टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • लालकृष्ण अडवानी, मायावती, मनोहर पर्रीकर, संजय लीला भन्साळी, नवाज शरीफ आणि अर्जंटिनामधील नवीन बेडूक
  • Wed , 15 March 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या लालकृष्ण अडवानी मायावती Mayawati मनोहर पर्रीकर Manohar Parrikar संजय लीला भन्साळी Sanjay Leela Bhansali नवाज शरीफ Nawaz Sharif अर्जंटिनामधील नवीन बेडूक Frog in Argentina

१. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना राष्ट्रपतीपद दिले जाण्याची शक्यता आहे. गुजरातमधील सोमनाथ येथील एका बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच राष्ट्रपतीपदासाठी अडवाणी यांचे नाव पुढे केल्याचे वृत्त आहे. या बैठकीला भाजप अध्यक्ष अमित शहा, केशुभाई पटेल आणि खुद्द लालकृष्ण अडवाणी उपस्थित होते.

चला, अडवाणींची ओळख ‘तहहयात भावी पंतप्रधान’ अशीच राहणार की काय, अशी शंका वाटत असताना मोदींनी ती बदलण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला, हे चांगलं झालं. उभयतांची राजधर्माची संकल्पनाही मॅचिंग आहे. शिवाय निवडणूक जुलैमध्येच असल्याने आणि भाजपकडे संख्याबळ असल्याने त्यांच्यावर ‘तहहयात भावी राष्ट्रपती’ बनण्याची वेळ येणार नाही.

...........................................................................

२. कोल्हापुरातील पन्हाळ्यावर येथे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ चित्रपटाच्या सेटला मंगळवारी रात्री आग लावण्याचा प्रयत्न झाला. मसई पठारावर सध्या या चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे. काही अज्ञात व्यक्तींनी मोडतोड करत सेटची जाळपोळ करण्याचाही प्रयत्न केला. काही महिन्यांपूर्वी राजस्थानमध्ये पद्मावतीचे चित्रीकरण सुरू असताना करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी भन्साळी यांना मारहाण केली होती.

करणी सेनेचे लोक कोणीतरी विचारशक्तीवरच करणी केल्यासारखं वागून संघटनेचं नाव भलत्याच प्रकारे सार्थ करतायत... जो सिनेमा अजून तयारच झालेला नाही, त्या सिनेमात आपल्या कोणत्या तरी काल्पनिक ऐतिहासिक श्रद्धास्थानाची विटंबना होणारच आहे, ही त्यांची अंधश्रद्धा अचाट आहे.

...........................................................................

३. मनोहर पर्रिकरांनी गोव्याचे १३वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. कोकणी भाषेत शपथ घेताना पर्रिकर ‘मुख्यमंत्री’ हा महत्त्वाचा शब्द विसरले. यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या मदतीला धावून गेले. ‘तुम्ही फक्त मंत्रिपदाची शपथ घेतली आहे,’ असं त्यांनी पर्रीकरांना सांगितलं. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री हा शब्द वापरून पुन्हा एकदा शपथ घेतली.

स्वाभाविक आहे. माणूस कितीही साधा, निष्ठावान कार्यकर्ता असला, सर्व सत्ताकांक्षांच्या वर पोहोचला असला, तरी संघटनेच्या आदेशामुळे दिल्लीचं मैदान सोडून गल्लीतल्या अंगणात यावं लागलं की, एवढी गडबड होणारच. गडकरींना वेगळीच काळजी. शपथ चुकल्याने काही तांत्रिक गडबड होऊन पर्रीकरांना पुन्हा दिल्लीलाच यावं लागलं, तर कितीजणांची केवढीतरी पंचाईत झाली असती ना?

...........................................................................

३. मतदान यंत्रामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करणाऱ्या बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी प्रत्युत्तर दिले आहे. मायावती यांचा पराभव हा चुकीच्या धोरणांमुळे झाला असून त्यांनी पराभवाचा स्वीकार केला पाहिजे असे जेटली यांनी म्हटले आहे.

भारतीय जनता पक्ष निवडणुकीत आहे म्हटल्यावर मायावती यांनी मुळात निवडणुकीत उतरायलाच नको होतं. उलट वेळात वेळ काढून भाजपचा, नोटाबंदीचा प्रचार करायला हवा होता. किमानपक्षी आपले काही हमखास विजयी होणारे भिडू कमळदलात पाठवून निवडून आणायचे होते. हे काही न करता त्यांनी निवडणूक लढवली म्हणजे रणनीती चुकलीच ना साफ!!

...........................................................................

४. अंधारात प्रकाशित होणारा पहिला बेडूक अर्जेटिनात सापडला असून त्याच्यात हिरवा, पिवळा व तांबडा रंग प्रकाशित रूपात दाखवण्याची क्षमता असते, पण अंधारात तो निळा व हिरवा प्रकाश बाहेर टाकतो. कमी तरंगलांबीचा प्रकाश शोषून जास्त तरंगलांबीचा प्रकाश बाहेर टाकण्याच्या गुणधर्माला प्रदीप्तता म्हणतात. आतापर्यंत उभयचरांमध्ये हा गुणधर्म दिसला नव्हता.

आता व्हॉट्सअॅप पोस्टची वाट पाहणं आलं... भारतात ऋषीमुनींच्या मंत्रशक्तीने प्रदीप्त होणारे बेडूक होते, त्यांच्या प्रकाशाने आकाशातल्या ढगांना सिग्नल मिळून पाऊस पडायचा, ही पर्जन्यदेवानेच निर्माण केलेली व्यवस्था होती. अशा रीतीने कृत्रिम पाऊसच नैसर्गिकरित्या पाडण्यात भारतीय पारंगत होते. त्यामुळे भारतीय बेडकांना अर्जेंटिनापर्यंत सगळीकडे मागणी होती. पण, भारतासारखी सुबक-सुंदर डबकी नसल्यामुळे बेडकांची ही प्रजाती कालौघात नष्ट झाली... घ्या... मिळवा फोटो... करा फॉरवर्ड! स्प्रेड इट लाइक फायर... क्यूंकि बिकाऊ मीडिया आप को ये सच नही दिखाएगी...

...........................................................................

५. बळजबरीने धर्मांतर करणे आणि दुसऱ्या धर्माच्या धार्मिक स्थळांवर हल्ला करणे इस्लाममध्ये अपराध मानले जाते, पाकिस्तान कोणत्याही धर्माविरोधात नाही. इथे धर्मावरून कोणतीच लढाई नाही, असे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी होळीनिमित्त आयोजित एका सोहळ्यात सांगितलं.

नवाज शरीफ आपला पक्ष भारतीय जनता पक्षात विलीन करून टाकून पाकिस्तान प्रदेशाध्यक्ष झालेत की काय? आता तिथेही पुढच्या निवडणुकांमध्ये भाजपला बहुमत मिळणार आणि अखंड हिंदुस्तानाचा दिशेने पाऊल पडणार अशी चिन्हं दिसतायत.

...........................................................................

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......