अजूनकाही
“The world of humanity has two wings – one is women and the other men. Not until both wings are equally developed can the bird fly. Should one wing remain weak, flight is impossible. Not until the world of women becomes equal to the world of men in the acquisition of virtues and perfections, can success and prosperity be attained as they ought to be.” - Abdu’l-Baha
सध्याचा काळ दीर्घकाळ स्वरूपाच्या नात्यांसाठी योग्य नाही. तंत्रज्ञान म्हणा, अर्थव्यवस्था म्हणा किंवा काळाचा महिमा, पण ‘वापरा आणि फेका’ या धर्तीवर आयुष्य चालवण्याचा ट्रेंड सध्या जोरावर आहे.
साधारणपणे २००२पासून भारतीय मध्यमवर्ग अति-वेगाने बदलला. आयटीच्या क्षेत्रात स्थलांतरे वाढली, नात्यांचे आयाम बदलले. अशा स्थलांतरित लोकांची सामाजिक ओळख व सामाजिक स्थान हे मुख्यत्वे करून व्यावहारिक मुद्द्यांवर केंद्रित झाले. या सामाजिक देवाणघेवाणीत भावना मागेच पडल्या. यातून स्त्री-पुरुष नाते वेगळ्या पद्धतीने आकाराला येत गेले. स्त्रिया मोठ्या प्रमाणात आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाल्या. त्यांनी हा बदल लवकर स्वीकारला, पण पुरुष हा बदल पचवू शकलेले नाहीत, असे दिसते. माझ्यापेक्षा जास्त CTC (Cost to company\एकूण पगार) असणारी मुलगी लग्नासाठी नको, म्हणणारी मुले अजूनही आहेतच. अमुक इतके पैसे कमावणाराच मुलगा पाहिजे, अशी अट मुलींचीसुद्धा असते. वय, धर्म, जात, व्यवसाय, शिक्षण, बाह्य रूप यानुसारच आयटी कंपन्यांत काम करणाऱ्यांचीसुद्धा लग्ने जुळतात.
मी पुण्यात २००६पासून काम करत आहे. तेव्हापासून आजूबाजूला ‘लिव्ह इन’ नाती व विवाहबाह्य संबंध बघत आले आहे. सुरुवातीला हा माझ्यासाठी मोठा धक्का होता, पण हळूहळू हे प्रकार अंगवळणी पडले. आधी शिक्षण आणि नंतर नोकरी यासाठी बाहेर राहणाऱ्या मुला-मुलींमध्ये मानसिक व शारीरिक जवळीक स्वाभाविकपणे घडून येते, पण त्यातील सर्वच नाती लग्नापर्यंत जातात, असे नाही. ज्यांचे लग्न झाले व टिकले, ते खुश आहेत का, हाही प्रश्न आहेच. ज्यांचे लग्न वेगवेगळ्या कारणांमुळे रखडले किंवा तुटले, त्यांचे आयुष्य ‘मस्त, बेधुंद’ वगैरे आहे, अशातलाही भाग नाही. उलट असे ‘सिंगल’ क्वचितच आनंदी आयुष्य जगताना दिसतात, असेच म्हणावे लागेल. अशी उदाहरणे आधीही होती, पण गेल्या काही वर्षांत अशा ‘सिंगल्स’चे प्रमाण बरेच वाढले आहे.
शरीराच्या नैसर्गिक गरजा कायदेशीर व सामाजिकदृष्ट्या योग्य मार्गाने भागवण्यासाठी लग्न ही व्यवस्था निर्माण करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील सांस्कृतिक व सामाजिक साचा बघितला, तर अजूनही बहुजन समाजांत लवकर लग्न करतात, याउलट ब्राह्मण समाजात उशिरा. ब्राह्मण समाजातल्या मुली व स्त्रिया यांच्या नोकरीचे प्रमाण बहुजन समाजाच्या मानाने जास्त आहे. ३५ ते ४० या वयात लग्न करण्याचे प्रमाण आता ब्राह्मण समाजात जवळपास सर्वमान्य बाब झाली आहे. परंतु त्यामुळे लग्न न झालेल्या मुला-मुलींची संख्याही जास्त दिसते.
एमपीएससीच्या मागे लागून लग्नाला उशीर झालेल्यांची संख्या बहुजन समाजातही दिसते. यात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे- सर्व समाजात लग्न हा व्यवहार असल्याने पैशाची गोष्ट आधी केली जाते आणि ज्यांना लग्न करायचे त्यांच्या मनाचा व शरीराचा विचार फारसा केला जात नाही… अगदी सुशिक्षित घरांमध्येही. गेल्या काही वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती दोलायमान झाली आहे. त्यामुळे केवळ पुरुषाला विशिष्ट रक्कम कमवता येत नाही, अशी समजूत करून मुली किंवा घरची मंडळी लग्नाला नकार देत आणि दोघांचेही नुकसान करतात.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
आपण अजूनही युरोप/अमेरिका झालो नाही. तिथे स्त्री-पुरुष आनंदाने शरीरसंबंधांसाठी एकत्र येतात व आनंदाने वेगळेही होतात. ‘सिंगल्स’च्या शारीरिक व मानसिक गरजा कशा पूर्ण होतील? त्या न झाल्याने त्यांच्या मानसिक आरोग्यावर व त्या अनुषंगाने सामाजिक स्थानावर काय परिणाम होत आहे? सिंगल (स्त्री/पुरुष) कधीही शारीरिक सुखासाठी कोणालाही उपलब्ध असतात, अशी प्रतिमा तयार होते. त्यात स्त्री सिंगल असेल तर विचारूच नका. ती जर करिअर करणारी असेल, तर काम मिळवण्यासाठी काहीही करेल, ही गैरसमजूत बहुतेक पुरुष आणि स्त्रियासुद्धा करून घेतात. सिंगल्सना काम मिळणे कठीण जाते. त्यांना फारसे ‘पर्सनल लाईफ’ही नसते. त्यामुळे त्यांना कमी पैशात राबवून घ्या, ही वृत्ती कॉर्पोरेट क्षेत्रात तर ठळकपणे दिसते. लग्न झालेले, मुले-बाळे असलेले ऑफिसमध्ये आपापला ग्रुप बनवून एकत्र राहतात. सिंगल अलिप्त राहतात. आपल्या वयाच्या लग्न झालेल्यांसोबत राहू शकत नाही आणि आपल्यापेक्षा कमी वयाच्या सिंगल्ससोबत जमत नाही, अशा कात्रीत हे ‘सिंगल्स’ अडकतात. परिणामी त्यांची चिडचिड आणखी वाढते.
‘तुम्हाला त्यातले काय कळणार?’, ‘तुमचे लग्न थोडेच झाले आहे?’, ‘तुम्हाला मुले होऊ, द्या मग कळेल!’, ‘लग्न जबाबदारी आहे, खेळ नाही’, असले फुकटचे सल्ले दररोज मिळतात. तुम्हाला शारीरिक, सांसारिक सुखात रस नाही, स्वैर आयुष्य जगायचे आहे, असा समज (?) करत सिंगल्सना एकटे पाडले जाते. डेटिंग अॅप, वधू-वर मंडळ वगैरेमध्ये फसवणुकीचे प्रकार प्रचंड आहेत. ही इंडस्ट्री सिंगल्सच्या हताशपणाचा फायदा घेत करोडो कमवते.
३५च्या वर गेलेल्या सिंगल्समध्ये आत्मविश्वास कमी होणे, स्व-प्रतिमा दुबळी होणे, नैराश्य वाढणे, असे प्रकार पाहायला मिळताहेत. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात लग्न न झाल्यामुळे जास्त त्रास होतो. शारीरिक गरज नाकारता येत नाहीच. दिवसा भांडणारी जोडपी रात्री पलंगावर एकत्र येतातच, मात्र सिंगल काय करणार? प्रत्येकाची (स्त्री/पुरुष) शारीरिक सुख विकत घेण्याची हिंमत व आर्थिक स्थिती नसते. आजूबाजूला असणारी लग्न झालेली मंडळी अशा सिंगल्सना हेरतात. आधी प्रेम होते, मात्र दुसऱ्यासोबत लग्न झाले, अशा जुन्या मैत्रिणी/मित्र खुणावतात. मात्र या सर्व व्यवस्था या सिंगल मंडळींचे दुःख कमी करू शकत नाहीत. काही सिंगल्स स्वतःला कामात बुडवून आपले दुःख कमी करण्याचा प्रयत्न करतात, काही जण सोशल मीडियावर आपली भडास काढतात. काहींच्या हातून चुका होतात, अगदी गुन्हेसुद्धा घडल्याच्या घटना आहेत.
समाजाने तयार करून दिलेली लग्नाची चौकट एका विशिष्ट वयात पार न केल्याचा प्रचंड ताण सिंगल्सवर असतो. चीनमध्ये २७व्या वर्षापर्यंत लग्न झाले नाही, तर त्या मुलींना ‘left over’ म्हणतात. भारतात अशा मुलींची संख्या ७.४ कोटी आहे, ज्या नोकरी करून स्वत:चे आयुष्य जगतात. मात्र ‘left over’ पुरुषांची आकडेवारी उपलब्ध नाही.
ज्या मुला-मुलींच्या लग्नाला उशीर झाला आहे, अशा पालकांनाही मनस्ताप सहन करावा लागतो. नातेवाईक बोलतात, नको ती बदनामी केली जाते. ते सिंगल्ससाठी आणखी कठीण असते.
‘माझं अजूनही लग्न झालं नाही’ हे सांगताना सलणारी भावना दारूच्या ग्लासाने, सिगरेटच्या झुरक्याने किंवा सिनेमाच्या पडद्यावर दिसणार्या रंगीबेरंगी झगमगाटाने कमी होत नाही. काही करिअरसाठी किंवा पॅशनसाठी लग्न करत नाहीत. त्यांना समजून घेणारी व्यक्ती ठरवून होणाऱ्या लग्नाच्या बाजारात मिळत नाही. त्यांना ती स्वत:हून शोधावी लागते. लग्नानंतर कितीही भांडणे होत असली तरी आधिक्य तिकडे जास्त असल्याने सर्व जाहिराती, वस्तू व सेवा या लग्न झालेल्या लोकांसाठी असतात.
३५च्या वर वय गेलेल्या पुरुषाला १० वर्षांनी लहान स्त्री हवी असते. आपण शारीरिक संबंधांत तेवढेच तरुण आहोत, हे दाखवण्याचा तो निष्फळ प्रयत्न असतो. वंशाचा दिवा हवा म्हणजे स्त्री लहानच हवी, असा गैरसमज २०२२मध्येही आहे. अशा जोड्या जमल्या तरी पुढे जाऊन वयातील अंतर शारीरिक, मानसिक व बौद्धिक स्तरावर दिसून येते. ३५-४०च्या पुढे होणारी लग्ने सोबतीसाठी असतात. त्यामुळे तसा विचार करूनच पुढे जावे. विशी-तिशीतला लग्नासाठीचा अट्टाहास ३५व्या वर्षी करू नये. त्यामुळे अपेक्षाभंग होऊ शकतो.
लग्नाचा निर्णय पुरुषांच्या हातात आहे. स्त्रीने कितीही म्हटले, पण पुरुष तयार नसेल तर लग्न होत नाही. त्यामुळे पुरुषाने या बदलाला समजून घेऊन स्वत:पासून सुरुवात करावी.
लग्न करायची इच्छा आहे, पण लग्न (कोणत्याही कारणाने) जमत नाही, अशा सिंगल्सनी काय करावे?
१) जे झाले ते विसरून वर्तमान काळावर लक्ष केंद्रित करावे.
२) वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपले व्यक्तिमत्त्व वेगळे असते. शारीरिक, मानसिक व बौद्धिक गरजा वेगळ्या असतात. त्यानुसार आपली आवड बदलत जाते. तेच जोडीदाराच्या बाबतीतही होते. लग्न करताना सर्वांनीच विशी-पंचविशीचे दिसणे किंवा त्या पद्धतीच्या भावना असणे गरजेचे नाही. कोमल भावना वयाच्या कोणत्याही टप्प्यात असू शकतात. फक्त त्या व्यक्त करण्याची पद्धत बदलते. भारतात बालविवाह, सतीप्रथा या विवाहसंस्थेशी संबंधित कु-प्रथा बंद झाल्या, त्याचप्रमाणे कोणत्याही वयातील सामान्य स्त्री-पुरुषांना लग्न करता येऊ शकते, हे ‘समाजमान्य’ व्हायला हवे. मी इथे मुद्दाम ‘सामान्य’ हा शब्द वापरते आहे, कारण एका विशिष्ट आर्थिक स्तरातल्यांसाठी आणि सेलिब्रिटींसाठी भारतात सर्व गोष्टी ‘मान्यता’प्राप्त आहेत.
३) स्वतःवर मेहनत घ्या. व्यायाम अशा वेळेस खूप उपयोगी ठरतो. त्यामुळे तरुण दिसणे, आत्मविश्वास वाढणे आणि लैंगिक ऊर्जेचा निचरा योग्य पद्धतीने होणे, असे फायदे होतात. छंद जोपासावा, म्हणजे मित्र-मैत्रिणी जोडले जातात. आकर्षक दिसा, आनंदी रहा. रडणारी, नकारात्मक व्यक्ती कोणालाच आवडत नाही.
४) सिंगल स्त्रीला जर एखादा विवाहित पुरुष विचारत असेल, तर तिने विचाराने पाऊल टाकावे. कारण अशी नाती वाईट पद्धतीने शेवटाला जातात.
५) आत्मपरीक्षण करावे. गरज पडल्यास समुपदेशकाचा सल्ला घ्यावा. आजूबाजूला असलेल्या सिंगल्सशी संवाद ठेवावा. माझे झाले नाही, मग मी का त्याच्याशी/तिच्याशी बोलू, असा विचार करू नये, पण विवाहित मित्र-मैत्रिणी, इतर मंडळी टोमणे मारत असतील, तर अशांपासून अंतर ठेवावे.
६) सिंगल्सची खिल्ली उडवणाऱ्या माध्यमांवर टीका करायला कमी करू नका. तुमच्यावरचे विनोद तुम्हीच हलक्यात घेतले, तर जग टर उडवायला बसलेलेच आहे.
७) विशिष्ट वयात लग्न झाले नाही, म्हणून स्वत:ला कमी लेखू नका. स्वत:च्या आर्थिक गुंतवणुकीची काळजी घ्या. जे आर्थिक नियम लग्न झालेल्यांसाठी आहेत, तेच न झालेल्यांसाठी आहेत, म्हणून गाफील राहू नका. पैशाच्या मागे आंधळेपणाने धावू नका.
८) सिंगल्सकडे कुटुंब, अगदी आई-वडीलही दुर्लक्ष करू शकतात. तुमचे लग्न होऊ नये, असा विचार भाऊ, बहीण व नातेवाईक करू शकतात किंवा एका काळानंतर तुम्हाला गंभीरपणे घेणे सोडून देतात. त्यामुळे तुम्ही स्वत:ला सावरायची गरज असते, कारण तुमचे अस्तित्व केवळ वंश वाढवणे व लग्न व्यवस्था चालवणे एवढ्यापुरतेच मर्यादित नसते\नाही. या कारणानेसुद्धा भारतात संशोधन, शोध व नवीन प्रकारची करिअर करणारी मंडळी कमी दिसतात. बहुतेक जण लग्न करून ते वाचवण्यात आपली ऊर्जा घालवतात, मग नाविन्यपूर्ण गोष्टी कशा शक्य होतील? त्यामुळे जोपर्यंत सिंगल आहात, तोपर्यंत शिक्षण, छंद व सकारात्मक असे काहीतरी करत राहावे. आयुष्याचा जोडीदार मिळाला की, त्याच्यासाठी बदलावे लागतेच.
९) ब्रेकअप झाला असेल, लग्न तुटले असेल तर स्वतःला थोडा वेळ द्या. लगेच दुसरे नाते शोधण्याचा उतावळेपणा करू नका. सोशल मीडियावर लग्न व संबधित गोष्टींवर चर्चा करू नका. लोक दोन मिनिट मजा घेतात आणि आपला मूळ प्रश्न तसाच राहतो.
१०) ज्यांच्या आजूबाजूला लग्न न झालेली मंडळी आहेत, अशांनी थोडा सहसंवेदनेचा वापर करत सिंगल्सची बाजू समजून घ्यावी. पालकांनी व नातेवाईकांनीसुद्धा त्यांना कमीपणा वाटेल, अशी वागणूक देऊ नये. कोणाचेही आयुष्य परिपूर्ण नसते. जेवढ्या विचित्र गोष्टी विवाहित लोकांच्या बाबतीत ऐकण्यात येतात, तेवढ्या सिंगल्सच्या बाबतीत येत नाहीत, असा माझा एक मानसशास्त्रज्ञ म्हणून अनुभव आहे.
असंख्य लुभावणार्या गोष्टी असताना ‘लग्नाची बेडी’ कशाला, असा विचार करत असाल, तर जे लोक तुम्हाला लग्न करू नका, असे सल्ले देत असतील, त्यांना तुम्ही का लग्न केले असे विचारा. लग्न अत्यंत सुंदर गोष्ट आहे. स्त्री-पुरुष एकत्र येणे ही नैसर्गिक गोष्ट असून त्यात निसर्गनिर्मितीची बीजे आहेत, परंतु भारतात लग्न, प्रेम व बाळाला जन्म देणे, या गोष्टींकडे अत्यंत चुकीच्या पद्धतीने पाहिले जाते. भारतातील लग्नसंस्था सामाजिक आणि कायदेशीर अशा दोन्ही पातळ्यांवर सुधारण्याची गरज आहे.
.................................................................................................................................................................
लेखिका डॉ. वृषाली रामदास राऊत मानसशास्त्रज्ञ आहेत.
vrushali31@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Vitthal Sawant
Wed , 27 July 2022
छान लिहिले आहे