अजूनकाही
डॉ. निर्मोही फडके यांचा ‘अरिंदम’ हा ललितलेखसंग्रह नुकताच ग्रंथालीतर्फे प्रकाशित झाला आहे.
या पुस्तकाविषयी सांगताना फडके लिहितात – “ललितलेखन करणं हे लिहित्या लेखणीच्या नैसर्गिक उदगाराला सोपेपणानं वाट करून देण्यासारखं आहे… ज्याच्या नावातच लालित्य अर्थात सुंदरता आहे तो ललितलेख. मी उल्लेख केला मुक्त-बंदिस्त अशा निबंधलेखनाचा, ज्यामध्ये ललित, वैचारिक, कधी काही अंशी सैद्धान्तिक लेखनही समाविष्ट असतं. जो कधी मुक्तचिंतन करतो, तर कधी मर्यादित जागेत, सांगितलेल्या शब्दसंख्येपुरतं व्यक्त होतो. तरीही जो नीटसपणे बांधलेला असतो… हे पुस्तक अशा शोधयात्रेतून लिहिलेल्या, तर कधी उत्स्फूर्तपणे, सुचलेल्या मुक्त-बंदिस्त अशा निबंधांचा संग्रह आहे.”
तर प्रसिद्ध कवी-संपादक अरुण शेवते ब्लर्बमध्ये म्हणतात - “डॉ. निर्मोही फडके यांच्या या ललितसंग्रहाची सुरुवातच वैशिष्ट्यपूर्ण आहे. ‘अरिंदम’ या आगळ्यावेगळ्या शीर्षकामुळे उत्सुकता निर्माण होते. पुस्तकाच्या पानोपानी लेखिकेचे समृद्ध व्यक्तिमत्त्व प्रत्ययास येते. रवींद्रनाथ टागोर, आरती प्रभू, विंदा करंदीकर, तुकाराम, ज्ञानेश्वर, कुसुमाग्रज आणि संतसाहित्याचे संदर्भ, त्याचे विवेचन वाचायला मिळते. प्रत्येक लेख वाचताना, दुसरा कुठला लेख असेल याची उत्सुकता मनात निर्माण होते. ललितलेखनाचे एक सांस्कृतिक, सामाजिक वैभव असते. त्या वैभवाच्या समृद्ध खाणाखुणा पुस्तकाच्या पानोपानी दिसतात.”
या पुस्तकातील हा एक लेख...
.................................................................................................................................................................
पूर्ण ग्रंथ पाहिल्याविण। उगाच ठेवी जो दूषण।
तो दुरात्मा दुराभिमान। मत्सरें करी॥
(‘दासबोध’, दशक-१, समास-१)
संत रामदास स्वामींनी ‘दासबोधा’च्या पहिल्या दशकाच्या पहिल्या समासात ही २२वी ओवी गुंफली आहे. ‘दासबोध’ या ग्रंथात वाचकांना काय वाचायला मिळणार आहे, याविषयी या समासात ते सारांशरूपाने प्रस्तावना करतात.
‘पूर्ण ग्रंथ पाहिल्याशिवाय उगीच त्यावर टीका करू नये. असे करणारी व्यक्ती ही दुरभिमानी, मत्सरी अशी दुरात्मा असू शकते’, असा या ओवीचा थोडक्यात भावार्थ आहे.
या दोन ओळींमध्ये ‘वाचक’ किंवा ‘अभ्यासक’ याने कसे असावे व कसे असू नये, हे अगदी नेमकेपणाने सांगितले आहे. आपल्या प्रास्ताविकातच असे नमूद करून संत रामदास स्वामी यांनी ग्रंथवाचनाविषयी वाचकांना एक प्रकारे महत्त्वाची सूचनाच देऊन ठेवली आहे.
आपल्या जुन्या ज्ञानग्रंथांमधील अशा प्रकारची काही वचने आजच्या गतिशील जीवनाच्या पार्श्वभूमीवर, आपल्या जीवनाशी संलग्न होऊ शकतात का? त्यांच्या वाचनातून आजच्या जीवनात आपण काही बदल घडवू शकतो का? जुन्या संतवचनांचे आपल्या आजच्या जीवनात महत्त्व आहे? असावे की नसावे? असे प्रश्न निर्माण होतात. याविषयीचे हे लहानसे विचारमंथन.
हा भावार्थ वाचल्यावर असे वाटले की, आजच्या तथाकथित आधुनिक युगात सर्वच क्षेत्रांत अर्ध्या हळकुंडाने पिवळे होण्याची अहमहमिका लागलेली दिसते. तिथे एखाद्या गोष्टीच्या मुळाशी जाण्याची सवड कुणाला? दर्शनी पटलावर जे दिसते, भावते ते उचलावे, त्यावर आपापल्या बौद्धिक कुवतीनुसार घाईघाईने टीकाटिप्पणी करावी वा दूरदृष्टी ठेवून वारेमाप कौतुक करावे अथवा ‘नरो वा कुंजरो वा’ म्हणत पुढे चालू पडावे, ही आजची परिस्थिती आहे. त्यामुळे एखादा ग्रंथ पूर्ण वाचण्याची, एखादी कलाकृती पूर्णपणे पाहण्याची किंवा एखाद्या गोष्टीच्या मुळाशी जाण्याची फुरसत कुणाला?
जे पाहिजे तेवढे मिळाले की, बाकीचे द्या सोडून. आगेमागे कशाला बघा. शितावरून भाताची परीक्षा करावी अन् केवळ भातच काय, अवघा स्वयंपाकच कसा चविष्ट झाला आहे किंवा बिघडला आहे, याचे प्रमाणपत्र देऊन मोकळे व्हावे, अशी परिस्थिती दिसते. कारण जगण्याचा वेगच जीवघेणा झाला आहे. त्यामुळे आजच्या भाषेत सांगायचे तर एवढे ‘पेशन्स’ आहेत कुणाला?
ग्रंथांच्या संदर्भात बोलायचे तर, आजकाल ग्रंथ हातात घेऊन पाहण्याचा, वाचण्याचाही प्रश्न उद्भवतो कुठे? विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात हातोहात ग्रंथांची पाने उलटता येतात. ही मानवी समाजाची प्रगती आहे हे मान्य करावेच लागते.
या ओवींच्या संदर्भात ‘ग्रंथ’ हा विषय असला तरी, त्या अनुषंगाने आजच्या व्यावहारिक जीवनाच्या कसोट्या तपासून पाहायला हरकत नाही. आधुनिक जीवनपद्धती, विशेषतः शहरांतील, इतकी वेगवान झाली आहे की, ती गती सांभाळण्याकरता प्रत्येकाचीच शारीरिक व मानसिक पातळीवर दमछाक होत आहे. अशा वेळी पुराणांतील वांगी पुराणांतच राहणे अपरिहार्य ठरते. जसजसा काळ पुढे सरकतो, तसतसे नव्या कालखंडाचेही रूपांतर जुन्या कालखंडात होऊ लागते.
या परिवर्तनास गत्यंतर नाही. अशा आजच्या आचारविचारांच्या प्रवाहात ‘दासबोधा’तील उपरोक्त ओवीचे किंवा अशा अनेक संतवचनांचे स्थान कुठे आहे? मुळात त्यांना स्थान आहे का? असे प्रश्न मनात निर्माण होतात.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
सगळीच संतवचने, जीवनविषयक मूल्ये ही कालातीत असतातच असे नाही. याची अनेक कारणे आहेत. कालौघाच्या प्रवासात माणसाच्या जीवनविषयक विचारांत भर पडत जाते. धारणा बदलतात. भौतिक साधने बदलत जातात. मध्ययुगीन काळात जेव्हा संतपरंपरेने आपली जीवनविषयक विचारसरणी समाजापुढे मांडली, तेव्हाचे सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय वातावरण हे त्यांच्या सर्जनशीलतेस कारणीभूत होते. त्यानुसार हे विचार मांडले गेले.
काही जीवनविषयक मूल्ये ही चिरंतन आहेत. उदाहरणार्थ, मानवता, भूतदया, सत्य इत्यादी. परंतु दैनंदिन आयुष्याशी निगडित असणाऱ्या इतर हजारो घटकांबाबत काळाच्या वेगात मागे गेलेले विचार तसेच्या तसे आचरणात आणणे कठीण होऊन बसते. मग त्या रूढी-परंपरा असोत किंवा व्यवहारज्ञान इत्यादी असो. माणसाला सतत बदल हवा असतो, हे मान्य करावे लागते. त्यामुळे असे नमूद करावेसे वाटते की, काही जुनी संतवचने, जी आजही योग्य वाटतात, त्यांना कालानुरूप नवे संदर्भ जोडावेत किंवा त्यांचा पुनर्विचार करावा. समतोल दृष्टी किंवा विचार हे केव्हाही श्रेयस्करच.
एका मोठ्या सामाजिक परिघात जगत असतानाही आपण आपल्यापुरते आपले स्वतःचे, लहानसे असे वर्तुळ तयार करतोच. त्या वर्तुळापुरते आपले काही विचार सीमित ठेवून त्यांचे आपल्यापुरते आचरण करू शकतो. ‘दासबोधा’तील या ओवीच्या संदर्भात म्हणायचे तर, एखाद्याला एखादा ग्रंथ अथपासून इतिपर्यंत वाचून त्याबद्दल बोलायचे, लिहायचे असेल तर ते त्याचे विचारस्वातंत्र्य आहे आणि एखाद्याने त्या ग्रंथाची दोन पाने वाचूनच त्या ग्रंथाविषयी काही निष्कर्ष काढला, तरीही ते त्याचे विचारस्वातंत्र्यच ठरते.
जुन्या-नव्याचा सुयोग्य मेळ, मग तो बौद्धिक विचारांपासून सामान्य आचारांपर्यंतच्या कुठल्याही बाबतीत असो, जमणे व जमवणे कठीण असते, अशक्य मात्र नसते. आदिम काळापासून मानव समूह यामुळेच तर जिवंत राहिले, हे इतिहासातील अनेक उदाहरणांवरून दिसून येते. जुनी संतवचने हा त्यांचा एक भाग आहेत. पुनर्विचार करण्यासारख्या अशा अनेक गोष्टी आहेत.
प्रारंभी उल्लेख केलल्या ओवीबद्दल नव्या संदर्भानुसार असा समतोल विचार करता येईल का, हा प्रश्न मनात उद्भवतो. आपल्या जीवनात संशोधन दृष्टी आणि संशोधक वृत्ती जोपासावी, असा मोलाचा संदेश देणारी ही ओवी कालबाह्य ठरत असल्यासारखे वाटते, परंतु व्यासंगी अभ्यासकांसाठी तिच्यातून व्यक्त होणारा भावार्थ नक्कीच अनुकरणीय आहे, हेही तितकेच खरे आहे, तेव्हा समजुतीचा हा करार सुबुद्ध व समविचारी माणसांनी आपापल्या क्षेत्रांत स्वतःशीच बौद्धिक प्रगल्भतेने करावा, अशी एक साधी अपेक्षा ठेवण्यास हरकत नाही.
‘अरिंदम’ – डॉ. निर्मोही फडके
ग्रंथाली, मुंबई
पाने – १५१,
मूल्य – २०० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment