अजूनकाही
जी.ए. कुलकर्णी या लेखकाचं मूळ नाव गुरुनाथ आबाजी कुलकर्णी असं आहे, हे माहीत व्हायलाच माझी कितीतरी वर्ष खर्ची झाली होती. सुरेश वैद्य, अनंत तिबिले, नारायण धारप, नलिनी वैद्य, बाबा कदम, सुहास शिरवळकर, गुरुनाथ नाईक, वि.स. खांडेकर ही नावं अकलूजच्या ‘सदुभाऊ सार्वजनिक वाचनालया’चा अपघातानं सभासद होऊ शकल्यानं परिचयाची झाली होती. अपघातानं या अर्थानं की, १९९६-१९९७च्या काळात महिना ३० रुपये देऊन ग्रंथालयाचा वर्गणीदार होणं अगदीच अशक्य होतं. घरची आर्थिक परिस्थिती वाचनासारख्या अनुत्पादक गोष्टीसाठी पैसे खर्च करायला परवानगी देत नव्हती. घराशेजारी असणाऱ्या देशी दारूच्या दुकानात काम करणारा अशोक पाटोळेसारखा वाचकमित्र भेटला नसता, तर माझ्यातला वाचक कदाचित आर्थिक झळांनी तेव्हाच होरपळून गेला असता.
दहावीची परीक्षा संपल्यानंतर मी अध्ये-मध्ये वाचनालयात वर्तमानपत्र वाचण्यासाठी जाऊ लागलो. तिथं मला पाहिल्यानंतर अशोकला आनंद झाला. त्याने मला त्याच्याकडचं पुस्तक दिलं. मला ते चांगलंच भावलं. मग काय, सुरुवातीला एक-दोन दिवसांतून अशोककडे पुस्तक आणायला जाणारा मी लवकरच रोज जाऊ लागलो. माझ्यातली वाचनाची ऊर्मी पाहून काही काळानंतर त्याने मोठ्या मनानं वाचनालयातील त्याचं खातं ग्रंथपालाला माझ्या नावे करायला सांगितलं. पुढे कित्येक महिने त्याने माझी फीदेखील भरली. हळूहळू सुट्टीत मीदेखील चहाच्या हॉटेलमध्ये काम करायला जाऊ लागलो. त्यातून मिळणाऱ्या पैशातून वाचनालयाची फी भरू लागलो.
पुस्तकांच्या जगात प्रवेश केल्यानंतर कोणत्याही वाचकासमोर आता काय वाचायचं, असा प्रश्न उभा राहतो, माझ्याही पुढे उभा राहिला. एकदा कुणीतरी ‘जीए वाच’ असं सांगितलं. त्याच दरम्यान कधीतरी माझ्या हातात ‘निळासावळा’ हे पुस्तक हाती पडलं. त्याचं गूढ, दु:खासक्त, काहीतरी आतून, खूप हुरहूर, जीवाला चटका लावणारं मुखपृष्ठ पाहूनच अस्वस्थ झालो.
‘निळासावळा’ या संग्रहातील ‘चंद्रावळ’ या पहिल्या कथेपासून मी जीएंच्या कथेशी जोडला गेलो. सुरुवातीला बरंच काही कळत नसे, परंतु त्या कथांतील पात्रांची होणारी फरफट उंची शब्दांमध्ये वाचताना काहीतरी साक्षात्कार झाल्याचा अनुभव वाट्याला यायला लागला. अवतीभोवतीच्या जगात अस्तित्वात असणारी काही माणसं जीएंच्या कथांत भेटायला लागली. मी ज्या गल्लीत राहत होतो, तिचं नाव ‘रामोशी गल्ली’ असं होतं. पुढे ते ‘इंदिरा गल्ली’ असं झालं. जीएंच्या कथेत मला अशाच कितीतरी गल्ल्या भेटल्या. मग ती ‘राधी’ कथेतील ‘महादेव गल्ली’ असेल किंवा ‘गुंतवळ’ कथेतील ‘सुतार गल्ली’ असेल. अशा कितीतरी गल्ल्या त्या काळात माझं भावविश्व घडवत-बिघडवत होत्या. त्यातील पात्रांशी साधर्म्य असणारी पात्रं माझ्या अवतीभोवतीच्या जगात वावरताना दिसत होती.
उदाहरणार्थ, ‘चंद्रावळ’ ही कथा. तिच्यातील ‘चंद्रावळ’सारखीच व्यक्तिमत्त्व घेऊन जगणारी एक वेश्या आमच्या गल्लीत राहत होती. ‘बबी’ तिचं नाव. ‘चंद्रावळ’ वाचत असताना मला सारखं तिचं व्यक्तिमत्त्व आठवत होतं. कथेतील नायिकेच्या संघर्षाइतकाच खडतर जीवनप्रवास बबीच्या वाट्याला आलेला होता. त्यामुळे जीएंच्या कथा वाचताना मी त्या त्या कथेतील पात्रांना माझ्या अवतीभोवतीच्या जगात शोधण्याचा प्रयत्न करायला लागलो. कधी कधी ही पात्रं भोवतालच्या जीवनानुभवात मिळालीही, कधी कधी मी त्यांना कल्पनेनं साकारण्याचा प्रयत्न करू लागलो. तेव्हापासून मला जीए माझ्या भावविश्वातले लेखक वाटायला लागले. त्यांच्या कथेची चटकच लागली.
पुढे यथावकाश बारावी उत्तीर्ण होऊन डी.एड.ला प्रवेश घेतला. तिथं सुनील खडतरे हा समानधर्मी वाचकमित्र भेटला. जीएंच्या कथांत जशी विक्षिप्त स्वभावाची माणसं आढळतात, अगदी माझ्याही जीवनात अशीच काही विक्षिप्त स्वभावाची माणसं नियतीनं जाणीवपूर्वक तर पाठवली नव्हती ना, असं आता वाटतं.
डी.एड.ला येईपर्यंत मी जीए बऱ्यापैकी वाचले होते. त्यातलं किती कळलं होतं, माहीत नाही, पण जीए मात्र प्रचंड आवडत होते. सुनीलला एकदा गप्पा मारताना ‘मी जीए वाचले आहेत’, असं सांगितल्यानंतर तो जाम खूश झाला. कारण त्या काळात डी.एड.ला येणारी मुलं झटपट नोकरी मिळवण्याच्या हेतूनं येत असत. अर्थात मीही त्याच हेतूनं आलेलो होतो. सुनीलही नाईलाजानंच डी.एड.ला आलेला होता, परंतु त्याचं कारण वेगळं होतं. प्रचंड बुद्धिमान असलेल्या सुनीलने वाचनवेडापायी एमबीबीएस अर्ध्यातूनच सोडून दिलं होतं. तो कित्येक महिने घर सोडून निघून गेला होता. शेवटी त्याच्या पालकांनी त्याला प्राथमिक शिक्षकाची हमखास नोकरी मिळवून देणाऱ्या डी.एड.ला प्रवेश घ्यायला लावला होता.
सुनील आणि मी जीएंवर तासनतास गप्पा मारत बसत असू. माझ्या जीए प्रेमास विधायक आणि विचक्षण भूमिका मिळवून देण्यात सुनीलचा खूप मोठा वाटा आहे. सुनील भेटल्यामुळे मला जीए कळायला लागले. अकलूजच्या विजय चौकात शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुतळ्यासमोरील छोट्याश्या बागेत आम्ही एकेका कथेची पिसं काढत असू. बाहेर संध्याकाळी भेळ-पाणीपुरी विकणारे गाडे लागत. त्या गोंगाटात आम्ही जीएंच्या कथांचे वेगवेगळे अन्वयार्थ लावण्यात गुंग होऊन गेलेलो असू. अक्षरशः जीएंच्या कथेतील पात्रं होऊन जगत असू. त्या दिवसांनी मला जीएंविषयी अधिक डोळस बनवलं.
डी.एड. झाल्यानंतर विनाअनुदानित शाळेवर नोकरी करत असतानाच बी.ए. आणि एम.ए.चं शिक्षण पूर्ण केलं. एम.ए.ला ‘निळासावळा’ कथासंग्रह अभ्यासासाठी नेमलेला होता. या काळात प्रेमनाथ रामदासी हा जीएंच्या कथांवर माझ्यासारखाच निस्सीम प्रेम करणारा वाचक भेटला. त्याने जीएंच्या कथा आणि त्यावर माधव आचवल, धों.वि. देशपांडे, म.द. हातकणंगलेकर, रा.ग. जाधव, गंगाधर गाडगीळ यांनी लिहिलेली समीक्षा वाचायला लावली. विशेष म्हणजे ही सर्व पुस्तकं त्या काळात अकलूजसारख्या निमशहरातील वाचनालयात उपलब्ध होती. जीए आपल्या संपूर्ण लेखनात ज्या नियतीवादाचा पुरस्कार करत होते, त्या नियतीच्याच इच्छेनं मला त्यांची पुस्तकं, त्यावरील समीक्षा आणि ते किती महत्त्वाचं आहे, हे सांगणारी माणसं भेटत राहिली. म्हणूनच कदाचित मी पुढे त्यांच्या कथेचा एक पैलू घेऊन पीएच.डी. करू शकलो.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
संशोधनासाठी वाचत असताना मला जाणवलं की, जीएंची कथा सुखापेक्षा दुःखाला, आशेपेक्षा निराशेला, जिंकण्यापेक्षा हरण्याला आणि जगण्यापेक्षा मरण्याला अधिक प्राधान्य देणारी आहे. त्यांच्या कथासंग्रहांची नावं (‘निळासावळा’, ‘पारवा’, ‘हिरवे रावे’, ‘रक्तचंदन’, ‘रमलखुणा’, ‘काजळमाया’, ‘सांजशकुन’ इ.) जरी इंद्रधनुष्यातील सप्तरंगाप्रमाणे मोहक वाटत असली, तरी या सर्वच कथासंग्रहांतून त्यांनी दुःखाचाच पुरस्कार केलेला दिसून येतो. एखाददुसरी कथा सोडली, तर बहुतांश कथा दुःखाच्या, निराशेच्या, अपयशाच्या, दुभंगलेपणाच्या, असहाय्यतेच्या काळ्या, गूढ छायांनी वेढलेल्या दिसतात. नियतीच्या कराल दाढेखाली त्या कथांतील पात्रं अक्षरशः रगडली जातात.
माझ्या व्यक्तिगत आयुष्यातसुद्धा नियतीनं असे काही तडाखे दिले होते की, मी पण हतबल झालो होतो. चौथीत असताना मोठ्या भावाचा दुर्दैवी मृत्यू होणं, घरची सगळी समृद्धी त्याच्या आजारपणात खर्च होणं, वडिलांचं सतत दारूच्या नशेत वेढलेलं असणं आणि आईनं प्रचंड कष्ट उपसत आम्हां भावंडांचा सांभाळ करणं… माझ्यासाठी हे सगळं अनाकलनीय होतं. तेव्हा आयुष्यात आलेली सगळी माणसं नखशिखान्त दुःखात बुडून गेलेली होती. याच काळात दुःखाला दारूच्या कैफात बुडवून टाकू पाहणारी माणसं खूप जवळून अनुभवली. जीएंच्या प्रिं. ठकार, चोवीसबोट्या बाळू, राधी यांसारख्या कथांमधील पात्रांसारख्या अनेक व्यक्ती माझ्याही अवतीभोवती वावरत होत्या.
जीएंची कथा रूढार्थानं कधीही न संपणारी आणि वाचून संपल्यानंतर खऱ्या अर्थानं सुरू होऊन, अंतर्मुख होऊन विचार करायला लावत, अस्वस्थतेच्या निबिड अरण्यात नेऊन सोडणारी आहे. जीए त्यांच्या पात्रांचं गहिरं दु:ख आपल्यासमोर मांडतात. साहजिकच या पात्रांचं वागणं गूढ होत जातं. अनेक घटितांमागील कारणांचा अर्थच आपल्याला समजत नाही. ही पात्रं अशीच का वागतात, असा प्रश्न उभा राहतो आणि त्याचं कुठलंही उत्तर आपल्याजवळ नसतं.
काठोकाठ भरून राहिलेली गूढता आणि अंतर्मन हेलावून टाकणारं दुःख, हे जीएंच्या कथांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगता येईल. त्यांची कथा सभोवतालच्या जगण्यातील क्षणभंगुरतेचं वेळोवेळी दर्शन घडवताना दिसते. ‘बळी’तील अमाशीचा, ‘बाधा’तील रमेचा, ‘कांकणे’तील लक्ष्मीचा, ‘निरोप’मधील विजूचा, अशी मृत्यूची मालिकाच पाहायला मिळते. आपण अक्षरशः हादरून जातो. प्रत्येक माणसासाठी त्याच्या जवळच्या माणसाचा मृत्यू कायमच हेलावून टाकणारा असतो. जीए आपल्याला मृत्यूच्या दुखात्म अस्तित्वाच्या कोषात नकळतपणे अडकवून टाकतात. आपण हताशपणे त्यात अडकत जातो.
जीएंची कथा म्हणजे आपल्यासमोर सभोवतालच्या जगण्याची वस्तुनिष्ठ रूपं उभी करणारी यंत्रणा. त्यांमधून मानवी जीवनाची शोकांतिका क्रमाक्रमानं उलगडत जाते. जीवनाशी माणसाच्या सातत्यानं चाललेल्या लढाईची आणि जय-पराजयाची, बहुतेकदा पराजयाचीच विभिन्न रूपं पाहायला मिळतात. मानवी जीवनातील अगम्य नातेसंबंध, विभिन्न प्रवृत्तींचे जीवनावर होणारे परिणाम, यामुळे या कथा व्यापक जीवनदर्शन घडवतातात. बाह्य परिसराबरोबरच मानवी अंतर्मनाचा रूपशोध घेत जातात. मानवी मन आणि त्याची विविध मार्गानं होणारी घुसमट, हे त्यांच्या कथांमध्ये वारंवार व्यक्त होताना दिसतं. मानवी जीवनाची असहाय्य वर्णनं पदोपदी अनुभवायला मिळतात. ती आपली त्वचा छिलून घेण्याइतकी वेदनादायी असतात.
जीएंची कथा आपल्यासमोर अनेक प्रकारचे फसवे विभ्रम उभे करताना दिसते. त्यांची कथा आवडते, पण कळतेच असं नाही. बहुतेकदा ती कळतच नाही, मात्र काहीतरी वेगळा अनुभव घेतल्याची अस्वस्थता आपल्या अंतरंगात निर्माण करते. आपण त्या कथेमागे फरफटत जातो. हे असं जाणं सोसणारं नसलं, तरी आपण सहन करत राहतो.
कथेच्या शेवटी आनंद मिळेल, याचीही शक्यता जवळजवळ नसतेच. परंतु तरीही आपण पदरी येणाऱ्या दुःखाचा, निराशेचा, असहाय्यतेचा सुन्नतेनं स्वीकार करत राहतो. काहीतरी वेगळं वाटलं, असं जीएंची कथा वाचल्यानंतर प्रत्येक जण म्हणतो, परंतु हा वेगळेपणा तो शब्दांत व्यक्त करू शकतोच असं नाही. जीएंच्या कथा अज्ञेय भावानुभवांचा न सुटणारा गुंता आपल्याभोवती विणत जातात.
जीएंची कथा वाचणं म्हणजे जणू जळत्या निखाऱ्यांवरून चालण्याचा दाहक अनुभव घेणं. ती वाचणं म्हणजे एका अर्थानं स्वतःला आत्मपीडा देण्यासारखंच आहे. आपली ऊर्जा स्खलन करणारी ही कथा कमालीची अंतर्मुख आणि अस्वस्थ करणारी आहे. या कथांचा अन्वयार्थ लावण्यात आपली प्रचंड शक्ती खर्च होते. आपल्यातील ऊर्जा कुणीतरी खेचून घेतली आहे, असा अनुभव येतो.
माणूस हाच जीएंच्या सर्व कथांचा केंद्रबिंदू असून, त्याला समजून घेणं आणि त्याच्या मनाच्या विविध विभ्रमांचा अर्थ मांडणं, यांना महत्त्वाचं स्थान आहे. ते भोवतालच्या अंध:कारमय वास्तवाला स्पर्श करत त्यातील दुःखभरल्या मानवी जीवनाचे विविध रंग आपणासमोर उलगडत जातात. परंतु दुर्दैवानं या सर्व रंगांचा मसावि फक्त काळा रंगच असलेला दिसून येतो. जीए दुःखाचा प्रातिनिधिक रंग म्हणून काळ्या रंगाकडे पाहत असलेले दिसतात.
मानवी जीवनातील अनिश्चितता, नियतीच्या प्रभावाखाली पिचून गेलेलं माणसाचं आयुष्य, कोणत्याही दिशेला जा, पराभवाशिवाय दुसरं काहीच वाट्याला येणार नाही, याची १०० टक्के हमी असणारी असहाय्य जाणीव, जीएंच्या कथा वाचत असताना सतत आपला पाठलाग करतात. आपलं आयुष्य म्हणजे प्रचंड वेदनांचं तुरुंगघर आहे आणि त्यात आपण एखाद्या गुन्हेगारप्रमाणे बंदिस्त झालेलो आहोत… कधीही न सुटण्यासाठी, अपार वेदना सहन करण्यासाठी, अशाच धारणा आपल्या मनात पक्क्या होत जातात.
जीएंच्या कथांचा अर्थ समजावून घेण्यापेक्षा निर्मोहीपणे त्यांच्या कथेला सामोरे जायला हवं, असं मला वाटतं. एखादी भावगर्भ पण अनाकलनीय कविता वाचत असताना, एखादं अमूर्त चित्र पाहत असताना, ज्या भावना आपल्या मनात निर्माण होतात, अगदी तशीच भावना मला जीएंच्या कथा वाचत असताना येते. त्या कदाचित वेगळ्या भावविश्वात, प्रदेशात, काळात घडलेल्या असतीलही, परंतु आजही त्या तितक्याच तरल, लुसलुशीत, ताज्या अर्भकाप्रमाणे आहेत, असं वाटतं.
माणसांना माणसांचं शोषण करत राहावंसं वाटेल, तोपर्यंत (‘काकणे’), आपले स्वार्थ जोपासत राहावेसे वाटतील, तोपर्यंत (‘स्वामी’), आपल्या पलीकडेही एक अज्ञात, पारलौकिक जग अस्तित्वात आहे, असं वाटेल तोपर्यंत (‘निरोप’), तरी जीएंच्या कथा आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग म्हणून जिवंत राहतील...
.................................................................................................................................................................
जी. ए. कुलकर्णी यांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/client/search/
.................................................................................................................................................................
लेखक रविकांत शिंदे श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी इथं मराठी विभागात सहाय्यक प्राध्यापक आहेत.
rvkntshinde@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment