‘धरणसूक्त’ : प्रभावी निसर्गचित्रणे, सहजतेने उभ्या राहणाऱ्या व्यक्तिरेखा, तांत्रिक बाबींना मानवी व्यवहाराची जोड, जीवनाकडे पाहण्याची सकारात्मक वृत्ती, यांमुळे ही मराठीतील एक महत्त्वाची कादंबरी ठरते
ग्रंथनामा - झलक
नागनाथ कोत्तापल्ले
  • ‘धरणसूक्त’ या कादंबरीचे मुखपृष्ठ
  • Thu , 18 August 2022
  • ग्रंथनामा झलक धरणसूक्त Dharansukta विलास शेळके धरणसूक्त Vilas Shelke धरण Dam रातसा धरण Ratsa Dam देवघर धरण Devghar Dam मेधा पाटकर Medha Patkar नागनाथ कोत्तापल्ले Nagnath Kottapalle

महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातून मुख्य अभियंता म्हणून निवृत्त झालेल्या विलास शेळके यांची ‘धरणसूक्त’ ही कादंबरी नुकतीच राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झाली आहे. रातसा धरण आणि देवघर धरण यांसारखी अनेक महत्त्वाची धरणे बांधणाऱ्या या कुशल इंजिनीअरने या कादंबरीच्या माध्यमातून एका आगळ्यावेगळ्या जगाचा आणि संस्कृतीचा वेध घेतला आहे. या कादंबरीला प्रसिद्ध समीक्षक व माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी लिहिलेल्या सविस्तर प्रस्तावनेचा हा संपादित अंश...

..................................................................................................................................................................

प्रत्येक वाङ्मयप्रकाराची स्वत:ची अशी काही वैशिष्ट्ये असतात, तशी कादंबरी या वाङ्मयप्रकाराचीही आहेत. त्यातील प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे कादंबरी या वाङ्मयप्रकारातून मोठा जीवनपट मांडता येतो. म्हणूनच काही काही कादंबऱ्यांमधून अनेक पिढ्यांचे जीवन व्यक्त होताना दिसते, तर काही कादंबऱ्यांमधून एक मोठा विस्तृत पट चित्रित होताना दिसतो. कधी कधी एखाद्या मोठ्या जनसमूहाचे चित्रणही कादंबरीतून प्रकट होताना दिसते. एकंदरीत मोठा जीवनाशय स्वत:मध्ये सामावून घेण्याची शक्ती कादंबरी या वाङ्मयप्रकारामध्ये असते. अर्थात अशा मोठ्या जीवनपटावर वावरत असताना लेखकाला फार सावध राहावे लागते. जसे की मोठ्या कॅनव्हासवर चित्र काढणाऱ्या चित्रकाराला चित्रातील प्रत्येक आकृती काढताना संपूर्ण अवकाशाचे भान ठेवावे लागते, तसेच कादंबरीकाराला कादंबरीतील प्रत्येक घटकाचे चित्रण करताना कादंबरीच्या व्यापक पटाचे भान ठेवावे लागते.

आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे समाजवास्तवाची विविध रूपे कादंबरीतून अधिक विस्ताराने प्रकट करता येतात. परंतु एकूणच मराठी साहित्य बराच काळ मध्यमवर्गीय जीवनकक्षेतच फिरत राहिले. मराठी कादंबरीही बव्हंशी फार व्यापक सामाजिक पट चित्रित करू शकली नाही. बाबा पदमनजी, अण्णा भाऊ साठे, शंकरराव खरात, महादेव मोरे, श्री. व्यं. केतकर अशा काही अपवादात्मक लेखकांनी मराठी साहित्याला, तसेच कादंबरीलाही जीवनाची अनेकविध रूपे, तसेच समाजाचे विविध स्तर चित्रित करून समृद्ध केले; परंतु त्यांची मराठीतल्या वाङ्मयव्यवहाराने उपेक्षाच केली. हे वातावरण दलित ग्रामीण साहित्यचळवळीच्या आगमनानंतर काहीसे बदलत गेले. त्यामुळे एकूण साहित्य व कादंबरी या वाङ्मयप्रकारामधून जीवनाचे विविध स्तर प्रकट व्हायला लागले. तसेच जीवनाची विविध क्षेत्रेही प्रकट होऊ लागली.

खरे म्हणजे जीवनाला व समाजाला पढे नेण्यासाठी शेती, व्यापार, विविध व्यवसाय, उद्योगधंदे, विज्ञान-तंत्रज्ञान, औद्योगीकरण नवे नवे शोध, नवे नवे प्रकल्प, नव्या संकल्पना, रूढ बाजूला सारून नवे वास्तव आकाराला येणे, अशा अनेक गोष्टी कार्यरत होत असतात. अशी सगळी क्षेत्रे पाहताना लक्षात येते की, एकूण संस्कृतीच्या परिघामध्ये स्वत:ची त्या त्या क्षेत्राची एक वेगळी संस्कृती निर्माण झालेली आहे. एक स्वतंत्र आणि स्वायत्त विश्व निर्माण झालेले आहे. अशी संस्कृतीची विविध रूपे मराठी कादंबरीमध्ये कमीच निर्माण होतात. उदा. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात औद्योगीकरण झालेले आहे. पण प्रत्यक्ष एखादा उद्योग उभारताना नेमके काय काय घडते, तेथे कोणती संस्कृती आकाराला आलेली असते, याचे मराठीमध्ये फारसे चित्रण येताना दिसत नाही. अलीकडे किरण गुरव या लेखकाने लिहिलेली ‘जुगाड’ ही कादंबरी या दृष्टीने महत्त्वाची आहे. ग्रामीण भागात एखादा उद्योग उभे करण्याचा प्रयत्न जेव्हा स्वार्थी पुढारी करतो, तेव्हा काय काय घडत जाते, याचे फार प्रभावी चित्रण किरण गुरव यांनी केले आहे. दुर्गम भागातील रस्ते उभारणीच्या संदर्भात लिहिलेली ‘रारंगढांग’ यासारखी कांदबरी त्यासाठीच महत्वाची ठरते.

प्राचीन काळापासून भारतामध्ये तलाव बांधले जात असत, असे दिसते. प्राचीन कालखंड सोडला, तरी इंग्रजी राजवटीमध्येही मोठमोठी धरणे बांधली गेली. स्वातंत्र्यानंतर तर देशाची गरज लक्षात घेऊन नियोजनपूर्वक धरणे बांधली जाऊ लागली. असे तलाव बांधले जातात, तेव्हा असंख्य लोक विस्थापित होतात. पण त्याच वेळी धरण बांधताना काय काय घडते, तेथे किती तज्ज्ञ, तंत्रज्ञ आणि कामगार काम करतात, त्या सगळ्यांच्या एकत्र येण्यातन तेथे कोणते जीवननाट्य आकाराला येते - हा खरे तर लेखकासाठी एक आव्हानात्मक अनुभव असतो. असू शकतो. परंतु अशा अनोख्या अनुभवविश्वाला भिडण्याचा प्रयत्न फार कमी लेखक करतात.

धरणांमुळे विस्थापित होणाऱ्यांच्या दु:खाची जाणीव प्रथमत: बा. सी. मर्ढेकर यांनी आपल्या ‘पाणी’ या कादंबरीतून व्यक्त केली. पुढे विश्वास पाटील, भास्कर चंदनशिव अशा काही लेखकांनी विस्थापितांचे दुःख आणि तेथील जीवननाट्य व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. गो. नी. दांडेकरांचाही उल्लेख करता येईल. परंतु प्रत्यक्ष धरण बांधताना काय काय घडते, बांधकाम करताना नेमके काय करावे लागते, तेथे किती प्रकारचे लोक असतात, नेतृत्व करणाऱ्या लोकांची काय भूमिका असते, आणि असे हजारो लोक रात्रंदिवस काही वर्षे सलग एकत्र काम करतात, तेव्हा नेमकी तेथील परिस्थिती काय असते, तेथे कशा प्रकारचे जीवननाट्य आकाराला येते, असंख्य लोकांच्या एकत्र येण्यातून काही वेगळी संस्कृती निर्माण होते का - हे आणि यासारखे अनेक प्रश्न उपस्थित होतात. अशा प्रश्नांच्या अनुषंगाने मराठीत काही लिहिले गेले आहे, असे दिसत नाही.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

मराठी साहित्यातील ही उणीव विलास शेळके यांच्या ‘धरणसूक्त’ या कादंबरीने अतिशय समर्थपणे भरून काढली आहे, यात मात्र काही शंका नाही. म्हणूनच ही मराठीतील एक महत्त्वाची आणि वैशिष्ट्यपूर्ण कादंबरी ठरते. या कादंबरीमध्ये धरणाचा पाया कसा खोदला जातो इथपासून ते धरण कसे पूर्ण केले जाते, इथपर्यंतच्या असंख्य गोष्टी या कादंबरीतून साकार केल्या जातात. नव्या काळात धरणे ही वीजनिर्मितीची केंद्रेही झालेली आहेत. तेव्हा त्यासाठी बांधली जाणारी धरणे, पाण्याचे चक्राकार फिरणे, पुन्हा ते पाणी इतर वापरासाठी सोडणे, अशा अनेक बाबी नव्याने या तंत्रज्ञानात आलेल्या आहेत. मग शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी बांधावयाचे धरण असो की, वीजनिर्मितीसाठी उभारावयाची धरणे असोत, त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात, कोणते तंत्रज्ञान वापरले जाते, काळाच्या ओघात तंत्रज्ञानात कसे बदल होत जातात, बदलणाऱ्या तंत्रज्ञानाबरोबर मनुष्यबळाचे कसे नियोजन केले जाते, या व अशा साऱ्या गोष्टी अभियांत्रिकी क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतातच. पण कुठलीही अभियांत्रिकी क्षेत्रातील गोष्ट मानवी सहभागाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. आणि जेथे जेथे मानवी सहभाग असतो; तेथे तेथे नाट्य निर्माण होते. त्या क्षेत्राशी संबंधित एक विशिष्ट अशी संस्कृती निर्माण होते. असे जेव्हा होते, तेव्हा या गोष्टी लेखकास आवाहन करणाऱ्या असतात. आणि आव्हान पायही असतात. धरणस्थळी निर्माण होणाऱ्या नाट्याने आणि संस्कृतीने विलास शेळके यांना आवाहन केले. त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे आव्हान लेखक म्हणून विलास शेळके यांनी मोठ्या समर्थपणे पेलले आहे.

या संपूर्ण कादंबरीभर धरणउभारणीच्या आणि विद्युतनिर्मिती प्रकल्पाच्या संदर्भात विपुल अशी तांत्रिक माहिती येते. ती येणे अपरिहार्यही आहे. परंतु या तांत्रिक माहितीमुळे तसेच अभियांत्रिकी क्षेत्रातील संज्ञांच्या वापरामुळे ही कादंबरी कुठेही क्लिष्ट होत नाही. त्याचे कारण असे की, त्या त्या प्रसंगी गुंतलेल्या मानवी भावभावना, तसेच मानवी श्रेय आणि वर्तन या गोष्टी लेखकाला महत्त्वाच्या वाटतात. त्यामुळे तांत्रिक माहिती आणि संज्ञा येऊनसुद्धा या कादंबरीतील निवेदन अतिशय वेगवान होत जाते, तसेच कादंबरीची वाचनीयताही वाढत जाते.

कादंबरीसारख्या लेखनप्रकारामध्ये अनुभवाची अनेक केंद्रे निर्माण होणे अपरिहार्य असते! तशी ती येथेही आहेत. त्यातील रातसा धरण प्रकल्प आणि देवघर धरण आणि वीजनिर्मिती प्रकल्प ही दोन मुख्य केंद्रे असली; तरी त्या निमित्ताने राज्य शासन, विरोधी पक्ष, विध्वंसक प्रवृत्ती आणि शक्ती, शासन पातळीवरील भ्रष्टाचार, कंत्राटदारांचे स्वायत्त जग, अधिकाऱ्यांचे आणि कामगारांचे जग, निस्वार्थपणे चळवळी करणारे कार्यकर्ते, चांगल्या गोष्टींना मदत करणाऱ्या समाजातील सत्प्रवृत्ती, मानवी जीवनाची हतबलता आणि नैसर्गिक आपत्तींवर मात करण्याची माणसाची जिद्द ही आणि अशी अनेक केंद्रे येथे आहेत. या अनेक केंद्रांना सांधण्याचे कार्य मात्र या कादंबरीतील प्रमुख ‘व्यक्ती’ अमर करताना दिसते. अमर स्वत: निष्णात व प्रयोगशील इंजिनियर आहे. तसेच तो विविध धरणप्रकल्पांवर काम करणारा एक शासकीय अधिकारीही आहे. किंबहुना त्याच्या विशिष्ट अशा व्यक्तिमत्त्वामुळे ही सगळी केंद्रे परस्परांशी एकजीव होऊन जातात आणि निसर्गाशी संघर्ष सुरू झाल्यानंतर उभे राहणारे एक भव्य जीवननाट्य या कादंबरीत साकार होत जाते. वेगवेगळ्या प्रकल्पावरती निर्माण झालेली संस्कृतीही येथे साकार होत जाते.

अमरचे व्यक्तिमत्त्व हे मोठे वैशिष्ट्यपूर्ण आहे. तो केवळ बढत्या मिळत गेलेला साहेब नाही. तर आपल्या साहेबीपणाच्या पलीकडे जाऊन माणूस समजून घेणारा, अडचणीत सापडलेल्या लोकांना मदत करू पाहणारा, ‘माणूस’ या मूल्यावर विश्वास ठेवणारा, संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा कवीही आहे. भारतीय समाजामध्ये ‘जात’ नावाची गोष्ट अनेक अर्थांनी महत्त्वाची ठरत जाते. परंतु त्याची जात पिढ्यान्पिढ्या दगडाधोंड्याचे काम करणारी पाथरवट. मागास. अगदीच अल्पसंख्य. राजकारणात किंवा व्यवस्थेच्या कुठल्याही महत्त्वाच्या स्थानी त्याच्या जातीचे कोणी नाही. अर्थात त्यालाही जातीच्या परिघात भिरभिरणे आवडत नाही. नातेगोते वापरून मलाई मिळवणाऱ्या इंजिनियर अधिकाऱ्यांकडे तो दयेच्या भावनेने पाहतो. म्हणजे जातीचा आधार घेणे त्याला आवडत नाही. असा जातीच्या पलीकडे गेलेल्या आणि केवळ आपल्या गुणवत्तेच्या बळावर अधिकार पदावर जाणाऱ्या अमरची कौटुंबिक पार्श्वभूमीही दरिद्रीच. तऱ्हेवाईक पण जिद्दी बापाच्या पोरी जन्मलेला, अकाली मातृसुखाला आचवलेला हा अभियंता स्वत:च्या कष्टामुळे आणि माणसाविषयी असलेल्या प्रेमामुळे जाईल तिथे स्वत:चे स्थान निर्माण करतो. धरणाच्या बांधकामावरची प्रत्येक गोष्ट स्वत: तपासून पाहिल्याशिवाय त्याचे समाधान होत नाही. हा काहीसा भावुकही आहे. बुद्धिवादी असूनही घरात परंपरेने चालत आलेला रामनवमीच्या उपवासाला खंड पडू द्यावा, असे त्याला वाटत नाही. किंवा धरणांसाठी पाणी अडवणारा हा अभियंता नदीला नमस्कार करतो, तिचे आशीर्वाद मागतो. असा काहीसा भावुक असणारा हा अभियंता कर्तव्यकठोरही आहे.

अमरच्या व्यक्तिमत्त्वाबरोबर त्याच्या पत्नीचे आरतीचे व्यक्तिमत्त्वही त्यांचे सांसारिक जीवन, तसेच त्यांचे भावजीवनही लेखकाने फार उत्कटपणे साकार केले आहे.

अमरच्या व्यक्तिमत्त्वासंबंधी थोडे विस्ताराने येथे लिहिले. कारण धरणांच्या प्रकल्पांवरती काम करणाऱ्या या अभियंत्याच्या नजरेतून सारी केंद्रे परस्परांशी जोडली गेलेली आहेत. किंबहुना त्यामुळेच ती एकजीव झाली आहेत.

या कादंबरीतला प्रमुख अनुभव हा धरणाच्या उभारणीसंबंधीचा आहे. धरणे कशी उभी राहतात, हे त्यांचा उपभोग घेणाऱ्यांना मुळीच माहीत असत नाही. केवळ भिंती उभ्या करून पाणी अडवले, एवढीच सामान्यांची धरणासंबंधीची समजूत असते. परंतु धरणाची रचना अतिशय गुंतागुंतीची तर असतेच, पण उत्तम तांत्रिक कौशल्य आणि अनेकांच्या श्रमातून, प्रसंगी बलिदानातूनही ती उभी राहतात, हे सामान्यांना माहीत असत नाही. हा सगळाच गुंतागुंतीचा अनुभव येथे लेखक अतिशय सहजपणे आणि प्रत्ययकारी पद्धतीने उभा करत जातो.

अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केल्यानंतर काही काळ शासनाच्या डिझायनिंग कार्यालयात तात्पुरत्या स्वरूपाची नोकरी केल्यानंतर प्रथम वर्ग अधिकारी म्हणून तो ‘रातसा’ धरणावर अभियंता म्हणून रुजू होतो. गेल्या गेल्या त्याला कळते की, धरणाच्या भिंतीचा पाया खोदताना सहा मजूर त्या पायात गाडले गेले आहेत आणि त्यांना शोधण्याचे काम सुरू आहे. पुढे देवघर धरणावरतीही चौदा मजूर नैसर्गिक आपत्तीमुळे गाडले जातात. संपत नावाचा बिल्डर्स हॉईस्टचा ऑपरेटरही अपघाताने मरतो.

म्हणजे धरणाचे बांधकाम बळी घेतल्याशिवाय पूर्ण होतच नाही की काय, अशी परिस्थिती आहे. अशा प्रसंगी अमरची संवेदनशीलता अधिकच तीव्र होताना दिसते. शिवाय ‘रातसा’ धरणाचे काम सुरू होताना तेथे विस्थापित झालेल्या आदिवासींचे पुनर्वसन केले जात नाही, कारण तसा कायदाच त्या वेळी नव्हता. त्यानेही अमरला सतत दुःख होत राहते.

रातसा धरण हे राज्यातले सगळ्यात मोठे दगडी बांधकाम असलेले म्हणजे ९०० मीटर लांब आणि ९० मीटर उंच असे नियोजित धरण आहे. ते तेथील सर्व अभियंत्यांना पूर्ण करायचे आहे. हे काम करणाऱ्या कंत्राटदाराने पुन्हा पुन्हा काम लांबवत नेल्यामुळे शासनाने आपल्या खात्यामार्फत स्वत:च ते पुरे करावयाचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे त्या प्रकल्पावरच्या अभियंत्यांची जबाबदारी अधिकच वाढलेली आहे.

धरणउभारणीच्या निमित्ताने काही तांत्रिक गोष्टीही येत जातात. उदा. जेथे धरण बांधावयाचे, तेथे वरती एक छोटे धरण बांधले जाते. त्यात साठलेल्या पाण्याचा वापर करून मोठे धरण बांधले जाते. धरणाच्या पोटात एक ‘संपवेल’ काढणे आवश्यक असते, भिंतींची पाहणी करण्यासाठी व वर जाण्यासाठी बांबूच्या ‘चाळ्या’ उभ्या केल्या जातात, तसेच मटेरियल वर पोचवण्यासाठी बिल्डर्स हॉईस्ट हे यंत्र वापरले जाते, या यंत्राची बकेट रेल्वे सदृश्य रुळावरून वरखाली ये-जा करत असते, त्याचे नियंत्रण सुटल्यास ते कोसळू शकते, दगड मिळवण्यासाठी चांगली खाण शोधून तेथील खाणीवर हजारो मजूर ठेवले जातात, काँक्रीटच्या दर्जावर कायम लक्ष ठेवले जाते. पावसाळ्यापूर्वी ‘पेनस्टॉक पाईप’ उभा करणे आवश्यक असते, धरणाच्या भिंतीवरून अधिकचे पाणी जेव्हा वाहायला लागते, तेव्हा त्याचा वेग प्रचंड असतो, तो वेग कमी करून त्याची विनाशक शक्ती कमी करण्यासाठी धरणाच्या पायथ्याशी बकेटसदृश आकार निर्माण करावे लागतात - या साऱ्या तांत्रिक गोष्टी येतात, एवढेच नाही तर तीस-पस्तीस वर्षांपूर्वी धरणाची भिंत सलग बांधता येत नसे. त्यासाठी ‘मोनोलिथ’ उभे करावे लागत, त्याला आधार म्हणून ‘बट्रेस’चे टेकू दिले जात. यात बट्रेसच्या निर्मितीसाठी पुन्हा जमिनीत मर्यादित स्फोट करावे लागत इ. तपशीलही येत जातात. पण हे सारे तपशील गद्य पद्धतीने येत नाहीत. त्या त्या गोष्टी होताना कोणते मानवी व्यवहार झाले, यावर लेखक भर देतो. त्यामुळे या तपशिलांना जडत्व येत नाही.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत” हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...

पूर्वनोंदणी करण्यासासाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

एखादे मोठे धरण बांधायचे असेल, तर तेथे काही वर्षे अभियंत्यांपासून सामान्य मजुरांपर्यंत हजारो लोक काही काळासाठी एकत्र राहतात. त्या काळातील त्यांच्या जगण्यात निर्माण झालेले नाट्य आगळेवेगळे असते. ते विलास शेळके प्रकट करतात. उदा. रातसा धरणाचे काम चालू असताना भूकंप झाला. या भूकंपातील अनुभव येथे व्यक्त होतात. या तात्पुरत्या वसाहतीवर अनेक उत्सव होतात, रविवारचा बाजार भरतो. या बाजारात मटनापासून सर्व गोष्टी मिळतात. या साऱ्याचे चित्रण जेव्हा लेखक करतो, तेव्हा त्यातून तेथे आकाराला आलेले सामूहिक जीवनच त्याला प्रकट करावयाचे असते. कादंबरीला ‘कादंबरीपण’ प्राप्त होण्यासाठी या साऱ्या गोष्टी आवश्यक असतात.

‘रातसा’ धरणाचे काम संपत आले आणि अमरची बदली एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून मराठवाड्यातील धरणावर होते. तो सहकुटुंब त्या धरणाच्या कामावर रुजू होतो. कालांतराने देवघर धरणावर सुपरिंटेंडींग इंजिनियर म्हणून रुजू होतो. हे काम ‘रातसा’ धरणापेक्षा खूपच मोठे, गुंतागुंतीचे आणि नव्या तंत्राने करावयाचे आहे. या प्रकल्पातून विद्युतनिर्मितीही करावयाची आहे. म्हणजे हा प्रकल्प आधीच्या प्रकल्पांपेक्षा वेगळा तर आहेच, पण प्रचंड अशी नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यामुळे कादंबरीचा बहुसंख्य भाग या प्रकल्पाने व्यापला आहे.

येथेही धरणाच्या आणि जलविद्युत प्रकल्पाच्या तांत्रिक बाबी येतातच. कारण प्रकल्पांची प्रत्यक्ष उभारणी चित्रित करणे हाच या कादंबरीचा मूळ गाभा आहे.

येथे सह्याद्रीच्या उंच डोंगरांवर येथील घळींचा फायदा घेत देवनदीवर दोन धरणे बांधायची आहेत. ही दोन धरणे नदीच्या उगमाच्या थोडे खाली बांधावयाची आहेत. कारण फार मोठ्या पाण्याचा साठा करण्याची आवश्यकता नाही. एका धरणातले पाणी कोकणकड्यावरून खाली असणाऱ्या जलविद्युत केंद्रामध्ये वेगाने सोडले जाऊन ते तिसऱ्या धरणामध्ये साठवले जाणार आहे.

रात्रीच्या वेळी जेव्हा विजेची मागणी कमी असते, तेव्हा निर्माण होणाऱ्या विजेचा वापर करून दुसऱ्या धरणातले पाणी पुन्हा पहिल्या धरणात पाठवले जाणार असते. शेवटी वापरले गेलेले पाणी तिसऱ्या धरणात (जे साई नदीवर पढे उभारलेले आहे) सोडले जाणार असते. या तिन्ही धरणांची कामे अमर आल्यानंतरच सुरू होतात. त्याच्या मार्गदर्शनाखाली धरणे जवळजवळ पूर्ण झाली आहेत. पाण्याची स्थितिज ऊर्जा गतिज उर्जेत रूपांतरित करणारा (पृ. १३३) विद्युतप्रकल्प पूर्ण करण्याचे काम अतिशय वेगात सुरू झालेले आहे. त्यासाठी आवश्यक असणारे बोगदे व भुयारी विद्युतगृह इ. कामे सुरू झालेली आहेत. वीज निर्माण करणारी यंत्रसामग्रीही पुष्कळशी बसवून झालेली आहे. आता काही दिवसांत विद्युतनिर्मितीही होणार होती. आणि अचानक नैसर्गिक आपत्ती येते. एक मोठा कोकणकडा अती पावसामुळे उंचावरून कोसळतो, तोच मुळी खालच्या तलावामध्ये. तलावात पाणी भरपूर असल्यामुळे ते अतिशय वेगाने विद्युतप्रकल्पात घुसते. त्याबरोबर झाडे, झडपे, चिखल, प्राणी यांनी संपूर्ण जलविद्युत प्रकल्प भरून जातो. त्यात काम करणारी चौदा माणसे त्या प्रवाहाच्या रेट्याबरोबर वाहत जातात. काही त्या चिखलामध्ये रुतून बसतात. काही पुढे कुठे जातात, ते कळत नाही.

अनपेक्षित असे नैसर्गिक संकट येते. त्यातूनही धरण सुरक्षित असते. परंतु संपूर्ण जलविद्युत प्रकल्प मात्र चिखलाने बुजून जातो. तो सगळा चिखल काढावयाचा निर्णय घेतला जातो आणि विपरीत परिस्थितीशी एक नवेच युद्ध सुरू होते. या आगळ्यावेगळ्या युद्धाचे अतिशय चित्रदर्शी वर्णन विलास शेळके करतात. या प्रसंगी मात्र विविध मानवी वृत्ती-प्रवृत्तींचे फार उत्कट चित्रण केलेले आढळते. चिखल-गाळ काढणारे आदिवासी मजूर, त्यांचे स्वार्थांध तरीही मेहनती पुढारी, न शिकलेला पण यंत्र-तंत्राची जुळवणूक करणारा सरदार कुलकर्णी, पत्रकार, अडवणूक करणारे विरोधी पक्ष नेते, समजून घेणारे अभ्यासू पाटबंधारे मंत्री, सतत पैशांची मागणी करणारे आदिवासी मंत्री, कुठलीही अपेक्षा न ठेवता मदत करणारे दुसरे आदिवासी आमदार, या आपत्ती निवारणात खांद्याला खांदा लावून मदत करणारे अभियंते, मंत्रालयातील झारीतील शुक्राचार्य असणारे अहंकारी अधिकारी, शिंद्यांसारखा मदत करणारा वरिष्ठ, या प्रकल्पांना मदत करणारे परदेशातील तज्ज्ञ अशी किती माणसे, प्रवृत्तींचे दर्शन या नैसर्गिक आपत्तीशी लढताना होते. किंबहुना असे म्हणता येईल की, आपत्तीच्या काळातच माणसे खरीखुरी कळतात, हेच लेखकाने येथे सूचित केले आहे.

प्रत्यक्ष धरण उभे करताना निर्माण होणारे जीवननाट्य साकार करणे हा या कादंबरीचा मूळ गाभा आहे. ही जशी एक नवी गोष्ट आहे, त्याप्रमाणे निसर्गाची विस्तृत आणि चित्रदर्शी वर्णने करणे हीही एक मोठी जमेची बाजू आहे. या संदर्भात मराठीतील सुप्रसिद्ध ग्रामीण कादंबरीकार र. वा. दिघे यांचे स्मरण होते. त्यांच्या ‘सराई’, ‘पाणकळा’ इ. कादंबऱ्यांमधील निसर्गवर्णने अविस्मरणीय आहेत. किंबहुना अशा प्रकारची काव्यात्म निसर्गवर्णने मराठीमध्ये प्रथमत:च येत होती. त्यानंतर अशी निसर्गवर्णने श्री. विलास शेळके यांच्या ‘धरणसुक्त’ या कादंबरीमध्येच येत आहेत, असे म्हणावे लागते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

चित्रदर्शी निसर्गवर्णने ही या कादंबरीची आणखी एक जमेची बाजू आहे. मानवी व्यवहाराकडे अतिशय सकारात्मक पद्धतीने अमर पाहतो, त्यामुळे चळवळीतूनही नव्या सकारात्मक गोष्टी निर्माण होतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे मेधाताई काटकर यांच्या आंदोलनामुळे पुनर्वसनाचा कायदा आला, ही गोष्ट याच सकारात्मक दृष्टीची प्रतिती देणारी आहे. किंबहुना सकारात्मक दृष्टी आणि अभेद्य जिद्द यामुळेच गाळात गेलेला विद्युतप्रकल्प स्वच्छ होऊन पुन्हा कार्यरत होऊ शकला असे दिसते. म्हणजे अमरचा सकारात्मक दृष्टिकोन ही या कादंबरीची आणखी एक जमेची बाजू...

मोठमोठ्या नद्यांना अडवून प्रचंड मोठी धरणे बांधणे म्हणजे मानवी प्रज्ञेने निसर्गावर मिळविलेला विजय जसा असतो, त्याप्रमाणे माणसाने निसर्गाशी पुकारलेले ते युद्धही असते. या युद्धात माणूस कधी विजयी होतो. कधी पराजित होतो. ‘धरणसूक्त’ म्हणजे अशा निसर्गाबरोबर मांडलेल्या युद्धाचे मोठे प्रभावी चित्रण आहे.

एकंदरीत प्रभावी निसर्गचित्रणे, सहजतेने उभ्या राहणाऱ्या व्यक्तिरेखा, तांत्रिक बाबींना मानवी व्यवहाराची जोड देऊन साधलेले प्रवाही निवेदन, जीवनाकडे सकारात्मक पद्धतीने पाहणे इ. अनेक बाबींमुळे ही मराठीतील एक महत्त्वाची कादंबरी म्हणून तिची नोंद केली जाईल, असे वाटते.

कादंबरीचे लेखक विलास शेळके हे स्वत: प्रयोगशील अभियंते आहेत. शासनाच्या सर्वोच्च पदावरून निवृत्त झालेले आहेत. त्यामुळेच असा एक आगळावेगळा अनुभव ते आपल्या कादंबरीतून साकार करू शकलेले आहेत, असे म्हणावे लागते. याचा अर्थ असा की, जीवनाच्या विविध क्षेत्रांतील प्रतिभावंत जोपर्यंत साहित्याच्या क्षेत्रात येत नाहीत, तोपर्यंत मराठी साहित्याचे पात्र विस्तृत होणार नाही.

मराठी साहित्यात एक नवे भावविश्व साकार करणाऱ्या कादंबरीकारांचे म्हणूनच सहर्ष स्वागत केले पाहिजे.

‘धरणसूक्त’ : विलास शेळके

राजहंस प्रकाशन, पुणे

पाने : ३२५

मूल्य : ३८० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......