निसर्गातील वस्तुजाताला सुंदर असे व्यक्तिस्वरूप देणे, हा कालिदासाच्या प्रतिभेचा एक अजब धर्म आहे...
पडघम - साहित्यिक
श्रीनिवास जोशी
  • डावीकडे क्रौंच-रंध्र आणि उजवीकडे कैलास पर्वतावरून उडणारे हंस
  • Tue , 26 July 2022
  • पडघम साहित्यिक कालिदास Kalidasa कालिदास दिन Kalidasa Din मेघदूत Meghadūta आषाढस्य प्रथम दिवसे Aashadhasya Prathama Divase

३० जूनपासून आषाढाला सुरुवात झाली… आणि आषाढ म्हटला की, अनेकांना महाकवी कालिदासाच्या ‘मेघदूत’ची आठवण येते. ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या त्यातल्या शब्दांना तर ‘मोस्ट कोटेबल कोट’चा दर्जा मिळालाय! आणि ‘मेघदूत’? त्याची ख्याती काय वर्णावी! गेल्या अनेक वर्षांपासून ‘मेघदूत’ मराठीसह जगभरच्या लेखक, कवी, अनुवादक आणि रसिकवाचकांना मोहिनी घालत आले आहे. त्याची ओळख करून देणारे हे सदर १२ जुलैपासून रोज...

.................................................................................................................................................................

लेखांक तेरावा

पूर्वमेघ

(लेखातला पहिला मूळ संस्कृत श्लोक कालिदासाचा आणि त्याचे अनुवाद अनुक्रमे कुसुमाग्रज, सी.डी. देशमुख आणि शांता शेळके यांचे)

५७.

प्रालेयाद्रेरुपतटमतिक्रम्य तांस्तान्विशेषान्

हंसद्वारं मृगुपतियशोवर्त्म यत्क्रौञ्चरन्ध्रम्।

तेनोदीचीं दिशमनुसरेस्तिर्यगायामशोभी

श्यामः पादो बलिनियमनाभ्युद्यतस्येव विष्णोः

 

क्रौंच गिरींतिल रंध्र, जयांतुन जाती हंसावली

अमर पताका भृगुराजाच्या धनुर्बलाची भली!

तिरपा होउन जातां त्यांतुन दिसेल शोभा तुझ

चरण जणूं हरि श्यामल उचली जिंकायासी बली!

 

दृश्यस्थानें हिमगिरितटीं लंघुनी पोंचशील

हंसद्वार, प्रथित करी जें भार्गवा क्रौंचरंध्र

त्या रंध्रें जा चढुनी वरतीं, दीर्घ शोभें उभासा

श्रीरंगाचा चरण बलितें दाबण्या श्याम जैसा

 

हिमालयाचे तट ओलांडुन क्रौंचरंध्र मग करि तूं जवळी

परशुरामयशसूचक पथ तो, ज्यांतुन जाते नित हंसाली

उत्तरेस तूं निघतां तिरपी दीर्घतनू तव दिसेल शोभुन

चरण सांवळा विष्णूचा की उचले बळिचें करण्या नियमन!

 

हिमालयाच्या उतरणीवरील विविध नयनमनोहर देखावे ओलांडून तू पुढे गेल्यावर तुला क्रौंच-रंध्र लागेल. हे हंसांचे मानससरोवराकडे जाण्या-येण्याचे हिमालयातील द्वार आहे. हे रंध्र परशुरामाच्या यशाची पताका म्हणूनही प्रसिद्ध आहे. त्यातून उत्तर दिशेला जाण्यासाठी तुला थोडे तिरपे व्हावे लागेल आणि थोडा निमुळता आकार धारण करावा लागेल. त्या वेळी तू बलीला पाताळात दाबण्यासाठी विष्णूने उचलेल्या सावळ्या पायाप्रमाणे दिसशील. पावलाचा आकार धारण केलेल्या शोभायमान अवस्थेत त्या हंसद्वारातून तू उत्तरेकडे झेप घे. उत्तर दिशा अनुसर!

क्रौंचरंध्राविषयी बापट-मंगरूळकर-हातवळणे यांनी एक टीप दिलेली आहे – “...‘क्रौञ्च’ नांवाचा पर्वत आहे असे, महाभारतांत म्हटलें आहे. कार्त्तिकेयानें या पर्वतांतून आरपार बाण मारिल्यामुळे त्याला ‘क्रौञ्चदारण’ हे अभिधान प्राप्त झालें. कैलास पर्वतावर भगवान् शंकराजवळ धनुर्वेद शिकत असतां परशुरामाला कार्त्तिकेयाच्या कीर्तीचा मत्सर वाटला व त्यानेंही त्या पर्वताच्या आरपार बाण मारिला. तेथे पडलेलें रन्ध्र हा त्याच्या सामर्थ्याचा पुरावा, म्हणजेच त्याच्या यशाचा मार्ग… प्रतिवर्षी मानससरोवराकडे जाणारे हंस याच मार्गाने जातात, अशी कल्पना आहे; म्हणून त्याला ‘हंसद्वार’ असेंही येथें म्हटलें आहे.”

बलीची कथा तर बहुतेक वाचकांना माहीतच असते. बापट-मंगरूळकर-हातवळणे यांनी ही कथाही दिलेली आहे.

“प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र बलि हा एक बलदंड असुर होता. त्याचे दमन करण्यासाठी विष्णूने वामनाचें रूप घेतलें आणि दानशूर बलीजवळ तीनच पावलें भूमि मागितली. बलीनें ही याचना पुरी करण्याचें वचन देतांच वामनानें विराट रूप धारण केलें आणि दोन पावलांनीं स्वर्ग आणि पृथ्वी व्यापून तिसरें पाऊल बळीच्या मस्तकावर ठेविले व त्याला पाताळांत दडपलें.”

बलीच्या मस्तकावर ठेवण्यासाठी विष्णूने उचलेल्या सावळ्या पावलाप्रमाणे सावळ्या मेघ दिसतो आहे.

सीडींनी या दोन ओळी फार सुंदर लिहिल्या आहेत-

‘त्या रंध्रें जा चढुनी वरतीं, दीर्घ शोभें उभासा

श्रीरंगाचा चरण बलितें दाबण्या श्याम जैसा’

क्रौंच-रंध्राचे वर्णन चंद्रा राजन यांनी अतिशय समर्पक शब्दांत केले आहे-

‘Kraunca-pass —gateway for wild geese and path to glory for the Bhṛgu Chief—’

क्रौंच-रंध्र - हंसांसाठीचे महाद्वार आणि परशुरामाच्या कीर्तीचा राजमार्ग!

या मार्गावरूनच परशुरामाची कीर्ती जंबुद्वीपात पसरली!

५८.

गत्वा चोर्ध्वं दशमुखभुजोच्छ्वासितप्रस्थसंधेः

कैलासस्य त्रिदशवनितादर्पणस्यातिथिः स्याः।

शृङ्गोच्छ्रायैः कुमुदविशदैर्यो वितत्य स्थितः खं

राशीभूतः प्रतिदिनमिव त्र्यम्बकस्याट्टहासः॥

 

दशाननानें हालविलेला, दिसेल जातां वरी

सुरांगनांचा भव्य आरसा – कैलासाचा गिरी!

कमलधवल तीं विशाल शिखरें पाहुनियां वाटते

उमेश्वराचें विकट हास्य हें साचतसे अंबरीं!

 

कैलासाचे तटिं अतिथि हो देवतादर्पणाचे

सांधे ज्याचे विघटित शिरीं बाहूंनीं रावणाचे

व्यापी पद्मामलशिखर जो तुंगतेनें नभास

गौरीशाचा प्रतिदिनिं जणूं सांठला अट्टहास

 

बलिष्ठ अपुल्या करें गदगदां जयास हलवी दशमुख रावण

सुरवनितांच्या प्रसाधनास्तव स्वयें होत जो निर्मळ दर्पण

उंच भरारी घेउनियां त्या कैलासाचा अतिथी होईं

शिखरें नच तीं - सदाशिवाचें धवल हास्य जणुं सांचुन राही

 

क्रौंच-रंध्रातून अजून पुढे गेल्यावर देवांच्या स्त्रियांना आरशाप्रमाणे उपयोगी पडणाऱ्या कैलास पर्वताचा तू पाहुणचार घे. याच कैलासाचे सांधे रावणाने आपल्या बाहूंनी निखळून टाकले होते. हा कैलास पर्वत रात्रविकासी कमलांप्रमाणे शुभ्र आहे आणि त्याने आपल्या शुभ्र शिखरांनी सारे आकाश व्यापून टाकलेले आहे. सारे आकाश व्यापून टाकलेला हा कैलास पर्वत म्हणजे युगानुयुगे रोज एकावर एक साठत गेलेली भगवान शंकराची शुभ्र आणि विकट हास्येच आहेत.

कालिदासाने ‘अट्टहास’ हा शब्द वापरला आहे. त्र्यंबकाचा अट्टहास! बोरवणकर अट्टहास याचा अर्थ विकट हास्य असा देतात. बापट-मंगरूळकर-हातवळणे अट्टहास याचा अर्थ विपुल हास्य असा देतात.

विकट हास्य हाच अर्थ योग्य वाटतो.

कुसुमाग्रजसुद्धा हाच अर्थ ग्राह्य धरतात -

‘कमलधवल तीं विशाल शिखरें पाहुनियां वाटते

उमेश्वराचें विकट हास्य हें साचतसे अंबरीं!’

विकट हास्य अंबरात साचत गेले, ही कल्पना अतिशय उन्नत अशी आहे.

चंद्रा राजन ‘wild laughter’ हा पर्याय निवडतात- 

“Towering up into the sky with lofty peaks radiant like white water-lilies, it stands as if it were the wild laughter of the Parent of the Triple-World piled up through the ages.”

कालिदासाने कैलासाला दिलेली शिवाच्या सर्व विश्वात घुमणाऱ्या हास्याची भव्य उपमा अतिभव्य अशी आहे!

रावणाने कैलास पर्वत हलवल्याची आख्यायिका बोरवणकरांनी दिली आहे- “रोज लंकेतून उठून कैलासाला शिवपूजेसाठी जाण्यापेक्षा कैलास पर्वत उचलून लंकेला आणला तर छान होईल, या विचाराने रावणाने कैलास पर्वत लंकेला आणण्याचे ठरवले. त्यासाठी रावण आपल्या २० हातांनी कैलास पर्वत उचलू लागला. सर्व शिखरे हादरू लागली. त्यामुळे पार्वती घाबरली. तेव्हा शंकराने त्या पर्वताला आपल्या पायाच्या अंगठ्याने दाबले. त्यामुळे रावण पर्वताखाली चिरडला जाऊ लागला.”

पुढे रावणाने शिवस्तुती करून आपली सुटका तर करून घेतलीच, पण शिवाला प्रसन्नही करून घेतले.

अशी ही दशानन रावणाने कैलास पर्वताचे सांधे निखळवून टाकल्याची आख्यायिका!

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

५९.

उत्पश्यामि त्वयि तटगते स्निग्धभिन्नाञ्जनाभे

सद्यःकृत्तद्विरददशनच्छेदगौरस्य तस्य।

शोभामद्रेः स्तिमितनयनप्रेक्षणीयां भवित्री -

मंसन्यस्ते सति हलभृतो मेचके वाससीव॥

 

कृष्ण काजळापरी स्निग्ध तूं, जातां त्या पर्वता

हस्तिदंत नुकताच कापला असली ज्या शुभ्रता

बलभद्रचि हा गमेल, कांबळ काळी खांद्यावरी

धारण करुनी उभा, अहो त्या दृश्याची दिव्यता!

 

जाशी जेव्हां तटनिकटिं तूं कज्जलें तुल्यवर्ण

त्या शैलाच्या धवल नव जो हस्तिदंतासमान

तेव्हां शोभा अचलनयनीं ती पहावी गिरीची

गोरस्कन्धीं मिरवित जशी नीलचैले हलीची

 

हस्तिदंत नुकतांच कापिला धवलवर्ण तो ऐसा गिरिवर

स्निग्ध काजळासमान काळा उतरशील तूं जेव्हां त्यावर

तव संपर्के मिरविल गिरि तो ऐसा नयनाभिराम तोरा

कांबळ काळी खांदी टाकुन उभा जणूं बलरामच गोरा!

 

घोटून घोटून तयार केलेल्या ताज्या आणि स्निग्ध अशा काजळाप्रमाणे तुझी कांती आहे. तू असा, तर कैलास पर्वत नुकत्याच कापलेल्या हस्तिदंताप्रमाणे शुभ्र! तू त्या कैलास पर्वताच्या तटापर्यंत गेलास, म्हणजे त्या पर्वताची शोभा निळे उत्तरीय खांद्यावर घेतलेल्या बलरामाच्या सौंदर्याप्रमाणे अनिमिष नेत्रांनी पाहात राहावी, अशी होईल असे मला वाटते आहे.

बापट-मंगरूळकर-हातवळणे यांनी या श्लोकावर टीप दिली आहे- “...हा श्लोक म्हणजे केवळ काळ्या-पांढऱ्या रंगांनीं निर्माण केलेले चित्र आहे. काळ्या आणि पांढऱ्या रंगांना येथे दोन सुंदर उपमा दिल्या गेल्या आहेत. या उपमांमुळे या श्लोकात किती रेखीव चित्रमयता आली आहे ते पहा! येथील पांढरा रंग हा नुसताच पांढरा नाहिये. हा, किंचित् निळसर झांक असलेला हस्तिदंताचा पांढरा आहे. आणि, काळा म्हणजेसुद्धा निस्तेज भुरा नाहिये, तर तुकतुकीत ओलसर असा कृष्णवर्णीय आहे. निसर्गातील वस्तुजाताला सुंदर असे व्यक्तिस्वरूप देणें, हा कालिदासाच्या प्रतिभेचा एक अजब धर्म आहे. हिमालयाच्या स्कंधावर पहुडलेला सांवळा मेघ पाहून निळें उत्तरी अंगावर टाकलेल्या गोऱ्यापान बलरामाची मूर्ति त्याला आठवते!”

बोरवणकरांनी टीप दिलेली आहे – “बलराम अतिशय गोरा होता व तो नेहमी कृष्णवस्त्र पांघरीत असे; त्यावरून कवीने ही कल्पना केली आहे.”

सीडींनी अतिशय ओघवत्या ओळी लिहिल्या आहेत-

‘जाशी जेव्हां तटनिकटिं तूं कज्जलें तुल्यवर्ण

त्या शैलाच्या धवल नव जो हस्तिदंतासमान

तेव्हां शोभा अचलनयनीं ती पहावी गिरीची

गोरस्कन्धीं मिरवित जशी नीलचैले हलीची’

काजळाच्या वर्णनाशी ज्याची तुलना करावी असा तू, जेव्हा नव्या हस्तिदंतासमान धवल असलेल्या त्या पर्वताच्या जवळ जाशील, तेव्हा अचलनयनांनी त्या पर्वताची ती शोभा पाहात राहावी. जणू काही, आपल्या दुधासारख्या शुभ्र खांद्यावर हली म्हणजे बलराम आपली निळी वस्त्रे मिरवत आहेत.

चैल म्हणजे वस्त्र!

मंदाक्रांता हे वृत्त लीलया हाताळावे तर ते सीडींनीच!

६०.

हित्वा तस्मिन्भुजगवलयं शंभुना दत्तहस्ता

क्रीडाशैले यदि च विचेत्पादचारेण गौरी।

भङ्गीभत्तया विरचितवपुः स्तम्भितान्तर्जलौघः

सोपानत्वं कुरु मणितटारोहणायाग्रयायी॥

 

टाकुनिया सर्पाचें कंकण, हातीं धरुनी जर

गिरिजेचा कर, चालत आले भूवरतीं शंकर,

होउनिया घनरूप लागण्या मंगल तीं पावलें

रत्नतटीं चढण्यास पायरी निज देहाची कर!

 

क्रीडाशैलीं सहल करण्या पार्वती तेथ येतां

सर्पाच्या त्या त्यजुनि वलया शम्भुनें दत्तहस्ता

अन्तर्धारा थिजत्रुनि करीं देह सोपान पंक्ति

हो सामोरा मणितट तुझ्या पायऱ्यांनीं चढो ती

 

सर्पवलय टाकून आपले हात शिवानें तिजला देतां

क्रीडाशैली विहार करण्या सजेल जर कां हिमनगदुहिता

मणिमय तट ते चढण्या तिजला साह्य करावें धरून हेतू

जळभारा रोधून अंतरी निजतनुचा सोपान करीं तूं

 

तू तिथे असताना जर आपल्या हातातील सर्पकंकण बाजूला करून शंकराने जर पार्वतीला हात दिला आणि ते दोघे क्रीडापर्वतावर पायी संचार करू लागले, तर तू आपल्या शरीरात असलेला पाण्याचा संचय घट्ट कर आणि आपल्या शरीराला लाटांचा आकार देऊन स्वतःला त्यांच्या मार्गामध्ये अंथर. त्यामुळे कैलासावरील रत्नखचित उतरण चढून जायला तू पार्वतीला पायऱ्यांप्रमाणे उपयोगी पडशील.

काजळाची कांती असलेला मेघ स्फटिकासारख्या कैलास पर्वतावर रेंगाळतो आहे. तेव्हा श्री शंकरांनी पार्वतीला हात देत आहेत आणि ते दोघे क्रीडाशैलावर संचार करायला निघत आहेत आणि ते बघून तो मेघ आपल्यातील पाणी गोठवून, स्वतःला जिन्याच्या आकारात ढाळून, स्वतःला पार्वतीच्या मार्गात अंथरत आहे. का तर, तिला क्रीडापर्वतावरील रत्नखचित उतरण सहजपणे चढून जाता यावी म्हणून! 

मेघदूतात इथून पुढे स्वर्गीय सौंदर्य आणि स्वर्गीय प्रेम यांची मनोहारी वर्णनं येतात! पृथ्वीवरील अफाट सौंदर्याचा आस्वाद घेऊन झाल्यावर कालिदासाची प्रतिभा इथून पुढे स्वर्गातील सौंदर्य आणि स्वर्गातील तृप्तता यांचा आस्वाद घेण्यात रमत जाते.

बोरवणकर अतिशय कसोशीनं टिपा देत जातात. या श्लोकातील टिपेमध्ये ते मल्लिनाथाचा संदर्भ देऊन लिहितात की, क्रीडाशैल हे कैलास पर्वताचेच एक नाव आहे.

६१.

तत्रावश्यं वलयकुलिशोद्धट्टनोद्गीर्णतोयं

नेष्यन्ति त्वां सुरयुवतयो यंत्रधारागृहत्वम्।

ताभ्यो मोक्षस्तव यदि सखे! घर्मलब्धस्य न स्यात्।

क्रीडालोलाः श्रवणपरुषैर्गर्जितैर्भाययेस्ताः॥

 

जलधारा झिरपतां तुझ्यांतुन रत्नस्पर्शे घना,

स्नानगृह करितील तुझें त्या निश्चित देवांगना.

ग्रीष्मांतहि सुख जलसेकाचें घेतिल त्या रंगुनी

मुक्त न होतां लौकर, भिववीं करुनि तयां गर्जना!

 

तेथे तीक्ष्ण त्रिदशयुवती टोंचुनी कंकणाग्र

कारंजें कीं करतिल तुजं निश्रयें मुक्तधार

ग्रीष्मीं येशी म्हणुनि सुटका ना मिळे तों निदानीं

क्रीडासक्ता भिवविं तरुणी घोर गर्जुनि कानीं

 

सुरललनांची रत्नकंकणें हीरक त्यांचे तुजला रुततां

फुटतां धारा करतिल त्या तव धारायंत्रच स्नानाकरितां

ग्रीष्मीं जळसुख घेतां रमल्या मुक्त न करतिल त्या जर तुजशी

कर्णकटू तर करुनि गर्जना सहज, सख्या रे! भिवव तयांशीं!

 

त्या क्रीडापर्वतावर देव-ललना आपल्या हातातील कंकणांवरील अग्रांचा तुझ्यावर आघात करतील. त्यामुळे तुझ्या अंगातून कारंजी उडू लागतील. त्या जणू काही तुला त्यांचे स्नानगृहच बनवतील. ऐन उन्हाळ्यात तू त्यांना प्राप्त झाल्यामुळे त्यांच्या हातून तुझी लवकर सुटका होणार नाही. तुझी त्यांच्या तावडीतून लवकर सुटका झाली नाही, तर त्या क्रीडालालस देवांगनांना तू तुझ्या कर्णकठोर गर्जनांनी भयभीत कर!

यक्षाचा मेघ कैलासावर विहरत आहे. देव-ललना त्याला स्पर्श करत आहेत. तेव्हा त्यांच्या कंकणांवरील रत्ने किंवा हिरे टोचून मेघाच्या अंगातून पाण्याची कारंजी उडत आहेत. चहूबाजूंनी कारंजी उडत आहेत, म्हणून तो मेघ जणू स्नानगृहासारखा भासत आहे.

कालिदासाने ‘यंत्रधारागृह’ असा शब्द वापरला आहे. याचे भाषांतर बोरवणकर कृत्रिम कारंजी बनवून तयार केलेले स्नानगृह असा करतात.

या श्लोकातील ‘कुलिश’ या शब्दाचा अर्थ चंद्रा राजन ‘वज्र’ असा घेतात. इतर भाषांतरकार कंकणे टोचल्यामुळे कारंजी उडू लागतील, असे भाषांतर करतात; तर चंद्रा राजन, वज्राच्या आघातामुळे तुझ्या शरीरातून पाण्याची कारंजी उडू लागतील, असे भाषांतर करतात. इंद्राचे वज्र म्हणजे आकाशात कडाडणारी वीज हे आपल्याला माहीतच आहे.

आपल्या टिपे मध्ये चंद्रा राजन लिहितात -

“ ‘कुलिश’या शब्दाचे दोन अर्थ होतात. एक म्हणजे आकाशात चमकणारी वीज आणि दुसरा म्हणजे हिरे. आपण जर दुसरा अर्थ स्वीकारला तर देवांगनांच्या कंकणांतील हिऱ्यांची टोके मेघाला टोचल्यामुळे त्याच्यातून जलाची कारंजी उडतात, असा अर्थ स्वीकारावा लागेल. मला ‘कुलिश’ या शब्दाचा वीज हा अर्थ इथे जास्त योग्य वाटतो.”

त्यामुळे त्यांचा अनुवाद पुढील प्रमाणे होतो -

“When struck by swarms of sparks off Indra’s thunderbolt your water-jets shoot out, celestial maidens there will surely use you for their bath; having found you in summer’s heat, my friend, if these girls eager for play will not let you go, you should scare them with harsh-sounding roars.”

काहीही असले तरी मेघामध्ये उभे राहायचे आणि त्याचे स्नानगृह बनवायचे, ही कल्पना अतिशय रम्य आहे. मेघामध्ये सौंदर्यवती देवांगना उभ्या आहेत. त्यांनी त्या मेघाचे स्नानगृह बनवले आहे. त्या मेघामध्ये त्या सौंदर्यवती संपूर्ण भिजल्या आहेत आणि जलवर्षावाने प्रसन्न झालेल्या त्या ललना मेघाला काही झाले तरी सोडतच नाहीयेत - हे चित्र कल्पिणे आणि ते काव्यात उतरवणे, हे काही सामान्य प्रतिभेचे काम नाहिये.

हे सारे सौंदर्य कुसुमाग्रजांनी आपल्या अनुवादात अतिशय सुंदर रीतीने पकडले आहे -

‘जलधारा झिरपतां तुझ्यांतुन रत्नस्पर्शे घना,

स्नानगृह करितील तुझें त्या निश्चित देवांगना.

ग्रीष्मांतहि सुख जलसेकाचें घेतिल त्या रंगुनी

मुक्त न होतां लौकर, भिववीं करुनि तयां गर्जना!’

‘जलसेक’ हा अत्यंत सुंदर शब्द कुसमाग्रज इथे वापरतात. जलसेक म्हणजे जलाचा छिडकावा. तुषारांचा वर्षाव!

६२.

हेमाम्भोजप्रसवि सलिलं मानसस्याददानः

कुर्वन्कामं क्षणमुखपटप्रीतिमैरावतस्य।

धुन्वन्कल्पद्रुमकिसलयान्यंशुकानीव वातै -

र्नानाचेष्टैर्जलद ! ललितैर्निर्विशेस्तं नगेन्द्रम्॥

 

सुवर्णकमळें ज्यांत उसासत, मानसजल सेवुन

सुरगज करतां विहार घडिभर त्यां हो अच्छादन,

कल्पतरूंचे किसलय कोमल हेलावी रेशमी

अमित सुखांचें त्या शैलावर तुजला आलोभन!

 

जेथें होती कनककमलें, पी जला मानसाचे

हौसेचा हो मुखपट जलादानिं ऐरावताचे

जैसें वस्त्रां सुरतरुदलां हालवीं मारुतांनीं

अद्रिश्रेष्ठा अनुभविं असे खेळ नाना करोनी

 

कांचनकमळें ज्यांत विकसती मानसजल तें सुखें

सेवुनी ऐरावत विहरती तयांची मुखें, घना, तूं टाक

झांकुनी कल्पतरूंचे कोमल पल्लव ललितलाघवें झुलवित राही

कैलासावर विसावतां क्षण सुखें लाभतिल अमित तुला ही!

 

सोन्याची कमलपुष्पे निर्माण करणारे मानससरोवराचे जल तू प्राशन कर. ऐरावत मानससरोवरामध्ये जल प्राशन करत असताना तू त्याच्या मुखाला वस्त्राप्रमाणे आच्छादून घे आणि त्याला प्रसन्न कर. नाजूक रेशमी वस्त्रांची सळसळ व्हावी त्याप्रमाणे कल्पवृक्षावरच्या पालवीला तू डोलायला लाव. अशा प्रकारे नाना प्रकारच्या क्रीडा करून तू त्या श्रेष्ठ पर्वताचा आनंद घे.

ऐरावताच्या मुखाला वस्त्राप्रमाणे आच्छादून घे, याचा अर्थ सहजपणे हाती लागत नाही. बापट-मंगरूळकर-हातवळणे म्हणतात, “हत्तीला पाणी पाजताना त्याच्या मुखावर वस्त्र घालतात व त्याने त्याला आनंद होतो असे म्हणतात.” पुढे ते म्हणतात, “मेघ स्वतःला ऐरावताच्या भोवती गुंडाळतो आहे आणि क्रीडा करून मेघ आपले मन रमवतो आहे.”

बोरवणकर येथे टीप देतात की, “ऐरावताचे मुखवस्त्र ही काय भानगड आहे ते कळत नाही.”

या श्लोकाचा सगळ्यात चांगला अर्थ चंद्रा राजन यांनी लावला आहे-

“Sipping Mānasa waters where golden lotuses grow, joyfully giving Airāvata the fleeting pleasure of your veiling shade”

ज्यात सुवर्ण कमले उगवतात असे मानससरोवराचे जल तू प्राशन कर,

ऐरावताला तुझ्या सतत आपले रूप बदलणाऱ्या आपल्या  सावलीचा आनंद दे.

शांताबाईंनी हे सर्व वातावरण आपल्या ओळींमध्ये अतिशय सुंदर पकडलेले आहे.

‘कांचनकमळें ज्यांत विकसती मानसजल तें सुखें

सेवुनी ऐरावत विहरती तयांची मुखें, घना, तूं टाक

झांकुनी कल्पतरूंचे कोमल पल्लव ललितलाघवें झुलवित राही

कैलासावर विसावतां क्षण सुखें लाभतिल अमित तुला ही!'

६३.

तस्योत्सङ्गे प्रणयिन इव स्रस्तगङ्गादुकूलां

न त्वं दृष्ट्वा न पुनरलकां ज्ञास्यसे कामचारिन्!

या वः काले वहति सलिलोद्गारमुच्चैर्विमाना

मुक्ताजालग्रथितमलकं कामिनीवाभ्रवृन्दम्॥

 

कैलासाच्या मांडीवर ती माझी अलकापुरी

ढळलेला गंगेचा शालू – मुग्ध कामिनीपरी,

उंच महालामुळे जाण ती वर्षाकालामधें

मोत्यांच्या वेणीसम घाली मेघमालिका शिरीं!

 

त्याच्या अंक बघुनि अलका वल्लभाच्याच जेवीं

जीचा गंगापदर सरला, स्वैर-गा, ओळखावी

वर्षाकालीं शिखरिं धरि जी मेघमाला सवर्ष

मुक्ताजालें ग्रथित रमणी ज्यापरी केशपाश

 

कैलासाच्या अंकावरती विसांवलेली जशी प्रणयिनी

पाहशील तूं अलका - ढळलें दुकूल गंगेचें कटिवरुनी

- जलमय मेघांमध्यें झाकतां हर्म्य जेथले वर्षाकाळी

दिसेल नटली कचपाशीं ती लेवुनिया मोत्यांची जाळी

 

हे कामाचारी मेघा, आपल्या प्रियकराच्या मांडीवर एखाद्या प्रेयसीने रेलावे, त्याप्रमाणे कैलासाच्या वरच्या भागामध्ये अलकानगरी वसलेली आहे. तिच्या अंगावरचे गंगारूपी रेशमी वस्त्र विस्कटलेले आहे, असे तुला दिसेल. अशी ही अलकानगरी तू पाहताक्षणीच तुला ओळखू येईल. उंच उंच प्रासाद असलेली ही नगरी आहे. एखाद्या प्रेमिकेने मोत्यांच्या जाळीने अलंकृत केलेला केशकलाप धारण करावा, त्याप्रमाणे ही अलकानगरी जलधरांचा वर्षाव करणारी मेघमाला धारण करते. 

अलकानगरी आपल्या प्रियकराच्या मांडीवर रेलून बसली आहे आणि तिने मेघमालेचा केशकलाप धारण केला आहे.

मेघमाला म्हणजे केशकलाप आणि त्या मेघमालेतून वर्षणारे जलाचे थेंब म्हणजे त्या केशकलापांवरची मोत्यांची जाळी, अशी ही सगळी शोभा आहे.

होरेस विल्सनने ही शोभा सुंदर चित्रित केली आहे-

“Now on the mountain's side, like some dear friend,

'Behold the city of the gods impend;

Thy goal behold, where Ganga's winding rill

Skirts like a costly train the sacred hill;

Where brilliant pearls descend in lucid showers,

And Clouds, like tresses, clothe her lofty towers.”

‘कामाचारी’ म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे कुठेही संचार करणारा.

 

अशा रीतीने रामगिरीवरून सुरू झालेला मेघाबरोबरचा हा प्रवास अलकानगरीमध्ये पोहोचला आहे. इथं ‘मेघदुता’चा ‘पूर्वमेघ’ संपतो. ‘उत्तरमेघ’ हा पुढचा भाग अलकापुरीमध्ये घडतो. तेव्हा यक्ष मेघाला काय काय सांगतो, हाही उत्कंठेचा भाग आहे.

..................................................................................................................................................................

लेखांक पहिला : कालिदासाच्या काव्यातील एकेक श्लोक सौंदर्यवंत ऐरावतासारखा झुलत राहतो, आणि त्यावर आशयाचा ऐश्वर्यमान इंद्र आरूढ झालेला असतो!

लेखांक दुसरा : उत्कंठा उत्पन्न करणाऱ्या त्या मेघासमोर यक्ष आपले अश्रू आवरत कसाबसा उभा राहिला…

लेखांक तिसरा : कालिदास आपल्याला आपल्या जगातून उचलतात आणि प्रेमाच्या व सौंदर्याच्या तीव्र संवेदनांनी भारलेल्या जगात घेऊन जातात…

लेखांक चौथा कालिदासाला जेव्हा जेव्हा प्रकृतीतील अपार सौंदर्य दिसते, तेव्हा तेव्हा त्याला पुरुष-तत्त्वाची आठवण होते…

लेखांक पाचवा : कालिदासाच्या सौंदर्यदृष्टीचा स्पर्श त्याच्या अनुवादकांनासुद्धा होतो…

लेखांक सहावा : येथून आपला कालिदासाच्या ‘मेघदूता’तील श्रृंगाररसाच्या प्रवाहात प्रवेश होतो.…

लेखांक सातवा : आपल्या प्रेमामुळे दुसरी व्यक्ती किती आनंदी होते आहे, यावर आपल्या प्रेमाचे भाग्य अवलंबून असते!

लेखांक आठवा : कालिदास सगळे वातावरणच स्त्री-पुरुषांतील प्रेमामध्ये अध्याहृत असलेल्या अनिवार वेडाने भारावून टाकतो...

लेखांक नववा : प्रेमात पडलेल्या स्त्रीच्या प्रेमाचा अव्हेर करणे, यक्षाला योग्य वाटत नाही. म्हणून तो मेघाला सांगतो आहे…

लेखांक दहावा : कालिदासाची सौंदर्यदृष्टी किती सूक्ष्म निरीक्षणांतून जन्मली आहे, याची अनेक उदाहरणे देता येण्यासारखी आहेत…

लेखांक अकरावा : ‘मेघदुता’तल्या ४७व्या श्लोकातील एका ओळीचा अनुवाद करताना सगळ्याच अनुवादकांची धांदल उडालीय...

लेखांक बारावामेघ थोर कुळातील असून जलसंपदा हे त्याचे वैभव. ते कारणी लागावे ही यक्षाची इच्छा आहे…

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......