कालिदासाचा मेघ प्रवासाला निघाला की, सगळे जग त्याच्याबरोबर ‘प्रेमाच्या प्रवासा’ला निघते…
पडघम - साहित्यिक
श्रीनिवास जोशी
  • प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 10 August 2022
  • पडघम साहित्यिक कालिदास Kalidasa कालिदास दिन Kalidasa Din मेघदूत Meghadūta आषाढस्य प्रथम दिवसे Aashadhasya Prathama Divase

आषाढ म्हटला की, अनेकांना महाकवी कालिदासाच्या ‘मेघदूत’ची आठवण येते. ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या त्यातल्या शब्दांना तर ‘मोस्ट कोटेबल कोट’चा दर्जा मिळालाय! आणि ‘मेघदूत’? त्याची ख्याती काय वर्णावी! गेल्या अनेक वर्षांपासून ‘मेघदूत’ मराठीसह जगभरच्या लेखक, कवी, अनुवादक आणि रसिकवाचकांना मोहिनी घालत आले आहे... मराठीमध्ये तर आजवर ‘मेघदूता’चे कितीतरी लेखक-कवींनी अनुवाद केले आहेत. त्यापैकी कुसुमाग्रज, सी.डी. देशमुख, शांता शेळके, बा. भ. बोरकर इत्यादींनी केलेल्या अनुवादांचे रसग्रहण करणारे ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ हे दैनंदिन सदर १२ जुलै ते ६ ऑगस्ट २०२२ दरम्यान ‘अक्षरनामा’वर प्रकाशित झाले. त्याच्या समारोपाचा हा लेख...

.................................................................................................................................................................

उपसंहार

१.

वर्षा ऋतू येतो आणि प्रत्येक हृदयाला जिवंत करून जातो. त्याचप्रमाणे, प्रत्येक आषाढात ‘मेघदूता’ची आठवण प्रत्येक रसिकाला येते आणि अनेक रसिक-हृदयांना प्रेमाची पालवी फुटते. आषाढात अनेक रसिकांचे हात आपोआप ‘मेघदूता’कडे वळतात, आणि त्यांचा कालिदासाच्या मेघाबरोबर एक उत्फुल्ल प्रवास सुरू होतो.

हे काव्य वाचत असताना यक्षाच्या विरहाची हुरहूर आपल्या मनात राहते, पण त्याचे आपल्या प्रेयसीवरचे प्रेमही आपल्याला सुखावत राहते. आपल्या प्रेमावर चढलेली काळाची पुटं यक्षाचे प्रेम धुऊन टाकते. आपण कधी काळी केलेल्या जिवंत प्रेमाचा ‘एहसास’ पुन्हा एकदा आपल्या हृदयांमध्ये धडधडू लागतो.

कालिदासाचा मेघ प्रवासाला निघाला की, सगळे जग त्याच्याबरोबर ‘प्रेमाच्या प्रवासा’ला निघते, सगळे वातावरण प्रेमभावनेने भारले जाते.

मेघ प्रवासाला निघाला की, ज्यांचे प्रियकर प्रवासाला गेले आहेत, त्या स्त्रिया केसांच्या बटा बाजूला करत मेघाकडे पाहू लागतात. त्यांना जाणवते की, पर्जन्य-मेघ आले म्हणजे इतके सुंदर वातावरण तयार होईल की, आपले प्रियकर आपल्यापासून फार काळ दूर राहू शकणार नाहीत. बलाकांच्या माला या पर्जन्य-मेघाबरोबर आनंदाने उडू लागतात. त्यांच्या मनात त्यांच्या प्रियकरांच्या, मीलनाच्या आठवणी जाग्या होतात.

वर्षाकाळात हत्तींच्या गंडस्थलावरून मद स्रवू लागतो. त्याच्या सुवासाने नर्मदा गंधित होते. वर्षाकाळात हत्तीसुद्धा मीलनासाठी उत्सुक होतात.

मेघ आम्रकूट पर्वतापर्यंत जातो, तेव्हा त्याच्या उतारावर आम्रवृक्षांना मोहर धरलेला असतो. संपूर्ण पर्वतच्या पर्वत आम्र-मोहरामुळे गोरा गोरा झालेला असतो. या पर्वतशिखरावर निळा मेघ काही काळ विश्रांतीसाठी थांबतो, तेव्हा ती सारी शोभा पृथ्वीच्या स्तनासारखी दिसते. मेघाचे निळे स्तनाग्र आणि खाली स्तनाचा गोरा गोरा उतार! सगळे सृजनाचे वातावरण!

मेघ अजून पुढे गेला की, आपल्याला दिसते की, वेत्रवती नदीने किलबिल करणाऱ्या पक्ष्यांच्या मेखला धारण केलेल्या आहेत. आणि, आपल्या चंचल तरंगांच्या भिवयांच्या विभ्रमांनी ही प्रेयसी मेघाला प्रेमाचे आवाहन करते आहे. मेघाला तरी हा मोह कसा आवरणार? वेत्रवतीवर प्रेमाचा वर्षाव करून मेघ निर्विन्ध्या नदीच्या प्रदेशात जातो. वेत्रवती मेघाच्या प्रेमात पडली आणि निर्विन्ध्या पडली नाही, असे कसे होईल? तीच स्थिती विरहामध्ये कृश झालेल्या सिंधू नदीची. सर्व नद्या मेघाच्या प्रेमाची वाट पाहणाऱ्या, मेघाच्या प्रेमासाठी उत्सुक असलेल्या.

मेघ नीचै पर्वतावर जातो, तेव्हा त्याच्या स्पर्शाने पर्वताच्या अंगावर कदंब-पुष्पांचे रोमांच उभे राहतात. त्या बहरलेल्या वातावरणात नीचै पर्वतावरील गुहांमध्ये युवक आणि गणिका यांच्यात बेभान प्रणय रंगतो. त्या गुहा रतिपरिमलाने, स्त्री-पुरुषांच्या मीलनाच्या सुगंधाने संपृक्त होतात.

‘मेघदूता’तले सगळे विश्व असे प्रेमाने बहरून गेलेले आहे. हे प्रेम सौंदर्यशाली आहे, उन्मत्त आहे, बेभान आहे आणि मेघदूत वाचणाऱ्यालाही ते बेभान करून टाकणारे आहे.

मेघ उज्जयिनी नगरीत येतो, तेव्हा क्षिप्रा नदीवरचा सुगंधित वारा मानखंडिता प्रेयसींच्या अंगावरून वाहत जाऊन त्यांना सुखावत असतो. जणू काही तो त्यांची समजूतच काढतो असतो. त्या मनखंडिता आहेत, कारण त्यांच्या प्रियकरांनी रात्र दुसऱ्या स्त्रीबरोबर घालवलेली आहे. या मानखंडिता रागावलेल्या असतात, त्याच वेळी कमलिनींच्याही गालांवर दवाचे अश्रू उभे राहिलेले असतात. कारण, त्यांचाही प्रियकर असलेला सूर्य आदल्या दिवशी संध्याकाळी ‘प्रतीची’बरोबर म्हणजे पश्चिम दिशेबरोबर प्रणय करायला निघून गेला असतो. आता सकाळ झाली की, सूर्य आपल्या या निराश प्रेयसीची समजूत काढून तिचे अश्रू पुसायला येणार असतो, कमलिनीच्या मुखावर बहराचे हास्य फुलवायला येणार असतो. 

उज्जयिनीला आल्यावर मेघ गणिकांच्या शरीरांवर त्यांच्या प्रियकरांनी उमटवलेल्या नखक्षतांवर थंड तुषारांचे सिंचन करतो. आणि त्यासुद्धा मेघाकडे आपले काळ्याशार भुंग्यांच्या मालिकेसारखे कटाक्ष कृतज्ञेतेने टाकतात. 

उज्जयिनीतील रात्री तर धमाल प्रणयाने नटलेल्या. रात्रीच्या अंधारात अभिसारिका आपल्या प्रियकरांकडे अत्यंत उत्सुकतेने जायला निघतात, तेव्हा मेघ आपल्या विद्युल्लतेच्या साहाय्याने त्यांना मार्ग दाखवतो. आणि ही विद्युल्लता तरी कशी? काळ्या कसाच्या दगडावर उमटलेल्या सुवर्णाच्या रेघेसारख्या सोनेरी रंगाची!

रात्र झाली की, उज्जयिनीमधील अभिसारिका सुंदर सुंदर श्रृंगार करून अत्यंत आवेगाने आपल्या प्रियकरांकडे जातात. सकाळ व्हायच्या आत जेव्हा त्या परततात, तेव्हा त्यांनी अनुसरलेल्या मार्गावर त्या अभिसारिकांचे विस्कटलेले श्रृंगार जागोजागी विखरून पडलेले असतात. हे अतीव सुंदर दृश्य मेघ अत्यंत मिश्किलपणे पाहत राहतो.

उज्जयिनी सोडल्यावर मेघ गंभीरा नदीच्या प्रेमात पडतो आणि पुढे मग चर्मण्वतीच्या!

गंभीरा नदीमध्ये ‘शफरी’ मत्स्य पाण्यावर नर्तनलीला करत असतात. त्यांचे ते नर्तन म्हणजे गंभीरा नदीचे कटाक्ष आहेत, असे यक्ष मेघाला सांगतो. त्यांच्याद्वारा गंभीरा नदी मेघाला प्रेमाचे आमंत्रण देते.

पुढे मेघ अलकानगरीमध्ये जातो. तेथे तर प्रणयाचा कल्लोळ आहे. एखाद्या प्रेयसीने आपल्या प्रियकराच्या मांडीवर रेलावे, त्याप्रमाणे अलकानगरी कैलास पर्वताच्या मांडीवर रेलून बसली आहे. तिच्या अंगावरचे गंगेचे वस्त्र विस्कटलेले आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

२.

कालिदासाने रंगवलेले स्त्रीरूप लाजाळू आहे, शालीन आहे, आपल्या हृदयातले प्रेम विभ्रमांमधून व्यक्त करणारे आहे, तसेच ते उन्मुक्त प्रणयात स्वतःला झोकून देणारेही आहे. एकदा आपल्या प्रियकराच्या मांडीवर रेलल्यावर हे स्त्रीत्व आपल्या विस्कटलेल्या वस्त्राची फारशी पर्वा करत नाही. निर्विन्ध्या नदीसुद्धा आपल्या नाभीचा भोवरा मेघाला अगदी हेतुपुरस्सर दिसू देते आहे.

अलकानगरीतील विलासी यक्ष आपल्या प्रेयसींबरोबर ‘रती हेच ज्याचे फल आहे’ असे ‘रतिफल’ नावाचे मद्य ग्रहण करत आहेत. आपल्या प्रेयसीच्या कमरेच्या वस्त्राची गाठ थोडी मोकळी झालेली पाहून ते यक्ष ते वस्त्र आपल्या चपल हातांनी ओढून घेत आहेत. लाजलेल्या त्या प्रेयसी रत्नदीप विझावेत म्हणून आपल्या मुठीतून गुलाल किंवा सुगंधी द्रव्य त्या दीपांवर फेकत आहेत. पण त्यामुळे ते रत्नदीप विझत नाहियेत. रत्नदीपांच्या प्रभेमध्ये त्या रंगद्रव्यांचे ढग तरंगत राहिले आहेत. अशा वेळी आपण ओढून घेतलेले वस्त्र आपल्या प्रेयसीला आवडतेय, हे त्या लबाड यक्षांना माहीत आहे.

सगळेच वातावरण असे उन्मुक्त झालेले आहे. या सौंदर्याने भरलेल्या मादक वातावरणात अलकानगरीतील त्या सौंदर्यशालिनी ललना प्रेमाचा मद अनुभवत आहेत. मध्यरात्री प्रियकरांच्या हातांच्या विळख्यातून त्या थोड्याश्या मोकळ्या होतात, त्या वेळी त्यांच्या शय्येवरती जडवलेल्या चंद्रकांत मण्यांवर चंद्रप्रकाश पडल्यामुळे ते मणी शीतल स्राव स्रवू लागतात. ते शीतल थेंब त्या ललनांच्या अंगावर पडतात आणि रतिक्रीडेमुळे त्यांना आलेला शीण थोडा कमी होतो. सगळे वातावरण असे प्रेमामुळे मंत्रमुग्ध झालेले!

‘मेघदूत’ म्हणजे, स्त्री-पुरुषांच्या प्रेमाचा सगळे विश्व भरून राहिलेला अतीव-सुंदर उत्सव! स्त्री-पुरुष प्रेमातील मूर्तिमंत सौंदर्य सगळ्या वातावरणात पसरलेले आपल्याला प्रत्येक क्षणी जाणवत राहते.

स्त्री-पुरुषांमधल्या अनावर प्रेमाची अनेक प्रतिबिंबे या जगात उमटलेली असतात, आणि त्यांनाच सौंदर्य म्हणतात, ही जाण ‘मेघदूत’ वाचून आपल्या हृदयात अत्यंत प्रकर्षाने आकार घेते. या प्रेमाची प्रतिबिंबे झाडावर उमटली की, फुले फुलली आहेत, असे आपण म्हणतो. ती प्रतिबिंबे आकाशात विखुरली की, चांदण्या उगवल्या असे आपण म्हणतो. त्या प्रतिबिंबांचा प्रकाश रात्री सर्वत्र पसरला की, काय टिपूर चांदणे पडले आहे, असे आपण म्हणतो! प्रेम आणि सौंदर्य यांच्यातील या विलक्षण नात्यावर ‘मेघदूत’ काव्यात्म प्रकाश टाकते!

मनात विचार येतो की, यक्षाचे आपल्या प्रेयसीवर इतके निरतिशय प्रेम नसते, तर त्याला हे जग इतके सुंदर दिसले असते का?

विंध्य ते कैलास पर्वत या भव्य पटावर नदी, ओहोळ, माती, पर्वत, गुहा, जंगले आणि बर्फ आणि मेघ; असे सगळे कालिदासाने आणि त्याच्या यक्षाने प्रेममय करून टाकलेले आहे. 

‘मेघदूता’चा खरा अर्थ, यक्षाच्या मनातील प्रेमाचा ताजेपणा आपल्या मनात तयार झाला, तरच आपल्या लक्षात येतो. आपल्यातील प्रत्येक जण खऱ्या-खुऱ्या प्रेमात कधी ना कधी पडलेला असतो. त्या काळातील तरलता आपल्या जवळ अजूनही या ना त्या सुप्त स्वरूपात राहिलेली असते. ‘मेघदूत’ वाचताना ती तरलता जर आपल्या मनात जिवंत झाली, तरच यक्षाच्या आणि कालिदासाच्या तरलतेशी आपण एकत्व पाऊ शकतो. 

आपण प्रेमात पडलेलो असतो, त्या काळातील चांदणे वेगळे असते. चंद्र वेगळा असतो, पाऊस वेगळा असतो, फुले वेगळी असतात. आपल्या आजूबाजूचे सगळे विश्व काव्याने मंतरलेले असते. प्रेमाच्या मंत्रामुळे आपण मुग्ध झालेलो असतो. सगळे जग या मंत्रामुळे भारून गेलेले असते. ज्या व्यक्तीच्या हृदयाला स्त्री किंवा पुरुषाविषयीच्या बेभान प्रेमाचा मंत्र डसलेला नाही, त्याला ‘मेघदूत’ कळणे थोडे अवघड पडेल, असे मला वाटते.

खरे प्रेम, आपल्या जीवनदृष्टीला अत्यंत रम्य अशी शीतलता देते. अखंड ‘मेघदूता’त एकही ‘निगेटिव्ह इमोशन’ आपल्याला बघायला मिळत नाही. यक्षाची एकही भावना नकारात्मक नाही. तो दुःख भोगतो आहे, पण त्याबद्दल त्याची तक्रार नाही. आपल्यावर अन्याय झाला आहे, अशी त्याची धारणा नाही. कुबेराने त्याला विरहाची शिक्षा दिलेली आहे, पण आपल्या त्या धन्याबद्दल अथवा आपल्या नियतीबद्दल त्याची कसलीही तक्रार नाही. याचे कारण असे की, आपले आपल्या प्रेयसीवर खरे प्रेम आहे आणि आपल्या प्रेयसीचे आपल्यावर खरे प्रेम आहे, हे त्याला माहीत आहे, आणि त्या प्रेमात तो तृप्त आहे.

स्त्रीच्या सौंदर्यातली कोमलता यक्षाच्या हृदयात कायमची राहायला आलेली आहे. स्त्री ही एक ‘विलक्षण’ निर्मिती आहे हे त्याला कुठेतरी जाणवलेले आहे. यक्षाचा स्त्रीत्वाविषयीचा आदर या कोमलतेविषयीच्या आदरातून आलेला आहे.

आपल्या हृदयातले प्रेम व्यक्त करायच्या स्त्रीच्या अदा वेगळ्या असतात. प्रेमाला होकार द्यायच्या तिच्या पद्धती वेगळ्या असतात. स्त्रीच्या विभ्रमातले नाट्य किती आणि कसे सुंदर असते, हे त्याला अत्यंत साकल्याने जाणवलेले आहे.

स्त्रीचे विभ्रम हा केवळ पूर्वरंग असतो आणि तिच्या प्रेमाचा उन्मुक्त आविष्कार हा खरा चढत गेलेला उत्तररंग असतो, अशी धारण बहुतेक पुरुषांची असते. यक्षाला स्त्रीचे विभ्रम तिच्या उन्मुक्त प्रेमाच्या आविष्काराइतकेच आकर्षक वाटतात!

यक्ष मेघाला सांगतो की, उज्जयिनीतील स्त्रियांच्या नयनांचे विभ्रम हे अतिशय नयनयमनोहर असे असतात; ज्या पुरुषांच्या डोळ्यांना स्त्रियांच्या विलोल कटाक्षातले सौंदर्य दिसू शकत नाही, ते डोळेच निष्फळ आहेत, असेच म्हणायला हवे!

स्त्रीचे सौंदर्य आणि तिची कोमलता ही पुरुषाला आकर्षित करून घेण्यासाठी तर आहेच, पण या दोन्ही गोष्टी पुरुषाला काव्य आणि माणुसकीच्या उन्नत आदर्शांकडे ढकलण्यासाठीही आहेत, हे भान कालिदासाचा यक्ष ‘मेघदूता’मध्ये आपल्याला देतो.

एकमेकांबद्दलची निष्ठा ही प्रेमाच्या जिवंतपणाची निशाणी आहे, ही गोष्ट ‘मेघदूता’मध्ये अधोरेखित होते. कालिदासाचा यक्ष अनेकनिष्ठ प्रेमाबद्दल मनमोकळेपणाने बोलतो. तो गणिकांबरोबर रममाण होणाऱ्या नीचै पर्वताच्या गुहांमधल्या तरुणांबद्दल बोलतो, कमलिनीला सोडून पश्चिम दिशेबरोबर रममाण होणाऱ्या सूर्याबद्दल बोलतो. वैभ्राज्य उद्यानातल्या आपल्या मैत्रिणी असलेल्या अप्सरांबरोबर रममाण होणाऱ्या यक्षांबद्दल बोलतो. उज्जयिनीमधले प्रियकर आपल्या प्रेयसींना सोडून इतर सौंदर्यवतींबरोबर रममाण होतात आणि नंतर सकाळी आपल्या मानखंडिता प्रेयसींची समजूत काढतात त्याबद्दलही बोलतो. परंतु, तो स्वतः आपल्या प्रेमदेवतेशिवाय दुसऱ्या कुठल्या स्त्रीचा उल्लेख करत नाही. पहिल्या प्रेमात पडलेल्या व्यक्तीला ‘प्रेम निष्ठावंत असते’ हे सांगायला लागत नाही, कारण पहिले प्रेम हे अतिशय तीव्र असते, इन्टेन्स असते. पहिल्या प्रेमामध्ये प्रेयसीला वाटत असते की, आपला प्रियकर या जगातला सर्वांत उत्कृष्ट पुरुष आहे आणि प्रियकराला वाटत असते की, आपली प्रेयसी ही जगातली सर्वांत सुंदर स्त्री आहे. ही सारी किमया प्रेमातल्या जिवंतपणामुळे होत असते.

यक्षाच्या प्रेयसीच्या कोमलतेमुळे यक्ष अत्यंत हळूवार बनलेला आहे. तो मेघाला सांगतो की, तू माझ्या प्रासादात पोहोचशील, तेव्हा तुझ्या विद्युल्लतेला काजव्यांच्या प्रकाशाइतके सौम्य व्हायला सांग, आणि नंतरच त्या ‘लुकलुकत्या’ विद्युल्लतेच्या नजरेने तू माझ्या प्रेयसीकडे बघ. नंतर तो मेघाला सांगतो आहे की, कळ्यांना तू जसे नाजूक तुषारांनी जागे करतोस, त्याच हळूवारपणे तू तिला जागे कर.

यक्षाला प्रेमाचे सगळे आविष्कार माहिती आहेत. दुरून विभ्रमांचे रसग्रहण करणे, तृषार्त नजरेने स्त्रीचे सौंदर्य प्राशन करणे आणि ‘रतिफल’ मद्य पिऊन रतिसुख देणे-घेणे हे सगळे त्याला माहीत आहे. पण त्याचबरोबर आपल्या प्रेयसीच्या मनाची कोमलता जपण्यासाठीची हळूवार संवेदनशीलतासुद्धा यक्षाकडे आहे. रामासारखे अवतार जसे ‘पूर्ण-पुरुष’ असतात, तसा कालिदासाचा यक्ष हा एक ‘पूर्ण-प्रियकर’ आहे! शाप संपला की, शरदाच्या चांदण्यामध्ये याच हळुवार प्रियकराला आपल्या प्रेयसीबरोबर धसमुसळे प्रेमसुद्धा करायचे आहे.

आधुनिक जगतात स्त्री-पुरुष प्रेमातील निर्मळपणा हरवल्यासारखा झाला आहे का, असे वाटू लागले आहे. पैशाचे आणि करिअरचे हिशोब करून आजकालच्या जगात प्रेम दिले-घेतले जाते आहे का, असे अनेकांना वाटू लागले आहे. 

या पार्श्वभूमीवर कालिदासाच्या यक्षाचे आणि यक्षीचे प्रेम विलक्षण आहे, असे वाटू लागते!

यक्षाच्या प्रेमाची जडण-घडण कुबेराच्या अलकानगरीमधील झाली आहे. इथे कशाचीही कमतरता नाही. इथे हिरे आणि पाचू तिजोऱ्यांमध्ये ठेवले जात नाहीत, तर अंगणातल्या विहिरींच्या पायऱ्यांना जडवले जात आहेत. इथल्या घरांमधले दीपसुद्धा रत्नांचे आहेत. या रत्नांच्या प्रभा म्हणजेच या दीपांच्या ज्योती! इथे यौवन याचाच अर्थ चिरयौवन असाच आहे. इथे प्रेमाच्या विरहाशिवाय दुसरे कसलेही दुःख नाहिये. ना मृत्यू, ना दारिद्र्य, ना जरा!

अलकानगरीतील प्रेम, सनातन सौंदर्य आणि चिरयौवन या दोन पाकळ्यांच्या कोंदणामध्ये जडवले गेले आहे.

‘मेघदूता’मध्ये प्रेमाचे दोन आविष्कार आहेत. ‘पूर्वमेघा’मधले पृथ्वीवरील मर्त्य जिवांमधले प्रेम आणि ‘उत्तरमेघा’मधले अलकानगरीमधील स्वर्गीय जिवांमधले प्रेम. हे दोन्ही आविष्कार आपल्याला एकाच ताकदीने मोहवत राहतात. उत्फुल्लता हा कुठल्याही प्रेमाचा प्राण असतो, हा साक्षात्कार आपल्याला ‘मेघदूता’मध्ये होतो. पृथ्वीवरचे प्रेम उत्फुल्लतेमध्ये आणि उत्स्फूर्ततेमध्ये स्वर्गीय प्रेमापेक्षा कुठेही कमी नाही, हा साक्षात्कारही आपल्याला ‘मेघदूता’मध्ये होत राहतो.

आपल्या केसांच्या बटा बाजूला करत मेघाकडे पाहत आपल्या प्रियकरांची वाट पाहणाऱ्या ‘पूर्वमेघा’तील स्त्रिया आणि यक्षाची वाट पाहणारी ‘उत्तरमेघा’तील यक्षपत्नी यांच्या प्रेमातील तीव्रता, ही एकसारखीच आहे.

‘मेघदूता’तल्या प्रेमाला सृजनाच्या सौंदर्याचे आधिष्ठान आहे, त्याचप्रमाणे त्याला मांगल्याचेही अधिष्ठान आहे. कदाचित म्हणूनच कालिदासाचे ‘मेघदूत’ गेल्या दोन हजार वर्षांपासून मानवी मनाला भुरळ घालते आहे. माणसाच्या हृदयाला स्पर्श करण्याची ‘मेघदूता’ची ताकद विलक्षण आहे.

३.

उज्जयिनीच्या महाकाल मंदिरात संध्याकाळच्या पूजेच्या वेळी मेघ नगारा वाजवतो आहे. हिमालयातील शिवपूजेच्या वेळी वेळूंचे वेणू वाजत असताना आणि किन्नरींचे स्वर शिवस्तुतीने गुंजत असताना मेघ स्वतः गर्जना करून मृदुंग वाजवत आहे. शिव आणि पार्वती कैलास पर्वतावर एकमेकांच्या हातात हात घालून संचार करायला निघाल्यावर मेघ स्वतःच्या देहाच्या पायऱ्या माता पार्वती यांच्या मार्गामध्ये अंथरतो आहे. स्वतः शिव, अलकानगरीत बाहेरील उद्यानात तपस्येसाठी बसले आहेत आणि त्यांच्या मस्तकावरच्या चंद्रकोरीच्या प्रकाशाने अलकानगरीमधील सारे प्रासाद उजळून निघालेले आहेत.

‘पूर्वमेघा’त एका डोंगरावरून इंद्रधनुष्य उसळून येते आणि  मेघ आपल्या निळ्या-सावळ्या सौंदर्यासह त्या इंद्रधनुष्याच्या कमानीमध्ये उभा राहतो. ते दृश्य बघून यक्षाला श्रीकृष्णाची आठवण येते. त्याचप्रमाणे क्रौंच-रंध्रातून पुढे जाता यावे म्हणून मेघाला निमूळता आकार धारण करावा लागतो. तो आकारा बघून यक्षाला श्री विष्णु यांनी बळीराजाच्या मस्तकावर ठेवायला उचललेल्या पावलाची आठवण होते.

उज्जयिनीमधील गृहदेवतांची रंगीत पावले प्रासादांमध्ये उमटलेली आहेत. गृहदेवता आणि लक्ष्मी यांचे एकत्व या प्रासादांमध्ये पाहायला मिळते. ‘मेघदूता’तील प्रेमाच्या सुंदर आवर्ताला मांगल्याची अशी अतीव सुंदर किनार आहे.

‘मेघदूता’तल्या प्रेमाच्या आविष्काराला आवर्त म्हणावे लागते, कारण त्यामध्ये सौंदर्याचा एक कल्लोळ उठलेला दिसतो. नर्मदा नदीचे शुभ्र आणि खळाळते पाणी हत्तींसारख्या खडकांवरून खळाळत चालले आहे. जांभळाची बने जांभळे लगडल्यामुळे निळी-सावळी दिसायला लागली आहेत आणि त्या निळ्या-सावळ्या पार्श्वभूमीवरून राजहंस संचार करताना दिसत आहेत. चपल मेघगणांनी इतके रुद्ररूप धारण केले आहे की, ते आता पर्वतांची शिखरे उडवून नेतील, असे वाटू लागले आहे. या रुद्रस्वरूप मेघांना दिग्गज आपल्या अतिप्रचंड शुंडांचे तडाखे देत आहेत. अलकानगरीमध्ये विजेच्या प्रहारामुळे मेघाच्या शरीरातून हिऱ्यांच्या धारा कोसळू लागल्या आहेत. त्या धारांमध्ये भिजण्याच्या निमित्ताने अलकानगरातील सौंदर्यशाली ललनांनी मेघाचेच स्नानगृह बनवलेले आहे. असा सगळा रुद्रसुंदर आणि अतिसुंदर कल्लोळ!

‘मेघदूता’तले जग हे अत्यंत सुंदर असे जग आहे. पण, आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की, हे फक्त कल्पनेतले जग नाही. प्रत्येक संवेदनशील स्त्री-पुरुषाच्या हृदयातले हे जग आहे.

अलकानगरीतले चिरयौवन ही फक्त कल्पना नाही. आपण सगळेच आपले वय काहीही असले तरी आपल्या मनामध्ये चिरतारुण्य जपलेले असते. अलकानगरीमधले सौंदर्य अविनाशी आणि सदाबहार आहे. आपल्या मनातील सौंदर्याच्या कल्पना सुप्तावस्थेत असल्या तरी अशाच अविनाशी आणि सदाबहार असतात!

‘मेघदूत’ वाचल्यावर जाणवते की, आपण आपल्या संवेदना काही कारणांमुळे दाबून टाकलेल्या नसतील, तर हे सनातन सौंदर्य जिवंत होते आणि आपल्यामध्ये राहायला येते.

प्रेमाच्या आणि सौंदर्याच्या संवेदनांना पुन्हा एकदा जिवंत करण्यासाठी आपल्याला फार कुठे दूर जायची गरज नसते, फक्त ‘मेघदूत’ उघडायचे असते. मग काही कळायच्या आत हा सौंदर्याचा आणि मानवी प्रेमाचा आवर्त आपल्याला त्याच्या मनोहारी विळख्यामध्ये घेतो.

आषाढातल्या पहिल्या दिवशी यक्ष डोळ्यात पाणी आणून आणि हातात कूटज फुलांचे अर्घ्य घेऊन मेघासमोर प्रार्थना करत उभा राहिला होता, कारण त्याला त्याच्या प्रियेला निरोप पाठवायचा होता. आपण ‘मेघदूत’ वाचले की, प्रत्येक आषाढात आपल्याला फुलांचे अर्घ्य हातात घेऊन कालिदासाच्या ‘मेघदूता’समोर उभे राहावेसे वाटते. कारण आपल्याला सुप्तावस्थेत गेलेल्या आपल्या संवेदनांना निरोप पाठवायचे महत्त्व कळलेले असते. 

यक्ष जरी मानव नसला तरी कालिदास मानव होता. यक्ष जे जे जगला ते ते सगळे कालिदाससुद्धा जगला. कालिदास नावाचा मानव जर हा बेभान आवर्त जगू शकत असेल तर, आपण का नाही? कालिदासाची सौंदर्यदृष्टी आणि जीवनदृष्टी आपण आत्मसात करू शकलो, तर जे जे कालिदास जगला ते ते सगळे आपणसुद्धा जगू शकू! साथीला कुसुमाग्रज, सीडी देशमुख, शांताबाई शेळके आणि बा. भ. बोरकर यांच्यासारखी कविहृदये असतातच... प्रत्येक भाषेत असतात, प्रत्येक शतकात!!!

..................................................................................................................................................................

लेखांक पहिला : कालिदासाच्या काव्यातील एकेक श्लोक सौंदर्यवंत ऐरावतासारखा झुलत राहतो, आणि त्यावर आशयाचा ऐश्वर्यमान इंद्र आरूढ झालेला असतो!

लेखांक दुसरा : उत्कंठा उत्पन्न करणाऱ्या त्या मेघासमोर यक्ष आपले अश्रू आवरत कसाबसा उभा राहिला…

लेखांक तिसरा : कालिदास आपल्याला आपल्या जगातून उचलतात आणि प्रेमाच्या व सौंदर्याच्या तीव्र संवेदनांनी भारलेल्या जगात घेऊन जातात…

लेखांक चौथा कालिदासाला जेव्हा जेव्हा प्रकृतीतील अपार सौंदर्य दिसते, तेव्हा तेव्हा त्याला पुरुष-तत्त्वाची आठवण होते…

लेखांक पाचवा : कालिदासाच्या सौंदर्यदृष्टीचा स्पर्श त्याच्या अनुवादकांनासुद्धा होतो…

लेखांक सहावा : येथून आपला कालिदासाच्या ‘मेघदूता’तील श्रृंगाररसाच्या प्रवाहात प्रवेश होतो.…

लेखांक सातवा : आपल्या प्रेमामुळे दुसरी व्यक्ती किती आनंदी होते आहे, यावर आपल्या प्रेमाचे भाग्य अवलंबून असते!

लेखांक आठवा : कालिदास सगळे वातावरणच स्त्री-पुरुषांतील प्रेमामध्ये अध्याहृत असलेल्या अनिवार वेडाने भारावून टाकतो...

लेखांक नववा : प्रेमात पडलेल्या स्त्रीच्या प्रेमाचा अव्हेर करणे, यक्षाला योग्य वाटत नाही. म्हणून तो मेघाला सांगतो आहे…

लेखांक दहावा : कालिदासाची सौंदर्यदृष्टी किती सूक्ष्म निरीक्षणांतून जन्मली आहे, याची अनेक उदाहरणे देता येण्यासारखी आहेत…

लेखांक अकरावा : ‘मेघदुता’तल्या ४७व्या श्लोकातील एका ओळीचा अनुवाद करताना सगळ्याच अनुवादकांची धांदल उडालीय...

लेखांक बारावा : मेघ थोर कुळातील असून जलसंपदा हे त्याचे वैभव. ते कारणी लागावे ही यक्षाची इच्छा आहे…

लेखांक तेरावा : निसर्गातील वस्तुजाताला सुंदर असे व्यक्तिस्वरूप देणे, हा कालिदासाच्या प्रतिभेचा एक अजब धर्म आहे...

लेखांक चौदावा : स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वात आणि सौंदर्यात विद्युल्लता लपलेली असते, हे कालिदासाला जेवढे जाणवले, तेवढे दुसऱ्या कुठल्या कवीला जाणवले असेल, असे वाटत नाही

लेखांक पंधरावा रत्नदीपांवर सुगंधाचा वा गुलालाचा किंवा हिऱ्याच्या कणिकांचा मेघ तरळतो आहे

लेखांक सोळावा : इतर वेळी पिणाऱ्याची दक्षता घालवणारे मद्य इथे मात्र अत्यंत दक्षपणे मदनाचे कार्य करत आहे...

लेखांक सतरावा : अशोकाला जसा ‘तो’ नाजूक लत्ता-प्रहार हवा आहे, तसा ‘तो’ यक्षाला स्वतःलाही हवा आहे…

लेखांक अठरावा : सौंदर्य, काम, प्रेम आणि निष्ठा हे या यक्ष आणि यक्षिणीच्या जीवनातील चार मुख्य आधारस्तंभ आहेत!

लेखांक एकोणविसावा : अभ्रांनी आच्छादलेल्या दिवशी कमलिनी ना नीट फुललेली आहे, ना नीट मिटलेली आहे…

लेखांक विसावा : कालिदास काय किंवा यक्ष काय... स्त्रीविषयी अत्यंत आदर असलेली व्यक्तिमत्त्वं होती!

लेखांक एकविसावा : कळ्यांना ज्या हळूवारपणे तू जागे करतोस, त्याच हळूवारपणे तू तिलाही जागे कर…

लेखांक बाविसावा वाऱ्याने तुला स्पर्श केलेला असतो आणि तुझे अस्तित्व त्याच्या श्वासातून वाहत असते…

लेखांक तेविसावाइति महाकविश्रीकालिदासविरचिते मेघदूते काव्ये उत्तरमेघः समाप्तः।

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......