अजूनकाही
मराठीत इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, रशियन आणि इतर जागतिक (आणि भारतीयही) भाषांतील लेखकांचं लेखन अनुवादित होत असतं, पण इंग्रजीच्या तुलनेत इतर भाषांचं प्रमाण कमी आहे. त्यातही तत्त्वज्ञान, साहित्याचा शास्त्रीय अभ्यास या विषयांवरील लेखन तुरळक प्रमाणातच मराठीत वाचायला मिळतं. जगभर प्रसिद्ध असणाऱ्या कथा, कादंबरी आणि ‘मोटिव्हेशनल’ पुस्तकांचा अनुवाद पटकन होतो, पण वैचारिक पुस्तकांचा अनुवाद करण्यासाठी फारसं कोणी धजावत नाही. ही उणीव लक्षात घेऊन प्राध्यापक डॉ. आनंद कुलकर्णी यांचं १९७०च्या दशकातील फ्रान्समधील एक महत्त्वाचे विचारवंत रोलां बार्थ यांच्याविषयीचं ‘रोलां बार्थ : लेखन, चिन्हमीमांसा आणि संहिता’ हे नुकतंच प्रकाशित झालं आहे. हे पुस्तक मराठी सहित्यात मोलाची भर घालणारं ठरेल.
या पुस्तकात एकूण पाच प्रकरणं आहेत. पहिल्यात बार्थ यांच्या लेखन व जीवनाची माहिती आहे. सोबतच आज बार्थ यांच्या विचारांची आवश्यकता का आहे, याचं सखोल स्पष्टीकरणही. आपल्या मराठीत लेखनापेक्षा लेखक म्हणून मिरवणारेच ‘लेखकराव’ जास्त आहेत. संहितेपेक्षा बाह्य व अनुषंगिक घटकाला महत्त्व देऊन लेखन करणाऱ्या आणि त्यांचीच पुस्तकं छापणाऱ्या प्रकाशकांची गर्दी आहे. त्यामुळे तशाच प्रकारचा वाचकवर्ग तयार होत आहे. बार्थ वाचल्यानंतर सखोल वाचन व चिंतन करणाऱ्यांना साहित्यनिर्मिती संदर्भात अनेक संदर्भ लक्षात येतील.
प्रकरण दोनमध्ये बार्थ यांचा अल्प परिचय दिला आहे. यात त्यांची लेखक आणि विचारवंत म्हणून कशा प्रकारे घडण झाली त्या काळाचं वर्णन आहे. या दरम्यान त्यांनी चिन्हमीमांसेशी संबधित विचार पुढे आणले. तसंच वैयक्तिक आयुष्यातील संघर्षातून ते प्रयत्नवादी असल्याचं अधोरेखित होतं. त्यांच्या वडिलांचा नौदलाच्या लढाईत मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा सांभाळ आईने केला. त्यांच्यावर दोन वेळा क्षय रोगाचा आघात झाला, पण हार न मानता ते लिहीत राहिले. त्यांच्या आयुष्यातील चार टप्पे अधोरेखित केले आहेत. त्यातल्या चौथ्या टप्प्यात बार्थ वाचक म्हणून त्यांच्याच सहित्याकडे तटस्थपणे पाहतात आणि त्या लिखाणातून स्वत:ला वजा करतात. त्यामुळेच बार्थ वाचकांवर जास्त भिस्त ठेवून आहेत. कारण वाचक संहितेचे अर्थ त्यांच्या अनुभवातून आलेल्या ज्ञानाच्या आधारे लावत असतात. बार्थ यांचं खाजगी आयुष्य हे खूप संकटांनी भरलेलं आहे. १९८०मध्ये त्यांचा रस्त्यावर एका लाँड्री व्हॅनने उडवल्यामुळे जखमी अवस्थेतच दुर्दैवी मृत्यू झाला.
प्रकरण तीनमध्ये बार्थ यांची विचारसूत्रं सांगितली आहेत. त्यांनी आयुष्यभर फ्रेंच साहित्य आणि संस्कृतीची भेदक चिकित्सा केली. ते एका बाजूने नवतेचा, बंडखोरीचा पुरस्कार करणारे आहेत, तर दुसऱ्या बाजूने फ्रेंच साहित्य-परंपरेतील अभिजात म्हणवल्या गेलेल्या बाल्झाक, प्रूस्त अशा लेखकांचे चाहते आहेत. त्यांच्यावर त्यांनी लेखनही केलं आहे. बार्थ यांच्या विचारांमध्ये असे अनेक अंतर्विरोध दिसतात. त्यामुळे त्यांच्याविषयी एकच एक ठोकळेबाज मत बनवता येत नाही, असं लेखकाने नमूद केलं आहे.
याच प्रकरणात लेखक पुढे बार्थ यांचे लेखनविषयक विचार मांडताना म्हणतात की, बार्थ हे मुळात लेखक आहेत आणि लेखनाद्वारेच त्यांनी त्यांच्या बंडखोर विचारांना वाट करून दिली आहे. बार्थ म्हणतात, भाषा, शैली, चिन्हमीमांसा, समाज, संस्कृती, राजकारण या विषयीचे सर्व विचार लेखनापासून सुरू होऊन शेवटी लेखनापाशीच येऊन थांबतात. बार्थ यांच्यासाठी लेखन हे व्यक्त होण्याचं माध्यम तर आहेच, शिवाय हेच लेखन विरोध करण्याचं हत्यारही आहे.
बार्थ यांच्यावर फ्रेंच तत्त्वज्ञ सार्त्रचा प्रभाव होता, पण तो अगदी सुरुवातीच्या काळातच जाणवतो. बार्थनी सात्रर् यांच्या काही मतांची पुनर्मांडणी केली आहे. त्यातूनच त्यांची एक स्वतंत्र शैली बनत गेली. लेखक व लेखन या विषयी सार्त्र यांनी दोन महत्त्वाची तत्त्वं - निवड आणि बांधिलकी - मांडली आहेत. यात ते असं म्हणतात की, लेखकानं लिखाणासाठी कोणता विषय निवडला आहे, यावरूनच ठरतं की, तो समाजाला काय संदेश देणार आहे. त्याचबरोबर लेखकाकडे बांधीलकी असली पाहिजे, म्हणजे लेखकाची बांधीलकी त्याच्या वाचकांशी होणाऱ्या संवादप्रक्रियेतून तयार व्हायला पाहिजे. म्हणजे लेखकाला वाचकांना एखादा संदेश देता यायला हवा, जगाविषयी वाचकांचं काहीएक मत तयार व्हायला पाहिजे. मनुष्य असणं म्हणजे नेमकं काय हे सांगता यायला हवं. म्हणजे लेखनात फक्त रचना किंवा आकृतिबंध असून चालणार नाही, तर त्यात दमदार आशय असला पाहिजे. बांधीलकी न मानणाऱ्या लेखकांचा जास्त भर लेखनाच्या रचना तंत्रावर, अभिव्यक्तीच्या पद्धतीत बदल करण्यावर असतो. असे लेखक समाजाला वास्तवापासून दूर नेतात आणि वाचकांना स्वातंत्र्याची जाणीव करून देण्यात अपयशी ठरतात.
बार्थ सार्त्रच्या पुढे जाऊन म्हणतात की, लेखन म्हणजे निव्वळ आशयाचं प्रकटीकरण नव्हे किंवा वाचकांना संदेश देणं नव्हे, तर लेखन म्हणजे लेखनाचा आशय किंवा संदेश यांच्या पलीकडे जाऊन वाचकांशी केलेला संवाद होय. वाचकांशी संवाद संहितेच्या रचनेतून झाला पाहिजे. सात्रर् अस्तित्ववादी विचारांना अनुसरून लेखनाचे स्वरूप मांडतात, तर बार्थ त्यात मार्क्सवादी विचारांची भर घालतात आणि अस्तित्ववाद व मार्क्सवादात दुवा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. पुढे जाऊन बार्थ म्हणतात की, रचना तंत्र किंवा अभिव्यक्तिवादी लेखनाला ‘साहित्याचे चिन्ह’ मानलं पाहिजे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
बार्थ भाषेबाबत म्हणतात की, भाषा नेहमीच अस्तिवात असते. ती निर्माण करता येत नाही किंवा तिची निवडही करता येत नाही. ती नैसर्गिकपणे आपल्याला मिळालेली असते. उदा. मराठी भाषा. आपण या भाषेतच जन्मलो. त्यामुळे नैसर्गिकपणे ती आपली भाषा झाली आहे. ती आपल्या अगोदरपासून अस्तित्वात आहे. पुढे ते असे म्हणतात, भाषा मुळात किंवा अंगभूतपणे वचर्स्ववादी आणि हिंसक असते. तिच्यातून सत्ताधारी वर्गाला अपेक्षित असा दमनकारी अर्थच व्यक्त होत असतो. भाषा प्रस्थापित संस्कृती किंवा समाज यांच्या विचारांची वाहक असते. त्यामुळे प्रस्थापित संस्कृती, समाज यांना विरोध करणारे, आव्हान देणारे विचार सत्ताधीशांना नको असतात. अशा वेळी ते भाषेचा वापर करून विरोधी विचारातील वेगळेपण नष्ट करतात आणि अशा विचारांना समाजमान्य परंपरेचा भाग बनवतात. मग विरोधच उरत नाही. बार्थ यांनी भांडवलशाही व्यवस्थेतील भाषेचा, डाव्या विचारसरणीतील भाषेचा विरोध करतात, आणि शेवटी कोणत्याही विचारसरणीतील भाषा उन्मादकारी व स्वामित्व गाजवणारीच असते, या निष्कर्षापर्यंत बार्थ येतात.
बार्थ लेखनाचा विचार करताना ‘डॉक्सा’ आणि ‘पॅराडॉक्सा’ या संज्ञांचा वापर करतात. त्यांच्या ‘मायथॉलीजिज’, ‘रोलां बार्थ बाय रोलां बार्थ’ आणि ‘द प्लेजर ऑफ द देक्स्ट’ या पुस्तकांत लेखनाविषयीच्या अशा प्रकारच्या संज्ञा विस्तारानं मांडल्या आहेत.
याच प्रकरणात पुढे बार्थ यांची चिन्हमीमांसा मांडली आहे. त्यांची चिन्हमीमांसा म्हणजे व्यवस्थेतील चिन्ह काही तर अर्थ व्यक्त करत असतात, ते आपण समजून घेतले पाहिजेत. त्यात ते म्हणतात की, संकेत, चिन्ह आणि प्रतीकं हे तीन घटक महत्त्वाचे आहेत. या तीन घटकातूनच संवाद होत असतो. त्यालाच मिथकांचे स्वरूप येते आणि त्यात प्रस्थापित संस्कृतीला अनुकूल असे अर्थ लोकांच्या मनात रुजतात.
बार्थ संहितेविषयी बोलताना म्हणतात, संहिता एकमेव, स्थिर आणि निश्वित अर्थ वाचकांना देत नाही. तिचे अनेक अर्थ असतात आणि ते संदर्भानुसार बदलतात. तसेच संहिता परिपूर्ण नसते आणि बंदिस्तही नसते. ती सतत स्वत:चं स्वरूप बदलत राहते. कारण ती अनेक संहितांची मिळून तयार झालेली असते. संहिता हे साहित्य आणि परंपरा यांपासून मुक्त लेखन आहे. ती कशाचीही गुलाम नाही. त्यामुळे ती वाचकांच्या आकलनशक्तीला आणि विचारांना आव्हान देत असते. संहिता अर्थ सांगत नाही, पण वाचकांना वेगवेगळ्या अर्थाच्या शक्यता दाखवत असते. संहितेच्या बाबतीत वाचक हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. कारण तो नुसताच वाचतो असं नाही, तर तीच संहिता नव्यानं लिहितो. म्हणजे वाचक त्याचे अर्थ, संदर्भ संहितेशी जोडून बघतो. त्यामुळे संहिता पूर्वीसारखी राहत नाही. ती वाचकांच्या वाचनप्रक्रियेत बदलते. असं प्रत्येक वाचकाच्या बाबतीत घडते आणि प्रत्येक वेळी संहिता वेगळी होत राहते. या अर्थाने संहिता बदलते आणि वाचक तिला बदलवत राहतो. हे आपण कोणत्याही साहित्यकृतीला लावून बघितले तर संहितेचा संदर्भ अजून स्पष्टपणे लक्षात येतो.
बार्थ ‘द डेथ ऑफ द ऑथर’ या निबंधात म्हणतात, साहित्यकृती लिहून पूर्ण झाली की, लेखकाचा अंत होत असतो. म्हणजे त्या लेखकाचं काम संपलेलं असतं. त्यानंतर जो अर्थ आणि आशय संहितेतून समजावून घ्यायचा असतो, तो वाचकांनी. १९६० पूर्वी साहित्यापेक्षा त्याच्या लेखकाचाच जास्त पुरस्कार केला जात असे. नेमकं हेच लक्षात घेऊन बार्थनी लिहिलं आहे की, संहिता महत्त्वाची आहे. उपलब्ध भाषिक साधनांचा वापर करून लेखक लेखनाची जुळवाजुळव करत असतो. थोडक्यात, लिहिणं म्हणजे काहीतरी नवीन निर्माण करणं आणि लेखकराव म्हणून मिरवणं, ही संकल्पना बार्थ मोडीत काढतात. त्यांनी साहित्य व्यवहारात असलेलं लेखकाचं वर्चस्व संपवून टाकलं आणि वाचकांना त्यांचा वाचण्याचा आनंद मिळवून दिला. बार्थनी सांस्कृतिक घटकांचा अभ्यास करण्यासाठी शिस्तबद्ध आणि शास्त्रशुद्ध दृष्टीकोनाचा पुरस्कार केला आहे. त्याचबरोबर साहित्याच्या शास्त्राची पायाभरणी केली. त्यामुळे त्या काळात त्यांना अनेक विरोधक तयार झाले. पण शेवटी बार्थ बंडखोर आणि धारदार लिखाण करणाऱ्या लेखकांचा खंदा समर्थक म्हणून उभा राहिले होते.
चौथ्या प्रकरणात आपण बार्थ यांच्याकडून काय शिकणार, याची मांडणी आहे. बार्थ म्हणतात, जुन्या पारंपरिक विचारांच्या बेड्यात न अडकता चिकित्सक विचार करणं महत्त्वाचं आहे. बार्थ कधीही परंपरेच्या ओझ्याखाली दडपला गेले नाही आणि कोणत्याही विचाराचे गुलाम झाले नाहीत. पारंपरिक जुनाट विचारांना विरोध करताना ते कधीही नव्या विचाराच्या लाटेत वाहत गेले नाहीत. ते सतत शोध घेत राहिले आणि वाटेत आलेल्या प्रत्येक विचाराचं परीक्षण करत राहिले. प्रत्येक गोष्टीचा सम्यक विचार करायचा, ही गोष्ट आपण त्यांच्याकडून शिकली पाहिजे.
बार्थनी आयुष्यभर भांडवलवादी उजव्या विचारसरणीचा आणि खोट्या आदर्शवादाचा विरोध केला, पण त्या सोबतच डाव्या विचारसरणीतील दोषही त्यांनी स्पष्टपणे मांडले आहे. यातून आपल्या असं लक्षात येतं की, त्यांनी स्वत:ची वाट स्वत: शोधली आहे. नावीन्य आणि कल्पकता याही गोष्टी आपण त्यांच्याकडून शिकल्या पाहिजेत. बार्थकडून संस्कृती, साहित्य, भाषा, संहिता, लेखन, वाचन, संप्रेषण या बाबतीत आपल्याला शिकण्यासारखं खूप आहे. कारण या सगळ्या बाबतीत ते त्यांच्या काळाच्या कितीतरी पुढे राहिलेले विचारवंत होते. चौकटीत बसेल आणि साचून राहिल असा विचार त्यांनी केला नाही. त्यांचा विचार प्रवाही आणि सर्वस्पर्शी आहे.
पाचव्या प्रकरणात बार्थचा जीवनक्रम दिला आहे. त्यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतची माहिती आहे. शेवटी संदर्भसूची दिली आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर बार्थ समजून घेण्यास मदत होईल. संपूर्ण बार्थ समजण्यासाठी त्याची मूळ पुस्तकं वाचावी लागतील आणि ती वाचण्याची गोडी हे पुस्तक निर्माण करतं. हे पुस्तक एक वेगळ्या धाटणीचं तर आहेच, पण साहित्य मूल्ये आणि मानवी जगण्याची खोली वाढवणारा विचार देणारंही आहे. जगामध्ये अस्तित्वात असणाऱ्या विचारसरणीच्या पलीकडे जाऊनही बघता येतं, हे या पुस्तकातून अधोरेखित होतं.
‘रोलां बार्थ : लेखन, चिन्हमीमांसा आणि संहिता’ - डॉ. आनंद कुलकर्णी
अपना मुक्काम पैदा कर प्रकाशन, औरंगाबाद
मूल्ये - २०० रुपये
.................................................................................................................................................................
लेखक ज्ञानेश्वर जाधवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यम व संज्ञापन अभ्यास विभागात पीएचडी स्कॉलर आहेत.
j.dnyan@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment