‘सिद्धार्थ’सारख्या तात्त्विक समस्येला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेल्या कादंबऱ्या एका वाचनात संपत नाहीत आणि समजतसुद्धा नाहीत. पण शंभर वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेली ही कादंबरी आजही खिळवून ठेवते!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
प्रा. अविनाश कोल्हे
  • ‘सिद्धार्थ’ या कादंबरीचे मुखपृष्ठ
  • Fri , 19 August 2022
  • ग्रंथनामा शिफारस सिद्धार्थ Siddhartha हरमन हेस Hermann Hesse गौतम बुद्ध Gautama Buddha

भगवान बुद्धांपासून दूर गेलेला सिद्धार्थ दिशाहीन भटकत राहतो. पण यात प्रत्येक टप्प्यावर त्याला काही ना काही गवसत जाते, त्याची माणूस म्हणून उन्नती होत असते. हरमन हेसने या अवस्थेचे वर्णन केले आहे – “मार्गावरील सिद्धार्थचं प्रत्येक पाऊल काहीतरी नवीन घेऊन येत होते. जगाकडे पाहण्याची दृष्टी बदलल्यामुळे सारंच मंत्रमुग्ध करणारं आणि सुंदर वाटत होतं. चंद्रसूर्य अनंतकाळापासून अवकाशामध्ये प्रकाशत होते. हे सारं पूर्वीही होतंच; पण तेव्हा सिद्धार्थच्या डोळ्यांवर पडदा पडला होता.” (पृ.४३) या टप्प्यावर त्याची भेट कमला या वारांगनेशी होते. तोपर्यंत सिद्धार्थने घर सोडून तीन वर्षं झालेली असतात आणि त्याने एकदाही स्त्रीचा सहवास भोगला नसतो. हरमन हेस नमूद करतो, “सिद्धार्थने प्रथमच एका स्त्रीबरोबर नजर न झुकवता संभाषण केलं” (पृ.४८), कमलाला बघितल्याबरोबर सिद्धार्थला एका वेगळ्या जगाची जाणीव होते. असं जग जे त्याने अद्याप बघितलेले नाही आणि जे बघणं त्याच्या आत्मिक प्रगतीसाठी नितांत गरजेचं आहे.

जीवनदर्शक संवाद

सिद्धार्थ कमलाला विनंती करतो, “आणि कमला, तुला राग येणार नसेल तर माझी मैत्री स्वीकारशील का; तसंच माझी गुरू होशील का हेही विचारायचं होतं. कारण तू ज्या कलेत एवढी पारंगत आहेस तिच्याबद्दल मला काहीही माहिती नाही.” (पृ.४७) या कादंबरीच्या प्रवासात जसा सिद्धार्थ-भगवान बुद्ध हा संवाद अतिशय महत्त्वाचा आहे, तसाच सिद्धार्थ-कमला हा संवाद महत्त्वाचा आहे. कमला सिद्धार्थच्या एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणते, “आपल्याजवळचं ज्ञान किंवा विचारशक्ती किंवा धर्मनिष्ठा लुटून नेईल अशी एखाद्या ब्राह्मणाला किंवा श्रमणाला भीती असते का? नाही; कारण या गोष्टी ही त्याची स्वतःची मालमत्ता असते. त्या कोणाला द्यायच्या, किती द्यायच्या हे सर्वस्वी त्याच्या इच्छेवर अवलंबून असतं. हीच गोष्ट कमलालाही लागू पडते. प्रेमही जबरदस्तीने मिळवता येत नाही. कमलाच्या लालबुंद रसरशीत ओठांचं तिच्या मर्जीविरुद्ध चुंबन घ्यायला गेलास तर तुला त्यांच्यातील माधुर्य चाखता येणार नाही. प्रेम ही अशी गोष्ट आहे जी तुला विनंती करून मिळवता येईल; तू ते विकतही घेऊ शकतोस किंवा तुला ते भेटही मिळू शकेल, पण ती कधीही चोरता येणार नाही.” (पृ.५०)

अशा संवादातून सिद्धार्थ आणि कमलाची मैत्री फुलत जाते. ती त्याला कामक्रीडेत निपुण करते. एवढेच नव्हे, तर तिच्यामुळे त्याला कामस्वामी या शहरातल्या सर्वांत धनाढ्य व्यापाऱ्याकडे नोकरीसुद्धा मिळते, येथेसुद्धा हरमन हेस सिद्धार्थ आणि कामस्वामी यांच्या पहिल्या मुलाखतीत झालेल्या संवादांतून वेगळे तत्त्वज्ञान वाचकांसमोर आणतो. जेव्हा कामस्वामीला समजतं की, सिद्धार्थ श्रमण होता, तेव्हा त्याला वाटतं की, सिद्धार्थ दुसऱ्याच्या जीवावर जगत होता. सिद्धार्थ उत्तरतो, ‘असं दिसतंय खरं. तसं बघायचं तर एक व्यापारीही इतरांच्या पैशावर जगतो.’ ‘बरोबर बोललास; पण पैशांच्या बदल्यात तो वस्तू देतो’ हेच जीवनाचं सूत्र आहे असं दिसतं. इथे प्रत्येक जण देत असतो आणि त्या बदल्यात काहीतरी घेत असतो. सर्वत्र हेच दिसून येतं ‘अरे, पण तुझ्याकडे काही नाहीच. मग तू कोणाला काय देणार?’ यावर सिद्धार्थ शांतपणे म्हणतो, ‘प्रतीक्षा, विचार आणि उपवास. माझ्याकडे या तीन गोष्टी आहेत.’ (पृ.५८) कमलाप्रमाणे कामस्वामीसुद्धा सिद्धार्थच्या बुद्धिकौशल्यामुळे प्रभावित होतात आणि त्याला स्वतःजवळ ठेवून घेतात.

सिद्धार्थ लवकरच त्यांच्याकडून व्यापारातील सर्व खुब्या शिकून घेतो. पण त्याला यातील कशाचीही ओढ नाही, आकर्षण नाही; हे नमूद करायला लेखक हेस विसरत नाही. एका बाजूला पैशाचं, व्यापाराचं जग; तर दुसरीकडे कमलाचा बेभान करणारा सहवास, ती देत असलेलं शरीरसुख अशा

रितीने सिद्धार्थचं नवं जीवन सुरू होतं. असं भोगलोलुप जीवन जगत असतानासुद्धा सिद्धार्थला सतत जाणीव असते की आणि आजूबाजूच्या लोकांमध्ये एक अदृश्य दरी आहे आणि तो त्याचं कारण तो पूर्वाश्रमी श्रमण होता हे असतं. याचा एक वेगळा परिणाम होता. हे दाखवताना हरमन लिहितो, 'एकेकाळी ईश्वर आणि ब्रह्मनच्या विचारांनी त्याचं मन व्यापलेलं असायचं. आता ती जागा लोक आणि त्यांच्या समस्यांनी घेतली होती (पृ.६३). सिद्धार्थचा आधिभौतिकाकडून भौतिकाकडे प्रवास सुरू असतो.

सुखभोगाकडून विरक्तीकडे...

हरमनने सिद्धार्थ या मध्यवर्ती पात्रात झालेला बदल फार सफाईने वाचकांसमोर उभा केला आहे. एवढेच नव्हे तर सिद्धार्थच्या मनात त्याच्या पूर्वायुष्याबद्दल असलेल्या भावनांबद्दल संभ्रम निर्माण झालेला दाखवला आहे. अनेकदा सिद्धार्थला आपल्या या मनोवस्थेची भीती वाटत राही. आपल्यालाही या लोकांप्रमाणे साध्यासुध्या गोष्टींमध्ये सुख शोधणं का जमत नाही? अलिप्तपणे बघ्याची भूमिका घेण्याऐवजी या जीवनाचा मी मुक्तपणे आनंद का घेऊ शकत नाही? असे प्रश्न त्याला पडत.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

अशी वर्षांमागून वर्ष जातात. एव्हाना सिद्धार्थ धनवान झालेला असतो. त्याला अफाट लोकप्रियता मिळालेली असते. असं असूनही एक कमला सोडली तर त्याला एकही जिवलग मित्र नसतो. सिद्धार्थच्या अंतरंगात झालेले बदल टिपताना हरमन लिहितो, ‘असं सुखासीन जीवन जगत असतानादेखील तो स्वतःला इतरांपेक्षा वेगळा आणि उच्च दर्जाचा समजायचा. इतरांकडे काहीशा तुच्छतेने, उपहासाने पाहायचा तो. श्रमणाची सर्वसामान्य जनलोकांकडे पाहण्याची दृष्टी अशीच तिरस्कारपूर्ण असते. मात्र हळूहळू सिद्धार्थच्या दृष्टीत बदल झाला. त्याच्या स्वभावातील इतरांना हीन लेखण्याची वृत्ती नष्ट होत गेली. मंद गतीने त्याच्या चेहऱ्यावर अन्य श्रीमंत लोकांप्रमाणे असमाधानाचे, रिकामपणाचे भकास भाव कायमचेच ठाण मांडून बसले. अखेर श्रीमंत लोकांना ग्रासणाऱ्या मानसिक आजारपणाची बाधा त्यालाही झाली.’ (पृ.६९)

येथे हरमन हेस एक लेखक म्हणून काय सुचवत आहे? सिद्धार्थचा जन्म धनाढ्य घरात झालेला आहे. मनातील अस्वस्थतेपोटी तो श्रमण बनतो आणि कष्टप्रद जीवन जगायला लागतो. नंतर पुन्हा एकदा त्याच्या जीवनात भौतिक सुखं भरभरून येतात. या खेपेला मात्र सिद्धार्थ त्यांच्यात रमतो. हा दोन सिद्धार्थमधला फरक समजून घेतला पाहिजे. पहिला सिद्धार्थ अननुभवी होता, तर आताचा सिद्धार्थ जीवनाच्या अनेक अंगांचा भरपूर भोग घेतलेला प्रौढ वयाचा पुरूष आहे. ‘त्याच्या चेहऱ्यावर वार्धक्याच्या खुणा दिसायला लागल्या होत्या’ (पृ.७१), अशा स्थितीत आलेल्या सिद्धार्थासमोर पश्चातापदग्ध होण्याला पर्याय नसतो. ‘मी आयुष्याची माती केली, आजवर चांगलं काहीही कमावलं नाही, फक्त गमावलंच अशा विचारांनी तो सैरभैर झाला’. त्याक्षणी त्याला लख्ख जाणीव झाली की, ‘तो हा खेळ यापुढे खेळू शकणार नाही. त्याच्यापुरती या संसारनामक नाटकाचा पडदा पडला आहे. त्या रात्री सिद्धार्थने बगिच्याचा, घराचा, नगरीचा कधीही न परतण्यासाठी, कायमचा निरोप घेतला. मात्र त्याचं बाळ कमलाच्या उदरात वाढत होतं.’ (पृ.७५). हा उल्लेख अतिशय महत्त्वाचा आहे. ही माहिती असूनही सिद्धार्थ ते नगर, त्याला अतिप्रिय असलेली कमला सोडून जातो. पितृत्वाचा मोह त्याला रोखू शकत नाही.

आत्मशोधाचा नवा टप्पा

गर्भवती कमलाला सोडून आल्यानंतर सिद्धार्थचा पुन्हा एकदा निरुद्देश प्रवास सुरू होतो. मात्र आताचा सिद्धार्थ आणि तरुणपणी वडिलांचे घर सोडलेला सिद्धार्थ यांच्यात जमीन-अस्मानचा फरक आहे. सर्व प्रकारचे भोग भोगून झाल्यानंतर त्याच्या मनात एक प्रकारचे वैराग्य निर्माण झाले असते. सिद्धार्थच्या या अवस्थेचं वर्णन करताना हरमन लिहितो, ‘जगातील एकही गोष्ट त्याला आकर्षित करण्याइतपत, त्याला आनंद आणि समाधान देईल एवढ्या महत्त्वाची राहिली नव्हती.’ (पृ.७७) अशा अवस्थेतील सिद्धार्थ नदीकाठी झोपतो. उठतो. तेव्हा त्याच्यासमोर भिक्खूच्या अवस्थेतील त्याचा जुना मित्र गोविंद बसलेला असतो. इथेसुद्धा सिद्धार्थ आणि गोविंद यांच्यातील संवाद उदबोधक आहे. जेव्हा सिद्धार्थ गोविंदला विचारतो की, आता तू  कोठे जाणार आहेस?’ तेव्हा गोविंद उत्तरतो, ‘मी कुठेही जात नाही. पर्जन्यऋतू वगळता आम्ही सतत प्रवास करत असतो. एका ठिकाणाहून दुसऱ्या, मग तिसऱ्या, असा आम्ही सतत प्रवास करत असतो.’ (पृ.८१) गोविंद पुढच्या यात्रेला निघून गेल्यावर सिद्धार्थला पुन्हा आत्मपरीक्षण करण्याची संधी मिळते. ‘मूर्खपणाचा कळस गाठला तेव्हाच माझ्यामधील आत्मनचा शोध लागला मला. पापं केली म्हणून पुनर्जीवन लाभलं. आता हा मार्ग मला कुठे घेऊन जाईल हे माहीत नाही. हा मार्ग भलेही वेडेपणाचा असेल किंवा चक्राकार किंवा नागमोडी जात असेल. ते काहीही असो मी याच मार्गाने जाणार हे निश्चित.’ (पृ.८५).

या टप्प्यावर सिद्धार्थचा पुढचा प्रवास सुरू होतो. हा प्रवास भौतिक कमी आणि आत्मिक जास्त असतो. नदीच्या किनारी त्याला खूप वर्षांपूर्वी भेटलेला नावाडी भेटतो. नावाड्याच्या म्हणजे वासुदेवच्या लक्षात येते की, त्याने सुमारे वीस वर्षांपूर्वी सिद्धार्थला नावेत बसवून पैलतीरी नेले होते. आता सिद्धार्थ त्याच्याजवळ राहू लागतो. वासुदेवकडून तो नावेची डागडुजी करायला शिकतो, घाटावर काम नसेल तेव्हा वासुदेवबरोबर भाताच्या शेतात जायला लागतो, या दरम्यान तो नदीकडून खूप काही शिकतो. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तो नदीकडून ‘कसं ऐकावं’ हे शिकतो (पृ.९३). या दरम्यान त्याच्यात आणि वासुदेव यांच्यात झालेल्या संवादांतून अनेक तात्त्विक बाजू समोर येतात. सिद्धार्थ वासुदेवला विचारतो ‘समय, काळ अशी काही संकल्पना नसतेच हेही रहस्य तुला नदीने सांगितलंय का?’ यावर वासुदेव उत्तरतो, ‘नदीला भूत आणि भविष्यकाळ नसतोच. ती केवळ वर्तमानकाळात असते.’ (पृ.९४)

अशीच वर्षामागून वर्ष जातात. पूज्य गौतम बुद्ध अतिशय आजारी असून लवकरच मृत्यू पावणार आहे, अशी बातमी सर्वत्र पसरल्यानंतर नदी पार करून बुद्धाच्या दर्शनाला येणाऱ्यांची नदीकाठी मोठी गर्दी होऊ लागते. याच गर्दीत सिद्धार्थला कमला दिसते. तिने बुद्धाचं अनुयायित्व स्वीकारलेलं असतं. तीसुद्धा आता तिच्या छोट्या अकरा वर्षांच्या मुलाला घेऊन बुद्धाचे दर्शन घ्यायला आलेली असते. तिला विषारी साप चावतो आणि ती मरते. जीवनाच्या या टप्प्यावर बाप-लेक समोरासमोर येतात. यासाठी हरमन हेसने ‘पुत्र’ हे प्रकरण लिहिले.

पुत्रप्रेमाचा तिढा

मुलाला आईने अतिलाडात वाढवलेले असते. आता तिच्या मृत्यूनंतर त्याला वडिलांबरोबर गरिबीत, झोपडपट्टीत राहावे लागते. साहजिकच त्याची चिडचिड सुरू होते. मात्र मुलगा भेटल्यानंतर सिद्धार्थ कमालीचा खुश होतो. आपलं जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध झालं असंही त्याला वाटतं. मला इथं, सत्यजित राय यांच्या अप्पू त्रिधारेतील (‘पथेर पांचाली’, ‘अपराजित’ आणि ‘अपुर संसार’) शेवटचा सिनेमा ‘अपुर संसार’मधलं शेवटचं दृश्य आठवलं. चार-पाच वर्षांचा मुलगा आणि त्याचे वडील यांचे मनोमिलनाचा क्षण सत्यजित राय यांनी अतिशय हळूवारपणे चित्रित केलेला आहे.

सिद्धार्थचा मुलगा मात्र सतत भांडणाच्या पवित्र्यात असतो. तो एकाही कामाला हात लावत नाही. पुत्राच्या आगमनाने आनंदित झालेल्या सिद्धार्थला मुलामुळे केवळ मनस्ताप आणि त्रास होत राहतो. मुलात बदल होईल, या आशेवर सिद्धार्थ हे सहन करतो. कैक महिने असेच उलटतात. मुलात काहीही बदल होत नाहीत. या संदर्भात नंतर वासुदेव सिद्धार्थला समजून सांगतो, ‘तुझ्या मुलाला वेगळं घर, वेगळ्या जीवनशैलीची सवय होती. ते ऐशआरामाचं जीवन त्याने स्वेच्छेने सोडलं नाही, त्याला या झोपडीत राहायला आवडत नाही, हे अगदी साहजिक आहे. तू त्याला कडक शिस्त लावत नाहीस, त्याला शिक्षा करत नाहीस, त्याला शिस्त न लावण्यात, त्याला शिक्षा न करण्यात तुझी चूक होतेय, असं वाटत नाही का? त्या घमेंडी, लाडावलेल्या पोराला तू दोन म्हाताऱ्यांबरोबर या मोडक्या झोपडीत राहण्यासाठी सक्ती करू शकत नाहीस.’ (पृ.१०३)

क्लेशदायी सोबत

कथानकाच्या या टप्प्यावर मला लेखक म्हणून हरमन हेसबद्दल अधिक आदर वाटतो. भारतीय संस्कृतीत आणि भारतीय समाजात ‘पुत्रप्रेम’ आजही फार महत्त्वाचे समजले जाते. महाभारतातील धृतराष्ट्राला इतरेजण दुर्योधनाबद्दल सांगत राहतात, तेव्हा धृतराष्ट्र मात्र पुत्रप्रेमाने आंधळा झालेला असतो. हाच प्रकार सर्व सुखदु:ख कोळून प्यायलेल्या प्रौढ सिद्धार्थबद्दलही घडतो. त्याच्यासमोर जेव्हा त्याचा लहान मुलगा येतो, तेव्हा सिद्धार्थच्या मनातील आपलेपणाची भावना उफाळून येते. तो मुलाला स्वतःपासून दूर करायला नाखुष असतो. भारतीय संस्कृतीतील हे वैशिष्ट्य जाणवणे आणि ते कमालीच्या सर्जनशील पातळीवरून वाचकांसमोर मांडणे वगैरे हरमन हेसची कौशल्यं वादातीत आहेत.

याच संबंधाने हरमन लिहितो, ‘सिद्धार्थला मित्राचा सल्ला मानवणारा नव्हता. पुत्राला दूर करणं शक्य नव्हतं. मुलाने केलेले अपमान, हिडिसफिडीस तो मुकाट्याने सहन करायचा. सिद्धार्थ स्वतःला वेगळा एकमेवाद्वितीय समजायचा; पण आता पुत्रप्रेमाने अंध झालेला सिद्धार्थ त्याच सामान्य लोकांच्या पंक्तीत येऊन बसला होता. मायेपोटी वेडा झाला होता तो. उशिरा का होईना आयुष्यात प्रथमच, त्याला एका आगळ्या भावनेची अनुभूती झाली होती, एकाच वेळी क्लेश आणि सुख देणारं, त्याला समृद्ध करणारं, ऊर्जा देणारं अनोखं प्रेम!’ (पृ.१०५)

मुलाच्या मनात वडिलांबद्दल जराही प्रेम निर्माण होत नाही. तो अतिशय नाराजीने वडिलांसोबत राहात असतो. एक दिवस त्याच्या रागाचा स्फोट होतो. मुलगा म्हणतो, ‘माझ्यावर हात उगारण्याची तुमच्यात हिंमत नाही. तुमचा हा अति चांगुलपणा मला शिक्षेसारखा वाटतो. तुम्हाला त्रास द्यायचा म्हणून मी चोऱ्यामाऱ्या करेन, खून करेन. तुमच्यासारखं होण्यापेक्षा नरकात जाणं पत्करेन. मी पिता म्हणून कधीही तुमचा स्वीकार करणार नाही...’ (पृ.१०६) दुसऱ्याच दिवशी मुलगा पळून जातो. इथे मला महात्मा गांधी आणि त्यांचा थोरला मुलगा हरिलाल यांच्यातील कमालीचे तणावाचे संबंध आठवले. हरिलालमुळे गांधीजींना खूप मानसिक त्रास सहन करावा लागला होता. (या विषयावर ‘गांधी माय फादर’ नावाचा अप्रतिम हिंदी सिनेमा आहे.)

पुत्रप्रेमाने अंध झालेला सिद्धार्थ मुलाचा शोध सुरू करतो. जंगलात सर्वत्र मुलाला शोधत असलेल्या सिद्धार्थला एका क्षणी जाणवतं की, मुलाला साऱ्या दुःखापासून दूर ठेवण्यासाठी आपली धडपड किती निरर्थक, किती मूर्खपणाची आहे!

(इथेसुद्धा वाचकांना भगवान गौतम बुद्धाच्या लहानपणी त्याच्या वडिलांनी कोणतेच दुःख दिसू नये म्हणून केलेली अयशस्वी धडपड आठवते.) मुलावर आपले निर्णय लादणे गैर आहे, मुळात त्याला मदत करणंच चुकीचं आहे हेही उमजतं. (पृ.१०८) ही जाणीव झाली तरी आपल्याला पुत्रप्रेम मिळालं नाही, हे शल्य त्याला त्रस्त करतच राहतं. चोर, दरोडेखोर, पापी लोकांना अपत्य प्रेम लाभतं. मग मलाच का नाही, हा प्रश्न त्याच्या डोक्यातून जात नाही.

या भावनेचा सिद्धार्थवर झालेला परिणाम नोंदवताना लेखक लिहितो, ‘पुत्रप्रेमापोटी अखेर तो कोणताही विचार न करता बोलणाऱ्या सर्वसाधारण लोकांच्या पंक्तीत जाऊन बसला, हे मात्र खरं. लोकांबद्दल त्याचं पूर्वीबद्दलचं मतही बदललं. ते फारसे हुशार, स्वाभिमानी नसतीलही; पण कदाचित म्हणूनच ते अधिक प्रेमळ, दयाळू आणि उत्सुक स्वभावाचे बनत असावेत.’ (पृ१११) इथे हरमन हेस कळत-नकळत संन्याशांना प्रापंचिकांबद्दल वाटणाऱ्या तुच्छतेवर बोट ठेवतो आणि या दोन जीवनशैलीतील, मानसिकतेतील फरक दाखवून देतो.

अंतर्बाह्य परिवर्तन

या टप्प्यावर लेखकाने हुशार आणि ज्ञानी सिद्धार्थच्या विचारविश्वात अपत्यवियोगाने झालेले बदल फार हुशारीने नोंदवले आहेत. निवेदक लिहितो, ‘वास्तविक पाहता सामान्यजन ज्ञानी पंडितांपेक्षा कोणत्याही दृष्टीने गौण नाहीत. किंबहुना, अनेकदा ते त्यांच्यापेक्षा वरचढच असतात असं त्याचं निरीक्षण होतं. सिद्धार्थला ‘ज्ञान म्हणजे नेमकं काय आणि तो कशाच्या शोधात आहे, याचा अर्थ धिम्या गतीने गवसत गेला.’ (पृ.११३) सिद्धार्थची ही अंतर्बाह्य उन्नती बघून सुजाण वाचक विस्मयचकीत होतो. सिद्धार्थच्या या अद्भुत प्रवासात वाचकही त्याच्याबरोबर सावलीसारखा असतो.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत” हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...

पूर्वनोंदणी करण्यासासाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

नंतर सिद्धार्थला स्वतःचे वडील आठवतात. आपण घर सोडून गेल्यावर आपल्यामुळे वडिलांच्या नशिबी पुत्रवियोगाचं दुःख आलं. जे आज आपल्या नशिबी आलेलं आहे. एकदा सिद्धार्थ आणि वासुदेव नदीच्या किनारी तिचं बोलणं ऐकत बसलेले असतात. सिद्धार्थला नदीच्या प्रवाहात वडिलांचा, त्याचा आणि त्याच्या मुलाचा चेहरा दिसू लागतो. यातून त्याला जीवनाचं सातत्य जाणवतं आणि नदीची मुक्कामाला जाण्याची ओढसुद्धा. सुरुवातीला त्याला नदीतून असंख्य आवाज ऐकू येत असतात. जशीजशी त्याची एकाग्रता वाढत जाते, तसतसे अनेक आवाज क्षीण होत जातात आणि शेवटी फक्त ‘ओम’ ऐकू येत राहतो. हे जीवनाच्या परिपूर्णतेचं प्रतीक. सिद्धार्थचं पुत्रवियोगाचं दुःख हलकं व्हायला लागतं. याची अंतिम अवस्था व्यक्त करताना हरमन हेस लिहितो, ‘त्या क्षणापासून सिद्धार्थने नियतीशी झगडणं थांबवलं. ज्ञानी माणसामध्ये दृग्गोचर होणारी अपार शांती त्याच्या चेहऱ्यावर पसरली. पापांपासून मुक्ती मिळाली. जीवनाशी सुंदर समन्वय झाला, मनात अपार शांती आणि माया भरली नदीपुढे शरणागती पत्करली.’ (पृ. ११६).

क्षण ज्ञानप्राप्तीचा

आता कादंबरी शेवटच्या टप्प्यावर आल्याचं वाचकांना जाणवतं. सिद्धार्थचा प्रवास संपत आला आहे, त्याला ज्ञानप्राप्ती झाली आहे, हे वासुदेवला जाणवतं. तो याच क्षणाची वाट पाहत असतो. तो क्षण आल्यावर वासुदेव नदीचा आणि सिद्धार्थचा निरोप घेतो. आता सिद्धार्थच्या अंतिम प्रवासात गोविंदची भेट उरते. अपेक्षेप्रमाणे ही भेट होते, पण तोपर्यंत स्वतः सिद्धार्थ वयोवृद्ध झालेला असतो. तसंच गोविंदसुद्धा. गोविंदच्या कानी आता नावड्याचं काम करत असलेल्या सिद्धार्थची कीर्ती जाते. गोविंद अशा स्थितीत सिद्धार्थला ओळखत नाही आणि त्याच्या नावेत बसतो. गोविंद नावाड्याचं काम करत असलेल्या सिद्धार्थला विचारतो, ‘तू यात्रेकरू, भिक्खूबरोबर प्रेमाने वागत असतोस, त्यांना पैलतीरी त्यांच्या मार्गी पोहोचवतोस. तुलाही योग्य मार्ग शोधावासा वाटत नाही का?’ (पृ.११९) नंतर मात्र गोविंद सिद्धार्थला ओळखतो आणि त्याच्या आग्रहाखातर एक रात्र सिद्धार्थच्या झोपडीत राहतो. एवढा प्रवास केल्यावर आणि गुरू केल्यावरही गोविंदला प्रवास संपलेला नसतो. त्याच्या तुलनेत नावाडी असलेल्या सिद्धार्थच्या चेहऱ्यावर शांती विलसत असते. गोविंद जेव्हा याबद्दल सिद्धार्थला विचारतो, तेव्हा सिद्धार्थ उत्तरतो, ‘मित्रा, तुला आठवत असेल, तरुणपणी संन्याशांसोबत वनामध्ये राहत असतानादेखील माझा कोणत्याही सिद्धांतावर किंवा तत्वांवर विश्वास नव्हता. ते शिकवणाऱ्या गुरूंकडे मी पाठ फिरवली होती. आजदेखील माझे असेच विचार आहेत.’ या उत्तराने गोविंदचे समाधान होत नाही. त्याला सिद्धार्थने ज्ञान कसं आणि कोणाकडून मिळवलं, हे जाणून घ्यायचं असतं. त्यावर सिद्धार्थ उत्तरतो, ‘शहाणपण दुसऱ्याला देता येत नाही. तसा प्रयत्न केला तर तो असफल ठरतो. किंबहुना तो मूर्खपणाचा वाटतो.’ एवढंच नव्हे तर सिद्धार्थ असंही म्हणतो, ‘सत्याला दोन बाजू असतात आणि दोन्ही बाजू तितक्याच खऱ्या असतात. कोणतीही गोष्ट, कोणीही व्यक्ती पूर्णतः चांगली किंवा वाईट नसते. मानवाला एकाच वेळी संसार आणि निर्वाण या दोन्ही गोष्टी साध्य करता येतात. क्लेश आणि स्वर्गसुख या एकाच गोष्टीच्या दोन बाजू आहेत.’ (पृ.१२३)

ज्याच्या त्याच्या ठायी बुद्ध

इथं गोविंदप्रमाणेच वाचकसुद्धा बुचकळ्यात पडतात. अपेक्षेप्रमाणे सिद्धार्थ समजून सांगतो, ‘बुद्ध होण्याची सुप्त क्षमता प्रत्येकामध्ये असते. पण त्याची जाणीव होणं आवश्यक असतं. गोविंद, हे जग अपरिपूर्ण नाही. परिपूर्णतेकडे त्याची संथ गतीने वाटचाल होत आहे असंही नाही. जग प्रत्येक क्षणी परिपूर्ण असतंच. प्रत्येक निरागस बालक अखेरीस विकलांग वृद्ध होणार हे निश्चित ठरलेलं आहे. भूत, वर्तमान आणि भविष्य असे तिन्ही काळ एका वेळी पाहता येतात.प्रत्येक गोष्टीचा आनंदाने स्वीकार केल्यामुळे नैराश्येला वाव नसेल. गोविंद, हे माझे अनुभवाअंती बनलेले विचार आहेत.’ (पृ.१२३) कादंबरीच्या अगदी शेवटी गोविंदला सिद्धार्थने काय मिळवलं आणि आपण काय मिळवलं नाही, याची जाणीव होते. ‘मस्तक जमिनीला टेकून त्याने पुतळ्यासारख्या स्तब्ध बसलेल्या सिद्धार्थला नमन केलं. सिद्धार्थच्या चेहऱ्यावरील मंद हास्यामध्ये आजवरच्या जीवनात ज्या ज्या गोष्टींवर त्याने जीवापाड प्रेम केलं, ज्या गोष्टी त्याच्यासाठी आत्यंतिक मूल्यवान आणि पवित्र होत्या त्या साऱ्यांचं दर्शन होत होतं.’ (पृ.१२८)

न संपणारा प्रवास

इथे ही चिमुकली, १२८ पानांची कादंबरी संपते. एवढ्या छोट्याशा अवकाशात लेखकाने काय काय साधले याचा अंदाज येतो आणि मन आदराने भरून येते. कादंबरी वाचून संपल्यानंतर काही वाचकांना सिद्धार्थप्रमाणे आपला प्रवास संपल्याची जाणीव होईल, तर काही वाचकांच्या मनांत गोविंदप्रमाणे प्रवास अद्याप न संपल्याची जाणीव असेल. हरमन हेसच्या ‘सिद्धार्थ’सारख्या तात्त्विक समस्येला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेल्या कादंबऱ्या एका वाचनात संपत नाहीत आणि व्यवस्थित समजतसुद्धा नाहीत. अशी कादंबरी लिहिणं फार अवघड आहे. ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकातील बुद्धकालीन वातावरण उभं करणं वगैरे तर आव्हानं आहेतच. पण खरं आव्हान असतं त्यातील तात्त्विक संघर्ष, त्यातला पूर्वपक्ष-उत्तरपक्ष समर्थपणे वाचकांसमोर मांडणं. या कसोटीला हरमन हेस पुरेपूर उतरला आहे.

विहंगम... आशयघन...

या कादंबरीतील तात्त्विक चर्चा वाचताना हे सर्व आत्मसात करण्यासाठी आणि लिहिण्यासाठी एक लेखक म्हणून पाश्चात्य संस्कृतीत जन्मलेल्या, वाढलेल्या हरमनने किती तयारी केली असेल, किती वाचन केलं असेल, याचा अंदाज येतो.

सिद्धार्थ ही जरी छोटेखानी कादंबरी असली, तर आशयाच्या पातळीवर फार मोठा पट कवेत घेते. ही बाबसुद्धा हरमन हेसच्या लेखनकौशल्याची साक्ष देते. जबरदस्त आशय व्यक्त करण्यासाठी मोठ्या आकाराची कादंबरी लिहावी लागते, या प्रचलित असलेल्या समजाला यामुळे धक्का बसतो.

हरमन हेस या जर्मन लेखकाने या कादंबरीसाठी भारतीय तत्त्वज्ञानाचा, भगवान बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा भरपूर अभ्यास केला असेल, याबद्दल शंका नाही. मात्र असं असलं तरी त्याचा आत्मा भारतीय नसल्यामुळे अतिशय काळजी घेऊन लिहिलेल्या ‘सिद्धार्थ’मध्ये एक प्रसंग मात्र खटकल्याशिवाय राहत नाही. पृष्ठ १६ वर सिद्धार्थचे पिता त्याला सांगतात, ‘आता जा. तुझ्या मातेचं चुंबन घेऊन ये.’ भारतीय समाजजीवनात मातेचं चुंबन घेत नाही, तर तिच्या पाया पडतात. मातेचं चुंबन घेण्याची पद्धत पाश्चात्य संस्कृतीत आहे. याचा अर्थ पाश्चात्य पद्धत वाईट आणि भारतीय पद्धत चांगली, असं मला अजिबात सुचवायचं नाही. मी फक्त दोन संस्कृतीत काय फरक आहे, हे दाखवून दिलं.

कादंबरीचं भाषांतर उल्का राऊत यांनी केलं आहे. श्रीमती राऊत ज्येष्ठ भाषांतरकार आहेत. त्यांच्या नावावर अनेक भाषांतरित पुस्तकं आहेत. त्यांनी हे भाषांतर मेहनत घेऊन केल्याचं पदोपदी जाणवतं. काही ठिकाणी मात्र दोष राहिले आहेत. ‘एकाच वेळी जिंकायचं आणि हरवायचंही असतं’ असं वाक्य पृष्ठ ६० वर आहे. या वाक्यात ‘हरवायचंही’च्या ऐवजी ‘हरायचंही’ असं असायला हवं होतं. तसंच पृष्ठ ७४ वर, ‘त्याच्यापुरती या संसारनामक नाटकाचा पडदा पडला आहे,’ असं वाक्य आहे. यात ‘त्याच्यापुरती’ऐवजी ‘त्याच्यापुरता’ असं असायला हवं होतं. पृष्ठ १०८ वर ‘आपल्या अजाण पळपुट्या मुलाबद्दल त्याच्या मनात अपार माया दाटून आली’ असं वाक्य आहे. यातील ‘पळपुट्या’ऐवजी दुसरा एखादा सकारात्मक (उदाहरणार्थ ‘अननुभवी’) शब्द वापरायला हवा होता. मराठीत ‘पळपुट्या’ शब्दाला नकारात्मक छटा आहे. असे काही संपादन आणि मुद्रितशोधनाच्या पातळीवरचे किरकोळ दोष वगळता श्रीमती राऊत यांचं भाषांतर उत्तम झालं आहे. मात्र संतुक गोळेगावकरांनी केलेलं कादंबरीचे मुखपृष्ठ असमाधानकारक आहे. कादंबरीचा आधिभौतिक आशय, लेखकाची तरल भाषा आणि मुखपृष्ठावर वापरलेले बटबटीत रंग एकमेकांना पूरक ठरत नाहीत. भगवान बुद्धाचं चित्र वापरण्याऐवजी अमूर्त शैलीत मुखपृष्ठ केलं असतं तर अधिक चांगलं झालं असतं.

बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९२२ साली प्रसिद्ध झालेली हरमन हेसची ही कादंबरी आजही आपल्याला खिळवून ठेवते. भारतीय मनाला आध्यात्मिक जगाची, संन्यासाची आंतरिक ओढ असते. त्यातही भगवान बुद्धाचं जीवन तर फारच गुंतागुंतीचं होतं. राजघराण्यात जन्मलेला, विवाहित, एक मुलाचा पिता असलेला सिद्धार्थ एक रात्री या सर्वांचा त्याग करून जगातल्या दुःखाचं मूळ आणि त्यावर उपाय शोधायला घराबाहेर पडतो, ही गोष्टच विलक्षण आहे. हरमनने अशा भगवान बुद्धाच्या जीवनावर कादंबरी न लिहिता सिद्धार्थमध्ये भगवान बुद्ध एक महत्त्वाचे पात्र म्हणून आणले आहे. याबद्दल हरमनच्या प्रतिभेला त्रिवार सलाम. यामुळे तो वेगळा परिणाम साधू शकला आहे.

‘सिद्धार्थ’सारख्या कलाकृती सुबुद्ध वाचकांसमोर असंख्य प्रश्न उभे करतात. अशा प्रश्नांना गणितात असतात, तशी उत्तरं नसतात. या प्रश्नांची उत्तरं प्रत्येकाला स्वतंत्रपणे शोधावी लागतात. शिवाय या उत्तरांत याचं उत्तरं बरोबर आणि त्याचं चुकीचं, असं काहीही नसतं. अशा आशयसूत्रावर जेव्हा कादंबरी संपते, तेव्हा वाचक स्वतःमध्ये पूर्णपणे हरवून गेलेला असतो. इतरांशी काय, पण स्वतःशीसुद्धा बोलण्याची, स्वतःचा आवाज ऐकण्याची त्याची इच्छा होत नाही. हीच निःशब्दता वाचकांचं आत्मभानही जागवणारी ठरते आणि जाणिवा समृद्ध होत गेल्याची भावनाही देऊन जाते...

‘सिद्धार्थ’: हरमन हेस

मराठी भाषांतर : उल्का राऊत

साकेत प्रकाशन, औरंगाबाद

पाने : १२७

मूल्य : १५० रुपये.

 

(‘मुक्त-संवाद’ या पाक्षिकाच्या १५ ऑगस्ट २०२२च्या अंकातून साभार)

.................................................................................................................................................................

लेखक अविनाश कोल्हे निवृत्त प्राध्यापक आणि कथाकार, कादंबरीकार आहेत.

nashkohl@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......