मेघ थोर कुळातील असून जलसंपदा हे त्याचे वैभव. ते कारणी लागावे ही यक्षाची इच्छा आहे…
पडघम - साहित्यिक
श्रीनिवास जोशी
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 25 July 2022
  • पडघम साहित्यिक कालिदास Kalidasa कालिदास दिन Kalidasa Din मेघदूत Meghadūta आषाढस्य प्रथम दिवसे Aashadhasya Prathama Divase

३० जूनपासून आषाढाला सुरुवात झाली… आणि आषाढ म्हटला की, अनेकांना महाकवी कालिदासाच्या ‘मेघदूत’ची आठवण येते. ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या त्यातल्या शब्दांना तर ‘मोस्ट कोटेबल कोट’चा दर्जा मिळालाय! आणि ‘मेघदूत’? त्याची ख्याती काय वर्णावी! गेल्या अनेक वर्षांपासून ‘मेघदूत’ मराठीसह जगभरच्या लेखक, कवी, अनुवादक आणि रसिकवाचकांना मोहिनी घालत आले आहे. त्याची ओळख करून देणारे हे सदर १२ जुलैपासून रोज...

.................................................................................................................................................................

लेखांक बारावा

पूर्वमेघ

(लेखातला पहिला मूळ संस्कृत श्लोक कालिदासाचा आणि त्याचे अनुवाद अनुक्रमे कुसुमाग्रज, सी.डी. देशमुख आणि शांता शेळके यांचे)

५१.

तस्याः पातुं सुरगज इव व्योम्नि पश्चार्धलम्बी

त्वं चेदच्छस्फटिकविशदं तर्कयेस्तिर्यगम्भः।

संसर्पन्त्या सपदि भवतः स्रोतसि च्छाययासौ

स्यादस्थानोपगतयमुनासङ्गमेवाभिरामा॥

 

क्षितिजावरती तिरकस होउन लवशिल थोडा तळीं

ऐरावत वा – तृषा भागवीं या गंगेच्या जळीं

नील तुझें प्रतिबिंब मिसळतां धवल जान्हवीमधें

गमेल झाला गंगायमुनासंगम भलत्या स्थळीं!

 

जैसा कोणी सुरगज नभीं वाकतो पूर्वभागें

पाणी पीण्या स्फटिका सम तू नम्र होण्यासि लागें

पात्रीं छाया तव सरकतां जान्हवीच्या पडोनी

होई वाटे रुचिर यमुना भेट अन्या ठिकाणीं

 

तिरपा किंचित् होउन झुकतां देवगजासम तू गगनांतुन

स्फटिकधवलसें पय गंगेचें आतुरतेनें करशिल प्राशन

तुझी सांवळी पडेल छाया शुभ्र जाह्नवीजळांत जेव्हां

गंगायमुनासंगम झाला भलत्या ठायीं - गमेल तेव्हां

 

दिग्गजाप्रमाणे आपल्या शरीराचा मागचा भाग आकाशाला टेकून आणि थोडे तिरपे उभे राहून जान्हवीचे स्फटिकाप्रमाणे निर्मळ असलेले पाणी प्यावे, असा तू विचार करत राहशील… तेव्हा तुझी अत्यंत मनोहर अशी कृष्ण रंगाची सावली त्या निर्मल आणि शुभ्र पाण्यात पडेल… आणि लाटांबरोबर हलत राहील. गंगा आणि यमुनेचा संगम एका वेगळ्याच ठिकाणी झाला आहे, असे त्यामुळे बघणाऱ्या लोकांना वाटत राहील. अतिशय मनोहर असे ते दृश्य असेल.

कालिदासाने ‘सुरगज’ असा शब्द योजला आहे. सुरगज म्हणजे देवांचा हत्ती. रा.शं. वाळिंबे आणि कुसुमाग्रज यांनी ‘ऐरावत’ असे, तर बोरवणकर वगैरेंनी ‘दिग्गज’ असे त्याचे भाषांतर केले आहे.

ऐरावत रंगाने शुभ्र असल्याने ती उपमा मेघासाठी योग्य वाटत नाही. शिवाय बोरवणकर म्हणतात की, ऐरावत हासुद्धा एक दिग्गजच आहे.

५२.

आसीनानां सुरभितशिलं नाभिगन्धैर्मृगाणां

तस्या एव प्रभवमचलं प्राप्य गौरं तुषारैः।

वक्ष्यस्यध्वश्रमविनयने तस्य शृङ्गे निषण्णः

शोभां शुभ्रत्रिनयनवृषोत्खातपङ्कोपमेयाम्॥

 

शिलांवरी कस्तुरी मृगांचा सुवास हृदयंगम

भागिरथीचें उगमस्थल तें, हरतिल सारे श्रम

शैलावर त्या धवल बैसशिल, दिसेल तेव्हां जणूं

नंदीनें उकरून काढला हिमभूवर कर्दम!

 

जातां शैलीं हिमधवल जो उद्गमप्रान्त तीचा

यत्पाषाणीं हरिण बसुनी गन्ध ये कस्तुरीचा

श्रृंगी मार्गश्रम शमविण्या बैसतां शोभशील

शुभ्रीं नन्दीशिरिं उकरिलें कीं जसें पंकजाल

 

शुभ्र जलाचे तुषार उडवी त्या गंगेचें हें उगमस्थळ

कस्तुरिहरणें बसलीं त्यांचा इथें शिळांना मादक परिमळ

श्रम घालविण्या हिमशैलावर टेकशील तूं, जलदा, जेव्हां

नंदीनें उखणून काढिल्या पंकासम, रे, दिसशिल तेव्हां

 

गंगेचे उगमस्थान असलेल्या आणि अलोट हिमाने पांढराशुभ्र झालेल्या हिमालयावर तू पोहोचशील, तेव्हा त्यावरील शिळा त्यांच्यावर बसलेल्या कस्तूरी-मृगांच्या नाभीमधील विपुल सुगंधाने सुवासिक होऊन गेलेल्या असतील. सगळ्या थकव्याचे हरण करणाऱ्या हिमालयाच्या पर्वत शिखरांवर तू जाऊन बसलास की, शंकराच्या शुभ्र नंदीने आपल्या शिंगांनी उकरलेल्या कर्दमाप्रमाणे ती शोभा दिसेल.

बापट-मंगरूळकर-हातवळणे यांनी त्यांच्या भाषांतरात एक सुंदर टीप दिली आहे. ते म्हणतात – “येथे शिखर या अर्थी ‘शृङ्ग’ हा शब्द वापरून कालिदासाने बहार केली आहे. (अशा ठिकाणी भाषांतरकाराला हात टेकावे लागतात!) नंदीच्या शृंगावरील चिखलाप्रमाणे पर्वत शृंगावर मेघाची शोभा दिसेल अशी सूचना त्यातून मिळते.”

सीडींनी हा अर्थ नेमका पकडलेला आहे-

‘श्रृंगी मार्गश्रम शमविण्या बैसतां शोभशील

शुभ्रीं नन्दीशिरिं उकरिलें कीं जसें पंकजाल’

नंदीने आपल्या शिंगाने उकरलेल्या चिखलाप्रमाणे तू दिसशील.

शुभ्र-धवल नंदीच्या शिंगावर काळसर-निळसर मेघ ही कल्पनाच अत्यंत रम्य अशी आहे!

बाकी कुसुमाग्रज आणि शांताबाईंनी ‘नंदीने आपल्या खुरांनी उकरलेल्या चिखलाप्रमाणे तू दिसशील’ असा अर्थ लावला आहे.

सीडी आणि वसंत बापट आदी भाषांतरांनी लावलेला अर्थ अर्थातच अतिशय सुंदर आणि रम्य असा आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

५३.

तं चेद्वायौ सरति सरलस्कन्धसंघट्टजन्मा

बाधेतोल्काक्षपितचमरीबालभारो दवाग्निः।

अर्हस्येनं शमयितुमलं वारिधारासहस्रै

रापन्नार्तिप्रशमनफलाः संपदो ह्युत्तमानाम्॥

 

पेटुनि वणवा देवतरूंचे दाहक होतां बन

केशभार धेनूंचा जाळिल उडणारें इंधन

हिमाचलासहि तापद, ओती सहस्र धारा तुझ्या

दुःखनिवारण दलितांचे हें साधुजनांचे धन!

 

वारा वाहे तंव भडकुनी घर्षता देवदार

त्यातें दाव ज्वलितचमरीकेश जांचील फार

तों टाकीं त्या शमवुनि सरी सोडुनीच तूं जलाच्या

आर्तत्राणें खचित सुफला संपदा उत्तमांच्या

 

सरलतरूंच्या घांसुन फांद्या वनास अवघ्या व्यापिल वणवा

उडवुन ठिणग्या वनगाईंचा केशभार जाळील जेधवां

सहस्रधारा वर्षुन तेव्हां शमवी, जलदा, तो दावानल

दुःखार्तांचें दु:खनिवारण श्रीमंतीचें हेंच खरें फळ!

 

सोसाट्याच्या वाऱ्यामुळे देवदार वृक्षांच्या शाखा एकमेकांवर घासल्या जाऊन हिमालयात वणवा भडकला असेल. तो आपल्या ठिणग्यांमुळे वनगायींचे विपुल असे केस जाळून टाकत असेल. असा हा वणवा हिमालय पर्वताला जर उपद्रव देऊ लागला, तर आपल्या धुवांधार वृष्टीने तू तो विझवून टाक. आपत्तीत सापडलेल्या लोकांच्या यातनांचे निवारण करण्यामध्येच थोरांच्या संपत्तीचे सार्थक असते. 

सीडींनी ही भावना अत्यंत सुंदर ओळीत व्यक्त केली आहे.

‘आर्तत्राणें खचित सुफला संपदा उत्तमांच्या’

जे आर्त आहेत त्यांना त्राण बहाल करण्यात उत्तम लोकांच्या संपदा सुफल होतात!

वसंत बापट-मंगरूळकर-हातवळणे त्यांच्या टिपेत म्हणतात – “मेघ हा थोर कुळातील आहे आणि जलसंपदा हे त्याचे वैभव आहे. ते कारणी लागावे ही यक्षाची इच्छा आहे. कालिदासाच्या सुसंस्कृत मनाचे हे असे प्रतिबिंब त्याच्या साहित्यात ठायी ठायी उमटलेले दिसते.”

५४.

ये संरम्भोत्पतनरभसाः स्वाङ्गभङ्गाय तस्मि -

न्मुक्ताध्वान सपदि शरभा लङ्घयेयुर्भवन्तम्।

तान्कुर्वीथास्तुमुलकरकावृष्टिपातावकीर्णान्

के वा न स्युः परिभवपदं निष्फलारम्भयत्नाः॥

 

शरभ तिथें करतील तुझ्यासह उगाच रण तुंबळ

करूनि घेतिल निज देहांची व्यर्थचि तारांबळ

हिमकणिकांच्या रिचवुनि राशी पळव तयांना वनीं

विफल ध्येय तर धडपडण्याचें हेंच अखेरीं फळ!

 

त्यांच्या मार्गा त्यजसि जरि तूं जे तुझ्या लंघनार्थ

वेगें व्योमीं शरभ उडती स्वांग मोडोनी घेत

वर्षीं गारा तुमुल करित्यां जर्जर श्वापदांना

होती हास्यास्पद करिते जे निष्फला कार्ययत्ना

 

मार्ग आपुला सोडुन चिडुनी शरभ तुझ्यावर धांवुन आले

संतापानें उसळुन तुजसी समर कराया पुढे ठाकले

गारांचा वर्षाव करुनियां दाणादाण करीं तू त्यांची

भलते साहस करुं बघती जे, गत त्यांची तर हीच व्हायची!

 

तू शरभ पशूंच्या वाटेतून बाजूला झाला असताना ते तुझ्यावर हल्ला करतील. हल्ला करण्यासाठी तू त्यांच्या टप्प्यात नसतानाही, खूप उंचावर असूनही ते क्रोधाने हल्ला करतील. या प्रकारात ते त्यांचे हात-पाय मोडून घेतील. त्यांनी असा हल्ला केला, तर तू गारांची प्रचंड वृष्टी करून त्यांना उधळून लाव. आपल्या कुवतीपलीकडची निरर्थक कृत्ये करणारे कुठले लोक तिरस्काराचे धनी होताना दिसत नाहीत!

सीडींनी लिहिले आहे -

‘होती हास्यास्पद करिते जे निष्फला कार्ययत्ना’

काही केल्या निष्फळच होणारे प्रयत्न जे लोक करत राहतात, ते हास्यास्पदच होत असतात!

शरभ हा आठ पाय असलेला हरिणासारखा प्राणी कवींनी कल्पिला आहे. हा हिंस्र असतो आणि तो सिंहाचाही पराभव करू शकतो.

कुसुमाग्रजांच्या चारही ओळी अत्यंत सुरेख उतरल्या आहेत -

‘शरभ तिथें करतील तुझ्यासह उगाच रण तुंबळ

करूनि घेतिल निज देहांची व्यर्थचि तारांबळ

हिमकणिकांच्या रिचवुनि राशी पळव तयांना वनीं

विफल ध्येय तर धडपडण्याचें हेंच अखेरीं फळ!’

५५.

तत्र व्यक्तं दृषदि चरणन्यासमर्धेन्दुमौलेः

शश्वत्सिद्धैरुपचितबलिं भक्तिनम्रः परीयाः।

यस्मिन्दृष्टे करणविगमादूर्ध्वमुद्धूतपापाः

संकल्पन्ते स्थिरगणपदप्राप्तये श्रद्दधानाः॥

 

तिथें शिलेवर शिवचरणाची खूण असे पावन

योगी पुरुषांनीं केलेलें सतत तिचें पूजन

भावभक्तिनें प्रदक्षिणा कर त्या स्थानाभोंवतीं

शाश्वत पद भक्तांस देत ती सरतां हें जीवन.

 

श्रीशम्भूचे चरण उठले स्पष्ट तेथें शिलाङ्गि

फेरी घालीं सविनय तयां पूजिती ज्यांस योगी

पापांचे हो दालन दिसतां जे नरां भक्तिवंता

होई नित्या शिवगणपदीं योजना देह जाता

 

स्पष्ट उमटलें दिसेल पाउल तिथें शिवाचें पाषाणावरिं

सिद्धार्पितबलि पावन स्थल तें, लवुनि तिथें तूं प्रदक्षिणा करिं

दर्शनेंच ज्या श्रद्धाळूंचें जन्मभराचें पाप निरसतें

देहपात घडतांच गणांमधिं शाश्वत त्यांतें स्थान लाभतें

 

तेथे हिमालयामध्ये एका शिळेवर चंद्रमौळी शंकराच्या पावलाचा ठसा उमटलेला दिसेल. तिला तू प्रदक्षिणा घाल. योगीजन शिवाची नित्य पूजा करतात. शंकराच्या पावलाचा ठसा उमटलेल्या या शिळेचे दर्शन झाल्यामुळे पापमुक्त झालेले सर्व श्रद्धावान त्यांचा देह पडल्यानंतर शिवगणांच्या शाश्वत पदाला पोहोचण्यासाठी पात्र होतात.

हरिद्वार जवळ हरकी पौडी नावाचे एक स्थळ आहे. ते या श्लोकात कालिदासाला अपेक्षित आहे.

५६.

शब्दायन्ते मधुरमनिलैः कीचकाः पूर्यमाणाः

संसक्ताभिस्त्रिपुरविजयो गीयते किंनरीभिः।

निर्ह्रादस्ते मुरज इव चेत्कन्दरेषु ध्वनिः स्या

त्संगीतार्थो ननु पशुपतेस्तत्र भावी समग्रः॥

 

वेळूंमधुनी वारा भरतां उमटे मंजुळ रव

जमून किन्नर-महिला गाती उमेश्वराचा स्तव

मृदंग झडतां गभीर तेथें गिरीदरींतुन तुझा

गायनवादन पूर्ण व्हायचें प्रसन्न करण्या शिव!

 

वारा रंध्रीं शिरुनी मुरलीसारिखा वेळू वाजे

गाती गान त्रिपुर विजया कन्नरी सुस्वरा जें

होई तूझें ध्वनित कुहरीं जों मृदुंगासमान

संगीताचा तंव हरपदी संच होईल पूर्ण

 

वेळूमध्यें शिरतां वारा नादतील स्वर, जशी बासरी

त्रिपुरविजय साजरा कराया प्रेमभरें गातील किन्नरी

डमरू होउन घुमतिल जेव्हां गिरीदरींतुन तुझी गर्जितें

शिवस्तुतीच्या गानोत्सविं मग उणें न लवही राहिल तेथें!

 

वाऱ्याने वेळूंमध्ये वारे भरल्यामुळे ते वेळू मधुर ध्वनी करत आहेत. गोड गळ्याच्या किन्नरी त्रिपुरविजयाचा महिमा गात आहेत. अशा वेळी पर्वतातील गुहांमधून तुझा गडगडाट मृदुंगाप्रमाणे घुमू लागला, म्हणजे त्या ठिकाणी भगवान शंकराचे यशोगान परिपूर्ण झाले आहे, असे म्हणावे लागेल.

त्रिपुरविजयावर बापट-मंगरूळकर-हातवळणे यांच्या अनुवादात एक टीप दिलेली आहे – “त्रिपुरविजय म्हणजे शंकराचा त्रिपुरासुरावरील विजय. असुरांचीं सुवर्ण, रुपे आणि लोखंड यांनी बांधिलेलीं तीन नगरें होतीं. तीं अनुक्रमें आकाश, अन्तराळ व पृथ्वी या ठिकाणीं होती. ही नगरे विद्युन्माली, रक्ताक्ष व हिरण्याक्ष या तीन दैत्यराजांसाठीं मयासुरानें निर्मिलीं होतीं. हीं जंगम नगरें घेऊन त्रिपुरासुर सर्वत्र हिंडत असे. शंकरानें त्यांचा नाश केला.”

शंकराने ती नगरे जाळून टाकली आणि विजय प्राप्त केला. त्याचे गान किन्नरी आपल्या रसाळ आवजात गात आहेत.

सीडींनी या श्लोकाचा अतिशय सुंदर अनुवाद केला आहे-

वारा रंध्रीं शिरुनी मुरलीसारिखा वेळू वाजे

गाती गान त्रिपुर विजया कन्नरी सुस्वरा जें

होई तूझें ध्वनित कुहरीं जों मृदुंगासमान

संगीताचा तंव हरपदी संच होईल पूर्ण

हरपदी : म्हणजे शंकराच्या पायापाशी. वेळूंची मुरली, किन्नरींचा सुस्वर आणि मेघाची मृदुंगासमान ध्वनिते यांचा संच श्री शंकराच्या पायी पूर्ण होईल.

..................................................................................................................................................................

लेखांक पहिला : कालिदासाच्या काव्यातील एकेक श्लोक सौंदर्यवंत ऐरावतासारखा झुलत राहतो, आणि त्यावर आशयाचा ऐश्वर्यमान इंद्र आरूढ झालेला असतो!

लेखांक दुसरा : उत्कंठा उत्पन्न करणाऱ्या त्या मेघासमोर यक्ष आपले अश्रू आवरत कसाबसा उभा राहिला…

लेखांक तिसरा : कालिदास आपल्याला आपल्या जगातून उचलतात आणि प्रेमाच्या व सौंदर्याच्या तीव्र संवेदनांनी भारलेल्या जगात घेऊन जातात…

लेखांक चौथा कालिदासाला जेव्हा जेव्हा प्रकृतीतील अपार सौंदर्य दिसते, तेव्हा तेव्हा त्याला पुरुष-तत्त्वाची आठवण होते…

लेखांक पाचवा : कालिदासाच्या सौंदर्यदृष्टीचा स्पर्श त्याच्या अनुवादकांनासुद्धा होतो…

लेखांक सहावा : येथून आपला कालिदासाच्या ‘मेघदूता’तील श्रृंगाररसाच्या प्रवाहात प्रवेश होतो.…

लेखांक सातवा : आपल्या प्रेमामुळे दुसरी व्यक्ती किती आनंदी होते आहे, यावर आपल्या प्रेमाचे भाग्य अवलंबून असते!

लेखांक आठवा : कालिदास सगळे वातावरणच स्त्री-पुरुषांतील प्रेमामध्ये अध्याहृत असलेल्या अनिवार वेडाने भारावून टाकतो...

लेखांक नववा : प्रेमात पडलेल्या स्त्रीच्या प्रेमाचा अव्हेर करणे, यक्षाला योग्य वाटत नाही. म्हणून तो मेघाला सांगतो आहे…

लेखांक दहावा : कालिदासाची सौंदर्यदृष्टी किती सूक्ष्म निरीक्षणांतून जन्मली आहे, याची अनेक उदाहरणे देता येण्यासारखी आहेत…

लेखकांक अकरावा : ‘मेघदुता’तल्या ४७व्या श्लोकातील एका ओळीचा अनुवाद करताना सगळ्याच अनुवादकांची धांदल उडालीय...

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......