अजूनकाही
औरंगाबादमध्ये सध्या एक नारा खूप गाजतोय, ‘सुप्रिया सुळे गो बॅक, सुप्रिया सुळे गो बॅक’. का हा नारा गाजतोय औरंगाबादमध्ये?
या शहरात मौलाना आझाद ट्रस्ट नावाची ख्यातनाम शिक्षणसंस्था आहे. रफिक झकेरिया यांनी ती स्थापन केलेली आहे. झकेरिया हे काँग्रेसचे मोठे नेते होते. ते औरंगाबादमधून खासदार म्हणूनही निवडून आले होते. त्यांची ही संस्था. या संस्थेत झकेरियांचे कुटुंबीय, कार्यकर्ते सदस्य व पदाधिकारी आहेत. मुस्लीम पदाधिकारी असले तरी सर्व जातीधर्माचे विद्यार्थी या संस्थेत शिकतात. या शिक्षण संस्थेचा पसारा मोठा आहे. जवळपास पंधरा हजार मुलं-मुली त्यात शिकतात. मराठवाड्यातली ही एक दर्जेदार, नामांकित शिक्षणसंस्था आहे. नाव मौलाना आझादांचं असलं तरी सर्व जाती धर्माची मुलं-मुलं तिथं प्रवेश घेतात, शिकतात. स्वत: झकेरिया हे सेक्युलर विचारांचे. सर्व क्षेत्रांत सुधारणावादाचा पुरस्कार करणारे. त्यांचं ‘In search of God’ (‘देवाच्या शोधात’) हे इंग्रजी पुस्तक वाचनीय आहे. या पुस्तकात झकेरिया यांच्या बुद्धिप्रामाण्यवादी व्यक्तिमत्त्वाची कल्पना येते.
या झकेरिया यांनी औरंगाबादमध्ये एक दर्जेदार शैक्षणिक संस्था असावी म्हणून मौलाना आझाद ट्रस्टची स्थापना केली. अल्पावधीत ही संस्था नावारूपाला आली. आज केजी टू पीजीपर्यंत विविध अभ्यासक्रम या शिक्षणसंस्थेत शिकवले जातात.
या नामांकित शिक्षणसंस्थेच्या विश्वस्त म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची नियुक्ती झाली आणि त्यावरून वाद सुरू झाला. या संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी नुकताच औरंगाबादमध्ये एक मेळावा घेतला. त्यात ‘सुप्रिया सुळे गो बॅक’ची घोषणा एकमतानं दिली गेली.
ही घोषणा देण्यात अग्रभागी होते एमआयएम पक्षाचे आमदार इम्तियाज जलील. ते या संस्थेचे माजी विद्यार्थी. त्यांनी इतर माजी विद्यार्थ्यांना एकत्र करून निषेध सभा घेतली आणि सुप्रिया सुळे यांच्या निषेधाचं आंदोलन सुरू केलं आहे.
शिक्षणसंस्था सत्तेचं एक प्रभावी केंद्र असतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याइतकं ते कुणालाही समजलेलं नाही. पवारांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेली रयत शिक्षणसंस्था अशीच हातोहात कब्जात घेतली. पवार पश्चिम महाराष्ट्रातलं राजकारण या संस्थेच्या माध्यमातून चालवतात, हे अनेकदा दिसलेलं आहे. तेव्हा इम्तियाज यांनी आरोप केला आहे की, ‘जशी रयत शिक्षण संस्था पवारांनी कब्जात घेतली तशीच मौलाना आझाद ट्रस्ट ही संस्था सुप्रिया सुळेंना पुढे करून पवार घशात घालू पाहत आहेत.’ त्यासाठी अगोदर पवारांनी या ट्रस्टला ५० लाखांचा निधी दिला. नंतर अलगद सुप्रिया यांनी या संस्थेवर सदस्य म्हणून पाठवलं.
इम्तियाज यांनी आझाद ट्रस्टच्या माजी विद्यार्थ्यांना एकत्र करून हे आंदोलन सुरू केलं आहे. त्यांचा दावा असा आहे की, या संस्थेचे मराठवाड्यातले सर्व माजी विद्यार्थी एकत्र येत आहेत. या विद्यार्थ्यांची भावना आहे की, बारामतीच्या सु्प्रिया सुळे यांचं औरंगाबादमध्ये मुळात काम काय? पवारांना जर मुलीचं पुनर्वसन करायचं असेल तर बारामतीतील एखाद्या संस्थेत ते करावं, औरंगाबादमध्ये त्यांचं काम काय?
आझाद ट्रस्टचे सर्व माजी विद्यार्थी या आंदोलनात उतरले आहेत आणि त्यांनी ट्रस्ट बचावची चळवळ सुरू केली आहे.
इम्तियाज हे मुळातले पत्रकार. त्यांना पवार घरण्याचं, राष्ट्रवादीचं राजकारण जवळून माहिती आहे. ते म्हणतात, ‘अगोदर मदत करण्याचं नाटक करायचं, नंतर जवळ यायचं, संस्थेच्या हितासाठी ट्रस्टींना काही गाजरं दाखवायची आणि नंतर संपूर्ण संस्थाच घशात घालायची, कब्जात घ्यायची हे पवार कुटुंबाचं राजकारण आहे. राज्यात अशा अनेक संस्था पवारांनी ताब्यात घेतल्या आहेत. तिथं आपली माणसं बसवली आहेत.’
इम्तियाज यांच्या आरोपात अगदीच तथ्य नाही असं नाही. पवारांच्या डोक्यात सत्ता म्हणजे काय, हे पक्कं गणित बसलेलं आहे. जसं ग्रामीण भागात सहकारी साखर कारखाने, दूध संघ, कृषिउत्पन्न बाजार समित्या, सहकारी सूतगिरण्या, इतर सहकारी संस्था या राजकारणाचे अड्डे बनवता येतात. त्या मार्फत निवडणुकीचं राजकारण खेळण्यास सोपं जातं. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष अशा सहकारी, शैक्षणिक संस्थांच्या जाळ्यातूनच उभा राहिला आहे. अशी एखादी संस्था ताब्यात असेल तर पश्चिम महाराष्ट्रात राजकारण करता येतं. अशी संस्था नसेल तर तो नेता उखडून फेकता येणं सहज सोपं जातं.
हे समीकरण लक्षात घेऊन पतंगराव कदम, डी.वाय. पाटील या नेत्यांनी पश्चिम महाराष्ट्रात स्वत:च्या शैक्षणिक संस्था काढल्या. त्या संस्थेच्या जोरावर हे नेते आणि त्यांची पोरंबाळं राजकारणात स्थिरस्थावर झाली. या नेत्यांचा कित्ता गिरवत महाराष्ट्रभर अनेक काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्वत:च्या सहकारी, शैक्षणिक संस्था काढल्या. या संस्था चालवण्यात काहींना अपयश आलं, पण बरेच जण अशा संस्था चालवण्यात यशस्वी ठरले. असे यशस्वी नेतेच नंतर आमदार, खासदार म्हणून निवडून येण्यात सक्षम ठरू लागले. ज्यांच्याकडे अशा संस्था नव्हत्या, ते नेते निवडणुकीच्या राजकारणात सपशेल पराभूत झाले. त्यांचं पुढे नामोनिशाणही राहिलं नाही. अशा अपयशी नेत्यांची यादी बरीच मोठी आहे.
पवारांना सत्ता, राजकारण या संकल्पनेची खूप खोलवर समज आहे. त्यांना आता सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्राची नेता म्हणून स्थापित करायचं आहे. त्यासाठी पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या महिला बचत गट चळवळीची नेता म्हणून सुप्रिया यांना पवारांनी पुढे केलं. नंतर खासदार म्हणून दिल्लीत नेलं. आता विविध संस्थांची चालक, अध्यक्ष, चेअरमन म्हणून पवार त्यांना प्रोजेक्ट करून बळ देऊ इच्छित आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मराठवाड्यातली केंद्रस्थानी आणि बलाढ्य असलेली शिक्षणसंस्था असलेल्या आझाद ट्रस्टमध्ये पवार सुप्रिया यांना घुसवू पाहत आहेत.
पण औरंगाबादमध्ये इम्तियाज आणि इतर मुस्लीम कार्यकर्त्यांनी हे पवारांचं राजकारण चांगल्या प्रकारे ओळखलं आहे. त्या विरोधात त्यांनी विरोधही संघटित केला आहे. इम्तियाज सुप्रिया यांच्या विरोधात किती वातावरण पेटवतात आणि ‘सुप्रिया गो बॅक’ ही चळवळ पुढे काय रूप घेते, हे येत्या काळात आपल्याला पाहायला मिळेलच. तूर्त सध्या तरी ‘सुप्रिया गो बॅक’चे नारे औरंगाबादमध्ये घुमत आहेत. आणि ते सुप्रिया आणि शरद पवार यांना त्रासदायक ठरत आहेत.
लेखक ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.
rajak2008@gmail.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Nishikant Bhalerao
Wed , 15 March 2017
राजा, तुमची माहिती बरोबर नाही शिवाय पत्रकारितेच्या संकेतानुसार पवारांची बाजू यायला हरकत नसावी. मुळात आपले सर्वांचे मित्र जे एका जातीयवादी पक्षाचे माझ्याच मतदार संघातून निवडून आलेत. ते पत्रकार आहेत पण ittehad सारख्या जातीय आणि बाहेरच्या पक्षाचे असल्याने त्यांचे सारे राजकारण आम्ही ओळखून आहेत. जो न्याय ते आणि तुम्ही सुप्रिया सुळे यांना लावत आहात तोच ओवेसी त्यांचा पक्ष आणि जलील यांना का लावू नये. त्यांचा महाराष्ट्राशी संबंध काय?मौलाना आझाद संस्थेचे मराठवाड्यात एक वेगळे स्थान आहे ती अल्पसंख्याकांच्या व्यवस्थापणाखालील संस्था असली तरी ती त्या अर्थाने झकेरीयानी minority institute बनू दिली नाही. त्यामुळे आमदार जलील जे नाटक करत आहेत ते कशासाठी ते साऱ्यांना ठाऊक आहे. एम आय एम पासून खरे तर या संस्थेला वाचवले पाहिजे. पवारांचे सत्ताकेंद्र ताब्यात घेण्याची हातोटी सर्वाना ठाऊक आहे ते संस्था कशा चालवतात ते सुद्धा ज्ञात आहे. त्यामुळे स्थानिक व्यवस्थापन कोणालाही संचालक बनवू शकते सुप्रिया सुळे यांना तसा अधिकार आहे ना? मग गो बॅक कसे?/निशिकांत भालेराव