जागतिक कीर्ती मिळवलेल्या पाच, तर महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वांत प्रभावशाली असणाऱ्या १० व्यक्ती....
ग्रंथनामा - झलक
संपादक राजा कांदळकर
  • ‘१०१ प्रभावशाली महाराष्ट्रीयन आणि २१ उगवते तारे’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 19 August 2022
  • ग्रंथनामा झलक १०१ प्रभावशाली महाराष्ट्रीयन आणि २१ उगवते तारे राजा कांदळकर सचिन तेंडुलकर जयंत नारळीकर डॉ. गणेश देवी सुनील गावस्कर शरद पवार उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस अजित पवार प्रकाश आंबेडकर राज ठाकरे छगन भुजबळ सुप्रिया सुळे संजय राऊत डॉ. बाबा आढाव

संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेचा हिरक महोत्सव गेल्या वर्षी झाला. करोना संकटामुळे दोन वर्षं महाराष्ट्र बंद होती. मात्र या वर्षी ‘महाराष्ट्र दिन’ उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने मुंबईच्या लोकमुद्रा प्रकाशनाने ‘१०१ प्रभावशाली महाराष्ट्रीयन आणि २१ उगवते तारे’ हे कॉफी टेबल बुक प्रकाशित केले आहे. राजा कांदळकर यांनी संपादित केलेल्या या पुस्तकात महाराष्ट्रातील १०१ प्रभावशाली व्यक्ती आणि २१ उगवत्या ताऱ्यांचा थोडक्यात परिचय करून दिला आहे. या पुस्तकातला जागतिक कीर्ती मिळवलेल्या पाच, तर महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वांत प्रभावशाली असणाऱ्या १० व्यक्तींविषयीचा हा मजकूर...

.................................................................................................................................................................

जगाच्या पाठीवर

सचिन तेंडुलकर : भारतरत्न

भारतीयांचा क्रिकेटमधला देव आहे सचिन तेंडुलकर… फलंदाजीत जगात अव्वल... क्रिकेट आवडणाऱ्या जगभरच्या तरुणांचा आयकॉन.

मुंबईच्या ‘साहित्य सहवासा’तला हा मुलगा. शारदाश्रम शाळेत प्रशिक्षक रमाकांत आचरेकर सर भेटले आणि जगप्रसिद्ध क्रिकेटर झाला. १५ वर्षांचा असताना शंभर धावांवर नाबाद हा विक्रम. पहिला आंतरराष्ट्रीय सामना पाकिस्तानच्या कराचीत. नंतर सचिन एक दंतकथा बनत गेला. अर्जुन पुरस्कार, क्रिकेटर ऑफ द इयर आणि ‘भारतरत्न’ सन्मान. ‘सचिन - अ बिलियन ड्रिम्स’ हे त्याच्या जीवनावरचं पुस्तक जगभर गाजलंय.

खेळाडू म्हणून ते महान आहेत. माणूस म्हणूनही मोठे आहेत. २०० अनाथ मुलांचा सांभाळ करतात. पण त्याचा गाजावाजा करत नाहीत. किक्रेटचं पीच तयार करणाऱ्या आणि मैदानाची निगराणी ठेवणाऱ्या माळ्यांची ते आठवणीनं विचारपूस करतात. आऊट होणाऱ्या सेहवागवर कोच जॉन राईटने हात उगारला म्हणून सौरभने त्यांना माफी मागायला सांगितली. तेव्हा वडिलांच्या जागी असणाऱ्या राईट सरांकडून माफी मागायला लावणं बरं नाही, हे सांगणारे सचिन तेंडुलकरच. शेवटचा सामना बघायला आपल्या आईबरोबर आपल्या गुरूलाही आणण्याची व्यवस्था त्यांनी केली होती. आचरेकर सरांच्या आजारपणात त्यांची सगळी काळजी आणि व्यवस्था पोटच्या मुलाप्रमाणे सचिन यांनीच केली. अडचणीतल्या अनेक सहकारी क्रिकेटपटूंना व मित्रांना सचिन यांनी मदतीचा हात अनेकदा दिला, तेही कोणतीही अपेक्षा न करता.

देश जोडण्याचं काम पूर्वी गांधी, नेहरू, आझाद यांच्यासारखे नेते करत. आता राजकीय नेत्यांचा दुसरा उद्योग आहे. पण देश ज्यांच्या नावाने एक होतो असे होते एपीजे अब्दुल कलाम आणि आता सचिन तेंडुलकर.

.................................................................................................................................................................

जयंत नारळीकर : विश्वारंभाच्या शोधात

विश्वाचा जन्म १३ अब्ज वर्षांपूर्वी महास्फोटातून झाल्याचं मानलं जातं. जयंत नारळीकर यांनी त्या आधीचे म्हणजे २० अब्ज वर्षांपूर्वीचे काही तारे शोधून काढले. महास्फोट ही एक घटना आहे. हे विश्व त्या आधीही होतं. ते अनादी आहे आणि अनंतही. डॉ. जयंत नारळीकर यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासोबत ‘कन्फॉर्मल ग्रेव्हिटी थिअरी’ मांडली. अल्बर्ट आइनस्टाईन यांच्या सापेक्षतावादाच्या संश्लेषणातून त्यांनी ही नवी थिअरी मांडली आहे. विश्वारंभाच्या संशोधनात डॉ. जयंत नारळीकर यांचं नाव जगन्मान्य आहे. इतक्या मोठ्या शास्त्रज्ञानं मराठी साहित्याची आणि विज्ञानशिक्षणाची केलेली सेवा थक्क करणारी आहे. मराठीतल्या विज्ञानलेखनाचे जनकही तेच आहेत. खगोलशास्त्र सोप्या मराठीत त्यांनी आणलं. त्यांच्या विज्ञानकथांनी मराठी रसिकांचं रंजन आणि प्रबोधनही केलं. पक्के विज्ञाननिष्ठ आहेत. अंधश्रद्धेच्या विरोधात उघड भूमिका घेत असतात. भारतीय पुराणातल्या पुष्पक विमानासारख्या भाकडकथांचा त्यांनी पूर्वीच पर्दापाश केला आहे. नाशिकच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. पुण्याच्या ‘आयुका’च्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता.

.................................................................................................................................................................

डॉ. गणेश देवी : देव बनाम देवी

संघाने केंद्रातल्या भाजप सरकारवरच जबाबदारी सोपवली आहे. देशाचा १२ हजार वर्षांचा आर्य केंद्रीत इतिहास लिहिण्याचा. पुढच्या दोन वर्षांत इतिहासाची पुस्तकं बदललेली असतील. त्याविरोधात डॉ. गणेश देवी उभे आहेत. जगभरातील ७० हून अधिक ख्यातनाम इतिहासकारांकडून भारत इतिहासाची गाथा लिहून काढण्याचा महाप्रकल्प त्यांनी हाती घेतला आहे. भारत कधीही एक धर्म, भाषा, वंश, संस्कृती केंद्रित नव्हता. भारताचा इतिहास फक्त देवांचा नाही, दानवांचाही आहे. द्रविड भारताचाही आहे. तो संशोधनसिद्ध इतिहास गणेश देवी संपादित करत आहेत. हे राजकीय आव्हान आहे. त्या तयारीनं ते उतरले आहेत. याआधी ‘पिपल्स लिंगविस्टीक सर्वे’ त्यांच्या नावावर आहेच. भारतातल्या आठशे बोली भाषांना त्यांनी वाचवलं. हे काम नोबेल पारितोषिक मिळावं या तोडीचं आहे. अशा विषयात नोबेल पारितोषिक नसतं, पण तसं असावं म्हणून जगातल्या अनेक विद्यापीठातल्या मान्यवरांनी देवींच्या नावाची शिफारस केली आहे.

महान लेखिका महाश्वेता देवी यांच्यासोबत त्यांनी आदिवासी आणि भटक्या, विमुक्त जातीजमातींचं संघटन व संशोधन केलं. गुजरातमधील तेजगढला आदिवासी अकादमी उभी केली. ‘भाषा रिसर्च ॲण्ड पब्लिकेशन सेंटर’ सुरू केलं. महाभारताचे अब्राह्मणी भाष्यकार आहेत डॉ. गणेश देवी. ‘MAHABHARATA : THE EPIC AND THE NATION’ हे त्यांचं अलीकडचं पुस्तक. पण अशी अनेक पुस्तके गाजली आहेत. जगभरच्या वर्तमानपत्रांमध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध होतात. राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी देशभर काम नेलं.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

डॉ. आशुतोष कोतवाल : गॉड पार्टिकलच्या शोधात

अफाट, अकाल, अनंत, अविनाशी विश्वाचा पसारा आपल्यासाठी अगम्य, अतळ. हे विश्व जन्माला कसं आलं? त्या रहस्याचा शोध घेताना मूलकणांची संकल्पना १९२० मध्ये मांडली होती भारतीय शास्त्रज्ञ डॉ. सत्येंद्रनाथ बोस यांनी. त्यांच्या आणि पीटर हिग्ज यांच्या नावावरून ओळखला जाणारा हिग्ज बोझॉन म्हणजे गॉड पार्टिकल. Large Hadron Colliderच्या महाप्रयोगात अगदी अलीकडेच सिद्ध झाला. या मूलकणांना धरून ठेवणारा डब्लू बोझॉन. त्याचं वस्तुमान मोजलं डॉ. आशुतोष कोतवाल या मुंबईकर मराठमोळ्या शास्त्रज्ञाच्या टीमने गेल्याच वर्षी. जे वस्तुमान गृहीत धरलं होतं, त्यापेक्षा ७७ पटीने अधिक होतं ते. W : 80.379+0.012 GeV/c2 (2018) 80.43340.009 GeV/c2 (2022)

या वस्तुमानावर प्रभाव टाकणारे घटक कोणते आणि या मूलकणांचे सुपरमेट्रिक जुळे मूलकण कोणते, यांचा शोध सध्या सुरू आहे. त्यातून अतिशय उच्च पातळीवरच्या ऊर्जाविज्ञानाची पहाट उगवण्याची शक्यता आहे. व्हेरी लार्ज हेड्रोन कोलायडरची महाकाय संशोधन यंत्रणा उभारण्याचा आराखडा तयार करण्यात डॉ. आशुतोष यांचाही खास वाटा आहे.

.................................................................................................................................................................

सुनील गावस्कर :  क्रिकेटचं मराठी स्वप्न

कसोटी क्रिकेटच्या इतिहासातला सर्वोत्तम फलंदाज. असं जगभर नाव होतं सुनील गावस्कर यांचं. जगातल्या सर्वोत्तम सहा फलंदाजांपैकी ते एक होते. २००५ पर्यंत भारतीय क्रिकेट म्हणजे गावस्कर असं समीकरण होतं. १९७०-८०च्या दशकात गावस्करांनी भारतीय क्रिकेट टीमचं यशस्वी नेतृत्व केलं. सध्या समालोचक, स्तंभलेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. ‘सनी डेज’, ‘रन्स ॲण्ड रुईन्स’, ‘वन-डे वंडर’ ही तीन पुस्तकं गाजली त्यांची.

.................................................................................................................................................................

सर्वांत प्रभावी

शरद पवार : महाराष्ट्र पुरुष

जितीजागती दंतकथा बनले आहेत शरद पवार. कॅन्सरवर मात करून कैक वर्षं उलटली आहेत. पाय जायबंदी होऊनही हा माणूस हातात काठी न घेता चालतो. वयाची, आजारपणाची पर्वा करत नाही. वादळ येवो, अतिवृष्टी होवो, पूर येवो, भूकंप येवो शरद पवार वादळी वाऱ्यासारखे फिरतात. निवडणुकीत साताऱ्याला भर पावसात ते भिजले. वारंच फिरलं. ‘वारा खात, गारा खात, बाभूळ झाड उभंच आहे’ कवितेची ही ओळ आता बदलावी लागेल. खेड्यातल्या लोकांना बाभूळ झाड माहीत आहे आणि शरद पवारही. शहरातल्या नव्या पिढीला बाभूळ झाड माहीत नसेल कदाचित. शरद पवार नक्की माहीत आहेत.

लातूरला भूकंप झाला. कलेक्टर पोचण्याच्या आत मुख्यमंत्री असलेले शरद पवार किल्लारीला पहाटे पोचले होते. कोसळलेली घरे त्यांनी वर्षभरात उभी केली. गावं वसवली. दुःख आणि वेदनांवर मात करत लोकांना उभं केलं. बॉम्बस्फोटात मुंबई हादरली होती. पवारांनी २४ तासांच्या आत मुंबईचं स्टॉक एक्सचेंज पुन्हा चालू केलं. दंगलीच्या काळात पवारसाहेब दिल्लीत स्वस्थ बसू शकले नाहीत. ते मुंबईत धावून आले. मराठवाड्यात नामांतराच्या प्रश्नावरून दंगल पेटली. पोलादी हातांनी त्यांनी दंगल शमवली. मराठवाडा विद्यापीठाचं नामांतरही करून दाखवलं, आपली सत्ता गमावून. दोन्ही समाजाची मनं जुळवण्यासाठी पुन्हा शरद पवारच उभे राहिले.

ओबीसींसाठी मंडल आयोग अंमलात आणणारे आणि महिलांसाठी सत्तेत आरक्षण देणारे ते पहिले मुख्यमंत्री. कोकणातलं फलोत्पादन, ग्रामीण महाराष्ट्रातली साखर कारखानदारी आणि दूध व्यवसाय, तर मुंबई-पुणे-नाशिकचा औद्योगिक त्रिकोण. आर्थिक आघाडीवर महाराष्ट्र आजही अग्रेसर आहे. त्याचे क्युरेटर म्हणून एकच नाव घ्यावं लागेल- शरद पवार.

दोन शब्दांत वर्णन करायचं तर, महाराष्ट्र पुरुष.

.................................................................................................................................................................

उद्धव ठाकरे : कुटुंबप्रमुख

कोविडच्या भयभीत काळात रस्त्यावर चिडीचूप होतं. लोक घाबरलेले होते. अशा वेळी घरातल्या टीव्ही स्क्रीनवर उद्धव ठाकरे आले की, हे सगळं घर जणू आश्वस्त होऊन जायचं. आपल्याशी मुख्यमंत्री नाही, आपला कुटुंबप्रमुख बोलतोय, हीच महाराष्ट्रातल्या घराघरांत भावना होती. राज्याचा कुटुंबप्रमुख ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची इमेज आजही महाराष्ट्रातल्या घराघरांत घर करून आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षण, एसटीचा संप, ईडीच्या धाडी, आरोपांच्या फैरी, मंत्र्यांची जेलवारी, वादळ, अवकाळी पाऊस, या वादळात आणि वावटळीत मुख्यमंत्र्यांची ही प्रतिमा भंग करण्यात विरोधी पक्षांना अजून यश आलेलं नाही.

संघ, भाजप आणि मोदींच्या हिंदुत्वाला उत्तर कसं द्यायचं, यावर काँग्रेस आणि डावे पक्ष अजून चाचपडत आहेत. उद्धव ठाकरे यांनी मात्र असली आणि नकली हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करत भाजपच्या ‘हिंदू नॅरेटिव्ह’ला दिलेलं आव्हान भाजप आणि भाजपेतर पक्षांसाठीसुद्धा अनपेक्षित आणि अपरिचित होतं. संजय राऊत यांना ‘सामना’साठी दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे म्हणाले होते, ‘‘धर्माचा उपयोग करून होळी पेटवून सत्ता मिळवणं हे माझं हिंदुत्व नाही, अजिबात नाही. ‘हिंदूराष्ट्र’ पाहिजे असं हे रोज म्हणतात, पण हे असं जळणारं अशांत हिंदू राष्ट्र मला अपेक्षित नाही. हे हिंदूराष्ट्र मी नाही मानणार.’’

बाळासाहेब ठाकरे यांच्या कुंचल्यातील षट्कार आणि शाब्दिक टणत्कार यांच्याशी उद्धव ठाकरेंच्या भाषेची नेहमी तुलना केली जाते. उद्धव ठाकरे यांची भाषा सौम्य मानली जाते. बाळासाहेबांच्या नंतर सेना संपेल किंवा भाजप गिळेल, असं मानलं जात होतं. उद्धव ठाकरेंनी सेना वाढवली. सत्ताही मिळवली. खुद्द मुख्यमंत्रीही झाले. त्याहीपेक्षा उद्धव ठाकरे यांनी भाजपपुढे जे राजकीय वैचारिक आव्हान उभं केलं आहे, तो टणत्कारच आहे.

.................................................................................................................................................................

देवेंद्र फडणवीस : अनाथपिंडक

सुंदरी त्या मुलीचं नाव. अनाथ आहे. आईवडील कोण माहीत नाही. जातही नाही. तरीही ती आरक्षण मिळवून पीएसआय झाली. अनाथ अजातांसाठी ठेवलेल्या १ टक्का आरक्षणात पोलीस इन्स्पेक्टर होण्याचं स्वप्न तिने पूर्ण केलं. अनाथ अजातांसाठी आरक्षण सुरू करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आणि देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री, अनाथपिंडकांची आठवण देणारे. गौतम बुद्धांचा शिष्य होता अनाथपिंडक. जात पंचायतीच्या जात बहिष्कृत करणाऱ्या प्रथेवर बंदी घालणारे ते पहिले मुख्यमंत्री. रावसाहेब एस. के. बोले यांनी मंदिर प्रवेशाचा कायदा मुंबई विधिमंडळात केला. त्यानंतरचा हा विधिमंडळातला मोठा निर्णय.

‘केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र’ या घोषणेतून देवेंद्र फडणवीस घराघरांत पोचले. शरद पवारांनंतर महाराष्ट्राचे दुसरे तरुण मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस यांचा चमकदार रेकॉर्ड आहे हा. भाजपचा राज्यातला पहिला मुख्यमंत्री. वसंतराव नाईकांनंतर सलग पाच वर्षे महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री, असा फडणवीसांचा दबदबा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्कूलमधले राज्यातले पहिले मुख्यमंत्रीही तेच. पण मुख्यमंत्री म्हणून खट्टर किंवा योगींसारखे ते कधी वागले नाहीत. आपण संघाचे नव्हे, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहोत, याचं भान त्यांनी कायम राखलं.

‘जलयुक्त शिवार’, ‘स्मार्ट सिटी’, ‘बुलेट ट्रेन’, ‘मेट्रो’ या त्यांच्या कार्यकाळातील योजना महत्त्वाकांक्षी होत्या. पवारांशी लढणारा, अंगावर घेणारा नेता अशी फडणवीसांची प्रतिमा आहे. वकिलीचं शिक्षण घेतलंय त्यांनी. विधिमंडळात वकिली युक्तीवादांने विरोधकांना घायाळ करण्याची कला त्यांच्या वक्तृत्वात दिसते. ‘मी पुन्हा येईन’ ही त्यांची सभागृहातली घोषणा होती. पण सेनेच्या धोबीपछाडने त्यांना विरोधी पक्षनेता व्हावं लागलं. त्या भूमिकेत त्यांनी सरकारला हैराण करून सोडलं आहे. ते परत येतील, याची टांगती तलवारही त्यांनी आघाडी सरकारवर कायम ठेवली आहे.

.................................................................................................................................................................

अजितदादा पवार : फील्ड मार्शल

सकाळी सात वाजता सुरू होणारा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा दिवस कोविड काळातही खंडित झाला नाही.

एखाद्या नेत्याचा कामाचा झपाटा काय असतो, याचे उदाहरण म्हणून शरद पवार यांचं नाव घेतलं जायचं, परंतु अजित पवार याबाबतीत त्यांच्या एक पाऊल पुढे आहेत. त्यांची स्वतःची वेगळी कार्यशैली आहे. स्वभाव फटकळ अन् परखड.

अजितदादांकडे गेल्यावर काम होणारच. दादांच्या खात्याशी निगडित नसलं तरी ते दोन मिनिटांत काम पूर्ण करतात. तिथल्या तिथे रिझल्ट देतात. कोविड काळात सगळे कडीकुलपात बंद असताना अजित पवार यांनी ज्या तडफेने काम केलं, त्याची दखल महाराष्ट्राने नक्कीच घेतली असेल.

कोविड युद्धात सर्वांनी ती जवळून पाहिली. कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे हे स्वाभाविकपणे सर्वांना समोर दिसले. त्यात आश्चर्य नाही. पण त्या दोघांच्या यशामध्ये दादांचा अदृश्य वाटा आहे, हे नाकारता येणार नाही.

दादा कुठेही पडद्यावर येत नाहीत. पत्रकारांच्या कॅमेऱ्यासमोर जात नाहीत. पण पडद्यामागे राहून एखाद्या फिल्ड मार्शलसारखं तेही युद्ध लढत आहेत. ठाकरे सरकारचे खरे फिल्ड मार्शल अजितदादाच आहेत.

दादा बोलायला जितके फटकळ तितकेच अत्यंत सहृदय आहेत. संवेदनशील आहेत. निर्भय आणि निडर आहेत. अभ्यासू आहेत. आणि सर्वांत महत्त्वाचं निर्णय घेण्याची प्रचंड क्षमता त्यांच्याकडे आहे.

.................................................................................................................................................................

प्रकाश आंबेडकर : वंचितांचा प्रकाश

खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाव ठेवलं आपल्या नातवाचं- प्रकाश. नातू म्हणून प्रकाश आंबेडकर यांना राजकारण, समाजकारणात आदर मिळाला जरूर, पण त्यांनी स्वतःचा रस्ता संघर्ष करून शोधला. ‘वंचित बहुजन आघाडी’चे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत बाळासाहेब म्हणजे प्रकाश आंबेडकर. शोषितांचा एकच एक राष्ट्रीय पक्ष हवा, यासाठी आटापिटा करत आहेत. वंचित आघाडीत धनगर, माळी, बंजारा, मुस्लीम, दलित, आदिवासी समाजाला सता मिळवून देण्याचा राजकीय प्रयोग त्यांनी मांडलाय. गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात ३८ लाख मतांची मोट बांधली. गेल्या विधानसभा निवडणुकीत २३४ जागा लढवून २४ लाख मतं मिळवली वंचितने. वंचित नावाप्रमाणे राजकीय पक्ष म्हणून आवश्यक असलेली साधनं, पैसा आणि गणितं यापासून वंचित असूनही त्यांनी हे यश मिळावलं. ते तत्त्ववेत्ते आहेत. उत्तरेतल्या दलित नेत्यांप्रमाणे महात्मा गांधींना शत्रू मानत नाहीत. समन्वयाचा रस्ता शोधतात. भीमा कोरेगाव दंगलीनंतर महाराष्ट्र बंद केला होता त्यांनी. जॉर्ज फर्नांडिस, दत्ता सामंत, बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर बंद यशस्वी करणारे नवे ‘बंदसम्राट’ म्हणून बाळासाहेबांनी दरारा निर्माण केला. एकही आमदार, खासदार नाही, पण म्हणून त्यांचं राजकीय वजन कुणाला पुसता आलेलं नाही.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत” हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...

पूर्वनोंदणी करण्यासासाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

राज ठाकरे : क्राऊड पुलर

राज ठाकरे म्हणजे वाद आणि वादळे. ताजा विषय आहे भोंग्यांचा. राज्याच्या राजकारणात काहीसा मागे पडलेला मराठी भाषेचा, मराठी भूमीपुत्रांचा विषय त्यांनी मागे मांडला. दुकानांवरील मराठी पाट्यांचे आंदोलन, मोबाईल कंपन्या तसंच कॉल सेंटर्स यांच्या संवादात मराठी भाषेचा आग्रह, रेल्वे नोकर भरतीत भूमिपुत्रांना प्राधान्य, परप्रांतीयाविरोधी - हिंदीभाषिक वर्चस्ववादाविरोधाला विरोध या त्यांच्या ‘महाराष्ट्र धर्म’वादी भूमिकांसाठी मराठीजनांचा त्यांना पाठिंबा मिळाला खरा, पण उद्धव ठाकरेंच्या सेनेपुढे राजकीय पाडाव लागला नाही. २००७ अन् २०१२च्या महापालिका निवडणुकांत, २००९च्या विधानसभा निवडणुकीत मनसेला घवघवीत राजकीय यश लाभलं होतं, पण त्याच वेगानं ओसरलं.

बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे व्यंगचित्रकला आणि रोखठोक - आक्रमक वक्तृत्वशैली आत्मसात केलेले राज ठाकरे आज त्यांच्या पक्षाचा केवळ एक आमदार असला तरी निर्विवादपणे महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय नेत्यांपैकी एक आहेत.

मनसेचा झेंडा आणि राजकीय विचारधारा बदलल्यावरून राज ठाकरेंवर गेले काही दिवस सातत्याने टीका होत आहे. तरीही विविध वृत्तवाहिन्या तसंच समाजमाध्यमांवर झालेल्या अनेक सर्वेक्षणानुसार ते तरुणांमधील सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत, आणि गर्दी खेचणारा नेताही.

.................................................................................................................................................................

छगन भुजबळ : ओबीसी चेहरा

बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक म्हणून राजकारणात झेपावले होते छगन भुजबळ. पण मंडल आयोगाच्या मुद्द्यावर सेना सोडली त्यांनी. आता ते देशातील सर्वांत मोठा ओबीसी चेहरा बनले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारमध्ये अन्नपुरवठा मंत्री. पण पक्षाच्या चौकटीत भुजबळ मावत नाहीत. ओबीसी आरक्षण, ओबीसींची जणगणना या विषयांवर राज्य आणि देश पातळीवर भुजबळांनी दबावगट उभा केला. महात्मा फुले समता परिषदेच्या मंचावरून देशव्यापी ओबीसी संघटन उभं केलं. महात्मा फुल्यांचा विचार देशभर नेला.

सत्तेचा अमृतकुंभ कुणाच्याच लेखी नसतो, पण मिळालेल्या सत्तेचा वापर कुणासाठी, या प्रश्नाचं उत्तर भुजबळांनी जेव्हा जेव्हा सत्ता हाती आली, तेव्हा तेव्हा दिलं आहे.

भुजबळांच्या वाट्याला तर हलाहल अधिक आलं. न केलेल्या अपराधाची शिक्षा त्यांना भोगावी लागली. मरणाला हात लावून ते परत आले. ती त्यांची विजिगीषु वृत्ती प्रत्येक संघर्षात दिसते.

ओबीसींच्या प्रश्नांवर ते कधीच तडजोड करत नाहीत किंवा माघार घेत नाहीत. देशातील ओबीसींचं नेतृत्व ब्रह्मप्रकाश चौधरी, कर्पूरी ठाकूर अशा दिग्गजांनी केलं. आज शरद यादवांकडे आदरानं पाहिलं जातं. त्या शरद यादव यांनीच आता जाहीर केलंय, ओबीसींचा आता एकच नेता आणि एकच आधार आहे तो म्हणजे छगन भुजबळ.

.................................................................................................................................................................

सुप्रिया सुळे : हिंसा मर्दिनी

सिल्वर ओकवर दगड आणि चपलांचा मारा सुरू असताना हिंसक जमावाला त्या सामोऱ्या गेल्या. सुप्रिया सुळे यांचं धीरोदात्त नवं रूप महाराष्ट्रानं, देशानं त्या दिवशी पाहिलं. हिंसा मर्दिनीचं.

आता त्या फक्त शरद पवार यांची मुलगी राहिलेल्या नाहीत. सतत दौरे, लोकांत मिसळणं, महिलांच्या प्रश्नांवर भिडणं, कार्यकर्त्यांना जपणं, घरात आणि मनात ताई म्हणून शिरणं. गेल्या काही वर्षांत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वतःचं स्थान आणि प्रभाव निर्माण केला आहे. शरद पवारांच्या सभ्य व सुसंस्कृत राजकारणाचा वारसा त्यांच्याकडे आहेच. पण एकाच वेळी शहरी आणि ग्रामीण अपील त्यांनी मेहनतीनं आत्मसात केलं आहे.

त्यांची संसदेतील पूर्ण वेळची उपस्थिती, सक्रीय सहभाग, हिंदी, इंग्रजी भाषांवरील प्रभुत्व आणि अभ्यासू वृत्तीमुळे राष्ट्रीय राजकारणातही त्यांनी छाप पाडली आहे. बारामतीत त्यांनी सुरू केलेला ‘संविधान चौक’ त्यांच्या विचारांची बांधीलकी सांगतो.

.................................................................................................................................................................

संजय राऊत : तख्यत पालटणारा

सत्तेला प्रश्न विचारणारे संपादक महाराष्ट्राने पाहिले, पण एक संपादक ताज आणि तख्त पालटतो. संजय राऊत हे असे वेगळे संपादक आहेत. प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या शैलीचा प्रभाव त्यांच्या पत्रकारितेवर आहे. अन भाषाशैलीवरही आहे. बाळासाहेब नसतानाही त्याच पद्धतीचं लेखन ‘सामना’मध्ये होत असल्याचं अनेकांना आश्चर्य वाटतं. बाळासाहेब ठाकरेंची फटके मारणारी आणि बोचकारे काढणारी अशी मार्मिक शैली होती. संजय राऊत यांनी ती शैली तंतोतंत आत्मसात केली. राऊत बाळासाहेबांच्या शैलीशी इतके एकरूप झाले की, बाळासाहेब बोलतात तसं संजय राऊत लिहितात की, राऊत लिहितात तसं बाळासाहेब बोलतात, असा प्रश्न अनेकांना पडायचा.

शिवसेनेचे खासदार म्हणून संजय राऊत यांचा राज्यसभेत स्वतंत्र ठसा आहे. सेनेचे प्रवक्ते म्हणून दिल्लीत धाडसाने वावरतात. ते काय बोलतात यावर देशाच्या मीडियाचं लक्ष असतं. सतत वाद आणि वादळे अंगावर घेणारे संजय राऊत तितकेच हजरजबाबी, आक्रमक आहेत.

संजय राऊत यांच्या करिअरची सुरवात आधी पत्रकार आणि नंतर राजकारणी अशी झाली. ‘लोकप्रभा’ साप्ताहिकात ‘क्राईम रिपोर्टर’ म्हणून त्यांची पत्रकारिता गाजली. तिथे त्यांनी अनेक सनसनाटी स्टोरीज केल्या. आपल्या लेखांमधून ते शिवसेनेच्या भूमिकेशी मिळतीजुळती भूमिका घेत असल्याचं बाळासाहेब ठाकरेंना जाणवलं. १९८९ला ‘सामना’ सुरू झाला तेव्हा कार्यकारी संपादक होते अशोक पडबिद्री. पडबिद्री यांच्यानंतर बाळासाहेबांनी संजय राऊत यांना बोलावून घेतलं.

ऑक्टोबर २०१९मध्ये भाजप-शिवसेनेला बहुमत मिळालं होतं. पण भाजपचं सरकार बनलं नाही. काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेचं सरकार आलं. पण संजय राऊत यांनी हे आधीच लिहून ठेवलं होतं. विधानसभा निवडणूक मतदानाच्या आदल्या दिवशी. त्यांच्या रोखठोक लेखात.

.................................................................................................................................................................

डॉ. बाबा आढाव : फुलेंचा सत्यशोधक

साने गुरुजींच्या श्यामचं लढाऊ रूप म्हणजे डॉ. बाबा आढाव. नथुरामी फॅसिझम आणि मनुवादी ढोंगबाजीच्या विरोधातला बुलंद नारा. एक गाव, एक पाणवठा म्हणजे बाबा. परित्यक्त्या स्त्रियांचा मुक्तीदाता, हमाल मापाड्यांचा कैवारी. बाबा म्हणजे काच-पत्रा वेचणाऱ्या हातांच्या जखमा पुसणारा जणू डॉ. अल्बर्ट स्वाईटझर.

मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी पिछड्यांना हाक घालणारा लोहियावादी. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी जेल भोगणारा सत्याग्रही. जयपूर हायकोर्टासमोरील मनुचा पुतळा हटवण्यासाठी लाँग मार्च काढणारा महाराष्ट्राचा बंडखोर. गोरगरिबांना परवडणारी कष्टाची भाकरी देणारा अन्नपूर्णदाता. असंघटित मजुरांच्या पेन्शनसाठी दिल्लीला धडक देणारा जणू नारायण मेघाजी लोखंडे. डॉ. बाबा आढाव म्हणजे सत्यशोधकांचा इतिहास महाराष्ट्रापुढे जागता ठेवणारा महात्मा फुलेंचा शेवटचा सत्यशोधक. बाबाचं आयुष्य फुलेमय आहे, पण त्यांच्यात गांधी, आंबेडकर यांचा समन्वयही आहे.

‘१०१ प्रभावशाली महाराष्ट्रीयन आणि २१ उगवते तारे’ - संपादक राजा कांदळकर

लोकमुद्रा प्रकाशन, मुंबई

पाने - १४०

मूल्य - २००० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......