अवैध गर्भपातांचा कारखाना असलेल्या म्हैसाळला एक वेगळाही इतिहास आहे!
पडघम - कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
टीम अक्षरनामा
  • ‘म्हैसाळ : दलितमुक्तीचा एक प्रयोग’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील चित्र
  • Wed , 15 March 2017
  • पडघम कोमविप म्हैसाळ Mhaisal म्हैसाळ : दलितमुक्तीचा एक प्रयोग Mhaisal-Dalit Mukticha yak prayog मुधकरराव देवल Madhukarrao dewal सहकारी शेती

या महिन्याच्या एक तारखेला सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ हे गाव एकदम प्रकाशझोतात आलं. या गावातील भारती हॉस्पिलटमध्ये अवैध गर्भपात करत असताना १ मार्च रोजी स्वाती जमदाडे या २६ वर्षीय विवाहित तरुणीचा मृत्यू झाला. तिच्या नातेवाईकांनी त्यावरून हॉस्पिटलविरोधात पोलीस तक्रार केली आणि या हॉस्पिलटमध्ये होत असलेल्या अवैध गर्भपाताचं प्रकरण चव्हाट्यावर आलं. प्रसारमाध्यमांपासून विधानसभेपर्यंत सध्या गाजत असलेल्या या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर हॉस्पिटलच्या परिसरात पोलिसांना १० मृत अर्भकं सापडली आहेत. या प्रकारामुळे सध्या महाराष्ट्रभर मोठी खळबळ उडाली आहे. या क्रूर, हिंस्र गुन्ह्यातील उर्वरित आरोपांचा पोलिस तपास करत असून लवकरच त्यांनाही अटक केली जाईल. या प्रकरणाचा छडा लावला जाईल.

या प्रकारामुळे म्हैसाळ हे छोटंसं गाव सध्या चर्चेचा विषय झालं आहे. मात्र या गावाला एक इतिहास आहे. ७०-८०च्या दशकांत एका वेगळ्याच प्रयोगासाठी महाराष्ट्रभर, देशभर आणि काही प्रमाणात आंतरराष्ट्रीय पातळीवरही चांगल्या अर्थानं हे गाव चर्चेचा विषय झालं होतं. काय होता तो प्रयोग?

या प्रयोगाविषयी पुण्याच्या ‘भारतीय शिक्षणसंस्थे’मध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक असलेल्या आणि ‘ग्रामायण’ या ग्रामीण विकासासंदर्भात काम करणाऱ्या संस्थेचे एक अध्यक्ष वसंत देशपांडे यांनी १९८४ साली एक पुस्तक लिहिलं आहे. त्याचं नाव आहे – ‘म्हैसाळ : दलितमुक्तीचा एक प्रयोग’.

देशपांडे यांनी ‘देवल : व्यक्ती आणि विचार’ या दुसऱ्या प्रकरणात लिहिले आहे –

“जातिव्यवस्था मुळापासून नष्ट केली पाहिजे याबद्दल देवलांच्या मनात संदिग्धता नाही. ती सहजासहजी जाणार नाही; सातत्याने विधायक कार्य, प्रबोधन आणि संघर्ष या मार्गानेच ती जाईल, असे त्यांना वाटते… सामाजिक विषमतेबरोबर आर्थिक विषमताही घालविली पाहिजे असे त्यांचे मत आहे. पण त्यासाठी जमिनीचे राष्ट्रीयीकरण करणे त्यांना व्यवहार्य वाटत नाही. जमीनधारणेवर कमाल मर्यादा हवी. आज आहे त्यापेक्षा कमाल मर्यादा खाली आणावी. सर्वसाधारणपणे बागायत जमिनीवर पाच एकरांची मर्यादा असावी. कोरडवाहू जमिनीवरील कमाल मर्यादा पावसाचे प्रमाण पाहून ठरवावी. अतिरिक्त जमीन दलित आणि भूमिहीन यांना वाटून द्यावी. मात्र अशी जमीन व्यक्तिगत पायावर कसण्यास देऊ नये. सहकारी तत्त्वावरच या जमिनी कसण्याचे त्यांच्यावर बंधन असावे. अल्पभूधारकांना सामुदायिक शेतीशिवाय भविष्य नाही. सामुदायिक शेतीतून आर्थिक आणि सामाजिक बळ या वर्गाला प्राप्त होईल. विषमता घालवण्यावर हाच एक उपाय आहे असे देवलांचे ठाम मत आहे… दलितांना आर्थिक उपक्रमांभोवती संघटित करणे आणि एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनाच पुढाकार घेण्यास प्रवृत्त करणे हे त्यांच्या कार्यपद्धतीचे सार सांगता येईल. ”

हे देवल म्हणजे मधुकरराव देवल. ते मूळचे म्हैसाळचेच. त्यांची या गावात शेती होती. काही वर्षं राष्ट्रीय स्वयंसेवक संघात त्यांनी काम केलं. पण तिथं त्यांचं मन रमलं नाही. मग त्यांनी म्हैसाळला परतून दलितांसाठी काम करायचं ठरवलं. दोन दशकांत एक महत्त्वाचं काम उभं करून दाखवलं.

या पुस्तकाला ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांची प्रस्तावना आहे. त्यात ते लिहितात –

“म्हैसाळ-प्रकल्पाचे वेगळेपण माझ्या दृष्टीने कोणते होते?

तेथे वारंवार पोचून खात्री करून घेतल्यावर मला जाणवले होते ते असे : एक तर खरेच देवलांसारख्या ‘बाहेरच्या’ माणसाला मार्गदर्शक आणि मित्र म्हणून म्हैसाळच्या बहुसंख्य दलितांनी मनापासून स्वीकारले होते. त्याचे मार्गदर्शन पत्करले होते. त्याच्या मागून काही मार्ग नेकीने आक्रमिला होता.

‘बाहेरचा’ म्हणजे बाहेरून आलेला किंवा दलितांपुरते बोलायचे तर उच्चवर्णीय; त्यातही ‘ब्राह्मण’ आणि तोदेखील जुना ‘संघ’पंथीय ‘हिंदू’ ब्राह्मण.

अनुभव असा की, ‘बाहेर’च्या माणसाने कितीही नि:स्वार्थपणे, इतकेच नव्हे तर पदरमोड करून काम केले तरी समाजाच्या तळागाळातली माणसे त्याच्याविषयी काही प्रमाणात साशंकच राहतात. ‘इतर उद्योग सोडून हा इथे का?’ हा प्रश्न त्यांच्या मनात, काही प्रमाणात त्या ‘बाहरे’च्याला अनुसरतानाही, घोळत असतो. पुढे या प्रश्नातून एखादे गाऱ्हाणेदेखील तयार होते. असंतोष धुमसण्याला आरंभ होतो. स्वार्थाचे आरोप त्या ‘बाहेर’च्यावर होऊ शकतात. संबंध बिघडतात. काम बिनसते.

देवलांच्या बाबतीत हे का होऊ नये?

याचे मुख्य कारण माझ्या मते देवलच आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात कामसूपणाबरोबर एक प्रकारचा अलिप्तपणा आणि परखडपणा आहे. आपण काढलेले किंवा केलेले काम आपणच व्यापावे हा जो कर्तबगार माणसांचा गुणधर्म, तो देवलांमध्ये नाही. ते कामात असूनही काहीसे अलिप्त असतात. अंग मोडून इतरांबरोबर काम करतानाच इतर आपल्या बरोबरीने काम करीत आहेत की नाहीत हे पाहतात. अशा प्रकारे इतरांवर अनेकार्थांनी त्यांचे लक्ष असल्याने ते स्वयंकेंद्रित होत नाहीत; त्याचबरोबर इतरांशी त्यांचे एक चांगले  ‘नाते’ तयार होते. म्हैसाळच्या प्रमुख दलितांशी देवलांचे असे ‘नाते’ मला जाणवले आहे…

म्हैसाळचा सहकारी शेती प्रकल्प हा त्यांच्या जगण्याचा ‘केंद्रबिंदू’ झाला नाही; तो त्यांचा एक महत्त्वाचा प्रयोग राहत आला, इतकेच. यामुळे ‘देवल म्हणजे श्रीविठ्ठल सहकारी शेती सोसायटी’ असे समीकरण – आणि त्यामुळे होऊ शकणारे संभाव्य तोटे – टळले…

म्हैसाळ-प्रकल्पासाठी, दलितांच्या गहाण पडलेल्या जमिनी देवलांनी सावकारांकडून सोडवून घेतल्या हा इतिहास वाटतो तितका साधा नाही. सावकारांनी त्या का सोडल्या? गहाण घेऊन कसाला आणलेली जमीन कोठला सावकार बऱ्या बोलाने सोडील? आणि या जमिनी परत न मिळत्या तर दलितांची विठ्ठल सहकारी सोसायटी अस्तित्वातच आली नसती. जमिनी दलितांना परत मिळाल्या यात देवलांचा वाटा मोठा मानला जातो. सावकारांची समजूत त्यांनी पटवली…

म्हैसाळमधल्या कार्यकर्त्या दलितांमध्ये जशी एक अस्मिता आणि आत्मविश्वास दिसला तसा म्हैसाळमधल्या आणि आसपासच्याही बहुसंख्य उच्चवर्णीयांमध्ये दलितांच्याविषयी एक दबदबा जाणवला. सहकारी पायावर दलितांना केलेल्या प्रगतीचे कौतुक करताना किंवा त्याविषयी परोक्ष-अपरोक्ष कुत्सित बोलताना, हा दलित हा  इतउप्पर ‘दलित’ राहिलेला नाही याची जाणीव ठसठशीतपणे व्यक्त होई. कुत्सितपणाची जागा क्वचित असूया घेई. ग्रामीण भागात वावरलेल्या कोणालाही यातली अपूर्वाई तेव्हाच उमगेल. सहकारी शेती सोसायटीच्या प्रयोगाने म्हैसाळचा दलित केवळ माणसात आला इतकेच नव्हे तर प्रतिष्ठित झाला, स्थानिक अर्थकारणात आणि राजकारणात तो सवर्णाच्या मांडीला मांडी लावून बसू शकतो, हे मी पाहिले.

दलिताला त्याच्या दलितपणातून केवळ आर्थिकदृष्ट्या नव्हे तर मानसिकदृष्ट्या बाहेर काढणे हे काम म्हैसाळपुरते सहकारी शेती सोसायटीच्या प्रयोगाने केले हा झाला या प्रयोगाच्या श्रेयाचा अर्धाच भाग. उरलेला अर्धादेखील दलितांसंबंधातल्या आजवरच्या प्रयोगांत, प्रकल्पांत आणि चळवळींत वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वाचा ठरावा असा होता. श्रीविठ्ठल शेती सहकारी सोसायटीने दलितांना प्रतिष्ठित बनवतानाच दलितेतर गरजू गरिबांना आर्थिक बळ पुरवण्याचे काम आरंभले. मराठा समाजापासून मांग जातीपर्यंत अनेकांना सोसायटीने कर्जमुक्त होण्याला मदत केली…

म्हैसाळच्या प्रकल्पात मला केवळ ‘शेतकरी’ दलित भेटले नाहीत, तर ‘व्यवस्थापक’ दलित भेटले. सहकारी सोसायटीचे व्यवहार दलित बघत होते, व्यवस्थापनाच्या भाषेत ते बोलते होते. जनरल बॉडी आणि गव्हर्निंग कौन्सिलच्या मीटिंगा चालवत होते. ग्रामीण दलितांचे असे रूप महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या इतर भागांत अद्यापीही अपरिचित आहे. यातही विशेष हे की व्यवस्थापनात एका दलित स्त्रीला सहभाग देण्यात आला होता.”

सामुदायिक शेतीचा प्रयोग आणि ग्रामीण भागातील दलितांचं आर्थिक स्वावलंबन करत त्यांना आत्मनिर्भर करण्याचा केवळ विचार देवल यांनी बोलून दाखवला नाही तर तो त्यांनी म्हैसाळमध्ये प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करून दाखवला. “दलितांचे आर्थिक जीवन स्वतंत्र आणि भक्कम पायावर उभे करमे, त्यासाठी त्यांना संघिटत करून सामूहिक कृत्तीस प्रवृत्त करणे, सर्व दलित आणि गरीब गावकऱ्यांना मदतीचा हात देऊन एकत्रित आणणे आणि दलित-दलितेतर यांमध्ये सामंजस्य निर्माण करणे, अशी उद्दिष्टे डोळ्यापुढे ठेवून देवलांनी कामास सुरुवात केली,” असे देशपांडे यांनी तिसऱ्या प्रकरणाच्या सुरुवातीला लिहिले आहे.

पु.ल.देशपांडे यांनी एके ठिकाणी म्हटलं आहे की, “काही वर्षापूर्वी मी सांगलीजवळ म्हैसाळ म्हणून गाव आहे, तिथे मधुकरराव देवल यांनी दलितांच्या सहकारी शेती संस्थेचा प्रयोग केला आहे, तो पाहायला गेलो होतो. भारतातल्या उत्तम ग्रामीण प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प आहे. एक काळ असा होता की, वस्तीतल्या स्त्रियांच्या अंगावर लज्जरक्षणापुरतीही वस्त्रं नसायची म्हणून त्यांना झोपडीबाहेर पडणं मुष्किल होतं. तिथे आम्ही गेलो त्या दलित वस्तीतली सर्व स्त्री-पुरुष मंडळी लग्नसमारंभाला जावं तसा पोषाख करून जमली होती. सहकारी शेतीने त्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडवून आणलं होतं आणि ते केवळ आर्थिक परिवर्तनच नव्हतं हे लगेच माझ्या लक्षात आलं.”

पुलंच्या म्हणण्याचा प्रत्यय या छोट्याशा पुस्तकातून येतो. या पुस्तकाचा अजून तपशीलवर परिचय करून देता येईल किंवा या प्रयोगाबाबतचे कुतूहल शमेल असा त्यातील निवडक भाग अजूनही देता येईल. तो मोह जाणीवपूर्वक आवरून आपण हे पुस्तक वाचावे, असे सुचवावेसे वाटते.

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यापासून सहा मैलांवर असलेलं हे छोटंसं गाव. सध्या भलत्याच कारणाने चर्चेत आलं असलं तरी या गावात एकेकाळी एक महत्त्वाचं सामाजिक मन्वंतर घडून आलं होतं. त्यामुळे सध्याच्या अमानुष उदाहरणावरून आपण या गावाची पारख करू नये. तर ती सामाजिक सौहार्दाचा एक यशस्वी प्रयोग करून स्वत:ची दखल घ्यायला लावणारं गाव म्हणून करावी. कधी काळी तुम्ही सांगलीला गेलात तर या गावाला आवर्जून भेट द्या. या प्रयोगाविषयी जाणून घ्या.

आजघडीला अशा प्रकारच्या प्रयोगाची प्रासंगिकता राहिलेली नाही, हे खरं, पण म्हणून या प्रयोगाचं मोल कमी होत नाही. जरी आज तो राहिलेला नसला तरी.

……………………………………………………………………………………..

म्हैसाळ : दलितमुक्तीचा एक प्रयोग – वसंत देशपांडे, मौज प्रकाशन, गृह, मुंबई, पाने – ११८, मूल्य – २० रुपये

………………………………………………………………………………………..

ऑनलाईन खरेदीसाठी लिंक -

http://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b11333&lang=marathi

………………………………………………………………………………………..

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......