‘कहाणी स्वातंत्र्य संग्रामाची’ : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात अमृत महोत्सवी वर्षातल्या प्रकाशनसंस्थेचे ‘जय हिंद’!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
टीम अक्षरनामा
  • ‘कहाणी स्वातंत्र्य संग्रामाची’ या विशेषांकाचे मुखपृष्ठ
  • Mon , 15 August 2022
  • ग्रंथनामा शिफारस कहाणी स्वातंत्र्य संग्रामाची Kahani Swatantrya Sangramachi जय हिंद प्रकाशन Jay Hind Prakashan

मराठीतल्या प्रकाशनसंस्थांना तसा मोठा इतिहास आहे. केशव भिकाजी ढवळे या संस्थेनं तर शतकाचाही टप्पा ओलांडला आहे. इतरही काही संस्थांनी ७०-८० वर्षं पूर्ण केली आहेत. त्यांपैकीच एक म्हणजे ‘जय हिंद प्रकाशन’. या संस्थेची स्थापना १९४६ साली ग. का. रायकरांनी केली… म्हणजे स्वातंत्र्य मिळालं, त्याच वर्षात. त्यामुळे हे वर्ष जसं स्वातंत्र्याचं अमृतमहोत्सवी वर्ष आहे, तसंच ‘जय हिंद प्रकाशना’चंही. या प्रकाशनसंस्थेची खरी ओळख ‘धार्मिक’ प्रकाशन म्हणून आहे. परंतु स्वातंत्र्याच्या वर्षात सुरुवात झाल्याने साहजिकच या संस्थेनी आपली सुरुवातीची २५-३० पुस्तकं स्वातंत्र्य चळवळीशी संबंधितच प्रकाशित केली होती. त्यांत ‘काँग्रेस रेडिओ’, ‘सेनापती भोसले’, ‘अच्युत आणि अरुणा’, ‘मी झियाउद्दीन’, ‘झेंडावंदन’, ‘स्वराज्याच्या वाटेवर’, ‘सीमेवरचा गोंधळ’, ‘राष्ट्रीय पोवाडे’, ‘संग्रामगीते’, ‘कॅप्टन लक्ष्मी सहगल’ या पुस्तकांचा समावेश होता. भारताच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगलेल्या, आपल्या प्राणाची बाजी लावलेल्या, हौताम्य पत्करलेल्यांविषयी पुस्तकरूपाने कृतज्ञता व्यक्त करणारी ‘जय हिंद प्रकाशन’ ही पुस्तकमालिका म्हणूनच महत्त्वाची ठरते.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने जय हिंद प्रकाशनाने ‘काँग्रेस रेडिओ’, ‘सेनापती भोसले’, ‘अच्युत आणि अरुणा’, ‘मी झियाउद्दीन’, ‘झेंडावंदन’ आणि ‘स्वराज्याच्या वाटेवर’ ही सहा पुस्तके नुकतीच पुनर्प्रकाशित केली आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्यवीरांची चरित्रे, कहाण्या, पोवाडे, वीरगीते यांचा समावेश असलेल्या या पुस्तकामालिकेची झलक ‘कहाणी स्वातंत्र्य संग्रामाची’ या विशेषांकातून सादर केली आहे.

या विशेषांकात ‘मी झियाउद्दीन’, ‘सेनापती भोसले’, ‘काँग्रेस रेडिओ’, ‘अच्युत आणि अरुणा’, ‘स्वराज्याच्या वाटेवर’, ‘सीमेवरील गोंधळ’, ‘झेंडावंदन’, ‘स्वातंत्र्यानंतरची वीस भाषणे’ आणि ‘नेताजी सुभाषचंद्र बोस पोवाडा’ या लेखांचा समावेश आहे.

‘मी झियाउद्दीन’ हे पुस्तक जय हिंद प्रकाशनाचे ग. का. रायकर यांनी लिहिले आहे. त्याचा संपादित अंश इथं घेतला आहे. ब्रिटिश सरकारची नजर चुकवून झियाउद्दीन यांनी तत्कालीन हिंदुस्थानची सरहद्द ओलांडली. कुठलाही परवाना नसताना, अनेक अडीअडचणींचा सामना करत ते काबूलमार्गे बर्लिनला पोहोचले. तिथे गेल्यावर त्यांनी हिंदुस्थानच्या जनतेला उद्देशून एक भाषण प्रसारित केले. हे झियाउद्दीन म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. त्यांच्या या रोमांचक प्रवासाची हकिकत म्हणजे हा लेख.

‘सेनापती भोसले’ हे गुं. फ. आजगांवकर यांचं पुस्तक. जगन्नाथराव भोसले या मराठी माणसाची ही शौर्यगाथा आहे. बालपणी जगप्रसिद्ध क्रिकेटपटू होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगलेल्या भोसले यांनी पुढे मात्र डेहराडून येथे लष्करी शिक्षण घेतले. ब्रिटिशांनी पुढे त्यांना उच्च लष्करी शिक्षणासाठी लंडनला पाठवले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते इंग्रजांच्या लष्करात मोठे अधिकारी झाले. नंतर मात्र ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत दाखले झाले; नेताजींचे आवडते सेनापती झाले. त्यांची ही कथा स्फूर्तिदायी आहे.

स्वातंत्र्याची चळवळ चालू असताना, विशेषत: गांधीजींनी १९४२मध्ये ‘चले जाव’ची घोषणा दिल्यानंतर ब्रिटिशांनी ही चळवळ दडपून टाकायला सुरुवात केली. तेव्हा ‘काँग्रेस रेडिओ’च्या माध्यमातून उषा मेहता यांनी ब्रिटिशांच्या कृष्णकृत्यांची माहिती देण्यासाठी विविध उपक्रम राबवून त्यांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवली. इंग्रजांच्या सततच्या चौकशीच्या ससेमिऱ्यामुळे हा रेडिओ जेमतेम तीन महिनेच चालला, पण त्या काळातही त्याने मोलाची कामगिरी केली. त्याची माहिती या लेखातून मिळते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

‘अच्युत आणि अरुणा’ या ग. का. रायकरलिखित पुस्तकात अच्युतराव पटवर्धन आणि अरुणा असफअली या दोन स्वातंत्र्यवीरांची गोष्ट आहे. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत दिलेलं योगदान या संक्षिप्त लेखातून जाणून घेता येतं.

पा. ना. मिसाळ यांची ‘स्वराज्याच्या वाटेवर’ ही नाटिका. मुलांसाठी लिहिलेली ही नाटिका स्वातंत्र्य चळवळ भरात असताना खूपच लोकप्रिय झाली होती. तिचे महाराष्ट्रात शेकडो प्रयोग झाले. या नाटिकेच्या छापील सात आवृत्त्या प्रकाशित झाल्या. खासकरून मुलांसाठी ही नाटिका लिहिली असली, तरी ती आबालवृद्धांना आवडेल अशी आहे. तिची ही झलकही पुरेशी ठरते.

दा. वि. फफे यांच्या ‘सीमेवरचा गोंधळ’ या पुस्तकाचे कथारूपांतर सुरेश कोकीळ यांनी केले होते. हे पुस्तक मात्र १९६२ सालच्या भारत-चीन युद्धाबाबतची माहिती देणारे आहे.

‘झेंडावंदन’ हे पुस्तक ग. का. रायकर यांन संकलित-संपादित केलं आहे. यात तिरंगी झेंड्याबाबतची आचारसंहिता दिली आहे. लेखाच्या शेवटी साने गुरुजी, हरिभाऊ भंडारे, मायदेव, श्रीमन्नारायण अग्रवाल, सियारामशरण गुप्ता, बाबू बंकिमचंद्र आणि सेनापती बापट यांची झेंडागीते दिली आहेत.

‘स्वातंत्र्यानंतर वीस भाषणे’ या लेखात १९४७ ते ६७ या काळातील पं. जवाहरलाल नेहरू यांची १६, लालबहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी यांची प्रत्येकी दोन भाषणे संक्षिप्त स्वरूपात दिली आहेत.

आणि शेवटी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जीवन, त्यांचा अतुल्य स्वार्थत्याग, ज्वलंत राष्ट्राभिमान आणि अद्वितीय संघटनाकौशल्य यांविषयीचा वीररसयुक्त पोवाडा वाचायला मिळतो.

या अंकाला ज्येष्ठ संपादक कुमार केतकर यांची छोटीशी, पण आशयनघन प्रस्तावना आहे. त्यात ते म्हणतात – “शाळकरी विद्यार्थ्यांना त्या स्फूर्तिदायक लढ्याचे आणि त्यात सहभागी झालेल्यांचे स्मरण थोडक्यात करून देणे हे मालिकेचे, अंकाचे उद्दिष्ट आहे.

‘‘ही संपूर्ण चरित्रे नव्हेत वा सविस्तर इतिहास नव्हे. हे सर्व ऐतिहासिक संदर्भ नव्हेत वा त्या संदर्भांची चिकित्सा नव्हे. विद्यार्थी, तरुण, इतकेच नव्हे, तर राजकारणात वा समाजकारणात येऊ इच्छिणाऱ्यांना आपल्या स्वातंत्र्यलढ्यातील दीपस्तंभांची ओळख व्हावी, इतकाच मर्यादित हेतू आहे. हा मजकूर वाचून त्या लढ्याचा इतिहास वाचण्याची वा अभ्यासण्याची इच्छा झाली, त्या व्यक्तींची पूर्ण, मोठी चरित्रे वाचावीशी वाटली आणि आपल्या देशाच्या व जगाच्या इतिहासाचे अध्ययन करावेसे वाटले, तरी हेतू सफल संपूर्ण झाला असे म्हणता येईल.

‘‘करुणा आणि कर्मवाद, मानवतावाद आणि आदर्शवाद, अहिंसा आणि सत्याग्रह, त्याग आणि सेवा, समाजभान आणि विविध विचारसरणी, विषमता व जातिनिर्मूलनाचे उद्दिष्ट, गरिबी आणि बकाली दूर करण्याचे ध्येय, निसर्ग आणि पर्यावरणाचे भान, ज्ञान आणि विज्ञानाचा दृष्टीकोन हे सर्व व बरेच काही स्वातंत्र्यलढ्याच्या क्रमात रुजवण्याचा प्रयत्न झाला. त्याच वेळेस श्रमप्रतिष्ठा, वर्गजातविरहित समाजव्यवस्था आणि सेक्युलर व संसदीय लोकशाही ही मूल्येही रुजवली गेली. त्यासाठी ज्यांनी योगदान केले त्यांची ही अल्पचरित्रे.”

मूळ पुस्तकांची मुखपृष्ठे तत्कालीन प्रसिद्ध चित्रकार रघुवीर मुळगावकर यांनी केली होती. त्या जुन्या चित्रांना नितीन निगडे यांनी नव्याने रंगसंगती देऊन ती या अंकात घेतली आहेत. प्रसिद्ध चित्रकार व्ही. एन. ओके यांनी महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांची केलेली अतिसुंदर रेखाचित्रे हेही या अंकाचे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक लेखात भरपूर चित्रे असल्यामुळे हा अंक देखणा आणि संग्राह्य झाला आहे.

त्याचबरोबर हा संपूर्ण अंक ऑडिओ बुक्सच्या रूपातही ‘स्टोरी स्टेल’च्या माध्यमातून उपलब्ध करून दिला आहे. या ऑडिओ बुक्ससाठी विक्रम गोखले, सुबोध भावे, नीना कुलकर्णी, शरद पोंक्षे, दिलीप प्रभावळकर या मान्यवर कलावंतांनी लेखांचे वाचन केले आहे.

‘कहाणी स्वातंत्र्य संग्रामाची’ – कार्यकारी संपा. हेमंत रायकर

जयहिंद प्रकाशन, मुंबई

पाने – १४४

मूल्य – २०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......