अभ्रांनी आच्छादलेल्या दिवशी कमलिनी ना नीट फुललेली आहे, ना नीट मिटलेली आहे…
पडघम - साहित्यिक
श्रीनिवास जोशी
  • कमलिनीच्या फुलझाडाचं एक छायाचित्र
  • Tue , 02 August 2022
  • पडघम साहित्यिक कालिदास Kalidasa कालिदास दिन Kalidasa Din मेघदूत Meghadūta आषाढस्य प्रथम दिवसे Aashadhasya Prathama Divase

लेखांक एकोणविसावा

उत्तरमेघ

(लेखातला पहिला मूळ संस्कृत श्लोक कालिदासाचा आणि त्याचे अनुवाद अनुक्रमे कुसुमाग्रज, सी.डी. देशमुख आणि शांता शेळके यांचे)

२६.

शेषान्मासान्विरहदिवसस्थापितस्यावधेर्वा

विन्यस्यन्ती भुवि गणनया देहलीदत्तपुष्पैः।

मत्सङ्गं वा हृदयनिहितारम्भमास्वादयन्ती

प्रायेणैते रमणविरहेष्वङ्गनानां विनोदाः॥

 

दिवस मोजिते रचुन फुलांची माळ देहलीवरी

शापकाल किति उरला आतां याची गणना करी,

संगसुखाचीं अथवा चित्रें रेखाटित मानसीं;

रमणी बहुधा असा कंठती काल वियोगांतरी!

 

शापाचे जे विरह-दिवसापासुनी शेष मास

मोजी पुष्पीं, भुइवर रची देहलींतील रास

मत्संगा वा स्मरूनि हृदयीं कल्पनास्वाद घेती

चित्ता प्रायः पति विरहिता यापरी रंजवीती

 

उंबरठ्यावर फुलें मांडुनी एक एक ती दिवस मोजिते

किति विरहाचे मास राहिले, पुन्हां पुन्हां अजमावुन बघते

रमते केव्हां कल्पनेंत मम सहवासाची चित्रे रेखुन

विरहामध्ये रमणी बहुधा असेंच करिती मनोविनोदन!

 

विरहाच्या दिवसापासून सुरू झालेल्या कालावधीतले आता किती महिने उरले आहेत, याची ती गणना करत असेल. त्यासाठी उंबरठ्यावर तिने फुलांची रास ठेवली असेल. त्यातील एक एक फूल जमिनीवर ठेवून ती गणना करत असेल, किंवा आपल्या हृदयात बाळगलेल्या मिलनाच्या चित्रांचा आस्वाद ती आपल्या कल्पनेमध्ये घेत असेल. सामान्यपणे आपल्या प्रियकराचा विरह झाला असेल तर स्त्रिया हेच उपाय योजतात आणि आपल्या मनाला विरंगुळा देतात.

बापट-मंगरूळकर-हातवळणे लिहितात, “आपल्या प्रियकराशी होणाऱ्या मीलनाची चित्रे आपल्या संकल्पानेच निर्माण करत आणि अनुभवत ती बसली असेल.” ते पुढे म्हणतात, “यक्ष-पत्नी फुले मांडून जो हिशोब करत होती, तो महिन्यांचा नव्हे तर दिवसांचा होता. एकतर राहिलेले चार महिने मोजण्यासाठी एवढा खटाटोप करण्याची आवश्यकता नव्हती. एकेक दिवस मोजत होती, हे म्हणण्यात विशेष सौरस्य आहे.”

रा. शं. वाळिंबे यांनी कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी केलेला या श्लोकाचा अनुवाद दिला आहे-

‘किती लोटले विरहदिवस हे कळावयाकरितां जीं

ठेवियलेली फुले प्रतिदिनीं पुनः पुनः ती मोजी;

किंवा ध्यानीं मजला आणुनि माझा मानससंग

अनुभवुनी त्या परमानंदी झाली असेल दंग.

बहुतकरूनी, घना, सुंदरी काळ कंठितां यावा.

म्हणुनि या परी करिती जवळीं नसतां प्राणविसांवा’

कृष्णशास्त्री दोन ओळी जास्त वापरतात, पण सगळा आशय सहजपणे आपल्यासमोर मांडतात.

सीडी हीच किमया चार ओळींमध्ये करतात -

‘शापाचे जे विरह-दिवसापासुनी शेष मास

मोजी पुष्पीं, भुइवर रची देहलींतील रास

मत्संगा वा स्मरूनि हृदयीं कल्पनास्वाद घे ती

चित्ता प्रायः पति विरहिता यापरी रंजवीती’

२७.

सव्यापारामहनि न तथा पीडयेन्मद्वियोगः

शङ्के रात्रौ गुरुतरशुचं निर्विनोदां सखीं ते।

मत्संदेशैः सुखयितुमलं पश्य साध्वीं निशीथे

तामुन्निद्रामवनिशयनां सौधवातायनस्थः॥

 

दिवस लोटतो, लक्ष राहतें गुंतुनिया तेवढें,

रात्र परी वैरीण वाटते, मन एकांतीं कढे,

झोंप कोठली, असेल पडली जागत जमिनीवरी

सुखवार्ता वद म्हणून रात्रीं बसुनि गवाक्षापुढें!

 

तीतें गांजी विरह दिनिं ना कार्यमग्नेसि तेवीं

रात्रीं शोका चढुनि भरती रंजनाभाव जेवीं

मद्वार्तेने बहु सुखविण्या अर्धरात्रीं सतीला

जागी पाहें खिडकिमधुनी शेज भूमीच जीला

 

घरकामांमधिं विविध गुंततां दिवस येवढा नसेल जाचत

माझ्या विरहें रात परंतू एकाकिनि कशि असेल कंठित?

सौधावरल्या खिडकीपाशीं थांबुन रात्री भेट तियेला

निद्रेविण तळमळतां भूवर, निरोप दे मम, सुखव सखीला!

 

दिवसभर ती कामात गुंतलेली असल्यामुळे तुझ्या सखीला माझ्या विरहाचे तितकेसे दुःख होणार नाही, पण रात्री मात्र मन रिझवण्यासाठी काहीच नसल्याने तिच्या दुःखाला पारावार राहणार नाही.  ऐन मध्यरात्रीसुद्धा माझ्या एकनिष्ठ पत्नीच्या डोळ्याला डोळासुद्धा लागला नसेल. ती जमिनीवर निजली असेल. तेव्हा माझा निरोप सांगून तिला सुखवण्यासाठी तू प्रासादाच्या गवाक्षात उभा राहून तिची भेट घे. 

बोरवणकर लिहितात की, प्रोषितभर्तृकांना ‘पर्यंकशय्या’ वर्ज्य होती. म्हणजे, ज्यांचे पती प्रवासाला गेलेले आहेत, अशा स्त्रियांनी पलंगावर झोपू नये असा संकेत होता. त्यामुळे यक्ष-पत्नी जमिनीवर पहुडली आहे. जमीन ही विरहासाठी उचित अशी शय्या मानली जात असे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

२८.

आधिक्षामां विरहशयने संनिषण्णैकपार्श्वा

प्राचीमूले तनुमिव कलामात्रशेषां हिमांशोः।

नीता रात्रिः क्षण इव मया सार्धमिच्छारतैर्या

तामेवोष्णैर्विरहमहतीमश्रुभिर्यापयन्तीम्॥

 

कुशीवरी पहुडली कृशांगी, विरहाची शेज ती

चंद्रकोर वा कलाशेष ती दिसे उमाठ्याप्रती

दीर्घ निशेवर शिंपित अश्रू, आठवुनी त्या निशा,

क्षणांपरी रतिसुखांत गमल्या ज्या माझ्या संगतीं!

 

दुःखें क्षीणा विरह-शयनीं कुक्षिनें ठेवि गात्र

राहे जैशी उदयिं घटुनी इन्दुची कोर मात्र

आनंदे जी क्षणसम निशा जात मत्संगतींत

उष्णाश्रृंनी बहुल विरहें आज ती घालवीत

 

प्रिया कृशांगी असेल निजली शय्येवरती एक कुशीवर

प्राचीवरतीं कोर शशीची कललेली जणुं पांडुर धूसर

मीलनांत जी क्षणासारखी, विरहानें ती प्रदीर्घ रजनी

उष्ण आंसवें ढाळुन क्रमिते दुःखभरानें सखी विरहिणी!

 

पूर्व दिशेच्या क्षितिजावर जिची केवळ एकच कला शिल्लक राहिलेली आहे, अशा क्षीण चंद्रकोरीसारखी ती आपल्या मनोव्यथेमुळे कृश झालेली असेल. विरहाला उचित अशा शय्येवर ती एका बाजूला बसलेली असेल. जी रात्र माझ्या सहवासात अनिर्बंध सुखांमुळे एका क्षणासारखी तिला वाटत असे, तीच रात्र आता तिला खूप दीर्घ वाटू लागली असेल. अशी न संपणारी रात्र ती अश्रू ढाळून कंठत असेल.

चंद्रा राजन लिहितात -

Wasted by anguish

she would be lying on her bed of

loneliness

drawing herself together on one side,

seeming like the last sliver

of the waning moon

on the eastern horizon.

By my side her nights flew by

on winged moments in rapture’s fullness;

now they drag on, heavy

with her burning tears.

सगळ्यात सुंदर ओळी सीडींनी लिहिल्या आहेत-

‘दुःखें क्षीणा विरह-शयनीं कुक्षिनें ठेवि गात्र

राहे जैशी उदयिं घटुनी इन्दुची कोर मात्र

आनंदे जी क्षणसम निशा जात मत्संगतींत

उष्णाश्रृंनी बहुल विरहें आज ती घालवीत’

 

दुःखामुळे ती क्षीण झाली आहे, विरहाच्या शय्येवर तिने कशीबशी एक कूस टेकवली आहे. उदयाच्या काळी चंद्राची जशी एकच कोर दिसते तशी ती दिसते आहे. जी तिची रात्र माझ्या संगतीत एका क्षणासारखी जात असे, आज तीच रात्र ती बहुल असे उष्णाश्रू ढाळत अत्यंत विरहात घालवत आहे.

२९.

पादानिन्दोरमृतशिशिराञ्जालमार्गप्रविष्टान्

पूर्वप्रीत्या गतमभिमुखं संनिवृत्तं तथैव।

चक्षुः खेदात्सलिलगुरुभिः पक्ष्मभिश्छादयन्तीं

साभ्रेऽह्नीव स्थलकमलिनीं न प्रबुद्धां न सुप्ताम्॥

 

अमृतशीतल बघुनि चंद्रिका नितळ नभाच्या तळीं

वळे हरखुनी, तोंच साचतें जल नेत्रांच्या दळीं

आर्द्र पापण्या मिटून घेते, झाकळलेल्या दिनीं

ना फुललेली, ना मिटलेली भूकमलाची कळी!

 

जाळीमार्गे अमृतमय जों चांदणे थंड येई

पूर्वप्रेमें वळत तिकडे तोंच माघार घेई

दृष्टी दुःखें सजल मिटिते पापण्यांनी मलूल

ना जागे ना निजत जणुं कीं दुर्दिनीं सूर्यफूल

 

अमृतशीतल सुखद चांदणें गवाक्षांतुनी येतां सदनीं

अभिमुख होई प्रिया तयाला पूर्वसुखाचें स्मरण होउनी

तोच आंसवें भरती डोळां, झुके पापणी त्यांवर ओली

भूकमळाची कळी जणूं की अर्ध उमलली, अर्धी मिटली!

 

गवाक्षांच्या वाटेने आत आलेल्या अमृतशीतल चंद्रकिरणांकडे तिची दृष्टी पूर्वीप्रमाणेच अतिशय आनंदाने घाव घेत असेल आणि लगेच निराश होऊन परत फिरत असेल. आसवांनी तिच्या पापण्या जड झाल्या असतील. त्यामुळे माझी प्रिया तुला एखाद्या आभ्राच्छादित दिवशी धड न फुललेल्या आणि धड न मिटलेल्या जमिनीवरील कमलिनीप्रमाणे भासेल.

या श्लोकामध्ये विरही यक्ष-पत्नीला अमृत-शीतल चांदणे खिडकीमधून आत आलेले दिसते आहे. त्या क्षणानंतर तिच्या भावनांचे एक नाट्य या श्लोकात उलगडत जाते. शांताबाईंनी हे नाट्य अतिशय सुंदर पकडलेल आहे-

‘अमृतशीतल सुखद चांदणें गवाक्षांतुनी येतां सदनीं

अभिमुख होई प्रिया तयाला पूर्वसुखाचें स्मरण होउनी

तोच आंसवें भरती डोळां, झुके पापणी त्यांवर ओली

भूकमळाची कळी जणूं की अर्ध उमलली, अर्धी मिटली!’

स्त्री-हृदयामधल्या भावनांची उत्स्फूर्तता शांताबाई स्त्री असल्यामुळेच पकडू शकल्या असे वाटते.

तीच गोष्ट चंद्रा राजन यांची-

Remembering past delights her

eyes would turn

towards the moonbeams, cool, ambrosial,

streaming in through the lattices,

and turn away at once in sorrow.

Veiling her eyes with lashes

heavy-laden with tears

she will seem to be hovering uncertain

between waking and dreaming

—a day-lily on a cloudy day

neither open nor shut.

त्या पुढे लिहितात –

she will seem to be hovering uncertain

between waking and dreaming

अभ्रांनी आच्छादलेल्या दिवशी कमलिनी ना नीट फुललेली आहे, ना नीट मिटलेली आहे. आणि, विरहाच्या ढगांनी आच्छादून गेलेली यक्ष-पत्नी जागृती आणि स्वप्न अशा दोन अवस्थांमध्ये दोलायमान होऊन सुन्न बसून आहे.

चंद्रा राजन आशयाचा एक सुंदर पदर आपल्यासमोर उलगडतात. स्त्री-हृदयाच्या वाटा एक स्त्रीच जाणू शकते, हेच खरे!

३०.

निःश्वासेनाधरकिसलयक्लेशिना विक्षिपन्तीं

शुद्धस्नानात्परुषमलकं नूनमागण्डलम्बम्।

मत्संभोगः कथमुपनयेत्स्वप्नजोऽपीति निद्रा

माकाङ्क्षन्तीं नयनसलिलोत्पीडरुद्धावकाशाम्॥

 

स्नेहाभावीं रखरखलेले केस कपोलांवरी

अधर-पालवी काजळणारे श्वास सारती दुरी,

स्वप्नीं व्हावें मीलन म्हणुनी निद्रेस्तव आतुरे

परी पापण्या अडवुनि बसती अश्रुजलाच्या सरी!

 

निःश्वासानें किसलय जसा वाळला ओंठ, गालीं

येती तेलाविण अलक जे रुक्ष ते दूर सारी

व्हावा स्वप्नीं तरि मजसवें संग ऐशा विचारें

इच्छी निद्रा परि नयनिं ती रोखली अश्रुपूरें

 

दीर्घ उष्णशा निःश्वासांनीं पल्लवकोमल अधर करपती

तैलाभ्यंगाविण स्नानानें बटा कोरड्या गालिं झेपती

स्वप्नसंगमासाठीं माझ्या नीज वांछिते सखी सारखी

नयनिं दाटतां परी आसवें सुखास त्याही होइ पारखी!

 

तिचे कोरडे केस विस्कटून तिच्या गालापर्यंत आलेले असतील. तिच्या ओठांच्या कोवळ्या पालवीला तिचे उष्ण निःश्वास करपवून टाकत असतील. गालांवर आलेले ते केस तिच्या निःश्वासांनी कंपित होत असतील. स्वप्नात का होईना, पण माझ्याशी संयोग व्हावा, अशी तिची कामना असेल. त्यासाठी ती निद्रेकडे डोळे लावून बसलेली असेल. पण त्या डोळ्यातून अश्रूंचे पूर भरून येत असल्याने तिला हवीशी वाटणारी निद्रासुद्धा तिला येत नसेल.

सीडी लिहितात -

‘व्हावा स्वप्नीं तरि मजसवें संग ऐशा विचारें

इच्छी निद्रा परि नयनिं ती रोखली अश्रुपूरें’

स्वप्नामध्ये तरी माझ्याशी संग व्हावा, या विचारांनी ती निद्रेची इच्छा करते आहे, पण काय करावे, तिच्या नयनांमध्ये अश्रूंचे गावच्या गाव रोखले गेले आहेत!

यायचे असले तरी निद्रेने तिच्या नयनांमध्ये कसे यावे?

..................................................................................................................................................................

लेखांक पहिला : कालिदासाच्या काव्यातील एकेक श्लोक सौंदर्यवंत ऐरावतासारखा झुलत राहतो, आणि त्यावर आशयाचा ऐश्वर्यमान इंद्र आरूढ झालेला असतो!

लेखांक दुसरा : उत्कंठा उत्पन्न करणाऱ्या त्या मेघासमोर यक्ष आपले अश्रू आवरत कसाबसा उभा राहिला…

लेखांक तिसरा : कालिदास आपल्याला आपल्या जगातून उचलतात आणि प्रेमाच्या व सौंदर्याच्या तीव्र संवेदनांनी भारलेल्या जगात घेऊन जातात…

लेखांक चौथा कालिदासाला जेव्हा जेव्हा प्रकृतीतील अपार सौंदर्य दिसते, तेव्हा तेव्हा त्याला पुरुष-तत्त्वाची आठवण होते…

लेखांक पाचवा : कालिदासाच्या सौंदर्यदृष्टीचा स्पर्श त्याच्या अनुवादकांनासुद्धा होतो…

लेखांक सहावा : येथून आपला कालिदासाच्या ‘मेघदूता’तील श्रृंगाररसाच्या प्रवाहात प्रवेश होतो.…

लेखांक सातवा : आपल्या प्रेमामुळे दुसरी व्यक्ती किती आनंदी होते आहे, यावर आपल्या प्रेमाचे भाग्य अवलंबून असते!

लेखांक आठवा : कालिदास सगळे वातावरणच स्त्री-पुरुषांतील प्रेमामध्ये अध्याहृत असलेल्या अनिवार वेडाने भारावून टाकतो...

लेखांक नववा : प्रेमात पडलेल्या स्त्रीच्या प्रेमाचा अव्हेर करणे, यक्षाला योग्य वाटत नाही. म्हणून तो मेघाला सांगतो आहे…

लेखांक दहावा : कालिदासाची सौंदर्यदृष्टी किती सूक्ष्म निरीक्षणांतून जन्मली आहे, याची अनेक उदाहरणे देता येण्यासारखी आहेत…

लेखांक अकरावा : ‘मेघदुता’तल्या ४७व्या श्लोकातील एका ओळीचा अनुवाद करताना सगळ्याच अनुवादकांची धांदल उडालीय...

लेखांक बारावा : मेघ थोर कुळातील असून जलसंपदा हे त्याचे वैभव. ते कारणी लागावे ही यक्षाची इच्छा आहे…

लेखांक तेरावा : निसर्गातील वस्तुजाताला सुंदर असे व्यक्तिस्वरूप देणे, हा कालिदासाच्या प्रतिभेचा एक अजब धर्म आहे...

लेखांक चौदावा : स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वात आणि सौंदर्यात विद्युल्लता लपलेली असते, हे कालिदासाला जेवढे जाणवले, तेवढे दुसऱ्या कुठल्या कवीला जाणवले असेल, असे वाटत नाही

लेखांक पंधरावा रत्नदीपांवर सुगंधाचा वा गुलालाचा किंवा हिऱ्याच्या कणिकांचा मेघ तरळतो आहे

लेखांक सोळावा : इतर वेळी पिणाऱ्याची दक्षता घालवणारे मद्य इथे मात्र अत्यंत दक्षपणे मदनाचे कार्य करत आहे...

लेखांक सतरावा : अशोकाला जसा ‘तो’ नाजूक लत्ता-प्रहार हवा आहे, तसा ‘तो’ यक्षाला स्वतःलाही हवा आहे…

लेखांक अठरावा : सौंदर्य, काम, प्रेम आणि निष्ठा हे या यक्ष आणि यक्षिणीच्या जीवनातील चार मुख्य आधारस्तंभ आहेत!

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......