अजूनकाही
भारताला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा मी भुसावळला, शाळकरी मुलगा होतो. नुकताच प्राथमिक शिक्षण संपवून इंग्रजी पहिल्या यत्तेत दाखल झालो होतो. माझी मोठी बहीण इंग्रजी पाचवीत होती. आम्ही दोघंही राष्ट्र सेवादलात जात होतो. घरचं वातावरण राष्ट्रीय म्हणता येईल असं होतं. आजोबा अगदी सुरुवातीपासून काँग्रेसशी संबंधित होते. वयाची पंचाहत्तरी झाल्यामुळे त्यांनी ठरवून काँग्रेसच्या जिल्हा वा तालुका कार्यकारिणीतील कोणतंही पद घेतलं नव्हतं. इतकंच नाही, तर आदल्याच वर्षी झालेल्या कान्स्टिट्युअंट असेंब्ली व पार्लमेंटच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने देऊ केलेली पूर्व खानदेशची उमेदवारी त्यांनी घेतली नव्हती. ते सर्व पदांपासून दूर राहिले असले तरी काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्याकडे सल्ला घ्यायला वा चर्चा करायला येत असत. साहजिकच स्वातंत्र्यदिन आणि संबंधित घटनांबाबत घरात कायम बोलणं होत असे.
त्या वेळच्या इलेक्ट्रॉनिक-पूर्व युगात छापील वर्तमानपत्रं हाच चालू जगाशी जोडणारा दुवा होता. ऑल इंडिया रेडिओ (त्याची अजून ‘आकाशवाणी’ झाली नव्हती) अस्तित्वात होता. पण भुसावळसारख्या तालुक्याच्या गावी क्वचितच कोणाच्या घरी रेडिओ संच होता. आजूबाजूचं वातावरण मात्र १५ ऑगस्टला काहीतरी विशेष घडणार आहे, आपला हिंदुस्थान स्वतंत्र होणार आहे, या विचारानं भारलेलं होतं. त्या दिवशी काय काय घडणार, याबद्दल उत्सुकता होती. लोक आपापसात बोलत होते. देशाचे तुकडे होणार याचा खेद होता, पण स्वतंत्र होणार याचा आनंद आणि अभिमान होता. काही जण ‘काय अमावस्येचा दिवस निवडला’ म्हणून किरकिरत होते, परंतु सामान्यतः सर्वांच्यात खुशी आणि उत्कंठा होती.
वर्तमानपत्रांतून प्रत्यक्ष सत्तांतराचा कार्यक्रम १४ आणि १५ ऑगस्टच्या मध्यरात्री ठीक १२ वाजता होणार हे लोकांना कळलेलं होतं. आदल्या दिवशी – १४ ऑगस्टला भारताचा तुकडा तोडून त्यातून पाकिस्तान निर्माण होणार होतं आणि त्यासाठी लॉर्ड माउंटबेटन कराचीला जाऊन तिथला कार्यक्रम उरकून लगेच त्याच दिवशी रात्री दिल्लीत होणाऱ्या सत्तांतराच्या कार्यक्रमाला हजर होणार होते. असे सर्व तपशील लोकांच्या चर्चेचे आणि कुतूहलाचे विषय झालेले होते.
त्या वेळी भारताचा राष्ट्रध्वज कसा असावा, यावरही वर्तमानपत्रांतून चर्चा होत होती. जूनमध्ये माउंटबेटन योजना आली आणि जेमतेम दोन महिन्यात सत्तांतर होणार होतं. अनेक निर्णय तातडीने करावे लागणार होते. त्यापैकीच एक राष्ट्रध्वजाबाबतचा. काँग्रेसचा तिरंगा अर्थातच चर्चेत होता. परंतु मला आठवतं आहे त्याप्रमाणे बऱ्याच काँग्रेसच्या लोकांनाही काँग्रेसच्या तिरंग्यापेक्षा राष्ट्रध्वज वेगळा असावा, असं वाटत होतं. चर्चा होऊन १५ ऑगस्टच्या दोन-तीन आठवडे आधी अशोकचक्रांकित तिरंगा हे राष्ट्रध्वजाचं चित्रांकन नक्की झालं. अर्थात पत्रकारांनी गांधीजींना त्यांची प्रतिक्रिया विचारली, तेव्हा हसत हसत त्यांनी सांगितलं होतं की, त्यांच्या चरख्याचं चाक आहेच की, राष्ट्रध्वजावर. हे वर्तमानपत्रांत वाचलेलं आठवतंय.
असं जाहीर झालं होतं की, १४-१५ ऑगस्टच्या मध्यरात्री ठीक १२ वाजता, सत्तांतराच्या मुहूर्ताला सर्व रेल्वे इंजिनं आणि गाड्या असतील तिथं एक मिनिट थांबतील आणि सर्व ड्रायव्हर अखंड एक मिनिट शिट्ट्या वाजवतील. भुसावळ हे त्या वेळच्या जी.आय.पी. रेल्वेवरचं मोठं जंक्शन होतं. त्यामुळे भुसावळला रेल्वे कामगार, ड्रायव्हर, गार्ड वगैरेंची मोठी वस्ती होती. त्या ऐतिहासिक क्षणाला आपण गाडीवर असावं आणि आपल्याला शिट्टी वाजवायला मिळावी, अशी इच्छा प्रत्येक ड्रायव्हरची होती. आपली ‘ड्युटी’ त्या दिवशी लागावी, अशी प्रत्येक ड्रायव्हरची धडपड होती.
गावातल्या अनेक लोकांप्रमाणे आम्हीही सत्तांतराच्या क्षणाला जागे राहणार होतो. खरं म्हणजे आम्ही सर्व जण जागे राहून काय करणार होतो? त्या प्रसंगाचे समालोचनही रेडिओवरून प्रसारित होणार नव्हतं. आणि होणार असतं तरी रेडिओ कोणाकडे होता? पण स्वातंत्र्य मिळताना आपण जागं असलं पाहिजे, अशी भावना होती. माझी बहीण आणि मी दोघांनाही वाटत होतं की, आपला आनंद, आपल्या देशाचा विजय त्या क्षणाला जाहीर केला पाहिजे. कसा ते काही सुचत नव्हतं. रात्रीचे बारा वाजले, आमच्या घरा समोरून जाणाऱ्या रेल्वेच्या रुळांवर एक गाडी आणि दोन शंटिंग करणारी इंजिनं थांबून त्यांच्या शिट्ट्या वाजायला लागल्या आणि आम्हाला एकदम सुचलं, गॅलरीतलं पत्र्याचं दार वाजवता येईल. आम्ही धावत पत्र्याच्या दाराशी गेलो. ‘भारतमाता की जय’ अशी आरोळी देत दार बडवायला सुरुवात केली. त्या मिनिटात आम्ही गजर करू शकलो होतो. त्यामुळे उगाचच धन्य वाटत होतं. आजोबा जागेच होते. आमच्या दार बडवण्याकडे ते काहीशा कौतुकाने बघत होते. रेल्वेच्या रुळांवरच्या शिट्ट्या थांबल्या आम्हीही थांबलो. आजोबा म्हणाले “माझ्या बिछान्याशी या”.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
आत गेलो. आजोबा बिछान्यावर बसले होते, त्यांच्या समोर बसलो. त्यांच्याकडून गोष्टी, हकिगती ऐकायला नेहमीच असे बसायचो. आज त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान होतं. ते बोलायला लागले, “आम्ही तरुण असल्यापासून आम्हाला जमेल तसा स्वातंत्र्याच्या चळवळीत आम्ही भाग घेतला. आम्हाला कधी अशी खात्री वाटली नव्हती की, आमच्या आयुष्यात स्वातंत्र्य मिळेल म्हणून. पण आज आपण प्रत्यक्ष स्वतंत्र झालो आहोत. फ्रेंचक्रांतीसारखीच ही जगाच्या इतिहासातली एक महत्त्वाची घटना आहे. त्या क्रांतीबद्दल इंग्लिश कवी वर्डस्वर्थ म्हणाला होता- ‘Bliss it was in that dawn to be alive, But to be young was very heaven’.”
या दोन ओळी ते अगदी ठासून म्हणाले. किंचित थांबले आणि परत एकदा ठासून त्या ओळी ते म्हणाले. ठासून उच्चारलेल्या त्या ओळी दोनदा कानावर पडल्यामुळे माझ्यासारख्या नुकतंच इंग्रजी शिकायला लागलेल्याच्या मनावरही त्या कायमच्या कोरल्या गेल्या. मग त्या ओळींचा अर्थही त्यांनी स्पष्ट केला आणि म्हणाले, “आज आम्ही अत्यंत आनंदाचा दिवस अनुभवत आहोत, पण तुमचं सारं आयुष्य तुम्ही स्वातंत्र्याचा स्वर्ग अनुभवणार आहात. बरं, चला झोपा आता. उद्या सकाळी झेंडावंदनाला जायचंय ना?”
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आंघोळ वगैरे उरकून मी गांधीटोपीसह सेवादलाच्या गणवेशात तयार होतो. आज प्रथमच सरकारी व सार्वजनिक इमारतींवर अधिकृतरीत्या राष्ट्रध्वज फडकवला जाणार होता. मी व माझा मित्र अरविंद प्रधान ‘झंडा उंचा रहे हमारा’ हे झेंडागीत म्हणणार होतो. प्रथम आम्ही भुसावळ म्युनिसिपालिटीत गेलो. त्यानंतर मामलेदार कचेरीत गेलो. दोन्ही ठिकाणी झेंडागीतातल्या ‘शान न इसकी जाने पाये l चाहे जान भले हि जाये l विश्वविजय करके दिखलाये l तब होवे प्रण पूर्ण हमारा l झंडा उंचा रहे हमारा l’ या ओळी म्हणताना नेहमीपेक्षा छाती अभिमानानं अधिकच फुलली होती.
या दोन ठिकाणचं झेंडावंदन झाल्यानंतर आम्हाला शाळेत जायला सांगण्यात आलं. इतर सरकारी कचेऱ्यांत झेंडागीतासाठी बहुधा दुसरी मुलं गेली असावीत. शाळेतली सर्व मुलं शाळेसमोरच्या पटांगणात जमली होती. सर्वांना बुंदीच्या लाडवाचा खाऊ वाटण्यात आला. घरी अर्थातच पक्वानाचं जेवण होतंच. संध्याकाळपासून घरातून रोषणाईने झगमगलेलं रेल्वे स्टेशन दिसत होतं. थोड्या वेळाने आई-वडील आणि आम्ही दोघं भावंडं असे स्टेशन, म्युनिसिपालिटीवरून पुढे गावाच्या बाजारपेठेतून वगैरे फिरून लोकांनी केलेली रोषणाई बघून आलो.
असा कायमचा माझ्या लक्षात राहिला आहे- भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment