अशोकाला जसा ‘तो’ नाजूक लत्ता-प्रहार हवा आहे, तसा ‘तो’ यक्षाला स्वतःलाही हवा आहे…
पडघम - साहित्यिक
श्रीनिवास जोशी
  • डावीकडे माधवीचे फुलझाड, उजवीकडील चित्र http://www.sanskritebooks.org वरून साभार
  • Sat , 30 July 2022
  • पडघम साहित्यिक कालिदास Kalidasa कालिदास दिन Kalidasa Din मेघदूत Meghadūta आषाढस्य प्रथम दिवसे Aashadhasya Prathama Divase

लेखांक सतरावा

उत्तरमेघ

(लेखातला पहिला मूळ संस्कृत श्लोक कालिदासाचा आणि त्याचे अनुवाद अनुक्रमे कुसुमाग्रज, सी.डी. देशमुख आणि शांता शेळके यांचे)

१६.

तस्यास्तीरे रचितशिखरः पेशलैरिन्द्रनीलैः

क्रीडाशैलः कनककदलीवेष्टनप्रेक्षणीयः।

मद्गेहिन्याः प्रिय इति सखे ! चेतसा कातरेण

प्रेक्ष्योपान्तस्फुरिततडितं त्वां तमेव स्मरामि॥

 

तिथें विहारा टेक बांधला रचुनी रत्नें निळीं

चहुबाजूंनीं त्यास वेढिती सोनेरी कर्दळी,

मम कांतेचें आवडतें स्थळ, आठव होई मला,

विजा उजळती तनू जेधवां तुझी निळीसावळी.

 

कांठीं तीच्या सुबक वलयीं कांचनी कर्दळीचे

आहे क्रीडाचल शिखर ज्या रम्य नीलस्थलीचे

येई डोळ्यापुढतिं झणिं तो आवडीचा सयेच्या

तूं ते पाहें जंव विफल मी मंडलीं त्वत्प्रियेच्या

 

सन्निध क्रीडाशैल शोभतो शिखर जयाचें नीलमण्यांचें

भवतिं वाढल्या सोनकर्दळी अधिक खुलविती वैभव त्याचें

विद्युत्वेष्टित नीलघना, तुज बघतां त्याचा आठव येतो

सखिला माझ्या प्रिय तो भारी म्हणुन स्मृतीनें व्याकुळ होतों!

 

या पुष्करिणीच्या काठावर एक क्रीडापर्वत बांधला आहे. या पर्वताचे शिखर इंद्रनील मण्यांचे आहे. याच्या आजूबाजूला सुवर्णाच्या कर्दळी उगवलेल्या आहेत. हा पर्वत माझ्या प्रियेचा अत्यंत आवडता आहे. हे मेघा, जवळ वीज असलेल्या तुझ्या रूपाला पाहिले की, मला सुवर्णकर्दळींनी वेढलेल्या त्या इंद्रनील पर्वताची आठवण येते.

आपल्या टिपेमध्ये बोरवणकर म्हणतात की – “भोवती चमकणाऱ्या विजेचे वेष्टन असलेल्या मेघाला पाहिले की, यक्षाला त्या क्रीडापर्वताची आठवण होते आहे. कारण मेघाप्रमाणेच इंद्रनील पर्वताच्या भोवती सुवर्णकर्दळींचे वेष्टन असल्यामुळे सोनेरी विजेने वेष्टिलेल्या मेघाप्रमाणेच तो दिसतो आहे.”

आपल्या प्रियेच्या आवडत्या क्रीडापर्वताची आठवण आली की, अर्थातच प्रियेच्या आठवणींनी यक्ष विकल होणारच!

शांताबाईंनी या श्लोकात अध्याहृत असलेली अर्थाची ही छटा अत्यंत सुंदर शब्दात पकडली आहे-

‘सन्निध क्रीडाशैल शोभतो शिखर जयाचें नीलमण्यांचें

भवतिं वाढल्या सोनकर्दळी अधिक खुलविती वैभव त्याचें

विद्युत्वेष्टित नीलघना, तुज बघतां त्याचा आठव येतो

सखिला माझ्या प्रिय तो भारी म्हणुन स्मृतीनें व्याकुळ होतों!’

खरं तर, कुसुमाग्रजांनीही या श्लोकाचा परत परत वाचावा असा अतिशय सुंदर अनुवाद केला आहे-

‘तिथें विहारा टेक बांधला रचुनी रत्नें निळीं

चहुबाजूंनीं त्यास वेढिती सोनेरी कर्दळी,

मम कांतेचें आवडतें स्थळ, आठव होई मला,

विजा उजळती तनू जेधवां तुझी निळीसावळी.’

सीडींनी तर मंदाक्रांतामध्ये हा आशय देताना कमालच केली आहे-

‘कांठीं तीच्या सुबक वलयीं कांचनी कर्दळीचे

आहे क्रीडाचल शिखर ज्या रम्य नीलस्थलीचे

येई डोळ्यापुढतिं झणिं तो आवडीचा सयेच्या

तूं ते पाहें जंव विफल मी मंडलीं त्वत्प्रियेच्या’

तिच्या (पुष्करिणीच्या) काठावर कांचनाच्या कर्दळींच्या सुबक वलयांमध्ये, रम्य नीलस्थल असलेला तो क्रीडाचल आहे. जेव्हा विफल असा मी तुझ्या प्रियेच्या मंडलामध्ये पाहतो, तेव्हा माझ्या डोळ्यांच्या समोर एका क्षणात तो क्रीडाचल येतो.

नीलस्थल म्हणजे ज्याची जमीन निळी आहे असा! सीडींना हे शब्द सुचतात कसे, याचे आश्चर्य वाटत राहते.

चंद्रा राजन यांनीसुद्धा या अतीव सुंदर श्लोकाचा अतिशय सुंदर असा अनुवाद केला आहे-

By its edge is a miniature hill,

wondrous,

with sapphire-inlaid crest,

exquisitely blue

and ringed round by golden

plantain-trees. Watching you glitter

at the edges with lightning-gleams

my heart trembles struck by the

memory of that hill, my friend,

remembering how dear it

was to my beloved wife.

१७.

रक्ताशोकश्चलकिसलयः केसरश्चात्र कान्तः

प्रत्यासन्नौ कुरबकवृतेर्माधवीमण्डपस्य।

एकः सख्यास्तव सह मया वामपादाभिलाषी

काङ्क्षत्यन्यो वदनमदिरां दोहदच्छद्मनास्याः॥

 

अशोक आणिक बकुल मिरविती नव पर्णांची कळा

लाल लतांचे पाश वेढिती त्या वृक्षांच्या गळां,

एक सखीच्या वाम पदाची अभिलाषा बाळगी

दुसरा वांछी तिच्या मुखांतुन द्राक्षार्काच्या चुळा !

 

कोरांटीचें वलय जवळीं माधवी-मण्डपातें

रक्ताशोक स्थिर-दल न जो केसर प्रेक्ष्य तेथें

इच्छी डावा चरण सखिचा एक, इच्छीत मी ते,

दूजा वान्छी वदन- मदिरा डोहळ्याच्या निमित्तें

 

अशोक तेथें फुले तांबडा झिलमिल ज्याची हले पालवी

केसरतरुही जवळ तयाच्या दिसे डंवरली लता माधवी

एक मजसवें तव वहिनीच्या वामपदाची करी प्रतीक्षा

चूळ मिळावी तिच्या मुखांतिल मद्याची - दुसऱ्याची वांछा!

 

त्या क्रीडापर्वतावर कोरांटीचे कुंपण असलेला माधवी-लतेचा एक मांडव आहे. त्या मांडवाशेजारी हलत्या-झुलत्या पालवीचा एक रक्त-अशोक आहे. आणि, त्याच्या शेजारी सुंदर असा बकुल वृक्ष आहे. फुलण्याचे डोहाळे लागले की, यातला एक वृक्ष माझ्या बरोबरीने तुझ्या मैत्रिणीच्या डाव्या पायाच्या लाथेची इच्छा करतो, तर दुसरा तिच्या मुखातील मदिरेची.

रक्त-अशोक म्हणजे तांबड्या फुलांचा अशोक!

सुंदर स्त्रीच्या डाव्या पायाच्या लत्ता प्रहाराने हा तांबड्या अशोकाचा वृक्ष बहरतो आणि बकुल-वृक्ष सुंदर स्त्रीच्या मुखातून मदिरेचे सिंचन झाल्यावर बहरतो, असा कवी संकेत आहे.

पुरातन साहित्यात माणसाचे जीवन आणि त्याच्या आजुबाजूच्या वृक्ष-लतांचे जीवन एकरूप झालेले दिसते.

बापट-मंगरूळकर-हातवळणे एक सुंदर टीप देतात. ते म्हणतात – “माणसांचें वृक्षांवर प्रेम असावें हें तर कांहींच नव्हे, संस्कृत साहित्यांत वृक्षलताही माणसांवर प्रेम करितात. आपल्या धनिणीच्या नाजूकशा लत्ताप्रहाराशिवाय आपण फुलणारच नाहीं, असा अशोकाचा गोड हट्ट आहे, तर तिच्या मुखांतून मदिरेचे सिंचन आपल्यावर झाले पाहिजे, अशी रंगदार अपेक्षा करीत बकुल समुत्सुक झालेला आहे!”

या श्लोकाचे भाषांतर करताना बोरवणकर मात्र गोंधळून गेलेले आहेत. “एक वृक्ष माझ्या बरोबरीने तुझ्या मैत्रिणीच्या डाव्या पायाच्या लाथेची इच्छा करतो, तर दुसरा तिच्या मुखातील मदिरेची इच्छा करतो.” यातील ‘माझ्या बरोबरीने लाथेची इच्छा धरतो’ यामुळे बोरवणकर गोंधळून गेलेले दिसतात. ते लिहितात – “ ‘सह मया’ या पदाचे औचित्य लक्षात येत नाही. कारण अशोकाला लाथ मरताना किंवा बकुल-वृक्षावर चूळ टाकताना यक्षाला आपल्या स्त्रीच्या हाताला हात लावण्याची आवश्यकता आहे असे वाटत नाही.”

खरं तर इथं अशोकावर नाजुकसा लत्ता-प्रहार करताना यक्षाला आपल्या प्रियेच्या बरोबर जायचे नाहिये. अशोकाला जसा तो नाजूक लत्ता-प्रहार हवा आहे, तसा तो यक्षाला स्वतःलाही हवा आहे. बुकलवृक्षाला जसे तिच्या मुखातल्या मदिरेचे सिंचन हवे आहे, त्याचप्रमाणे यक्षाला त्याच्या प्रियेच्या मुखातून तिच्या ओठाला ओठ लावून मदिरा प्यायची आहे.

बापट-मंगरूळकर-हातवळणे लिहितात – “हे वृक्ष अगदीं आपल्यासारखे आहेत, असें यक्षाला वाटतें. प्रणयकलहांत रुसलेल्या कान्तेचे पाय धरावे आणि तिचा पदाघात हेच भूषण मानावें आणि तिच्या ओठातून आपल्या ओठात आलेले मद्य हा मोठा अनुग्रह मानावा, अशी कामार्ताना मोठी हौस.”

बापट-मंगरूळकर-हातवळणे पुढे लिहितात – “ ‘मालविकाग्निमित्रां’तील अग्निमित्राला यासाठींच अशोकाचा हेवा वाटतो आणि अशोकाप्रमाणे आपलीही इच्छा पुरी कर, असे तो मालविकेला विनवितो. यक्षाचीही अभिलाषा थेट तशीच आहे.”

‘माधवी मंडपस्य’ याचे भाषांतर बोरवणकर ‘मोगऱ्याचा मंडप’ असे करतात; तर इतर भाषांतरकार ‘माधवीच्या वेलाचा मंडप’ असेच करतात. गूगलवर ‘माधवी के फूल’ असा शोध घेतला की, ही शुभ्र आणि नाजूक फुले पाहायला मिळतात.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

१८.

तन्मध्ये च स्फटिकफलका काञ्चनी वासयष्टि-

र्मूले बद्धा मणिभिरनतिप्रौढवंशप्रकाशैः।

तालैः शिञ्जावलयसुभगैर्नर्तितः कान्तया मे

यामध्यास्ते दिवसविगमे नीलकण्ठः सुहृद्वः॥

 

दोन तरूंच्या मधें चौथरा पाचूंचा बांधला

कनकशलाका वरती, खालीं शुभ्र हिऱ्यांची शिला

त्यावर बसुनी मोर, सखीचीं रुमझुमतां कंकणें

सायंकाळीं त्या तालावर नाचतसे प्रेमला!

 

स्वर्णा यष्टि स्फटिकफळिची तेथ पक्षी बसाया

रत्नांचा ज्या खुलत हिरव्या वेळुचा कींच पाया

सायंकाळी तिजवरि तुझा मित्र तो मोर येत

ज्याला तालें ध्वनित-वलयें मत्प्रिया नाचवत

 

एक यष्टिका झुले कांचनी तरूंमध्ये त्या स्फटिकशिलेवर

जिच्या मुळाशी आधारास्तव रत्ने खचिली हिरवीं सुंदर

तिथें आमुच्या पाळिव मोरा सांजेला सखि शिकवी नर्तन

तालावर ती टाळी देतां रुणझुणु करिती करांत कंकण!

 

त्या दोन वृक्षांच्या मध्ये स्फटिकाचा फलक असलेली एक सोन्याची दांडी आहे. ती कोवळ्या वेळूंची कांती असलेल्या रत्नांच्या चौथऱ्यावर उभारलेली आहे. माझी कांता ताल धरून आमच्या प्रासादातील मोराला नृत्य करायला लावते. ती आपल्या हातांनी टाळ्या वाजवत ताल धरते, तेव्हा तिच्या रुमझुमणाऱ्या कंकणांमुळे तो ताल अतिशय मोहक वाटतो. तुझा मित्र असलेला तो मोर रोज सायंकाळी त्या सोन्याच्या दांडीवर विसावतो.

बोरवणकर इथे एक टीप देतात – “मोराची बसावयाची काठी स्फटिकाच्या शिळेवर बसवली होती आणि या स्फटिकाच्या शिळेच्या बुंध्याशी पाचूंचे दगड बसवले होते, अशी ही कल्पना असावी.”

बापट-मंगरूळकर-हातवळणे लिहितात – “ ‘तत्रागारं’पासून सुरू झालेल्या पांच लोकांत यक्षानें आपल्या प्रासादाचे वर्णन केले आहे. आपल्या घराला एक शानदार उंच कमानीचा दरवाजा आहे; बागेत मोठी पुष्करिणी आहे; ही पुष्करिणी पाचूंनी बांधून काढलेली आहे; तिच्यांत वैडूर्यांचे देठ असलेलीं सोन्याचीं कमळें आहेत; जवळच नील मण्यांनी खचित अशी टेकडी आहे; भोंवती सोन्याच्या केळी आहेत; मोराला बसण्यासाठी केलेली दांडी सोन्याची आहे; तिचा पाचूंचा आधार आहे आणि तिची बैठक स्फटिकाची आहे हे सगळे सगळे यक्ष अत्यंत आपुलकीने सांगतो आहे.”

तेथील बालमन्दारवृक्ष, सीतेचा अशोक, बकुल आणि माधवीचा मांडव यांतही यक्षाचा जीव गुंतलेला आहे. एक त्याच्या कान्तेचा मानसपुत्र आहे, तर दुसरे दोघे त्याच्यासारखेच तिच्या अनुग्रहासाठी आसुसलेले आहेत. आपल्या घरच्या वृक्षांची पालवी, घरच्या विहिरीचें पाणी, त्या विहिरीतले हंस, कंकणांच्या किणकिणीवर आणि हातांच्या टाळ्यांवर थरकत नाचणारा मोर – या सर्वांबद्दल त्याला अपार जिव्हाळा आहे... या जिव्हाळ्यामुळेच हे घराचे वर्णन आपल्याला आपल्या परिचयाचें वाटतें.”

बापट-मंगरूळकर-हातवळणे पुढे म्हणतात – “घराची वर्णने करताना कालिदासानें रंगांची रेलचेल केली आहे. जणूं काही घराच्या तोरणावरील इंद्रधनुष्याचे रंग घरामध्येही परावर्तित झालेले दिसत आहेत. स्वच्छ जलाभोंवती हिरवे पाचू आहेत; सोनेरी कमळांशेजारीं उठून दिसणारे शुभ्र हंस आहेत; नीलवर्ण मण्यांची टेकडीसुद्धा सोनेरी कोंदणांत बसवलेली आहे; अशोकसुद्धा लाल फुलांचा आणि लाल पालवीचा आहे; कोंवळ्या वेलूंसारख्या हिरव्या वेदिकेवर स्फटिकाचें पीठ आहे, त्यावर सोन्याची दांडी आहे. त्या सुंदर दांडीवर नीलकंठ बसतो आहे! अशा रितीनें हिरवा, सोनेरी, शुभ्र, निळा या रंगांनीं कवीनें एक सुंदर चित्र निर्माण केलेले आहे, आणि या चित्राला लाल अशोकाची कोमलता प्राप्त करून दिलेली आहे.”

१९.

एभिः साधो ! हृदयनिहितैर्लक्षणैर्लक्षयेथा

द्वारोपान्ते लिखितवपुषौ शङ्खपद्मौ च दृष्ट्वा।

क्षामच्छायं भवनमधुना मद्वियोगेन नूनं

सूर्यापाये न खलु कमलं पुष्यति स्वामभिख्याम्॥

 

निवास माझा दिसेल चतुरा, विसंबतां यावर,

पद्मादिक शिवमंगल चिन्हें भूषविती परिसर

उदासीनता वेढुन बसली असेल, नाहीं धनी,

मान टाकतें कमल कोमुनी मावळतां भास्कर!

 

या चिन्हांना स्मरुनि निपुणा आमुचें शोध सद्म

त्याच्या द्वाराजवळ बघ ते काढिले शंख- पद्म

शोभा त्याची खचित नुरली दूर जो मी प्रवासी

अस्ता जातां रवि विलय हो पद्मिनी वैभवासी

 

शंखपद्म रंगविलीं चित्रे प्रवेशद्वारीं बाजुस दोन्ही

चतुरा, माझें सदन बघावें खुणा अशा या ठेवुन स्मरणी

ओळखशिल तूं त्वरित जरी तें दिसेल शोभाविहीन आतां

कमळाची का खुले मुखश्री सायंकाळी रवि मावळतां?

 

हे चतुर मेघा, तू आपल्या हृदयात जपून ठेवलेल्या खुणांच्या साहाय्याने माझे घर शोधून काढ. तिथे दरवाज्याच्या दोन्ही बाजूंना काढलेले शंख आणि पद्म पाहून माझे घर शोधून काढ. माझ्या वियोगामुळे जे घर अगदी उदास दिसते आहे, ते घर तू शोधून काढ. सूर्य अस्ताला गेला म्हणजे कमळ आपली मूळची शोभा कायम ठेवू शकत नाही.

या श्लोकावर बोरवणकर लिहितात की – “यक्ष, मेघाला आपल्या घराच्या खुणा रामगिरीवर सांगत आहे. या खुणा मेघाने अलकानगरीस पोहोचेपर्यंत लक्षात ठेवायच्या आहेत म्हणून ‘हृदयनिहितै:’ या शब्दाची योजना आहे.”

‘हृदयनिहितै:’ म्हणजे ‘हृदयात वागवलेले!’

२०.

गत्वा सद्यः कलभतनुतां शीघ्रसंपातहेतोः

क्रीडाशैले प्रथमकथिते रम्यसानौ निषण्णः।

अर्हस्यन्तर्भवनपतितां कर्तुमल्पाल्पभासं

खद्योतालीविलसितनिभां विद्युदुन्मेषदृष्टिम्॥

 

उतर खालतीं बालगजासम मितदेही होउन,

त्या शैलाच्या शिखरावरतीं तुज हो रत्नासन,

मंद विजांचें तेज फुलव जणुं लुकलुकती काजवे

नेत्र तुझे ते वेध घेउं दे तिचा निवासांतुन.

 

छावा जैसा बनुनि करिचा शीघ्र जाण्यासि आंत

पूर्वोक्ती त्या रुचिर-शिखरी बैस क्रीडाचलांत

गेहीं दृष्टी तव शिरकुं दे सौम्य सौदामिनी ती

मन्दोन्मेषा, चमकत जणूं काजव्यांचीच पंक्ती

 

बालगजाचें रूप धरीं तू उतरशील मग सहजच खालीं

सुरम्य शिखरी टेक जरासा पूर्वोल्लेखित क्रीडाशैलीं

विद्युल्लेखाकटाक्ष टाकुन सदन आंतुनी प्रथम बघावें

सौम्य करी पण तेज विजेचें मंद चमकती जसे काजवे!

 

तुला पटकन खाली उतरता यावे, म्हणून तू हत्तीच्या पिलासारखा छोटासा आकार घे. मघाशी सांगितल्या रमणीय शिखरे असलेल्या क्रीडापर्वतावर तू बस. आणि नंतर काजव्यांच्या मालिकेच्या प्रकाशाप्रमाणे अतिशय अल्प तेज असलेल्या तुझ्या विजेच्या दृष्टीने तू आमच्या घरामध्ये एक नजर टाक!

कुसुमाग्रजांनी हे सगळे चित्र अतिशय सुंदर शब्दांमध्ये रेखाटले आहे-

‘उतर खालतीं बालगजासम मितदेही होउन,

त्या शैलाच्या शिखरावरतीं तुज हो रत्नासन,

मंद विजांचें तेज फुलव जणुं लुकलुकती काजवे

नेत्र तुझे ते वेध घेउं दे तिचा निवासांतुन.’

‘मितदेह’ हा सुंदर शब्द कुसुमाग्रजांनी इथे तयार केला आहे.

सीडींनीसुद्धा धमाल उडवून दिली आहे-

‘छावा जैसा बनुनि करिचा शीघ्र जाण्यासि आंत

पूर्वोक्ती त्या रुचिर-शिखरी बैस क्रीडाचलांत’

करी म्हणजे हत्ती हे आपण आधी बघितले आहे. ‘आधी सांगितलेल्या सुंदर अशा शिखराच्या क्रीडापर्वतावर तू बस’ हा सारा ऐवज सीडी ‘पूर्वोक्ती त्या रुचिर-शिखरी बैस क्रीडाचलांत’ एवढ्याच शब्दांत बसवतात.

पुढच्या दोन ओळींमध्ये ‘मन्दोन्मेषा’ हा सुंदर शब्द वापरतात-

‘गेहीं दृष्टी तव शिरकुं दे सौम्य सौदामिनी ती

मन्दोन्मेषा, चमकत जणूं काजव्यांचीच पंक्ती’

‘मन्दोन्मेषा’ म्हणजे मंद असे उन्मेष असलेली!

मंद उन्मेष असलेल्या सौम्य सौदामिनीची तुझी दृष्टी माझ्या घरात शिरू दे, जणू काही ती काजव्यांची एक पंक्ती चमकत चमकत घरात आलेली आहे!

..................................................................................................................................................................

लेखांक पहिला : कालिदासाच्या काव्यातील एकेक श्लोक सौंदर्यवंत ऐरावतासारखा झुलत राहतो, आणि त्यावर आशयाचा ऐश्वर्यमान इंद्र आरूढ झालेला असतो!

लेखांक दुसरा : उत्कंठा उत्पन्न करणाऱ्या त्या मेघासमोर यक्ष आपले अश्रू आवरत कसाबसा उभा राहिला…

लेखांक तिसरा : कालिदास आपल्याला आपल्या जगातून उचलतात आणि प्रेमाच्या व सौंदर्याच्या तीव्र संवेदनांनी भारलेल्या जगात घेऊन जातात…

लेखांक चौथा कालिदासाला जेव्हा जेव्हा प्रकृतीतील अपार सौंदर्य दिसते, तेव्हा तेव्हा त्याला पुरुष-तत्त्वाची आठवण होते…

लेखांक पाचवा : कालिदासाच्या सौंदर्यदृष्टीचा स्पर्श त्याच्या अनुवादकांनासुद्धा होतो…

लेखांक सहावा : येथून आपला कालिदासाच्या ‘मेघदूता’तील श्रृंगाररसाच्या प्रवाहात प्रवेश होतो.…

लेखांक सातवा : आपल्या प्रेमामुळे दुसरी व्यक्ती किती आनंदी होते आहे, यावर आपल्या प्रेमाचे भाग्य अवलंबून असते!

लेखांक आठवा : कालिदास सगळे वातावरणच स्त्री-पुरुषांतील प्रेमामध्ये अध्याहृत असलेल्या अनिवार वेडाने भारावून टाकतो...

लेखांक नववा : प्रेमात पडलेल्या स्त्रीच्या प्रेमाचा अव्हेर करणे, यक्षाला योग्य वाटत नाही. म्हणून तो मेघाला सांगतो आहे…

लेखांक दहावा : कालिदासाची सौंदर्यदृष्टी किती सूक्ष्म निरीक्षणांतून जन्मली आहे, याची अनेक उदाहरणे देता येण्यासारखी आहेत…

लेखांक अकरावा : ‘मेघदुता’तल्या ४७व्या श्लोकातील एका ओळीचा अनुवाद करताना सगळ्याच अनुवादकांची धांदल उडालीय...

लेखांक बारावा : मेघ थोर कुळातील असून जलसंपदा हे त्याचे वैभव. ते कारणी लागावे ही यक्षाची इच्छा आहे…

लेखांक तेरावा : निसर्गातील वस्तुजाताला सुंदर असे व्यक्तिस्वरूप देणे, हा कालिदासाच्या प्रतिभेचा एक अजब धर्म आहे...

लेखांक चौदावा : स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वात आणि सौंदर्यात विद्युल्लता लपलेली असते, हे कालिदासाला जेवढे जाणवले, तेवढे दुसऱ्या कुठल्या कवीला जाणवले असेल, असे वाटत नाही

लेखांक पंधरावा रत्नदीपांवर सुगंधाचा वा गुलालाचा किंवा हिऱ्याच्या कणिकांचा मेघ तरळतो आहे

लेखांक सोळावाइतर वेळी पिणाऱ्याची दक्षता घालवणारे मद्य इथे मात्र अत्यंत दक्षपणे मदनाचे कार्य करत आहे...

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......