अजूनकाही
महाराष्ट्रात १९व्या शतकात फुले-लोकहितवादी यांच्यापासून सुरू झालेल्या प्रबोधन पर्वाने रूढीप्रामाण्य, अंधश्रद्धा, शोषण यांवर कठोर प्रहार करून चिकित्सक विचार, समाजशिक्षण, समता, बंधुता, न्याय या तत्त्वांचा पुरस्कार केला. नव्या मूल्यांची पायाभरणी केली. या मूल्यांना राज्यघटनेने कायद्याचे अधिष्ठान दिले. याचाच परिपाक म्हणजे ज्यांना वर्षांनुवर्ष इथल्या व्यवस्थेने मनुष्यत्वाचे अधिकार नाकारून, त्यास धर्माचे अधिष्ठान दिले होते, त्या माणसांचे आत्मभान जागृत होऊ लागले. ती माणसे न्याय-हक्कांसाठी संघर्ष करू लागली. आपला संताप, दु:ख कथा, कादंबरी, काव्यातून मांडू लागली.
हाच आवाज वर्धिष्णू व्हावा, सवर्ण समाजाची संवेदनशीलता जागी व्हावी, या हेतूने ‘साधना’ साप्ताहिकाने स्वातंत्र्याच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने, १५ ऑगस्ट १९७२चा अंक ‘२५ वर्षांतील दलितांचे स्वातंत्र्य’ या विषयावर काढला. यात प्रथमच शिक्षणाच्या प्रवाहात आलेल्या दलित तरुणांचे लेख-अनुभव प्रसिद्ध करण्यात आले. यातील राजा ढाले यांचा लेख चार-दोन वाक्यांमुळे वादग्रस्त ठरला. त्यावर मतमतांतरे-वादसंवाद घडून आला. ‘साधना’वर मोर्चा-प्रतिमोर्चा, राजीनामे, माफीनामे अशा नाट्यमय घटना घडून आल्या. तो सर्व वादसंवाद व विशेषांक साधना साप्ताहिकाच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त पुस्तकरूपात उपलब्ध करून देण्यात आला आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
या पुस्तकाची पार्श्वभूमी सांगणारा सविस्तर लेख ‘साधना’चे विद्यमान संपादक विनोद शिरसाठ यांनी लिहिला आहे. हा लेख यांसारख्या वादांकडे कसे बघायचे याचे सम्यक भान देतो. शिरसाठ लिहितात, “या प्रकरणातून धडा मिळतो, तो हाच की, कोणत्याही शोषित समूहांची अभिव्यक्ती जहरी असणे स्वाभाविक, म्हणून त्याबद्दल आम जनतेने अधिक सहनशील व सहिष्णु होत जायला हवे आणि त्याच वेळी सामाजिक परिवर्तनासाठी लढणारांनी आपली अभिव्यक्ती करताना जबाबदारीचे भान ठेवायला हवे, तोल जाणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.” तारतम्य-विवेक हरवलेल्या आजच्या समाजात शिरसाठांच्या या दृष्टीकोनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
हे पुस्तक चार विभागात विभागले आहे. पहिल्या विभागात ‘२५ वर्षांतील दलितांचे स्वातंत्र्य’ हा संपूर्ण विशेषांक आहे. दुसर्या विभागात ‘साधना’चे तत्कालीन संपादक व कार्यकारी संपादक यांची राजीनामापत्रे, एस. एम. जोशी यांचा ‘तेजोभंगाचे पाप आम्ही करणार नाही’ हा विलक्षण उंचीचा लेख, मोर्चा-प्रतीमोर्चाचे वर्णन करणारा अनिल अवचट यांचा लेख, असे लेख आहेत. तिसऱ्या विभागात मतमतांतरं आहेत, तर चौथ्या विभागात सहा मान्यवरांचे लेख आहेत. या चारही विभागातील मजकूर कमालीचा वाचनीय व विचारप्रवृत्त करणारा आहे.
पहिल्या विभागाची म्हणजेच ‘२५ वर्षांतील दलितांचे स्वातंत्र्य’ विशेषांकाची सुरुवात यदुनाथ थत्ते यांच्या संपादकीय लेखाने होते. त्यांत त्यांनी साने गुरुजींचा ‘साधना’ साप्ताहिक काढण्यामागील ध्येयवाद सांगितला आहे व ‘साधना’च्या पंचवीस वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला आहे. तसेच या अंकाची भूमिका मांडली आहे. नंतर कार्यकारी संपादक अनिल अवचट यांचे टिपण आहे. स्पृश्य समाजाचे स्वातंत्र्याच्या रौप्य महोत्सवाच्या झगमगाटातून अस्पृश्य समाजाच्या वेदनांकडे लक्ष जावे, त्यांच्या आनंदाचा विरस व्हावा, या हेतूने अंक काढत आहोत, अशी भूमिका या टिपणात मांडली आहे. या अंकात एकूण १२ दलित तरुणांचे अनुभव असून ते वाचल्यावर दलितांसाठी शिक्षणाचा, सामाजिक प्रतिष्ठेचा लढा किती व कसा आव्हानात्मक आहे, याची जाणीव होते. कालच्या तुलनेत आज दलितांवरील अत्याचार कमी झालेले दिसतात, मात्र डोळसपणे समाजाकडे पाहिल्यास आजही या ना त्या स्वरूपात भेदभाव शाबूत असल्याचे दिसतात आणि सामाजिक सुधारणांचा वेग अतिशय संथ असल्याचे ध्यानात येते.
‘वास्तवाला सामोरे जायलाच हवे’ या लेखात जगदीश करंजगावकरांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतरच्या रिपब्लिकन पक्षाच्या राजकारणाचा वेध घेतला आहे. यात त्यांनी आपापसातील गटबाजी बाजूला ठेवून कम्युनिस्ट, समाजवादी, लाल निशाण या पुरोगामी पक्षांसोबत एकजूट घडवून आणून बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला रिपब्लिकन पक्ष उभारावा, असे आवाहन पक्ष नेतृत्वाला केले आहे. या पुस्तकाच्या निर्मितीस कारणीभूत ठरलेला राजा ढालेंचा (अंशतः संपादित केलेला) वादग्रस्त लेख सर्वाधिक वाचनीय आहे. खरे तर या लेखावरून इतका वाद होण्याचे काही कारण नव्हते. आपल्या समाजातील स्त्री-पुरुषांच्या होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध राजा ढालेंनी ओकलेल्या आगीकडे समाजाने सहिष्णूपणे बघायला हवे होते. अंतर्मुख व्हायला हवे होते. मात्र तसे झाले नाही. त्यामुळेच पुढचे नाट्य घडून आले. जो समाज शारीरिक-मानसिक अत्याचार सहन करतो, त्याच्या केवळ भाषिक अभिव्यक्तीवरून गदारोळ माजवणे, हे समाज म्हणून अपरिपक्वतेचे लक्षण आहे. यात महाराष्ट्रातील थोर विचारवंतही होते. मात्र हेही तितकेच खरे की, या सगळ्याकडे सहिष्णूपणे पाहणारेही होते, गदारोळ उगीच माजवला गेला, असे म्हणणारेही होते.
पुस्तकाच्या दुसर्या विभागात यदुनाथ थत्ते व अनिल अवचट यांचे संपादकपदाचे राजीनामे आहेत. याच विभागात विलक्षण एस.एम. जोशींचा लेख आहे. त्यातून जोशींची वैचारिक स्पष्टता व ती निर्भयपणे मांडण्याच्या हिमतीचे दर्शन होते. दोन मोर्च्यांची कहाणी सांगणारा अनिल अवचट यांचा लेख आहे. ‘साधना’वर आलेले दोन मोर्चे, त्यातील गमती-जमती, भाषणे यांचे रंजक वर्णन वाचताना ‘साधना’च्या आवारात काय काय घडले असेल, याचे चित्र नजरेसमोर उभे राहते.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत” हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...
पूर्वनोंदणी करण्यासासाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
तिसऱ्या विभागात राजा ढालेंच्या लेखावर प्रधान मास्तर, दत्तो वामन पोतदार, अ. के. भागवत या सारख्या थोरामोठ्यांच्या व अन्य वाचकांच्या प्रतिक्रिया आहेत. ढालेंचे सर्मथन करणारी ४१ विचारवंतांनी लिहिलेली प्रतिक्रिया आहे. या प्रतिक्रिया साधारणपणे तीन विभागात विभागात येतील. एक, राजा ढालेंची भाषा ग्राम्य व हलकट आहे, त्यामुळे संपादकांनी राजीनामा द्यावा. दोन, ढालेंची भाषा ग्राम्य आहे, त्यांवर संपादकीय संस्कार होणे आवश्यक होते, आशय शेरेबाजी न करताही पोहचवता आला असता. मात्र राजीनाम्याची जरूर नाही. तीन, राजा ढालेंनी वापरलेली भाषा गैर वाटत नाही. भाषा ‘सभ्य व शुद्ध’ ठेवण्याचा प्रयत्न बहुतेक वेळा वरिष्ठ थरांचे सांस्कृतिक प्रभुत्व राखण्याचा प्रयत्न असतो. या सर्व वादचर्चा उद्बोधक म्हणाव्यात अश्या आहेत.
चौथ्या विभागात सहा मान्यवरांचे लेख आहेत. अप्पा भेंडवडे यांनी लेखात राजा ढालेंच्या भाषेची थोडक्यात कारणमीमांसा दिली आहे. थत्ते-अवचटांनी राजीनामा दिल्यानंतरही ‘साधना’वर आलेल्या मोर्चेकऱ्यांना प्रश्न विचारले आहेत, हे प्रश्न आजही तितकेच प्रस्तुत ठरतात. नरहर कुरुंदकरांनी त्यांच्या लेखात संपादक, विश्वत मंडळाने राजीनामे देऊ नयेत, अशी भूमिका घेतली आहे. मात्र ‘अभद्र भाषेतील अभद्र अभिरूचीचे वाङ्मय’ असे ढालेंच्या लेखाचे वर्णन केले आहे. दुर्गाबाई भागवतांवर टीका असल्याने ते समजण्यासारखेही आहे. दि.के. बेडेकरांनी त्यांच्या लेखात प्रतीकांचा वापर स्वार्थी लोक कसा वापर करतात, याचा उहापोह केला आहे. दत्तात्रय काळेबेरे, न्यायप्रेमी, वसंत पळशीकर यांच्या लेखात वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे ढाले प्रकरणाची चिकित्सा आहे.
हे पुस्तक वाचताना शोषित, पीडित, दलित समाजाच्या कठोर अभिव्यक्तीकडे कालच्या तुलनेत आज आपण उदारपणे बघतो आहोत की, अनुदारपणे बघतो आहोत, हा प्रश्न विचारणे प्रस्तुत ठरते. या संदर्भात असे दिसते की, संस्कृतीरक्षक, ट्रोलर्सचा सुळसुळाट झालेल्या आजच्या समाजात आपण पिडितांच्या अभिव्यक्तीकडे कालच्या पेक्षा अधिक अनुदारपणे बघत आहोत. त्यांना व त्यांच्याविषयी बोलणार्यांना देशद्रोही, ‘अर्बन नक्षल’ ठरवत आहोत. असे केल्याने मूळ प्रश्न सुटणार नसून ते अधिक चिघळण्याचाच संभव आहे. म्हणून कोणत्याची अन्यायग्रस्त समाजाची किंवा व्यक्तीची जहरी अभिव्यक्ती समाजाने ‘सर्मथनीय नाही मात्र क्षम्य आहे’ असे मानून त्यांचे मूळ प्रश्न कसे सुटतील, हे पाहिले पाहिजे.
‘२५ वर्षांतील दलितांचे स्वातंत्र्य’ - संपा. अनिल अवचट
साधना प्रकाशन, पुणे
मूल्य - २०० रुपये.
.................................................................................................................................................................
लेखक सौरभ बागडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेत आहेत.
bagadesaurabh14@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment