गेल्या काही वर्षांत व्यामिश्र आणि सतत बदलत राहणाऱ्या वास्तवाची काव्यात्मकतेशी तडजोड न करता आपल्या कवितांतून नेमकेपणाने अभिव्यक्ती करणारे जे काही चांगले कवितासंग्रह मराठीत प्रकाशित झाले असतील, त्यांत प्रवीण दशरथ बांदेकर यांच्या ‘चिनभिन’ या कवितासंग्रहाचा समावेश करावा लागेल. या संग्रहातील कविता विविध आशयसूत्रांच्या आधारे एकूण सहा भागांत विभागलेल्या आहेत.
या सगळ्या कवितांतून कवीच्या व्यक्तिगत जगण्यातील जखमा, चिंता आणि अस्वस्थता या बाबी जशा दृग्गोचर होतात, तसंच अवतालभवताली घडणाऱ्या सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील ऱ्हासशीलतेकडे वाटचाल करणाऱ्या घटना-दुर्घटनांनी व्यथित झालेलं त्याचं मनही दिसतं. त्याच्या मनाच्या तळघरात विराट अस्वस्थता वसत असावी, असं या कविता वाचल्यानंतर वाटतं. तसंही ‘अस्सल कविता या तुमची आत्मशांती नष्ट केल्याशिवाय लिहिणं शक्यच होत नाही,’ असं श्रेष्ठ भारतीय कवी चंद्रकांत देवताले यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगून ठेवलेलं आहेच. बांदेकर यांची ‘आत्मशांती’ नष्ट होण्याची कारणं जशी व्यक्तिगत आहेत, तशीच ती त्याहून कितीतरी अधिक पटींनी बाह्य जगातल्या सर्व प्रकारच्या आपमतलबी आणि फसव्या व्यवहारांनी बद्ध असलेल्या, हिंसक घटनांनी वेढलेल्या सार्वजनिक जगातही गुंतलेली आहेत. या संग्रहातील कविता वाचल्यानंतर याची पुरेपूर प्रचिती येते. त्यामुळेच मनाची सैरभैर अवस्था अशा अर्थाचं ‘चिनभिन’ हे या संग्रहाचं शीर्षकही अत्यंत समर्पक आहे, असं आपण म्हणू शकतो.
बांदेकरांच्या कविता बाहेरच्या काळोख पसरलेल्या वातावरणाची यथायोग्य जाणीव करून देतात. आणि या बाह्य वातावरणाचे सुट्या सुट्या व्यक्तीच्या जीवनावर, त्या व्यक्तीचे इतरांशी, समाजाशी असलेले जे संबंध आहेत, त्यांवर कोणते परिणाम होत आहेत, याकडेही निर्देश करतात. या अंधाराकडून उजेडाकडे जाण्यासाठी आवश्यक असणारी ब्ल्यू प्रिंट उपलब्ध करून देणारी ही भाबडी कविता नाहीय. ती या सर्वदूर पसरत असणाऱ्या अंधाराचीच वेगवेगळी रूपं आपल्यासमोर सादर करते. या अंधारातील निसरड्या टोकांची जाणीव करून देण्यासाठीच यांतल्या काही कवितांत निराशावादी सूर लागलेला दिसतो. आपल्या अवघ्या जगण्याला वेढून असणाऱ्या अंधाराची नीट ओळख झाली की, उजेडाकडे जाण्याचा मार्ग आपला आपण शोधायचा आहे. त्यासाठी ‘स्व’लाही सोलून काढणारे नेमके प्रश्न विचारावे लागतील. त्यांची उत्तरं कवितेत नाही, तर प्रत्यक्ष जगण्यात सापडतील.
१.
गेल्या काही वर्षांत आपल्या राज्यकर्त्यांकडून जो काही तथाकथित ‘विकास’ घडवून आणला गेला आहे, त्याच्या पापुद्र्याखाली अनेक बाबींच्या नष्ट होण्यातून घडणारा विनाश टाहो फोडतो आहे. त्याचे विपरीत परिणाम जरी दृश्य रूपात सर्वांसमोर असले तरी वेगवेगळ्या प्रकारची धुंदी डोळ्यांवर चढलेली असल्यामुळे त्यांकडे सोयीस्कर कानाडोळा केला जातो आहे. मग आपल्या नद्यांचं पाणी नासवलं गेलं आणि ‘पिढीजात मालकीचे समुद्र, डोंगर बोथट केले गेले’ तरी त्याची बोच मनाला लागत नाही. कारण प्रत्येक जण आपापल्या भाषेत वा जातीत फुशारक्या मारत मिरवण्यात मश्गूल आहे. या सगळ्या गोष्टींचा उल्लेख बांदेकर ‘अवदसेच्या काळातलं जगणं तुझं माझं’ या कवितेत ‘अवदसा’ असा करतात. या अवदसेची वावटळ घरादारांवर धडका मारू लागली आहे आणि त्यातून उद्याच्या जगण्याची साशंकता आणि असुरक्षितता वाढीला लागली आहे, हे सांगताना हा कवी लिहितो, ‘...उद्या मी हा असाच पावलं टाकेन काय / जन्मापास्नं ओळखीच्या या भुईवर ओळखीच्या या हवेत / ...कळत नाहीय कुणालाच, दिवस आहे की रात्र / जागे आहोत की झोपेत आपण / हे आपलेच अवयव की ब्रँडेड प्रॉडक्ट्स?’
ही संभ्रमित करणारी स्थिती कवीला बोचत राहते. तो ‘म्हटलंच तर काळंबेरं’ या कवितेत ही मानसिक स्थिती व्यक्त करतो. आज अवतीभवती कोलाहल इतका प्रचंड आहे की, ‘एक आवाज दुसऱ्यातून वेगळा करायला खूप प्रयत्न करावे लागतील’. नेहमीच्या परिचित गोष्टी त्यांच्या ठरीव आकार-रूपात दिसत नाहीत, काही आठवत नाही, मागचं दिसत नाही, पुढचं ऐकू येत नाही, अशी अधांतरी लोंबकळल्यासारखी मनःस्थिती या कवितेत व्यक्त झालीय. ती आजच्या काळाचं यथोचित रूपक आहे, असंही म्हणता येऊ शकतं. ‘दुःखाची भाषा कळत नाही दिशांना’ या कवितेतही संभ्रमावस्था आणि स्वतः दुनियेच्या बाजारातून ‘आउटडेटेड’ होत चालल्याची जाणीव, तसेच आपण नेमके कुठे उभे आहोत हेच कळू नये, अशी अवस्था आणि बरं-वाईट लिहिताना काही गवसत नसल्याची वेदना तीव्रपणे मुखर झाली आहे.
काळ तर असा विपरीत आला आहे की, ‘आपल्याच घराच्या आसपास कुणीतरी दबा धरून बसलंय’ आणि ‘आपल्या आरशांतही त्यांचीच प्रतिबिंबं उमटतायत’ अशी भयावह परिस्थिती कवी अधोरेखित करतो. या पराभूत, निराश करणाऱ्या दिवसांची उजळणी करताना त्याच्या मनाला ‘आपल्या अंगणी आपण पोरके’ झाल्याची वेदना डाचत राहते. आणि म्हणूनच तो ‘गे माये / उद्याचे कसे थोपवावे?’ असे प्रश्नार्थक आर्त मांडतो. आजच्यापेक्षाही उद्याचा काळ आणखी भयावह असणार आहे, याचं संसूचन तो या ओळींतून करतो.
‘आपलं काहीतरी...’ या कवितेत एक विशिष्ट मनोवस्था चित्रित करण्याचा प्रयत्न केला आहे. या कवीला सतत स्वप्नांत दिसत राहतं की, आपला मुलगा हरवलाय. कधी कधी तर खुद्द तो स्वतःच हरवलाय आणि त्याचे वडील त्याला धुंडाळू पाहतायत, असंही दृश्य त्याला दिसत राहतं. माणसाला जी स्वप्नं पडतात, त्यांना जागृत अवस्थेत घडणाऱ्या घटनांचा संदर्भ असतो. त्या घटनांची मनात चालणारी विश्लेषण प्रक्रिया स्वप्नांच्या घडणीला कारणीभूत ठरते. मुलगा हरवत असल्याचं स्वप्न वारंवार पडण्यामागेही आसपासच्या माणसांसोबत असणाऱ्या नात्यांत निर्माण होणारे ताण, अस्थिर, बेभरवशी सामाजिक-राजकीय परिस्थिती यांचा संदर्भ असू शकतो.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
स्वप्नं पडणं हा कवीचा अगदी खासगी अनुभव आहे, पण त्यातूनही तो भवतालच्या स्थितीकडे अप्रत्यक्षपणे सूचन करतो. आपल्या आत कोणत्याही प्रकारच्या संवेदना शिल्लक राहणार नाहीत, काहीही नवं गवसणार नाही, आसपासच्या कुणाच्याही मदतीसाठीच्या हाका आपल्यापर्यंत पोहोचणार नाहीत, अशी कुणी जाणीवपूर्वक व्यवस्था करून ठेवली आहे की, काय अशी शंका तो ‘कुणी केलीय ही भक्कम तरतूद’ या कवितेत व्यक्त करतो.
याला आधीच्या पिढीतील लोक जबाबदार आहेत की, समकालीन असाही प्रश्न त्याला पडतो. पण त्याबाबत तो ठाम काही सांगू शकत नाही. यातून त्याची संभ्रमित अवस्था निदर्शनास येते. या कवितेतून आसपासच्या जगाची असंवेदनशीलता, क्रूरतादेखील अप्रत्यक्षपणे अधोरेखित होते. तो ‘आपल्या आतले भयाचे चेहरे’, ‘अजूनही आपल्या काळात’ या कवितांतूनही आजच्या काळाविषयी त्याच्या मनात असणारा संभ्रम, कसलाच भरवसा न वाटण्याच्या दिवसांतून जाताना येणारे अनुभव आणि मुक्त अस्तित्वाला झाकोळून टाकणारं भय यांची अभिव्यक्ती करतो.
२.
मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्यानंतर चहूअंगांनी येऊन आदळणारं जागतिकीकरणाचं वारं आपल्या समाजातील आधीच्याच गुंतागुंतीच्या असणाऱ्या समस्यांना अधिकच जटिल करत गेलं. अधिक उत्पादन, विक्री आणि हव्यासी नफा या त्रिसूत्रीभोवती सगळा राजकीय-आर्थिक विचार केंद्रित झाल्यामुळे व्यक्तीची ‘व्यक्ती’ म्हणून असलेली प्रतिष्ठा लोप पावत जाऊन त्याला ‘ग्राहक’ ही नवी ओळख अंगीकारायला भाग पाडलं गेलं. कवी ‘गिऱ्हाईक’ या आपल्या कवितेत आजच्या बाजारकेंद्री जगात एखाद्या व्यक्तीवर सगळ्या बाजूंनी कशा तऱ्हेने विविध पद्धतींनी वस्तूंच्या विक्रीचा मारा केला जातो आणि अंततः ती व्यक्ती ‘सगळेच एवढं कानीकपाळी ओरडतायत तर एकदा वापरून बघायला काय हरकत आहे?’ असा विचार करायला कशी विवश होते, याचं चित्रण करतो.
हा जाहिरातींचा मारा निरनिराळ्या रूपांत आणि माध्यमांतून कसा होतो, हे सांगताना कवी त्या त्या स्तरावरील भाषेत विधानं करतो, हे विशेष आहे. उदाहरणार्थ, ‘आठवडा बाजाराच्या कोलाहलातही ऐकू आलं खणखणीत / रस्ते का माल सस्ते में... जल्दी करो! जल्दी करो!! / स्टाक खतम! स्टाक खतम!!’ किंवा ‘स्टाफरूममध्ये कलिगने भडकावलं, च्युतिया बनवतात साले! / अमक्यावर अमकं गिफ्ट, तमक्यावर तमका डिस्कौट / लिसन मी, आय थिंक, हाच बेटर त्याच्यापेक्षा’. या आजच्या बाजारकेंद्रित व्यवस्थेत नैतिकता, प्रामाणिकपणा, सचोटी या गोष्टी खुंटीला टांगून ठेवाव्या लागतात. सगळ्याच क्षेत्रांतील अधःपतनामुळे अवतीभवती सुमारांची चलती असण्याचे दिवस पाहावे लागतात. अशा वातावरणात कवीला त्याचं ‘गांभीर्य भाकडकथांचे उत्सव गिळून टाकतायत’, ‘आपल्या अनैतिक स्वप्नांवरही दर्दी अभिजनांच्या उड्या पडतायत’, ‘आपल्या बरळण्याला आध्यात्मिक सत्याचे संदर्भ लाभतायत’, ‘कोलांटउड्यांना पक्क्या राजकीय मुत्सद्देगिरीच्या झुली चढतात’ असं सगळं अनुभवास येतं. या स्थितीत आपल्यासह अनेक जण या व्यवस्थेला शरण जाण्याचा पर्याय निवडतात, हे सांगताना कवी लिहितो, ‘आपणही बिनचूक बाजाराच्या पोटातली गुपितं / आपलीशी करायला शिकतो हळूहळू बनचुके / ...आपणही उच्चरवात आपल्या किमतीची बोली उच्चारायला लागतो / आणि तसे तर आपणच फक्त असतो / असं काही नाही आता आसपास’.
बाजारकेंद्रित व्यवस्था तुम्हाला कशा पद्धतीने गिळंकृत करते यावर ‘हळूहळू सर्वदूर पसरत जातात आपले उच्चार’ ही कविता भाष्य करते. त्याची ‘नवजात मुलासाठी काही सूचना’ ही कविता आपल्या मुलासाठी भविष्यात कोणतं सामाजिक-राजकीय पर्यावरण उपलब्ध असू शकतं आणि त्यात त्याची काय अवस्था होऊ शकते, हे सांगताना सध्या आपण बाजारकेंद्रित व्यवस्थेत कुठे उभे आहोत, याचं अप्रत्यक्षपणे सूचन करते. जर भविष्यात बाप आणि मुलाला संवाद साधण्यासाठी ‘डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू पितापुत्र संवाद डॉट कॉम किंवा असल्याचं एखाद्या तंत्राचा’ आधार घ्यावा लागणार असेल, भावना ‘टेक्निकली आउटडेटेड’ झाल्या आहेत म्हणून ‘थुंकल्या जाणार’ असतील, प्रेम करणं, कविता करणं म्हणजे नक्की काय करणं, यांबाबत संभ्रम निर्माण होणार असेल, पाऊल टाकायला हक्काची भूमी उपलब्ध नसेल आणि ‘श्वासांवरही नियंत्रण’ ठेवून ‘दीर्घ प्रदीर्घ प्राणायाम करून किती हवा वापरली जातेय’ याचा तपास केला जाणार असेल, तर आज आपण त्या ऱ्हासशीलतेच्या कड्यावर येऊन उभे आहोत असं कवी सुचवू पाहतो.
आपल्या मुलाला ‘निर्णायक क्षणी त्याचे आईबापदेवदेशसंस्कृती नि नावगावसुद्धा आठवू दिलं जाणार नाही’, त्याची ‘आयडेंटिटीच हरवून जाईल’ असा भीषण भविष्यकाळ कवीला दिसतो आहे. त्या मुलाला आणि पर्यायाने पूर्ण समाजालाच तो नाइलाजाने संदेश देतो की, ‘त्यांच्या ग्लोबल मार्केटातलं / हक्काचं गिऱ्हाईक हो!’ आजचं वास्तव किती भयावह असेल हे कवी या कवितेत उभ्या करत असलेल्या भविष्यकाळातील मुळं तुटलेल्या, पराधीन माणसांच्या जगण्याच्या चित्रणातून करतो.
कवी ‘मुलं कुतूहलानं बघत जातायत’ या कवितेत लहान मुलांच्या नजरेतून आदल्या दिवशी कदाचित धर्माच्या नावाखाली घडलेल्या दंगलीमुळे झालेली वाताहत चित्रित करतो. त्याचबरोबर या मुलांच्या कोवळ्या मनावर या हिंस्र वातावरणाचा कसा विपरीत परिणाम होतोय, हे मांडताना लिहितो, ‘मुलं आजमावतात त्यांच्या कोवळ्या मनगटांची ताकद / इथेतिथे पडलेले दगड पेलून पाहत / आणि भिरकावून लांबवर मोडक्या इमारतीच्या तुटक्या काचांपर्यंत / बिनचूक... / ...शाळेची वाट चालता चालता / ...चड्ड्या सोडून अभंग असलेली लिंगं दाखवत / खिदळतात गर्वानं देवाधर्माच्या नावानं / निरागस मिजाशीत भाबड्या मस्तीत...’ या ओळी अंगावर काटा आणणाऱ्या आणि समाजाची भविष्यातील जी काही स्थिती असणार आहे, त्याविषयी चिंता वाढवणाऱ्या आहेत.
कवीला त्याची मुलं गोंधळल्यासारखी, सैरभैर झाल्यासारखी, खेळण्याआधीच आत्मविश्वास गमावून हरल्यासारखी वाटू लागतात. पण मग हा आपल्याच नजरेतील दोष असू शकेल, अशी तो स्वतःची समजूत काढतो. हा एवढाच आशय असलेल्या 'नियंत्रण गमावलेली आपली मुले' या कवितेतून कवी तरुण पिढीच्या जगण्यातील पेचांचं नेमकेपणाने सूचन करतो. आपली मुलंबाळं जर हट्टीपणा करत करत टोकाच्या हिंस्रतेकडे वळत असतील, तर कोणत्या टप्प्यावर आपण हस्तक्षेप करायला हवा, याबाबतही गोंधळल्यासारखी मनःस्थिती आई-वडिलांची असते. त्यांना या प्रक्रियेत मूल क्रूर आणि असंवेदनशील होत जातंय याचाही अंदाज येत नाही. हा आशय कवी ‘सुखानं जगायचं असेल’ या कवितेत रूपकात्मक पद्धतीने व्यक्त करतो.
३.
समाजात जेव्हा मोठ्या प्रमाणात लोकांना अस्तित्व टिकवून ठेवण्याच्या धडपडीत पदोपदी उरस्फोड करावी लागते, तेव्हा साहजिकच त्या गोष्टींचा मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो. त्यात आणखी जनतेच्या अस्मितांचे प्रश्न केंद्रस्थानी आणून कोंबड्यांच्या झुंजी लावून द्याव्यात, तसं समाजातील विविध गटांना आपसांत भिडवलं जातं. त्यातून येणारे ताण काही काही वेळेस सहन करण्याच्या पलीकडील असतात. अशा काळात अध्यात्माचा बाजार तेजीत येतो. राज्यकर्त्यांना अध्यात्म विकणाऱ्या ढोंगी बाबांची गरज असतेच. मग या दोहोंच्या संगनमताने जनतेची दिशाभूल करण्याचे उपक्रम सुरू होतात. कवीने आज अध्यात्माच्या नावाखाली सर्वसामान्य माणसाला त्याच्या जगण्या-मरण्याच्या प्रश्नांपासून कसं दूर लोटलं जातंय आणि त्याच्या मनात स्वतःसोबतच इतरांच्याही जगण्याच्या दुर्दशेबाबत कशी अलिप्तता येत जाते, यावर ‘सळसळू दे अध्यात्म नसानसांतून’ या कवितेत भाष्य केलं आहे.
एकदा का या सामान्य माणसाला ‘सनातन अध्यात्माच्या गोळ्या चघळायला दिल्या’ की, तो कसा बाहेरच्या जगाविषयी बेफिकीर आणि असंवेदनशील होत जातो, हे सांगताना कवी लिहितो, ‘छळणार नाहीत मग / करपलेल्या शेतांत गळफास लावून घेतलेल्या कुणब्यांची भुतं / त्यांच्या बायकापोरांचे विलाप / ...किंवा कोलाहल आपल्या आतबाहेरचे / करणार नाहीत अस्वस्थ...’ या अध्यात्माच्या गुंगीत समाज इतका धुंद झालेला आहे की, राज्यकर्त्यांकडून होणारं त्याचं शोषण त्याला जाणवतही नाही.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत” हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...
पूर्वनोंदणी करण्यासासाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
अशा वेळी सर्वसामान्य माणसाला विविध पातळ्यांवर कशा पद्धतीने सगळ्या गोष्टींत गृहीत धरून पिळून काढलं जातंय याचं चित्रण ‘टाइमपास म्हणून’ ही कविता करते. आपणाला दाढेखाली धरलं जातंय, रगडलं जातंय, हेडलाइन्सवरून झरझर नजर फिरवून बेफिकीरपणे बाजूला सारलं जातंय, अशा काही प्रतिमांच्या माध्यमातून कवी ही सामान्य माणसाला नाण्यासारखं वर फेकून तो कुठे पडतोय याचा तपास न करणारी सद्य:स्थिती मांडतो. या सामान्य माणसाचं जगणं वेठीला धरून ‘टाइमपास’ कोण करतंय, याचा निर्णय मात्र वाचकाला आपापल्या विवेकानुसार करावयाचा आहे. ‘निवडणुकीआदली संध्याकाळ, जुलै २००५’ या कवितेत दृश्यात्मकता आहे.
एक नंदीबैलवाला निवडणुकीच्या आदल्या संध्याकाळी गावात शिरतो तर चिटपाखरूही त्याच्या दृष्टीस पडत नाही. सबंध गावात स्मशानशांतता पसरलेली असते. तो वैतागून परत जात असताना त्याचा बैल ‘विचित्र पद्धतीने हंबरतो’ आणि जणू काही ‘पाण्यात पडलेली चंद्राची सावली पाहून अदृष्टाच्या चाहुलीनं फसफसून मुततो’, अशा प्रतिमा कवी योजतो. काही काही ठिकाणी निवडणुकीनंतर घडणाऱ्या हिंस्रतेचं सूचन या प्रतिमांमधून साधलं जातं. या कवितेत आलेला निवडणुकीचा उल्लेख केवळ निमित्तमात्र आहे. कवी या कवितेतील घटनेद्वारे एकूणच येणाऱ्या काळातील भयावह अरिष्टाकडे निर्देश करतो आहे, असं वाटतं.
४.
कवी त्यांच्या त्यांच्या कुवतीनुसार आजच्या बिघडलेल्या परिस्थितीची जाणीव आपल्या कवितांतून करून देण्याचा प्रयत्न करतात. राज्यकर्ते मात्र भांडवलदार आणि माध्यमं यांना हाताशी धरून कवींच्या मुक्त अभिव्यक्तीला कोंडून टाकण्याचा आणि त्यांचा आवाज चिरडून टाकण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात हे आजचं वास्तव आहे. ‘बिघडलेल्या गोष्टींविषयी बोलू पाहतोय कवी’ ही कविता वर्तमान काळात निरनिराळ्या मार्गांनी कवींच्या मुक्त अभिव्यक्तीवर बंधनं आणू पाहणाऱ्या व्यवस्थेचा चेहरा आपल्यासमोर फार प्रभावीपणे सादर करते. कवीच्या व्यक्त होण्यावर दडपशाही करणाऱ्या यंत्रणांकडून नजर ठेवली जाते आणि त्याच्या समग्र जगण्यावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो हे वास्तव व्यक्त करताना कवी लिहितो, ‘...दाबला जातोय कवीचा नैसर्गिक आवाज / उमटवू दिली जात नाहीयेत अक्षरं / मनातल्या मनातही, आपल्या आपल्यांतही / नजर ठेवली जातेय त्याच्या जांभयांवर, शिंकण्या-खोकण्यावर / प्रत्येक हालचालीवर...’
अशा काळात कवीने साधं वाक्य जरी उच्चारलं तरी ‘त्याची संशयित म्हणून कसून चौकशी झाली’ तर त्याचं नवल वाटू नये. बाहेरच्या जगात घडणाऱ्या गोष्टी आपली इच्छा असो वा नसो, त्या आपल्या जगण्यावर येऊन आदळणारच आहेत. पण या निराशाजनक वातावरणातही आपण ‘मिळेल त्या डाव्याउजव्या व्यासपीठांवरून मिरवण्यातच’ धन्यता का मानतोय, हे त्याला समजेनासं होतं. कवीला अशा वातावरणात आजूबाजूच्या जगात वावरताना काही घटनांविषयी वाटणारी भीती ‘स्वतःला फसवून’ या कवितेत व्यक्त झाली आहे. त्या सगळ्याचा ताण त्याच्या सर्जनशीलतेवरही येतो. ‘कविता लिहिताना वाटत राहतंय सारखं, की हा शब्द अकारण / आणेल गोत्यात, वापरावा की नये वापरू / पर्याय शोधताना विरत जाते कविताही वारंवार डोळ्यांदेखत' किंवा 'मुलं मोठी होत वाढत जाताना दिवसागणिक भीती वाटतेय / ...ऐनवेळी आता सुचणार नाही मुलांसमोर काहीच बोलणं / असंही वाटत राहतं वेळीअवेळी’ या विधानांतून त्याला व्यक्तिगत पातळीवर जाणवणारं भय आणि बाह्य दबावांमुळे सर्जनशील निर्मितीत येणारे अडथळे या दोन्ही गोष्टींची प्रभावीपणे अभिव्यक्ती झाली आहे. त्याला या आसपासच्या मुर्दाड वातावरणामुळे मानसिक कोंडीचा सामना करावा लागतो. ती स्थिती तो ‘आपल्याच वाट्याचे हे दिवस’ या कवितेत व्यक्त करतो.
कवी लिहितो, ‘आपणच ठणकावून सांगितल्याशिवाय / कळत नाहीय कुणालाच / काळजाची सूक्ष्म धडधड / ठळकपणे नोंद घ्यावी असा दिवसही / नाहीय आपल्या कॅलेंडरात हाताशी’. या विधानांतून त्याची निराशा जशी आपल्याला जाणवते, तशीच ‘ठणकावून सांगितल्याशिवाय काळजाची धडधड न कळणाऱ्या’ आसपासच्या समाजाची असंवेदनशील वृत्तीही मनाला बोचते. त्यामुळे जर त्याला ‘आतूनच कुणापाशीही जाऊ नये असं वाटत असेल’ तर त्याची कारणं ही केवळ त्याच्या एकट्याच्या जगण्यात सापडणार नाहीत. समाज म्हणून आपण एकमेकांशी करत असलेल्या कोरड्या व्यवहारांकडे लक्ष वेधण्यासाठीच बहुधा या कवितेचा सूर हताशेचा आहे.
‘निष्ठुर या काळाचा वाटत नाहीय भरवसा’ या कवितेतूनही अशाच प्रकारची घुसमट व्यक्त झाली आहे. ‘आसपासच्या अवघ्यांपासून तुटत चाललेला असताना’ त्याच्यापाशी ‘कवितेशिवाय कुठलंही हत्यार नसल्याची’ त्याला जाणीव आहे. अस्मिता टोकदार होण्याच्या या काळात कुठल्याही कारणासाठी जेव्हा चवताळलेली झुंड रस्त्यावरून जाईल, तेव्हा त्यात आपल्या जवळच्या व्यक्तीला पाहावं लागलं तर त्या गोष्टीइतकं ‘जीवघेणं दुसरं काहीही नसेल’ असं तो लिहितो, तेव्हा त्याच्या मनातील भय किती विविध परींनी त्याच्या मनाला कुरतडत आहे याची तीव्र जाणीव होते. तो ‘रे अरण्या कोलटकरा...’ या कवितेतून विठोबाला व्यापारयुगातल्या भोवळ आणणाऱ्या व्यवहारांच्या, जीवनशैलीच्या, मूल्यं आणि नैतिकता यांच्या बदलत गेलेल्या संदर्भांच्या, बदलत्या कौटुंबिक व्यवस्थेच्या, बाजारवादाच्या वाढत्या वर्चस्वाच्या अरण्यांतून फेरफटका मारायला लावून आजच्या काळातील बहुतेक दुखऱ्या जागांवर बोट ठेवतो. आणि हा सगळा अनुभव अभंगात कसा बसवणार अशी अरुण कोलटकर या श्रेष्ठ कवीला पृच्छा करतो. तो कोलटकर यांना मूळ पुरुष, महापुरुष म्हणून संबोधतो, हे विशेष आहे.
अरुण कोलटकर यांनी आधुनिक काळातील व्यामिश्र जगण्याचे अनुभव व्यक्त करताना काही कवितांत अभंग हा रूपबंध योजला होता. आजच्या काळातील वास्तव हे कोलटकर यांच्या काळापेक्षाही अधिक गुंतागुंतीचं, जटिल होत चाललेलं आहे, तेव्हा बांदेकर यांना त्यांची आठवण येणं साहजिकच आहे. कवी वेगवेगळ्या तऱ्हेने आशयाची पेरणी करत आजच्या सामाजिक जगण्यातले ताणेबाणे काव्यात्मकतेला धक्का न लावता व्यक्त करतो. यातून त्याच्या कल्पनाशक्तीचाही प्रत्यय येतो. तो प्रसंगोपात बोलभाषेतील म्हणी, गाणी कवितेच्या आशयात बेमालूमपणे मिसळतो. त्यामुळे कवितेच्या अभिव्यक्तीतील एकसाचेपणा भंग होऊन ती वेगवेगळ्या रूपांत वाचकासमोर सादर होते.
५.
आपल्या सर्जनशील निर्मितीत सामोऱ्या येणाऱ्या आव्हानांबाबत, तसेच त्या प्रक्रियेबाबत कवितेतूनच भाष्य करण्याची कवींची वृत्ती हिंदी काव्य परंपरेत ठळकपणे दिसते. बांदेकर यांनी या आशयसूत्राला धरून अनेक कविता लिहिल्या आहेत. त्यांच्या या प्रकारच्या कविता हिंदीतील कवितांना ओलांडून खूप पुढे जातात असं वाटतं. कारण बांदेकर सर्जनशील निर्मिती प्रक्रियेबाबत उच्चार करतात, त्या वेळी केवळ व्यक्तिगत पातळीवर जाणवणारे पेच मांडूनच थांबत नाहीत, तर ते या प्रक्रियेत अडथळा ठरणाऱ्या बाह्य घटकांचाही वेध घेतात. आजघडीला कवींचं समाजातील स्थान कोणतं आहे, हे कवी कोणत्या प्रकारच्या कविता लिहीत आहेत, आसपासच्या प्रलोभनांना भिडताना त्यांच्या निष्ठा, त्यांची नैतिकता टिकून राहते की नाही, अशा अनेक अंगांनी बांदेकर या कवितांतून काव्यात्मक विधान करतात.
कवींच्या दांभिक वृत्तीवर उपहासात्मक पद्धतीने ‘वय वाढत जाण्याआधीच हळूहळू’ या कवितेत टीका केलेली आहे. कवीचं वय वाढण्याआधी त्याची ‘वाढ’ होत जाते, पण ती कोणत्या पद्धतीची वाढ असते आणि त्यासाठी तो कवी कसा स्वतःत बदल घडवून आणतो हे सांगताना तो लिहितो, ‘कालपरवापर्यंतच्या आपल्यांचे आपुलकीचे खांदे / तोकडे वाटू लागतात आपल्याला / आपले प्राथमिक शब्द दुरुस्त करणाऱ्यांना / खोडून टाकतो आपण आपल्या विस्तारित बाराखडीतून’. मोठ्या विश्वविद्यालयात कविता वाचायला जाणाऱ्या कवीला त्याची बायको ‘खादीचा झब्बा’ उतरवायला लावून ‘पीटर्स इंग्लंडचा शर्ट’ घालायला लावते. या वेळी कवी लिहितो, ‘देशी व्हाणांना कोपऱ्यात ढकलून हा कवी उत्तराधुनिक संवेदनांनी हसतो’. तेव्हा इथे ‘झब्बा’ आणि ‘शर्ट’ हे कवीच्या मानसिक-वैचारिक पातळीवर होणाऱ्या स्थित्यंतराचं केवळ प्रतीक आहे. या कवीला सत्काराच्या शाली स्वीकारताना आपली ‘मान कधी झुकली’, ‘पाठीचा कणा कधी वाकला’ हेही लक्षात येत नाही.
एकुणात ही कविता कवींच्या नैतिक घसरणीचा आलेख मांडते. ‘उदाहरणार्थ, नवं जगणं नवी कविता’ ही कविता सामाजिक वास्तवासोबतच नव्या कवितेचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे, याची चिकित्सा करते. बदलत्या सामाजिक-राजकीय स्थितीगतीची अभिव्यक्ती जर आपण केली तर कदाचित ‘पारंपरिक आणि आउटडेटेड’ वाटण्याची शक्यता आहे असं त्याला वाटू लागतं. नव्या ‘कवितेचा आपल्या जगण्याशी, काळाशी मेळ लागत नाही’, अशी त्याची भावना होते आणि हे सातत्याने कात टाकून नवं रूप धारण करणारं वास्तव खुद्द त्यालाही शब्दांत पकडता येणं जिकिरीचं होऊन बसल्याची अनुभूती येते. नव्या कवितेतून सामोरी येणारी ‘कम्प्युटर लँग्वेज, भाषिक फ्यूजन आणि इमेजिसचं रिमिक्स’ हे आपल्याला हवंय की नकोय आणि आपली नेमकी भूमिका काय आहे, याचा जराही थांगपत्ता या नव्या कवींच्या कवितांतून लागत नाही आणि ‘नुसतेच कवितेतून हे ते शब्द कोंबून त्यालाच नवं जगणं आणि नवी कविता म्हटलं जातं’, अशा शब्दांत कवी या नव्या कवींवर उपरोधिक टीका करताना दिसतो.
कवीने आजवर कविता लिहिण्यासाठी जी काही धडपड केली आहे, ती ‘मांडली शक्यता’ या कवितेत आविष्कृत झाली आहे. त्याची अस्सल कविता लिहिता यावी म्हणून जी काही उरस्फोड चाललेली असते, तिचा प्रत्यय ही कविता वाचल्यानंतर येतो. या प्रयत्नात त्याला अनेकदा अपयशच येतं, तरीही तो कवितेचा पाठलाग करणं सोडत नाही. तो लिहितो, ‘चाचपले तरी हाती ना लागले निसटुनी गेले डोळ्यांपुढे / कितीदा मोडले कितीदा खोडले तरी ना सोडले ठाव तुझे’. या कवितेपायी लौकिक जगण्यात काहीही सध्या करू शकलो नाही, याची त्याला जाणीव आहे. याला तो ‘तण माजून शेत नासण्याची’ उपमा देतो. आणि अशाही स्थितीत आपण ‘कवितेचं निशाण उंच धरून आहोत’ असं लिहून आपली कवितेवरील अम्लान निष्ठाही व्यक्त करतो. तो त्याची कवितेचा शोध घेत असताना होणारी बेचैन अवस्था, त्याच्या मनाची होणारी तगमग ‘नव्या जन्मासाठी होऊन सिद्ध’ या कवितेत मुखर करतो.
त्याची सर्जनशील निर्मितीबाबची संभ्रमावस्था आणि ‘बाहेरचा कोलाहल टिपण्यातले’ अपुरेपण याची त्याला जाणीव आहे. त्यामुळे कोणतीही कविता ही आपली अखेरची कविता ठरू शकते, अशी भीती त्याच्या मनात घर करून राहते. या भावस्थितीची उत्तम अभिव्यक्ती ‘आपली अखेरची कविता’ या कवितेत केलेली दिसते. एखाद्या कवीचा मृत्यू झाल्यानंतर बरेच लोक त्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी त्याच्या कविता वाचत असतात, काही हळहळत असतात. हे नेहमी दिसणारं दृश्य आहे. पण बांदेकर यांना त्याच क्षणी ‘दुसरा एक कवी नुकताच पुन्हा लिहू लागला आहे आणि समजून उमजून भाषेतल्या भाषेत वावरू लागला आहे’ हेदेखील दिसतं. यातून त्यांचा आशावादी दृष्टीकोन प्रतीत होतो.
कवी जेव्हा आतल्या जगाकडे पाठ फिरवून बाह्य जगातल्या प्रलोभनांना बळी पडतो, तेव्हा त्याची कविता हरवत जाते, हे वास्तव कवी ‘कवी असल्याचा भ्रम’ या कवितेत व्यक्त करतो. कवी लिहितो, ‘आपण नियंत्रित करतो आपल्या हालचाली / आणि आपण ऐऱ्यागैऱ्यासारखी स्वप्नं पाहू लागतो / बाजाराची आणि बाजारबुणग्यांनी केलेल्या जयजयकाराची / तेव्हाच खरंतर हरवून गेलेलो असतो आपण / आपलं कवी असणं’. त्यामुळे कवी म्हणून ‘आपणालाच दिसणारं अद्भुताच्या प्रदेशातील काही तरी पकडू पाहण्याच्या धडपडीतील’ सातत्य कालांतराने हरवून जातं.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत” हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...
पूर्वनोंदणी करण्यासासाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
कवीच्या मनातील निरागसता हळूहळू संपुष्टात येऊ लागते. मग ‘कविता लिहूनही होता येत नाही कवी’ अशी हास्यास्पद, करुण अवस्था होऊन जाते. आणि म्हणूनच अवतीभवती इतकी दुःखं, यातना यांनी ओतप्रोत भरलेली आयुष्यं दिसत असूनही त्यांची दुखरी नस अजूनही कवींना का पकडता येत नाहीय, असा प्रश्न त्याला ‘नव्या नव्या शब्दांचे भास’ या कवितेत पडलेला दिसतो. कवीला ‘कागदातल्या कागदात कुजबुजणाऱ्या’ कवींना ‘कशी मुकाट होऊन जातात अचानक / चालती बोलती माणसं वाचा गमावून?’ हे कळत नसल्याची खंत वाटते. त्यामुळेच एवढं सगळं होत असताना ‘ईश्वराच्या एकही लाडक्या जिवाला / का सापडू नये अजून / काळाची ही किटकिटती नस अचूक?’ असा रोकडा सवाल तो विचारतो.
कवीने केवळ कवितांतच मश्गूल न राहता जरा बाहेर येऊन अवतीभवती पाहिलं तर ‘भांबावलेला पाचोळा कसा भेदरून उडतोय आणि किती डेंजर वारा सुटलाय’ हे त्याच्या लक्षात येईल, हे कवी ‘जाणत्यांनी ऐकवलं’ या कवितेत चंद्र कवीला या गोष्टीची जाणीव करून देतोय अशी कल्पना करत व्यक्त केलं आहे. हा चंद्र कवीला म्हणतो की, ‘...आता कठीणच आहे मलाही जिथं स्थिर राहणं न विस्कटता तिथं तुम्ही फोलपटं काय कराल रे, शाईसुक्या लेखण्यावाले?’ या विचारण्यात सूक्ष्म उपहास आहे. कवी त्यातून अवतालभवतालच्या भयावह परिस्थितीचंही सूचन करतो.
६.
मंगलेश डबराल या हिंदीतील कवीने त्याच्या ‘कवि का अकेलापण’ या पुस्तकात असं लिहिलं आहे की, मोठ्या कवीचं मोठेपण त्याच्या कवितेतील जीवनाविषयक आलेल्या काव्यात्मक विधानांतून जसं सिद्ध होतं, तसंच त्याने मृत्यूविषयी किती खोल, व्यापक चिंतन मांडलं आहे, यावरूनही निश्चित होतं. बांदेकर काही कवितांतून मृत्यूविषयक अशीच सखोल निरीक्षणं मांडताना दिसतात. त्यांनी ‘हूल’ या कवितेत सतत आसपास असल्यासारख्या वाटणाऱ्या पण नेहमी हूल देणाऱ्या मृत्यूविषयी आणि पर्यायाने स्वतःच्या जगण्याविषयी लिहिलं आहे. या मृत्यूने सतत भोवंडून टाकत जिवाची घालमेल करू नये, त्यापेक्षा त्याने थेट सामोरं यावं असं त्याला वाटतं. त्याने ‘जिवापाड जपलेली बोचकीही रिकामीच’ राहिलेली आहेत. ‘आशाअपेक्षांची गुंतवळही नाही फारशी पायांतळी / आठवेल तसं एकेक आवरत जावं आता घाईघाईने’ असा समजूतदार आणि समोर थाटलेल्या परिस्थितीचा स्वीकार करणारा प्रगल्भ दृष्टिकोनही या ओळींतून व्यक्त होतो.
‘तरीही सुटत नाहीत या सवयी’ या कवितेतही कधीही सामोरा येणार मृत्यू आणि त्याचा दुबळा प्रतिकार करू पाहणारे आपण यांच्यातल्या द्वंद्वाचं चित्र रेखाटलं आहे. ‘मरण येतं सामोरं / कवितेतल्या प्रतिमेइतकंच नकळत’ असं म्हणणाऱ्या कवीला या मरणाचा सामना करता यावा म्हणून आजवर जोपासलेल्या सवयी बदलून त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न करत राहावा की, ‘देहाची दारं किलकिली करत’ त्याला थेट पुढ्यात येऊ द्यावं, असा प्रश्न पडला आहे. या संभ्रमावस्थेच्या चित्रणातून कवी मृत्यूची अपरिहार्यता मनावर बिंबवण्यात सफल होतो. तो ‘चाहूल’ या कवितेतही मृत्यूची आपल्या जीवनाला वेढून असणारी सावली कधीही आपल्याला तिच्या आवरणाखाली घेऊ शकते, याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करताना दिसतो.
७.
कवीचं या कवितांतून आसपासच्या माणसांत गुंतलेलं असणं स्पष्टपणे दिसून येतं. त्याच्या आयुष्यात आलेल्या स्त्रिया, त्यांचे वडील, लहान मुलं, इतकंच नाही तर त्यांचे पूर्वज या सगळ्यांत असलेली त्यांची भावनिक गुंतवणूक समर्थपणे व्यक्त होते आणि त्यातून त्याचा या सगळ्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन किती नितळ, प्रामाणिक आणि काही प्रसंगी तटस्थदेखील आहे याचा प्रत्यय येतो. तो ‘किंवा असं होतं की’ या कवितेत वडिलांचं चित्र रेखाटतो. या चित्रणातून वडिलांची कुटुंबवत्सल, समजूतदार आणि इतरांविषयीच्या करुणेनं ओतप्रोत भरलेली प्रतिमा डोळ्यांपुढे साकार होते. या कवितेतील वडील पूर्वी घडलेल्या काही कौटुंबिक कारणांनी जसे विद्ध होतात, तसेच समाजाच्या अवनतीबद्दलही हळहळ व्यक्त करतात.
आजच्या या सामाजिक स्थितीगतीला कुठेतरी आपणच जबाबदार आहोत, अशीही त्यांची भावना आहे. यामुळे त्यांना कदाचित फार निराशही वाटत असेल आणि त्यातूनच ते ‘धाप लागेपर्यंत एकेका माडाच्या मुळाशी खणत बसतात तिन्हीसांजेला / ...अंगावर माती घेत, मातीतच जसे न्हात’. ही माती उकरणाऱ्या वृद्ध माणसाची प्रतिमा एखाद्या हताश आणि स्वतःवरच आसूड ओढून घेणाऱ्या माणसासारखी वाटून वाचणाऱ्याच्या मनाला बेचैन करते. ‘बोलू लागल्यावर वडिलांनी विचारलं...’ या कवितेत एक छोटीशी घटना आहे. या घटनेत त्याचा वडिलांसोबत झालेला संवाद आहे. वडील इस्पितळात भरती आहेत आणि त्यांना शुद्ध आल्याआल्या कवीला आठवड्याभरात काय काय घडलं, म्हणून विचारणा करतात तर हा राज्यातल्या, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर घडलेल्या घटना सांगतो. तेव्हा वडील शांतपणे ऐकून घेऊन त्याला त्यांच्या घराशी, प्रत्यक्ष जगण्याशी संबंधित असलेल्या गोष्टींविषयी पृच्छा करतात, तेव्हा हा निरुत्तर होतो.
ही कविता अनेकार्थतेची क्षमता बाळगून असलेली कविता आहे. पहिला सरळ लक्षात येणार अर्थ म्हणजे आपल्या जगण्यासाठी ज्या गोष्टींची गरज आहे, त्यांच्याबाबत विचार न करता मोठ्या स्तरावर ज्या घटना घडत असतात, त्यांचं केवळ चर्वण करत राहण्याच्या सवयीवर ही कविता उपरोधिक अंगाने भाष्य करते. सामाजिक चळवळींत कार्यरत असणाऱ्या काही गटांना आंतरराष्ट्रीय पातळीवर काय चाललेलं आहे, यावर चर्चा करण्यात फार रस असतो, पण आपल्या पायाखाली काय जळतंय, याचा ते विचार करत नाहीत, या प्रवृत्तीवरची ही कविता एक रूपक आहे असंही म्हणता येईल. हे सगळे अन्वयार्थ बाजूला ठेवले तरी या कवितेतून वडिलांचं जे जीवनात रसरसून गुंतलेलं असण्याचं चित्र आपल्या मनावर ठसतं ते एक वेगळाच परिणाम करून जातं.
‘वडील गेल्यानंतर पहिल्यांदाच’ या कवितेतही एक प्रसंग चित्रित केला आहे. त्याने वडिलांच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच त्यांच्या पोथ्या उघडल्या आहेत. हा आपल्या वडिलांचा वारसाच आहे, असं त्याला वाटतं आणि म्हणून त्यावरून हात फिरवताना त्याला शहारल्याची अनुभूती येते. पण या पोथीतून काही अक्षरं, शब्द, ओळी नष्ट झालेल्या आहेत हे पाहून तो दचकतो. त्या प्रसंगी त्याच्या मनात येणारा विचार हा केवळ त्याचा व्यक्तिगत अनुभवातून आलेला न राहता आधीच्या पिढीच्या समृद्ध वारशाची धूळधाण करायला टपलेल्या आपल्या आजच्या सामाजिक-राजकीय संस्कृतीपर्यंत व्यापक होत जातो. तो लिहितो, ‘काही दिवसांचं दुर्लक्षही असतं पुरेसं / नष्ट करून टाकायला / वाडवडिलांनी जिवापाड जपलेलं संचित / नष्ट होत नाहीत नुसतेच / पोथ्यांतले शब्द आणि ओव्यांच्या ओळी / नष्ट होतो शब्दांना, ओळींना लगडलेला अर्थही’.
त्याला आधीच्या पिढीतून नकळत झिरपत असणाऱ्या चांगुलपणाची, समंजसपणाची ओळख वेगवेगळ्या पद्धतीने आजच्या निष्ठुर काळात सारखी होत राहते. आपण जर या काळात काही शोधत राहिलो, खणत राहिलो तर ‘आपलेच स्वार्थ आपल्याला सापडतील’ आणि ‘हाती येतील लिबलिबीत स्पर्शासह / विषारी, बिनविषारी धुसफुसत असलेले / नेणिवेतले मनस्वी जीवाणू’ असं कवी ‘अशा वेळीच जाणवून येईल की’ या कवितेत लिहितो. या भयव्याकूळ करणाऱ्या काळातही आपल्याला आपल्या पूर्वजांनी सोपवलेलं ‘आपलेपणाचं बी’ दिसू लागेल, ‘आपल्या आसपासच्या हवेत विरलेले आधीच्यांचे श्वास बोलू लागतील’ असा विश्वासही तो व्यक्त करतो. नव्या वास्तुसाठी पाया खोदताना काही गाडग्या-मडक्यांचे काळेबेन्द्रे तुकडे सापडतात तर हे तुकडे पाहून तो आपल्या आजे-पणजे यांनी जगलेले दिवस डोळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करतो. त्या काळातील काही घटितांची या सापडलेल्या तुकड्यांच्या निमित्ताने पुनर्मांडणी करतो. पण त्याचं असं स्मृतिकातर होणं इतरांसाठी हास्यास्पद ठरू शकतं, हे तुकडे त्यांना निरुपयोगी वाटू शकतात, म्हणून तो ते पुन्हा मातीखाली गाडू पाहतो. इथे कवी जुन्याशी किमान आठवणींच्या पातळीवरही सांगड घालण्याची गरज न वाटण्याच्या वृत्तीकडे निर्देश करतो (‘इतिहासाचे तुकडे’). ‘ही राख हुनहुनीत अजून’ या कवितेतही त्याचा सूर पूर्वजांच्या आठवणीने काहीसा स्मृतिकातर झाल्यासारखा जाणवतो.
८.
त्याच्या स्त्रियांवरील कवितांच्या विभागातील कविता वाचून तो स्त्रियांचं जगणं किती विविध अंगांनी समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, हे लक्षात येतं. या स्त्रियांच्या जगण्याचं जे काही दर्शन त्याला स्वानुभवातून, निरीक्षणांतून घडतं, ते तो कोकणातल्या जीवन संस्कृतीतून फुलणाऱ्या प्रतिमा, उपमा यांच्या उपयोजनातून समर्थपणे आपल्या कवितांत आविष्कृत करतो. ‘रुजव बाई अधिकारानं...’ ही कविता एकटीने संसार रेटणाऱ्या स्त्रीची व्यथकथा आणि तिची करारी वृत्ती यांचं दर्शन घडवते. नवऱ्याच्या संसाराकडे दुर्लक्ष करण्याच्या वृत्तीमुळे ही स्त्री खचून जात नाही, उन्मळून पडत नाही, तर तिचे ‘हक्क शाबूत राखून’ जी काही तिच्या वाट्याला आपापतः आलेली क्षेत्रं आहेत, ती एकहाती सांभाळते. ही स्त्री नवऱ्याला उद्देशून म्हणते की, ‘भरल्या धान्यासारखा असेल भक्कम तर येईल भुईवर / नपेक्षा जाईल उडून फोलफटासारखा’. या ओळींतून तिचा स्वतंत्र बाणा, दृढनिश्चय प्रतीत होतो. कवी तिच्या कष्टदायक जीवनाबद्दल लिहितो, ‘ओल्या शेणामातीनं लिंपत राह्यली / चाचपडताना जाणवली ती गृहछिद्रं / आडव्या हातानं कोरड्या मनानं’. या ओळींत आलेली ‘भिंती लिंपून गृहछिद्रं’ झाकण्याची प्रतिमा ही तिच्या संसारातील प्रत्येक विस्कटू पाहणाऱ्या गोष्टीला सांधून घेण्याच्या प्रयत्नांचं सूचन करते.
ही स्त्री निपुत्रिक असावी, हे सांगताना कवी ‘दुष्काळी गर्भाशय’ असं शब्दसंयोजन करतो. या स्त्रीला रात्री निजताना कसले तरी भास होत असावेत आणि अशा वेळी तिची मानसिक स्थिती किती पराकोटीच्या यातनांखाली दबली जात असेल, याचा निर्देश करताना कवी लिहितो, ‘दुष्काळी गर्भाशयात तिच्या / विझून जाताना सात जन्मांच्या पारंब्या / कूस बदलून बदलून उसासत राह्यली रात्र रात्र / आभासाचे अध्यात्म अनुभवत / लुगड्याआत समजुतीनं सावरत राह्यली गात्र गात्र’. लोकनिंदा, कुचाळक्या आणि आणखी हजार संकटांचा सामना करत ही स्त्री कणखरपणे उभी राहते आणि शेवटी कवी तिच्या जगण्यातून आपल्या सर्जनशीलतेला आणि एकूणच जगण्याला बळ मिळावं, अशी प्रार्थना करताना लिहितो, ‘ऐकू दे मलाही तुझ्यासवे आतल्या आवाजाचा कौल, गो बाये / येऊ दे माझ्यातल्या कवीने उच्चारलेल्या प्रत्येक नव्या शब्दात / माथ्यावरच्या आभाळाइतकंच चिरंतन मंत्राचं सामर्थ्य / आणि पायातळीच्या मतीइतकीच भक्कम सर्जनशील विश्वासार्हता...’
स्त्रीत असणारा ‘मायेचा अंश’ आपल्याही रक्तामांसात टिकून राहो आणि तिच्या आत असणारा ‘करुणेचा पाझर’ आपल्या शब्दाशब्दांत झिरपत राहो असंही त्याचं मागणं आहे. कवी अप्रत्यक्षपणे स्त्रियांच्या गुणांचा गौरवच या ओळींतून करतोय हे आपल्या लक्षात येतं. ‘या निर्जन पायवाटांवरून चालत जाणारी स्त्री’ या कवितेत सगळ्या घुसमटीतून बाहेर पडून ‘स्व’चा आवाज ओळखण्याच्या प्रयत्नात असलेल्या स्त्रीची तडफड व्यक्त झाली आहे. तो ‘जोडावीत नाती तशी’ या कवितेत कष्टकरी, कुणबी स्त्रियांचं चित्र रेखाटतो. तो या कवितेतून त्यांच्या कष्टाच्या जगण्याचे तपशील देतो. या स्त्रिया कष्ट करत असताना ‘देवीं’सारख्या भासतात असं सांगताना लिहितो, ‘खळंभर पसरून असतात राहिलेल्या त्यांच्या सावल्या सतत अस्थिर / नशिबासारख्याच त्यांच्या / नेसूच्या बोंदरातून भासतात भावकाई, भूमकाई, पावनाई आणि सातेरी साक्षात हाडामांसाच्या’.
९.
या संग्रहातील एका विभागात विठ्ठल, रखुमाई आणि जनमानसांत रुजून बसलेल्या ईश्वराच्या अस्तित्वाबाबत उत्कृष्ट कविता वाचायला मिळतात. ‘थेट तुझ्यापर्यंत...’, ‘बिनमायेची तुझी ही पंढरी’ या कवितांत तो रखुमाईबद्दल ममत्वाने लिहितो. तिला कोणी मुद्दाम पाहायला, भेटायला येत नाहीत, तिच्या नावाने कुणी नवस-सायास करत नाही, गाऱ्हाणी मांडत नाहीत, तर एक सोपस्कार म्हणून तिच्या गाभाऱ्यात केवळ डोकावून जातात अशी खंत त्याला वाटते.
विठ्ठलाला टाळून तिच्यापर्यंत ‘पोचण्याची अवघड पायवाट कधीतरी आपल्याला सापडेल काय?’ असा प्रश्न त्याला सतावतो. यातून त्याचा रखुमाईकडे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून पाहण्याची दृष्टी दिसून येते. तिचं अस्तित्व विठ्ठलावरच अवलंबून असल्यासारखी स्थिती आहे. कवी कुठेतरी या स्थितीला छेद देण्याचा प्रयत्न करताना दिसतो. ‘तरीही का थांबून असतो मी’ या कवितेत त्याची भक्तिभावना त्याच्या ‘अंधारात थांबून असण्याच्या’ आणि ‘नात्यातलं पावित्र्य जपण्याच्या’ प्रतिमांतून जोरकसपणे व्यक्त होते.
तो ‘राखण्याच्या धोंड्याला’ या कवितेतून सर्वसामान्य माणसाच्या मनात ‘शेंदूर फासलेल्या धोंड्याचं’ कसं मानसिक आधार देणारं स्थान असतं, हे अधोरेखित करतो. तो लिहितो, ‘राखण्याच्या धोंड्याला शेंदूर फासून सीमेवर / ओलांडू वेस / की पाठीशी कुणी असल्याचं वाटत राहील / बरं असतं तेवढंच / भूकलाडू तानलाडूंसोबत बोचक्याला उबेला’. पण पुढे तो या धोंड्याची ‘आपणास जाणवणारही नाही अशा गतीनं माती होत आहे’, असंही उपरोधाने लिहितो. त्यामुळे या कवितेतून सर्वसामान्य माणसाचं कुठल्या तरी शक्तीवर विसंबून राहत मानसिक आधार शोधणं आणि त्यातली वैयर्थता त्याला न जाणवणं अशा दोन्ही अंगाने भाष्य येतं. ‘गंगेत न्हाऊन आलाय घोडा’ या कवितेतही अशाच प्रकारचा उपरोध स्पष्टपणे जाणवतो. ईश्वराच्या अस्तित्वाबाबत शंका उत्पन्न करणाऱ्या ओळी ‘कुणब्या-कुळवाड्यांच्या जत्रेत...’ या कवितेतही येतात. जत्रेत दगडी ईश्वरापुढे नवस म्हणून कोंबड्या कापल्या जातात. त्या वेळी नवस करणाऱ्यांच्या दृष्टीने हे वातावरण अगदी पवित्र असतं. या वातावरणाची दृश्यात्मक मांडणी या कवितेत केलेली आहे.
१०.
बांदेकर यांनी काही कवितांतून वेगवेगळ्या भावावस्था समर्पक अशा प्रतिमा-प्रतीकांच्या साहाय्याने मुखर केल्या आहेत. ‘विझेल आता’ या कवितेत उदास करणाऱ्या अनेक प्रतिमा आल्या आहेत. कधीही विझू शकेल असा फडफडणारा दिवा, पाऊलही न वाजवता मांजरीचं उठून निघून जाणं, कावळ्यांची कावकाव थांबणं, तिन्हीसांजेला साळुंक्यांचं सैरभैर उडून जाणं, या सगळ्या प्रतिमा खिन्न करणाऱ्या वातावरणाची निर्मिती करतात.
या कवीला ‘तिन्हीसांजेच्या डोळ्यांतला प्रकाश सावकाश विझत’ जाताना दिसतो. त्याने या कवितेत अस्वस्थ करणारी मनोदशा प्रभावीपणे व्यक्त केली आहे. ‘मी कधीचाच मरून गेलो आहे’ या कवितेत त्याची हताश मनोवृत्ती प्रतिबिंबित झाली आहे. या हताश वाटण्याची कारणंही तशीच आहेत. तो लिहितो, ‘आता मला रचता येत नाहीयेत / खऱ्या-खोट्या शब्दांना हाताशी धरून / माझ्या समकाळाची विराट कथने / ...आपल्या वाट्याच्या या काळावर / आरूढ होण्याच्या / मरून पडतायत आकांक्षा’. त्याला समकालात जाणवणारी निराशा किती पराकोटीची आहे, हे व्यक्त करताना तो ‘नकळत्या वर्तमानात नसत्या भयानं उगवण्याआधी उताणा पडलेल्या सूर्याची’ प्रतिमा योजतो.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
कवीला भवताली हताश, निराश करणाऱ्या घटना घटित होताना पाहाव्या लागत असल्या आणि त्याने तो उद्विग्न आणि काही प्रसंगी क्षुब्ध झाल्याचं दिसत असलं, तरी तो पूर्णतः नाउमेद झालेला नाही, याचाही पुरावा त्याच्या कवितांतूनच मिळतो. ‘हाही पावसाळा सरेल आपल्यातून’ या कवितेतून त्याची आशावादी दृष्टी प्रतीत होते. 'आपलेपण निभावून' वाहत येणाऱ्या वाऱ्यामुळे 'विवंचनांचे आगंतुक ढग वाहून जातील’ आणि ‘आतून आतून मातीतली नाती पालवून येतील’ असा विश्वास त्याला या दिवसांतही वाटतो. एरवी सामान्य असणाऱ्या कवीच्या आत ‘शोधूनही सापडू नये असं आतल्या आत काहीतरी टोचत राह्यलेलं असतं’ आणि याच मनःस्थितीत असताना त्याला ‘बिघडलेल्या संबंधांची खळबळ’ ऐकू येते. या संबंधातून भ्रमनिरासच जरी हाती लागत असला तरी त्याला त्यातलं गुंतणंसुद्धा लुभावतं.
त्याची जगण्यातली आसक्ती कमी होत नाही. उलट तो हताश करणाऱ्या गोष्टींनाही स्वीकारायला तयार असतो. त्याला ‘दुखऱ्या संबंधांचे पाश’ हवे आहेत कारण त्याची प्रत्यक्ष जगण्यातील गुंतवणूक जराही पातळ झालेली नाही (‘एरवी आपण तसे’). ‘मिथ्यकथा’ या कवितेत भवतालच्या भोवंडून टाकणाऱ्या वास्तवात तो आशा व्यक्त करतो की, ‘...लख्ख नव्या उजेडात / ठेचाळणार नाहीत डोळस माणसं / ...पारखतील आपापल्या रानांतली / डावीउजवी जनावरं सैरभैर’. इथे ‘डावीउजवी जनावरं सैरभैर’ ही प्रतिमा वैचारिक गटांगळ्या खाणाऱ्यांकडे निर्देश करते. इतर दिव्यांसारखाच कवितेच्या दिव्याखालीही अंधार आहे पण कवीला मात्र वाटत राहतं की, आपली कविता अनेक सकारात्मक बदल घडवून आणण्यास साहाय्यभूत ठरेल. त्याचबरोबर अवतीभवतीच्या ‘पराकोटीच्या आंधळ्या यादवी’त अडखळून कोसळताना ‘उजेडातील मायावींच्या मिथ्यकथा’चा अर्थ आकळू लागेल असं लिहितो, तेव्हा आजच्या हिंस्र काळात ज्या काही खोट्या आशा दाखवणाऱ्या जागा आहेत, त्यांतली निरर्थकताही समजून येईल, असं सुचवतो.
११.
हिंदी भाषेत कविता लिहिणाऱ्या विष्णु खरे यांनी चांगल्या कवितेत त्यांना काय वाचायला आवडेल, याविषयी एक विधान केलं होतं. ते म्हणाले होते, “चांगल्या कवितेत माणसाच्या अस्तित्वासमोर उभ्या ठाकलेल्या सर्व संकटांविषयी चिंता, ती व्यक्त करताना आवश्यक असलेली बांधिलकी, सगळ्या मानवजातीच्या रोमांचक व्यवहारांत खोल रुची, आयुष्य आणि नातेसंबंध यांतल्या विविधतेप्रति असणारी उत्सुकता, आणि हे सगळं आपल्या भाषा आणि शैलीत मांडण्याची क्षमता हे गुण आढळायला हवेत.” प्रवीण बांदेकर यांच्या या संग्रहातील सगळ्या कवितांत हे गुण आढळतात, असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही.
‘चिनभिन’ : प्रवीण दशरथ बांदेकर
शब्द पब्लिकेशन, मुंबई
पाने : १३५
मूल्य : २४० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment