खरा ‘स्वातंत्र्य दिन’ कोणता, हा प्रश्न व्हॉट्सपींसाठीच बिकट झालाय. कारण २१ ऑक्टोबर १९४३च्या आणि २०१४च्या स्वातंत्र्याबद्दल संदेश पाठवणारे व्हॉटसपी एकच होते…
पडघम - देशकारण
लोकेश शेवडे
  • महात्मा गांधी, भारताचा तिरंगा, पंडित नेहरू आणि सुभाषचंद्र बोस
  • Sat , 06 August 2022
  • पडघम देशकारण महात्मा गांधी भारताचा तिरंगा पंडित नेहरू सुभाषचंद्र बोस

गेले काही दिवस व्हॉट्सप आणि अन्य समाजमाध्यमांवर ‘आझादी ७५’, ‘स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या शुभेच्छा’पासून ‘घरोघरी झेंडावंदन’ अशा संदेशांचा रतीब सुरू आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या या अमृतमहोत्सवी वर्षादरम्यानच काही महिन्यांपूर्वी, काही लक्षवेधेच्छुक सिने तारे-तारकांनी “१९४७ साली स्वातंत्र्य मिळालंच नव्हतं, खरं स्वातंत्र्य २०१४ साली मिळालं” अशा आशयाचं ज्ञानामृत पाजलं होतं आणि समाजमाध्यमांतल्या मजकुराला ‘ज्ञान’ मानणाऱ्या व्हॉट्सपींनी या ताऱ्यांच्या समर्थनार्थ, २०१४ साल आणि त्यातल्या स्वातंत्र्य दिनाशी निगडित मजकूर फॉरवर्ड करून त्या ज्ञानाचं इमानेइतबारे वाटप केलं होतं.

मी ‘फॉर्वडेड’ संदेश फारसे पाहत नाही आणि दिनाबिनाच्या शुभेच्छा तर अजिबातच पाहत नाही. पहिल्या ओळीत काही वेगळेपणा आढळला, तरच तो संदेश उघडून पाहतो. त्यामुळे तेव्हा आणि आताही संदेश पाहण्याची इच्छादेखील झाली नाही. पण सध्याच्या या संदेशांवरून चारेक वर्षांपूर्वीचे असेच थप्पीनं आलेले ‘स्वातंत्र्य दिन शुभेच्छा’ फॉर्वर्डस आठवले. २०१८ साली कधीतरी व्हॉट्सपवर माझ्यासकट अनेकांना ढीगभर संदेश आले होते. या सर्व व्हॉट्सप संदेशांत पहिली ओळ ‘खऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवाच्या शुभेच्छा’ अशी दिसत होती. मला आश्चर्य वाटलं, कारण तो काही ऑगस्ट महिना नव्हता आणि साल २०१८ होतं, म्हणजे स्वातंत्र्य मिळून ७१ वर्षं झाली होती. मग आज स्वातंत्र्य दिन कसा आणि तोही अमृतमहोत्सवी कसा? शेवटी कुतूहलानं मी त्यातले काही संदेश उघडले -

‘‘खऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवाच्या शुभेच्छा’ : मित्रहो, आज २१ ऑक्टोबर २०१८. बरोब्बर ७५ वर्षांपूर्वी, १९४३ साली याच दिवशी स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस यांनी भारत स्वतंत्र झाल्याची घोषणा करून ‘आझाद हिंद’ सरकार स्थापन केलं होतं. पण भारतीय स्वातंत्र्याचं श्रेय सुभाषबाबूंना मिळू नये, म्हणून हे ऐतिहासिक सत्य काही स्वार्थी लोकांनी लपवून ठेवलं. त्यापूर्वी त्याच लोकांनी सुभाषबाबूंसारख्या महान नेत्याला पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला भाग पाडलं. सुभाषबाबूंनी मिळवलेलं हे खरं स्वातंत्र्य चार वर्षं गुप्त ठेवून, ब्रिटिशांशी समझोता करून, याच स्वार्थी लोकांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य जाहीर केलं आणि स्वातंत्र्याचं श्रेय लाटलं. स्वातंत्र्य दिनाचा हा खरा इतिहास आपल्याला कधी सांगितला गेला नाही....”

९ ऑक्टोबर १९४३ रोजी जपानी मंत्रीमंडळाने सुभाषबाबूंच्या हंगामी सरकार स्थापण्यासंबंधीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. सुभाषबाबू तेव्हा जपानी सेनाव्याप्त सिंगापूरमध्ये होते. २१ ऑक्टोबर रोजी सिंगापूरमधल्या कॅथे सिनेमागृहात सुभाषबाबूंनी आझाद हिंद हंगामी सरकार स्थापन केलं. नेताजी सुभाषचंद्र बोस हे या सरकारचे राष्ट्रप्रमुख होते तर मंत्रीमंडळात आझाद हिंद सेनेचे सात प्रतिनिधी होते....  वगैरे बराचसा इतिहास मी शाळेत असताना, म्हणजे १९७२ पूर्वी कधीतरी शालेय पुस्तकातच वाचला होता.

त्याच काळी शालेय ग्रंथालयातल्या पुस्तकात काँग्रेसच्या अध्यक्षपदाची झालेली निवडणूक, त्यात गांधीजींचा विरोध असूनही सुभाषबाबूंचा झालेला विजय आणि त्यानंतर त्यांनी दिलेला राजीनामा, हेदेखील उल्लेख नजरेखालून गेले होते. मग लपवून काय ठेवलं होतं? कोणता इतिहास आम्हाला सांगितला गेला नव्हता? असे प्रश्न पडत असतानाच काही व्हिडियो क्लिप्स आणि लिंक्सदेखील व्हॉट्सपवर आल्या. त्यातल्या बहुतांश लिंक्स-क्लिप्स विविध नेत्यांच्या भाषणांच्या होत्या. त्यात बहुतांश नेत्यांच्या अंगात जाकीट आणि डोक्यांवर सुभाषबाबूंची आझाद हिंद सेनेची टोपी होती. काही नेते, ‘सुभाषबाबूंना राजीनामा द्यावा लागला’, ‘खरं स्वातंत्र्य त्यांनीच मिळवलं’, ‘खरा स्वातंत्र्यदिन २१ ऑक्टोबर १९४३ हाच होता’, ‘खरा इतिहास लपवला गेला’, ‘खरा इतिहास कोणी सांगितला नाही’ असं ओक्सबोक्शी सांगत होते. आणि ‘आम्ही सत्य उघडकीस आणतोय’, ‘खरा इतिहास आम्ही सांगतोय...’ असं गुरगुरत होते.

त्यातल्याच कुठल्या तरी जुन्या क्लिपमध्ये कोणीतरी अचानक ‘गांधीजींनी स्वातंत्र्यानंतर काँग्रेस विसर्जित करा असं सांगितलं होतं....’ असंही खिंकाळला. तथापि त्या गुरगुरण्यातून-खिंकाळण्यातून नवीन सत्य किंवा इतिहास, यापैकी काहीच बाहेर येत नव्हतं. परिणामतः त्या सर्व जाकिटी नेत्यांच्या ‘ऐतिहासिक’ आक्रंदनामुळे आपल्याला काय काय सांगितलं गेलं नाही, हे आक्रंदक नेते नेमकं नवीन काय सांगताहेत, आपल्यापासून काय काय लपवलं गेलं आणि सर्वांत महत्त्वाचं, कोणी लपवलं? याचा शोध नकळत सुरू झाला. आणि सुभाषबाबूंशी निगडित स्वातंत्र्यदिनाविषयी शालेय पुस्तकांबरोबरच अन्य पुस्तकांत वाचलेला मजकूरही आठवू लागला....  

सुभाषबाबू १९ फेब्रुवारी १९३८ रोजी सुरू होणाऱ्या काँग्रेसच्या हरिपुरा (गुजरात) अधिवेशनाचे अध्यक्ष बनले होते. पुढे काँग्रेसच्या त्रिपुरी अधिवेशनाच्या अध्यक्षपदीही निवडून आले. तथापि नंतर गांधीजींशी मतभेद होऊन एप्रिल १९३९मध्ये त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यानंतर कलकत्त्यातल्या राहत्या घरातून १६ जानेवारी १९४१ रोजी निसटून पेशावर, काबुल, मॉस्को मार्गे बर्लिन गाठल्यावर सुभाषबाबूंच्या नियोजित ‘आझाद हिंद’बाबत पहिली बैठक १९४१ नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात संपन्न झाली. आझाद हिंद सेनेच्या संरचनेस-स्थापनेस हिटलरकडून मंजुरी १९ डिसेंबर १९४१ रोजी मिळाली.

९ ऑगस्ट १९४२ रोजी गांधीजींनी ‘चले जाव’ आंदोलन सुरू केल्यावर त्यासंबंधी ३१ ऑगस्ट रोजी सुभाषबाबूंनी बर्लिन ‘आझाद हिंद’ रेडियोवरून भाषण दिलं. ८ फेब्रुवारी १९४३ रोजी सुभाषबाबू पाणबुडीतून मलायाला निघाले. जुलै १९४३मध्ये सिंगापूरला येऊन त्यांनी आझाद हिंद सेनेची अधिकृत स्थापना करून  २१ ऑक्टोबर १९४३ रोजी हंगामी (आझाद हिंद) सरकार स्थापन केलं आणि ब्रिटिशांशी युद्ध करण्यासाठी आझाद हिंद सेनेला निधी देण्याचं लोकांना आवाहन केलं.

५ नोव्हेंबर १९४३ रोजी टोकियोमध्ये आयोजित झालेल्या बृहृद पूर्व आशिया परिषदेत नेताजींच्या भाषणानंतर परिषदेत भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला पाठींबा देणारा ठराव एकमतानं मंजूर झाला. यानंतर १५ मार्च १९४४ रोजी आझाद हिंद सेनेनं इंफाळच्या दिशेनं चढाई सुरू केली आणि ६ जुलै १९४४ रोजी रंगूनच्या आझाद हिंद रेडियोवरून आपली भूमिका विशद केली. तथापि मार्च १९४५नंतर युद्धाची परिस्थिती पालटल्यामुळे सुभाषबाबूंना सिंगापूरला परतावं लागलं. तिथेच १५ ऑगस्ट रोजी आझाद हिंद सरकारची बैठक सुरू असताना टोकियो रेडियोवरून जपानची शरणागती जाहीर झाली. ही आझाद हिंद सरकारची शेवटची बैठक ठरली, कारण पुढच्या प्रवासात सुभाषबाबूंच्या विमानाला अपघात होऊन त्यात १८ ऑगस्ट १९४५ रोजी त्यांचं निधन झालं.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

हा सारा इतिहास पूर्वीपासून वेगवेगळ्या पुस्तकांतून वाचण्यासाठी उपलब्ध होताच. किंबहुना, हे ‘आझाद हिंद शिरस्त्राण धारक वक्ते’ जे काही सांगत होते, त्यापेक्षा हा इतिहास बराच जास्त तपशीलवार होता. त्यामुळे हे यूट्यूबी नेते नवीन काय सांगताहेत? आणि, लपवलं काय? कोणी? - हे प्रश्न उरलेच!  परिणामतः शालेय काळापासून वाचलेल्या विविध पुस्तकांतल्या इतिहासाचा आणखी काही सूक्ष्म तपशीलही अभावितपणे क्रमवारीनं आठवू लागला....

१) भारताचा ‘स्वातंत्र्य दिन’ पहिल्यांदा जाहीर झाला, तो सुभाषबाबूंच्या उपस्थितीतच, पण तो २१ ऑक्टोबर १९४३ रोजी नव्हे, तर ३१ डिसेंबर १९२९ रोजी नेहरूंच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनात. ब्रिटिश सरकारला गांधीजींनी केलेल्या ‘संपूर्ण स्वराज्या’च्या मागणीची मुदत या दिवशी संपत होती, म्हणून २६ जानेवारी १९३० हा ‘स्वातंत्र्य दिन’ जाहीर करण्याचा ठराव एकमताने संमत झाला होता. त्याच मध्यरात्री रावी नदीच्या तीरावर स्वातंत्र्याचा जयघोष करत तिरंगा ध्वज फडकावला गेला. सुभाषबाबू तेव्हा ट्रेंड युनियन काँग्रेसचे (आयटक) अध्यक्ष होते. त्यांनी हाजरा पार्क मैदानावर कामगारांची सभा घेऊन पहिल्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वतयारीला प्रारंभ केला. पण त्यांनी चार महिन्यांपूर्वी केलेल्या निदर्शनाचं कारण देत सरकारनं २३ जानेवारीला (सुभाषबाबूंच्या ३३व्या वाढदिवशी) त्यांची तुरुंगात रवानगी केली. हा स्वातंत्र्य दिन त्यांनी तुरुंगातच साजरा केला (नेताजी : वि.स. वाळिंबे - पृ १५२-१५६, कहाणी सुभाषचंद्रांची : य.दि. फडके - पृ २५६-२६२)

२६ जानेवारी १९३० नंतर सुभाषबाबू हा दिवस नेमानं ‘स्वातंत्र्य दिन’ म्हणून यथाशक्ती साजरा करत. नोव्हेंबर १९४१मध्ये झालेल्या आझाद हिंद बाबतच्या पहिल्या बैठकीत ‘जनगणमन’ हे राष्ट्रगीत आणि तत्कालीन काँग्रेसचा ‘तिरंगा’ हा राष्ट्रीय ध्वज आणि ‘जय हिंद’ हे अभिवादन ठरलं. हिटलरच्या मंजुरीनंतर आझाद हिंद सेनेची उभारणी सुरू झाल्यावर पहिला कार्यक्रम साजरा करण्यात आला, तो २६ जानेवारी या स्वातंत्र्यदिनाचा १२वा वर्धापन दिन! (नेताजी : पृ. ४२६-४३०) २१ ऑक्टोबर १९४३ रोजी आझाद हिंद सरकार स्थापन केल्यानंतरदेखील इंफाळवर चढाई करण्यापूर्वी रंगूनमध्ये आझाद हिंद सेनेसह नेताजींनी २६ जानेवारी १९४४ रोजीच ‘भारताचा स्वातंत्र्यदिन’ साजरा केला. (कहाणी नेताजींची : य.दि.फडके : पृ. २४४)

२) काँग्रेसच्या हरिपुरा अधिवेशनाचे सुभाषबाबू अध्यक्ष बनले, पण ते निवडणूक लढवून नव्हे, तर गांधीजींनी नेमलं म्हणून. त्या वेळी सुभाषबाबू लंडनमध्ये होते, तिथे त्यांना तारेनं कळवण्यात आलं. (नेताजी : पृ. २४७/२४८, कहाणी सुभाषचंद्रांची : पृ. ३७९) तेव्हा कधीतरी गांधीजी ‘स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेसची गरज नाही’ असं म्हणाले होते. या मुद्द्याला सुभाषबाबूंनी अधिवेशनाच्या अध्यक्षीय भाषणात उत्तर दिलं होतं, “हिंदुस्थान स्वतंत्र झाल्यावर काँग्रेसचं विसर्जन करण्यात यावं, असं काही जण म्हणतात. पण मला ते मान्य नाही. या संबंधात माझं मत असं आहे की, जो पक्ष हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देईल, त्यानंच नंतर पुनर्रचना अंमलात आणायची जबाबदारी घ्यावी.” (ने : २५१, कसु : ३८६)

३) १६ जानेवारी १९४१ रोजी कलकत्त्याहून निसटून वेषांतर करून मॉस्को-बर्लिनपर्यंत सुभाषबाबू गेले, पण एकटे नव्हे. त्यासाठी भगतराम खेरीज मियाँ अकबर शहा, महम्मद शहा, अबदखान, हाजी महम्मद अमीन, हाजी अली सुभान, मोहम्मद याकूब या मुस्लिम लोकांनी आपला जीव गहाण टाकून सुभाषबाबूंना सोबत आणि मदत केली होती. (ने : ३५२-४०८, कसु : ४६६-४६८, कने : १-२५)

४) ३१ ऑगस्ट १९४२ रोजी बर्लिन आझाद हिंद रेडिओवरून दिलेल्या भाषणांत नेताजींनी गांधीजींच्या ‘चले जाव’ या स्वातंत्र्यलढ्यात सामील होण्यासाठी सर्व जनतेला आवाहन केलं. आणि म्हणाले, “ब्रिटिशांबरोबर तडजोड करावी असं म्हणणाऱ्या जिना, सावरकर आणि त्यांच्यासारख्या नेत्यांना माझी कळकळीची विनंती आहे. उद्याच्या जगात ब्रिटिश साम्राज्य अस्तित्वातच राहणार नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावं. जे पक्ष, गट किंवा व्यक्ती या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होतील त्यांनाच उद्याच्या स्वतंत्र भारतात मानाचं स्थान मिळेल. ब्रिटिश साम्राज्यवाद्यांच्या पाठीराख्यांना कसलंच स्थान उरणार नाही.” (ने : ४५१, कने : १२५/१२६) 

५) १९४३च्या फेब्रुवारीत सुभाषबाबू पाणबुडीतून निघाले, तो प्रवास तब्बल ८८ दिवसांचा होता आणि त्यांना एकाच व्यक्तीला सोबत नेणं शक्य होतं. त्यांनी त्यासाठी निवड केली ‘अबिद हसन’ या मुस्लीम व्यक्तीची! (ने : ४५४, कने : १५६)

६) २१ ऑक्टोबर १९४३ रोजी स्थापन केलेल्या ‘आझाद हिंद सरकार’मध्ये सुभाषचंद्र बोस हे राष्ट्रप्रमुख, पंतप्रधान, परराष्ट्रमंत्री व युद्धमंत्री होते, तर आझाद हिंद सेनेचे सात प्रतिनिधी होते- त्यातले तीन हिंदू व चार मुस्लीम होते, सहा सल्लागार होते- त्यातले तीन हिंदू, एक ख्रिश्चन व दोन मुस्लीम होते. आझाद हिंद सरकारचे ब्रीद होतं- ‘इत्तेहाद, इत्तमाद और कुर्बानी’. आझाद हिंद सेनेला निधी देण्यासाठी नेताजींनी आवाहन केल्यावर देणग्यांचा वर्षाव होऊ लागला, अनेकांनी अंगावरचे दागिने उतरवून दिले. त्यात सर्वांत मोठी रक्कम (एक कोटी रुपये) देणाऱ्या देणगीदाराचं नाव होतं- मेमन अब्दुल युसूफ हबीब मर्फानी. हबीबसाहेबांना सुभाषबाबूंनी आझाद हिंद सरकारतर्फे ‘सेवक-ए-हिंद’ हा किताब बहाल केला. (ने : ४९३, कने : २८७)

७) नोव्हेंबर १९४३मधल्या बृहृद पूर्व आशिया परिषदेतल्या नेताजींच्या भाषणानंतर परिषदेचे जपानचे पंतप्रधान टोजो म्हणाले, “भारत स्वतंत्र झाल्यावर तिथं नेताजी सर्वेसर्वा ठरतील.” हे ऐकताच नेताजींनी ताडकन उठून खुलासा केला, “स्वतंत्र भारतात सर्वाधिकाऱ्याची निवड करण्याचा अधिकार अन्य कुणालाही नसून फक्त भारतीय जनतेला आहे. भारतीय लोकांची तशी इच्छा  असल्यामुळेच आजही महात्मा गांधी, मौलाना आझाद, जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल हे भारताचं नेतृत्व करत आहेत.”  (कने : २१५) 

८) १५ मार्च १९४४ रोजी ब्रह्मदेशातून इंफाळवर चढाईची सुरुवात करताना, सुभाषबाबूंनी सेनेच्या पहिल्या तीन ब्रिगेडची नावं ‘गांधी ब्रिगेड’, ‘नेहरू ब्रिगेड’ व ‘आझाद ब्रिगेड’ अशी ठेवली आणि ६ जुलै १९४४ रोजी आझाद हिंद रेडियोच्या रंगून केंद्रावरून त्यांनी आपली भूमिका विशद केली, “शत्रू (ब्रिटिश) बाहेर गेला की आमच्या ‘हंगामी’ सरकारचं काम पूर्ण झालं असं आम्ही समजू आणि लगेच त्याचं विसर्जन करू. स्वतंत्र हिंदुस्थानचं स्थायी सरकार जनतेनंच निवडून द्यायचं आहे असंच मी मानतो.” या भाषणाच्या अखेरीस त्यांनी गांधीजींना साद घातली- “राष्ट्रपिता, आम्हाला तुमचे आशीर्वाद हवेत!!” गांधीजींना ‘राष्ट्रपिता’ हे संबोधन सर्वप्रथम वापरणारे सुभाषचंद्र बोस आणि ‘महात्मा’ हे संबोधन सर्वप्रथम वापरणारे रवींद्रनाथ टागोर हे दोघंही योगायोगानं बंगालीच! (ने : ४८७, कसु : ४३)

९) युद्ध परिस्थिती पालटल्यावर नेताजींना ब्रह्मदेशातून सिंगापूरला परतावं लागलं. जपानने शरणागती पत्करल्यावर त्यांनी तिथून निसटून सायगाव (व्हिएतनाम) मार्गे तैपेई (तैवान -तत्कालीन फॉर्मोसा)वरून पुढे मांचुरियावाटे रशियाला जाण्यासाठी निघाले. त्यांच्याबरोबर सल्लागार म्हणून त्यांनी सहा जणांना निवडलं होतं. तथापि विमानात त्यांच्याखेरीज आणखी एकाचीच जागा शिल्लक असल्यामुळे त्यांनी त्यातल्या हबीबूर रहमान यांची निवड केली. या प्रवासात नेताजींना अपघाती मृत्यू आला. मरणाच्या दारापर्यंत नेताजींनी भरवशाचा साथीदार म्हणून एका मुस्लिमाचीच निवड केली होती. (ने : ५२७, कने : ३६९-३७१)

हा सारा इतिहास पूर्वीच अनेकदा वाचला होता - तो पूर्ण आठवला, तरीही या प्रश्नांची उत्तरं मिळालीच नाहीत की, खरा स्वातंत्र्यदिन कोणता? स्वातंत्र्यदिन आणि सुभाषबाबू यांच्याबाबतीत ‘खरा इतिहास’ सांगितला नाही, तो नेमका कुठला? लपवलं काय आणि कोणी लपवलं? उलट, काही लपवलं असेलच तर हे ‘जाकिटी आक्रंदक’ ते का सांगत नाहीत हा नवीनच प्रश्न उपस्थित झाला!

याखेरीज, सुभाषबाबू आझाद हिंद सेना उभारत असतानाच्या काळात, गांधीजींच्या अहिंसेवर टीका करत सैनिकी प्रशिक्षणावर व्याख्यानं झोडणारे आणि गणवेशासह कवायत करत राष्ट्रसेवेचा डिंडिम पिटणारे काही संघ आणि पक्षांचे नेते भारतात अस्तित्वात होते. त्यांची नावं आझाद हिंद सेनेच्या ब्रिगेड्सना सुभाषबाबूंनी का दिली नाहीत? हाही प्रश्न पडला तो अलाहिदा!!  

असो. खरा स्वातंत्र्यदिन कोणता, हा प्रश्न मात्र फक्त व्हॉट्सपींसाठीच बिकट झाला. कारण २१ ऑक्टोबर १९४३चा संदेश पाठवणारे आणि २०१४च्या स्वातंत्र्याबद्दल संदेश पाठवणारे व्हॉटसपी एकच होते... पण या प्रश्नाकडे जनतेनं लक्ष देण्याची गरज नाही. कारण तो व्हॉटसपी आणि जाकिटी त्यांच्या त्यांच्यात  सोडवतील किंवा उद्या कदाचित प्रजासत्ताक दिनाबद्दलही नवा प्रश्न उभा करतील! एकंदरीत, त्यांच्या नित्यनवीन तारखांपेक्षा आपल्यासारख्या सामान्यांसाठी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीच महत्त्वाचे!

.............................................................................................................................................

लेखक लोकेश शेवडे नाशिकस्थित उद्योजक आहेत.

lokeshshevade@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......