रत्नदीपांवर सुगंधाचा वा गुलालाचा किंवा हिऱ्याच्या कणिकांचा मेघ तरळतो आहे
पडघम - साहित्यिक
श्रीनिवास जोशी
  • प्रातिनिधिक चित्र
  • Thu , 28 July 2022
  • पडघम साहित्यिक कालिदास Kalidasa कालिदास दिन Kalidasa Din मेघदूत Meghadūta आषाढस्य प्रथम दिवसे Aashadhasya Prathama Divase

३० जूनपासून आषाढाला सुरुवात झाली… आणि आषाढ म्हटला की, अनेकांना महाकवी कालिदासाच्या ‘मेघदूत’ची आठवण येते. ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या त्यातल्या शब्दांना तर ‘मोस्ट कोटेबल कोट’चा दर्जा मिळालाय! आणि ‘मेघदूत’? त्याची ख्याती काय वर्णावी! गेल्या अनेक वर्षांपासून ‘मेघदूत’ मराठीसह जगभरच्या लेखक, कवी, अनुवादक आणि रसिकवाचकांना मोहिनी घालत आले आहे. त्याची ओळख करून देणारे हे सदर १२ जुलैपासून रोज...

.................................................................................................................................................................

लेखांक पंधरावा

उत्तरमेघ

(लेखातला पहिला मूळ संस्कृत श्लोक कालिदासाचा आणि त्याचे अनुवाद अनुक्रमे कुसुमाग्रज, सी.डी. देशमुख आणि शांता शेळके यांचे)

.

मन्दाकिन्याः सलिलशिशिरैः सेव्यमाना भरुद्भि-

र्मन्दाराणामनुतटरुहां छायया वारितोष्णाः।

अन्वेष्टव्यैः कनकसिकतामुष्टिनिक्षेपगूढैः

संक्रीडन्ते मणिभिरमरप्रार्थिता यत्र कन्याः।।

 

मंदारांची सुखद सावली नदीकिनाऱ्यावर

शीतल गंगाजलांत न्हाऊनि वारा हो मंथर

सुवर्ण रेतीमधें खेळती रोवुनि कर नंदिनी

खेळ मण्यांचा, सुरहि वांछिती तो नवतीचा भर!

 

ज्यांना गंगा-पवन सलिलें शीत सेवीत छाया

मन्दारांची तट - निकटिंच्या लभ्य तापा हराया

मुष्टि-क्षेपें मणि लपविला हैम वात त्याला

शोधावें हें रमति अमराभ्यर्थिता जेथ बाला

 

शीतल गंगाप्रवाह सेवुनि वारा तिथला झाला शीतल

तीरावर मंदारतरूंच्या सावलींत सुखशीत धरातल

तिथें कन्यका रूपसुंदरा देवहि ज्यांना स्वयें वांछिती

सुवर्णरतिंत लपवुन रत्नें शोधायाचा खेळ खेळती

 

अमरांनी म्हणजे देवांनीही ज्यांची अभिलाषा बाळगावी, अशा कन्यका आपल्या मुठीत रत्ने घेऊन सुवर्णाच्या वाळूत ती रत्ने लपवतात आणि ती पुन्हा शोधून काढण्याचा खेळ खेळत असतात. अशा वेळी मंदाकिनीने शीतल केलेला वारा त्या कन्यकांना सुखावतो आणि मंदार वृक्ष त्यांच्यावर सावली धरून त्यांचे उन्हापासून रक्षण करतो.

.

नीवीबन्धोच्छ्वसितशिथिलं यत्र बिम्बाधराणां

क्षौमं रागादनिभृतकरेष्वाक्षिपत्सु प्रियेषु।

अर्चिस्तुङ्गानभिमुखमपि प्राप्तरत्नप्रदीपान्

ह्रीमूढाना भवति विफलप्रेरणा चूर्णमुष्टिः॥

 

सैल निरी ओढितां सख्यानें वसन रेशमी गळे

रूपगर्विता बावरती, ना काय करावें कळे

दिवे मालवावया उधळती गुलाल हातांतला

असती पण ते पुंज हिऱ्यांचे, प्रकाश ना मावळे!

 

मुक्तग्रन्थी शिथिल काटेचें रेशमी वस्त्र जेथ

औत्सुक्यानें पटुतर करें ओढितां दूर नाथ

बिंबौष्ठी सभ्रम शरमुनी फेंकिती तो गुलाल

उच्चज्योतीवरति परि हो रत्नदीपांत फोल

 

हात घालतां सजण निरीला सैल रेशमी वसन ओघळे

लाजुनियां बावरती ललना काय करावें आतां नकळे

अंगराग उधळिती मुठीनें, प्रकाश तिमरी बुडवूं बघती

ज्योत उंच पण तशीच झळके रत्नदीप ते मुळीं न विझती

 

निरीची गाठ सुटून सैल झालेले रेशमी वस्त्र प्रणयाच्या आवेगात चपलहस्त प्रियकर ओढून घेतात, तेव्हा लालचुटूक ओठांच्या तरुणी लाजेनं चूर होतात आणि रत्नदीप विझवण्यासाठी आपल्या हातातील गुलाल रत्नदीपांवर फेकतात. परंतु, तो गुलाल प्रभेची झळाळी असलेल्या त्या रत्नदीपांपर्यंत पोहोचला तरी त्यांना विझवू शकत नाही.

त्या तरुणींनी आपल्या मुठीत नक्की काय घेतले आणि रत्नदीपांवर फेकले, याबाबत वेगवेगळी मतमतांतरं दिसतात. रा.शं. वाळिंबे म्हणतात- केशर आणि इतर सुगंधी द्रव्ये फेकली. बोरवणकर म्हणतात- जी चूर्णमुष्टी त्या तरुणींनी फेकली, ती मुष्टी कुंकवाची, गुलालाची अथवा कसल्या तरी सुवासिक चूर्णाची असावी. बापट-मंगरूळकर-हातवळणे ती मुष्टी सुगंधी द्रव्याची होती, असा अर्थ लावतात.

कुसुमाग्रज मात्र ते चूर्ण म्हणजे हिऱ्यांचे पुंज असे लिहितात. मात्र हिऱ्यांचे पुंज रत्नदीपांवर फेकले तर प्रकाश कसा मावळणार?

‘दिवे मालवावया उधळती गुलाल हातांतला

असती पण ते पुंज हिऱ्यांचे, प्रकाश ना मावळे!’

रत्नदीपांवर फेकलेले ते चूर्ण म्हणजे गुलाल असो वा सुगंधी द्रव्य वा रत्नचूर्ण, किती सुरेख दृश्य! रत्नदीपांवर सुगंधाचा वा गुलालाचा किंवा हिऱ्याच्या कणिकांचा मेघ तरळतो आहे. प्रकाश घालवण्याचा आपला प्रयत्न विफल झाला आहे, हे बघून त्या तरुणींच्या मुखकमलांवर लज्जेचा मेघ अजून गडद झालेला आहे. आपला प्रयत्न विफल झाल्याचे त्यांना कुठेतरी आवडतेसुद्धा आहे, हे त्यांच्या प्रियकरांना पक्के माहीत असल्याने स्त्रीच्या प्रेमाचा तो सगळा उत्सव प्रियकर आपल्या लबाड डोळ्यांनी अत्यंत मिश्किलपणे बघत आहेत! सगळेच सुंदर - कल्पनेच्या बाहेरचे सौंदर्य!!!

होरेस विल्सनने या श्लोकाचा सुंदर अनुवाद केला आहे-

‘The bold presumption of her lover's hands

To cast aside the loosened vest, withstands;

And, feeble to resist, bewildered turns

Where the rich lamp with lofty radiance burns;

And vainly whelms it with a fragrant cloud

Of scented dust, in hope the light to shroud.’

आपल्या प्रेयसीला तिची वस्त्रे उतरवलेलीच हवी आहेत, अशी धीट अनुमाने करून प्रियकरांचे हात त्या प्रेयसींच्या अंगावरची सैल वस्त्रे ओढून घेतात. त्या फारसा प्रतिकार करू शकत नाहीत, म्हणून त्या रत्नदीप विझवण्याकडे आपला मोहरा वळवतात. हातातल्या सुगंधी द्रव्यांचे ढग त्या प्रेमिका त्या रत्नदीपांवर उधळतात. त्यांना वाटते की, रत्नदीपांच्या प्रकाशाभोवती एक ढग तयार होऊन अंधार पडेल.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

.

नेत्रा नीताः सततगतिना यद्विमानाग्रभूमी

रालेख्यानां नवजलकणैर्दोषमुत्पाद्य सद्यः।

शङ्कास्पृष्टा इव जलमुचस्त्वादृशा जालमार्गे

र्धूमोद्गारानुकृतिनिपुणा जर्जरा निष्पतन्ति॥

 

सलील घन ते सौधावरुनी वाऱ्याच्या संगती

शिरुनि मंदिरीं अमोल चित्रें पाण्यानें नासती

होउनि मग भयभीत पिंजुनी स्वतांस घेती त्वरें

धुराप्रमाणें गवाक्षांतुनी पळ वेगें काढती!

 

प्रासादाग्रीं शिरुनि जिथल्या प्रेरिलेले समीरें

चित्रे तेथे नवसलिलजें दूषवोनी तुषारें

जाणों भ्याले जलधर झणीं जालमार्गे त्वदाप्त

धूम्राकारग्रहणिं कुशल व्यस्त बाहेर जात

 

वाऱ्यासंगें मेघ तुझ्यासम तिथें सातव्या मजल्यावरतीं

शिरुन मंदिरीं भिंतीवरची रंगचित्रणें धूसर करिती

भीतियुक्त परि होतां चित्तीं जलद जाळिच्या गवाक्षांतुनी

पिंजुनि जलकण रूप धुराचें घेउन वेगें जाती पळुनी!

 

तुला प्रेरणा देणारा वारा तुझ्यासारख्या मेघांना सात मजली उत्तुंग प्रासादांच्या अगदी वरच्या मजल्यांपर्यंत घेऊन जातो. हे मेघ तिथं गेल्यावर आपल्या नूतन जलबिंदूंनी त्या उंच प्रासादांमधील चित्रांमध्ये दोष उत्पन्न करतात. त्यानंतर जणू काही त्यांच्या मनात भय उत्पन्न होते आणि ते विखरून जातात. मग हे मेघ गवाक्षांमधून धुराचे रूप घेऊन पटकन बाहेर निघून जातात. धुराचे रूप घेण्यात हे मेघ एकदम तरबेज असतात.

.

यस स्त्रीणां प्रियतमभुजालिङ्गनोच्छ्वासिताना -

मङ्गलानिं सुरतजनितां तन्तुजालावलम्बाः।

त्वत्संरोधापगमविशदैश्चन्द्रपादैर्निशीथे

व्यालुम्पन्ति स्फुटजललवस्यन्दिनश्चन्द्रकान्ताः॥

 

उत्तर रात्रीं गगन निवळतां नितळ शशीचे कर,

द्रवुनि छतांतिल चंद्रकांत, रस गळे मंचकावर

रमणांच्या विळख्यांतुनि झाल्या मुक्त तिथें अंगना,

शीण रतीचा वारतील ते रत्नांचे पाझर!

 

जेथे होतां शिथिल दयितालिंगनें खेद अंगीं

जो नारींच्या सुरतज, तया झालरीचे पलंगीं

नेती दूर द्रव सुदुनियां चन्द्रकांत स्रवांनी

त्वत्रिमुक्तिप्रकट शशिच्या मध्यरात्रीं करांनीं

 

उत्तररात्री रतिलीलेनें क्लान्त जाहल्या जिथें कामिनी

सैल मिठी सजणाची होतां आळसावुनी पडती शयनी

छतास झुलती चन्द्रकान्तमणि चंद्रकरांनी ते विरघळती

थेंब टपोरे तनुवर पडतां विलासिनींचा शीण वारिती

 

येथे शयनगृहातील मंचकांच्या छतांमध्ये चंद्रकांत मणी गुंफलेले असतात. हे मेघा, मध्यरात्री तुझे आवरण दूर झाले की, चंद्राची निर्मल किरणे या चंद्रकांत मण्यांवर पडू लागतात आणि त्यामुळे हे मणी या टपोऱ्या जलबिंदूंनी पाझरू लागतात. आपल्या प्रियकरांच्या बाहूंच्या विळख्यातून थोड्याश्या विलग झालेल्या स्त्रियांच्या शरीरांवर हे जलबिंदू हळूहळू बरसत राहतात आणि रतिक्रीडेमुळे आलेला त्यांचा थकवा ते दूर करतात.

चंद्रा राजन यांनी या बहारदार श्लोकाचा अत्यंत सुंदर अनुवाद केला आहे-

‘Where at midnight moonstones

hanging from networks of threads,

touched by the moon’s feet resplendent

as you move away shed clear drops

of coolness to dispel the languor

born of oft-enjoyed loveplay in women just

released from a loved husband’s close embrace.’

हे मेघा, तू बाजूला झाल्यावर चंद्राच्या प्रकाशमान पायांचा स्पर्श चंद्रकांत मण्यांना होतो आणि ते शीतलबिंदू स्रवू लागतात. शीतलतेचे हे बिंदू आपल्या प्रियकरांच्या घट्ट मिठीतून नुकत्याच दूर झालेल्या स्त्रियांचा रतिश्रमांचा थकवा दूर करण्यासाठीच असतात!

१०.

अक्षय्यान्तर्भवननिधयः प्रत्यहं रक्तकण्ठै-

रुद्गायद्भिर्धनपतियशः किंनरैर्यत्र सार्धम्।

वैभ्राजाख्यं विबुधवनितावारमुख्यासहाया

बद्धालापा बहिरुपवनं कामिनो निर्विशन्ति॥

 

वैभवशाली घरांत ज्यांच्या अचल राहतें धन

कूजन करिती सुरांगनांसह जेथ विलासी जन

नगरशिवेवर उपवन, करिती विहार तेथें सदा

किन्नर गाती यक्षपतीचें मंजुळ संकीर्तन.

 

निःसीमश्री रसिक जिथले किन्नरांच्या समेत

जे कंठांनीं धनपतियश प्रत्यहीं गोड गात

संलापानें, परिवृत सदा अप्सरा मुख्य-वृंदें

वैभ्राजाख्यीं बहिरुपवनीं काल नेती प्रमोदें

 

अलकेबाहिर उपवन फुललें नामें जैं ‘वैभ्राज’ शोभलें

कुबेरकीर्ती सदैव गाती अनुरागानें यक्ष तेथले

संगे प्रणयालाप कराया स्वर्गामधल्या गणिका सुंदर

स्वरामध्यें स्वर मिसळुन गाया सज्ज सदाही असती किन्नर!

 

अलकानगरीमध्ये यक्षांच्या घरांत कधीही कमी न होणाऱ्या धनाचे निधी (साठे) असतात. अप्सराच या यक्षांच्या मैत्रिणी असतात. हे विलासी यक्ष संभाषणांमध्ये अतिशय चतुर असतात. अलकानगरीच्या बाहेर ‘वैभ्राज’ नावाच्या उद्यानात अनेक किन्नर आपल्या रसाळ कंठांतून उच्चरवाने कुबेराच्या यशाचे गान करत असतात. या ‘वैभ्राज’ उद्यानात हे यक्षपुरुष आपल्या मैत्रिणी असलेल्या अप्सरांबरोबर प्रेमक्रीडा करत असतात.

वैभ्राज नामक उद्यान म्हणजे भगवान शंकराच्या विभ्राज नावाच्या गणांनी ज्याचे रक्षण केले आहे, असे उद्यान, अशी टीप बोरवणकर देतात. विभ्राज हे चित्ररथ गंधर्वाचे एक नाव आहे, असेही ते पुढे सांगतात. काही अनुवादक त्यामुळे वैभ्राज या उद्यानाचे नाव ‘चित्ररथ’ उद्यान असेही देतात.

यक्षांच्या या ज्या मैत्रिणी आहेत, त्यांच्यासाठी शांताबाई ‘गणिका’ हा शब्द वापरतात. सीडी त्यांना ‘अप्सरांच्या वृदांच्या मुख्य’ म्हणतात. कुसुमाग्रज त्यांना ‘सुरंगना’ म्हणतात.

कालिदासाने त्यांच्यासाठी ‘विबुधवनितावारमुख्या’ हे शब्द वापरले आहेत. बापट-मंगरूळकर-हातवळणे आणि रामचंद्र बोरवणकर हे गद्य भाषांतरकार याचा ‘अप्सरा असलेल्या वेश्या’ असा अर्थ देतात. रा. शं. वाळिंबे यांना ‘मैत्रिणी’ म्हणतात.

‘अप्सरा’ या शब्दाचा अर्थ ‘अमरकोशा’मध्ये ‘स्वर्गामध्ये इंद्राच्या सभेत नृत्य-गायन करणाऱ्या सुंदरी’ असा दिलेला आहे. अप्सरांना कधी कधी वेश्या म्हटले जाते, कारण त्या एकापेक्षा जास्त पुरुषांवर अनुरक्त होतात. मात्र येथे पैसे घेऊन शरीरसुख देण्या-घेण्याचा संबंध नाही. अप्सरांचे काम मन रिझवणे हे आहे, पैसे कमवणे नाही. त्यामुळे सीडींनी लावलेला ‘अप्सरांच्या वृदांच्या मुख्य’ हा अर्थ जास्त बरोबर वाटतो. रा.शं. वाळिंबे यांनीही योग्य भाषांतर केले आहे. वैभ्राज उद्यानात यक्षांबरोबर रममाण होणाऱ्या अप्सरा या यक्षांच्या ‘मैत्रिणीच’ आहेत.

..................................................................................................................................................................

लेखांक पहिला : कालिदासाच्या काव्यातील एकेक श्लोक सौंदर्यवंत ऐरावतासारखा झुलत राहतो, आणि त्यावर आशयाचा ऐश्वर्यमान इंद्र आरूढ झालेला असतो!

लेखांक दुसरा : उत्कंठा उत्पन्न करणाऱ्या त्या मेघासमोर यक्ष आपले अश्रू आवरत कसाबसा उभा राहिला…

लेखांक तिसरा : कालिदास आपल्याला आपल्या जगातून उचलतात आणि प्रेमाच्या व सौंदर्याच्या तीव्र संवेदनांनी भारलेल्या जगात घेऊन जातात…

लेखांक चौथा कालिदासाला जेव्हा जेव्हा प्रकृतीतील अपार सौंदर्य दिसते, तेव्हा तेव्हा त्याला पुरुष-तत्त्वाची आठवण होते…

लेखांक पाचवा : कालिदासाच्या सौंदर्यदृष्टीचा स्पर्श त्याच्या अनुवादकांनासुद्धा होतो…

लेखांक सहावा : येथून आपला कालिदासाच्या ‘मेघदूता’तील श्रृंगाररसाच्या प्रवाहात प्रवेश होतो.…

लेखांक सातवा : आपल्या प्रेमामुळे दुसरी व्यक्ती किती आनंदी होते आहे, यावर आपल्या प्रेमाचे भाग्य अवलंबून असते!

लेखांक आठवा : कालिदास सगळे वातावरणच स्त्री-पुरुषांतील प्रेमामध्ये अध्याहृत असलेल्या अनिवार वेडाने भारावून टाकतो...

लेखांक नववा : प्रेमात पडलेल्या स्त्रीच्या प्रेमाचा अव्हेर करणे, यक्षाला योग्य वाटत नाही. म्हणून तो मेघाला सांगतो आहे…

लेखांक दहावा : कालिदासाची सौंदर्यदृष्टी किती सूक्ष्म निरीक्षणांतून जन्मली आहे, याची अनेक उदाहरणे देता येण्यासारखी आहेत…

लेखांक अकरावा : ‘मेघदुता’तल्या ४७व्या श्लोकातील एका ओळीचा अनुवाद करताना सगळ्याच अनुवादकांची धांदल उडालीय...

लेखांक बारावा : मेघ थोर कुळातील असून जलसंपदा हे त्याचे वैभव. ते कारणी लागावे ही यक्षाची इच्छा आहे…

लेखांक तेरावा : निसर्गातील वस्तुजाताला सुंदर असे व्यक्तिस्वरूप देणे, हा कालिदासाच्या प्रतिभेचा एक अजब धर्म आहे...

लेखांक चौदावास्त्रीच्या व्यक्तिमत्त्वात आणि सौंदर्यात विद्युल्लता लपलेली असते, हे कालिदासाला जेवढे जाणवले, तेवढे दुसऱ्या कुठल्या कवीला जाणवले असेल, असे वाटत नाही

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......