सलमान रश्दी यांचा ‘धोक्याचा इशारा’ आपण ओळखू शकलो नाही...
पडघम - साहित्यिक
बारी वेस
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 16 August 2022
  • पडघम साहित्यिक सलमान रश्दी Salman Rushdie सॅटॅनिक व्हर्सेस The Satanic Verses

आपण अशा सांस्कृतिक-विश्वात राहतो आहोत, ज्यामध्ये सर्वोच्च पदी असलेले अनेक नामांकित लोक असे मानतात की, ‘शब्द’ हीच हिंसा आहे. असे मानणाऱ्यांचे १९८९मध्ये सलमान रश्दी यांच्या विरोधात पहिला फतवा काढणारे इराणचे अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी आणि परवा न्यूयॉर्कमध्ये रश्दी यांच्यावर खुनी हल्ला करणारा २४ वर्षीय तरुण हादी मातर, यांच्याशी बरेच साम्य आहे. शब्द हिंसक आहेत, हे हिंसा करून सिद्ध करण्याचाच हा प्रकार आहे.

या गटातील लोकांची अशी धारणा आहे की, ते सर्वसमावेशक आणि सहिष्णुतेने प्रेरित आहेत. यामागे त्यांची अशी भावना आहे की, एका आदर्श उदारमतवादी (utopian) समाजाची निर्मिती करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. त्यात कुणाच्याही धार्मिक किंवा इतर भावना दुखावल्या जाणार नाहीत आणि कुणीही नाराज होणार नाही. तर दुसऱ्या गटातील लोकांना ‘धार्मिक कट्टर’ म्हणून ओळखले जाते. शब्द हिंसक आहेत असे मानणाऱ्या भ्याड लोकांच्या भावनांचे लांगूलचालन करणारे या गटात आहेत, हे विशेष. पहिल्या गटातील लोकांच्या उद्दामपणामुळे या दुसऱ्या हिंसक गटाचे धाडस वाढले आहे. त्यामुळे एखादा माथेफिरू साहित्यिक विचारपीठावर जाऊन एका लेखकाच्या मानेवर चाकूने हल्ला करण्याची हिंमत करू शकतो, अभिव्यक्ती-स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या सर्वांत आघाडीच्या लेखकाला हिंसा करुण संपवण्याचा प्रयत्न करतो.

टोकियोतल्या त्सुकुबा विद्यापीठातील हितोशी इगाराशी या ४४ वर्षीय जपानी प्राध्यापकाने सलमान रश्दी यांच्या ‘सॅटॅनिक व्हर्सेस’चा जपानी भाषेत अनुवाद केला आहे. १९९१मध्ये या अनुवादकाचा एका मुस्लीम माथेफिरूने चाकूने भोसकून खून केला. त्याच महिन्यात ‘सॅटॅनिक व्हर्सेस’चे इटालियन अनुवादक एटोरे कॅप्रिओलोला मिलानमधील त्यांच्या घरी चाकूने वार करून मारण्यात आले. दोन वर्षांनंतर जुलै १९९३मध्ये ‘सॅटॅनिक व्हर्सेस’चे तुर्की भाषेतील अनुवादक अझीझ नेसिन यांना शिवस शहरातील हॉटेलवर झालेल्या जाळपोळीच्या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले होते. या हल्ल्यातून ते बचावले, परंतु इतर ३७ जण मृत्यूमुखी पडले. काही महिन्यांनंतर ‘सॅटॅनिक व्हर्सेस’च्या नॉर्वेजियन अनुवादाचे प्रकाशक विल्यम नायगार्ड यांच्या ऑस्लो येथील घराबाहेर तीन वेळा गोळ्या झाडल्या गेल्या, त्यात ते गंभीररित्या जखमी झाले होते.

१९८९ मध्ये रश्दी यांचे जन्मस्थान असलेल्या मुंबईत ‘सॅटॅनिक व्हर्सेस’वरून झालेल्या दंगलीत १२ लोक मारले गेले होते. त्या वेळी भारतात या पुस्तकावर बंदी घालण्यात आली होती. इस्लामाबादमध्ये याच पुस्तकावरून झालेल्या वादंगात पाच पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाला होता.

स्वत: सलमान रश्दी यांना ब्रिटिश सरकारने २४ तास संरक्षण दिल्यामुळे त्यांनी इंग्लंडमध्ये आश्रय घेतला होता. एका दशकाहून अधिक काळ ते ‘जोसेफ अँटोन’ (त्यांच्या आत्मचरित्राचे शीर्षक) या नावाने इंग्लंडमध्ये राहत होते. एका सुरक्षित घरातून दुसऱ्या सुरक्षित घरात असा त्यांचा या काळात प्रवास होता. पहिल्या सहा महिन्यांत त्यांना ५६ वेळा आपले ठिकाण बदलावे लागले. (इंग्लंडसुद्धा धार्मिक उन्मादापासून मुक्त नव्हते. ब्रॅडफोर्ड शहरात मुस्लिमांनी रश्दींचे पुस्तक जाळले आणि पोलिसांच्या सूचनेनुसार तेथील दोन पुस्तक दुकानांनी पुस्तक विक्रीसाठी ठेवणे बंद केले होते.)

रश्दी त्यांचे अर्धे आयुष्य अशा तणावात जगले आहेत. त्यांच्या खुनासाठी इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणने सुमारे ३.३ दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे. २०१५मध्ये L`Express या फ्रेंच वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत रश्दी म्हणतात, “आपण आज सर्वांत काळ्याकुट्ट अशा युगातून जात आहोत.” त्यांच्या मतानुसार वर्षानुवर्षे ज्या आधुनिक व पाश्चात्य मानवाधिकार मूल्यांनी अभिव्यक्ती-स्वातंत्र्याचे रक्षण केले, त्याच मूल्यांप्रती आमची (पाश्चात्य देशांची) श्रद्धा कमी होत असल्याचे आज दिसत आहे. ते या मुलाखतीत पुढे म्हणतात, “जर आज ‘सॅटॅनिक व्हर्सेस’वरून हल्ले झाले, तर पाश्चात्य लोक मदतीला धावून येणार नाहीत. कारण त्यांच्या मते मी एका धार्मिक अल्पसंख्याक गटाच्या भावना दुखावल्या आहेत.”

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

जेव्हा रश्दी फतवा किंवा इतर धमक्यांमुळे भूमिगत होते, तेव्हा त्यांच्या संरक्षणासाठी व त्यांच्या अभिव्यक्ती-स्वातंत्र्याच्या बाजूने भूमिका घेऊन उभे राहणाऱ्या लेखकांमध्ये टॉम वूल्फ, ख्रिस्तोफर हिचन्स, नॉर्मन मेलर, जोसेफ ब्रॉडस्की आणि सिमस हिनी यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. या सर्वांचे नेतृत्व PEN अमेरिका या संस्थेची अध्यक्ष सुसान सोंटाग यांनी केले होते. तिने ‘सॅटॅनिक व्हर्सेस’चे सार्वजनिक वाचन करण्यास प्रोत्साहन दिले आणि तसे कार्यक्रमही घडवून आणले.

याबद्दल अँडी रॉस या पुस्तक विक्रेत्याचा उल्लेख करायलाच हवा. अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्याच्या बर्कले या शहरात एकेकाळी ‘Cody’s Books’ हे पुस्तकाचे दुकान रॉस चालवत असत. ‘सॅटॅनिक व्हर्सेस’  विक्रीसाठी दुकानात ठेवावे की नाही, यावर त्यांच्या कार्यालयीन सहकाऱ्यांशी ते चर्चा करत होतो. त्यावर त्यांनी अंतर्गत मतदान घेतले, तेव्हा सर्वांनी एकमताने हे पुस्तक विक्रीसाठी ठेवण्याला दुजोरा दिला. रॉस म्हणाले की, “माझ्या ३५ वर्षांच्या पुस्तक विक्री व्यवसायातील हा एक महत्त्वपूर्ण अध्याय होता. तेव्हा मला जाणीव झाली की, पुस्तकविक्री एक धोकादायक आणि क्रांतिकारी स्वरूपाचे काम आहे. कारण कल्पना-विचार हे शक्तिशाली शस्त्र आहे. आम्ही ते पुस्तक विक्रीसाठी कायम ठेवण्याचे ठरवले, तो दिवस आमच्या जीवनातील सर्वांत गौरवशाली आणि अभिमानपूर्ण दिवस होता.”

वर उल्लेख केलेली रश्दी यांची वृत्तपत्रीय मुलाखत जेव्हा प्रसिद्ध झाली, त्याच सुमारास फ्रेंच नियतकालिक ‘चार्ली हेबदो’च्या कर्मचाऱ्यांना PEN अमेरिका या संस्थेने पुरस्कार देऊन गौरवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या पुरस्काराविरोधात बऱ्याच प्रसिद्ध लेखकांनी जाहीर भूमिका घेतली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार ‘चार्ली हेबदो’ या नियतकालिकाने इस्लाम किंवा मोहम्मद पैगंबर यांच्यावरील व्यंगचित्रे प्रसिद्ध करून मुस्लीम अल्पसंख्याक गटाच्या भावना दुखावल्या आहेत. एका ठराविक पद्धतीच्या व्यंगचित्रास त्यांनी जास्त प्रसिद्धी दिली आहे. त्यामुळे इस्लामविरोधी आणि अरबविरोधी भावना प्रसारित व्हायला मदत झाली. सलमान रश्दी यांनी मात्र याच्या विरोधात भूमिका घेतली होती. ते म्हणाले होते, “अन्यायग्रस्त अल्पसंख्याक समुदायाशी हा विषय संबंधित नाही. ही लढाई माथेफिरू मुस्लिमांविरोधात आहे. मुस्लीम आणि गैरमुस्लीम या समुदायांना दहशतीमध्ये ठेवणाऱ्या श्रीमंत-गब्बर मुस्लीम संघटनांविरोधात ही लढाई आहे.” रश्दी यांचे तेव्हा बरोबर होते, आजही ते बरोबर आहेत. त्यांच्यावरील हल्लाने ते अधोरेखित झाले आहे.

जो गट असे म्हणतो की, शब्द हे शस्त्र आहेत, ते कदाचित एका बाबतीत सत्यच बोलतात. खरेच, नि:संशय शब्द तीक्ष्ण, धारदार, अपमानास्पद, किळसवाणे, अमानवीय असतात. वक्ता किंवा लेखक यांचा सार्वजनिक उपमर्द, कठोर टीका, तसेच त्यांचा निषेध करण्यापर्यंत शब्दांची मजल जाऊ शकते. पण सुसंस्कृत समाज आणि सैतानी (दंडेलशाही) समाज, या दोन्हीतला फरक ते शब्द आणि हिंसेची निवड कशी करतात, यावरूनच होत असते. सुसंस्कृत समाज शब्दांचा मुकाबला शब्दांनी करतो, चाकू किंवा गोळीबार करून नाही. ही यातील प्रखर अशी सीमारेषा आहे. ती धूसर करण्याचे कोणतेही समर्थनीय कारण असू शकत नाही. त्यासाठी कोणत्याही प्रकारचा धार्मिक उन्माद किंवा रूढीवादाचे समर्थन केले जाऊ शकत नाही.   

सध्याच्या काळात ही सीमारेषा धूसर करण्यासाठी किंवा असे काम करणाऱ्या गटांना बळ देण्यासाठी काही जण असा तर्क सातत्याने मांडत आहेत की, शब्द, कविता, गाणे, लहान मुलांची पुस्तके, संपादकीय, वृत्तपत्रीय कॉलम आणि इतर साहित्य हिंसेचे काम करते. या दृष्टीकोनाशी आपण एवढे एकरूप झालो आहोत की, या प्रकारचे काही प्रकरण घडल्यावर आपण लगेच माफी मागून मोकळे होण्याची आणि दयेची याचना करण्याची संस्कृती अंगी भिनवली आहे. माथेफिरू धार्मिक गटांपुढे शरणागती पत्करण्याची आपणच आपली मानसिकता घडवली आहे. या प्रकारच्या मानसिकतेविरोधात अलीकडच्या काळात डेव्ह चॅपल, जे. के. रोलिंग (‘हॅरी पॉटर’ची लेखिका) उभे राहिले हे विशेष.

आज २०२२मध्ये माथेफिरू मुस्लिमांच्या हातात परत एकदा सलमान रश्दी यांची हत्या करण्यासाठी चाकू आला आहे. सलमान रश्दी यांनी आयुष्यभर अभिव्यक्ती-स्वातंत्र्याचे समर्थन केले, त्यासाठी ते जगत आहेत आणि त्याची मोठी किंमतसुद्धा मोजत आहेत. कारण शब्दांचा सामना शब्दांनीच करायचा असतो. जेव्हा आपण स्वार्थी उन्मादाने प्रेरित असतो, तेव्हा शब्दांचा मुकाबला ही हिंसा करते. सलमान रश्दी यांच्यावर परवा चाकू हल्ला झाला, तेव्हा अशीच हिंसा झाली. होय, ती हिंसाच होती, शब्द नव्हते!  

स्वैर मराठी अनुवाद – राहुल माने

.................................................................................................................................................................

हा मूळ इंग्रजी लेख https://www.commonsense.news या पोर्टलवर १३ ऑगस्ट २०२२ रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा - 

https://www.commonsense.news/p/we-ignored-salman-rushdies-warning

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......