३० जूनपासून आषाढाला सुरुवात झाली… आणि आषाढ म्हटला की, अनेकांना महाकवी कालिदासाच्या ‘मेघदूत’ची आठवण येते. ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या त्यातल्या शब्दांना तर ‘मोस्ट कोटेबल कोट’चा दर्जा मिळालाय! आणि ‘मेघदूत’? त्याची ख्याती काय वर्णावी! गेल्या अनेक वर्षांपासून ‘मेघदूत’ मराठीसह जगभरच्या लेखक, कवी, अनुवादक आणि रसिकवाचकांना मोहिनी घालत आले आहे. त्याची ओळख करून देणारे हे सदर १२ जुलैपासून रोज...
.................................................................................................................................................................
लेखांक सोळावा
उत्तरमेघ
(लेखातला पहिला मूळ संस्कृत श्लोक कालिदासाचा आणि त्याचे अनुवाद अनुक्रमे कुसुमाग्रज, सी.डी. देशमुख आणि शांता शेळके यांचे)
११.
गत्युत्कम्पादलकपतितैर्यत्र मन्दारपुष्पैः
पत्रच्छेदैः कनककमलैः कर्णविभ्रंशिभिश्च।
मुक्ताजालैः स्तनपरिसरच्छिन्नसूत्रैश्च हारै
नैशो मार्गः सवितुरुदये सूच्यते कामिनीनाम्॥
सूर्योदयिं दिसतील तुला त्या नगरीं जलवाहका,
पथि गळलेल्या शीर्ण फुलांच्या वेणींतुनि मालिका,
हार गळ्यामधुनी तुटलेले कानांतिल कुंडलें,
जाण रात्रिं त्या मार्गे गेल्या अधीर अभिसारिका!
वेगें जातां च्युत अलकिंची जेथ मन्दार-वेणी
पानें तैशीं कनक कमलें भ्रष्ट कर्णावरोनी
मुक्ताजाल, स्तन- विचलनें भग्न जे हार होती
हीं रात्रींचा पथ सुचविती कामिनींचा प्रभार्ती
सूर्योदयिं तूं पथीं पाहशिल वेणीमधुनी सुमनें सुटली,
कमळें ढळतां कानांवरुनी ठायीं ठायीं दलें विखुरली,
पुष्ट स्तनांवर हेलकावतां तुटल्या माळा, गळले मोती,
अभिसारोत्सुक रमणी गेल्या इथून रात्रीं - खुणा सुचविती!
सूर्योदय झाला की, नगराच्या मार्गावर केसांतून गळून पडलेली मंदारपुष्पे तुला दिसतील, तसेच गळून पडलेली पर्णभूषणे आणि कानांवरून ओघळून पडलेली सुवर्ण-कमलेही दिसतील. मोत्यांच्या जाळ्या आणि स्तनप्रदेशांवरून तूटून पडलेले हारसुद्धा दिसतील. रस्त्यात पडलेल्या या साऱ्या गोष्टींमुळे रात्री अभिसारिकांनी कुठला मार्ग अनुसरलेला आहे, हे लक्षात येते.
बापट-मंगरूळकर-हातवळणे लिहितात की, आपल्या प्रियकरांकडे जाण्यासाठी या अभिसारिका गुप्त वाटा शोधून काढतात, पण त्या वाटांवर पडलेले हे सारे श्रृंगार पाहून त्यांच्या वाटा सगळ्यांच्या दृष्टीला पडतात.
रात्री अभिसारिका जेव्हा आवेगाने आपल्या प्रियकरांकडे जातात, तेव्हा त्यांच्या चालण्यातील हेलकाव्यांमुळे हे सगळे श्रृंगार विखरून पडले आहेत, असे बहुतेक अनुवादकांचे मत पडले आहे.
कुसुमाग्रज म्हणतात – ‘जाण रात्रिं त्या मार्गे गेल्या अधीर अभिसारिका!’
सीडी म्हणतात – ‘वेगें जातां च्युत अलकिंची जेथ मन्दार-वेणी’
वेगाने जाताना केसांवरची मंदाराच्या फुलांची वेणी आपल्या जागेवरून च्युत होते!
आणि शांताबाई म्हणतात – ‘अभिसारोत्सुक रमणी गेल्या इथून रात्रीं - खुणा सुचविती!’
मात्र बापट-मंगरूळकर-हातवळणे यांचे मत असे की, जाताना प्रियकराला भेटण्याच्या घाईमुळे आणि परत येताना श्रृंगाराचे फक्त अवशेष शिल्लक असल्यामुळे ते श्रृंगार एक एक करून विखरून पडले आहेत.
जाताना आणि येताना दोन्ही वेळा श्रृंगार खाली पडणार, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि दोन्ही वेळची कारणे अतिशय गोड असल्यामुळे आपण दोन्हीही ‘इंटरप्रिटेशन्स’ मान्य करायला हरकत नाही.
१२.
मत्वा देवं धनपतिसखं यत्र साक्षाद्वसन्तं
प्रायश्चापं न वहति भयान्मन्मथः षट्पदज्यम्।
सभ्रूभङ्गप्रहितनयनैः कामिलक्ष्येष्वमोघै
स्तस्यारम्भश्चतुरवनिताविभ्रमैरेव सिद्धः॥ -
वास करी तो यक्षपतीचा सखा इथें शंकर
ओळखुनी हें मदन लाविना भ्रमरधनूला शर;
परंतु वनिता तिथें विंधिती नेत्रशरांनीं प्रियां
शृंगारीं त्या चतुर सुंदरी - कशास कुसुमाकर?
जेथें साक्षात् धनद-सख तो शम्भु राहे म्हणोनी
वाटे भ्याला रतिपति धनु भृंग-रज्जू न आणी
भ्रूसंकेतें अचुक नयनें वेधितां प्रेमि-लक्ष्य
साधे त्याचें पटु रमणिच्या विभ्रमें मात्र कार्य
वसे सदाशिव साक्षात येथें सखा असे प्रिय जो धनपतिचा
म्हणुनि भिउनियां मदन न खेंची भ्रमरधनूची निज प्रत्यंचा
कामिजनांवर परंतु रमणी अमोघ येथें कटाक्ष टाकिति
प्रणयचतुर त्या विभ्रमशीला अनंगहेतू सहज साधिती!
अलकानगरीमध्ये धनपती कुबेराचा मित्र साक्षात शंकर राहतो. त्यामुळे कामदेव मदन, भ्रमरांची प्रत्यंचा असलेले आपले धनुष्य येथे भीतीमुळे धारण करत नाही. परंतु त्यामुळे काही फरक पडत नाही. कामिजनरूप लक्ष्यांचा वेध घेण्याचे कामदेवाचे काम इथल्या चतुर ललना आपले नेत्र-कटाक्ष सोडून करतात. भिवयांची धनुष्ये ताणून सोडलेल्या या कटाक्षांबरोबरच त्यांचे विलासी विभ्रमसुद्धा लक्ष्यवेध करण्याचे काम अतिशय समर्थपणे पार पाडतात.
कामदेव मदनाच्या हातात धनुष्य असते आणि त्याला भुंग्यांची प्रत्यंचा असते. मदनाचा बाण फुलांनी बनलेला असतो. म्हणून कुसुमाग्रज मदनाला ‘कुसुमाकर’ म्हणतात-
‘परंतु वनिता तिथें विंधिती नेत्रशरांनीं प्रियां
शृंगारीं त्या चतुर सुंदरी - कशास कुसुमाकर?’
शांताबाईंनी तर अतिशय सुंदर ओळी लिहिल्या आहेत -
‘कामिजनांवर परंतु रमणी अमोघ येथें कटाक्ष टाकिति
प्रणयचतुर त्या विभ्रमशीला अनंगहेतू सहज साधिती!’
प्रणयचतुर अशा या कामिनींना शांताबाई ‘विभ्रमशीला’ म्हणतात. या ‘विभ्रमशीला कामिनी’ त्यांच्या मनातल्या प्रणयाचा ‘अनंग’ हेतू आपल्या विभ्रमांनी अतिशय सहजपणे साध्य करतात, असे शांताबाई आपल्याला सांगत आहेत! अनंग म्हणजे शरीर नसलेला. आपल्या इच्छांना शरीर नसते, म्हणून त्यांना ‘अनंग’ म्हटले आहे.
चंद्रा राजन म्हणतात -
‘…the God of Love out of fear
refrains from drawing
his bow strung with honeybees,
his work accomplished by lovely women
displaying their alluring charms,
who bend the bow of their eyebrows
to shoot bright glances
unerringly at Love’s targets.’
स्त्रिया आपल्या भिवयांची धनुष्ये ताणून आपले तेजस्वी कटाक्ष आपल्या प्रेमाच्या लक्ष्यांवर फेकत आहेत! आणि त्यांचे नेम अजिबात चुकत नाहियेत!
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
१३.
वासश्चित्रं मधु नयनयोर्विभ्रमादेशदक्षं
पुष्पोद्भेदं सह किसलयैर्भूषणानां विकल्पान्।
लाक्षारागं चरणकमलन्यासयोग्यं च यस्या-
मेकः सूते सकलमबलामण्डनं कल्पवृक्षः॥
विविध मुलायम शालदुशाला, मादक मद्यासव
कटाक्षलीलांचें जें शिकवी नेत्रांना लाघव,
रंगविण्याला चरण लाल रस, सपर्ण पुष्पें तशीं
कल्पतरू दे तिथें भूषणें सारीं ललनेस्तव!
नानारंगी वसन, नयनां मद्य जें नाचवीत
लेणीं नानाविध, नव फुलें पल्लवाच्या समेत
तैसे पादाम्बुज सजविण्या आळता जेथ यक्ष
स्त्री-साजाला पुरवि सगळ्या एकला कल्पवृक्ष
चित्रित वसनें, मादक मदिरा कटाक्ष करि जी अधिकच गहिरे
मृदुल पालवीसवेंच सुमनें, अलंकारही विविध साजरे,
चरणतळां रंगविण्या अळिता, रुचिर मण्डनें विलासिनींचीं,
एक कल्पतरु पुरवी अवघी शृंगाराची हौस तयांची!
या अलकानगरीमध्ये चित्रविचित्र रंगाची वस्त्रे, नेत्रांना अत्यंत दक्षतापूर्वक प्रणयाचे विभ्रम शिकवणारे मद्य, कोवळ्या पानांच्या कोंदणात उमलणारी कोवळी फुले, वेगवेगळे अलंकार आणि पावलांना लावायला लाखेचा रंग, असे सगळे स्त्रियांचे श्रृंगार एकटा कल्पवृक्ष पुरवतो!
या श्लोकातली मजा अशी की, या श्लोकातील मद्य अत्यंत दक्षपणे त्या ललनांना विभ्रम शिकवत आहे. इतर वेळी पिणाऱ्याची दक्षता घालवणारे मद्य इथे मात्र अत्यंत दक्षपणे मदनाचे कार्य करत आहे.
कुसुमाग्रजांनी अत्यंत सोप्या भाषेत हा सगळा आशय आपल्या अनुवादात आणला आहे-
‘विविध मुलायम शालदुशाला, मादक मद्यासव
कटाक्षलीलांचें जें शिकवी नेत्रांना लाघव,
रंगविण्याला चरण लाल रस, सपर्ण पुष्पें तशीं
कल्पतरू दे तिथें भूषणें सारीं ललनेस्तव!’
बोरवणकर इथे मल्लिनाथाची टीप देतात - केशभूषा, देहभूषा, वस्त्रप्रावरण आणि विलेपन ही स्त्रियांची चार मुख्य भूषणे होत. ही सर्व येथे एका कल्पवृक्षापासून मिळतात, असे यक्ष सांगतो आहे.
मल्लिनाथ हे १४व्या किंवा १५व्या शतकातील संस्कृत भाषेचे फार मोठे टीकाकार होते, हे बहुतेक वाचकांना माहीतच असते.
१४.
तत्रागारं धनपतिगृहानुत्तरेणास्मदीयं
दूराल्लक्ष्यं सुरपतिधनुश्चारुणा तोरणेन।
यस्योपान्ते कृतकतनयः कान्तया वर्धितो
मे हस्तप्राप्यस्तबकनमितो बालमन्दारवृक्षः॥
यक्षपतीच्या तिथें निवासाजवळीं माझें घर
इंद्रधनुष्यापरी मनोरम तोरण दारावर,
पुत्रासम कान्तेनें माझ्या वाढविलेला तरू
मंदाराचा पलीकडे, ये हाताशीं मोहर.
अस्मद्गेह द्रविणपतिच्या उत्तरेला, जनांच्या
दृष्टीला ये दुरुनि धनुवत् कान्तिनें तोरणाच्या
मन्दाराचा नव तरु तिथें पुत्रसा पाळिलेला
मत्कान्तेनें, लवविति कर प्राप्य पुष्पें जयाला
कुबेरसदनाजवळीं आहे उत्तरेस तें भवन आमुचें
दुरून भरतें नयनीं कारण तोरण दारी इंद्रधनूचें
प्रियपुत्रासम सखिनें माझ्या वाढविलेला तरू अंगणीं
मंदाराचा - गुच्छ जयाचे सहज करामधिं येती झुकुनी
अलकानगरीमध्ये कुबेराच्या राजगृहाच्या उत्तरेला आमचा प्रासाद आहे. इंद्रधनुष्याप्रमाणे सुंदर तोरण या प्रासादाला असल्यामुळे अगदी दूरवरूनदेखील हा प्रासाद ओळखता येतो. आणि त्याच्या अंगणामध्ये माझ्या प्रियेने आपल्या स्वतःच्या मुलाप्रमाणे वाढवलेला मंदार वृक्ष आहे. अगदी हाताला येतील अशा पुष्प गुच्छांनी हा छोटासा मंदार वृक्ष वाकलेला आहे.
१५.
वापी चास्मिन्मरकतशिलाबद्धसोपानमार्गा
हैमैश्छन्ना विकचकमलैः स्निग्धवैदूर्यनालैः।
यस्यास्तोये कृतवसतयो मानसं संनिकृष्टं
नाध्यास्यन्ति व्यपगतशुचस्त्वामपि प्रेक्ष्य हंसाः॥
विहीर तेथें, आंत पायऱ्यांवर पाचूंचे खडे
कांचनकमलें, मृदु देठावर वैदूर्यच वा जडे
जलामधें त्या हंस नांदती अनेक आनंदुनी
बघुनीही तुज म्हणतिल जाणें नको मानसाकडे!
वापी तेथें विराचित जिला घाट पाचू-शिळांचे
स्वर्णाम्भोजें फुलुनि भरली, नाल वैदूर्य ज्यांचे
तीच्या तोयीं वसति करिती हंस निश्चिन्त चित्तं
तूं आवासी तरि जवळच्या ध्यात ना मानसातें
वापी सन्निध पाचुमण्यांच्या तिच्या पायऱ्या आंत उतरती
सुवर्णकमळें तिथें लहरतीं वैदुर्याच्या देठांवरती
हंस विहरती जळामध्यें त्या सौख्य लाभतें इतुकें त्यांना
तुज बघतांही मानससरसीं जाणें- जवळीं जरी रुचेना!
आमच्या प्रासादामध्ये एक पुष्करिणी आहे. तिच्या पायऱ्या पाचूंनी बांधल्या आहेत. ही पुष्करिणी फुललेल्या सुवर्णकमळांनी गच्च भरलेली आहे. या सुवर्णकमळांचे देठ वैदूर्य मण्यांप्रमाणे आहेत. या पाण्यामध्ये जे राजहंस आहेत, ते तुला पाहूनसुद्धा खेद करणार नाहीत आणि मानस सरोवर जवळ असूनही तिकडे जाण्याचा विचारसुद्धा त्यांच्या मनात येणार नाही.
येथे बोरवणकर टीप देतात – “हंसाची गोष्ट अशी सांगतात की, पावसाळा सुरू होण्याची वेळ आली की, ते मानस सरोवराकडे जातात. कारण पावसाने येथील पाणी गढूळ होते.”
यावरून आपल्या लक्षात येते की, पावसाचा मेघ बघूनही यक्षाच्या पुष्करिणीमधील राजहंसांना मानस सरोवराकडे जावेसे वाटत नाहिये, याचा अर्थ कितीही पाऊस पडला तरी इथले पाणी गढूळ होणार नाही, याची राजहंसांना खात्री आहे.
वैदूर्य मणी हिरवट-शेवाळी रंगाचा असतो. गूगलवर बघता येईल. याला इंग्रजीमध्ये ‘कॅटस् आय स्टोन’ म्हणतात.
चंद्रा राजन यांनी वैदूर्य मण्याचे भाषांतर ‘बेरिल स्टोन’ असे केले आहे.
“full-blown lotuses on glossy beryl stems—”
..................................................................................................................................................................
लेखांक पहिला : कालिदासाच्या काव्यातील एकेक श्लोक सौंदर्यवंत ऐरावतासारखा झुलत राहतो, आणि त्यावर आशयाचा ऐश्वर्यमान इंद्र आरूढ झालेला असतो!
लेखांक दुसरा : उत्कंठा उत्पन्न करणाऱ्या त्या मेघासमोर यक्ष आपले अश्रू आवरत कसाबसा उभा राहिला…
लेखांक तिसरा : कालिदास आपल्याला आपल्या जगातून उचलतात आणि प्रेमाच्या व सौंदर्याच्या तीव्र संवेदनांनी भारलेल्या जगात घेऊन जातात…
लेखांक चौथा : कालिदासाला जेव्हा जेव्हा प्रकृतीतील अपार सौंदर्य दिसते, तेव्हा तेव्हा त्याला पुरुष-तत्त्वाची आठवण होते…
लेखांक पाचवा : कालिदासाच्या सौंदर्यदृष्टीचा स्पर्श त्याच्या अनुवादकांनासुद्धा होतो…
लेखांक सहावा : येथून आपला कालिदासाच्या ‘मेघदूता’तील श्रृंगाररसाच्या प्रवाहात प्रवेश होतो.…
लेखांक सातवा : आपल्या प्रेमामुळे दुसरी व्यक्ती किती आनंदी होते आहे, यावर आपल्या प्रेमाचे भाग्य अवलंबून असते!
लेखांक आठवा : कालिदास सगळे वातावरणच स्त्री-पुरुषांतील प्रेमामध्ये अध्याहृत असलेल्या अनिवार वेडाने भारावून टाकतो...
लेखांक नववा : प्रेमात पडलेल्या स्त्रीच्या प्रेमाचा अव्हेर करणे, यक्षाला योग्य वाटत नाही. म्हणून तो मेघाला सांगतो आहे…
लेखांक दहावा : कालिदासाची सौंदर्यदृष्टी किती सूक्ष्म निरीक्षणांतून जन्मली आहे, याची अनेक उदाहरणे देता येण्यासारखी आहेत…
लेखांक अकरावा : ‘मेघदुता’तल्या ४७व्या श्लोकातील एका ओळीचा अनुवाद करताना सगळ्याच अनुवादकांची धांदल उडालीय...
लेखांक बारावा : मेघ थोर कुळातील असून जलसंपदा हे त्याचे वैभव. ते कारणी लागावे ही यक्षाची इच्छा आहे…
लेखांक तेरावा : निसर्गातील वस्तुजाताला सुंदर असे व्यक्तिस्वरूप देणे, हा कालिदासाच्या प्रतिभेचा एक अजब धर्म आहे...
लेखांक पंधरावा : रत्नदीपांवर सुगंधाचा वा गुलालाचा किंवा हिऱ्याच्या कणिकांचा मेघ तरळतो आहे
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment