सौंदर्य, काम, प्रेम आणि निष्ठा हे या यक्ष आणि यक्षिणीच्या जीवनातील चार मुख्य आधारस्तंभ आहेत!
पडघम - साहित्यिक
श्रीनिवास जोशी
  • कृष्णधवल चित्र शांताराम आत्माराम सबनीस यांच्या ‘महाराष्ट्र मेघदूत’ (१९३८) या पुस्तकातून साभार
  • Mon , 01 August 2022
  • पडघम साहित्यिक कालिदास Kalidasa कालिदास दिन Kalidasa Din मेघदूत Meghadūta आषाढस्य प्रथम दिवसे Aashadhasya Prathama Divase

लेखांक अठरावा

उत्तरमेघ

(लेखातला पहिला मूळ संस्कृत श्लोक कालिदासाचा आणि त्याचे अनुवाद अनुक्रमे कुसुमाग्रज, सी.डी. देशमुख आणि शांता शेळके यांचे)

२१.

तन्वी श्यामा शिखरिदशना पक्कबिम्बाधरोष्ठी

मध्ये क्षामा चकितहरिणीप्रेक्षणा निम्ननाभिः।

श्रोणीभारादलसगमना स्तोकनम्रा स्तनाभ्यां

या तत्र स्याद्युवतिविषये सृष्टिराद्येव धातुः।।

 

देह मुलायम, दांत मनोहर, अधर तोंडल्यापरी,

उदरकटी कृश, चकित मृगासम नजर जरा बावरी,

स्तनभारानें लवली किंचित, मंद नितंबामुळें,

स्त्रीरूपाची पहिली प्रतिमा हीच विधाता करी!

 

बिंबौष्ठी जी सुदति, तरुणी, लोचनांनीं कुरंगी

जैशी भ्याली, तनु तर कटी, गाढ-नाभी कृशांगी

श्रोणीभारें लघुपद न घे, अल्प वांके स्तनांनीं

वाटे हीच प्रथम विधिची मूर्ति नारी विधानीं

 

तनु सडपातळ, दांत रेखिले, ओठ सरस जणुं पिकें तोंडलें

बारिक कंबर, सखोल नाभी, भ्याल्या हरिणीसमान डोळे,

पृथुलनितंबा मंदगामिनी, स्तनभारानें किंचित् लवली,

स्त्रीरूपाची पहिली प्रतिमा काय विधीनें गमे घडविली!

 

जिची दंतपंक्ती अत्यंत नाजूक आहे, जिचे ओठ पक्व बिंबफलाप्रमाणे लालचुटूक आहेत, जिची कंबर अत्यंत कृश आहे, जिचे डोळे हरिणीप्रमाणे चंचल आहेत, जिची नाभी खोल आहे, आपल्या पुष्ट नितंबांमुळे जिची चाल थोडीशी मंद झालेली आहे आणि जी आपल्या स्तनांमुळे किंचित झुकलेली आहे, अशी स्त्री तुला घरात दिसेल. तुला वाटेल की, ब्रह्मदेवाने स्त्रीची जी पहिली प्रतिमा बनवली होती, ती हीच होती काय!

बोरवणकर लिहितात की, श्यामा म्हणजे मूल न झालेली स्त्री! जिचा वर्ण कांचनाचा असतो, अशा स्त्रीलासुद्धा ‘श्यामा’ म्हणतात, असा दाखलाही बोरवणकर देतात.

बापट-मंगरूळकर-हातवळणे लिहितात - जी स्थूलही नाही आणि जी कृशही नाही, अशी ‘तन्वी’! जी मुग्धाही नाही आणि जी प्रौढाही नाही, अशी ‘श्यामा’!

“केवळ स्मिताने जग जिंकत जावे, असे हिचे ओठ आहेत - पिकलेल्या तोंडल्यासारखे रसरशीत, स्निग्ध, लालसर आणि कोमल! हरिणीसारखे भावतरल डोळे असलेली ही अनामिक यक्षजाया! शरीरानेसुद्धा ही खूप रेखीव आहे. हिची कमर पातळ आहे! हिच्या नितळ पोटावर खोलसर नाभीचा आवर्त आहे! देहाच्या यौवनसुलभ पुष्टतेमुळे ही मंद गतीने चालते! आणि गुच्छांनी लगडलेल्या वेलीप्रमाणे ही किंचित् पुढे झुकली आहे. जणूं ब्रह्मदेवाला प्रथम स्फुरलेली युवतीविषयक कल्पनाच येथें समूर्त झाली आहे!”

कालिदासाचा हा श्लोक फार प्रसिद्ध आहे.

चंद्रा राजन यांनीसुद्धा या श्लोकाचे फार सुंदर भाषांतर केलेले आहे -

There you will see her, in the

springtime of youth, slender,

her teeth jasmine-buds, her lips ripe bimba-fruit,

slim-waisted, with deep navel

and the tremulous eyes of a

startled doe, moving languidly

from the weight of her hips,

her body bowed down a little by

her breasts

 —Ah! The Creator’s master-work among women.

२२.

तां जानीथाः परिमितकथां जीवितं मे द्वितीयं

दूरीभूते मयि सहचरे चक्रवाकीमिवैकाम्।

गाढोत्कण्ठां गुरुषु दिवसेष्वेषु गच्छत्सु बालां

जातां मन्ये शिशिरमथितां पद्मिनीं वान्यरूपाम्॥

 

ती मम कांता विरही व्याकुळ असेल मितभाषिणी

सहचर जातां वसे अकेली चक्रवाकपक्षिणी

जीवित माझें केवळ दुसरें – वा विरहानें दशा

असेल झाली, तीव्र हिंवानें कोळपते पद्मिनी!

 

ती जाणावी परिमित-वचा जीव माझा दुजा कीं

जातां दूरी सहचर जशी एकली चक्रवाकी

बाला कंठी अलघु दिन जे दुःखभारें, न जाणें

भासे अन्या जणुं करपली पद्मिनी की हिमानें

 

केवळ दुसरा प्राणच माझा मितभाषी ती जाण लाडकी

विरहें माझ्या मनीं झुरतसे चक्रवाकि वा जणुं एकाकी

कठिण दुरावा गाढ सोसतां असेल गेली म्लान होउनी

शिशिराचा आघात सोसतां विशीर्ण व्हावी जशी कमलिनी!

 

ती माझी प्रिया अगदी मोजकेच बोलणारी आहे. माझा जीव की प्राण आहे ती! आपला प्रियकर आपल्यापासून खूप दूर असल्यामुळे तिची अवस्था एखाद्या एकाकी चक्रवाक पक्षिणीप्रमाणे झालेली असेल. विरहाने प्रदीर्घ झालेले हे दिवस जात असताना विरहाची व्यथा तिला असह्य झालेली असेल. शिशिर ऋतूमधल्या कडाक्याच्या थंडीमुळे म्लान झालेल्या एखाद्या कमलिनीप्रमाणे ती अगदी कोमेजून गेली असेल, असे मला वाटते आहे.

या श्लोकातील चक्रवाक पक्षिणीचा संदर्भ लक्षात घेतला, तर या श्लोकामधल्या विरहाच्या भावना अत्यंत तीव्र होतात.

बापट-मंगरूळकर-हातवळणे यांनी चक्रवाक पक्षिणीचा संदर्भ उलगडून दाखवला आहे- “चक्रवाक पक्षी नेहमीं जोडप्याने राहतात, असा समज आहे. रात्र पडताच एखाद्या कमलपत्रामुळे जरी चक्रवाक आणि चक्रवाकी यांच्यात अंतर पडले, तरी ते त्यांना सहन होत नाही. मग ते रात्रभर टाहो फोडतात. परस्परांवरील गाढ निष्ठा व प्रीति यांचे प्रतीक म्हणजे चक्रवाकयुगुल असें मानले गेले आहे. चक्रवाकांना रात्रभर वियोग होईल, असा एका ऋषीनें शाप दिला आहे, असेही मानले गेले आहे. तसेच सीतेसाठीं राम रडत असतांना हे पक्षी रामाला हसले, म्हणून रामानें त्यांना शाप दिला, अशीही एक कथा आहे.”

पराकोटीचे सौंदर्य, पराकोटीचा काम, पराकोटीचे प्रेम आणि पराकोटीची निष्ठा ही यक्ष आणि यक्षिणीच्या जीवनातील अतिशय पवित्र अशी जीवनमूल्ये आहेत. सौंदर्य, काम, प्रेम आणि निष्ठा हे या यक्ष आणि यक्षिणीच्या जीवनातील चार मुख्य आधारस्तंभ आहेत!

होरेस विल्सनसाहेबाने आपल्या भाषांतरात यक्षिणीची अवस्था सुंदर मांडली आहे-

And sad, and silent, shalt thou find my wife,

Half of my soul, and partner of my life,

Nipped by chill sorrow, as the flowers enfold

Their shrinking petals from the withering cold.

एखादी कमलिनी जशी थंडीपासून आपल्या पाकळ्या जशा मिटून घेते, अगदी त्याप्रमाणे माझी प्रिया दुःखामुळे अगदी विशीर्ण झाली असेल!

शांताबाईंनी या श्लोकाचा अत्यंत मधुर आणि सोपा अनुवाद केला आहे -

‘केवळ दुसरा प्राणच माझा मितभाषी ती जाण लाडकी

विरहें माझ्या मनीं झुरतसे चक्रवाकि वा जणुं एकाकी

कठिण दुरावा गाढ सोसतां असेल गेली म्लान होउनी

शिशिराचा आघात सोसतां विशीर्ण व्हावी जशी कमलिनी!’

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

२३.

नूनं तस्याः प्रबलरुदितोच्छूननेत्रं प्रियाया

निःश्वासानामशिशिरतया भिन्नवर्णाधरोष्ठम्।

हस्तन्यस्तं मुखमसकलव्यक्ति लम्बालकत्वा -

दिन्दोर्दैन्यं त्वदनुसरणक्लिष्टकान्तेर्बिभर्ति॥

 

सतत आसवें गाळुन असतिल नेत्र तिचे ओढले

सतत उसासे उष्ण टाकुनी ओठहि कोमेजले

तळहातावर वदन टेकतां, सैल कुंतलीं लपे,

अभ्राच्छादित सुधाकराचें बिंबच तें झाकलें!

 

मत्कान्तेचे नयन सुजले रोदनें दुर्निवार्यें

उष्णोच्छ्वासें खचित अधरीं श्यामतेची छटा ये

अर्धव्यक्त स्वकरिं मुख तें ठेविलें मुक्तकेशीं

भासे क्षीणप्रभ शशि जसा दीन जो आड येसी

 

असतिल सुजले डोळे सखिचे सदैव करितां प्रदीर्घ रोदन

उष्ण दीर्घ त्या नि:श्वासांनी गेले असतिल ओठहि करपुन

तळहातावर वदन विसावे मुक्त केश त्यावरीं विखुरले

घनपटली जणुं केविलवाणें बिंब शशीचें अर्धझांकलें!

 

रडून रडून तिचे डोळे सुजले असतील. उष्ण निःश्वासांमुळे तिच्या ओठांचा लाल रंग हरपला असेल. आपल्या तळहातांवर चेहरा टेकवून ती बसली असेल. तिचे काळे कुरळे केस मोकळे सोडलेले असल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर आलेले असतील आणि तिचा चेहरा अर्धा झाकला गेलेला असेल. तेव्हा, हे मेघा, तुझ्यामुळे झाकोळल्या गेलेल्या चंद्राची खिन्नता तिच्या चेहऱ्यावर विलसत असेल.

होरेस विल्सन लिहितात -

I view her now! Long weeping swells her eyes,

And those dear lips are dried by parching sighs.

Sad on her hand her pallid cheek declines, And half unseen through veiling tresses shines;

As when a darkling night the moon enshrouds,

A few faint rays break straggling through the Clouds.

सीडींनी त्यांच्या अनुवादात या श्लोकाचा सगळा आशय  आणि मंदाक्रांत वृत्ताचे चापल्य असे सगळेच विलक्षण सौंदर्याने एकत्र आणले आहे-

‘मत्कान्तेचे नयन सुजले रोदनें दुर्निवार्यें

उष्णोच्छ्वासें खचित अधरीं श्यामतेची छटा ये

अर्धव्यक्त स्वकरिं मुख तें ठेविलें मुक्तकेशीं

भासे क्षीणप्रभ शशि जसा दीन जो आड येसी’

ज्याचे निवारण करता येत नाही अशा ‘दुर्निवार्य’ रुदनामुळे माझ्या कांतेचे नयन सुजले आहेत. तिच्या उष्ण श्वासांमुळे तिच्या अधरांना श्यामतेची छटा आलेली आहे. त्या मुक्तकेशीने आपल्या करांवर आपले मुख ठेवले आहे आणि म्हणून ते मुख अर्धव्यक्त असे दिसते आहे. त्यामुळे असे वाटते आहे की, तिचे अर्धव्यक्त मुख म्हणजे हे मेघा, तू आड आल्याने क्षीणप्रभ झालेला दीनवाणा असा चंद्रच आहे.

सीडींनी असे कडवे लिहिले आहे की, स्तिमित होणे एवढेच आपल्या हातात असते. त्याच्या सौंदर्यावर बोलायचा प्रयत्न आपण करायचा नसतो!

२४.

आलोके ते निपतति पुरा सा बलिव्याकुला वा

मत्सादृश्यं विरहतनु वा भावगम्यं लिखन्ती।

पृच्छन्ती वा मधुरवचनां सारिकां पञ्चरस्थां

कच्चिद्भर्तुः स्मरसि रसिके! त्वं हि तस्य प्रियेति॥

 

दिसेल अथवा पूजन करितां भाविकतेनें सती,

चितारीत वा कल्पनेंतली कृश माझी आकृती,

उभी पिंजऱ्यासमोर अथवा पुसत सारिकेप्रतः

तूंहि लाडकी होतिस त्यांची, तुज होते का स्मृती?

 

त्या वेळीं तूं बघशिल तिला गुंतलेली पुजेत

मच्चित्रीं वा विरह-कृशता कल्पुनी रंगवीत

मैनेला वा पुसत, करि जी पंजरी मंजु बोला

स्वामीतें कां स्मरसि रसिके? लाडकी तूं तयाला

 

दिसेल तुजला सती कदाचित् देवपूजनामधे गुंतली

विरहें कृश मम तनू कल्पुनी चित्रांकित वा करित राहिली

पिंजऱ्यांतल्या मैनेला ती असेल किंवा पुसत कौतुकीं

‘स्मरती का, गे, प्रियतम तुज ते? होतिस मजसम तूंहि लाडकी!’

 

तू बघशील तेव्हा माझी प्रिया तुझ्या दृष्टीस पडेल. ती देवपूजेमध्ये गढून गेलेली असेल किंवा, मी खूप कृश झालो असेन, अशी कल्पना करून माझे चित्र काढत असेल. किंवा मग ती पिंजऱ्यातल्या सारिकेला विचारत असेल की, ‘तुला तुझ्या धन्याची आठवण येत नाही का, तू तर त्यांची अतिशय लाडकी आहेस.’

बोरवणकर म्हणतात की, ‘हल्ली ‘सारिका’ म्हणजे सर्वसाधारणपणे ‘मैना’ मानली जाते. पण, सारिका म्हणजे पोपटाची मादी असा अर्थ विविक्षित असल्याचे ‘शुक-सारिका’ या शब्दद्वंद्वावरून वाटते.’

कुसुमाग्रज त्यांच्या अनुवादात ‘सारिका’ हाच शब्द वापरतात. सीडी आणि शांताबाई मैना हा पर्याय वापरतात.

२५.

उत्सङ्गे वा मलिनवसने सौम्य! निक्षिप्य वीणां

मद्गोत्राङ्कं विरचितपदं गेयमुद्गातुकामा।

तन्त्रीमार्द्रा नयनसलिलैः सारयित्वा कथंचि

द्भूयोभूयः स्वयमपि कृतां मूर्च्छनां विस्मरन्ती॥

 

वसन जुनें वा नेसुनि वीणा मांडीवर घेउनी

करिते गीताक्षरांत माझ्या नांवाची गुंफणी,

परि तारेवर ओघळतें जल नेत्रांतिल सारखें

पुन्हापुन्हा तें पुसतां विसरे तानांची मांडणी!

 

किंवा वीणा मलिन वसनीं अंकिं ठेवोनियां ती

माझ्या नांवावरि विरचिता सिद्ध गाण्यासि गीती

तारा ओल्या नयन सलिलें वाजवीते प्रयासें

वारंवार स्वकृत तरिही नाठवे तान, भासे

 

मलिनवसनिं वा मांडीवरतीं वीणा घेउन असेल बसली

नांव गुंफिलें जयांत माझें गीत गावया आतुर झाली

गातांना पण नयनीं आंसू ओघळती ते तारांवरतीं

स्वयें योजिल्या तानांचीही सखिला होते, हाय! विस्मृती!

 

तिची वस्त्रे मलीन झालेली असल्याने आपल्या मांडीवरील मलीन वस्त्रावरच तिने आपली वीणा ठेवली असेल. माझे नाव गुंफून तिने तयार केलेले गीत गाण्याची तिची इच्छा असेल. पण त्याच वेळी डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंमुळे वीणेच्या तारा परत परत ओल्या होत असतील. त्या तारा पुन्हा पुन्हा पुसत ती गायचा प्रयत्न करत असेल. अशा प्रकारे गाताना आपण स्वतःच केलेली स्वर-रचना ती विसरून जात असेल. 

कालिदासाने ‘मूर्छना’ हा शब्द वापरला आहे. बोरवणकरांनी आपल्या टिपेत लिहिले आहे– ‘मूर्छना म्हणजे आरोह-आणि अवरोह यांच्यामधील आलाप.’

..................................................................................................................................................................

लेखांक पहिला : कालिदासाच्या काव्यातील एकेक श्लोक सौंदर्यवंत ऐरावतासारखा झुलत राहतो, आणि त्यावर आशयाचा ऐश्वर्यमान इंद्र आरूढ झालेला असतो!

लेखांक दुसरा : उत्कंठा उत्पन्न करणाऱ्या त्या मेघासमोर यक्ष आपले अश्रू आवरत कसाबसा उभा राहिला…

लेखांक तिसरा : कालिदास आपल्याला आपल्या जगातून उचलतात आणि प्रेमाच्या व सौंदर्याच्या तीव्र संवेदनांनी भारलेल्या जगात घेऊन जातात…

लेखांक चौथा कालिदासाला जेव्हा जेव्हा प्रकृतीतील अपार सौंदर्य दिसते, तेव्हा तेव्हा त्याला पुरुष-तत्त्वाची आठवण होते…

लेखांक पाचवा : कालिदासाच्या सौंदर्यदृष्टीचा स्पर्श त्याच्या अनुवादकांनासुद्धा होतो…

लेखांक सहावा : येथून आपला कालिदासाच्या ‘मेघदूता’तील श्रृंगाररसाच्या प्रवाहात प्रवेश होतो.…

लेखांक सातवा : आपल्या प्रेमामुळे दुसरी व्यक्ती किती आनंदी होते आहे, यावर आपल्या प्रेमाचे भाग्य अवलंबून असते!

लेखांक आठवा : कालिदास सगळे वातावरणच स्त्री-पुरुषांतील प्रेमामध्ये अध्याहृत असलेल्या अनिवार वेडाने भारावून टाकतो...

लेखांक नववा : प्रेमात पडलेल्या स्त्रीच्या प्रेमाचा अव्हेर करणे, यक्षाला योग्य वाटत नाही. म्हणून तो मेघाला सांगतो आहे…

लेखांक दहावा : कालिदासाची सौंदर्यदृष्टी किती सूक्ष्म निरीक्षणांतून जन्मली आहे, याची अनेक उदाहरणे देता येण्यासारखी आहेत…

लेखांक अकरावा : ‘मेघदुता’तल्या ४७व्या श्लोकातील एका ओळीचा अनुवाद करताना सगळ्याच अनुवादकांची धांदल उडालीय...

लेखांक बारावा : मेघ थोर कुळातील असून जलसंपदा हे त्याचे वैभव. ते कारणी लागावे ही यक्षाची इच्छा आहे…

लेखांक तेरावा : निसर्गातील वस्तुजाताला सुंदर असे व्यक्तिस्वरूप देणे, हा कालिदासाच्या प्रतिभेचा एक अजब धर्म आहे...

लेखांक चौदावा : स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वात आणि सौंदर्यात विद्युल्लता लपलेली असते, हे कालिदासाला जेवढे जाणवले, तेवढे दुसऱ्या कुठल्या कवीला जाणवले असेल, असे वाटत नाही

लेखांक पंधरावा रत्नदीपांवर सुगंधाचा वा गुलालाचा किंवा हिऱ्याच्या कणिकांचा मेघ तरळतो आहे

लेखांक सोळावा : इतर वेळी पिणाऱ्याची दक्षता घालवणारे मद्य इथे मात्र अत्यंत दक्षपणे मदनाचे कार्य करत आहे...

लेखांक सतरावाअशोकाला जसा ‘तो’ नाजूक लत्ता-प्रहार हवा आहे, तसा ‘तो’ यक्षाला स्वतःलाही हवा आहे…

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......