रविवारी, ७ ऑगस्ट रोजी ‘फ्रेंडशिप डे’ साजरा झाला. हल्ली कुठलाही डे असला की, सोशल मीडियावर शुभेच्छांचा महापूर येतो. त्यातून सोपस्कारही पार पडतो आणि सोयही होते. कित्येकांच्या तर मैत्र्याही ‘व्हर्च्युअल’च असतात. ‘आपण फेसबुक फ्रेंड आहोत’ वगैरे लोक कधी तरी भेटतात तेव्हा सांगतात, तेव्हा आपला चेहरा (किंवा आपण ज्याला सांगतो त्याचा चेहरा) पाहण्यासारखा असतो. तर ते एक असो. मैत्री ही संकल्पना नेमकी काय आहे, कशी असते, याविषयीचा हा एक वेगळा लेख.... कालच्या मैत्री दिनानिमित्त...
हा लेख पहिल्यांदा ‘पुरुष स्पंदनं - माणूसपणाच्या वाटेवरची’ या दिवाळी वार्षिकाच्या २००९ सालच्या ‘मैत्री विशेषांका’त प्रकाशित झाला होता. त्याची ही थोडी सुधारित आवृत्ती...
.................................................................................................................................................................
‘मैत्री’ला आयुष्यात खूप महत्त्वाचे स्थान असून ते पूर्णपणे चिरेबंदी, चिरस्थायी पण ऐच्छिक सामाजिक नाते आहे. ‘मैत्री’ ही समाजशास्त्रीय दृष्टीने एक प्राचीन सामाजिक संस्था आहे, तर मानसशास्त्रीयदृष्ट्या ‘मैत्री’ हे भावनिक अन्न आहे.
येथे ‘सामाजिक असणे’ याचा अर्थ वर्णवंशजात आणि लिंगभेद आणि आर्थिक, राजकीय, शैक्षणिक इत्यादी कृत्रिम भेदभावांच्या पल्याड जाणे. या अर्थाने संस्कृती, सभ्यता, धर्म, तत्त्वज्ञान इत्यादी मानवी संस्कृतीच्या विकासात्मक घटकांच्या अतीत जाऊन ‘समग्र मानवजात एक समाज आहे’, हे मानववंशशास्त्रीय सत्य गृहीत मैत्रीचे आकलन करवून घेणे. थोडक्यात, व्यापक अर्थाने सर्व प्रकारच्या कृत्रिम भेदभावाच्या निरपेक्ष असणे, ही मैत्रीची मूलभूत अट असते.
सर्व प्रकारच्या कृत्रिम भेदभावाच्या अतीत जाणे, अशक्यही नाही आणि कठीणही नाही. जसे की, ‘समान शीले व्यसनेषु सख्यम्’ ही म्हण शील (चारित्र्य) किंवा आपत्ती हा कोणाही दोघात मैत्री होण्यातला समान धागा सूचित करते. (मूळ श्लोक : “मृगा मृगे: संगमनुव्रजन्ति गावश्च गोभिस्तुरगास्तुरंग:। मूर्खाश्च मूर्खः सुधियः सुधीभिः समानशीले व्यसनेषु सख्यम्।।” (पंचतंत्र १.३०५) अर्थ : “हरीण हरिणांच्या संगतीने, गायी गायींच्या संगतीने, घोडे घोड्यांच्या संगतीने, मूर्ख मूर्खाच्या संगतीने, बुद्धिमंत बुद्धिमंतांच्या संगतीने एकत्र जमतात. शील किंवा आपत्ती समान असली म्हणजे सख्य जमते.”)
येथे ‘व्यसन’चा अर्थ छंद, आवड इत्यादी असला तरी ज्या छंदामुळे किंवा आवडीमुळे संकटे, आपत्ती येऊ शकते, ती जीवघेणी असू शकते, म्हणून ‘व्यसन = आपत्ती’ असे समीकरण केले जाते. कोणत्याही दोन अनोळखी व्यक्तींमध्ये काही थोडक्या काळात ‘मैत्री’ होण्यामागे कारण त्यांचे चारित्र्य तरी एकसमान असते किंवा किंवा व्यसन तरी समान असते. सख्य म्हटले की कोणत्याही दोन माणसांत काहीएक परस्पराकर्षक समान गुण मानलेच जातात. शील किंवा आपत्ती समान असली की, मित्र मित्रासाठी स्वत:चा जीव देण्यास अथवा दुसऱ्याचा घेण्यास तयार असतो.
येथे मी मैत्रीविषयक तीन भूमिका मांडू इच्छितो -
१) मैत्रीची संकल्पना : मित्र म्हणजे नेमका कोण?
२) मैत्रीची अनिवार्य अट : आत्मप्रेम व मानवजातीचे प्रेम
३) मैत्रीची बाजारपेठ : मैत्री विकत घ्यावयाची असते!
या तीनपैकी तिसरा मुद्दा ‘मैत्रीची बाजारपेठ’ हा मुद्दा मला येथे सविस्तर मांडावयाचा आहे. परिणामी पहिल्या दोन मुद्द्यांचा थोडक्यात परामर्श देत आहे. ते वस्तुतः अतिशय मौलिक व स्वतंत्र विषय आहेत, त्यांचा शोध हा एक उत्तम बौद्धिक प्रवास आहे आणि त्यावर खूप काही लिहिणे शक्य आहे (आणि मी ते लिहिलेही आहे. म्हणजेच माझा काही प्रवास झाला आहे).
समाजाची रचना आणि मैत्रीची रचना यांच्यात ‘एकास एक संबंध’ (one to one correspondence) आहे का? असा प्रश्न यथार्थपणे उपस्थित करता येतो. या प्रश्नाचे उत्तर शोधणे हाही एक उत्तम बौद्धिक प्रवास आहे. तो स्वतंत्र वेगळ्या लेखाचा विषय आहे. तूर्तास येथे 'मैत्री विकत घेता येते का?' याचा विचार मांडणार आहे.
त्यासाठी प्रथम ‘मैत्री’ची तत्त्वज्ञानात्मक संकल्पना थोडक्यात स्पष्ट करतो.
‘मैत्री’ची तत्त्वज्ञानात्मक संकल्पना
धर्म, कुटुंब किंवा अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था इत्यादीपेक्षा मैत्रीची तुलना पैसा, भाषा, प्रदेश, देश अथवा प्रेम यांच्याशी केली जाते. तिची व्याख्याच करण्याची वेळ आली, तर ती कोणत्या तरी भौतिक वस्तू, गरज, उपयुक्तता इत्यादीशी जोडलेली आढळते. उदाहरणार्थ ‘जो गरजेला धावतो, तोच मित्र’ इ.इ. (पण इथे गरज म्हणजे नेमकी कोणती? असा प्रश्न उपस्थित करता येईल.)
मैत्री नेमकी काय आहे? रूपकाच्या अलंकारिक भाषेत स्पष्ट करायचे तर “मैत्री हा जणू एक प्रकारचा पांढरा घोड़ा आहे”. अतिशय चपळ, अवखळ अबलख पण आनंददायक आणि आवश्यक अशी ती नैतिक गोष्ट आहे. मैत्री म्हणजे या पृथ्वीवरचे अमृत (The Nectar) आहे आणि मैत्री म्हणजे ज्याची चव केवळ प्राचीन देवदेवतांनाचं मिळू शकते, असे उत्तम दर्जाचे अन्न (The Ambrosia) आहे.
पण रूपके व अलंकार काढून टाकले तर मैत्रीचे अनलंकारिक अनावृत्त ‘दर्शन’ कोणते? तर मैत्री ही ज्ञान, प्रेम, संगीत, कला, साहित्य, सौंदर्य, ईश्वर, धर्म यासारखी एक संकल्पना (Concept) आहे.
‘मैत्री’ ही सापेक्ष संज्ञा आहे. मित्र आणि मैत्री या संज्ञांमधून व्यक्तिची वैशिष्ट्ये स्पष्ट होतातच, पण दोन किंवा अधिक व्यक्तींमधील अतिविशिष्ट गहिरे, आंतरिक नाते स्पष्ट होत असते. आत्मीयता, सार्वभौमता, परस्पर सहानुभाव मित्रनिवडीतील उत्कटता ही मैत्रीची काही निवडक ठळक वैशिष्ट्ये आहेत. पण त्याहीपेक्षा जास्त कोणत्याही ‘अंतस्थ स्वार्थी हेतूचा पूर्णपणे अभाव’ हे ‘मैत्री’चे ‘आत्मरूप’ असते. मैत्री ही मानवी जीवनाचा जणू काही गाभा असते. त्यामुळेच ‘मित्र नसणे ही लज्जास्पद गोष्ट समजली जाते’.
पण प्रत्यक्ष व्यवहारात मैत्री हे मूल्य फारसे जपले जात नाही. भावंडे एकमेकांवर कितीही प्रेम करणारी असली तरी ती ‘एकमेकांचे मित्र नसतात’, ती ‘भावंडे’च राहतात. त्यामुळे भाऊबंदकीला अवकाश मिळतो. ‘भाऊबंदकी’ अशी संकल्पना असते, पण ‘मित्रबंदकी’ असा शब्दप्रयोग कधी केला जात नाही; ती मानलीच समजा तरी ती निरर्थक आशयहीन संकल्पना (empty concept) बनते. अर्थात ‘बहीणबंदकी’ असाही शब्दप्रयोग अस्तित्वात नाही. तिला पुरुषी जगाने विकसित होऊच दिलेले नाही. पण दोन बहिणी ‘मैत्रिणी’ असू शकतात. भाऊ मात्र मित्र होणे, ही अशक्यच घटना असते. तसेच बाप व मुलगा किंवा मुलगी व आईदेखील मित्र असू शकत नाहीत. कारण ते नातेच मूलतः विषमतेवर आधारित असते. ते नाते सहजसिद्ध नैसर्गिक शारीरिक, मानसिक, आर्थिक व सामाजिक विषमता असते. आई-वडील ‘मित्रासारखे’ असतात, पण मित्र नसतात, होऊ शकत नाहीत, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
ईश्वर अथवा संन्यासी मित्र?
आता, ईश्वराला मित्राची गरज असते का? ईश्वर कुणाचा मित्र होवू शकतो का? प्रेषित, संत कुणाचा मित्र होवू शकतो का? संन्याशाला मित्र असावेत का? असे प्रश्न उपस्थित केल्यास त्याची उत्तरे काय मिळू शकतील? की हे प्रश्नच चुकीचे आहेत?
ईश्वराला मित्राची गरज असते का? ईश्वर कुणाचा मित्र होवू शकतो का? तर नाही! ईश्वराशी मैत्री करता येत नसते (ईश्वर हा स्त्री की पुरुष, असा वाद येथे उपस्थित न करता ती सर्वोच्च शक्ती या अर्थाने ही संज्ञा वापरु) ईश्वर स्वकल्याण करुन घेण्यास समर्थ असतो. त्याचे कल्याण इतर कुणी करु शकत नाही. बाह्य मदतीची त्याला गरज नसते. तो सर्वज्ञ, सर्वशक्तीमान, सम्राट, चालक, निर्माता, सर्वगुणसंपन्न असतो. त्याच्यात काहीही कमी नसते. त्याला देण्यासारखे काहीच माणसाकडे कधीही नसते. माणूस जर ईश्वरात काही कमी आहे, असे समजून ती त्रुटी भरून काढू पाहू गेला तर ईश्वर सर्वगुणसंपन्न उरणारच नाही! त्याचे ईश्वरत्व ढळेल.
दुसरे म्हणजे मैत्रीतील सामाजिक आंतरक्रियेला ईश्वर कधीही प्रतिसाद देवू शकत नाही. तो त्या पलिकडे असतो. याचाच अर्थ असा की ईश्वराशी माणसाची मैत्री होवू शकत नाही. ईश्वरही कुणाचा मित्र होवू शकत नाही. ‘विठोबा माझा बॉयफ्रेंड’ किंवा ‘रुक्मिणी माय गर्लफ्रेंड’ असे म्हणता येईलही. पण ते काही खरे नाही. ईश्वर व माणूस यांचे नाते केवळ आणि केवळ ‘ईश्वर आणि भक्त’ असेच असू शकते. देवदूत असू शकतो, पण ‘देव-मित्र’ नसतोच कधी. याही पोकळ संकल्पना (empty concepts) आहेत.
ईश्वर कुणाचा मित्र होवू शकतो का? हाच प्रश्न त्याचे रूप बदलून किंवा विधेय बदलून एखादा प्रेषित-संत-संन्यासी आपला मित्र असू शकतो का? आपण माणूस त्यांचे मित्र होऊ शकतो का? किंवा प्रश्न व्यापक केला तर प्रेषित-संत-संन्याशाला मित्र असावेत का? हा प्रश्न उपस्थित होईल.
प्रेषित-संत-संन्यासी हा नैतिकदृष्ट्या चांगला असतो हे गृहीत धरता "नैतिकदृष्टया जो चांगला आहे त्याने एकांतात राहिले तरी चालेल" असे म्हणणे चमत्कारीक ठरते. त्याचे मुख्य कारण असे की, एकटा किंवा एकाकी, राहण्याच्या अटीवर माणूस चांगला राहू शकत नाही किंवा वस्तु संग्रह करू शकत नाही, कारण माणूस मुळात एक राजकीय प्राणी आहे आणि इतरांबरोबर राहणे हा त्याचा स्वभाव आहे. त्याचा चांगुलपणा इतरांच्या सहवासाशिवाय सिद्ध होवू शकत नाही. जंगलात राहणारा नैतिकही नसतो, अनैतिकही नसतो आणि न-नैतिकही नसतो.
माणूस सामाजिक प्राणी आहे, याचा अर्थच असा की माणसाचे पालनपोषण जन्मक्षणापासून इतरच कोणीतरी करत असते. तो त्याच्या अस्तित्वासाठी परावलंबी आहे. त्यासाठी त्याला इतरांची गुरुज असतेच असते. त्याला नातेवाईकांप्रमाणे मित्र हवे असतात. मित्रांकडे तो नातेवाईक म्हणून पाहू शकत नसतो, तर तो मित्राकडे ‘मित्र’ म्हणूनच पाहत असतो. माणूस जर स्वार्थ अथवा राजकारण म्हणून त्याच्या मित्राकडे पाहू लागला, तर मैत्रीचे मूल्य कमी, दुय्यम होते; अशी मैत्री उपयुक्ततावादी मैत्री होते.
ईश्वर-भक्त, संन्यासी, प्रेषित, देवदूत अथवा मालक-नोकर, नोकरीधंदा इत्यादी व्यावसायिक ठिकाणच्या सहकारी लोकांमध्येही, ती नाती सामाजिक स्वरूपाची असली तरी त्या नात्यांमध्ये मैत्री विकसित होत नाही. ईश्वर, देवदूत हे काही सामाजिक जीव नाहीत. त्यांचा समाजही नसतो आणि ते समाजात राहतही नसतात. प्रेषित-संत- संन्यासी सामाजिक जीव आहेत, पण त्यांचा धार्मिक व आध्यात्मिक दर्जा वेगळा असतो. मैत्रीचा नसतो.
ही सारीच नाती वय, लिंगभेद आणि वर्ग यांच्या अतीत जाण्याची मैत्रीची मूलभूत मागणी पूर्ण करण्यास ही नाती तयार नसतात. मैत्रीखेरीजची ही सर्व नाती कोणत्या ना कोणत्या विषमतेवरच बांधली जातात. पण मैत्री ही गोष्ट बांधीलकी, समता आणि उत्स्फूतर्ता या तीन मुख्य घटकांनी तयार होणाऱ्या व स्वेच्छेने जोडल्या जाणाऱ्या नात्याची गुंफण असते. तिचे व्यक्ति व समाज यांच्यावर होणारे परिणाम गुंतागुंतीचे असतात.
तथापि वास्तव असे आहे की प्रत्यक्ष जीवन व्यवहारात मैत्री हे मूल्य (Value) म्हणून फारसे जपले जात नाही. ती जेव्हा व्यवहारात येते तेव्हा, मैत्रीचे स्वरूपच असे बनते की ती आपल्या सामाजिकीकरणात अतिशय मोलाची भूमिका बजावते. आपला श्वासोच्छवास तितका अकृत्रिम, नैसर्गिक, सहज व्हावा तितकीच ही संकल्पना आपल्या व्यक्तित्वात जीवन व्यवहारात मुरलेली आहे. मात्र राष्ट्रप्रेम, धर्मप्रेम ते प्रणयरम्य प्रेम, राजकारण, समाजकारण, महागाई, बेकारी, हवामान, पाककृती, घडयाळ दुरुस्ती, काजेबटन, फॉलपिको, झाडू, पायपुसणीचा सुद्धा जेवढा विचार करतो तितकाही मैत्रीचा विचार करत नाही!
जीवनाच्या महत्त्वाच्या अंगाकडे आपण इतके कमी लक्ष देतो, ही शोकान्तिक गोष्ट आहे.
गेल्या काही वर्षांत जागतिकीकरणामुळे या शोकांतिकेच्या तणावात भर पडली आहे. खुले आर्थिक धोरणाने समाजात काही प्रमाणात समृद्धी आणण्यात यशस्वी ठरले असले तरी नातेसंबंधात खंकपणाही आला, हे कटू सत्य आहे. जागतिकीकरणाच्या विकराल लाटेच्या विळख्यात 'मैत्री' ही संकल्पनासुद्धा सापडून ती उपयुक्ततावादी, बाजारू, दिखावू बनावटीची, झाली आहे. ती पोकळ, कोणतीही जबाबदारी न घेणारे नाते बनले आहे. नव्या नात्याची निर्मिती क्षमताही नसलेले ते एक विचित्र ‘क्लीब’ नाते बनले आहे. 'फ्रेन्डशिप डे’, ‘व्हॅलेंटाईन डे', साजरे होण्यामागे मैत्रीचे सेतू किती बांधले जातात आणि धंदा किती जोखला जातो', हा गंभीर संशोधनाचा विषय आहे. त्यातच बजरंग दल, शिवसेना इत्यादी भारतीय संस्कृतीच्या स्वयंघोषित संघटनांचा ह्या 'डेज्'ना होणारा विरोध ही नवी जास्तच चिंताजनक गोष्ट ठरते .
भारतीय समाजात 'मैत्री' ही संकल्पनाच फारशी मान्य नाही. स्त्री–पुरुषांचा संबंध केवळ वर्ण, जाती आणि रक्ताचाच संबंध असतो, असे समजले जाते किंवा मग तिला थेट गूढतावादी, उच्च आध्यात्मिक रूप दिले जाऊन ती इतकी भव्य बनवली जाते की, मानवी आकलनाच्या, दैनंदिन व्यवहाराच्या, वास्तवात आणण्याच्या पलिकडेच जाते! उदाहरणार्थ दुर्योधन-कर्णाची, कृष्ण-अर्जुनाची, कृष्ण-सुदाम्याची मैत्री.
राम आणि कृष्ण यांच्यातील मैत्रीबाबत इतका चमत्कारिक विरोधाभास आहे की 'आदर्शा'च्या वेदीवर मैत्रीचा बळी देण्यात आला आहे, याकडे दुर्लक्षच झाले आहे. कृष्णाला मित्र होते, ते अनेक होते, सख्या होत्या, प्रेयसी होत्या, अनेक होत्या. पण रामाचे काय? रामाला जीवलग भाऊ होते, अनुयायी होते, आज्ञाधारक महासेना होती; आणि भक्त? भक्त तर रामाच्या हयातीत होतेच होते, पण त्याच्या मृत्युनंतरही रामाला भक्तांची मांदियाळी लाभत राहिली. एकविसाव्या शतकात तर भक्तांचा सप्तसागर उधाणला आहे. राजकारणात काही 'राम' नाही, असे पूर्वी घडले असले तरी आता मात्र राजकारणात खऱ्या अर्थाने 'राम' आला आहे. मंदिरात बालाजीकरण झालेला सोनेरी राम निर्जीव पुतळा होऊन बसला आहे, तर भारतीय राजकारणात केवळ 'राम नाम सत्य है' झाले आहे. राम देवच झाला जणू. पण प्रचंड लोकप्रियता लाभूनही 'रामाला एकही मित्र नव्हता!'. सीता तर थेट आज्ञाधारक अर्धांगी होती. ती रामाची मित्र नव्हती.
महाभारतातील 'मित्र' संकल्पना आवाक्याबाहेर गेली तर रामायणात 'मैत्री'चा पत्ताच नाही! 'सखा' हा पर्यायी शब्दही आकलनाबाहेरच राहिला किंवा मग भारतीय कथासागरामधील मैत्रीच्या हजारो कथासुद्धा 'मैत्री' संकल्पनेची केवळ उपयुक्ततावादी बाजूच पुढे आणणाऱ्या ठरल्या आहेत.
मित्राची गरज
मित्राची गरज का असते? आपल्याला मैत्रीची गरज का आहे? कोणाशी तरी मैत्री का करावीशी वाटते ? कारण मैत्री हा एक सामाजिक संबंध आहे. पण आपण दैनुदिन सामाजिक व्यवहारात आणि लोकसंबंधात स्वतःला झोकून देऊन देऊन उतरू शकत नाही. आपल्या अनेक इच्छा, भावना, निर्णय इत्यादी गोष्टी आपण बऱ्याच वेळेस रोखून धरतो. परिस्थिती परवानगी देईल, तेव्हा, तेवढेच आणि तेही समोरच्या व्यक्तिची त्याबाबतची पात्रता तपासून त्या इच्छा, भावना, निर्णय इत्यादी गोष्टी बाहेर सोडतो. आपली दुर्बलता, कमीपणा आपण लपवितो. एवढेच नव्हे तर, आपली मतेही लपवितो. कारण इतरांवर आपला विश्वास नसतो. पण मित्रावर मात्र संपूर्ण विश्वास असतो. त्याच्यासमोर आपण पूर्ण-संपूर्ण व्यक्त होतो-प्रकट होतो.
मित्र म्हणजे नेमका कोण?
मित्र मिळवण्यासाठी, मला काय करावे लागेल? म्हणजे 'आपण' इतरांचे मित्र व्हावे, असे जर मला वाटत असेल तर मला, काय काय करावे लागेल. त्याच वेळी ज्यांना माझे मित्र व्हावे, असे वाटते; त्या मित्रांनी काय काय केले पाहिजे? हे गंभीर प्रश्न आहेत. याचाच अर्थ मित्र असणे म्हणजे नेमके काय व कसे असणे? हा प्रश्न सोडवण्याचा एक मार्ग सुचवू इच्छितो. आपण मैत्रीची व्याख्या करण्याचा प्रयत्न करू, ती अशी -
एखाद्याबद्दलचे आपल्या मनातील 'मैत्र भावनेचे वर्णन' आपणांस त्याच्या भल्यासाठी आणि त्याच्यासाठी जे इष्ट आहे, ते त्याला प्राप्त व्हावे, अशी सदिच्छा (Good Will, not good wish) असे केले पाहिजे. त्यासाठी तुमच्याकडून यथाशक्ती प्रयत्न होतील, अशी तुमची वृत्ती असणे आणि ती त्याच अपेक्षित यथार्थतेने आणि पूर्ण क्षमतेने प्रकट करणे, म्हणजे मित्र असणे'.
याचा नेमका अर्थ काय? सांगतो -
'मित्राच्या भल्यासाठी आणि त्याच्यासाठी जे इष्ट आहे, ते त्याला प्राप्त व्हावे', अशी सदिच्छा आपल्याकडून व्यक्त होणे, याचा अर्थ ती भावना आपण अनुभवणे असते.
बरोबर!? पुढे आता, केवळ आपणच त्या भावना अनुभवणे पुरेसे नव्हे; तर दुसऱ्या व्यक्तीमध्येसुद्धा तुम्ही त्या भावना जागविणे येथे अपेक्षित आहे.
याचा अर्थ असा की दुसरी व्यक्ती, जिला तुम्ही मित्र मानू इच्छित आहात, त्या व्यक्तीमध्येसुद्धा 'तुमच्याविषयी अगदी तंतोतंत तीच भावना जागी झाली पाहिजे आणि ती त्याने त्याच अपेक्षित यथार्थतेने आणि पूर्ण क्षमतेने प्रकट केली पाहिजे!
आता, येथे हे लक्षात घेतले पाहिजे की, ही किमान अपेक्षा आहे, दोन्ही बाजूंनी. कमाल अपेक्षा नाही, कमाल अपेक्षा शब्दांमध्ये मांडणेदेखील कठीण आहे (अशक्य नाही).
ती एकदा मान्य झाली की पुढचे काम सोपे होते.
आता, तुम्ही म्हणू शकता की, 'तुमचा मित्र ही अशी व्यक्ती असते की, तुमच्या इष्ट गोष्टींच्या प्राप्तीच्या तुमला होणाऱ्या तुमच्या आनंदात ती सहभागी असते, आणि त्याच वेळी ती तुमच्या दुःखातही सहभागी असते. म्हणजे तुमच्यासंबंधीच्या सुख-दुःखाच्या सहभागित्वाची त्या व्यक्तीची भावना हीच ती व्यक्ती तुमचा मित्र असण्याची खूण असते.
बरोबर!?
आता आपण मैत्री करतो, ती अखंड राहावी, अशी आपली इच्छा असते. पण तसे होत मात्र नाही. अनेक अडथळे येतात. हे का घडते?
कारण, आपण मैत्रीचे वास्तव स्वरुप नीटपणे कधीही ध्यानात घेत नाही म्हणून!
कसे हे मैत्रीचे स्वरूप? तर, मैत्रीचे स्वरूप मूलतः नैतिक असते, पण ती व्यवहाराच्या जगात व्यावहारिक होते. तिला अर्थशास्त्रीय स्वरूप येते. अर्थशास्त्र अनेकांचा आवडता ‘उद्योग’ असतो. म्हणूनच हे मी थोडं सर्वांना आवडत्या अर्थशास्त्रीय बाजारपेठीय परिभाषेत मांडतो. शक्य आहे, कदाचित त्यामुळे 'मैत्री' अधिक सुस्पष्ट होईल. मैत्रीची अर्थशास्त्रीय बाजारपेठीय परिभाषा म्हणजे काय?
मैत्रीचा बाजारपेठीय अर्थ
...तर असे की आपण ज्या व्यावहारिक जगात जगतो, ते जग विशिष्ट प्रकारच्या समाजव्यवस्थेने, राजकीय व्यवस्थेने ग्रस्त आहे आणि ते अनेक विचारव्यवस्थांमध्ये पांगलेले आहे. या अनेक प्रकारच्या व्यवस्थांनी मिळून या जगाची, म्हणजेच आपल्या जीवनाची रचना घडवली आहे.
मैत्री ही या अनेक व्यवस्थांमध्ये अनुस्यूत असलेल्या अनंत व्यवहारांमधील एक महत्त्वाचा व्यवहार आहे. आणि हा शुद्ध देव-घेवीचा व्यवहार आहे!
मैत्री ही व्यावहारिक वस्तू आहे.
तथापि मैत्रीच्या या व्यावहारिक अंगाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे मैत्रीच्या नात्यात कितीतरी प्रश्न निर्माण होतात. ज्या वेळेस दोन्ही बाजूचे मित्र या अर्थव्यवहाराचे (the practice of meanings) स्वरूप समजावून घेतील, तेव्हा त्यांच्या मैत्रीची इमारतीचा एक पाया मजबूत आणि अतिशय भक्कम होईल.
हे पाहा, सर्व प्रकारचे तत्त्वकारण झाले, मैत्रीचे उदात्त तत्वज्ञान उगाळून झाले की, शेवटी आपण "मित्र ही व्यक्तीसुद्धा भौतिक आपल्या गुरजा भागविणारी व्यक्ती आहे." या निर्णयाकडे येतो आणि साहजिकच तुम्हीसुद्धा त्याच्या गरजा भागवणारे असाल तरच तुम्ही तुमच्या मित्राचे मित्र बनता.
मूल्यांसाठी मूल्य
दोन्ही बाजूंनी हे समीकरण लक्षात घेतले आणि तशी वागणूक ठेवली तर 'मूल्यांसाठी मूल्य' (Value for Value Basis) हा नवाच नातेसंबंध अस्तित्वात येतो. 'मूल्यांसाठी मूल्य' हे असे नाते असते की, खऱ्या सचोटीचे व टिकाऊ असते.मूल्य म्हणजे मी ज्याला मूल्य मानतो, त्याला मित्रानेही मूल्य मानले पाहिजे आणि उलट बाजूनेही तसेच मानले गेले पाहिजे. उभयपक्षांना समान मूल्यव्यवस्था मान्य व स्वीकृत असली पाहिजे.
आता हा दृष्टीकोन हरवला, तर दोघांच्या मैत्रीत अडथळा येतो.
मैत्रीचे दोन घटक
'मूल्यांसाठी मूल्य' या नातेसंबंधावर मैत्रीचे दोन घटक अवलंबून असतात. मैत्रीचे हे दोन घटक म्हणजे एका अर्थाने निखळ मैत्रीच्या पायाभूत अटी आहेत. कोणतीही मैत्री या दोन अटींच्या अधीन राहूनच निर्माण होते आणि अधीन राहूनच ती यशस्वी होते. कोणत्या अटी आहेत त्या? - १) कौतुक किंवा आदर, २) बौद्धिक स्वरूपाचा स्वार्थ
कौतुक किंवा आदर
जर एखादया व्यक्तीने तुमचे कौतुक केले नाही, किंवा तुमच्याविषयी आदर दर्शवला नाही, तर ती व्यक्ती तुमचा मित्र होऊ शकत नाही. कारण त्याने कौतुक केले नाही किंवा आदर केला तर आणि तरच तुम्ही त्याच्या गरजा भागवण्याची शक्यता असते. उलट्या बाजूने तुम्ही कोणाचे कौतुक केले नाही किंवा आदर दर्शवला नाही, तर ती व्यक्ती तुमची गरज भागवणार कशी? किंवा 'अशा' व्यक्तीचं तुमच्याशी काय देणे घेणे असेल?
याचा अर्थ असा 'कौतुक करणे किंवा आदर करणे' हा कोणत्याही दोन व्यक्तींमधील मैत्रीचा अगदी पहिला पाया आहे. ही 'भावनिक गरज' म्हणा हवी तर. हिलाच मी 'मानसशास्त्रीय अन्न' म्हणतो. काय स्वरूपाचे हे अन्न आहे?
यासाठी एक गोष्ट (हो, गोष्टच!) लक्षात घेतली पाहिजे. ती म्हणजे प्रत्येक व्यक्तीत एक ‘बालक’ दडलेला असतो. माणूस वय, प्रतिष्ठा, संपत्ती, सत्ता, ज्ञान, इत्यादीबाबतीत कितीही मोठा झाला तरी त्याच्या ‘आत’ एक ‘लहान मूल’ दडलेले असते. आणि जगातील प्रत्येक लहान मुलाला कौतुकाची गरज असते! असतेच ती!! कौतुक केले नाही की, ते मूल रुसते, फुगते, रागावते, चिडते आणि अबोला धरते. ते सारेच प्रमाण वाढले की ते थेट दुष्मनी करते!
कौतुक करणे, हे त्या व्यक्तीने आयुष्यात जे काही मिळवले आहे, त्याची पावती देणे असते. त्याला सलामी देणे, त्याचे महत्त्व मान्य करणे असते. व्यक्तिगत जीवनात आणि सार्वजनिक जीवनात त्या व्यक्तीने जे काही योगदान दिलेले असते, त्याची यथार्थ नोंद घेणे आणि आपली त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे असते.
विविध सामाजिक पुरस्कार, बक्षिसे, मानपत्रे, किताब इत्यादी कौतुकेच असतात. सार्वजनिक कौतुकाला प्रत्येक पात्रच असतो असे नाही. पण खासगी कौतुकाला प्रत्येक जण पात्र असतो. आई-वडील, नातेवाईक कौतुक करतातच. अनेकदा त्यात स्वार्थीपणा असतो. पण मित्रांनी केलेले कौतुक (आणि टीका-शिव्या इत्यादी) नि:स्वार्थी असते. केवळ मित्रच निःस्वार्थी कौतुक करू शकतात! म्हणून कौतुक करणे ही गुंतवणूक ठरते.
बालकापासून वृद्धापकाळापर्यंत कौतुकाची गरज असते. वृद्ध व्यक्तीला तिच्या समग्र जीवनाच्या यशअपयशाचे कौतुक-टीका हवी असते. माणूस कितीही म्हातारा झाला तरी त्याच्यातील बालक अजूनही जिवंत असतोच ना!
कौतुकाबरोबरच आदर हाही मूलभूत घटक आहे. मित्राने हे काही यश मिळवलेले असते त्याबद्दल आदर व्यक्त करणे, हेही गरजेचे असते. तीही एक प्रकारची मित्रत्वाची पावती असते.
वृद्धांचे कौतुक म्हणजेच त्यांच्याविषयी आदर दाखवणे. तेव्हा कौतुक व आदर हे महत्त्वाचे अवयव आहेत.
बौद्धिक स्वरूपाचा स्वार्थ
मैत्री यशस्वी करणारा दुसरा धागा म्हणजे विचारपूर्वक स्कावीरलेला स्वार्थ. म्हणजेच सुबुद्ध स्वार्थीपणा होय.
आपल्या मैत्रीची किंमत जोखून, ती नीट ओळखून, त्या मैत्रीचे मूल्य ओळखून त्याची किंमत देणे हा मैत्रीचा दुसरा पाया आहे. इथेही एकेरी व्यवहार नाही, तो दुहेरी आहे. केवळ किंमत द्यायची नाही, ती मिळवायचीही आहे, म्हणजेच ती दुसऱ्याने तुम्हाला देणे लागते आहे. ते त्या दुसऱ्याने जाणायचे आहे, जसे तुम्ही जाणले आहे!
जी माणसे हा ‘देण्याघेण्याचा व्यवहार’ जाणू शकत नाहीत, त्यांना मैत्री करण्यात अडथळे येतात. जी माणसे केवळ घेण्याचा हक्क बजावू पाहतात, पण देण्याचे कर्तव्य बजावणे विसरून जातात, ती माणसे “हे जग माझे जगण्यासाठीचे देणे लागतो” (World Owes-Me-A-Living Theory) या सिद्धान्ताने ग्रासलेले असतात.
खरे सांगू का? सत्य असे आहे की, 'कोणीच कोणाचे कसलेही देणे घेणे लागत नाही, मैत्रीत तर मुळातच नाही'. पण मैत्री हवी असेल तर मैत्रीला असलेले मूल्य चुकते करावे लागते. 'मूल्यासाठी मूल्य' या आधारावरच (Value for Value Basis) मैत्री होते, हे एकदा नीट लक्षात घेतले तर मित्रहो, आपणास अतिशय आश्चर्यकारक अनुभव येतील! तुम्हाला आले असणारच आहेत.
आता, World Owes-Me-A-Living Theory आणि Value for Value Basis दोन या मुद्द्यांच्या आधारे मैत्रीची एक व्यापारिक व शुद्ध व्यावहारिक मूल्य असणारी एक संकल्पना बाजारात प्रचलित आहे, अशी भूमिका घेणे शक्य आहे. मैत्रीचे सामाजिक नाते टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असलेले हे व्यावहारिक मूल्य विकसित केले पाहिजे. मी तर म्हणतो की ते स्वतःच (in itself) अशा प्रकारचे नाते आहे की, जे सामाजिक नाते आहे.
आयुष्यात जमीन, सोने-नाणे, संपत्ती, प्रतिष्ठा, मानमतराब, सत्ता इत्यादी गोष्टी कमवाव्यात तशी 'मैत्री ही देखील कमावण्याची गोष्ट आहे' हे लक्षात घेतले पाहिजे, ती आपोआप मिळणारी गोष्ट नाही. World Owes-Me-A-Living Theoryनुसार मैत्री ही मिळत नसते. तिच्यासाठी खूप कष्ट लागतात, मूल्य द्यावे लागते. ती Value for Value Basisवर लाभते. म्हणजे काय होते नेमके ? तर ते असे घडते :
तुम्ही जेव्हा इतरांशी मैत्री करता तेव्हा तुमचा मित्र तुमच्याकडे काय म्हणून आणि कोणत्या अर्थाने पाहत असतो? तुमच्या मैत्रीचे मूल्यमापन तो कसे करतो? कोणत्या तराजूत तो तुमची मैत्री मोजतो?
हे पाहा मित्रहो, तुमच्या मित्राकडे एक विशिष्ट प्रकारचा तराजू असतो. त्याला म्हणतात आनंद मोजण्याचा श्रीशिल्लक तराजू (Weight and Balance happiness Scale).
त्या तराजूनेच तुमची मैत्री होत असते. तुमचा मित्र तुम्हाला त्या तराजूतच जोखत असतो. आणि “तुम्हीही तेच करत असता! कारण तुमच्याकडेही तसाच तराजू असतो!”
आता, हे वास्तव लक्षात घेतले तर "मी मित्रासाठी त्याग केला" असा दावा तुम्ही करताना नेहमीच हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, तुमच्या बाजूने त्यागाचीही कृती म्हणजे एक जाणीवपूर्वक सुबुद्धीने केलेली शुद्ध स्वार्थाची कृती असते. त्या व्यक्तीची मैत्री तुम्हाला सुखदायी असते, म्हणूनच तुम्ही त्याग करता. मैत्रीतून सुख मिळवणे हा स्वार्थच नव्हे तर काय! पण तुम्ही केवळ तुमच्या स्वार्थासाठी मैत्री कराल तर मग तुमची मैत्री World Owes-Me-A-Living Theory मैत्री असते.
पण तुमच्या मित्राकडेसुद्धा असाच तराजू आहे, हे मात्र तुम्ही विसरता! म्हणजे तुमच्या बाजूने तुमच्या मित्राला तुमच्याकडून सुखदायी मैत्री लाभली पाहिजे, हेच तुम्ही विसरता. पण या तराजूचे अस्तित्व नीट लक्षात घेतले की, तुम्हाला योग्य भूमिका स्वीकारणे शक्य होते. म्हणजे काय? मैत्रीत स्वार्थ असतो आणि तो विशिष्ट तराजूने मोजला जातो, हे वास्तव स्वीकारले की योग्य भूमिका स्वीकारता येईल.
पण होते काय की, अनेकांना रूढी आणि परंपरा यांच्या दबावामुळे या 'तराजू'चे अस्तित्व स्वीकारणे, तेही दुसऱ्या बाजूने स्वीकारणे फारच कठीण होऊन बसते. पण एकदा का हा स्वार्थयुक्त मैत्रीचा नातेसंबध स्वीकारला की, आपण आणि आपले मित्र अतिशय प्रामाणिक बनतो, वास्तववादी बनतो. मित्राला आपल्याकडून सुखमूल्य हवे आणि आपल्याला ती मूल्यपूर्ती करायची आहे, याची सुबुद्ध (आणि अर्थातच स्वार्थी!) जाणीव राखली की, मग तुमची मैत्री हा एक 'मूल्यासाठी मूल्य' देणारा दीर्घकाळ टिकणाऱ्या अतिशय सुंदर नातेसंबंधाचे रूप धारण करतो.
अर्थात याचा अर्थ असे नव्हे की, दोन्ही मित्रांनी बाजूनी एकच प्रकारचे वर्तन करावे. एखाद्याला चांगला सल्ला हवा असेल, दुसऱ्याला बौद्धिक प्रेरणा हवी असेल, तर तिसऱ्याला केवल गप्पाटप्पांचा काव्यशास्त्रविनोद-आनंद हवा असेल किंवा नुसता मूक सहवास हवा असेल. ते कसेही असू शकते किंवा अन्य काही ..
या पार्श्वभूमीवर एक नाजूक (कदाचित भावुकजनांच्या मते संतापजनक) प्रश्न उपस्थित करता येईल. करू?
मैत्री विकत घेता येते का?
मैत्री विकत घेता येते का? ती विकाऊ वस्तू आहे का?
हो तर! मैत्री विकत घेता येते. आणि एवढेच नव्हे तर “मैत्री विकतच घेतली पाहिजे.” ती जगातील अनेकू वस्तूंप्रमाणे एक वस्तू (thing) आहे. भारतीय तत्त्वज्ञानाच्या परिभाषेत मांडण्याचे स्वातंत्र्य जर काही शिथिल अर्थाने घेतले तर 'मैत्री हा एक ज्ञानात्मक पदार्थ आहे'. ज्या अनेक पदार्थांनी खास माणसाने निर्माण केलेले 'मानवीविश्व' बनलेले आहे, त्यातीलच 'मैत्री' हा एक पदार्थ (substance) आहे.
पुस्तक, संगणक, हार्डडिस्क, पेनद्राईव्ह या ज्ञानवाहक-धारक वस्तूचीही खरेदी-विक्री होऊ शकते, तर 'ज्ञान' या वस्तूचीही खरेदी-विक्री होऊ शकते. ज्ञान अमूर्त वस्तू असूनही आपण ती पुस्तके, संकेतस्थळ इत्यादीवरून पैसे देऊन विकत घेतो. तशी मैत्रीदेखील ज्ञानवस्तू असून तिचा खरेदी-विक्री व्यवहार शक्य आहे. आणि मैत्री विकत घेणे हा मित्र मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे! किंबहुना जगातील प्रत्येक जण आपले मित्र विकतच घेत असतो. सगळे जग म्हणजे मैत्रीच्या मुक्त बाजारव्यवस्थेचा मोठा उद्योग आहे (Free Enterprize Friendship Market).
या बाजारात मैत्रीचा आकार आणि दर्जा यानुसार व्यक्तिगणिक मैत्रीच्या किमती बदलत असतात. पण प्रत्येक मित्राला किंमत असते आणि ती मोजावीच लागते.
मुक्त बाजारपेठेचे जे नियम असतात, तेच मैत्रीच्या बाजारपेठेलाही ही लागू असतात बर कां. उदाहरणार्थ- असे दोन नियम आहेत.
१) मुक्त बाजार व्यवस्थेच्या उद्योगातील प्रत्येकाला काही ना काही गरजा असतात
२) गरजा भागवणाऱ्या प्रत्येक योग्य मौलिक वस्तूला किंमत असते.
आता, हे मान्य केले की, मैत्री आपल्या कोणकोणत्या गरजा भगवते, ते तर आता आपण जाणतोच. मग त्या गरजांच्या तुलनेत मैत्रीच्या संदर्भात मैत्रीची किंमत कोणती? किंवा मूल्य कोणते असते? कसे असते? त्याचे स्वरूप काय आहे? ती किंमत मोजावयाची कशी? हे असे अन इतर अनेक प्रश्न उपस्थित करता येतील.
हे पाहा, मित्रहो, तुम्ही रोख पैसे मित्राला दिले पाहिजेत, असे नव्हे... तर, तुम्ही मित्राला रोज किती वेळ देता? त्याला कोणती प्रेरणा देता? त्या प्रेरणांचे स्वरूप काय आहे? आर्थिक, वैचारिक, नैतिक की आत्मिक की आध्यात्मिक गरजा भागवता की प्रेरणा देता? तुमचा मित्र तुमच्याबरोबर कोणकोणते आनंद घेत असतो? तुमच्याकडून त्याला नेमके काय कसे मिळते? त्याला कोणती मदत तुम्ही करता? की नुसताच पोकळ सहवास देता?
या सर्व प्रश्नांची उत्तरे देणे सक्तीचे आहे. ही उत्तरे देणे, ती देण्याची परिस्थिती तुम्ही निर्माण करणे ही एका अर्थाने तुम्ही तुमच्या मित्रामध्ये केलेली भांडवली गुंतवणूक आहे. ही गुंतवणूक करावीच लागते. कारण मैत्रीच्या मुक्त बाजारव्यवस्थेच्या उद्योगाच्या तुम्ही व्यवस्थेचे भाग असता. तुम्ही एखाद्याची गरज भागवता म्हणजे त्याच्याशी मैत्री जोडण्याची तुम्ही किंमत देत असता, आणि आपल्या पोटातील पाणीही न हलवता "हे जग माझ्या जगण्याचे देणे लागते" या सिद्धान्ताच्या आधारे केवळ काहीतरी मिळवण्याचीच अपेक्षा तुम्ही करता; तेव्हा तुम्ही बाजारपेठेतून बाहेर फेकले जाण्याच्या पात्रतेचे बनता!! लक्षात येतंय ना मी काय म्हणतो ते!
तुम्ही मित्र व्हावे म्हणून तुमचा मित्र तुमचे मूल्य चुकते करत असतो. त्या वेळी तुम्हीही त्याचे मूल्य चुकते केले पाहिजे, पण तुम्ही किंमत देण्यास राजी नसाल तेव्हाच मैत्रीत उडथळा निर्माण होतो. अर्थात तो मित्रही असेच अथळे निर्माण करू शकतो. असे सगळे जण करत असतात.
एक तुकडाही खर्च न करता आपल्याच सगळे मिळावे, असे प्रत्येकाला वाटते. तुम्हालाही वाटत असेल तर वाईट वाटून घेऊ नका. हा मानवी स्वभाव आहे हो! पण मग वाईट वाटण्याचे किंमत (Cost) म्हणून मित्रापासून तुटण्याचे मूल्य (Value) देण्यास राजी व्हा. कदाचित ही तुम्हाला शिक्षा वाटेत! ती भोगा! कारण तुमची ही आयातोबावृत्ती तुम्ही दाबून टाकल्याशिवाय तुम्हाला मित्र मिळणार नसतात. तुमचा हा World Owes-Me-A-Living स्वार्थ तुम्ही जितका दाबाल, नियंत्रणात आणाल जितके मित्र मिळविण्याची शक्यता वाढत जाईल.एवढेच नवे तर तुम्ही इतरांचे मित्र बनण्याची तुमच्या आयुष्यातील संधी वाढत जाईल. अन्यथा नाही!!
थोडक्यात, मैत्री करताना आपण दोन गोष्टी केल्या पाहिजेत. पहिली, एक या माणसाशी मैत्री करताना मला काय मूल्य दयावे लागेल? दुसरी, ते मूल्य देण्यास मी तयार आहे का? आणि तितकी माझी ताकद आहे का? दोन गोष्टी पूर्ण करणे म्हणजे दीर्घकालीन मैत्री जोडणे. दुसरं काय!
मैत्री तोडायचीय?
समजा तुम्हाला मैत्री तोडायची आहे तर तुम्ही काय कराल? जर ती व्यक्ती तुमची चांगली मित्र असेल तर खूप काही गृहीत धरता येईल. तुमच्या सर्वांत वाईटच्या शत्रूच्या बाबत तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही, अशा स्वरूपाचे हवे तितके स्वातंत्र तुम्ही या मैत्री तोडण्याच्या प्रक्रियेत घेऊ शकता.
याचा अर्थ असा की, स्वतःशी तुम्ही जितके वाईट वागू शकता त्यापेक्षाही जास्त वाईट, आणि जास्त प्रमाणात तुम्हाला चांगल्या मित्राची मैत्री तोडण्यात वागता येईल. पण “शत्रूपेक्षाही जास्त वाईट मित्राशी वागण्यात काय अर्थ आहे?” शिवाय तसे खरोखरच वागता येईल का?
कारण तुमच्या प्रमाणेच तुमच्या मित्राकडे सुध्दा मैत्रीचे सुख मोजण्याचा आनंदाचा श्री शिल्लक तराजू असतो, हे विसरू नका. तुम्ही जेवढा खर्च कराल, जेवढी गुंतवणूक कराल किमान तेवढी गुंतवणूक तुमचा मित्र तुमच्यावर करणार असतो. ही देवघेव चालूच राहते. ती शांतपणे समजूतदारपणे चालणे हे मित्रत्वाचे यश मानावयास हरकत नाही.
पण मित्रहो, तुम्ही मित्रासाठी जो काही खर्च करता, त्यापेक्षा त्याच्याकडून येणेच जास्त असेल तर तुम्ही समजूतदारपणे घेतले पाहिजे. तुम्ही घाई करुन वसूली करू पाहाल तर तुम्ही मेलातच! कारण, कदाचित उलटही घडू शकते ना!
ही वसूली तुम्हाला परवडत नाही, हे तुमच्या लगेच लक्षात येईल. कारण तुमच्या मित्रालाही हा व्यवहार परवडत नसतो. मित्राने तुमच्यावर खूप खर्च केला आणि तुम्ही खर्च करण्यास तयार नसाल किंवा 'काहीच खर्च केला नाही' असे वर्णन करण्यास पात्र होईल इतकाच खर्च केला, तर त्या मित्राने तुमची मैत्री का ठेवावी? असा विचार करून तो तुमच्याशी मैत्री तोडून टाकेल!
माझे हे मैत्रीचे तत्त्वज्ञान तुम्हाला कसे वाटते? ते मी जगजाहीर करावे का?
हो! मला वाटते मी केलेच पाहिजे. माझी भूमिका मला जगजाहीर करावयाची आहे!
माझ्या मित्रांनी नेमके हेच तर समजावून घेतले पाहिजे. माझी भूमिका समजावून घेण्यात ते कमी पडले, तर माझे मित्र होण्यात त्यांना धोका निर्माण होईल. मित्रांसाठी मी योग्य ती किंमत देण्यास तयार आहे. कारण मी ही किंमत दिली नाही, तर मी त्यांच्या आयुष्यातून वगळला जाईन, याचे मला भान आहे आणि... मला अपेक्षित मूल्य देण्यास मित्र तयार नसतील, तर ते माझ्या आयुष्यातून वगळले जातील!! मैत्रीची किंमत देण्यास तयार नसलेले, हे मित्र स्वतःहून माझ्या आयुष्यातून वगळले गेले, तर अर्थातच ते चांगले घडेल. असल्या स्वार्थी व रोगट मैत्रीपासून माझे संरक्षण होईल.
तेव्हा मित्रहो, आपल्या हे लक्षात येते आहे का, की माझ्या मैत्रीचे तत्वज्ञान ही अशी 'यंत्रणा' आहे की, ती मला नको असलेल्या मित्रांपासून त्यांच्या त्रासातून किंवा नंतर निर्माण होणाऱ्या विकृतींपासून वाचवते.
म्हणून ‘मी’ तिचे स्वागत केले पाहिजे.
येथे ‘मी’ म्हणजे तृतीयपुरुषी एकवचनी!
.................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास हेमाडे तत्त्वज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक आणि व्यावसायिक तत्त्ववेत्ते आहेत.
shriniwas.sh@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment