शुक्रिया जनाब… भारत-पाकिस्तानात माणुसकीची, मानवी भावभावनांची कदर करणारे, थोडीथोडकी का होईना सहृदयी माणसे वस्तीला आहेत!
पडघम - सांस्कृतिक
संपादकीय विभाग, मुक्त संवाद
  • रिना छिब्बर-वर्मा रावळपिंडी, पाकिस्तान येथील त्यांचे घर पाहताना
  • Thu , 04 August 2022
  • पडघम सांस्कृतिक रिना छिब्बर-वर्मा Reena Chhibber Varma पाकिस्तान Pakistan भारत India फाळणी Partition

मुळांची ओढ कोणाला नसते? ज्याला भावभावना आहेत, ज्याच्यातली संवेदनशीलता संपलेली नाही, ज्याला मातीशी असलेल्या नात्याचा कालपरत्वे विसर पडलेला नाही, तो माणूस एका टप्प्यावर पुनश्च मुळांचा शोध घेण्याचा यशाशक्ती प्रयत्न करून पाहतोच पाहतो. यामागे ज्या मातीत आपण जन्मलो, त्या मातीशी असलेले नाते पुनरुज्जीवित करण्याची, पर्यायाने सरलेला काळ नव्याने जगण्याची विलक्षण ऊर्मी दडलेली असतेच, परंतु जगलेल्या आयुष्याचा, आपल्या समग्र अस्तित्वाचा नव्याने अर्थ लावण्याची धडपडही त्यामागे असते.

एरवी, मुळांपर्यंत पोहोचवणारी वाट तर रुळलेली असते, पण रोखलेली नसते. जिथे स्वतःच्या मुळांपर्यंत घेऊन जाणाऱ्या वाटा रोखलेल्या असतात, तिथे वाट्याला येणारा मानसिक-भावनिक संघर्ष सहसा कोणाला चुकत नाही. त्यातही ही वाट कालौघात परकीय ठरलेल्या देशात जाऊन थांबत असेल, तर या संघर्षाला तसाही पारावार राहात नाही. इथे मानवी भावभावना, इच्छा-आकांक्षा यापेक्षा निष्ठूरपणे राबवले जाणारे कायदे आणि नियम महत्त्वाचे बनतात. ते अनेकदा अत्यंत क्रूरपणे राबवलेही जातात. त्याही मागे पुन्हा शत्रू राष्ट्र आपला घात करेल असा संशय असतो. पण वयाच्या नव्वदीत पोहोचलेल्या रिना छिब्बर-वर्मांना असा घातपात करण्यासाठी कोण कशाला निवडील? किंवा त्या स्वतः असा काही घातपात घडवून आणण्याची योजना कशाला आखतील? परंतु मनात कायमस्वरूपी संशय आणि तिरस्कार या दोन भावना असलेल्यांपुढ्यात तर्क आणि मीमांसा जराही उपयोगात येत नाही, हे लोक असुरक्षिततेच्या भावनांपोटी कायम कायद्यावर बोट ठेवत राहतात. नव्वदीतल्या छिब्बर-वर्मा आजीबाईंबाबतही पाकिस्तानने हाच मार्ग अवलंबिला.

मातीची हाक

आजीबाईंचे मूळ गाव पाकिस्तानातल्या रावळपिंडीतलं. फाळणीनंतरच्या घटनाक्रमात सारेच उद्ध्वस्त होत गेले. दोन्ही देशात धार्मिक विद्वेषाच्या ज्वाळा भडकत राहिल्या, त्यात आजीबाईंच्या कुटुंबालाही आपले पिढीजात घर सोडून हिंदूबहुल भारतात नाईलाजाने यावे लागले. त्या काळात आजीबाईंच्या मनावर कधीही भरून न येणाऱ्या जखमा झाल्या असणार. मनातल्या इच्छा-आकांक्षा अकाली मरण पावल्या असणार. तशाच घायाळ अवस्थेत लाखो विस्थापितांप्रमाणेच त्यांच्याही कुटुंबाने भारतातल्या त्यांच्यासाठी परक्या असलेल्या गावा-शहरात रुजण्याचा, रुळण्याचा प्रयत्न त्यांनी केला असणार. आयुष्य कोणीसाठी थांबत नाही. तसे ते आजीबाईंसाठी तरी कशाला थांबावे? पण म्हणून मुळांपासून तुटल्याची, दुरावल्याची बोच मनातून निघून जाते, असेही तर घडत नाही.

आयुष्यात येणाऱ्या चढ-उतारावर स्वार होताना मनाच्या कोपऱ्यात ती सल उरतेच, तीच सल एका टप्प्यानंतर आयुष्याचे ध्येयही होऊन बसते आणि स्वप्नदेखील. वयाच्या चौदा-पंधराव्या वर्षी परिस्थितीवश रावळपिंडीतले आपले राहते घर सोडून भारतात आलेल्या आणि आता पुण्यात वास्तव्यास असलेल्या रिना छिब्बर-वर्मानामक या रूपसुंदर आजीबाईंची अशीच काहीशी अवस्था झालेली.

परिस्थितीचा असह्य फेरा

१९६५मध्ये आजीबाईंच्या मनाने अशीच उचल खाल्लेली. कसेही करून रावळपिंडीत पोहोचायचे असा  मनोनिग्रह केलेला. त्यातूनच व्हिसासाठी अर्जफाटे करून झाले. पण ते वर्ष भारत-पाकिस्तानसाठी सर्वाधिक राजकीय-लष्करी ताण-तणावाचे होते. त्याचा फटका दोन्ही देशांतल्या परक्यांना बसला होता. हे सारेच परके केवळ शरीराने नियतीने नेमून दिलेल्या देशात राहत होते, त्यांचे आत्मे मात्र मूळ गावा-शहरांत अडकलेले होते. अर्थात, युद्धात युद्ध लढणाऱ्यांसाठी, ते लढवणाऱ्यांसाठी सारे काही माफ असते, तसे युद्धात भाग न घेणाऱ्यांसाठी, युद्धाच्या धगीत पोळणाऱ्यांसाठी सारे काही निषिद्धही असते. जणू सारे स्थानबद्ध होऊन जातात. त्यामुळे १९६५मध्ये आजीबाईंना पाकिस्तानचा व्हिसा नाकारला गेला. आजीबाईंच्या इच्छा-आकांक्षा सीमेअलीकडेच रोखल्या गेल्या.

पण, मानवी मन आहे म्हटल्यावर, ते संधी मिळता उफाळून येतेच, स्थानबद्धता शरीराला असते, मनाला कसली आलीय स्थानबद्धता, ते तर सर्वसंचारी आहे, त्याला रोखण्याची ताकद कोणा हुकूमशहात आहे? असे काहीसे या रिना आजीबाईंच्या बाबतीत घडले.

ईर्ष्या फळाला आली... सीमेपलीकडून प्रतिसाद मिळाला

गेल्या वर्षी सहज मनाचा चाळा म्हणून सोशल मीडियामधून आजीबाईंनी पाकिस्तानातल्या आपल्या पिढीजात घराला एकदा तरी भेट देण्याची इच्छा जाहीर केली. योग असा, पाकिस्तानातल्या सजाद हैदर नावाच्या एका संवेदनशील मनाच्या पाकिस्तानी नागरिकाच्या हृदयापर्यंत रिनाआजींची हाक पोहोचली. त्याने आजीबाईंच्या हाकेला सीमेपलीकडून ‘ओ’ दिली. पण इथवरच न थांबता सज्जाद हैदर एकदिवस आजीबाईंनी उल्लेख केलेल्या पत्त्यावर गेला आणि तिथे जाऊन त्याने आजीबाईंच्या रावळपिंडीतल्या घराची छायाचित्रे आजीबाईंना पाठवली. ती पाहताच फाळणीआधीचा काळ क्षणार्धात परतून आला. आजीबाईंचे डोळे पाणावले, गळा दाटून आला. घराची ओढ अनावर झाली. त्याच अनावर ओढीपायी आजीबाईंनी पुन्हा एकदा मनाचा हिय्या करून पाकिस्तानी दूतावासात रावळपिंडी भेटीसाठी व्हिसा मिळावा, यासाठी अर्ज केला. पण पुन्हा एकदा निष्ठूर कायदे नियम आणि संबंधांतली टोकाची कटुता आडवी आली. रिनाआजींना व्हिसा नाकारण्यात आला. दोन राष्ट्रांच्या शत्रुत्वात मानवी भावनांचा कितव्यांदा चुराडा झाला, याची गणतीच नाही.

तरीही, रिनाआजींनी हार मानली नाही, कोणीतरी सुचवले म्हणून आजींनी पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार यांच्या पुढ्यात आपली कैफियत मांडली. आजच्या सोशल मीडियाच्या भाषेत त्यांना टॅग केले. नव्या जगाच्या भाषेने आणि मार्गाने परिणाम साधला. एका स्त्रीची अनावर इच्छा बहुदा मंत्रीबाईंच्या हृदयाला स्पर्शून गेली. त्यांनी पुढाकार घेतला आणि चमत्कार व्हावा, त्याप्रमाणे वयाच्या नव्वदाव्या वर्षी रिना छिब्बर-वर्मा आजीबाईंचा आपल्या मूळ घराकडे परतण्याचा मार्ग प्रशस्त झाला. भारतातल्या पाकिस्तानी दूतावासाने ‘सदिच्छाभाव’ (गुडविल जेश्चर) राखत आजीबाईंना चांगला तीन महिन्यांचा व्हिसा मंजूर केला.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

आठवणींची वरात परतून आली...

१६ जुलै २०२२ रोजी रिनाआजी अट्टारी सीमा पार करून पाकिस्तानात प्रवेश करत्या झाल्या. तब्बल ७५ वर्षांनंतर ज्या मातीत त्या जन्मल्या होत्या, त्या मातीला त्यांचे पाय लागले. अर्थातच डोळे भरून आले होते. नजरेपुढ्यात धूसर, अंधूक पडदा आलेला होता. विश्वास बसू नये, असे सारे त्या क्षणांत घडत असल्याने आजीबाईंच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते, त्यांचा भावव्याकूळ झालेला चेहरा मात्र खूप काही बोलत-सांगत होता.

पाकिस्तानात प्रवेश केल्यानंतर काय काय करायचे हे ठरले होते. त्यानुसार आजीबाई थेट रावळपिंडीकडे रवाना झाल्या. तिथे गेल्यावर देवी कॉलेज रोडवरचे ‘प्रेम निवास’ हा त्यांचा पहिला थांबा होता. हेच त्यांचे फाळणीआधीचे राहते घर होते. तिथून जिथे शिक्षण झाले, ती शाळा आणि शाळेतले अजूनही हयात असलेले मित्र-मैत्रिणी यांच्या भेटीगाठी, असा हा भावूक प्रवास होता.

त्या आपल्या मोहल्ल्यात काय पोहोचल्या, त्यांच्या धूमधडाक्यात झालेल्या आगत-स्वागताचे व्हिडिओ व्हायरल होण्यास वेळ लागला नाही. ठेंगण्याठुसक्या, डोईवर चंदेरी केसांचा संभार, डोळ्यांत चमक, चेहऱ्यावर समाधान आणि अवघे शरीर प्रफुल्लित अशा रूपातल्या सोनपिवळ्या रंगातला कुर्ता आणि लालकिरमिजी रंगातली ओढणी घेतलेल्या रिनाआजी जशा प्रवेश करत्या झाल्या, तसे पठाणी पगडी घालून आलेल्या एका वादकाने एक ढोल-ताशा वाजवून त्यांचे दिमाखदार स्वागत केले. स्वागताला आसपासच्या लोकांनी गुलाब-पाकळ्यांचा त्यांच्यावर वर्षाव केला. वस्तीतल्या बाया-बापड्या रस्त्यावर आजीबाईंना कौतुकाने न्याहाळू लागल्या. कोणी त्यांची छबी मोबाइलमध्ये टिपण्यासाठी पुढे आले, कोणी आजीबाईंना हाताला धरून नाचले. एका गृहस्थाने तर आनंदाच्या भरात रिनाआजींना उचलून घेतले. तशीच स्वारी आजीबाईंच्या जुन्या-पुराण्या घरापर्यंत गेली. ज्या घरात रिनाआजींचे कुटुंब राहिले होते, त्या घरातली प्रत्येक भिंत, प्रत्येक वस्तू रिनाआजींनी मोठ्या कौतुकाने नजरेत साठवून घेतली. त्या क्षणांत आठवणींच्या वरातीमागून वराती रिनाआजींनी अनुभवल्या असणार… नव्वदीच्या रिना छिब्बर-वर्मांची, नऊ-दहा वर्षांची अल्लड रिना झालेली असणार. सारेच अदभुत.

प्रेम, आणि सौहार्दाचा भूतकाळ

आजीबाई म्हणाल्या, “मी लहानपणी मॉडर्न स्कूलमध्ये शिकले. माझी चारही भावंडे याच शाळेत शिकली. पुढे जाऊन माझा एक भाऊ आणि बहीण तिथून जवळ असलेल्या गॉर्डन कॉलेजातही शिकले. माझ्या थोरल्या भावंडांची बरीचसे मित्र-मैत्रिणी मुस्लीम होते. परंतु माझे वडील मोकळ्या मनाचे आणि आधुनिक विचारांचे होते. त्यामुळे आमच्या भेटीगाठींवर त्यांनी कधीही आक्षेप घेतला नाही की, तुम्ही असे करू नका, तसे करू नका, अशा अटीही कधी घातल्या नाहीत. आम्ही जिथे राहात होतो, त्या मोहल्ल्यात फाळणीआधी हिंदू-मुस्लीम हा भेदच नव्हता. हा भेद उफाळून आला फाळणीनंतर. फाळणीनंतरच कधीही न संपणारे हिंसेचे पर्व सुरू झाले…

फाळणी ही अत्यंत चुकीचे पाऊल होते, पण आता तो इतिहास झाला आहे, तो उगाळत बसलो तर त्यातून चंदनाचा गंध नव्हे, तर आगीच्या ठिणग्या उडत राहणार आहे. याचे भान ठेवत दोन्ही देशांतल्या धुरिणांनी सामंजस्याचे दर्शन घडवत दोन्ही देशांतल्या नागरिकांना एकमेकांच्या भेटी घेण्यासाठी सीमांवरची बंधने सैल करत व्हिसा प्रक्रिया अधिक सुलभ, अधिक मानवी करण्याकडे लक्ष पुरवायला हवे आहे.”

रिना छिब्बर-वर्मा आजीबाईचे हे अनुभवाचे बोल आहेत. शहाणपणाचे बोल आहेत. त्यात काळाने शिकवलेल्या धड्याचेही सूचन आहे आणि माणसाला विपरित परिस्थितीतही तगवून ठेवणारा आशावादही आहे. आताच्या घडीचा सर्वांत मोठा प्रश्न भारत असो वा पाकिस्तान या दोन्ही देशात वाढत्या धर्मांधतेचा असला तरीही, दोन्ही देशांत माणुसकीची जाण असलेले, मानवी भावभावनांची कदर करणारे, मन मोठे असलेले थोडीथोडके का होईना रिना छिब्बर-वर्मा, सज्जाद हैदर, हिना रब्बानी खार यासारखी सहृदयी माणसे वस्तीला आहेत, तोवर दोन्ही देशांतल्या मुळांची ओढ लागलेल्यांच्या आशा-आकांक्षांना मजबूत पंख लाभत राहणार आहेत...

(‘मुक्त-संवाद’ या पाक्षिकाच्या १ ऑगस्ट २०२२च्या अंकातून साभार.)

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......