कळ्यांना ज्या हळूवारपणे तू जागे करतोस, त्याच हळूवारपणे तू तिलाही जागे कर…
पडघम - साहित्यिक
श्रीनिवास जोशी
  • प्रातिनिधिक चित्र
  • Thu , 04 August 2022
  • पडघम साहित्यिक कालिदास Kalidasa कालिदास दिन Kalidasa Din मेघदूत Meghadūta आषाढस्य प्रथम दिवसे Aashadhasya Prathama Divase

लेखांक एकविसावा

उत्तरमेघ

(लेखातला पहिला मूळ संस्कृत श्लोक कालिदासाचा आणि त्याचे अनुवाद अनुक्रमे कुसुमाग्रज, सी.डी. देशमुख आणि शांता शेळके यांचे)

३६.

तस्मिन्काले जलद! यदि सा लब्धनिद्रासुखा स्या –

दन्वास्यैनां स्तनितविमुखो याममात्रं सहस्व।

मा भूदस्याः प्रणयिनि मयि स्वप्नलब्धे कथंचि

त्सद्यःकण्ठच्युतभुजलताग्रन्थि गाढोपगूढम्॥

 

असेल जलदा, जरि मम कांता निद्रेच्या अंकित

रहा घडीभर तसाच तेथें, करूं नको गर्जित

दुर्लभ दर्शन असेल घडलें माझें स्वप्नामधें

तुटतां कंठांतील मिठी ती होइल रे दुःखित!

 

त्या वेळीं ती जरि अनुभवी सौम्य, निद्रा-क्षणांतें

पाच बैसे प्रहर-भर तूं थांबवीं गर्जनांतें

यत्नें स्वप्नीं रमण दिसतां मी तिची गाढ भेट

ना हो सैल क्षणिं सुटुनियां बाहुंची कंठिं गांठ

 

घना, लाडकी माझी तेव्हां निद्रासुख जरि असेल सेवित

करी प्रतीक्षा प्रहर तीन तूं, विसर सख्या, रे, अपुलें गर्जित

मीलनसुख ती असेल सेवित स्वप्नभेट तरि माझी होतां

गळामिठीचें स्वप्न भंगुनी सैल न व्हाव्या तिच्या भुजलता!

 

हे मेघा, तू जाशील तेव्हा जर ती निद्रेचे सुख अनुभवत असेल, तर गर्जना न करता तू थोडा वेळ थांबून राहा. मोठ्या कष्टानं स्वप्नामध्ये माझी आणि तिची भेट झाली असेल, तर तुझ्या गर्जनेमुळे तिच्या हातांच्या वेलींचा वेढा सुटून आमच्या दृढ आलिंगनामध्ये व्यत्यय यायला नको! 

होरेस विल्सन त्याच्या अनुवादात म्हणतो -

‘Soothed by expected bliss, should gentle sleep

O'er her soft limbs and frame exhausted creep,

Delay thy tidings, and suspend thy flight,

And watch in silent patience through the night.

Withhold thy thunders, lest the awful sound

Her slumber banish, and her dreams confound;

Where her fond arms, like winding shrubs, she flings

Around my neck, and to my bosom clings.’

तिला निद्रा आली असेल तर तुझी वादळे आणि तुझ्या भयानक गर्जना तू थोडा वेळ थांबव. नाहीतर ज्या स्वप्नांमध्ये आपल्या लाडिक हातांच्या वेली माझ्या गळ्याभोवती गुंफून ती मला बिलगलेली आहे, ती स्वप्ने, तिची निद्रा हद्दपार झाल्यामुळे संपून जातील

३७.

तामुत्थाप्य स्वजलकणिकाशीतलेनानिलेन

प्रत्याश्वस्तां सममभिनवैर्जालकैर्मालतीनाम्।

विद्युद्गर्भः स्तिमितनयनां त्वत्सनाथे गवाक्षे

वक्तुं धीरः स्तनितवचनैर्मानिनीं प्रक्रमेथाः॥

 

तुषारशीतल तव वाऱ्यानें कांतेला जागवीं,

पहाटचें दंव सेवुनि होई प्रफुल्लिता माधवी

चकित होउनी तुला मानिनी बघेल खिडकीमधें

फुलवुनि चपला शब्द तिला मग संथपणें ऐकवी:

 

तीतें जागी करुनि पवनें शीत जो बिन्दु-योगें

जों श्वासा ती, खुलुनि कलिका मालतीची जशी घे

ज्योतिर्युक्ता तुज निरखण्या दृष्टि देतां गवाक्षीं

धीरे लागें ध्वनितवचनें बोलण्या मानिनीशीं

 

जागव सखिला जलकण मिसळुन शीतल झालेल्या झुळुकांनी

जातिफुलांसह त्या स्पर्शानें प्रसन्न होइल प्रिया विरहिणी

बघेल तुज ती उभा गवाक्षी झळक विजांची अंगीं लेवुन

घनगर्जनवच बोलुनियां मग मानिनीस त्या दे आश्वासन

 

आपल्या जलाच्या तुषारांनी थंड झालेल्या वाऱ्याच्या झुळुकांनी तू तिला जागे कर. त्या वेळी जाईच्या कळ्यांसारखेच तिलाही नवचैतन्य प्राप्त झालेले असेल. तुला गवाक्षामध्ये बघून ती मानिनी आश्चर्यचकित होईल. तू अंतरंगात विद्युल्लता असलेला आहेस. तेव्हा तू तुझ्या धीरगंभीर आवाजात तिच्याशी बोलायला सुरुवात कर.

कळ्यांना ज्या हळूवारपणे तू जागे करतोस, त्याच हळूवारपणे तू तिलाही जागे कर, असे यक्ष सांगतो आहे.

यक्ष तिला ‘मानिनी’ म्हणतो आहे. बापट-मंगरूळकर-हातवळणे म्हणतात, ‘मानिनी’ या शब्दाचा अर्थ कदाचित असा असेल – “इतके दिवस झाले, मी इकडे झुरत असताना कोणाकरवी निरोप पाठवण्याचे याला सुचले नाही… ना आपले कुशल कळवायचे या निष्ठूराला सुचले, ना मला धीर द्यायचे सुचले!”

थोडक्यात रागावलेली म्हणून मानिनी! मानिनी आहे, म्हणून रागावलेली आहे!

रा. शं. वाळिंबे मल्लिनाथाने सुचवलेला अर्थ स्वीकारतात - मानिनी म्हणजे मनस्विनी!

मल्लिनाथाचा अर्थ इथे जास्त चपखल आहे, असे वाटते.

मेघाच्या अंतरंगातील विद्युल्लतेची आठवण यक्ष का करून देतो आहे, यावरही अनुवादकांमध्ये चर्चा झडलेली आहे.

बोवणकर-बापट-मंगरूळकर-हातवळणे म्हणतात, परस्त्रीला भेटायला जाताना आपल्या स्त्रीला घेऊन जाण्याचा प्रघात होता म्हणून विद्युल्लतेची योजना आहे.

‘begin to address the noble lady

in vibrant tones courteous,

with your lightning-gleams

hidden deep within you.’

तुझ्या विजेचे प्रकाश तुझ्यामध्ये खोलवर गर्भित असताना त्या मानिनीशी तू विनम्र स्वरात बोलायला सुरुवात कर.

येथे विजेचा प्रकाश हा मेघाच्या अंतःकरणातला प्रकाश आहे. अशा तेजस्वी अंतःकरणाचा मालकच विनम्र असू शकतो, असा एकूण सूर दिसतो आहे.

सीडीसुद्धा हाच अर्थ ध्वनित करत आहेत असे वाटते-

‘ज्योतिर्युक्ता तुज निरखण्या दृष्टि देतां गवाक्षीं

धीरे लागें ध्वनितवचनें बोलण्या मानिनीशीं’

कालिदासाने मेघाला या श्लोकामध्ये ‘विद्युतगर्भ’ म्हटलेले आहे. सीडी त्याला ‘ज्योतिर्युक्त’ म्हणत आहेत.

‘हे ज्योतिर्युक्ता, जेव्हा तुला निरखण्यासाठी गवाक्षाकडे आपली दृष्टी ती नेईल, तेव्हा तू त्या मानिनीशी हळूहळू ध्वनितवचने बोलू लाग.’

इथेसुद्धा ज्ञानाच्या ज्योतीने प्रकाशित असलेला मेघ यक्ष-पत्नीशी योग्य पद्धतीनं बोलेल, हा विश्वास आहे.

आपल्याला मेघदूतातील प्रेमभावना, कामभावना, कामक्रीडा आणि अगदी विरहसुद्धा सुसंस्कृतवृत्तीने प्रकाशत राहिलेले दिसतात. त्यामुळे बोरवणकर वगैरे अनुवादकांपेक्षा सीडी आणि चंद्रा राजन यांनी लावलेला विद्युतगर्भचा अर्थ जास्त योग्य वाटतो.

मेघ थोर कुळातला आहे, आर्द्र हृदयी आहे. आपल्या पत्नीला भेटायला पाठवताना ‘तुलाही विद्युल्लता नावाची पत्नी आहे’, अशी आठवण करून द्यायची गरज यक्षाला वाटली असेल, असे वाटत नाही.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

३८.

भर्तुर्मित्रं प्रियमविधवे! विद्धि मामम्बुवाहं

तत्संदेशैर्हृदयनिहितैरागतं त्वत्समीपम्।

यो वृन्दानि त्वरयति पथि श्राम्यतां प्रोषितानां

मन्द्रस्निग्धैर्ध्वनिभिरबलावेणिमोक्षोत्सुकानि॥

 

केशबंध सोडण्या स्त्रियांचे अधीर जे अंतरीं

त्या पांथांची मधु शब्दांनीं पाठवणी जो करी

तोच मेघ मी – सांग प्रियेला – तुझ्या पतीचा सखा,

सुवासिनी हे, निरोप घेउनि आलों तुझिया घरीं.

 

मी भर्त्याचा प्रियसख तुझ्या, मंगले, मेघ जाण

आलों तूझ्याजवळि हृदयीं शब्द त्याचे धरून

पान्थांना मी मधु-घन-रवें प्रेरितों, शीणले ते

उत्कंठेनें त्वरित गृहिणी-वोणि सोडावयातें

 

केशबंध विरहिणी वधूंचे उकलाया जे अधीर झाले

पांथांची त्यां स्नेहभरें मी सदनिं वळवितों त्वरित पाउलें

सुवासिनी, मज ओळखिलें का, तव दयिताचा सखा मेघ मी

हृदयिं धरुन संदेश तयाचा समीप आलों तुझिया धामी!

 

हे सौभाग्यसंपन्न स्त्रिये, मी मेघ आहे. आपल्या विरही प्रेयसींच्या ‘विरह-वेण्या’ सोडून त्यांचा विरह मिटवण्यासाठी अधीर झालेल्या प्रियकरांना मी प्रेरित करतो. प्रवास करून थकलेल्या त्या अधीर प्रियकरांना मधुरगंभीर गर्जना करून मी घरी जाण्यासाठी त्वरा करायला लावतो. मी तुझ्या पतीचा मित्र आहे आणि तुझ्या पतीचा तुझ्यासाठीचा निरोप मी चित्तात धारण करून तुझ्याकडे आलेलो आहे.

विरही स्त्रिया तेल वगैरे प्रसाधने न वापरता, फुले वगैरे न माळता आपल्या रुक्ष झालेल्या केसांची वेणी विरह-कालामध्ये बांधत. विरहकाल संपल्यावर त्यांचे प्रियकर आपल्या हाताने ती रुक्ष वेणी सोडवत. श्लोकातील वेणीमोक्षाचा संदर्भ हा असा आहे. या संकेताचा उल्लेख मेघदूतामध्ये पूर्वीही आलेला आहे.

मेघ येताच वातावरण बदलून जाते आणि त्या सुंदर वातावरणात प्रियकरांना आपल्या प्रेयसींची आठवण येते, हा उल्लेखही आधी आलेला आहे.

३९.

इत्याख्याते पवनतनयं मैथिलीवोन्मुखी

सा त्वामुत्कण्ठोच्छ्वसितहृदया वीक्ष्य संभाव्य

चैवम् श्रोष्यत्यस्मात्परमवहिता सौम्य!

सीमन्तिनीनां कान्तोदन्तः सुहृदुपनतः संगमात्किंचिदूनः॥

 

हें वदतां, ती बघेल वरती आतुर उत्कंठिता

अशोकवनिकेमधें जानकी जशी अंजनीसुता,

जीवन अवघें जमेल कानीं शब्द तुझा ऐकण्या

भेट गमे संदेश सतींना – थोडीशी न्यूनता!

 

सीता जैशी पवन तनया उन्मुखी ऐकतां हें

सोत्कंठा ती फुलुनि हृदयीं आदरें तूज पाहे

एकाग्रत्वें परिशिल पुढें सांगणें जें, स्त्रियांची

वार्ता मित्राकडुनि अपुरी भेट जैशी प्रियाची

 

आशातुर सोत्कंठ निरखिते पवनसुतातें जशी जानकी

भरल्या हृदयें तशीच तुजला पाहिल माझी सखी लाडकी

वचनें तव ती ऐकत राहिल आणुन श्रवणीं प्राण आपुला

प्रिये भेटीहुन उणा कितीसा प्रियकुशलाचा श्रवणसोहळा!

 

तू असे सांगताच पवनतनय हनुमानाकडे सीतेने जसे पाहिले, तसे ती तुझ्याकडे पाहील. उत्कंठेने तिचे हृदय फुलून येईल आणि मान वर करून ती तुझ्याकडे दृष्टीक्षेप करेल. सीतेने हनुमंताचे जसे स्वागत केले, तसे तुझे स्वागत ती करेल. कारण हे सौम्या, मित्राने आणलेल्या आपल्या पतीचा निरोप स्त्रियांना आपल्या प्रियाच्या प्रत्यक्ष भेटीपेक्षा थोडासाच उणा भासतो!

या शेवटच्या ओळीचा अतिशय सुंदर अनुवाद शांताबाईंनी केला आहे-

‘प्रिये भेटीहुन उणा कितीसा प्रियकुशलाचा श्रवणसोहळा!’

एखाद्या प्रियेला आपल्या प्रियाच्या कुशलाचा श्रवणसोहळा हा त्याच्या भेटीपेक्षा असा कितीसा उणा भासणार?

कुसुमाग्रजांनी आपल्या चार ओळींमध्ये प्रियाच्या निरोपाचा स्वर्ग उतरवला आहे-

‘हें वदतां, ती बघेल वरती आतुर उत्कंठिता

अशोकवनिकेमधें जानकी जशी अंजनीसुता,

जीवन अवघें जमेल कानीं शब्द तुझा ऐकण्या

भेट गमे संदेश सतींना – थोडीशी न्यूनता!’

तू हे वदताच, ती आतुर उत्कंठिता वर नजर करून बघेल, जसे अशोकवनिकेमध्ये सीतेने अंजनीसुताकडे पाहिले होते. तिचे अवघे जीवन तुझा शब्द ऐकण्यासाठी तिच्या कानांमध्ये जमा होईल. कारण प्रियकराचा संदेश हा सतींसाठी भेटीसारखाच असतो - त्यात भेटीपेक्षा थोडीशीच न्यूनता असते एवढेच!

‘आतुर-उत्कंठिता’ काय, अशोकवनाऐवजी ‘अशोकवनिका’ काय! प्रियाच्या वार्ता-ग्रहणाचे हळूवार वातावरण कुसुमाग्रज अशा अलवार शब्दांमधून उभे करतात!

या प्रसंगातला हळूवार भाव चंद्रा राजन यांनी यक्षीच्या अपेक्षांमुळे उमलून येणाऱ्या हृदयाचे वर्णन करून उभा केला आहे-

Thus addressed, like Mithila’s princess

lifting her face up to the Son of the Wind,

she will gaze on you, her heart

opening like a flower from eager expectation :

तू असे बोलताच, हे वैनतेया, मिथिलेच्या राजकन्येप्रमाणे ती तिचे मुख वर उचलेल आणि तुझ्यावर दृष्टीक्षेप करेल - तिचे हृदय तेव्हा अपेक्षांनी एखाद्या फुलाप्रमाणे उमलून येत असेल!

४०.

तामायुष्मन्! मम च वचनादात्मनश्चोपकर्तुं

ब्रूयादेवं तव सहचरो रामगिर्याश्रमस्थः।

अव्यापन्नः कुशलमबले ! पृच्छति त्वां वियुक्तः

पूर्वाभाष्यं सुलभविपदां प्राणिनामेतदेव॥

 

नाथ तुझा – तिज सांग उदारा - रामगिरीवर वसे

मरणासम त्या वियोग हा, सुखरूप तरीही असे

आहे ना तव कुशल पुसे तो - कृतार्थ होशिल घना,

- आपत्काळीं प्रथम जनांना अन्य पुसावें कसें?

 

हे आयुष्मन् तिज मम वचे व्हावयाही कृतार्थ

सांगावें कीं, पति तव वसे रामगिर्याश्रमांत

राहे स्वास्थ्यें, विरहिं पुसतो 'गेहिनी तूं खुशाल?

प्राण्यांचे, ज्यां सुलभ विपदा, हेच की आद्य बोल

 

प्रिय मित्रा, तूं उदार अससी, करीं येवढें माझ्याखातर

सांग सखीला, कान्त तुझा, गे, काळ कंठितो रामगिरीवर

जगे कसा तरि कुशल तुझें तो तुला पुसतसे व्याकुळ भावें

वियोगकाळी अबल सखीला याहुन दुसरें काय पुसावें?

 

हे आयुष्यमान मेघा, माझा निरोप तू कळव आणि हा परोपकार करून कृतार्थ हो! तू तिला सांग की, हे अबले, तुझा सहचर रामगिरीवरील आश्रमात असून तो सुखरूप आहे. तुझ्यापासून वियुक्त झालेला तो तुला तुझे कुशल विचारत आहे. तो प्रथमतः तुझे कुशल विचारतो आहे, कारण आपदांना जे लोक बळी पडलेले असतात, त्यांना हेच काय ते प्रथम विचारण्यासारखे असते.

सगळ्या अनुवादकांनी ‘सहचर’ या शब्दाचे भाषांतर ‘पती’, ‘नाथ’ किंवा ‘कान्त’ असे केले आहे. चंद्रा राजन यांनी ‘कॉन्सॉर्ट’ असे भाषांतर केले आहे. म्हणजे पती किंवा पत्नी. पण हा शब्द साधारणपणे राजा, राणी किंवा देवतांच्या सहचरांबद्दल वापरतात.

पण, खरं बघायला गेलं तर ‘सहचर’ म्हणजे एकत्र प्रवास करणारा किंवा एकत्र राहणारा! पती, नाथ, कांत किंवा कॉन्सॉर्ट यापेक्षा ‘सहचर’ हे जास्त मोकळे नाते आहे.

..................................................................................................................................................................

लेखांक पहिला : कालिदासाच्या काव्यातील एकेक श्लोक सौंदर्यवंत ऐरावतासारखा झुलत राहतो, आणि त्यावर आशयाचा ऐश्वर्यमान इंद्र आरूढ झालेला असतो!

लेखांक दुसरा : उत्कंठा उत्पन्न करणाऱ्या त्या मेघासमोर यक्ष आपले अश्रू आवरत कसाबसा उभा राहिला…

लेखांक तिसरा : कालिदास आपल्याला आपल्या जगातून उचलतात आणि प्रेमाच्या व सौंदर्याच्या तीव्र संवेदनांनी भारलेल्या जगात घेऊन जातात…

लेखांक चौथा कालिदासाला जेव्हा जेव्हा प्रकृतीतील अपार सौंदर्य दिसते, तेव्हा तेव्हा त्याला पुरुष-तत्त्वाची आठवण होते…

लेखांक पाचवा : कालिदासाच्या सौंदर्यदृष्टीचा स्पर्श त्याच्या अनुवादकांनासुद्धा होतो…

लेखांक सहावा : येथून आपला कालिदासाच्या ‘मेघदूता’तील श्रृंगाररसाच्या प्रवाहात प्रवेश होतो.…

लेखांक सातवा : आपल्या प्रेमामुळे दुसरी व्यक्ती किती आनंदी होते आहे, यावर आपल्या प्रेमाचे भाग्य अवलंबून असते!

लेखांक आठवा : कालिदास सगळे वातावरणच स्त्री-पुरुषांतील प्रेमामध्ये अध्याहृत असलेल्या अनिवार वेडाने भारावून टाकतो...

लेखांक नववा : प्रेमात पडलेल्या स्त्रीच्या प्रेमाचा अव्हेर करणे, यक्षाला योग्य वाटत नाही. म्हणून तो मेघाला सांगतो आहे…

लेखांक दहावा : कालिदासाची सौंदर्यदृष्टी किती सूक्ष्म निरीक्षणांतून जन्मली आहे, याची अनेक उदाहरणे देता येण्यासारखी आहेत…

लेखांक अकरावा : ‘मेघदुता’तल्या ४७व्या श्लोकातील एका ओळीचा अनुवाद करताना सगळ्याच अनुवादकांची धांदल उडालीय...

लेखांक बारावा : मेघ थोर कुळातील असून जलसंपदा हे त्याचे वैभव. ते कारणी लागावे ही यक्षाची इच्छा आहे…

लेखांक तेरावा : निसर्गातील वस्तुजाताला सुंदर असे व्यक्तिस्वरूप देणे, हा कालिदासाच्या प्रतिभेचा एक अजब धर्म आहे...

लेखांक चौदावा : स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वात आणि सौंदर्यात विद्युल्लता लपलेली असते, हे कालिदासाला जेवढे जाणवले, तेवढे दुसऱ्या कुठल्या कवीला जाणवले असेल, असे वाटत नाही

लेखांक पंधरावा रत्नदीपांवर सुगंधाचा वा गुलालाचा किंवा हिऱ्याच्या कणिकांचा मेघ तरळतो आहे

लेखांक सोळावा : इतर वेळी पिणाऱ्याची दक्षता घालवणारे मद्य इथे मात्र अत्यंत दक्षपणे मदनाचे कार्य करत आहे...

लेखांक सतरावा : अशोकाला जसा ‘तो’ नाजूक लत्ता-प्रहार हवा आहे, तसा ‘तो’ यक्षाला स्वतःलाही हवा आहे…

लेखांक अठरावा : सौंदर्य, काम, प्रेम आणि निष्ठा हे या यक्ष आणि यक्षिणीच्या जीवनातील चार मुख्य आधारस्तंभ आहेत!

लेखांक एकोणविसावा : अभ्रांनी आच्छादलेल्या दिवशी कमलिनी ना नीट फुललेली आहे, ना नीट मिटलेली आहे…

लेखांक विसावाकालिदास काय किंवा यक्ष काय... स्त्रीविषयी अत्यंत आदर असलेली व्यक्तिमत्त्वं होती!

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......