अती उत्साहात अन मातलेल्या आत्मविश्वासात मोदी सरकार एक चूक करून बसलेय. त्याने आपल्या बेहोशीत उन्माद करता करता काँग्रेसच्या अंगणात पाय ठेवला अन तो जोराचा मुरगाळला. त्यामुळे धड नाचता येईना, धड कशी जिरवली याचा तोरा मिरवता येईना. स्वातंत्र्य चळवळ खूप वर्षे चालली. असंख्य लोक येत-जात होते. आपापल्या परीने, कुवतीने चळवळीला हातभार लावत होते. उपोषण, मौन, त्याग, बहिष्कार, असहकार अशा अनेक मार्गांनी त्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आपला छोटा-मोठा वाटा उचलला. पंतप्रधान मोदींना त्यामुळे असे म्हणायची संधी मिळाली की, स्वातंत्र्य चळवळ म्हणजे काही घटना, कार्यक्रम अथवा संस्था नव्हेत. त्याबाहेरही भरपूर लोक स्वातंत्र्येच्छू होते! देहूत तुकाराम महाराजांच्या साक्षीने त्यांनी जणू गाथा इंद्रायणीत बुडवला जाताना नुसतेच हळहळून तुकोबांविषयी सहानुभूती व्यक्त करणाऱ्या देहूकरांसारखे आपले हे निवदेन केले. ठीक आहे. चळवळ म्हटली की, हिशेब, नोंदी, टिपणे अन दाखले लटके पडतात. निष्ठा व त्याग यांच्या कसोट्या लागू पडत नसतात. सध्या नाही का संघी गणेवश न घालताही अनेकांना आपण शाखावंत झाल्याचा आनंद घेता येतोय. तसेच हे.
पण तिरंगा केवळ अन केवळ काँग्रेस पक्षाच्या पोटातून जन्मलेला. खादीचे कापड, तिन्ही रंग आणि चरखा अशी सारी चिन्हे खास काँग्रेसची. स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या संघटनेला तेवढा तरी अधिकार नक्कीच पोहचतो. पुढे स्वातंत्र्यानंतर चरखा जाऊन अशोक चक्र आले. चळवळीत लाखो-करोडोंना प्रेरणा देणारा हा साधा, सोपा, लोभस व दिमाखदार ध्वज एका मोठ्या देशाचा राष्ट्रध्वज बनला. साम्राज्यशाही, वसाहतवाद, जुलूम, शोषण यांविरुद्ध अहिंसक आणि सत्याग्रही मार्गांनी लढून जिंकणाऱ्या करोडो लोकांचा तो स्वाभिमान ठरला. भाजपवाले संघरूपाने या स्वाभिमानात कधीही हिस्सेदार नव्हते. त्यांना त्यांच्या हडपाहडपीच्या मोहिमांत मिळते, तसे राष्ट्रध्वजाला लोंबकळत घराघरांत पोचूया अन कधीच नसलेले स्वातंत्र्यप्राप्तीचे श्रेय लुटूया असे वाटले. पण राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती यांनी इतरांना रोज न्हाऊ घालणारे राष्ट्रध्वजाच्या बाबतीत चक्क कोरडे दिसले. काँग्रेसने जवाहरलाल नेहरू यांचा राष्ट्रध्वज हातात घेऊन त्याकडे मोठ्या अभिमानाने, आस्थेने बघतानाचे एक छायाचित्र जाहीर केले. वर आव्हान दिले की, दाखवा तुमच्या लाडक्या संघपरिवारातल्या एकाचे तरी असे छायाचित्र. झाले! संविद पात्रांसारखे बाष्कळ, पोरकट प्रवक्ते तोच तो घराणेशाहीचा व्यक्तिगत आरोप करू लागले. खरे तर चिडलेलेच होते ते. गफलत झाली व ती पकडली यामुळे. पण वेळ निघून गेलेली होती.
जुलै महिन्यात बराच काळ पिंगली व्यंकय्या यांचा गाजावाजा भाजप सरकारकडून असा केला गेला की, तेच राष्ट्रध्वजाचे जनक होते. त्यांचे राष्ट्रध्वजाचे रंगचित्र स्वीकारले गेले इत्यादी. आता ‘डेक्कन क्रॉनिकल’ या हैदराबादेतल्या दैनिकाची ही बातमी पहा. २७ एप्रिल २०१६ रोजीची ही बातमी आंध्र प्रदेशचे पिंगली व्यंकय्या यांना राष्ट्रध्वजाच्या कल्पनेचे श्रेय सरकार देत असल्याचे सांगते. मग ही बातमी पुढे सांगते की, सदर वृत्तपत्राने केंद्रीय गृहखात्याकडून माहितीचा अधिकार वापरून यासंदर्भात ठरावाची प्रत मागितली. तिरंग्याचा पहिला प्रस्ताव वा अंतिम ठराव मिळावा असे म्हटले. गृहखात्याचे केंद्रीय जनसंपर्क अधिकारी आणि संचालक (ए. अँड व्ही.) श्री अनुज शर्मा यांचे उत्तर या दैनिकाला मिळाले ते असे – “ ‘अवर फ्लॅग’ या माहिती व प्रसारण खात्याच्या प्रकाशन विभागाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकानुसार २२ जुलै १९४७ रोजी संविधान सभेने भारताचा राष्ट्रध्वज मान्य केला. त्याच्या प्रती सोबत जोडल्या आहेत. राष्ट्रध्वजाचा डिझायनर व त्याचे नाव याविषयीची कसलीही माहिती आमच्यापाशी नाही.”
या बातमीत नंतर असे म्हटले आहे की, याच्या विपरीत ‘https://www.india.gov.in’ या भारत सरकारच्या संकेतस्थळावर ‘हिस्ट्री ऑफ ट्रायकलर’मध्ये पिंगली व्यंकय्या यांनी रचलेला हा ध्वज २२ जुलै १९४७ च्या संविधान सभेच्या बैठकीत स्वीकारला गेला. तो ध्वज १५ ऑगस्ट १९४७ ते २७ जानेवारी १९५० या काळातल्या डोमिनियन ऑफ इंडियाचाही राष्ट्रध्वज राहिला… गृहखात्याच्या त्या कागदपत्रांत असे सांगितले आहे की, पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी संविधानसभेत ध्वजाचा ठराव मांडला. त्या वेळी नेहरू म्हणाले, “आम्ही राष्ट्रध्वज सुंदर असावा असे ठरवले, कारण देशाचे प्रतीक सुंदर असले पाहिजे. असा एक ध्वज आम्ही विचारात घेत होतो, ज्याच्या एकत्रित आविष्कारात आणि त्याच्या स्वतंत्र हिश्श्यातही राष्ट्राचा आत्मा प्रकटेल. खेरीज मिलाफाची परंपरा जी हजारो वर्षे आम्हाला घडवते आहे, तीही त्यात उमटेल. आम्ही असे ठरवले की, भारताचा राष्ट्रध्वज आडवा असावा. त्यावर केशरी, पांढरा व हिरवा या रंगांचे समान पट्टे असावेत. चरख्याच्या जागी मध्यभागी नेव्ही ब्ल्यू या रंगात सारनाथ येथील अशोक चक्क असावे.”
ही बातमी एक स्वातंत्र्यसैनिक कॅप्टन एल. पांडुरंग रेड्डी यांचा हवाला देत पुढे म्हणते की, व्यंकय्या यांचे नाव पुढे केले जात असले तरी माजी काँग्रेस अध्यक्ष बी. पट्टाभी सीतारामय्या यांनी १९३५मध्ये जे ‘काँग्रेस चरित्र’ लिहिले, त्यात म्हटले आहे की, पक्षाने लाल, पांढरा व हिरवा रंग असणारा डॉ. अनी बेझंट यांच्या होमरूल लीगचा ध्वज स्वीकारला आणि त्या वेळी लालऐवजी केशरी रंग वापरावा असे ठरले. १९३१मध्ये अशा रंगाचा ध्वज काँग्रेसने स्वीकारला. त्यावर गांधीजींचा चरखा होता, या रंगांना कोणत्याही धर्माचे प्रतीक म्हणून स्वीकारले नव्हते.
या बातमीला सहा वर्षे उलटून गेली आहेत. आपल्या राज्यातल्या सदगृहस्थाने खरोखरच तसा पराक्रम केलाय का, याची शहानिशा हैदराबादच्या या दैनिकाने केलीय. पण पदरी निराशा आली. आता आपण याही बातमीची पडताळणी करू या. म्हणजे जुन्या काँग्रेसवाल्यांच्या पुस्तकांमध्ये काही सापडते का, ते पाहूया. काँग्रेसचा सुवर्णमहोत्सव १९३५ साली साजरा झाला, तेव्हा महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेस कमिटीचे चिटणीस गोपाळ आबाजी देशपांडे यांनी ‘काँग्रेसकथा’ नामक एक पुस्तक लिहिले होते. महत्त्वाचे म्हणजे ते स्वत: या पुस्तकाचे प्रकाशकही आहेत. सुलभ राष्ट्रीय ग्रंथमाला त्या वेळी निघे आणि तिचे संपादक आचार्य शंकरराव जावडेकर, आचार्य स. ज. भागवत आणि कार्यकारी संपादक भाऊ धर्माधिकारी हे स्वातंत्र्यसैनिक होते. पुढे १९४६ साली याच पुस्तकाची सुधारून वाढवलेली आवृत्ती काँग्रेसच्या हीरक महोत्सवानिमित्त निघाली. तीत परिशिष्ट आठवे यामध्ये राष्ट्रध्वज या परिच्छेदात पुढीलप्रमाणे मजकूर आहे :
“भारतीय काँग्रेस कमिटीने ऑगस्ट ६, १९३१च्या बैठकीत राष्ट्रध्वजासंबंधी पुढीलप्रमाणे खुलासा केला आहे – राष्ट्रध्वज नेहमी तीन रंगी असेल. त्याला केशरी, पांढरा व हिरवा असे तीन आडवे पट्टे राहतील. त्यांचा अनुक्रम केशरी, पांढरा व हिरवा असाच राहिल. पांढऱ्या पट्ट्याच्याबरोबर मध्यावर गर्द निळ्या रंगीत चरख्याचे चित्र राहील. हे तीन रंग गुणनिदर्शनार्थ आहेत, जातिवाचक नाहीत. केशरी रंग त्याग व धैर्य, पांढरा रंग सत्य व शांति आणि हिरवा रंग श्रद्धा व आर्तत्राणवृत्ती, यांचे निदर्शक आहेत. चरखा हे बहुजनसमाजाचे आकांक्षा-चिन्ह आहे. राष्ट्रध्वजाची लांबी-रुंदी तिनास दोन या प्रमाणात राहील.” (देशपांडे, १९४६, पृष्ठ २९८)
गेली आठ वर्षे भारतीय पत्रकारिता आपली सत्यशोधनाची जबाबदारी आणि कर्तव्ये टाळत चाललीय. संघाचा तीत झालेला शिरकाव, सवर्ण मध्यमवर्गाचा दबाव आणि मालकांची शरणागती यांमुळे ही कर्तव्यच्युती चाललीय. त्यामुळे थोडीफार धुगधुगी असताना ‘डेक्कन क्रॉनिकल’ने स्वत:हून आपल्या भूमिपुत्राच्या तथाकथित पराक्रमाचा वेध घेतला. उघड आहे, तेव्हाचे अधिकारी शाखेत जात नसल्यामुळे त्यांनी जे उपलब्ध वास्तव आहे, तेवढे त्याला पाठवले. म्हणजे केंद्रातले सरकार खोटारडे तर आहेच, पण आपला खोटेपणा उघडकीस समजा आलाच तर तशीही तजवीज करून ठेवत आहे. काय म्हणावे या दुटप्पीपणाला? ५ ऑगस्ट रोजी राहुल गांधी यांनी मोदी सरकार प्रत्येक गोष्ट खोटी सांगत असल्याचा आरोप केला. पण काँग्रेसचा मागमूसही कोठे ठेवायचा नाही या त्वेषाने पेटलेल्या संघपरिवाराला आपलेच सरकार कसा दुतोंडी कारभार करतेय, हे पाहून लाजही वाटली नसणार. कारण दुहेरी वागणे, ढोंग करणे, थापा ठोकणे, यात तरबेज असणारे खरे तेच आहेत. मोदी वगैरे त्यांचा प्रतिध्वनीच जणू.
रा.स्व.संघाच्या मुख्यालयावर राष्ट्रध्वज फडकवावा आणि संघ पदाधिकाऱ्यांनी आपल्या सेलफोनचे डिस्प्ले पिक्चर पंतप्रधानांच्या आवाहनप्रमाणे राष्ट्रध्वजाचे लावावे, असे काँग्रेसच्या प्रवक्त्याने सुचवले. तर संघाकडून खुलाश्याची पळवाट ‘अशा विषयांत राजकारण आणू नका’ हे सांगत निघाली! राष्ट्रीय म्हणवून घेणाऱ्या संघटनेला राष्ट्रध्वज का बरे खुपतो? दुसऱ्यांच्या घरावर झेंडा लावायला निघालेले मोदी-शहा संघवाल्यांच्या घरांबद्दल काय करणार आहेत? लावले तरी त्यांना सलामी ते देणार आहेत काय? ‘जनगणमन’ऐवजी ‘वंदे मातरम’ म्हणून आपला पण टिकवण्याची शर्थ करणारच आहेत का? ‘इन्किलाब जिन्दाबाद’ असे न म्हणता ‘वंदे मातरम’ आणि ‘भारत माता की जय’ एवढेच म्हणणार आहेत काय?
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
आता आपण दोन सरसंघचालकांची राष्ट्रध्वजाबद्दलची मते ऐकू. ती खरे तर निंदा, चेष्टा आणि बदनामी आहे. आधी ज्यांच्या काळात भारत स्वतंत्र झाला मात्र, त्यात नखभरही वाटा नसलेले माधव सदाशिव गोळवलकर काय म्हणतात ते पाहू :
“…आपल्या नेत्यांनी आपल्या देशासाठी एक नवा ध्वज तयार केला. त्यांनी नवा ध्वज तयार का केला? त्यांची प्रवाहपतित अवस्था, परानुकरणवृत्ती याचेच हे उदाहरण आहे. हा ध्वज कसा तयार झाला? फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी फ्रेंचांनी ‘समता’, ‘बंधुत्व’ व ‘स्वातंत्र्य’ या तीन कल्पनांचे प्रतीक म्हणून तीन पट्टे घेऊन ध्वज तयार केला. अशाच तत्त्वांच्या प्रेरणेतून झालेल्या ‘अमेरिकन क्रांती’नेही थोडाफार बदल करून तोच ध्वज स्वीकारला. त्यामुळे आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनाही या तीन पट्ट्यांचे आकर्षण वाटू लागले. म्हणून काँग्रेसने त्यांचा स्वीकार केला. नंतर असे स्पष्टीकरण करण्यात येऊ लागले की, हा ध्वज येथील निरनिराळ्या जातीजमातींच्या एकतेचे प्रतीक आहे. भगवा रंग हिंदूंचे प्रतीक, हिरवा मुसलमानांचे आणि पांढरा बाकी राहिलेल्या सर्व जातींचे. अहिंदू जमातींपैकी मुसलमानांचा खास उल्लेख करण्याचे कारण असे की, आपल्या बहुसंख्य प्रमुख पुढाऱ्यांच्या मनावर मुसलमानांचे दडपण विशेष होते; शिवाय त्यांचा उल्लेख केल्याशिवाय आपले राष्ट्रीयत्व पूर्ण होणार नाही असेही त्यांना वाटत होते. नंतर जेव्हा कोणीतरी म्हटले की, या स्पष्टीकरणाला जातीवादाचा वास येत आहे, तेव्हा मग या रंगांचा नवीन अर्थ लावण्यात आला. भगवा रंग त्यागाचे प्रतीक, पांढरा रंग पावित्र्याचे आणि हिरवा रंग शांततेचे. त्या काळात काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत ही सर्व चर्चा झाली होती. हा दृष्टीकोन निरोगी आणि विशुद्ध राष्ट्रीय दृष्टीकोन आहे असे कोण म्हणू शकेल? कोणत्याही राष्ट्रीय धारणेतून किंवा आपल्या राष्ट्राच्या इतिहास व वारसा यांच्यावर आधारित सत्यातून सुचलेला हा विचार नाही. एक किरकोळ बदल करून तोच ध्वज आता राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्यात आला आहे. आपले राष्ट्र हे वैभवशाली भूतकाळ असलेले एक प्राचीन राष्ट्र आहे. आपल्यापाशी स्वत:चा असा ध्वज नव्हता काय? हजारो वर्षांच्या या काळात आपल्या राष्ट्राला एकही मानचिन्ह नव्हते काय? निश्चितपणे होते. मग आपल्या मनात ही एवढी पोकळी का निर्माण झाली?” (समग्र श्रीगुरुजी – खंड ११, भारतीय विचार साधना, पुणे, २००६, पृष्ठ २५८-५९)
मोदी-शहा आणि तमाम संघवाल्यांचे असत्य भाषण कसे असते, याचा पाठच या उताऱ्यावरून आपल्याला मिळेल. झालेल्या चर्चा वेगळ्या व ठराव वेगळा, असे असताना गोळवलकर सर्रास ठोकून देत आहेत की, धर्माप्रमाणे रंग निवडले. निरोगी व विशुद्ध यांची परीक्षा घेणारे गोळवलकर कोण? त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग न घेता अशा पिचकाऱ्या का उडवाव्यात? मुसलमान काय, अहिंदू काय, वाट्टेल तसे शब्दप्रयोग करून मनामनांत किल्मिष पेरायचा कावा या ओळींमधून स्पष्ट जाणवतो. प्राचीन काळ वा वैभवशाही भूतकाळ कोणता? गोळवलकर स्पष्ट कोणता ध्वज हवा होता, ते का सांगत नाहीत? शंका, संशय, संदेह, फितुरी, परपोषण असे शिंतोडे काँग्रेसनेत्यांवर उडवण्याचे कारण आपण सनातनत्व जपत असल्याचाच दावा ते करत आहेत ना? टीका करताना उपहास, चेष्टा, निंदा कशासाठी करायची? माधवराव उत्तम प्रचारक होते. त्यांना फक्त तेवढ्यापुरते काय बोलायचे ते समजे. धर्म, संस्कृती, भाषा, इतिहास यांचे ते अभ्यासक, विशेषज्ञ अथवा पंडित नसताना काही तरी खुसपट काढून अपमान करणे, एवढाच त्यांचा हेतू या मतांमागे दिसतो.
तब्बल ३२ वर्षे माधवराव सरसंघचालक राहिले. साहजिकच संघाची वैचारिक, प्रतिक्रियावादी बांधणी त्यांनी केली. ती अजून टिकून आहे. कारण त्यांच्यानंतरच्या सरसंघचालकांना लेखन, भाषण, प्रबोधन, मांडणी इत्यादी करायला त्यांच्याएवढा वेळ मिळाला नाही. त्यांचेच विचार कदाचित इतरांनी पुढे नेले. आपला राष्ट्रध्वज भगवा असावा अशी मागणी हिंदुत्ववाद्यांनी केली होती व त्यांनी डॉ. आंबेडकरांची मध्यस्थी वापरून ध्वजसमितीपुढे ती नेण्याचे प्रयत्न केले. पण समितीसमोर ती मागणी गेली नाही असे खैरमोडे यांनी नोंदवून ठेवलेय. बरे, गोळवलकरांना त्या समितीपुढे आपले मागणे सादर करायला कोणी रोखले होते की काय? त्यामुळे माधवराव बोटे मोडत, चरफडत बसले एवढेच या उताऱ्यावरून जाणवते. परंतु त्यांचीच हरकत असल्यामुळे त्यांनी ना कधी भारतीय स्वातंत्र्याला, ना तिरंग्याला मान्यता दिली. तीच स्थिती आजतागायत नागपूरपासून सर्व संघीयांच्या संस्थांपर्यंत आढळते.
आता विद्यमान सरसंघचालक डॉ. मोहन भागवत राष्ट्रध्वजाविषयी काय, कसे, का बोलले ते पाहू. १७, १८, १९ सप्टेंबर २०१८ रोजी दिल्लीत त्यांची विज्ञानभवनात व्याख्याने झाली. त्यांनी त्यात मांडलेल्या राष्ट्रध्वजाविषयीची भूमिका www.rsss.org या संकेतस्थळावर एका चित्रपट्टिकेच्या काही मिनिटांच्या भागात उपलब्ध आहे. त्याकडे आपण आता वळू.
“संघ हमारा स्वावलंबी हैं. खर्चा जो करता पडता है वो हम ही जुटाते हैं. संघ का काम चलाने के लिए एक पाई भी बाहर से हम लेते नही. किसी ने लाकर दी तो हम लौटा देते हैं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वयंसेवकों की गुरुदक्षिणा पर चलता हैं. साल में एक बार भगवे ध्वज को गुरू मानकर इसकी पूजा में दक्षिणा समर्पित करते हैं. भगवा ध्वज गुरु क्यो, क्यों की वह अपनी तब से आज तक की परम्परा का वो चिन्ह हैं. जब जब हमारे इतिहास का विषय आता हैं, ये भगवा झंडा कहीं न कहीं रहता हैं. यहां तक की स्वतंत्र भारत का झंडा इसका फ्लॅग कमिटीने जो रिपोर्ट दिया, उस में परिवर्तन हुआ, वह तिरंगा आ गया, उसका भी पूर्व सम्मान रखते ही हैं. ये भी प्रश्न उठाया जाता हैं- शाखा में भगवा झंडा लगता हैं, तिरंगे झंडे का क्या? तिरंगे झंडे के जन्म से, उसके सम्मान के साथ संघ का स्वयंसेवक जुडा हैं. मैं आपको सत्य कथा बता रहा हूँ. निश्चित होने के बाद उस समय तो चक्र नहीं था, चरखा था ध्वजपर. पहली बार हाईस्कूल (येथे फैजपूर हवे) के काँग्रेस अधिवेशन में उस ध्वज को फहराया गया था. और अस्सी फीट उंचा ध्वजस्तंभ लगाया था. नेहरूजी उसके अध्यक्ष थे. तो बीच में लटक गया. उपर पुरा जा नहीं सका और इतना उंचा चढकर उसको सुलझाने का साहस किसा का नहीं था. एक तरुण भीड में से दौडा वह सटासट उस खंबे पर चढ गया, उसने रस्सियों की गुत्थी सुलझाई. ध्वज को उपर पहुंचाकर नीचे आ गया. तो स्वाभाविक लोगों ने उसको कंधो पर लिया. नेहरूजी के पास लेकर गये. नेहरूजीने उसकी पीठ थपथपाई और कहा कि तुम आओ शाम को. खुले अधिवेशन में तुम्हारा अभिनंदन करेंगे. लेकिन कुठ नेता आए और कहा की उस को मत बुलाओ, वह शाखा में जाता हैं. जलगाव में हाईस्कूल (फैजपूर हवे) में रहनेवाले श्री किशन सिंह राजपूत वह स्वयंसेवक थे. उस समय. पांच वर्षं, छह वर्ष पहले उनका देहान्त हुआ. डॉ. हेडगेवार को पता चला तो वे प्रवास करके गये. उन्होने उसको एक छोटासा लोटा चांदी का पुरस्कार के रूप में भेंट कर उसका अभिनंदन किया. पहली बार फहराया गया तब से इसके सम्मान सत्य स्वयंसेवक जुडा हैं…” (उदय इंडिया, दिल्ली, १३ ऑक्टोबर २०१८, पृष्ठ २१-२२)
एक भयंकर, हास्यास्पद, केविलवाणे आणि लोकांना अज्ञानी बालक समजणारे हे निवेदन आहे. तिरंग्याचा सन्मान हा मुळात प्रश्नच नाही. खरा प्रश्न आहे तो तिरंग्याचा स्वीकार करण्याचा. राष्ट्रध्वज म्हणून त्याला संघाची मान्यता आहे का नाही याचा. भागवत सहज सांगून जातात की, ध्वज समितीने अहवाल दिला. प्रत्यक्षात तो होमरूल लीगप्रमाणे स्वीकारला. दुसरे असे की, ८० फूट ध्वजस्तंभ, त्यावर सरसर चढून गेलेला युवक वगैरे घडलेही असेल. पण त्याचा व तिरंग्याच्या स्वीकृतीचा संबंध काय? उद्या एखादा गणवेशधारी संघ स्वयंसेवक रस्त्यात अडखळून पडला तर कोणीही त्याला आधार द्यायला धावून जाईलच की! त्यात वैचारिक वा राजकी मतभेद कोठून येतील? ती एक मानवी कृती असेल. दोरीत गुंतलेला ध्वज सोडवायला एक स्वयंसेवक धावला याने स्वीकृती, अधिमान्यता अथवा प्रेम सिद्ध होत नाही. म्हणजे दरवेळी ध्वज अडकावा अन स्वयंसेवकाने धावावे, असे होत राहिले तर केवढी ही राष्ट्रभक्ती असे म्हणण्यासारखे पोरकट झाले हे.
एक रोमांचकारी प्रसंग रंगवून तो मूळ मुद्द्यापासून लक्ष लांब भरकटायला वापरायचा ही तर संघपरिवाराची खासीयत. श्रोत्यांना वाटेल पाहा, स्वयंसेवक भेदभाव न करता गेला व फडकावून आला! म्हणून भागवत म्हणतात ते एकाच अर्थाने खरे आहे. ते म्हणजे तिरंग्याच्या सन्मानाशीच स्वयंसेवक जोडलेला आहे. सन्मान आणि संमती सारखे नाहीत. सन्मान खूप जण देत असल्यानेसुद्धा दडपणापोटी दिला जातो. त्यात स्वेच्छा असेलच असे नाही. मुळात मंजुरी, स्वीकृती असेल तर असा प्रासंगिक सन्मान देण्याची गरज नाही. तरीही भागवत शाखांमधून भगवा ध्वज काढून त्या जागी तिरंगा लावला जाईल याची बातही करत नाहीत. तो राहीलच! अन्यत्र तिरंगा जिथे असेल तिथे त्याच्या सम्मान राखू असे ते म्हणत आहेत. म्हणजे गोळवलकर यांची भूमिका आजही संघाला मंजूर असून तो तिरंग्याला केवळ प्रसंग म्हणून मान देतो आहे. केवळ नाईलाज आहे, अन्यथा… असा भाव भागवतांच्या या भाषणात आहे.
आता बोला! भागवतांना तिरंग्याची बात करतानासुद्धा नेहरू, काँग्रेस, अधिवेशन, ध्वजसमिती हे अत्यंत नावडते टेकू घेऊन बोलावे लागले. याचा अर्थ स्वातंत्र्य चळवळ, तिरंगा, राज्यघटना, तुरुंगवास आदी मुद्द्यांचा संबंध आला की, भाजप व संघ गडबडतात. त्यांना कावरेबावरे होऊन वैयक्तिक हल्ले करावे लागतात. स्वातंत्र्यासारख्या जन्मसिद्ध हक्क नाकारण्याची कृतघ्नता आणि क्रौर्य संघ सदैव बाळगून आहे. पदोपदी त्याची तयारी स्वातंत्र्य आणि स्वाधीनता चिरडायची असते. कोठून येते ही अशी दुष्ट प्रेरणा? ब्राह्मणी वर्चस्व टिकवण्याच्या धडपडीतून आणि सामाजिक विषमता कायम करण्याच्या खटपटीतून. बाकी संघापाशी उरते काय? ते जे काही असते तो एक देखावा व बनाव आहे आहे. अमृत महोत्सव प्रत्यक्षात अनृत महोत्सव आहे.
..................................................................................................................................................................
लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.
djaidev1957@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Vivek Date
Wed , 24 August 2022
You are correct in stating that RSS had no role in the national flag design and since the Indian National Flag was adopted by the Constituent Assembly in 1947, their party elected under the constitution have to accept the reality and respect the flag. Wikipedia search tells us that - Pingali Venkayya (2 August 1876/8[1][2] – 4 July 1963) was an Indian freedom fighter and a Gandhian. He is known for designing the Swaraj Flag, used by Mahatma Gandhi during the Indian independence movement and later modified by Surayya Tyabji into the Flag of India. He was also as a lecturer, author, geologist, educationalist, agriculturist, and a polyglot. She is daughter of Badruddin Tyabji.