काल सोलापुरात २५व्या ‘अखिल भारतीय मराठी जैन साहित्य संमेलना’ला सुरुवात झाली. मराठीतील प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते या संमेलनाचे उदघाटन झाले. या संमेलनाची उद्या संध्याकाळी सांगता होईल. या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब पाटील यांच्या अध्यक्षीय भाषणाचा हा संपादित अंश…
.................................................................................................................................................................
‘विविधज्ञानविस्तार’ या नियतकालिकाच्या जानेवारी १९२४च्या अंकात जैन मराठी वाङ्मयाच्या अस्तित्वाची शुभवार्ता श्री. शेषराव पारिशवाड या जैन सज्जनाने प्रथम झळकवली. जैनांनी मराठी माध्यमातून आपले विचार पेरावे अथवा हृदय ओतावे, हे नवलाईचे नाही. कारण मराठीच्या जन्मापूर्वीपासून जैनांचा महाराष्ट्राशी आणि महाराष्ट्राशी जिव्हाळ्याचा संबंध आहे.
महाराष्ट्री प्राकृत : मराठी भाषेची गंगोत्री
महाराष्ट्री प्राकृत हे मराठीचे मूळ आहे. प्रथमपासूनच जैनांनी प्राकृत भाषांचे माध्यम स्वीकारले व ते कधीही सोडले नाही. मागधी, अर्धमागधी, शौरसेनी, पैशाची, महाराष्ट्री वगैरे विविध प्राकृत भाषांमधून ‘आगमग्रंथ’ व लोकवाङ्मयाची जैनांनी सातत्याने निर्मिती केली आहे. संस्कृत भाषेच्या प्रभाव काळातही जैन आचार्यांनी संस्कृत भाषेत विविध विषयांवरील श्रेष्ठ दर्जाची ग्रंथरचना केली. जैन संस्कृत साहित्य विचारात घेतल्याखेरीज संस्कृत वाङ्मयाचे यथार्थ आकलन होणार नाही व त्याची थोरवीही कळणार नाही, असे अभ्यासकांचे मत आहे. कालांतराने अपभ्रंश भाषेला महत्त्व आल्यावर इ.स. सहाव्या शतकापासून ते १२ शतकापर्यंत जैनांनी अपभ्रंश भाषेत प्रचंड ग्रंथरचना केली. सध्या उपलब्ध अपभ्रंश भाषेतील वाङ्मयापैकी तीन चतुर्थांश वाङ्मय जैन लेखकांचे आहे.
महाराष्ट्रात प्राचीन काळापासून महाराष्ट्राच्या इतिहासाच्या विविध कालखंडात प्रचलित असलेल्या भाषेतून जैन धर्मविषयक साहित्य पाहायला मिळते.
महाराष्ट्रातील जैन समाजाला इतिहास व भूगोल दोन्हीही आहेत. महाराष्ट्रात जैनांची कुंथलगिरी, मांगीतुंगी, मुक्तागिरी व गजपंथा ही सिद्धक्षेत्रे आहेत. १८ ते २० अतिशय क्षेत्रे आहेत. कोल्हापूर, नांदणी, लातूर, कारंजा येथे भट्टारक पीठे आहेत. विदर्भ मराठवाडा, अपरान्त, पश्चिम महाराष्ट्रात या सर्व भागांत प्राचीन जैन मंदिरांचे अवशेष, शिलालेख पाहायला मिळतात.
प्राचीन महाराष्ट्रातील जैन संदर्भ
मौर्य काळातील एक शिलालेख पाले जि. पुणे येथे असून ‘णमो अरिहंताणं’ अशी अक्षरे कोरली आहे., इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात आचार्य समंतभद्र कराड (करहाटक) येथे वादसभेसाठी आल्याचा उल्लेख येतो. सातवाहन राजा हाल याने संकलित केलेल्या ‘गाथा सप्तशती’त जैन सूरींच्या अनेक गाथा आढळतात. सहाव्या शतकात तेर (उस्मानाबाद) येथे करकंडू राजाने सुंदर गुहामंदिरे खोदवली असल्याचे स्पष्ट पुरावे आहेत. आठव्या शतकातील राष्ट्रकूटवंशीय राजा दंतीदर्ग यांच्या दरबारात आचार्य अकलंकाचा सन्मान झाला होता. राष्ट्रकूट राजा अमोघवर्ष याने जैनधर्म स्वीकारून नाशिकजवळ चंदनपुरी येथे ‘अमोघबस्ति’ नावाचे जैनमंदिर बांधल्याचा इतिहास आहे. एलोरा येथील लेण्यात इंद्रसभा लेणी खोदवणारा एल सामंत हा राष्ट्रकूट राजा इंद्रचा मांडलिक होता. यादवांची राजधानी असलेल्या देवगिरीच्या अंबरकोटातील जैन मंदिर आजही आपण पाहू शकतो. कुंडल क्षेत्राला इ.स. ६९४मध्ये चालुक्य व राष्ट्रकूट राजांनी दान दिल्याचे शिलालेख आहेत. कोल्हापूर शिलाहार वंशातील राजा गंडरादित्य रुपनारायण यांच्या नावाने बांधलेले रूपनारायण मंदिर आणि त्या मंदिराचे आचार्य माघनंदी यांचा इतिहास सर्वज्ञात आहे. डिचोला पेडणे येथील उत्खननात मिळालेल्या मूर्त्या व शिललेखावरून गोवा, कोकण विभागातील जैन प्रभाव जाणवतो. विद्येचा मूळारंभ करतांना ‘ॐ नमः सिद्ध:’ हा जैनांचा मंत्र सर्वांनाच शिकवला जाई. त्यावरून ‘ओनामासिधम’ हे रूप तयार झाले
महाराष्ट्रापासून सुदूर असलेल्या श्रवणबेळगोळला गगनस्पर्शी गोमटेश्वराच्या चरणाशी, मराठीच्या जयंतीचे अभिलेख जैनांनीच कोरले. ‘श्री चामुंडराये करवियले, गंगराजे सुत्ताले करविले’ असे हे भव्योत्तम शिल्प म्हणजे एक प्रकारे जैनांनी शिल्पात गायिलेले मराठीचे महिमास्तोत्रच आहे. मराठीच्या माऊलीचे म्हणजे महाराष्ट्री अपभ्रंश भाषेचे संगोपन जैनांनी जन्मजन्मांतरीच्या जिव्हाळ्याचे केले आहे. महाराष्ट्री अपभ्रंश भाषा ही जैन अपभ्रंश भाषा म्हणून ओळखली जाते, इतका जैनांचा आणि महाराष्ट्रीचा अतूट संबंध आहे.
१० व्या शतकातील पुष्पदंत व मेघराज हे महाकवी माझे व आपल्या सर्व मराठी जैन साहित्य रसिकांचे दैवत आहेत, असे मला वाटते. कारण महाराष्ट्रीला परम् वैभवाच्या सह्यागिरीवर विराजमान करणारा महाकवी पुष्पदंत हा मराठी मातीतच जन्मास आला. बुलढाण्याजवळचे रोहिणखेड हे त्याचे मूलस्थान. ‘खंडोबा’ हे त्याचे मूळ नाव आणि महाराष्ट्र महोदयाचे महान शिल्पकार असलेले मान्यखेटचे राष्ट्रकूट सम्राट हे त्याचे उदार आश्रयदाते. पूर्व जीवनात शिवाच्या आराधनेत रमणारा हा महाकवी उत्तर जीवनात जिनचरणी विनीत झाला आणि त्याने ‘महापुराण’, ‘नागकुमारचरित’, ‘यशोधरचरित’ या तीन अपभ्रंश काव्यांची निर्मिती केली. शिवाकडून जिनाकडे झालेली त्याची ही धार्मिक वाटचाल आश्चर्यकारक आहे.
महाकवी पुष्पदंतापूर्वी योगींद्रदेवासारख्या महान जैन सिद्धाने कंठखाने उद्घोषित केले होते की, ‘सो सिऊ संकरु विण्ह सो, सोरुद्दवि सो बुद्ध।। सो जिम्मु ईसरु बंभुसो, सो अनंतु सो सिद्ध॥’ पुष्पदंताची प्रकृति सर्वस्वी मराठी होती. तो स्वत:ला अभिमान ‘मेरु’ म्हणवून घेतो. राज वैभवाला निस्पृहपणे तुच्छ लेखतो. आपल्या काव्यप्रतिभेनी शतावधी रसिकांना पुलकित करण्याची शक्ती असणारा हा कवी सम्राटाच्या आणि महामात्म्यांच्या आश्रयात राहिला कारण आश्रयदाते, हे त्याच्या काव्यकमलाभोवती रुंजी घालणारे भ्रमर होते म्हणूनच! पुष्पदंताला राजाच्या वैभवाशी कर्तव्य नव्हते. त्याच्या लेखी महत्त्व होते, ते त्यांच्या रसिकतेचे, गुणग्राहकतेचे!
महामात्य भरताला त्याने एकदा स्पष्टपणे सुनावले होते की, मी धनाला कस्पटाप्रमाणे तुच्छ मानतो, त्याची मला जरुरी नाही. मी तर केवळ अकारण प्रीतीचा भुकेला आहे आणि त्यासाठीच तुमच्या प्रासादात विसावलो आहे. माझ्या प्रतिभा कुंदाला काव्याचे घुमारे फुटतात तेजिनचरणांच्या भक्तीतून निर्वाहाच्या विचारातून नव्हे!
कवीकुलतिलक पुष्पदंताच्या मनाची महत्ता त्याच्या कवितेतून सहस्त्रकळांनी व्यक्त झाली आहे. मराठी मनाचे सर्व सुंदर उन्मेश त्यांच्या कवितेत दृष्टीगोचर होतात. त्याच्या भाषेत जसे मराठीपण आहे. तसेच त्याच्या भावातही मराठपण आहे. भाव आणि भाषा याच्या मराठपणाचा प्रभाव पाहयचा असेल तर पुष्पदंतानी केलेले हे वीरवर्णन पहा-
‘भडु को वि भणई जइ जीड़ जीउ। सो जाऊ थाऊ छुडु पहू पयाड॥
भडु को वि भणई रिऊ एंतु चंडु। मइं अजुकरवेड खंडु खंडु॥
पडु को वि भणई, जइ मुंडु पडइ। तो महूं ऊंडु जिरिउं हणविणडइ॥’
युद्धभूमीवर शत्रूशी भिडताना कोणी युद्धा म्हणतो, प्राण गेला तरी बेहत्तर, पण स्वामींच्या यशाला कलंक लागता कामा नये. कोणी योद्धा म्हणतो, ‘शत्रू कितीही मोठा असला तरी आज मी त्याचे खंड खंड करून टाकीन. कोणी योद्धा म्हणतो की, शत्रूशी लढता लढता माझे शीर कापले गेले, तरी माझे धड शत्रूचा निःपात करत रणभूमीवर नाचत राहील.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
पुष्पदंत हा महाराष्ट्री अपभ्रंश साहित्याच्या शिल्पकाराच्या मालिकेतला मेरुमणी होय. महाराष्ट्र अपभ्रंश भाषेचा सम्राट पुष्पदंताएवढाच तोलामोलाचा मेघराज व त्याचे साहित्याने माझ्या मनाला भुरळ घातली आहे. सोळाव्या शतकात जे जैन वाङ्मय निर्माण झाले, त्यात पंडित मेघराजाची ‘जसोधर रास’ अथवा ‘जसोधर चरित्र’ ही कृती महत्त्वाची आहे. कोणा शांतिदासाचा शिष्य असलेला हा मेघराज अथवा मेघा कवी यशोधर चरित्र कथेचे पराठीत अवतरण घडवण्यात यशस्वी झाला आहे.
यापूर्वी याच शतकात नागो आया नामक कवीने २९२ ओव्यात संक्षेपाने हीच कथा मांडली आहे आणि या (कदाचित) दोघांच्या पूर्वीच्या काळात गुणनंदी गुणसागराने १३१६ ओव्यात अत्यंत ओघवत्या व ओजस्वी शैलीत या कथेला मराठी परिवेष दिला आहे.
यशोधर चरित्राची कथा जैन साहित्यात अतिप्राचीन काळापासून प्रिय आहे. संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश, तामिळ, कन्नड तसेच प्राचीन हिंदी, गुजराती व मराठी या भाषात या कथेवर ३०हून अधिक रचना पहायला मिळतात. महाकवी पुष्पदंतानेही ‘जसहरचरित्र’ लिहून आपली यशपताका फडकवली आहे. यशोधर राजा व त्याची माता चंद्रमती यांची हिंसाचार केल्यामुळे त्यांना अनेक जन्म घेऊन कशी दुःखे भोगावी लागली, हा या कथेचा विषय आहे. हिंसेची अनिष्ठता आणि जैन धर्माला प्रिय असलेल्या अहिंसेची महनीयता ही या कथेची तात्त्विक बैठक आहे. या कथेत कमालीची नाट्यात्मकता आहे. त्यामुळे ती अथपासून इतिपर्यंत चित्ताकर्षक आहे. पंडित मेघराजने कथेच्या प्राणभूत नाट्यमयतेची नाडी ओळखून मूळ कथा आपल्या रसाळ वाणीने खुलविली-फुलवली आहे.
यशोधर राजा, त्याची व्यभिचारिणी पत्नी अमृता आणि धर्माच्या अज्ञानातून धर्माच्या नावाने अनिष्ठाचार करणारी राजमाता चंद्रमती, यांची व्यक्तिचित्रे मेघराजने अत्यंत जिवंत शैलीत रेखाटली आहेत. कथानिवेदनात येणाऱ्या विविध भावनांच्या हेलकाव्याबरोबरच वाचकांचीही मने हेलावतात आणि मेघराजाच्या या धर्मकथेत रस घेता घेता, त्याला अपेक्षित असलेल्या अर्थाने धर्मप्रवण बनू लागतात. एवढा त्यांच्या निवेदन कौशल्याचा प्रभाव आहे. वाग्वदिनी सरस्वती त्याला प्रसन्न आहे. तिच्या अमृतदृष्टीतून बरसरणाऱ्या कृपाजळाने पुष्ट बनलेला हा मेघराज मेघदर्शनाने नाचणाऱ्या मोरासारखा मत्त बनूनच कथा-कथनात रंगून गेला आहे.
कथेच्या प्राणभूत नाट्यमयतेला साकार करणारी संवाद कुशलता आणि चित्रमयता हे मेघराजाच्या कथनशैलीचे प्रधान वैशिष्ट्य आहेत. अमृता राणीने यशोधर राजाला विष घातले आणि नंतर त्याच्या उरावर बसून आणि त्यांच्या कंठावर अंगठा दाबून त्यांचा जीव घेतला आणि मग लटकणेपणाने तिने दुःख प्रदर्शन सुरू केले. या प्रसंगाचे मेघराजाने केलेले वर्णन पाहण्यासारखे आहे.
कवी पुष्पदंत व मेघराज यांची काव्ये म्हणजे साक्षात साहित्याने कैलास लेणेच आहे. उपमा-यमक-अलंकार या मराठी भाषेच्या अलंकारांनी जैन तत्त्वज्ञानाला जखडून टाकले आहे. ही काव्ये म्हणजे भाषेच्या सकल गुणांनी मंडित आहेत. या तत्त्वज्ञानासारख्या रुक्ष विषयाला प्रतिभेची झालर चढवून काव्य रसिक वाचकांना ज्या परिणाकतेने भुरळ घातली आहे. त्याला तोड नाही.
मध्ययुगीन मराठी
महाराष्ट्री अपभ्रंश भाषेतून मराठी भाषेची उत्पत्ती आजच्या मराठीची जननी आहे. ती मराठी सारखीच आहे म्हणून तिला डॉ. तगारे ‘राष्ट्रकूटकालीन मराठी’ म्हणतात.
१४५० ते १८५० या मध्ययुगीन मराठी भाषेत जैन ग्रंथकारांची संख्या ५०हून अधिक असून लहान-मोठ्या ग्रंथांची संख्या १५०हून अधिक आहे. मध्य युगाच्या प्रारंभीच्या काळात गुजरातच्या ईडर येथील भट्टारक व कारंजा पीठाचे भट्टारक या गुरुशिष्यांचे योगदान मोठे आहे. ईडरचे भट्टारक भुवनकीर्ति यांचा शिष्य ब्रह्मजिनदास हा गुजराती साहित्याचा अधिकारी होता. १४५०ला त्यांनी गुजराती भाषेत ‘राम’ लिहिले आहेत. ब्रह्मजिनदासाचे शिष्य गुणदास यांनी मोठ्या प्रमाणामध्ये मराठीत लेखन केले. त्यामध्ये मराठी भाषेतील एक उत्कृष्ट कलाकृती श्रेणिक चरित्र लिहिले आहे. हाच गुणदास पुढे गुणविती आचार्य झाला आणि ‘धर्मामृत’ नावाचा आदर्श काव्यग्रंथ लिहिला. हा गुणदास गीतकारही आहे. क्षमा गीत, विधू गीत, गावहाणे, रामचंद्र हळदुली, अशा लोकवाङ्मय प्रकारात गीते लिहिली, ज्यामध्ये ज्ञानदेव-नामदेवांच्या गीतांप्रमाणे नादमधुरता आहे.
त्यानंतर गुणकीर्ति यांनी ‘परापुराण’, ‘बारा अनुप्रेक्षा’, ‘रुक्मिणी हरण’, ‘रामचंद्रफाग’, ‘नेमिनाथ पाळणा’ अशा महत्त्वपूर्ण रचना केल्या. मेघराज यांनी तर यशोधर चरित्र, पार्थनाथ भवांतर, कृष्णगीत, रामायणी कथा, गुजरी मराठी गीत, गोमटस्वामी गीत अशा रचना करून आपल्या प्रतिभेची साक्ष दिली आहे. कामराज सुरीजनानी परमहंस कथा लिहून आध्यात्मिक रूपकाद्वारे चित्तवेधक चंपूकाव्ये लिहिली आहेत. यानंतर १४९३च्या सुमारास देवगिरी येथे महाकवी जिनदास यांने हरिवंश पुराणाची रचना केली. याच कालखंडात दामा पंडितांने ‘जंबुस्वामी चरित’, ‘दानशिलतपभावना’ या रचना, तर दयासागराने ‘सम्यकत्व कौमुदी’, ‘धर्मामृत पुराण’ अशा रचना केल्या आहेत.
पैठणच्या चिमणा पंडितानी फुगडी, पिंगा, टिपरी, लाखोटा आदी लोकगीतांचा आधार घेऊन केलेल्या रचना सुप्रसिद्ध आहेत. लातूरचे भट्टारक महिचंद्र यांनी १९१६ सालात ओवीबद्ध आदिनाथ पुराण, शांतिनाथ स्तोत्र, नेमिनाथ भवांतर आदी रचना करून जैन साहित्याला आपली सेवा बहाल केली आहे. महिचंद्राचे शिष्य देवेंद्रकीर्ति यांनी कालिकापुराण तर जिनसागर व जनार्दन यांनी १७२४ ते १७४४ या काळातत लिहिलेल्या भविष्यकथन करणाऱ्या ‘कयको’ या काव्यप्रकाराचा उपयोग करून रचना केली आहेत.
ज्ञानेश्वरीवरही जैन साहित्यातील अहिंसेचा प्रभाव स्पष्ट दिसतो. संत ज्ञानेश्वरांनी अहिंसेची जी व्याख्या केली आहे, असे अनुपम भाष्य अन्यत्र नाही. अहिंसेचे वर्णन करताना आपल्या काव्यमय भाषेत ज्ञानेश्वर म्हणतात-
“ते वाट कृपेचि करितु । जे दिशाच स्नेहे करितु । जीवातली अंथरितु । जीव आपुला ।। पुढास्नेह पाझरे । मागा चालति अक्षरे । शब्द पाठी अवतरे कृपा आधी। साच आणि मवाळ । मितुले आणि रसाळ । शब्दजैसे कल्लोळ । अमृताचे । आसुडेलवारा । नख लागेल अंबरा । इया बुदी करा । चळो नेथि। कमलावरी भ्रमर । पाय ठेविता सुकुमार। कुचंबेल केशर । इये शंका ।। स्वंये श्वसनेचि ते सुकुमार । मुख मोहाचे माहेर । माधुर्या जाहले अंकुर । दर्शन तैसे। तैसे दयालुत्व आपुले । मने हातापाया आणिले । मग तेच निपजविले । अहिंसेते । जगाच्या सुखोपदेशे। कायावाचामनसे। रहाटणे हे अहिंसे । स्व जाण॥”
थोडक्यात, अहिंसावाद्यांनी श्वासही हळू घ्यावा, प्रेम हदयात नाही, तर कृतीत आणल्यास अहिंसेचे पालन होईल. जगाच्या सुखासाठी झटणे म्हणजेच अहिंसा. गोड शब्दांनी कार्यसिद्धी करून घ्यावी. असे अहिंसेवरील भाष्य ज्ञानेश्वरांनी केले आहे. ज्ञानेश्वरांनी इतके सूक्ष्मचिंतन केले, जणू काय त्यामधून जनमतच प्रवृत्त झाले आहे. ज्ञानेश्वरांनी अहिंसेची केलेली चरम व्याख्या पाहता जैन तत्त्वज्ञानाने कृतकार्यतेची धन्यता अनुभवली पाहिजे, ज्ञानेश्वरांविषयी कृतज्ञ असले पाहिजे.
बागेत टोळ जातो व फुलाचा नाश करून आसुरी आनंदाने बागेबाहेर पडतो. पण पुलपाखरू प्रत्येक फुलाचा वास घेते, पण कोणत्याही फुलाचा नाश करत माही. जगताना टोळासारखे नाही, तर फुलपाखरासारखे जगा, असे महावीर सांगतात. भगवान महावीरांच्या या कथनाचे प्रतिबिंब मराठी जैन साहित्यात उमटलले पानोपानी दिसते.
महाराष्ट्र जैन साहित्य परिषद आणि जैन साहित्य
महाराष्ट्र जैन साहित्य परिषदेच्या स्थापनेपूर्वीही अनेक साहित्यिकांनी मराठी शारदेची पूजा बांधली होती. विसाव्या शतकारंभी श्री. तात्यासाहेब पांगळ यांनी सरस, सुरस ग्रंथमाला स्थापून कथा-कादंबऱ्या प्रसिद्ध केल्या. मराठी जनतेला त्यांनी साहित्य वाचनाची गोडी लावली. मोडनिंब येथील वा. ना. शहा यांनी तर उत्कृष्ट कादंबऱ्या लिहिल्या. त्यांची ‘सम्राट अशोक’ ही कादंबरी मुंबई विद्यापीठात अभ्यासक्रमात होती. शेठ हिराचंद नेमचंद यांनी १३४ वर्षापूर्वी ‘जैनबोधक’ हे वर्तमानपत्र काढले व जैन समाजाच्या मानसिक परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोविली. त्या मालिकेतच पंडित कल्लाप्पाण्णा निटवे शास्त्री, धर्मवीर रावजी सखाराम व जीवराज गौतमचंद यांनीही आपल्या संपादकीय कालात जैनत्व जागृतीचा व सामाजिक समस्यांचा पाठपुरावा केला.
तिकडे विदर्भात अकोला येथे श्री बाळासाहेब चवरे वकील यांनीही क्रांतिकारी विचारांची व परिवर्तनवादी विचारांची चळवळ उभी केली. कोल्हापूर भागात दिवाणबहादर आण्णासाहेब लठ्ठे यांनी वयाच्या २२व्या वर्षी ‘प्रगती जैनविजय’च्या रूपाने प्रबोधनाची ज्योत प्रज्वलित केली. याच सुमारास - १९१८मध्ये ब्र. श्री. देवचंद कस्तुरचंद शहा (गुरुदेव समंतभद्र) यांनी कारंजा येथे महावीर ब्रह्मचर्याश्रमाची स्थापना केली. त्यांच्या गुरुकुल प्रणालीने जैन समाजात शिक्षण, संस्कार यामुळे उत्तम कार्यकर्ते व साहित्यिक निर्माण केले. श्री. माणिकचंद भिसीकर, श्री. माणिकचंद चवरे, पं. धन्यकुमार भोरे, डॉ. श्री. सुभाषचंद्र अक्कोळे, प्रा. श्री. जे. डी. भोमाज, श्री. मृत्युंजय मालगावे, डॉ. सुबोधकुमार काळबे, प्रा. सुमेरचंद जैन, न्यायाधीश पार्श्वनाथ गुंडवाडे, डॉ. कुलभूषण लोखंडे, पं. नरेंद्र भिसीकर, डॉ. हेमचंद्र वैद्य, प्रा. महावीर कंडारकर, डॉ पद्यनाम जैनी, ब्र. आदिनाथ सोनटक्के असे अनेक साहित्यिक गुरुकुल प्रणालीने समाजाला दिले. गुरुदेवांचे हे योगदान महत्त्वाचे आहे.
१९३४ साली स्तवनिधी येथे तात्या नेमिनाथ पांगळ यांच्या अध्यक्षतेखाली जैन साहित्य संमेलन भरवून जैन साहित्यिकांना संघटित करण्याचे प्रयत्न झाले.
१९३५ - जैन महाराष्ट्र कवि मंडळ स्थापून ‘नादलहरी’ द.भि. रणदिवे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला.
१९४० - जैन महाराष्ट्र स्त्री लेखिका - लेखसंग्रह सुलोचनाबाई भोकरे
सोलापूरातील श्राविकाश्रम संस्थेच्या पद्मश्री पं. सुमतीबाई शहा यांनी आपल्या श्रेष्ठतम कर्तृत्वाने अनेक मराठी ग्रंथ निर्माण केले. त्यांनी संपादिलेले ‘पूर्णार्घ्य’ हा ग्रंथ जैन संस्कृती, परंपरा, इतिहास यांचा ज्ञानकोशच म्हणावा लागेल. श्राविका आश्रमातून शिक्षण प्रसाराबरोबर साहित्य निर्मितीचा अखंड प्रवाह निर्माण झाला आहे.
दक्षिण भारत जैन सभेनेही मराठी जैन साहित्य निर्मितीत मोलाचे योगदान दिले आहे. श्री. बा. भू. पाटील यांनी जैन इतिहास नावाचे पुस्तक लिहून नव्याने जैनत्व जागृतीचा जोरदार प्रयत्न केला. याच कालावधीत किर्तनकार तात्यासाहेब चोपडे, सुप्रसिद्ध लेखक आ. भा. मगदूम, पुण्याचे ‘प्रभातकार’ वा. रा. कोठारी, अज्ञात (कोशकार) यांची साहित्यसेवा जैन समाज विसरू शकत नाही. विसाव्या शतकातील नव्या तरुणांनी सभेच्या प्रेरणेने श्री लठ्ठे यांचे चरित्र, श्री. माणिकचंद जव्हेरी यांचे चरित्र, प्राचार्य जी. के. पाटील व डॉ. सुभाषचंद्र अक्कोळे यांच्या प्रगतीतील लेखांचा संग्रह प्रकाशित केला.
वरील संस्थांखेरीज स्वतंत्रपणे लिखाण करणारी लेखक मंडळी आहेत. त्यात डॉ. निर्मलकुमार फडकुले यांनी अनेक सुंदर ग्रंथ साहित्य शारदेला अर्पण केले आहेत. सौ. सुरेखा चंद्रगुप्त शहा (सोलापूर) यांनी ७२हून अधिक पुस्तके लिहिली आहेत.
कवी श्री अज्ञान (मो. हि. गांधी) यांनी मराठी काव्य प्रांतात महापंडित श्री जिनदासजी शास्त्रीप्रमाणे अनेक काव्यग्रंथ स्वत: लिहून व छापून प्रसिद्ध केले आहेत. ‘समाचार’चे सहसंपादक श्री. ना. हि. शहा यांनी या दैनिकाची संपादकीय धुरा सांभाळली होती. जैन समकालीन वृत्तपत्रीय लेखनही त्यांनी मुबलक प्रमाणात केले आहे. ‘प्रगती-जैनविजया’च्या माध्यमातून द. भा.जैन सभेने एक शतक साहित्य संसार उभा केला. श्री लठ्ठे हे स्वत: उत्तम लेखक होते. जैनधर्मावरील त्यांची पुस्तके आजही अभ्यासनीय आहेत. इंग्रजीवर त्यांचे प्रभुत्व वाखाणण्यासारखे होते. ‘सन्मती’ मासिकाने ५० वर्षांहून अधिक काळ उत्तमोत्तम लेखकांच्या सहकार्याने मराठी साहित्याची परंपरा जपली आहे. याशिवाय सोलापूरचे श्राविका, पुणे येथील धर्ममंगल, कोल्हापूरचे रत्नत्रय, नांदणी येथील सार्वधर्म इ. मासिकांनी मराठीच्या वृद्धीत भरपूर योगदान दिले आहे.
जैन बोधकांची १५ वर्षे धुरा सांभाळून आम्ही स्वतः १९९९पासून ‘पंचरंग प्रबोधिनी’ नावाचे मासिक सुरू केले आहे. त्यालाही आत्ता २३ वर्षे पूर्ण झाली आहेत.
जैन साहित्य निर्मिती अत्यंत जिकिरीची, आतबट्ट्याची व सतत मानसिक तणावात ठेवणारी आहे, तरी परंतु साहित्याची तीव्र ओढ हाडाच्या साहित्यिकांना गप्प बसू देत नाही.
मुंबईचे श्री श्रेणिक अन्नदाते यांनी ‘तीर्थकर’ मासिकाच्या माध्यमातून व आयुष्याच्या उत्तरकाळात मराठी साहित्य प्रकाशन क्षेत्रात उतरून उत्तमोत्तम कथासंग्रह दिले आहेत. जैन मराठी साहित्यात त्यांचेही योगदान चिरंतन ठरावे.
महाराष्ट्र जैन परिषदेने ही सारी गुणी कर्तृत्ववान साहित्यिक मंडळी एकत्र आणण्याचा व नवनवीन साहित्य प्रकाशित करणाऱ्या नव्या पिढीलाही प्रेरणा देण्याचा भव्य उपक्रम संमेलनाच्या रूपाने अमलात आणला आहे. कसलेही भक्कम आर्थिक पाठबळ नसताना गेली २४ संमेलने परिषदेने अत्यंत थाटामाटात पार पाडली. वेगळे जैन साहित्य संमेलन कशासाठी असे विचारणाऱ्यांना ही साहित्य संमेलने हेच उत्तर आहे.
जैन मराठी परिषद ही जैन समाजाची अत्यंत मौल्यवान ठेव आहे. जैनांची अस्मिता, जैनांची जागतिक मूल्ये म्हणजे अहिंसा, सत्य, अनेकांत व अपरिग्रह यांना प्राणपणाने जपणारी परिषद आहे. जातीभेद, भाषाभेद, वर्णभेद किंवा मानवामानवातील कोणतीही उच्च-नीचता न मानणारी ही साहित्य संस्था आहे.
जैन साहित्य परंपरा अति प्राचीन आहे. खरे म्हणजे भारतीय संस्कृतीच्या पायरीचा दगडच आहे. पुण्याच्या तिसऱ्या संमेलनाचे उद्घाटक पंडित महादेव शास्त्री जोशी म्हणाले होते, ‘जैन साहित्य संमेलनास आम्ही जातीय संमेलनाच्या पंक्तीत बसवणार नाही.’ समाजातील स्थित्यंतराचा विचार करून शास्त्र आणि धर्म सुरक्षित करण्यासाठी साहित्य सभा भरवण्याची जैनांची प्राचीन परंपरा साहित्य संमेलनाच्या रूपात नव्याने प्रगट झाली आहे. चंद्रगुप्त मौर्यांच्या काळापासून जैन साधूंची अशी संमेलने भरत आली आहेत.
प्राचीन जैन मराठी साहित्याचे संशोधक व अभ्यासक इतिहासकार वि.का. राजवाडे, काका कालेलकर, वि.वा. मिराशी, शां.भा. देव, डॉ. सांकलिया, डॉ. वि.भि.कोलते, डॉ. शं.गो. तुळपुळे, डॉ. रा.चिं. ढेरे, डॉ. अ.ना. देशपांडे, डॉ.व.दि. कुलकर्णी, डॉ.सुभाषचंद्र अक्कोळे, डॉ.कृ.पा. कुलकर्णी, डॉ. तगारे, डॉ. श्रीरंग कुलकर्णी ब्रह्मानंद देशपांडे आदी विद्वतजनांचे साहित्य वाचून मराठी जैन साहित्यविषयक ज्ञानात भर पडली आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना १८७८ साली न्यायमूर्ती रानडे यांनी केली. त्यानंतर १०६ वर्षांनी (१९८४) महाराष्ट्र जैन साहित्य परिषदेची स्थापना झाली. महाराष्ट्र जैन साहित्य परिषद स्थापनेमागे विद्रोहाचा किंवा असंतोषाचा भाग नाही. ‘अविभक्त विभक्तेषु’ असेच याचे स्वरूप व हेतू आहेत. महाराष्ट्रातील जैन साहित्याचे हे व्यासपीठ एकंदरीत मराठी साहित्याच्या विकासाला, अभिवृद्धीला पूरक व संजीवक ठरले आहे. साहित्याचे क्षेत्र हे विचारवंताचे, बुद्धिवंतांचे असल्याने सांप्रदायिकता बाजूला ठेवून विचार झाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. साहित्याबरोबर संस्कृतीचाही विचार व्हावा असा आग्रह आहे.
महाराष्ट्रातील पुरोगामी विचाराचे अध्वर्यु महात्मा ज्योतिबा फुले व कृतीशील छत्रपती शाहू महाराजांचे विचार वाचताना-ऐकताना मला महावीर-बुद्धांचा समतेचा विचार त्यांच्या तोंडातून ऐकतो असे वाटते -
“कम्मुणा बंभणो होई, कम्मुणा होइ खत्तिओ।
वइसो कम्मुणा होई. सुद्दो हवइ कम्मुणा ।।
(ब्राह्मण काय किंवा क्षत्रियत्व काय, वैश्यपण काय, पण क्षुद्रपण केवळ कर्मावर अवलंबून आहे. त्याचा व्यक्तिशी संबंध नाही)
न वि मुंडिएण समणो - (मुंडण केल्याने कोणी श्रमण होत नाही)
न ओंकारेण बंभणो ।। (ओमकाराचा उच्चार करुन ब्राह्मण होता येणार नाही)
न वि रण्णवासेन - (अरण्यात राहिल्याने मुनि होत नाही)
कुसचीरेण न तावसो ॥ (वल्कले नेसून तपस्वी होणे शक्य नाही)”
या विचारामागील तर्कात आणि भावनेत विचाराचे अफाट सामर्थ्य दडले आहे.
चेतनेचे स्वरूप अधिक व्यापक करण्याची गरज
जीवनात मांगल्य, सौंदर्य व गुणवैभव कसे निर्माण करता येईल, हे साहित्याचे ध्येय आहे. आजचे साहित्य हे स्त्री-पुरुषांच्या प्रेमकथेस महत्त्व देत आहे. जागतिकीकरणाच्या वावटळीत बहुराष्ट्रीय कंपन्या, जाहिरात आणि प्रसारमाध्यमांनी भारतीय माणूस, भाषा आणि संस्कृती यांना उखडून टाकण्याचे काम केले आहे. यामध्ये स्वत्वाचा कोंब करपून गेला आहे. शिक्षितांची मने संवेदनहीन दगडासारखी झाली आहेत. सुख ओरबाडण्याची वृत्ती वाढली आहे. माणूस सुखलोलूप झाला आहे. आर्थिक विषमता कमी होईल, असे वाटत असताना ती झपाट्याने वाढत आहे. विषमतेमुळे हिंसा वाढण्याची शक्यता बळावली आहे. कष्टकरी, शेतकरी, अशिक्षित सामान्य माणूस दुर्लक्षिला जात आहे. नट-नट्या, क्रिकेटपटू आणि जाहीरातीतील मॉडेल तरुणांचे आदर्श झाले आहेत. वलयांकित माणसे समाजाचे नेतृत्व करत आहेत. आज विज्ञान-तंत्रज्ञान नव-साम्राज्यवादाची व भांडवलदारांची दासी म्हणून वावरत आहे. विज्ञानाच्या संहारक-भयानक शक्तीला गांगरून गेलेला माणूस ईश्वराकडे मदतीची याचना करत आहे.
आज काम आणि अर्थ या दोन प्रेरणांना सर्वाधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. सवंग, करमणूक वाढली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान माणुसकीची साथ सोडून मस्तवाल जनावराप्रमाणे उंडारत आहेत. वास्तविक आपल्याकडे निकोप सांस्कृतिकतेच्या अनेक परंपरा आहेत. तत्वज्ञान, शास्त्रीय संगीत, नाटके, दुर्मीळ ग्रंथ, ऐतिहासिक परंपरा, चित्रकला हे आपले अलंकार आहेत. हे शालू-शेले आपण जपले पाहिजेत.
खरं म्हणजे महाराष्ट्रातील जैन लोकांचे प्रश्न, समस्या व मराठी जैन माणसाची अस्मिता याबाबत फारच कमी लिहिले जाते. जैन समाजासाठी जर साहित्य निर्माण करावयाचे असेल, तर त्या समाजाच्या मानसिकतेचे भाव-भावनांचे, जैन शेतकऱ्यांच्या समस्या, व्यापारी, शिक्षण या विविध समस्यांवरचे चित्रण साहित्यात असायला हवे. ते चित्रण १०० टक्के प्रातिनिधिक व सच्चे, प्रामाणिक असावे. यासाठी मराठी जैन साहित्यिकाची आजची मानसिकता अधिक गहिरी, अधिक व्यापक व सर्व समावेशक होणे गरजेचे आहे. उपेक्षित लेखकाची दखल मराठी जैन साहित्य संमेलनाच्या निमित्ताने घेतली पाहिजे, असे सूचवून नवयुवकांसाठी काव्य लेखन, कथा लेखन, वृत्तलेखन आदीच्या कार्यशाळांचे आयोजन करण्याचेही आवाहन करत आहे.
मूल शाळेत गेल्यानंतर लिहायला वाचायला शिकत असते. तेथेच वाचन संस्कृतीच्या पायाभरणीला सुरुवात होते, म्हणून शाळेतील वातावरण हे वाचनसंस्कृतीला पोषक असले पाहिजे. खरे तर नवीन मजकूर वाचायला विद्यार्थी उत्सुक असतात. म्हणून त्यांना नवीन मजकूर वाचायला मिळेल अशी योजना आपल्याकडे हवी. दुसरी गोष्ट, वाचन कमी झाले आहे, असे आपणास म्हणता येणार नाही, असे मला वाटत नाही. वाचनाची माध्यमे बदलली आहेत इतकेच. छापील माध्यमाची जागा आता इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी घेतली आहे. नवी पिढी वाचत आहे पण फक्त गरजेनुसार... व्यवसायानुसार. जीवनावश्यक, जीवनोपयोगी वाचत आहे. जीवनवादी वाचन कमी झाले आहे, ही वस्तुस्थिती आहे.
विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे दाराशी आलेल्या सुखाची चटक वाढली आहे. आयता पैसा, श्रम न करता भरपूर संपत्ती मिळवण्याची जुगारी प्रवृत्ती वाढली आहे. प्रामाणिक कष्ट हे ओझे वाटू लागले आहे. विद्यार्थ्यांना ‘श्रमातून कमवलेले वैभव हेच खरे वैभव असते’, हे सांगण्याचे धाडस पालकांत राहिले नाही. मुलांबाबत आपण एक पालक म्हणून फारच निष्काळजी आहोत. मुलांचे मानसशास्त्र जाणून त्यांचे कल, आवडीनिवडी, त्यांची बौद्धिक कुवत तपासून त्यांना करिअरची संधी दिली पाहिजे. मुलांच्या मनाविरुद्ध त्यांच्यावर शिक्षण लादले जाते. डॉक्टर, इंजिनिअर, वकील याबरोबरच खेळ, कला, भाषा व इतर अनेक कौशल्ये, अनेक क्षेत्रे अनभिज्ञच राहतात, याकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे असे आवाहनही करत आहे.
शृंगाराच्या दलदलीतून बाहेर पडून नैतिक मानवी मूल्यांचा उत्कट भाव प्रगट करणारे मराठी जैन साहित्य म्हणजे भारतीय चेतनेचे स्तोत्रच आहे, असे मला वाटते. या चेतनेचे स्वरूप अधिक व्यापक, अधिक प्रकाशक करण्याची गरज आहे. यासाठी मी स्वत: व महाराष्ट्र साहित्य परिषद आज वचनबद्ध होत आहे.
‘खम्मामि सव्व जीवे । सव्वे जीवा खम्मतुमे।
मित्तिमे सव्व भूदेसु ।वैरं मज्झं न केवि।’
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment