लेखांक बाविसावा
उत्तरमेघ
(लेखातला पहिला मूळ संस्कृत श्लोक कालिदासाचा आणि त्याचे अनुवाद अनुक्रमे कुसुमाग्रज, सी.डी. देशमुख आणि शांता शेळके यांचे)
४१.
अङ्गेनाङ्गं प्रतनु तनुना गाढतप्तेन तप्तं
सास्रेणाश्रुद्रुतमविरतोत्कण्ठमुत्कण्ठितेन।
उष्णोच्छ्वासं समधिकतरोच्छ्वासिनादूरवर्ती
संकल्पैस्तैर्विशति विधिना वैरिणा रुद्धमार्गः
दैव साधतें वैर म्हणोनी दूर राहणें पडे
विरहीं झुरतों जळतो, पडती नित अश्रूंचे सडे
करुनि कल्पना विविध मनोमय देहलतेशीं तुझ्या
या देहानें मीलित व्हावें, छंद एक हा जडे!
अंगीं अंगा, कृाशिं अतिकृशा, तप्तिं दीप्तानलाते
सास्त्रीं अश्रु प्रचुर, सतत व्याकुलीं व्याकुलातें
उष्णोच्छ् वासीं वसत सुदुरीं दीर्घ निःश्वास देत
वैरी दैवें पथिं अडवितां लावितों कल्पनेत
वैर साधितो विधी त्यामुळें दुरावलेला सजण तुझा, गे.
कल्पनेंत तव संग अनुभवी, देइ तुला आलिंगन वेगें
अवयव भिडती घट्ट अवयवा, तनू तापल्या तनूस मिळते
श्वास उष्ण टाकतो सारखा व्याकुळ नयनीं जळ ओघळतें!
तिला सांग की, दूरदेशी असलेल्या तुझ्या प्रियकराची वाट दैवाने अडवून धरलेली आहे. तो अतिशय कृश झालेला आहे. त्याचे शरीर दुःखाने अत्यंत तप्त झालेले आहे. त्याचे डोळे अश्रूंनी सतत डबडबून गेलेले असतात. अत्यंत उत्कंठित अशा अवस्थेत तो दीर्घ निःश्वास सोडत असतो. आपल्या या अशा अवस्थेत तो तुझ्या दुःखाकुल आणि उष्ण निःश्वास सोडणाऱ्या तनूचा विचार सतत करत असतो. त्याला माहिती आहे की, तुझे डोळे सतत अश्रूंनी डवरलेले असतात आणि तुझे मन अखंड वेदनांनी व्यापून गेलेले असते. असा हा तुझा विरही प्रियकर अनेक मनोरथे रचून तुझ्या कृश आणि दुखी शरीराबरोबर आपल्या कल्पनेत मीलन पावत असतो.
चंद्रा राजन यांचा अनुवाद वाचण्यासारखा झाला आहे-
Far off, his way barred by
adverse decree,
in his imaginings
his body becomes one with your
body;
thin with thin,
anguished with intensely
anguished,
tear-drowned with tear-drenched
yearning with endlessly
yearning,
your hotly-sighing body
with his racked by long
drawn-out sighs.
खूप दूर, एका प्रतिकूल फर्मानाने त्याचा रस्ता अडवला गेला आहे. त्याच्या कल्पनेच्या राज्यात त्याचे शरीर तुझ्या शरीराबरोबर एक होते. कृश शरीर तुझ्या कृश शरीरामध्ये मिळून जाते. व्याकूळ झालेले सारे पराकोटीच्या व्याकूळ शरीरात मिळून जाते. तळमळणारे शरीर आठवणींनी तळमळत राहिलेल्या शरीरामध्ये मिळून जाते. तुझे उष्ण निःश्वास टाकणारे शरीर दीर्घ श्वासांनी उदध्वस्त झालेल्या त्याच्या शरीरात मिळून जाते.
कालिदासाच्या या सुंदर श्लोकाचा अनुवाद करताना चंद्रा राजन यांनी एक सुंदर कविताच लिहिली आहे.
सीडींनीसुद्धा याच धर्तीवर अनुवाद केलेला आहे-
‘अंगीं अंगा, कृाशिं अतिकृशा, तप्तिं दीप्तानलाते
सास्त्रीं अश्रु प्रचुर, सतत व्याकुलीं व्याकुलातें
उष्णोच्छ्वासीं वसत सुदुरीं दीर्घ निःश्वास देत
वैरी दैवें पथिं अडवितां लावितों कल्पनेत’
वैरी अशा दैवाने माझा पथ अडवलेला असताना माझ्या कल्पनेमध्ये मी तुझ्या अंगाला अंग लावतो आहे. कृशामध्ये अतिकृश मिळून जाते आहे. तप्त असलेल्या मध्ये ‘प्रदीप्त अनल’ म्हणजे तप्त वारा मिसळून जातो आहे. अश्रूंनी भरून गेलेल्या मध्ये अश्रूंनी प्रचूर असलेले मिळून जाते आहे. व्याकुळामध्ये सतत व्याकूळ असलेले मिळून जाते आहे. उष्ण अशा श्वासांबरोबर मी खूप दूरवर राहतो आहे आणि तिच्या दीर्घ निःश्वासांबरोबर माझे उष्ण श्वास सोडत आहे.
४२.
शब्दाख्येयं यदपि किल ते यः सखीनां पुरस्ता -
त्कर्णे लोलः कथयितुमभूदाननस्पर्शलोभात्।
सोऽतिक्रान्तः श्रवणविषयं लोचनाभ्यामदृष्ट –
स्त्वामुत्कण्ठाविरचितपदं ममुन्खेनेदमाह॥
रहस्य नसतां, जें न कथावें सख्यांपुढें येउन
कानगुजे जो उगाच, होण्या गालाशीं मीलन
श्रवण -दृष्टिच्या पलीकडे तो - अधीरतेंने तुला
मम वाणींने कळवित आहे व्यथित आपुलें मन.
बोलाया जें अनुचित नसे मैत्रिणींच्या समोर
तेही कानीं कथित वदन-स्पर्श-लोभें अधीर
तो कानांचा विषय नुरला नेत्र मार्गीं न राहे
औत्सुक्याने जुळवुनि वचा मन्मुखें सांगताहे
सखिसहवासी असतांना तूं, ओठ भिडावे गालीं म्हणुनी
सहज बोलणें तेंहि जयानें हळुच कथावें तुझिया कानी
रमण तुझा तो श्रवणदर्शना अतीत होउनि दुरावला, गे,
म्हणुनिच केवळ माझ्याकरवीं तुला मनोगत अपुलें सांगे!
जे बोलणे तुझ्या मैत्रिणींसमोर मोठ्याने बोललेले अगदीच चालले असते, ते तुझ्याजवळ अगदी येऊन तुझ्या कानात सांगण्याचा अशाळभूतपणा तुझा प्रियकर करत असे. तुझ्या गालांचा त्याच्या ओठांना स्पर्श व्हावा, अशी त्याची त्या वेळी इच्छा असायची! आता तोच प्रियकर, तुझ्या श्रुतींच्या टप्प्याच्याही बाहेर गेला आहे आणि तुझ्या डोळ्यांनाही दिसू शकत नाहीये. असा दुरावलेला तुझा प्रियकर, उत्कंठेने भारलेले शब्द ज्या निरोपात आहेत, असा निरोप माझ्या मुखातून तुला ऐकवत आहे.
पूर्वी अगदी साध्या साध्या बोलण्याच्या निमित्ताने ज्याला आपल्या प्रेयसीच्या गालांना ओठांनी स्पर्श करता यायचा, त्याच्यावरच आता भयंकर वेळ आलेली आहे. त्याचा निरोप आता भावनांनी कितीही ओतप्रोत भरलेला असला तरी मित्राकरवी पाठवायला लागतो आहे!
कुसुमाग्रजांनी अगदी साधे शब्द वापरून यक्षाची ही व्यथा व्यक्त केली आहे-
‘रहस्य नसतां, जें न कथावें सख्यांपुढें येउन
कानगुजे जो उगाच, होण्या गालाशीं मीलन
श्रवण-दृष्टिच्या पलीकडे तो - अधीरतेंने तुला
मम वाणींने कळवित आहे व्यथित आपुलें मन.’
कुसुमाग्रजांनी इथे ‘कानगुजे’ हा सुंदर शब्द वापरला आहे. ‘कानगुजे तो उगाच!’- काहीही कारण नसताना जवळ येऊन तो तिच्या कानामध्ये तो गुज करत असे! का, तर – ‘होण्या गालाशी मीलन!’
असा तो प्रियकर, आता तिच्या श्रवणाच्या आणि दृष्टीच्या पलीकडे गेला आहे आणि मेघाच्या वाणीने तिला आपले व्यथित मन कळवतो आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
४३.
श्मामास्वङ्गं चकितहरिणीप्रेक्षणे दृष्टिपातं
वक्त्रच्छायां शशिनि शिखिनां बर्हभारेषु केशान्।
उत्पश्यामि प्रतनुषु नदीवीचिषु भ्रूविलासान्
हन्तैकस्मिन्क्वचिदपि न तो चण्डि! सादृश्यमस्ति॥
लता दाविते कोमलता तव, शशांक मुखमंडल,
मोरपिसारा पाहुन म्हणतों हेच तिथे कुंतल,
जललहरींतुन भ्रूनर्तन तव, कटाक्ष मृग दाविती,
हन्त दिसेना पूर्ण आकृती कुठेंहि ती कोमल!
वेलींमध्ये वपु दचकल्या एण-दृष्टींत नेत्र
केशां पिच्छ-प्रसरिं शिखिच्या, चंद्रबिंबात वक्त्र
भ्रूभंगातें बघत लघुशा मी नदीच्या तरंगी
नाहीं कोठें परि तव तुला भामिनी एक जागीं
वेलीच्या वलयांत तनू तव भीतमृगीमधिं चंचल डोळे
शशीमध्यें मुख, मोरपिसारा - केशभार तो तव आंदोळे
लहरी उठती सरितेवरतीं भ्रूभंगच ते रम्य वांकडे
एका ठायीं, हाय, परन्तू साम्य कुठें नच तुझें सांपडे!
श्यामालतांच्या ठिकाणी मला तुझी शेलाटी शरीरयष्टी दिसते. चकित हरिणींच्या डोळ्यांमध्ये मला तुझे नेत्र-कटाक्ष दिसतात. चंद्रामध्ये मला तुझ्या मुखाची कांती दिसते. मोरांच्या दाट पिसाऱ्यात मला तुझा केशपाश दिसतो. नदीवर उठलेल्या नाजूक लहरींमध्ये मला तुझ्या भिवयांचे विलास दिसतात. परंतु, खेदाची गोष्ट अशी आहे की, यातील कोणाच्याही ठिकाणी मला तुझे संपूर्ण चित्र दिसत नाही.
आजूबाजूच्या प्रत्येक सुंदर गोष्टीमध्ये यक्षाला आपल्या प्रेयसीच्या सौंदर्यातील कुठले ना कुठले तत्त्व दिसते आहे, परंतु तिचे संपूर्ण सौंदर्य त्याच्या हाती लागत नाहीये!
विरहामध्ये मनुष्य चार प्रकारांनी आपल्या प्रिय व्यक्तीची आठवण काढत असतो, असा संकेत संस्कृत साहित्यात आहे. याला ‘विरहविनोदन’ असे नाव संस्कृतात दिले गेले आहे. विरहविनोदनाच्या या अवस्था लक्षात ठेवून कालिदासाने या श्लोकात आणि पुढच्या तीन श्लोकांमध्ये यक्षाच्या व्याकूळ अवस्थेचे चित्रण केले आहे.
बापट-मंगरूळकर-हातवळणे याविषयी लिहितात की – “विरहामध्ये आपल्या प्रिय व्यक्तीच्या दर्शनाची इच्छा धरून तिचे सादृश्य ठिकठिकाणी पाहणें, तिचे चित्र काढर्णे, तिला स्वप्नांत भेटणें, निदान तिच्या देहाचा स्पर्श झालेल्या वस्तूंची वांछा करणें, हा विरही जनांचा स्वभावच आहे. त्या तन्वीचें लवलवतें शरीर लतांच्या विभ्रमांत पहावे, भयभीत हरिणींच्या भिरभिरत्या कटाक्षांत तिचे कटाक्ष बघावेत, चंद्रामध्ये तिचीच गोंडस मुखकांति दिसते आहे असे मानावें, मयूरांच्या पिसाऱ्यांत तिच्या केशपाशाचे वैभव न्याहळावें, आणि नदीच्या प्रवाहांतील तरलसुंदर लहरींत तिच्या भिवयांच्या विभ्रमांचा भास व्हावा. अशा रितीनें तिचीं अंशदर्शनें निसर्गात यक्षाला नित्य घडत होती.”
४४.
त्वामालिख्य प्रणयकुपिता धातुरागैः शिलाया -
मात्मानं ते चरणपतितं यावदिच्छामि कुर्तुम्।
अस्रैस्तावन्मुहुरुपचितैर्दृष्टिरालुप्यते मे
क्रूरस्तस्मिन्नपि न सहते संगमं नौ कृतान्तः॥
रुसलेली तूं – तव चरणाशीं मी करितों याचना -
कधीं शिळेवर चितारण्याला बसतों ही कल्पना
तोंच लोटतें जल नेत्रांतुन, नजरेला अंधता
नशीब निर्दय भेट आपुली तेथेंही साहिना!
तूझी मूर्ति प्रणय-कुपिता गेरुचा जीस रंग
काढोनी जो चरणिं तिचिया ठेवण्या इच्छिं अंग
तेव्हां माझी डबडबुनि हो अश्रुनीं लुप्त दृष्टी
तेथें ही ना रुचत अपुल्या कर दैवासि भेटी
रुसलेली तूं - धातुरसांनीं चित्र शिळेवर असें रेखितों
चरणीं तुझिया नत झालेल्या मला, सखी, मी रंगवुं बघतों
तोंच आंसवें नयनिं दाटतीं, दृष्टी माझी होते धूसर
चित्रांतीलहि मीलन अपुलें सहन होइना दैवा निष्ठुर!
तू प्रेमभराने रागावलेली आहेस, असे तुझे चित्र गेरूने शिळेवर काढतो. तुझे चित्र काढून झाल्यावर, मी तुझ्या चरणांवर नतमस्तक झालेलो आहे, असे चित्र काढावे असे माझ्या मनात येते. पण तेवढ्यात डोळ्यांत पुन्हा पुन्हा साचून आलेल्या अश्रूंनी माझी दृष्टी झाकोळून जाते. दैव इतके क्रूर आहे की, चित्रातदेखील आपले मीलन झालेले त्याला सहन होत नाही.
धातूराग वापरून चित्र काढले असे कालिदासाने लिहिले आहे. धातूराग म्हणजे गेरु किंवा दगड-माती वापरून तयार केलेले रंग, अशी टीप बापट-मंगरूळकर-हातवळणे देतात. सीडी त्यासाठी ‘गेरू’ हा शब्द वापरतात, बोरवणकर ‘काव’ हा शब्द वापरतात, शांताबाई ‘धातुरस’ हा शब्द वापरतात आणि बापट-मंगरूळकर-हातवळणे ‘रंगमय धातू’ हे शब्द वापरतात. ‘रंगमय धातू’ हे शब्द वापरल्यामुळे यक्षाचे काढलेले आपल्या प्रियचे चित्र अनेकरंगी होते, असा अर्थ प्रतीत होतो.
आपल्या प्रिय व्यक्तीचे चित्र काढणे, हा विरहविनोदनामधील दुसरा प्रकार अशीही टिप बापट-मंगरूळकर-हातवळणे यांनी दिलेली आहे.
४५.
मामाकाशप्रणिहितभुजं निर्दयाश्लेषहेतो -
र्लब्धायास्ते कथमपि मया स्वप्नसंदर्शनेषु।
पश्यन्तीनां न खलु बहुशो न स्थलीदेवतानां
मुक्तास्थूलास्तरुकिसलयेष्वश्रुलेशाः पतन्ति
कधीं सुदैवें होतें मजला स्वप्नीं तव दर्शन
धडपडती कर अवकाशांतुन देण्या आलिंगन
वनदेवी मम दीन दशा ती पाहुन व्याकूलती
मोत्यांसम जल पर्णावरती पडतें नेत्रांतुन!
कष्टें स्वप्नीं मजसि दिसतां गाढ आलिंगण्यातें
तू तें जेव्हां भुज पसरतों अंतराळांत कान्ते
तेव्हां मातें बघुनि बहुधा अश्रु-बिन्दू लतांचे
पर्णीं मोतीं जणुं टपकति स्थानिंच्या देवतांचे
महत्प्रयासें कधीं तरी तू स्वप्नीं मजला दर्शन देसी
आलिंगावें दृढ तुज यास्तव बाहु पसरितों मी अवकाशीं
दीन दशा ती बघतांना मम स्थलदेवी मनिं व्याकुळ होती
अश्रु ढाळिती तरुपर्णांवर टपटपती जणुं टपोर मोती!
स्वप्नामध्ये कधीतरी तू मोठ्या कष्टाने मला भेटतेस. त्या वेळी तुला गाढ आलिंगन देण्यासाठी मी हात आकाशात पसरतो. तेव्हा मला त्या स्थितीत पाहून वनदेवतांचे मोठ्या मोत्यांएवढे कितीतरी अश्रू झाडांच्या कोवळ्या पालवीवर ओघळतात.
वनदेवींचे वृक्षांच्या पानांवर पडणारे अश्रू म्हणजे दवबिंदू, हे सहज लक्षात येते.
बापट-मंगरूळकर-हातवळणे लिहितात, “स्वप्नामध्ये अवचित जाग आल्यामुळे यक्षाचा विरहविनोदनाचा तिसरा मार्गसुद्धा कुंठित झाला!”
४६.
भित्त्वा सद्यः किसलयपुटान्देवदारुद्रुमाणां
ये तत्क्षीरस्रुतिसुरभयो दक्षिणेन प्रवृत्ताः।
आलिङ्गयन्ते गुणवति ! मया ते तुषाराद्रिवाताः
पूर्वं स्पृष्टं यदि किल भवेदङ्गमेभिस्तवेति॥
किसलय सेवुन सरलतरूंचा सुगंध जे वाहती
हिमाचलांतिल येतां वारे दक्षिण देशाप्रती,
त्या लहरींना बाहुपाश पसरोनी कवटाळितों
असेल झाला कारण त्यांना स्पर्श तुझा गुणवती!
कोंभाना जे उकलति वळे देवदारांत तेथें
अर्कस्रावें मग परिमले लादले दक्षिणेतें
येती जे ते सजणि हिमवद्वायु आलिंगिले म्यां
पूर्वी यांनीं तव तनु असे स्पर्शिली कल्पुनीयां
सरलतरूंचे कोमल किसलय पर्णपुटें ती हलकें फुलवुन
रसाळ गंधित वारे येती दक्षिणदेशी हिमालयाहुन
तुषारार्द्र त्या शीतल झुळका आलिंगन मी, प्रिये गुणवती,
कारण झाला असेल आधी तुझ्या तनूचा स्पर्श त्यांप्रती!
हिमालयातील वारे देवदार वृक्षांच्या कोवळ्या पानांमधून वाहत असताना त्यांच्या स्रावाने सुगंधित होतात. हे वारे जेव्हा दक्षिणेत येतात, तेव्हा त्यांनी तुझ्या शरीराला स्पर्श केला असेल, या भावनेने हे गुणवती स्त्रिये मी त्या वाऱ्यांना आलिंगन देतो.
कुसुमाग्रजांनी या श्लोकाचा अगदी ओघवता अनुवाद केला आहे-
‘किसलय सेवुन सरलतरूंचा सुगंध जे वाहती
हिमाचलांतिल येतां वारे दक्षिण देशाप्रती,
त्या लहरींना बाहुपाश पसरोनी कवटाळितों
असेल झाला कारण त्यांना स्पर्श तुझा गुणवती!’
कोवळ्या पानांना त्यांनी ‘किसलय’ हा शब्द वापरला आहे. देवदार वृक्षांना त्यांनी ‘सरलतरू’ हा शब्द वापरला आहे.
सरलतरूंच्या किसलयांचे सेवन करून त्या किसलयांचा सुगंध जे वाहत आहेत, असे वारे हिमालयाच्या पदरावरून जेव्हा दक्षिण देशात येतात, तेव्हा त्या वाऱ्याच्या लहरींना मी माझे बाहुपाश पसरून कवटाळतो. कारण, मला वाटत असते की, वाऱ्याच्या त्या लहरींना तुझा स्पर्श झालेला असेल.
अशा रीतीने बापट-मंगरूळकर-हातवळणे यांनी सांगितलेला ‘विरहविनोदनाचा’ चौथा प्रकार यक्ष करतो आहे. प्रिय व्यक्तीचा स्पर्श झालेल्या गोष्टींच्या स्पर्शात प्रिय व्यक्तीचा स्पर्श शोधतो आहे.
चंद्रा राजन यांनी त्यांच्या भाषांतरामध्ये या ‘विरहविनोदना’च्या चार श्लोकांचा अंतर्भाव केलेला नाही.
एखाद्या श्लोकाचा अनुवाद करताना होरेस विल्सन कालिदासाचा शब्दांचा माग मध्येच सोडून देतो. इतकेच काय कधी कधी आपले शब्द आणि आपल्या कल्पनासुद्धा तो श्लोकाच्या अनुवादात घालतो. पण, काहीही असले तरी शेवटी श्लोकाचा एकूण अर्थ तो आपल्यापर्यंत नक्की पोहोचवतो.
तो लिहितो -
“Soft and delightful to my senses blows
The breeze that southward wafts Himálaya's snows,
And rich impregnated with gums divine,
Exuding fragrant from the shattered pine,
Diffuses sweets to all, but most to me;
Has it not touched? does it not breathe of thee?”
माझ्या इंद्रियांना लुभावणारा आणि हिमालयातील बर्फाला दक्षिणेकडे आणणारा तो वारा, देवदाराच्या दैवी वृक्षस्रावांनी लादला गेलेला असतो. आपल्यामधील ती माधुरी तो सर्वांपाशी पसरवत असला, तरी त्यातली बहुतांश तो माझ्यापाशीच आणून ठेवतो. कारण त्याने तुला स्पर्श केलेला असतो आणि तुझे अस्तित्व त्याच्या श्वासातून वाहत असते.
४७.
धारासिक्तस्थलसुरभिणस्त्वन्मुखस्यास्य बाले
दूरीभूतं प्रतनुमपि मां पञ्चबाणः क्षिणोति।
धर्मान्तेऽस्मिन्विगणय कथं वासराणि व्रजेयु –
र्दिक्संसक्तप्रविततघनव्यस्तसूर्यातपानि॥
भिजल्या भूमीपरी सुगंधी वदनाची माधुरी
दूर असे, पण दाह जिवाचा मन्मथ माझ्या करी
शिणलेली विरहानें काया, परी न त्याला दया
झाकळलेले दिन ग्रीष्माचे कसे जायचे तरी!
सीडी, शांताबाई आणि सगळ्या गद्य अनुवादकांनी हा श्लोक प्रक्षिप्त मानला आहे. परंतु चंद्रा राजन यांनी याचा अनुवाद केला आहे-
“Scent of warm earth rain-
sprinkled, rising fresh,
O my darling, as the fragrance of
your mouth, and
the God of Love, five-arrowed,
wastes my frame
already wasted, grieving, far
from you.
For pity’s sake, think how my days
pass now at summer’s close, as
massed rain clouds
rending the sunshine, scatter
the pieces
and cling enamoured to
the sky in all directions.”
हे प्रिये, उष्ण मातीवर पाऊस पडल्यावर उसळणाऱ्या ताज्या सुगंधाप्रमाणे तुझ्या वदनाचा सुगंध आहे! तुझ्यापासून मी खूप दूर आहे. त्यात पाच बाण असलेली कामदेवता! तुझा सुगंध आणि कामदेवतेचे बाण मला कृश करत आहेत. आता ग्रीष्म संपत आलेला आहे. मेघ झाकोळून टाकत आहेत सूर्यप्रकाशाला आणि फैलावत आहेत सर्वदूर बिलगत आकाशाला अत्यंत मोहित होऊन.
कामदेवाचे बाण पाच फुलांनी सजवलेले असतात. शुभ्र कमळाचे फूल, अशोकाचे फूल, आम्रतरूचा मोहर, जुईचे फूल आणि निळ्या कमळाचे फूल अशी ही पाच फुले असतात हे सर्वश्रुतच आहे.
..................................................................................................................................................................
लेखांक पहिला : कालिदासाच्या काव्यातील एकेक श्लोक सौंदर्यवंत ऐरावतासारखा झुलत राहतो, आणि त्यावर आशयाचा ऐश्वर्यमान इंद्र आरूढ झालेला असतो!
लेखांक दुसरा : उत्कंठा उत्पन्न करणाऱ्या त्या मेघासमोर यक्ष आपले अश्रू आवरत कसाबसा उभा राहिला…
लेखांक तिसरा : कालिदास आपल्याला आपल्या जगातून उचलतात आणि प्रेमाच्या व सौंदर्याच्या तीव्र संवेदनांनी भारलेल्या जगात घेऊन जातात…
लेखांक चौथा : कालिदासाला जेव्हा जेव्हा प्रकृतीतील अपार सौंदर्य दिसते, तेव्हा तेव्हा त्याला पुरुष-तत्त्वाची आठवण होते…
लेखांक पाचवा : कालिदासाच्या सौंदर्यदृष्टीचा स्पर्श त्याच्या अनुवादकांनासुद्धा होतो…
लेखांक सहावा : येथून आपला कालिदासाच्या ‘मेघदूता’तील श्रृंगाररसाच्या प्रवाहात प्रवेश होतो.…
लेखांक सातवा : आपल्या प्रेमामुळे दुसरी व्यक्ती किती आनंदी होते आहे, यावर आपल्या प्रेमाचे भाग्य अवलंबून असते!
लेखांक आठवा : कालिदास सगळे वातावरणच स्त्री-पुरुषांतील प्रेमामध्ये अध्याहृत असलेल्या अनिवार वेडाने भारावून टाकतो...
लेखांक नववा : प्रेमात पडलेल्या स्त्रीच्या प्रेमाचा अव्हेर करणे, यक्षाला योग्य वाटत नाही. म्हणून तो मेघाला सांगतो आहे…
लेखांक दहावा : कालिदासाची सौंदर्यदृष्टी किती सूक्ष्म निरीक्षणांतून जन्मली आहे, याची अनेक उदाहरणे देता येण्यासारखी आहेत…
लेखांक अकरावा : ‘मेघदुता’तल्या ४७व्या श्लोकातील एका ओळीचा अनुवाद करताना सगळ्याच अनुवादकांची धांदल उडालीय...
लेखांक बारावा : मेघ थोर कुळातील असून जलसंपदा हे त्याचे वैभव. ते कारणी लागावे ही यक्षाची इच्छा आहे…
लेखांक तेरावा : निसर्गातील वस्तुजाताला सुंदर असे व्यक्तिस्वरूप देणे, हा कालिदासाच्या प्रतिभेचा एक अजब धर्म आहे...
लेखांक पंधरावा : रत्नदीपांवर सुगंधाचा वा गुलालाचा किंवा हिऱ्याच्या कणिकांचा मेघ तरळतो आहे
लेखांक सोळावा : इतर वेळी पिणाऱ्याची दक्षता घालवणारे मद्य इथे मात्र अत्यंत दक्षपणे मदनाचे कार्य करत आहे...
लेखांक सतरावा : अशोकाला जसा ‘तो’ नाजूक लत्ता-प्रहार हवा आहे, तसा ‘तो’ यक्षाला स्वतःलाही हवा आहे…
लेखांक अठरावा : सौंदर्य, काम, प्रेम आणि निष्ठा हे या यक्ष आणि यक्षिणीच्या जीवनातील चार मुख्य आधारस्तंभ आहेत!
लेखांक एकोणविसावा : अभ्रांनी आच्छादलेल्या दिवशी कमलिनी ना नीट फुललेली आहे, ना नीट मिटलेली आहे…
लेखांक विसावा : कालिदास काय किंवा यक्ष काय... स्त्रीविषयी अत्यंत आदर असलेली व्यक्तिमत्त्वं होती!
लेखांक एकविसावा : कळ्यांना ज्या हळूवारपणे तू जागे करतोस, त्याच हळूवारपणे तू तिलाही जागे कर…
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment