ताशी ११२ किमीपेक्षाही जास्त वेगानं धावणाऱ्या शाही पाहुण्यांचं तब्बल ७० वर्षांनी भारतात आगमन होतंय हो…
पडघम - देशकारण
आरती कुलकर्णी
  • आशियाई चित्त्याचं एक प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 09 August 2022
  • पडघम देशकारण चित्ता Cheetah

स्वातंत्र्याच्या अमृत-महोत्सवाच्या निमित्तानं चित्ता पुन्हा एकदा भारतात अवतरणार आहे. १९५२ साली भारतातून चित्ता नामशेष झाल्याचं अधिकृतरित्या घोषित करण्यात आलं होतं. त्यानंतर आता तब्बल ७० वर्षांनी चित्ता भारतात दिसणार आहे. आफ्रिका खंडातल्या नामिबियामधून मध्य प्रदेशमधल्या कुनो नॅशनल पार्कमध्ये हे चित्ते आणले जाणार आहेत. पृथ्वीवरचा हा सर्वांत वेगवान प्राणी हवेतून उड्डाण करून नामिबियामधून आणला जातोय. आफ्रिका खंडातून आशिया खंडात होणारं चित्त्याचं हे स्थानांतर जगातलं सर्वांत दीर्घ पल्ल्याचं स्थानांतर आहे.

आशियाई चित्ता का नाही?

भारतात अगदी १९४७पर्यंत चित्त्यांचा आढळ असल्याची नोंद होती, पण आत्ताच्या छत्तीसगडमधल्या सरगुजामध्ये तत्कालीन महाराजा रामानुज प्रतापसिंह देव यांनी शेवटचे तीन चित्ते मारले. आणि भारतातून चित्त्यांचा निर्वंश झाला.

भारतातला चित्ता हा आशियाई होता, पण त्यांची संख्या खूपच कमी झाली आहे. आता फक्त इराणमध्ये आशियाई चित्ता पाहायला मिळतो. तिथं त्यांची संख्याही १२ इतकी खालावलेल्या स्थितीत आहे.

आफ्रिकेमध्ये आत्ताच्या घडीला सुमारे ७ हजार चित्ते आहेत. आफ्रिकेतला चित्ता हा तिथल्या सॅव्हाना गवताळ प्रदेशांचा मानबिंदू आहे. त्याचं संवर्धन आणि संरक्षण कसं करायचं, यासाठी भारत सरकार दक्षिण आफ्रिका आणि नामिबियाच्या वन्यजीव विभागांची आणि तज्ज्ञांची मदत घेत आहे. हा प्रकल्प यशस्वी झाला तर चित्त्यांच्या निमित्तानं भारतातली माळरानं पुन्हा एकदा जिवंत होतील, अशीही आशा वन्यजीव तज्ज्ञांना वाटते आहे.

‘चित्ता’ हे नाव भारतीय

भारतासारख्या विपुल जैवविविधता असलेल्या आणि जंगलांच्या देशातून चित्ता नामशेष होणं ही मोठी नामुष्की होती. ‘चित्ता’ हे नावही भारतीय आहे. चित्ता म्हणजे ठिपके असलेला. चित्त्याच्या शरीरावरच्या ठिपक्यांमुळे त्याला हे नाव पडलं आणि आफ्रिकेतल्या चित्त्यालाही इंग्रजीमध्ये ‘Cheetah’ असंच म्हटलं जाऊ लागलं. 

१५ ऑगस्टच्या आधीच या चित्त्यांची पहिली तुकडी दाखल होईल. जे ठरलं आहे त्याप्रमाणे सगळं झालं तर या चित्त्यांना प्रवासाच्या काही तास आधी ट्रँक्विलाइज केलं जाणार आहे, म्हणजे त्यांना भुलीचं इंजेक्शन दिलं जाणार आहे. त्यानंतर नामिबियामधून दक्षिण आफ्रिकेमध्ये आणि मग जोहान्सबर्ग विमानतळावरून हे चित्ते भारताच्या दिशेनं उड्डाण करतील!

चित्त्यांसाठीची जागा - कुनो नॅशनल पार्क

‘कुनो’चा गवताळ प्रदेश

चित्त्यांची ही चित्तथरारक कहाणी समजून घेण्यासाठी थेट जाऊया कुनो नॅशनल पार्कमध्ये. याआधी गीरच्या जंगलात सिंहांची संख्या जास्त झाल्यामुळे त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये हलवण्यात येणार होतं, पण गीरच्या लोकांनी याला विरोध केल्यामुळे इथे सिंह येऊ शकले नव्हते. आता त्याच जंगलात चित्ते येत आहेत.

हे नॅशनल पार्क आपण जे वाघाचं जंगल बघतो तसं नाही. हा अधिवास आफ्रिकेतल्या सॅव्हानासारखाच गवताळ प्रदेशाचा आहे आणि त्यामुळेच तो चित्त्यासाठी योग्य आहे, असं वन्यजीव तज्ज्ञांचं मत आहे. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

५० चित्ते सोडण्याचा प्रकल्प

या चित्त्यांसाठी योग्य वसतिस्थान विकसित करण्याचे प्रयत्न कुनो नॅशनल पार्कमध्ये सुरू आहेत. अनुकूल असं वसतिस्थान आणि पुरेसं भक्ष्य, यांची खबरदारी घ्यावी लागेल. चित्त्यांच्या आगमनाची इथं जोरदार तयारी सुरू आहे. अर्थात त्यांना थेट इथल्या जंगलात सोडून देता येईल, असं मात्र नाही. हे एक शास्त्रशुद्ध पद्धतीनं राबवलं जाणारं ऑपरेशन आहे. कुनो नॅशनल पार्कमध्ये या चित्त्यांसाठी सध्या पाच चौ. कि.मी.ची एक बंदिस्त जागा तयार करण्यात आली आहे. आधी त्यांना या जागेत ठेवण्यात येईल आणि त्यांच्यावर २४ तास सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असेल. आणि मग दोन-तीन महिन्यांनी त्यांना माळरानावर सोडण्यात येणार आहे. असे एकूण ५० चित्ते भारतातल्या माळरानांवर सोडण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे.

खरं तर या प्रकल्पाची सुरुवात ४० वर्षांपूर्वीच झाली होती. ‘‘ही गोष्ट आहे १९७२ सालची. मी तेव्हा अमेरिकेतल्या यलो स्टोन नॅशनल पार्कमध्ये एका परिषदेसाठी गेलो होतो. तिथं मला इराणच्या वन्यजीव विभागाचे प्रमुख भेटले. मी त्यांच्याशी बोलताना भारतात नामशेष झालेल्या चित्त्यांचा विषय काढला...’’ भारताचे माजी वन्यजीव संचालक आणि भारताच्या चित्ता प्रकल्पाचे मुख्य सूत्रधार डॉ. एम. के. रणजितसिंह सांगतात.

‘‘भारतात चित्ते आणायचे असतील तर ते आशियाई चित्ते हवे आणि आशियाई चित्ते इराणमधल्या गवताळ माळरानांवर चांगल्या संख्येनं होते. त्या वेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या प्रकल्पाला होकार दिला. गुजरातमधल्या एका ठिकाणी हे चित्ते आणता येतील, अशी शक्यता दिसू लागली. आम्ही त्यावर कामही सुरू केलं, पण त्यानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. इराण आणि भारतात सत्ताबदल झाला आणि हा प्रकल्प मागे पडला.

‘‘तेव्हा इराणमध्ये ३०० चित्ते होते. आत्ता तिथं फक्त १२ चित्ते उरले आहेत. त्यामुळे भारतात आशियाई चित्ता आणणं काही शक्य नाही. त्यामुळे आम्ही आफ्रिकेतून चित्ते आणण्याचा हा निर्णय घेतला. याला सर्वोच्च न्यायालयानेही हिरवा कंदील दाखवला आहे.’’

‘बिग फाइव्ह’चा दबदबा

चित्ता खरंच भारतात आणावा का? यावर रणजितसिंह यांचा प्रश्न आहे- ‘‘का नाही? त्यात नुकसान काय आहे? आतापर्यंत आपण आपलं वन्यजीवन वाचवतच आलो आहोत. चित्त्यामुळे हे प्रयत्न थांबणार नाहीत, उलट त्याला गतीच येईल.’’

‘पण सर, भारतातले सिंह इतके संकटात असताना त्यांचं संवर्धन बाजूला ठेवून आपण ही जोखीम स्वीकारावी का?’ शिवाय चित्त्यांसाठी लागणारी विस्तीर्ण माळरानं आपल्याकडे खरंच उरली आहेत का? त्यांच्यासाठी पुरेसं भक्ष्य आहे का? आफ्रिकेतला चित्ता भारतातल्या जंगलांमध्ये स्थिरावेल का?

डॉ. एम. के रणजितसिंह ही वस्तुस्थिती नाकारत नाहीत, पण त्यांचं चित्त्यावरचं प्रेम जराही कमी झालेलं नाही. ते सांगतात, “वाघ, सिंह, हत्ती, गेंडे आणि चित्ते यांचा उल्लेख आपण अभिमानाने ‘बिग फाइव्ह’ असा करतो. आपल्याकडे हे सगळे प्राणी आहेत फक्त चित्ता नाही.”

सम्राटांकडचे शिकारी चित्ते

भारतातल्या विस्तीर्ण माळरानांवर एकेकाळी चित्ते होते, पण जसजशी शेती वाढत गेली, तसतशी माळरानं आक्रसू लागली, शिकारीचं प्रमाण वाढलं आणि चित्त्यांनी मध्य भारतातल्या साल वृक्षांच्या जंगलात आश्रय घेतला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतातले अगदी शेवटच्या पिढीतले चित्ते दिसले ते साल वृक्षांच्या जंगलात. त्यांना तिथं अक्षरश: लपूनछपून राहावं लागत होतं. याच जंगलाजवळच्या खुल्या माळरानांवर ते शिकार करत होते, पण पुन्हा बछड्यांना जन्म देण्यासाठी त्यांना या साल जंगलांचा आश्रय घ्यावा लागत होता...

या काळात चित्त्यांची अनिर्बंध शिकार झाली आणि भारतातला आशियाई चित्ता नाहीसा झाला. आता आपल्याकडे चित्ता उरला आहे, तो फक्त शाही राजवाड्यांमध्ये आणि तोही पेंढा भरलेल्या स्वरूपात. त्यामुळे चित्त्याबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्याला इतिहासातच जावं लागतं.

भारतात सम्राट अकबराकडे एक हजार चित्ते होते. त्यांचा वापर मुख्यत: शिकार करण्यासाठी होत असे. कोल्हापूर संस्थानचे शाहू महाराज यांनीही शिकार करण्यासाठी गुजरातहून चित्ते आणले होते. त्या काळी दाजीपूरसारख्या जंगलांमध्ये चित्त्यांच्या मदतीने रानडुकरांची शिकार होत असे.

माळरानाचा राजा

माळरानांवर भक्ष्य पकडण्यासाठी सुसाट दौडत जाणारा, दबा धरून नंतर झेप घेणारा, चित्ता हे दृश्य आपण अनेकदा डिस्कव्हरीसारख्या चॅनल्सवर पाहत असतो. चित्ता हा पृथ्वीवरचाच सर्वांत वेगवान प्राणी आहे आणि तो ताशी ११२ किमीपेक्षाही जास्त वेगानं धावू शकतो. त्यामुळे वाघ आणि सिंहांपेक्षाही आपल्याला याचं जास्त आकर्षण आहे.

चित्ता हा माळरानांचा राजा असला तरी तो अतिशय संवेदनशील प्राणी आहे. त्यामुळे भारतातल्या जंगलांमध्ये आफ्रिकेतला चित्ता सोडताना आपल्याला अत्यंत काटेकोर वन्यजीव व्यवस्थापन करणं गरजेचं आहे, असं वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. यजुवेंद्र झाला यांचं म्हणणं आहे.

आफ्रिकेमध्ये चित्ते इम्पाला, चिंकारा, काळवीटं अशा प्राण्यांची शिकार करतात. आपल्याकडे इम्पाला नाहीत, पण कुनो नॅशनल पार्कमध्ये सांबर, चिंकारा, काळवीटं यांची संख्या चांगली आहे. त्याचबरोबर इथं आधीच बिबटे आणि तरस मोठ्या प्रमाणात आहेत. या प्राण्यांचे चित्त्यांशी कसे संबंध असतील हेही तपासून पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे बिबटे आणि तरसांना रेडिओ कॉलर लावून त्यांचा अभ्यास करण्याचा संशोधन प्रकल्पही हाती घेण्यात आला आहे.

कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्यांसाठी तयार केलेल्या जागेत बिबटे घुसण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आधी या बिबट्यांना बाहेर काढून ती सुरक्षित असल्याची खबरदारीही घ्यावी लागत आहे.

चित्त्यावरून वादंग

चित्त्यांना त्यांचा अधिवास पुन्हा मिळवून देण्याचं हे काम अजिबातच सोपं नाही. त्यासाठी आधी कुनो नॅशनल पार्कमधले गवताळ प्रदेश आणखी विकसित करावे लागतील. टप्प्याटप्प्यानं चित्ते सोडून ते या वातावरणात कसे तगून राहतात, याचा अंदाज घ्यावा लागेल. यामुळेच हा प्रकल्प स्वागतार्ह असला तरी वन्यजीव तज्ज्ञांनी याबद्दल काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

आशियाई सिंहांवर संशोधन करणारे डॉ. रवी चेल्लम यांच्या मते, आपण एका अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला हात घातला आहे. या चित्त्यांना इथल्या अधिवासात सोडणं कठीण झालं, तर चित्त्यांसाठीची ही जागा फक्त ‘चित्ता सफारी पार्क’ बनून राहण्याचा धोका आहे.

आधी सिंह की आधी चित्ता?

आधी गीरच्या सिंहांच्या स्थानांतराचा प्रकल्प हाती घ्यायला हवा होता, असंही त्यांना वाटतं. गीरच्या जंगलात सिंहांची संख्या वाढत असल्यानं यापैकी काही सिंहांचं स्थानांतर कुनो अभयारण्यात करावं, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने नऊ वर्षांपूर्वीच दिले होते. पण त्यावर कुठलीच अंमलबजावणी झाली नाही. आणि आता तर तो प्रकल्पच मागे पडला आहे.

भारतातले आशियाई सिंह गुजरातमधल्या गीरमध्ये एकाच ठिकाणी एकवटलेले आहेत. अशा स्थितीत एखादी नैसर्गिक आपत्ती आली किंवा विशिष्ट रोगाचा प्रसार झाला, तर सिंहांच्या पूर्ण प्रजातीलाच धोका निर्माण होऊ शकतो, असं डॉ. रवी चेल्लम म्हणतात. १९९४मध्ये टांझानियामधल्या सेरेनगेटी नॅशनल पार्कमध्ये एका विषाणूचा संसर्ग होऊन एक हजार सिंहांचा मृत्यू ओढवला होता याची आठवण ते करून देतात.

माळढोकांच्या संवर्धनाचं काय?

सिंहांच्या संवर्धनाप्रमाणेच माळरानांचा राजा असलेल्या माळढोक पक्ष्याचं संवर्धन हाती घेतलं पाहिजे, असंही काही वन्यजीव तज्ज्ञांना वाटतं. भारतात सध्या सुमारे ३००च माळढोक उरले आहेत. कॅप्टिव्ह ब्रीडिंग म्हणजे कृत्रिम प्रजनन केलं तरच त्यांची संख्या वाढण्यात मदत होईल, असं डॉ. रवी चेल्लम यांचं म्हणणं आहे.

शिवाय चित्त्यांसाठी आदर्श वसतिस्थान विकसित करायचं असेल, तर ५ ते १० हजार चौरस किलोमीटर जागेची गरज असते, पण एवढी विस्तीर्ण माळरानं सध्या तरी आपल्याकडे नाहीत, याकडेही वन्यजीव तज्ज्ञांनी लक्ष वेधलं आहे.

थोडक्यात, चित्त्यांच्या निमित्तानं जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यातही आतापर्यंत वाघ या राष्ट्रीय प्राण्यावर केंद्रित झालेली चर्चा आता आशियाई सिंह, चित्ते, माळढोक आणि माळरानांच्या अधिवासाकडे वळली आहे. पण हेही तितकंच खरं की, हे चित्ते स्थिरावले तर इथल्या विस्तीर्ण माळरांनाची शान पुन्हा एकदा दिसू लागेल, अशी आशाही वन्यजीव तज्ज्ञांना आहे.

भारताने याआधी काझिरंगा नॅशनल पार्कमध्ये एकशिंगी गेंड्यांचं संवर्धन, व्याघ्र प्रकल्प यांसारख्या मोहिमा यशस्वी करून दाखवल्या आहेत. आता इतिहासजमा झालेला चित्ताही पुन्हा दौडू लागेल, अशी खात्री या प्रकल्पामध्ये सहभागी झालेल्या तज्ज्ञांना आहे. त्यामुळे या शाही पाहुण्यांची उत्कंठेनं वाट पाहिली जातेय. 

..................................................................................................................................................................

लेखिका आरती कुलकर्णी मुक्त पत्रकार आहेत.

artikulkarni262020@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

Post Comment

Abhijeet Athalye

Thu , 11 August 2022

पहिल्या टप्प्यात किती चित्ते आणले जाणार आहेत ?


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......