‘निळे आकाश’ या पुस्तकातून १६ यशस्वी दलित उद्योजकांच्या कथा आपल्यासमोर येतात. वंचित समाजातील अनेक नवतरुण, महिला, मध्यम तसेच ज्येष्ठ वर्गामध्ये त्या नवचेतना जागवणाऱ्या ठरतील
ग्रंथनामा - झलक
मिलिंद कांबळे
  • ‘निळे आकाश : गोष्टी उद्योजकतेच्या’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Wed , 17 August 2022
  • ग्रंथनामा झलक निळे आकाश : गोष्टी उद्योजकतेच्या Nile Aakash- Goshti Udyojaktechya जगदीश जाधव Jagdish Jadhav स्वाती अमराळे-जाधव Swati Amrale-Jadhav मिलिंद कांबळे Milind Kamble दलित इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इन्डस्ट्रीज Dalit Indian Chamber of Commerce & Industry डिक्की DICCI दलित उद्योजक Dalit entrepreneur

‘निळे आकाश : गोष्टी उद्योजकतेच्या’ या जगदीश जाधव, स्वाती अमराळे-जाधव यांच्या पुस्तकात त्याच्या नावाप्रमाणेच उद्योजकांच्या गोष्टी आहेत, पण हे दलित उद्योजक आहेत. १६ यशस्वी दलित उद्योजकांच्या यशोगाथा या पुस्तकात वाचायला मिळतात. हे पुस्तक नुकतेच परममित्र पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाला ‘दलित इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इन्डस्ट्रीज’ (डिक्की)चे संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी प्रस्तावना लिहिली आहे. ती ‘अक्षरनामा’च्या वाचकांसाठी...

.................................................................................................................................................................

दलित, आदिवासी, बहुजन समाजामधील उद्यमशीलता हा सदैवच माझ्या चिंतनाचा आणि कामाचा भाग राहिलेला आहे. कळत्या वयापासूनच माझ्यावर सर्वाधिक प्रभाव असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक लेखनाचा मी अभ्यास करत आलो आहे. राज्यघटना देशाला समर्पित करण्यापूर्वी संविधान सभेत बाबासाहेबांनी (२५ नोव्हेंबर १९४९ रोजी) केलेल्या भाषणाचा इशारा माझ्यासहित अनेकांच्या मनावर स्पष्ट कोरला गेलेला आहे. ‘राज्य घटनेच्या अंमलबजावणीद्वारे आपल्या देशातील राजकीय व्यवस्थेमध्ये समता प्रस्थापित होईल, परंतु देशातील सामाजिक तसेच आर्थिक जीवनात जोवर समता नांदत नाही, तोवर एका अतिशय विषम परिस्थितीचा सामना आपल्याला करावा लागेल’, असे बाबासाहेब त्या भाषणादरम्यान म्हणाले होते. ‘हा विरोधाभास लवकरात लवकर नाहीसा केला नाही, तर आपल्या देशातील लोकशाही राज्यप्रणाली खऱ्या अर्थाने स्थिरप्रद होऊ शकणार नाही’, असे बाबासाहेबांचे कथन होते.

तथाकथित दलित समजल्या जाणाऱ्या समाजसमूहांचे आर्थिक उत्थान होणे, ही आर्थिक क्षेत्रांतील आणि पर्यायाने यशावकाश सामाजिक क्षेत्रातील समता साकार होण्याची पूर्वअट ठरते, अशी बाबासाहेबांची धारणा होती. दलित समाजसमूहांच्या पाचवीला पुजलेले दारिद्रय ही दलितांच्या आर्थिक पुनरुत्थानातील मुख्य धोंड होती. मुख्य आव्हान होते ते गरिबी निवारणाचे. या पिढीजात गरिबीचे निराकरण दलितांच्या मुक्तिसंग्रामातील पहिला टप्पा ठरतो, हे अतिशय नेमकेपणे हेरणारा या भूमीतील पहिला विचारवंत म्हणजेच महात्मा फुले. ‘विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतीविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्तविना शुद्र खचले। एवढे अनर्थ एका अविद्येने केले।।’ म. जोतीराव फुले यांच्या या अजरामर पंक्तीतील ‘वित्तविना शुद्र खचले।’ ही ओळ वंचितांच्या स्थितीचे नेमके वर्णन करणारी आहे. दलित समाजसमूहापाशी धनसंचय होणे, हा त्यांच्या दैन्य निवारणाचा खरा राजमार्ग आहे. धनसंचय करायचा झाला तर साधने हवीत. त्या वेळी सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण हाच काय तो आर्थिक पुनरुत्थानाचा पर्याय दलित जातसमूहातील होतकरूंना दिसत होता. आर्थिक पुनर्रचनेच्या काळात मात्र सरकारी नोकऱ्यांमधील संधी आक्रसत चालल्या होत्या. त्यामुळे एकाच पर्यायावर अवलंबून राहून चालण्यासारखी परिस्थिती आजही नाही. दुसरा मार्ग उरतो तो स्वयंरोजगाराचा. इथून पुढे नोकऱ्या मागणारे नव्हे, तर नोकऱ्या निर्माण करणारे बनण्याखेरीज गत्यंतर नाही.

१९व्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकेत ‘ब्लॅक कॅपिटॅलिझम’ चळवळ जोर धरू लागली होती. अमेरिकेत १८६१मध्ये वर्णभेद निर्मूलनाचा जाहीरनामा मांडला गेला. त्याद्वारे समान नागरी हक्कांची चळवळ तिथे अंकुरली. त्या चळवळीच्या शताब्दीचे निमित्त साधून मार्टिन ल्यूथर किंग यांच्या प्रेरणेने १९६१ साली अमेरिकेत एक ‘लाँग मार्च’ काढण्यात आला. ‘आम्हांला स्वातंत्र्य आणि भाकरी दोन्हीही हवे’, अशी त्या संपूर्ण चळवळीची मागणी होती. वर्णभेद आणि वर्णद्वेष ही अमेरिकी भांडवलशाहीला काळिमा फासणारी सामाजिक बाब होय आणि तिचा मुकाबला करायचा तर कृष्णवर्णीय समूहांनीदेखील भांडवल संचयाद्वारे आर्थिक-औद्योगिक क्षेत्रांत अग्रेसर बनायला हवे, हा विचार त्या सगळ्या घुसळणीद्वारे प्रकर्षाने पुढ्यात आला. त्यातूनच कृष्णवर्णीयांमधील उद्यमशीलतेचे संवर्धन-संगोपन करणाऱ्या ‘ब्लॅक कॅपिटॅलिझम’चा जन्म झाला.

या सर्व गोष्टींचा विचार करत असताना एक गोष्ट आपल्याला स्पष्ट जाणवते की, असे आपल्या भूमीत पूर्वीही घडलेले आहेच की! हा विचार इथे रुजवणारा एक लोकोत्तर पुरुष आपल्याकडेही होऊन गेलेला आहे. त्यांचे नाव छत्रपती शाहू महाराज. १९०२ साली शाहू महाराजांनी संस्थानातल्या नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची कल्पना पहिल्यांदा राबवली. परंतु, त्याच्याही पुढे जाऊन, दलित-पददलित समाजसमूहातील घटकांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्याचे पाऊलही महाराजांनी उचलले. प्रसंगोत्पात भेटायला येणाऱ्यांना खास प्रख्यात असणाऱ्या कोल्हापुरी चपला भेटीदाखल देण्यास शाहू महाराजांनी प्रारंभ केला. त्याद्वारे कोल्हापुरी पादत्राणांचे ‘ब्रँडिंग’ शाहू महाराजांनी स्वत: पुढाकार घेऊन केले. गंगाराम कांबळे नावाच्या गृहस्थांना कोल्हापुरात हॉटेल चालू करण्यास पाठबळ पुरवले ते शाहू महाराजांनीच. त्या काळात स्वतः शाहू महाराज गंगारामबुवांच्या हॉटेलात जाऊन अधूनमधून खाद्य-पेयांचा आस्वाद घेत असत. या सगळ्या संदर्भाच्या एकत्र येण्यातून ‘डिक्की’च्या कल्पनेचे बीजारोपण माझ्या मनात घडले.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत १९९१ सालापासून दृढ झालेल्या आर्थिक पुनर्रचना पर्वाद्वारे देशाच्या अर्थकारणात परिवर्तनाची जणू एक झंझावाती लाटच अवतरली. आर्थिक उदारीकरणामुळे देशी बाजारपेठा मोठ्या प्रमाणावर खुल्या झाल्या. बाजारपेठ ही अतिशय ताकदवान संस्था असते. मुळात, आपल्या देशाची लोकसंख्या प्रचंड आहे. देशांतर्गत बाजारपेठ अतिशय सघन, सखोल आणि चौफेर विस्तारलेली आहे. देशांतर्गत बाजारपेठही वैविध्यपूर्ण आहे. कोणत्याही अर्थाने ती एकसंध नाही. तिच्यात उदंड स्तरीकरण आहे. हे स्तरीकरण उद्योगव्यवसायांच्या पथ्यावरच पडत असते. उत्पन्न, आवडीनिवडी, प्राधान्यक्रम, खरेदीच्या सवयी व संस्कृती, खर्चाची प्रवृत्ती इ. बाबी स्तरीकरणातील प्रत्येक स्तरांत भिन्नभिन्न आहेत. त्यामुळे ‘तयार कराल ते खपते’, असे आपल्या बाजारपेठेचे वैशिष्ट्य आहे. उदारीकरणाच्या पर्वात शासनसंस्थेची अथवा सरकारची अर्थकारणातील भूमिका बदलत आहे. देशाची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. या वाढत्या हातांना काम पुरवण्याचे आव्हान आपल्यापुढे आहे. त्यातही दलित समाज समूहांतील तरुणांची परिस्थिती अधिक बिकट आहे. आजवर त्यांना सरकारी नोकरी आणि राजकीय व्यवस्थेतील आरक्षणाचे थोडेफार कवच होते. उत्तरोत्तर ही स्थिती संकुचित होत जाणार आहे. अशा परिस्थितीत स्वत:चे आर्थिक उन्नयन घडवून आणण्यासाठी उद्योगधंदे उभारणे हाच हुकमी पर्याय शिल्लक राहतो. आर्थिक पुनर्रचनेमुळे या पर्यायांचा अवलंब करण्यास आपल्या देशात अनुकूल वातावरण तयार झाले आहे. आर्थिक उदारीकरण व पुनर्रचना आपल्या देशातील सामाजिकदृष्ट्या उपेक्षित राहिलेल्या या समाजसमूहांच्या आर्थिक व वित्तिय उत्कर्षास पूरक ठरते आहे.

बाजारपेठेत तुमची जात अप्रस्तृत ठरते. बाजारपेठीय व्यवहारांमध्ये सहभागी होणाऱ्या कोणत्याही आर्थिक तसेच व्यावसायिक घटकाला - मग तो उत्पादक असो, पुरवठादार असो, व्यापारी असो, अडत्या असो, ग्राहक असो, गुंतवणूकदार असो वा अन्य कोणी - समोरच्याच्या जातीशी काहीही घेणे-देणे नसते. बाजारपेठ दाद देते ती कौशल्यांना, गुणवत्तेला आणि कार्यक्षमतेला. तिथे महत्ता चालते, ती वस्तू अगर सेवेच्या गुणवत्तेची. तिथे त्या वस्तू अगर सेवेच्या निर्मात्याची अथवा पुरवठादाराची जात अप्रस्तृत असते. जात अगर सामाजिक दर्जा तिथे गैरलागूच ठरतो. बाजारपेठेची ही ताकद व वैशिष्ट्ये अतुलनीय होत.

दलित समाज हा मुळात अनेक प्रकारचे कौशल्ये अंगी बाळगणारा समाज आहे. पूर्वीच्या बलुतेदारी पद्धतीची ती देणगी होय. दलित समाजातील व्यक्तीच्या गुणसूत्रातच कौशल्य व कारागिरी असते. स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी मुख्यत: दोन गोष्टी लागतात. एक म्हणजे कौशल्य आणि दुसरे म्हणजे धोका वा जोखीम पत्करण्याची तयारी. व्यावसायिक कौशल्ये दलित समाजापाशी पूर्वापारपासून आहेतच. पदरचे काही तरी गमावण्याची भीती असलेला माणूस जोखीम पत्करण्यास नाखुष असतो. इथे मुदलात दलित समाजापाशी गमावण्यासारखे काही नव्हतेच. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही.

महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोघांच्या व्यक्तिमत्त्वातील नवसर्जक, धडाडीचा उद्योजक मला नेहमीच आर्कषित करत आलेला आहे. उभी पारंपरिक समाजव्यवस्था नाकारण्याचे उदंड धाडस या दोघांपाशीही होते. म. फुले समाजसुधारक तर होतेच, पण ते स्वत: एक यशस्वी उद्योजक होते. ते सरकारी कंत्राटदार होते. पुण्यात हडपसरजवळ त्यांनी मोठ्या मेहनतीने बागायत फुलवलेली होती. स्वतंत्र भारताची राज्यघटना सिद्ध करून बाबासाहेबांनी समाजव्यवस्थेबाबतही एक आदर्श जीवनदृष्टी आपल्या पुढ्यात मांडली. बाबासाहेबही प्रचंड उद्यमशील होते. त्यांना भांडवली बाजाराचे, शेअर बाजाराचे उत्तम ज्ञान होते. त्यात ते सक्रियही होते.

बाबासाहेब हे जन्मजात नवसर्जकच (आन्त्रप्रोन्युअर) होते. अखंड अभ्यास, अफाट मेहनत, निडर वृत्ती, धाडस आणि वाटेल ती किंमत मोजून प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची अदम्य उर्मी हे नवसर्जक उद्यमशीलाचे आद्य लक्षण व भांडवल. हा सारा गुणसमुच्चय म्हणजे तर बाबासाहेबांचा स्थायीभाव होता. त्यांचा संघर्ष हा आपल्या समाजातील उतरंडप्रधान जातिव्यवस्था आणि तिच्यातून निपजणाऱ्या विषमेतविरुद्ध होता. त्याला कारणही तसेच आहे. विषमतेतून जन्माला येते ती पिळवणूक. पूर्वापार या पिळवणुकीची सांगड पडलेली होती, ती पिढीजात हलक्या व्यवसायांशी. तो व्यवसाय बदलण्याची मुभा कोणालाच नव्हती. तेच वळण स्वातंत्र्यानंतरच्या काही पिढ्यांच्या अंगी राहिले. परिणामी त्यांचा सारा भर राहिला तो शिक्षण, राजकारण आणि सरकारी नोकऱ्यांच्या आरक्षणावर. इथून पुढे हे फारसे उपयोगी ठरणार नाही. त्यामुळे या विषमतेतून सुटका करून घेण्यासाठी आपल्याला वेगळे पर्याय शोधावे लागणार आहेत. भांडवलशाही आणि भटशाही या दोहोंनाही बाबासाहेबांचा कडवा विरोध होता. त्याला कारण होती ती तत्कालीन परिस्थिती. त्या काळात भांडवल संचयाच्या वाटा समाजातील केवळ काहीच जातवर्णांच्या मुठीत बंदिस्त होत्या. त्यामुळे बाबासाहेबांना ते सारेच वास्तव त्याज्य वाटत होते. उदारीकरणानंतर सारेच बदलले आहे. दलित समाजातील उद्यमशीलतेला धुमारे फुटण्यास बाजारपेठेने मोठा अवकाश पुरवलेला आहे. त्यातून दलित समाजसमूहातील घटकांपाशी भांडवल संचयाचे मार्ग मोकळे होत आहेत. त्यातून उद्यमशीलतेला अधिक वाव मिळेल आणि यशावकाश जात अप्रस्तृत ठरत जाईल. बाबासाहेबांचा सारा संघर्ष त्यासाठीच होता. ते त्यांचे स्वप्न आता खुल्या झालेल्या बाजारपेठेच्या माध्यमातून साकारण्यास अनुकूल वातावरण निर्माण झालेले आहे. जात आणि भांडवल या दोन गोष्टी कधीच एकत्र नांदू शकत नाहीत.

समाजातील विविध आर्थिक-व्यावसायिक घटकांमध्ये वसणाऱ्या उद्यमशील व सर्जक क्षमतांचे संवर्धन करण्यावर भर देणारी प्राध्यापक जगदीश भगवती यांची विकासावर दृष्टी समाजाला आत्मनिर्भर बनवणारी आहे. देशी तसेच विदेशी गुंतवणूकदारांना भारतीय अर्थव्यवस्थेबाबत विश्वास वाटण्याजोगे आर्थिक-औद्योगिक पर्यावरण निर्माण होण्याच्या दृष्टीने ते सारे प्रयत्न महत्त्वाचे ठरतात. भारतीय अर्थव्यवस्थेतील वस्तुनिर्माण उद्योगाचा पाया विस्तारावा, या दृष्टीने ‘मेक इन इंडिया’, ‘स्कील इंडिया’, ‘स्टँड अप- स्टार्ट अप इंडिया’ यांसारखे सरकारने जाहीर केलेले उपक्रम पूरक आहेत. उद्योग-व्यावसायिकांना त्यांचे-त्यांचे व्यापारधंदे व उद्योग सुलभपणे करता यावेत (ईझ ऑफ डुइंग बिझनेस) यासाठी या सरकारचे सुरू असलेले प्रयत्नही स्तुत्यच आहेत. आपल्या देशातील बेरोजगारी, कौशल्यांना वाव उपलब्ध होण्यासाठी सार्वजनिक मंचाचा असलेला अभाव, स्वयंरोजगारांचे आक्रसलेले पर्याय, यांसारख्या परिस्थितीवर विविध उपाय महत्त्वाचे आहेतच. त्याहीपेक्षा महत्त्वाचे आहे ते या सरकारने स्वयंरोजगारांना दिलेली तळागाळातील माणसांत जागवलेली आशा, त्यांना उपलब्ध करून दिलेल्या संधी. आपल्या देशातील लघु व मध्यम आकारमानाच्या उद्योगघटकांचे अलीकडील काळात जोमाने सुरू झालेले पुनरुत्थान.

२००८ साली साधारणपणे ३ कोटी ९० लाखांच्या घरात असलेली लघु व मध्यम आकारमानाच्या उद्योगघटकांची आपल्या देशातील संख्या २०१३ साली ४ कोटी ८० लाखांचा टप्पा पार करून गेलेली होती. आजमितीस ही संख्या जवळपास साडेसहा कोटींच्या पुढे गेलेली आहे. लघुत्तम उद्योगघटकांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य पुरवणाऱ्या ‘मुद्रा’ योजनेद्वारा आजतागायत जवळपास साडेतीन कोटी उद्योजकांना सुमारे १ लाख ४० हजार कोटी रुपयांचे कर्ज वाटप झालेले आहे.

दलित चळवळीतील सुरुवातीच्या पिढ्यांनी प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध संघर्षाचा पवित्रा धारण केला. त्या काळात आणि चळवळीच्या त्या टप्प्यावर ते स्वाभाविकही होते आणि आवश्यकही. परंतु बाजारपेठीय व्यवस्थेच्या माध्यमातून आर्थिक उन्नयन साधायचे म्हटल्यानंतर तिथे संघर्षाचा मार्ग स्वीकारून चालत नाही. तिथे समन्वयाची भूमिका घ्यावी लागते. व्यापारउदिमात ग्राहकाचे आणि अन्य व्यावसायिकांचे मन जिंकणे महत्त्वाचे असते. त्यामुळे संघर्षातून मुक्तीच्या प्रवासाचा पुढचा टप्पा समन्वयातून विकास हाच असतो. कोणताही व्यवसाय हा समन्वयातून, साहचर्यांतून आणि सामंजस्यातूनच उभा राहत असतो. संवाद आणि सौदाहपूर्ण परस्पर सहकार्य हे त्यासाठीचे अचूक माध्यम होय.

दलित चळवळींच्या आधीच्या टप्प्यांवर जी व्यूहरचना त्या-त्या काळातील धुरिणांनी अंगिकारलेली होती, तिच्याशी तुलना करता आम्ही संपूर्णत: ‘यू टर्न’ घेतला आहे. हा मार्ग स्वीकारल्यानंतर आम्हांलाही तीन पर्वांतून प्रवास करावा लागलेला आहे. प्रवासाच्या पहिल्या टप्प्यांत आम्हांला हास्यापद बनवण्याचे प्रकार झाले. ते साहजिकही होते. कोणीही काही नवीन करायला लागले की, पहिल्यांदा समाज त्याची कुचेष्टाच करतो. पण आम्ही पुढे चालतच राहिलो. दुसऱ्या टप्प्यांत आम्हांला टीकेचे धनी व्हावे लागले. त्या भडिमारानेही आम्ही डगमगलो नाही. दुसऱ्या पर्वातून तावूनसुलाखून बाहेर पडल्यानतर तिसऱ्या पर्वात आम्ही कौतुकाचे, गुणग्राहकतेचे धनी बनत आहोत.

‘निळे आकाश’ या पुस्तकातून १६ यशस्वी दलित उद्योजकांच्या कथा आपल्यासमोर येतात. वंचित समाजातील अनेक नवतरुण, महिला, मध्यम तसेच ज्येष्ठ वर्गामध्ये त्या नवचेतना जागवणाऱ्या ठरतील. इंग्रजीमध्ये याआधी असा प्रयत्न झालेला आहे. महाराष्ट्रासारख्या विविधता, विपुलता आणि पुरोगामी चळवळीची पार्श्वभूमी असणाऱ्या राज्यात मातृभाषेत असलेल्या या उद्योजकांच्या कथा अनेक अल्पशिक्षित, उपेक्षित तरुणांना मार्गदर्शक ठरतील. यातील काही कथा या महाराष्ट्रातीलच असल्याने त्यांना ते अधिक भावेल. कठोर आणि प्रतिकूल परिस्थितीतील या उद्योजकांचा प्रवास, तरुणांनी पाहिलेली स्वप्ने प्रत्यक्षात साकार करण्याची प्रेरणा देतील. यादृष्टीने लेखकद्वयीने केलेला हा प्रयत्न स्तुत्यच म्हणावा लागेल. त्यांचा पुढचा प्रयत्न हा दलित महिला उद्योजकांच्या कथा लोकांपुढे आणण्याचा असावा, अशी इच्छा मी न व्यक्त करतो. त्यांच्या पुढील लेखन प्रवासासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा!

‘निळे आकाश : गोष्टी उद्योजकतेच्या’ – जगदीश जाधव, स्वाती अमराळे-जाधव

परम मित्र पब्लिकेशन्स, ठाणे

पाने – १२८

मूल्य – २०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......