त्यांचे स्वातंत्र्य वेगळे, आपले वेगळे, एवढे आपण सदैव लक्षात ठेवले पाहिजे...
पडघम - देशकारण
जयदेव डोळे
  • स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे केंद्र सरकारने तयार केलेले बोधचिन्ह आणि तिरंगा
  • Wed , 27 July 2022
  • पडघम देशकारण राज्यघटना Constitution लोकशाही Democracy स्वातंत्र्य Freedom समता Parity बंधुता Fraternity काँग्रेस Congress संघ RSS महात्मा गांधी Mahatma Gandhi

हक्क आणि अधिकार या दोन्ही गोष्टी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला चीड आणणाऱ्या आहेत. कोणी त्यावर बोलू लागले की, संघवाले लगेच कर्तव्याची, जबाबदारीची भाषा बोलू लागतात. जणू कर्मसिद्धान्तच ते आडून आडून मांडत असतात. यामधील बारीक गोष्ट अशी की, हक्क आणि अधिकार यांचा स्वातंत्र्याशी दाट संबंध असतो. व्यक्तीला काय हवे, नको ते सांगण्याचे स्वातंत्र्य म्हणजे हक्क आणि अधिकार. कर्तव्ये स्वातंत्र्य गृहित धरत नाहीत. निसर्गत:च अमुकढमूक कामे करणे एकेकाची जबाबदारी असते, असे संघ मानतो. म्हणजे चातुर्वर्ण्याचा तो एक आविष्कार. भारताची राज्यघटना व्यक्तीस्वातंत्र्यावर आधारलेली आहे. समूह वा समुदाय तिने आधारासाठी घेतलेला नाही. कारण भारतात समूह व समुदाय म्हणजे समाज असा अर्थ होतो आणि त्याचा निष्कर्ष जात हाच असतो.

संघ कायम राष्ट्र, धर्म, समाज, संस्कृती अशा लोकनिष्ठ गोष्टी करतो, व्यक्तीनिष्ठ नव्हे! समाजाच्या दबावापुढे कोण्याही व्यक्तीला स्वतंत्र होता येत नाही, ती कायम समाजबद्ध असावी, असे संघ चाहतो. मुळात भारतीय परंपरेत म्हणजे हिंदू परंपरेत स्वातंत्र्याला जागाच नाही. मुक्ती अथवा मोक्ष या अर्थाने हिंदू परंपरा स्वातंत्र्याकडे पाहते. सुटका, अंत, सोडवणूक, निरास अथवा समाप्ती म्हणजे स्वातंत्र्य असे ती मानते. अवघे अध्यात्म याच पायावर उभे आहे. त्यामुळे संघ स्वातंत्र्याकडे हिंदू संस्कृतीमधील मुक्तता याच नजरेने पाहतो, राजकीय दृष्टीतून नाही.

या कारणानेच संघ कधीही स्वातंत्र्य चळवळीत सामील झाला नाही. काँग्रेसची स्वातंत्र्य चळवळ ज्या भारताची राजकीय उभारणी करू इच्छित होती, ती संघाच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या विरोधात होती. आपल्याला प्रिय अशा ब्राह्मणी, वैदिक पकडीतून या देशाची मोकळीक करण्याचा काँग्रेसचा इरादा संघाला मान्य होणे शक्यच नव्हते. एक हिंदू म्हणून गांधींनी देवळे, मूर्तीपूजा व पुजारी यांना नाकारून निराकार ईश्वराची सामूहिक प्रार्थना लोकप्रिय करत चालल्याने, तर संघ त्यांच्यावर कमालीचा रागावलेला होता. त्यात अस्पृश्यतेचा नाश करू पाहणारे, आंतरजातीय विवाहांना उत्तेजन देणारे गांधी संघाला म्हणजे हिंदुत्ववादी कर्मठांना केवळ असह्य होत होते. सबब, संघ स्वातंत्र्यापासून लांब राहू लागला.

दुसऱ्या अर्थाने संघ राजकीय स्वातंत्र्य व सांस्कृतिक स्वातंत्र्य यांत फारकत करून आपला सामाजिक आशय घट्ट धरू पाहत होता. आपण स्वतंत्रच आहोत, आपले स्वातंत्र्य कोणी हिरावू शकत नाही, असा ठाम विश्वास संघाचा होता. जोवर आपली चातुर्वर्ण्याची, जातीची व्यवस्था अभंग असेल, तोवर आपले स्वातंत्र्य अखंड राहणार आहे, असे संघ मानत राहिला.

माधव सदाशिव गोळवलकर हे दुसरे सरसंघचालक या भूमिकेवर ठाम होते. इंग्रज हिंदू समाजव्यवस्थेत मुळीच ढवळाढवळ करत नव्हते. त्यामुळे संघाचा इंग्रजी सत्तेला पाठिंबा होता. इंग्रज गेले की, आपणच सत्तेवर येऊ असे संघ इच्छित होता, मात्र काँग्रेसमधले हिंदुत्ववादी त्या कामी मागे पडले.

आधी राजकीय स्वातंत्र्य हस्तगत करावे लागते, मग सामाजिक, आर्थिक स्वातंत्र्ये येतात. संघाला राजकीयच नको होते. बाकीची स्वातंत्र्ये वर्णव्यवस्थेमुळे हिंदुत्ववाद्यांपाशी होतीच. त्यामुळे चळवळ, आंदोलने यांकडे तो पाठ फिरवे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

आणखी एक कारण हेही होते की, राजकीय चळवळींचा रोख सामाजिक समता, बंधुता व स्वातंत्र्य यांकडे वळाला, तर आपला पायाच उदध्वस्त होईल असे भय संघाला वाटे. म्हणून त्याने सत्यशोधक समाज, आर्यसमाज, ब्राह्मणेतर चळवळ, समाजवाद यांचा सतत द्वेष केला… त्यांना प्रखर विरोध केला. समता व बंधुता मानणारे ख्रिश्चन व इस्लाम धर्मही संघाने शत्रुस्थानी ठेवले. एक भारतीय म्हणून संघाने स्वातंत्र्य चळवळीत न उतरून आपल्याविषयी संशयाचा वेढा आणखी घट्ट केला. किंबहुना स्वातंत्र्याची निंदा, अपमान, बदनामी असे त्याने सर्व केले. त्याचा एक नमुना पाहू –

“छिन्नविच्छिन्न स्थितीतच आपल्याला स्वराज्य मिळाले आहे. अप्राप्य होते ते प्राप्त झाले आहे. पण त्याचे रक्षण करणे कठीण आहे. त्यासाठी ही विच्छिन्नता नाहीशी करून, स्वाभाविक राष्ट्रीयता जागृत करून सामर्थ्यसंपन्नता प्राप्त करणे आवश्यक आहे. योग्य राष्ट्रभावनेची जागृती केली नाही व जर ती भावना अस्पष्ट वा विकृत असली तर नेहमीकरता हे राष्ट्र बंधनात पडण्याची भीती सदासर्वदा आपल्यासमोर उभी राहील. ज्या दुर्बलतेमुळे आम्ही आमचे स्वातंत्र्य घालवून बसलो, ती दुर्बलता दूर केली पाहिजे. समाजाची छिन्नविच्छिन्नता संपविली पाहिजे. योग्य राष्ट्रीय भावनेचा अभाव असेल तर ती निर्माण केली पाहिजे… असे म्हणतात की, आपल्या देशात सर्वत्र राजनैतिक जागृती (पोलिटिकल कॉन्शसनेस) उत्पन्न झाली आहे. असे जर आहे तर केवळ काही निवडक व्यक्तींनाच देशभक्त का म्हटले जाते? ती व्यक्ती तेवढी देशभक्त आणि बाकी देशभक्त नाहीत काय? अन्य देशांमध्ये असे काही दिसत नाही. चर्चिललादेखील कोणी देशभक्त असे संबोधिले नाही. तेथे तर कुणीही सांगेल की, सर्वसाधारण माणूस देशभक्तच असला पाहिजे. देशभक्ती हा एक विशेष उल्लेख करण्यासारखा गुण आहे, ही कल्पना आपल्या देशातच कशी काय आली? कारण हे आहे की, सर्वसाधारण जनता राष्ट्रभक्ती वगैरे काहीही जाणत नाही. कसे तरी जगते आहे. मेली नाही म्हणून जिवंत आहे. राष्ट्राचा घटक असून त्याची जाणीव नाही. राष्ट्रीयतेवर श्रद्धा नाही. म्हणूनच कोणी विशष रीतीने देशकार्याकडे लक्ष दिले, थोडाबहुत त्याग केला की, त्याचा लगेच जयजयकार केला जातो, त्याचा गौरव होतो. याचाच स्पष्ट अर्थ हा आहे की, इथे सर्वसाधारणपणे राजकीय जागरण झाले नाही. लोकांना शब्द व घोषणा देता येतात. स्वार्थासाठी घातक वृत्तीने कार्य कसे करावे, हे त्यांना समजते. परंतु सत्प्रवृत्तीचे, राष्ट्रभक्तीचे धडे मात्र मिळालेले नाहीत. यामुळेच काही लोकांना देशभक्त म्हणावे लागते.” (‘समग्र श्रीगुरुजी’ – खंड २, संघ विचारमंथन, भारतीय विचार साधना, पुणे, २००६, पृष्ठ १८-१९)

१९ ऑक्टोबर १९४९चा हा लेख अथवा भाषण आहे. त्यासंदर्भाने काही प्रश्न पडतात – १) स्वराज्य छिन्नविच्छिन्न मिळाल्याचे संघाला दु:ख झाले. पण ते तसे मिळू नये, यासाठी संघाने चळवळीत भाग का घेतला नाही? २) राष्ट्रीयता व योग्य राष्ट्रभावना म्हणजे नेमके काय, हे गोळवलकर स्पष्ट न करताच ठोकून देतात की, हे स्वातंत्र्य अराष्ट्रीय म्हणजे राष्ट्रविरोधी आहे. ३) दुर्बलता, दुर्गुण, संकुचित स्वार्थ हेही गूढ शब्दप्रयोग ते करतात. म्हणजे ब्राह्मणी पावित्र्य, शुद्धता आणि नैतिकता नसलेले हे स्वातंत्र्य आहे, असे त्यांना म्हणायचे आहे? ४) ‘देशभक्त’ या विशेषणाची निंदा करताना गोळवलकर असे सुचवतात की, सत्याग्रह, कैद, बहिष्कार, असहकार, उपोषण, खादी, काँग्रेस म्हणजे देशभक्ती हे चूक. याचा अर्थ प्रत्यक्ष काहीही न करता शाखेत जाणारेही देशभक्त असतात, असे गोळवलकर म्हणत आहेत! त्यांना उदाहरण म्हणून चर्चिल का दिसले? चर्चिल देशभक्त असूनही साम्राज्यवादी होते. दुसऱ्यांचे स्वातंत्र्य हरण करणारे होते, हे गोळवलकरांना ठाऊक नव्हते? ५) सर्वसामान्य माणूस निर्बुद्ध आणि मेंढरासारखा असतो, असा गोळवलकरांचा सिद्धान्त आहे. राष्ट्रभक्ती आदी भावना मूठभरांनाच ज्ञात असतात आणि त्यांचेच नेतृत्व देशाला हवे असते, म्हणून अभिजनवादी म्हणजे ब्राह्मणी नेतृत्वाचा हा आग्रह आहे.

गोळवलकरांकडे १९४० साली सरसंघचालकपद आले. तोवर म्हणजे १९२५ ते १९४० ही १५ वर्षं डॉ. के. बा. हेडगेवार त्या पदावर होते. त्यांना संघवाले स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेससदस्य वगैरे ठरवतात. मग संघाचा पाया असा स्वातंत्र्य चळवळीच्या विरोधात कसा झाला? त्याचे स्पष्टीकरण आरंभी केले आहे. गोळवलकर एखाद्या तत्त्वज्ञाच्या भाषेत काय म्हणतात ते पाहू –

“उदाहरणादाखल १९२१ची असहकार चळवळ आणि १९४२ची भारत छोडो चळवळ. एकदा आंदोलन सुरू झाल्यावर ते कोणते वळण घेईल हे सांगता येत नाही. त्यावर मग कोणाचेच नियंत्रण राहत नाही. अशा आंदोलनांनी विध्वंस होऊ शकतो, पण काही निर्मिती मात्र होत नाही. सामूहिक निर्माणशक्ती प्राप्त करणारे हे आपले कार्य लोकक्षोभात्मक शक्तीपेक्षा अधिक चांगलं आहे. आपले कार्य एक नियंत्रित शक्ती निर्माण करण्याचे आहे. लोकक्षोभ भडकवण्याचे नाही. जर लोकक्षोभ उत्पन्न करण्याची गरज वाटली तर त्याला नियंत्रणात ठेवण्याची पात्रताही मिळवावी लागेल. याला निश्चितच जास्त वेळ लागणार. परंतु आमचे ध्येय-उद्दिष्ट हेच आहे आणि ते सिद्ध करण्याचा आमचा पक्का निश्चय आहे.” (उपरोक्त, पृष्ठ १५५)

एखाद्या ब्रिटिश अधिकाऱ्याला काळजी वाटावी, अशा थाटात गोळवलकर विध्वंस, लोकक्षोभ यावर बोलत आहेत. चळवळी, आंदोलने यांचा अपमान करायचा म्हणून ते म्हणतात की, त्यातून उत्पन्न काही होऊ शकत नाही. ‘नियंत्रितशक्ती’ असा शब्दप्रयोग करून गोळवलकर नाझींच्या काळातले गेस्टापो, इटलीतील ब्लॅक शर्टस् किंवा निजामाचे रझाकार घडवू पाहत आहेत असेच वाटते. लोकशाही, लोकशक्ती यांची तर गोळवलकर उघडपणे निर्भर्त्सना करतात.

संघ आधी दलित पुरुषाला आणि नंतर आदिवासी महिलेला राष्ट्रपती करायला पुढाकार घेतो. मात्र प्रत्यक्षात तो कधी या सामाजिक घटकांच्या हितसंबंधांवर आणि नागरिकांवर हल्ले होतात, तेव्हा काही करत नाही. का? कारण या घटकांना राजकीय सत्ता दिली, तरी तो त्यांच्या हाती सामाजिक व धार्मिक सत्ता कधी सोपवणार नाही. ते केवळ अशक्य आहे. चातुर्वर्ण्य पुनरुज्जीवित करायचा, हे गोळवलकर कसे स्पष्टपणे सांगतात ते पाहा –

“खरे तर असे आहे की, आपले कार्य अल्पकालिकही नाही आणि दीर्घकालिकही नाही. तर ते चिरकालिक आहे. संस्कार करणारे हे महान यंत्र वंशपरंपरेने चालवायचे आहे. आत्मविस्मरण होऊ द्यायचे नाही, म्हणून आजच्या युगाला अनुसरून ही संस्कारांची रचना संघकार्याच्या रूपाने विद्यमान आहे. पूर्वकालातील यज्ञयागादीमुळे होणारे संस्कार खंडित झाले, म्हणून संघकार्याद्वारे ते अशा प्रकारे करावयाचे आहेत… हिंदूराष्ट्र स्वतंत्र करण्याचा जो उल्लेख प्रतिज्ञेमध्ये आहे, त्यासंबंधी डॉक्टर म्हणत, इंग्रजांनी येथून जावे हा त्या स्वातंत्र्याचा अर्थ नाही, तर आपली विशुद्ध परंपरा उज्ज्वल होऊन पुन्हा एकदा इथे दिमाखात उभी राहील व आपले स्वत्वपूर्ण जीवन इथे पूर्णपणे आदराने नम्र होईल, तेव्हा यथार्थ स्वातंत्र्य मिळाले असे होईल. प्रतिज्ञेत उल्लेखिलेले स्वातंत्र्य हे अशा स्वरूपाचे आहे.” (उपरोक्त, पृष्ठ २५५)

हे स्वातंत्र्य खोटे आहे असे न म्हणता ते दुभंगलेले अन छिन्नविच्छिन्न मिळाले असे म्हणणे; हिंदूराष्ट्र निर्माण होईल, तेव्हाच खरे स्वातंत्र्य मिळाले, असे बोलणे ही कशाची लक्षणे? वंशपरंपरा, पूर्वकाल, संस्कार या शब्दांचा अर्थ काय होतो? जातिव्यवस्थेची पुन:स्थापना हाच ना? विशुद्ध परंपरा म्हणजे कशाची? स्वत्वपूर्ण जीवन म्हणजे जातिबद्ध जीवन हेच म्हणायचे ना?

पंतप्रधान मोदी यांनी देहूत येऊन विकास व परंपरा एकत्र नेण्याची गोष्ट केली. कोणत्या परंपरा? लोकांना वाटते की, तुकाराम महाराजांच्या. छे! मोदींचा ‘नवा भारत’ संघाच्या मुशीमधून उतरणार आहे. वरती गोळवलकर जे ठासून सांगत आहेत, तेच आलटूनपालटून मोदी व त्यांचे मंत्री बोलत असतात. स्वातंत्र्य अधिकाधिक परिपुष्ट कसे होईल, त्याचा चकार कोणी काढत नाही. कारण मग हक्क व अधिकार खूप द्यावे लागतील. म्हणून हे कर्तव्यांचा मारा सतत करत राहणार. म्हणून ‘आझादी का अमृतमहोत्सव’ प्रत्यक्षात ‘आझादों का’ होता. त्यांचे स्वातंत्र्य वेगळे, आपले वेगळे, एवढे आपण सदैव लक्षात ठेवले पाहिजे.

..................................................................................................................................................................

लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.

djaidev1957@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......