अजूनकाही
१. अमेरिकेत वंशभेदातून भारतीयांवर हल्ल्यांचे सत्र सुरूच आहेत. फ्लोरिडामध्ये मुस्लीम समजून भारतीय वंशाच्या नागरिकाचे दुकान जाळण्याचा प्रयत्न केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ६४ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. हे दुकान मुस्लीम नागरिकाचे आहे असे वाटल्याने ते जाळून टाकण्याचा प्रयत्न केला अशी कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. मला देशातून अरबी लोकांना हाकलून द्यायचे आहे असे त्याने पोलिसांना सांगितले.
आपल्या वर्तमानपत्रांतून या बातम्या कशा येतात ना? अरबी समजून भारतीयाचं दुकान जाळलं, मुस्लीम समजून शीख व्यक्तीवर हल्ला… जणू तो माणूस अरबी, मुसलमान किंवा आफ्रिकन वगैरे असता तर तो हल्ला समर्थनीय ठरला असता! आपल्याला प्रॉब्लेम फक्त भारतीयाबद्दल 'गैरसमज' करून घेतल्याचा आहे. बाकी तिथल्या तडीपार गोऱ्यांनी नंतर आलेल्यांना उपरे म्हणावं, हा वेगळाच विनोद आहे.
…………………………………………………………
२. गोव्यात पुन्हा एकदा सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने पूर्ण कंबर कसली असून. मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वात भाजप सत्तास्थापनेचा दावा करणार आहे. मनोहर पर्रिकर यांनी संरक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा होती, परंतु त्यांनी अद्याप राजीनामा दिला नाही. गोवा फॉरवर्ड पार्टीचे नेते विजय सरदेसाई यांनी मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वात भाजपला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे.
गोव्यातलं त्रिशंकू सरकार ही काय बला असते आणि तिथले दोन-तीन जागांचे धनी असलेले टेकूपक्ष सत्तेत काय धुमाकूळ घालतात आणि इकडून तिकडे कोलांटउड्या मारून सरकारचा काय खेळ करतात, याचा पर्रीकरांना चांगलाच अनुभव आहे. तो त्यांना परत घ्यायचा आहे, हे एक नवलच. इतका धैर्यशाली माणूस खरं तर संरक्षणमंत्रीपदावरच हवा होता… पण, ते एक असो.
…………………………………………………………
३. उत्तर प्रदेशातील विजयासाठी भारतीय जनता पक्षाला शुभेच्छा देताना बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी विरोधकांना उपदेशाचे डोस पाजले. राजकीय पक्षांनी नोटाबंदीला विरोध करण्याची गरजच नव्हती, असं मत त्यांनी मांडलं. नोटाबंदीच्या माध्यमातून मोदींनी श्रीमंतांना वेसण घातली आहे, अशी गरीब जनतेची समजूत झाली होती. त्याकडे सर्व विरोधी पक्षांनी दुर्लक्ष केलं, असं ते म्हणाले.
नीतीश यांची शब्दयोजना फार गंमतीची आहे. ते भाजपने करून दिलेल्या समजुतीबद्दल बोलत होते. नोटाबंदीच्या काळात लोक रांगांमध्ये मरत असताना, गोरगरिबांचे रोजगार आणि व्यवसाय बाराच्या भावात गेलेले असताना त्यांच्या बाजूने न बोलल्यावर जनतेने विरोधी पक्षांचा सत्कार केला असता आणि प्रेमाने मतं दिली असती, असा नीतीश यांचा दावा आहे का? भाजपने करून दिलेली समजूत आणि जमिनीवरचं वास्तव यांच्यातला फरक ठोसपणे पुढे आणण्याच्या कामात सगळेच विरोधक कमी पडले आणि महामहोपाध्याय नीतीश यांनीही त्यासंदर्भात अमूल्य मार्गदर्शन केलं नाही, त्याचं काय!
…………………………………………………………
४. उत्तर प्रदेशातील पराभवानंतर भारतीय राजकारणातील चमत्कारपुरुष म्हणून ओळखले जाणारे प्रशांत किशोर यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच प्रशांत किशोर यांनी मात्र पराभवासाठी राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांना जबाबदार ठरवलं आहे. आपल्याला उत्तर प्रदेशातल्या प्रचारात मोकळीक दिली गेली नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.
अब पछताए होत क्या, जब चिडिया चुग गयी खेत? निवडणुकांच्या काळातच तुम्ही यासंदर्भात निर्वाणीचं बोलून त्यातून 'हात' मोकळा करून घेतला असता, तर आज दुसऱ्यांकडे बोटं दाखवण्याची वेळ आली नसती. आता तुम्ही ज्यांना निकटवर्ती म्हणताय ते तुम्हाला राहुलजींचे निकटवर्ती म्हणतात. मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार ठरवणं आणि प्रियंका गांधींना प्रचारात उतरवणं, या तुमच्या दोन प्रमुख सूचनाच कचऱ्याच्या टोपलीत गेल्या असतील, तर मग तुम्ही वाट कशाची पाहत होतात? चमत्काराची?
…………………………………………………………
५. उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाला जनतेने दिलेला कौल हा राम मंदिराच्या निर्माणकार्यासाठी दिलेला पाठिंबा असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मा. गो. वैद्य यांनी व्यक्त केले. अयोध्येत जिथे राम मंदिर होते, ते पाडून राम मंदिर बांधण्यात आलं होतं, असं अलाहाबाद उच्च न्यायालयाने मान्य केलं आहे. सर्वोच्च न्यायालय हीच भूमिका कायम ठेवेल, अशी आशा आहे; पण सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात योग्य वेळेत निर्णय दिला नाही, तर केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखाली सरकारने राम मंदिरासाठी कायदा केला पाहिजे, असं ते म्हणाले.
चला, आतापर्यंत 'सब का साथ, सब का विकास, मतं न दिलेल्यांचंही सरकार, गरिबांचं उन्नयन' वगैरे ढोलकीची एकच बाजू वाजत होती. आता दुसरी बाजूही वाजू लागली. अर्थात, विद्यमान सरकार सोन्याची अंडी देणारी ही कोंबडी कापून खाणार नाही, याची कल्पना वैद्यांनाही असेलच. तेही त्यांची भूमिका बजावताहेत, हाही रेटा आहे, हे दाखवतायत. गाजराची पुंगी वाजवताहेत.
…………………………………………………………
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment