आयुष्यात खूप माणसं येतात, जातात. मात्र नंदा खरे यांच्यासारखा ‘खरा माणूस’ अभावानंच सापडतो!
संकीर्ण - श्रद्धांजली
हर्षवर्धन निमखेडकर
  • साहित्यिक नंदा खरे आणि त्यांची निवडक ग्रंथसंपदा
  • Thu , 28 July 2022
  • संकीर्ण श्रद्धांजली नंदा खरे Nanda Khare अंताजीची बखर Antajichi Bakhar बखर अंतकाळाची Bakhar Antkalachi

मराठीतील विचक्षण कादंबरीकार, अनुवादक आणि संपादक नंदा (अनंत यशवंत) खरे यांचं शुक्रवार, २२ जुलै २०२२ रोजी पुण्यात वयाच्या ७६व्या वर्षी दीर्घ आजारानं निधन झालं. त्यांच्याविषयी त्यांच्या एका मित्रानं लिहिलेला हा लेख...

.................................................................................................................................................................

नंदा खरे यांच्यावर काही लिहिण्याचा मी गेले तीन-चार दिवस सतत प्रयत्न करतो आहे, पण मन अजूनही एवढं उदास आहे की, गाडी फारशी पुढे सरकतच नाहीये. आणि त्यांच्यावर अनेकांनी एवढं भरभरून आणि सविस्तर लिहिलंय की, मी त्यात आणखी काय भर टाकू?

त्यातही माझ्या बहुतेक सर्व आठवणी वैयक्तिक स्वरूपाच्या आहेत. खरे कुटुंबाशी आमचे स्नेहसंबंध गेल्या जवळपास चाळीसेक वर्षांचे, त्याच्या या आठवणी आहेत. या खासगी स्मरणांत कोणाला का म्हणून रस वाटावा?

खऱ्यांचा आणि माझा पानवाला एकच होता. गेली कित्येक वर्षं ते ज्या वेळी तिथं सिगरेट विकत घ्यायला जायचे, नेमकी तीच वेळ माझी तिथं पान विकत घ्यायला जायची असायची. त्यामुळे तिथंही आमच्या बहुतेक रोजच दहा-पंधरा मिनिटांच्या गप्पा होत असत. त्या तो पानवाला भय्याही उत्सुकतेनं ऐकत असायचा. मला एक दिवस त्यानं विचारलंही की, ‘ये कोन साहब हैं? आप की बातों से लगता हैं की, ये कोई बहुत बड़ी हस्ती हैं’. मी त्याला थोडक्यात त्यांची माहिती सांगितली. परवा खऱ्यांची बातमी वाचून तोही बिचारा गहिवरला होता.

खरे फार intense गृहस्थ होते. त्यांना आवडणाऱ्या आणि नावडणाऱ्या विषयांवर ते पोटतिडिकीनं बोलत असत. पी. जी. वुडहाऊस हा आमच्यातला एक समान धागा होता. जॉर्ज मकडॉनल्ड फ्रेझरचा मानसपुत्र फ्लॅशमन (म्हणजे त्यांच्या ‘अंताजीची बखर’चा मूळ इंग्रजी अवतार) हा दुसरा. शिवाय इतिहास आणि रहस्यकथाही. ‘द ग्रेट आर्क ऑफ इंडिया’ हा ग्रंथ लिहिणारा ब्रिटिश इतिहासकार जॉन की याचं नागपुरात एक भाषण झालं, त्याला आम्ही दोघं गेलो होतो. सभेला जाताना आणि येताना कारमध्ये ते इतिहासावर बरंच बोलले.

खऱ्यांना कोणत्याही प्रकारचा बडेजाव, वैभव किंवा कर्तृत्वाचा अहंकार, याचं प्रदर्शन मान्य नव्हतं. साधं, सरळ, पारदर्शी, प्रामाणिक आयुष्य ते जगले. ते मितभाषी नक्कीच नव्हते, पण अपुल्या मते उगीच चिखल कालवणारेही नव्हते. त्यांचे सूर ज्यांच्याशी जुळत, त्यांच्यासोबत ते दिलखुलास बोलत.

सुधीर देवांच्या ‘माझा ग्रंथसंग्रह योजना’ (माग्रस) या ग्रंथप्रसारक चळवळीशी त्यांचं जवळचं नातं होतं. खरं तर तिथंच आमची पहिल्यांदा ओळखी झाली आणि पुढे त्याला आणखी काही वैयक्तिक आयाम जोडले गेले. माग्रसची वार्षिक स्नेहभेट अनेक वर्षं दर जुलै महिन्यात त्यांच्या घरी होत असे. अनेकांसाठी ती एक पर्वणीच असायची. खऱ्यांचं घर आणि त्यांचा ग्रंथसंग्रह बघणं, ही कुतूहलाची बाब असायची. खऱ्यांनी उदारहस्ते आपली पुस्तकं कुणाकुणाला देऊन टाकली.

आपल्या नित्य परिचयाचे खरे हे ‘एवढं थोर’ व्यक्तिमत्त्व होतं, हे अनेकांना त्यांच्यावरच्या मृत्यूलेखांवरूनच बहुधा कळलं असेल. याचं कारण त्यांचा स्वतःला झाकून ठेवण्याचा self-effacing स्वभाव. साहित्य अकादमीचा पुरस्कार नाकारणं, हा त्याचाच भाग. येनकेनप्रकारेन प्रसिद्ध पुरुष होण्यात त्यांना अजिबात स्वारस्य नव्हतं. एका विशिष्ट वयानंतर आणि ख्याती व यशानंतर बरीच थोर्थोर मंडळी गल्लीबोळातल्या सार्वजनिक कार्यक्रमांची अध्यक्षपदं भूषवताना आपण बघतो. खरे याला अपवाद होते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

माझ्या आणि त्यांच्या बौद्धिक पातळीत जमीन-अस्मानाची तफावत होती. वयानंही मी त्यांच्यापेक्षा बराच लहान होतो. फक्त आणि फक्त पुस्तकांच्या जगात रमणारा सामान्य (वकुबाचा) माणूस. ते मात्र (त्यांच्या आवडीच्या अनेकविध क्षेत्रांत) लोकाभिमुख होते. लोकहिताची कामं करण्यात ते आघाडीवर असत, पण श्रेय वा प्रसिद्धी यांपासून मात्र खूप लांब राहत. त्यांची-माझी मैत्री कशी काय झाली आणि टिकली, हा माझ्यासाठीही एक कुतूहलाचा विषय आहे. सामाजिक कार्याबद्दल मी त्यांना दोन-तीनदा अत्यंत बालिश, खरं तर बावळटपणाचेच प्रश्न विचारले होते. न रागावता आणि मी दुखावला जाणार नाही, याची काळजी घेत त्यांनी मला उत्तरं दिली होती, हे विशेष.

नंदा खरे हे खूप गंभीर प्रकृतीचे आणि कडू औषध प्यायल्यावर चेहरा जसा होतो, त्या स्वरूपाचे होते, असं जर कोणाला वाटत असेल (त्यांच्यावरचे मृत्यूलेख वाचून), तर तसं काही नव्हतं, बरं. त्यांच्यातला खोडकर मुलगा कधी कधी जागा व्हायचा, आणि ते अगदी लीलया फिरकीही घ्यायचे. गंभीर चर्या ठेवून केलेला त्यांचा एक perfect पण harmless practical joke खूप गाजला होता. रेव्ह. टिळकांचे नातू अप्पा टिळक अशाच जोक्ससाठी प्रसिद्ध होते. खऱ्यांच्या या विनोदानं मला त्यांचीच आठवण आली. आत्ता संपूर्ण तपशील आठवत नाहीय, पण थोडक्यात सांगायचं झालं तर कर्मठ, पुस्तकी संशोधकांवर त्यांनी केलेलं ते व्यंग्य होतं.

माग्रसच्या एका बैठकीत त्यांनी एक टिपण वाचून दाखवलं. केशवसुतांच्या ‘झपूर्झा’ या शब्दाचा इतिहास (कृतक इतिहास) त्यात सांगितला होता. कोकणातला हा कवी कृष्णा एकदा युरोपातल्या झॅपोर्जी नावाच्या गावाला गेला होता, आणि त्याच नावावरून त्याला ‘झपूर्झा’ हा शब्द सुचला, असं प्रतिपादन या टिपणात केलेलं होतं.

या शुद्ध लोणकढी थापेला, जेव्हा हा लेख इतरत्र छापून आला (बहुधा ‘म.टा.’), पश्चिम महाराष्ट्रात चांगलीच प्रसिद्धी मिळाली. काही नामवंत मराठी समीक्षकांना केशवसुत युरोपात गेले होते, हे आपल्याला कसं ठाऊक नाही, हा प्रश्न पडला. त्यांनी खरेंशी संपर्कही साधला. पण खरे tongue in cheek बोलत होते, हे त्या बापड्यांना उमजलंच नाही.

नंतर खूप वर्षांनी (बहुधा) ‘अंतर्नाद’ मासिकात खऱ्यांनी स्वतःच एक लेख लिहून खरं प्रकरण काय होतं, याचा उलगडा केला, तेव्हा सत्य बाहेर आलं. हा खुलासा मुळातून वाचण्यासारखा आहे.

खरे गेल्यापासून मला राहून राहून एमिली डिकिन्सनच्या ‘I’m Nobody! Who are you?’ या कवितेतले काही शब्द आठवत आहेत-

‘How dreary – to be – Somebody!

How public – like a Frog –

To tell one's name – the livelong June –

To an admiring Bog!’

या ओळी खऱ्यांना लागू पडतात, असं मला वाटतं. ते ‘Nobody’ तर नक्कीच नव्हते. He was a great man, a walking encyclopedia of knowledge, a practical man, a doer, a rational thinker with scientific temperament. त्यांनी खूप काही मिळवलं, पण तरीही ते प्रसिद्धीपासून लांब राहिले. त्या अर्थानं त्यांना जवळून न ओळखणाऱ्यांसाठी ते ‘Nobody’च होते. वलयांकित जीवन जगण्यास नकार देणाऱ्या खऱ्यांनी स्वतःभोवती प्रशंसकांचं, स्तुतीपाठकांचं, चमच्यांचं कोंडाळं कधी जमू दिलं नाही. आणि त्यांचे जे परिचित होते, त्यांना त्यांच्याबद्दल वेगळं काही सांगण्याची गरजही नव्हती. प्रसिद्धीच्या झोतापासून जाणीवपूर्वक दूर राहिलेले नंदा खरे एक ‘rara avis’ होते.

खरे गेले, माझ्या आयुष्यातलं आणखी एक आनंदपर्व संपलं. त्यांच्या नागपुरातल्या घरावरून मला रोज दोन-चारदा जावं लागतं. इतके दिवस ‘खरे येथे राहतात’, अशी मानसिक नोंद माझं अंतर्मन आपोआप करत असे. ‘आता ‘खरे येथे राहत होते’, हा बदल त्या नोंदीत झाला आहे. खरे गेल्याचं दुःख तर आहेच, पण त्यांचा सहवास लाभला होता, हा आनंदभावही आहे. आयुष्यात खूप माणसं येतात, जातात. मात्र खऱ्यांसारखा ‘खरा माणूस’ अभावानंच सापडतो. त्यांच्यामुळे आमच्या अवघ्या परिवाराचं जीवन ज्ञानसमृद्ध झालं होतं, यावरच आता समाधान मानायचं.

.................................................................................................................................................................

हेही पाहा\वाचा :

येवढं बोलावं, लिहावं का, स्वतःच्या भूमिकेबद्दल?... तर जरा तपशीलानं उत्तर दिलं, झालं...

सोशल मीडियावर मराठी मजकुराचं इंग्लिश भाषांतर येतं, ते फार चुकीचं असतं, पण त्यात नंदा खरे यांचं भाषांतर ‘Nanda is True’ असं येतं…. अन् ते सत्य आहे!

माणसांना (आणि त्यातही आपल्यापेक्षा अर्ध्या वयाच्या लोकांना) स्वतःशी जोडणं, मग आपल्या मित्रांना एकमेकांशी जोडणं हा जणू त्यांचा छंदच होता

.................................................................................................................................................................

लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.

the.blitheringest.idiot@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......