मारिया अरबातवा, शुमित दत्त गुप्ता या दाम्पत्याने एकत्रितपणे लिहिलेल्या ‘द आयर्न फिलॅटेलिस्ट’ (ऑर्डिअल बाय डेथ) या मूळ रशियन कादंबरीचा मराठी अनुवाद अनघा भट यांनी केला असून तो नुकताच कलासक्त पुणे या संस्थेने प्रकाशित केला आहे. या हेर-कादंबरीच्या अनुवादाला ज्येष्ठ पत्रकार रवी आमले यांनी लिहिलेली ही प्रस्तावना...
.................................................................................................................................................................
१.
‘लपंडाव मृत्यूशी’ या कादंबरीच्या निमित्तानं मराठी गुप्तहेरकथांच्या दालनात एका ‘अस्सल’ गुप्तहेरकथेची भर पडत आहे, ही मोठी स्वागतार्ह बाब आहे. मराठीमध्ये गुप्तहेरकथा-कादंबऱ्यांची मोठी वानवा. खरं तर ते दालन दुष्काळग्रस्तच. त्या तुलनेत रहस्यकथा भरपूर. साहसकथा अनेक. बंगालीतील ‘ब्योमकेश बक्षी’चे जनक शरदेंदू बंदोपाध्याय यांनी ‘डिटेक्टिव्ह’ला ‘सत्यान्वेषी’ असा मोठा समर्पक पर्यायी शब्द दिला आहे. त्या चातुर्यकथा. त्याही पुष्कळ आहेत. अगदी १८५७च्या बंडानंतर अवघ्या ३० वर्षांत येथे रहस्यकादंबरी प्रसिद्ध झाली होती. तिचं नाव ‘वेशधारी पंजाबी’. २९४ पानांची आणि सव्वा रुपये किमतीची ही रहस्यकादंबरी बाजारात आली, ते साल होतं १८८६. तो काळ पाहा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना होऊन तेव्हा अवघं एक वर्ष झालं होतं. पुण्यात नुकतंच फर्गसन कॉलेज सुरू झालं होतं. तिकडे इंग्लंडमध्ये सर ऑर्थर कॉनन डॉयल यांच्या शेरलॉक होम्सचाही जन्म व्हायचा होता. ‘वेशधारी पंजाबी’नंतर एक वर्षानं पहिली शेरलॉक कथा जन्माला आली. तर अशा त्या काळात आपल्याकडे रहस्यकादंबरी लिहिली जाणं हे विशेषच.
पुढे दोन महायुद्धांच्या मधल्या काळात तर मराठी रहस्यकथांच्या प्रकाशनास चांगलाच बहरच आला. तेव्हाचे गो. ना. दातार, नाथमाधव हे लेखक आजही - निदान स्मरणरंजनाचा भाग म्हणून का होईना, पण - वाचले जात आहेत. यानंतरचा काळ होता बाबुराव अर्नाळकर यांचा. १९५० नंतरची दोन दशकं त्यांची. प्रचंड लिखाण, प्रचंड खप, प्रचंड लोकप्रियता म्हणजे बाबुराव अर्नाळकर. एकूण १४८० रहस्यकादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. एस. एम. काशीकर हेही त्यांचे समकालीन लोकप्रिय रहस्यकादंबरीकार. त्यांच्यानंतरचा काळ गाजवला गुरुनाथ नाईक, सुहास शिरवळकर, सुभाष शहा, दिवाकर नेमाडे प्रभृतींनी.
समीक्षकांच्या लेखी हे सारं रंजनपर ‘लगदा साहित्य’, निम्न दर्जाचं वाङ्मय. बहुधा जे लोकप्रिय ते वाईटच, असा काही समीक्षकी सिद्धान्त असावा. वस्तुतः हा एक जगन्मान्य साहित्य प्रकार आहे. पाश्चात्य जगतात अगदी एडगर ॲलन पो यांच्यासारख्या थोरामोठ्यांनीही त्यात लेखणी चालवलेली आहे. रहस्यकथांचे आद्य प्रणेते मानतात त्यांना. अनेकांना हे वाचून आश्चर्य वाटेल की, मराठीत शांता शेळकेंसारख्या ऋजू कवयित्रीनेही हा प्रकार हाताळला आहे. तीन रहस्यकादंबऱ्या आहेत त्यांच्या नावावर.
समीक्षक काहीही म्हणोत, वाचकांनी मात्र नेहमीच रहस्यकथा, साहसकथांना डोक्यावर घेतलं. त्यामुळे त्यांचा प्रसवही मोठ्या प्रमाणावर झाला. पण गुप्तहेरकथा-कादंबऱ्यांबाबत मात्र तसं म्हणता येणार नाही. म्हणजे वाचकांनी त्यांना आश्रय दिला नाही असं नाही, तर गुप्तहेरकथांमध्ये ती थरारकता, ती रहस्यमयता, ती रोमहर्षकता, असा सारा ऐवज असूनही मराठीत त्या मोठ्या प्रमाणावर लिहिल्या गेल्या नाहीत. हेरगिरीविषयी सखोल विचार करणाऱ्या आर्य चाणक्यांच्या भूमीत हे घडावं, ही आश्चर्याचीच बाब म्हणावी लागेल.
ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकात चाणक्य तथा कौटिल्य यांनी लिहिलेल्या अर्थशास्त्रात हेरगिरीसाठी दोन स्वतंत्र प्रकरणं दिलेली आहेत. हेरगिरीचं एक स्वतंत्र शास्त्रच त्यांनी रचलं आहे. पण त्याही आधीपासून हेरगिरीचा विचार आपल्याकडे झालेला आहे. वरुण ही वेदांतील देवता. तिला तर आद्यहेर म्हणता येईल. अथर्ववेदांत या वरुणाचा उल्लेख हेरगिरीसंदर्भात आलेला आहे. त्यांच्याकडे हेर आहेत, त्यांना हजार डोळे आहेत, असं म्हटलेलं आहे. ‘तैतरिय’ संहितेत दूत आणि प्रहित असे उल्लेख येतात. सायनाचार्यांच्या म्हणण्यानुसार दूत हा राजाचा प्रतिनिधी आणि प्रहित म्हणजे गुप्तचर. म्हणजे ही संस्था तेव्हापासून आपल्याकडे होती.
पुढे ‘महाभारता’तही हेरसंस्थेचा स्पष्ट आणि थेट उल्लेख येतो. त्यात महारथी भीष्मांनी राजाची जी कर्तव्यं सांगितली आहेत, त्यातील एक कर्तव्य आहे - हेरांची नियुक्ती करणं. विजयनगरचे सम्राट कृष्णदेवराय यांच्या ‘अमुक्तमाल्यद’ ग्रंथात गुप्तचरांची आवश्यकता नमूद केलेली आहे. प्रत्यक्ष व्यवहारात, राज्यकारभारात तर ते नक्कीच उतरत असणार. भारतीय इतिहासात फितुरीच्या अनेक कथा येतात. जेथे फितुरी आहे, तेथे हेरगिरी आहे. परकी टोळधाड आपल्याला नवी नव्हती. आक्रमणाआधी हेरगिरी येतेच. असं सगळं असताना त्याबाबतच्या कथा-कहाण्या अगदी अपवादानंच दिसतात. त्यातील एक आहे कच-देवयानीची कथा.
शत्रूपक्षाकडील महत्त्वाची माहिती मिळवणं, पळवणं हे एक हेरांचं काम. असुरगुरू भार्गव शुक्राचार्यांकडे जाऊन कच हा देवगुरू अंगिरस बृहस्पतींचा पुत्र संजिवनीविद्या हस्तगत करतो. वस्तुतः ही हेरकथाच. भारतीय परंपरेनं मात्र तिच्याकडे सातत्यानं कच-देवयानी यांची प्रेमकथा या रूपातच पाहिलं. आर्य चाणक्य म्हटलं की, आपल्याला विषकन्या आठवतात. भारतीय हेरगिरीच्या इतिहासातील ही एक प्रचंड लोकप्रिय अशी दंतकथा. कौटिलिय अर्थशास्त्रात त्यांचा उल्लेख आहे, असा अनेकांचा समज असतो. तेथे हेर म्हणून स्त्रियांचा कसा वापर करायचा, याचा उल्लेख आहे. तेथे विषाचे अनेक प्रकार आणि त्यांचा वापर याविषयी लिहिलेलं आहे. मात्र तेथे विषकन्येबाबत काहीही म्हटलेलं नाही. तो उल्लेख येतो विशाखादत्तच्या ‘मुद्राराक्षस’ या नाटकातून. चंद्रगुप्त मौर्याचा वध करण्यासाठी पाठवण्यात आलेल्या विषकन्येला चाणक्य पर्वतक राजाकडे पाठवतात. तिच्याशी संबंध आल्यानं त्या राजाचा मृत्यू होतो आणि चंद्रगुप्ताचा मार्ग निष्कंटक होतो, अशी ती कथा. मुळात इतिहासात पर्वतक नावाचा राजाच नव्हता. एकंदर ही लोकप्रिय, पण दंतकथाच. मराठी विश्वात मात्र लोकप्रियतेच्या निकषावर पहिला क्रमांक लागतो तो बहिर्जी नाईकांच्या कहाण्यांचा.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
राज्यकारभाराचं एक महत्त्वाचं आणि अत्यावश्यक अंग म्हणून हेरगिरीचा विचार करणारे राजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवानं उल्लेख करावयास हवा. महाराजांच्या पदरी हेरांची फौज असल्याचे उल्लेख फॅक्टरी रेकॉर्ड्समध्ये येतात. त्यांच्या या हेरखात्याचे प्रमुख होते बहिर्जी जाधव नाईक. दुर्दैवानं महाराजांच्या हेरयंत्रणेविषयीची फारच कमी अस्सल कागदपत्रं आज उपलब्ध आहेत. बहिर्जी नाईकांबाबतही तेच. त्यांच्याविषयीचे महत्त्वाचे उल्लेख आढळतात ते सभासदाच्या बखरीत. कृष्णाजी अनंत सभासद यांनी छत्रपती राजाराम महाराजांच्या आज्ञेनं लिहिलेली ही बखर. त्यात एके ठिकाणी ‘सरनोबताजवळ बहिरजी जाधव नाईक, मोठा शहाणा, जासुदांचा नाईक केला. तो बहुत हुशार चौक करून ठेविला’, असा उल्लेख येतो. यानंतर मात्र या बखरीत बहिर्जींचा उल्लेख येतो तो थेट सूरत प्रकरणात आणि नंतर जालना लुटीच्या वेळी.
आग्र्याहून सुटका, शाहिस्तेखानावरील हल्ला, अफझलखान वध अशा शिवचरित्रातील काही थरारक प्रकरणांमध्ये नक्कीच या हेरयंत्रणेचा उपयोग महाराजांना झालेला असावा. पण त्याविषयीच्या चोख नोंदी नाहीत आणि तरीही बहिर्जी नाईकांबाबत विविध कहाण्या रचण्यात आल्या आहेत. त्याविषयीच्या काही कादंबऱ्याही प्रसिद्ध झालेल्या आहेत. स्वाभाविकच त्यात आहे ती कल्पनांची घोडदौडच, परंतु या भराऱ्या अन्यत्र का दिसत नाहीत, हा खरा प्रश्न आहे. मात्र तो सुरुवातीच्या काळातील मराठी कादंबरीकारांना वा भाषांतरकारांना विचारता येणार नाही.
एक तर मराठीमध्ये कादंबरी हा गद्य साहित्यप्रकार आला तोच अगदी अलीकडे. सुमारे १३६ वर्षं झाली त्याला. अव्वल इंग्रजी अमदानीचा काळ तो. गुलामगिरीचा. इंग्रजी सत्ता तोवर दृढ झालेली. अजून भारतीय राष्ट्रवादाची पायाभरणी व्हायची होती. तशा त्या वातावरणात राष्ट्रसंरक्षणाचं महत्त्वाचं अंग असलेल्या हेरसंस्थेचा विचार येथील लेखकांच्या मनात येणं एकूणच कठीण. त्या काळात साहित्यिकांपुढील महत्त्वाचे प्रश्न हे सामाजिक होते. प्राधान्यानं तोच आशय त्यांच्या कथांतून प्रकट होत होता.
हे झालं तेव्हाच्या स्वतंत्र कादंबऱ्यांबाबत. पण तेव्हा अनेक कादंबऱ्या इंग्रजीतून अनुवादित वा रूपांतरित होत्या. त्यात हेरकादंबऱ्या का आल्या नाहीत, असं विचारावं, तर मुळात तेव्हा इंग्रजीतच तसं लेखन फारसं झालेलं नव्हतं.
इंग्रजीत या लेखनप्रकारास बहर आला तो विसाव्या शतकात. युरोपियन राष्ट्रांचा आशियातील सत्तासंघर्ष, रशिया आणि ब्रिटनमधल ‘ग्रेट गेम’ त्यास कारणीभूत ठरला. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाने अशा प्रकारच्या लेखनास आवश्यक असलेली पार्श्वभूमी पुरवली. सोव्हिएत रशिया आणि अमेरिका यांच्यातील शीतयुद्धानं या प्रकारास आणखी उंचावर नेलं. पण मग या गोष्टी तेव्हाच्या मराठी कादंबरीकारांना दिसत नव्हत्या का? पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात अनेक महाराष्ट्रीय तरुण सहभागी झालेले होते. अनेक तरुण क्रांतिकार्यात सामील झाले होते. रासबिहारी बोस, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी परदेशात जाऊन सेना उभारणी केली होती. त्यात त्यांना हेरकादंबऱ्यांची बीतं, कथावस्तू दिसत नव्हती का? याचं साधं उत्तर आहे - नव्हती. पण त्या उत्तराकडे येण्यापूर्वी ते प्रश्न नीट तपासून घ्यायला हवेत. आणि तसं केल्यास जाणवेल की, ते सवालच फिजूल आहेत.
कौटिलिय अर्थशास्त्र काय किंवा बहिर्जींच्या कथा काय, यांची लोकप्रियता ही फार नंतरची आहे. अर्थशास्त्राचं मराठी भाषांतर विसाव्या शतकाच्या प्रारंभी झालेलं होतं हे खरं. परंतु भाषांतर प्रसिद्ध होणं आणि ते झिरपून लोकमानसात उतरणं यात काळाचं मोठं अंतर आहे. बहिर्जींच्या कथांचंही तेच. आपण येथे स्वातंत्र्यपूर्व काळाबाबत बोलत आहोत. त्या काळात हेरगिरी या संकल्पनेविषयीच्या जाणीवा फारच मर्यादित होत्या. गुलाम राष्ट्र हेरगिरीसारख्या गोष्टींचा विचार करूच शकत नसते. हा विचार स्वतंत्र भारतातच शक्य होता.
भारत स्वतंत्र होणार याची चाहूल लागल्यापासून येथे अमेरिकेची गुप्तचरसंस्था सीआयए (पूर्वीची ओएसएस), रशियाची हेरसंस्था केजीबी आणि अर्थातच ब्रिटनची एमआय-सिक्स यांच्या कारवाया सुरू झाल्या होत्या. १९६२च्या युद्धातील पराभवानंतर तर ‘इंटेलिजन्स ब्युरो’ ही भारतीय हेरसंस्था माध्यमी चर्चांच्या केंद्रस्थानी आली होती. मराठी साहित्यिकांचं जग मात्र या पासून अलिप्त होते. पुढे १९६५ आणि १९७१ अशी दोन युद्धं झाली. १९७४ मध्ये भारतानं अणुचाचणी स्फोट केला. १९७८मध्ये संपूर्ण देशाला हादरा देणारं असं एक हेरगिरी प्रकरण उजेडात आलं. हिमालयातील नंदादेवी शिखरावर अणुऊर्जेवर चालणारं टेहळणी यंत्र बसवण्याचा सीआयएचा प्रयत्न होता. तो फसला. त्याची माहिती अमेरिका आणि भारतातील वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाली. त्यावरून संसदेतही गदारोळ झाला. त्याचा पुढच्याच वर्षी ‘सांबा हेरगिरी प्रकरणा’नं देशास धक्का दिला.
हे सारं देशात घडत होतं आणि मराठी साहित्य मात्र त्यापासून प्रचंड अंतरावर उभं होतं. देशातील या घटनांचं प्रतिबिंब, या घटनांच्या आधारे वा त्यांपासून स्फूर्ती घेऊन कोणी उत्तम हेरकादंबरी लिहिली असं झालं नाही. कुठे तरी भा. रा. भागवतांचा फास्टर फेणे, कुठे तरी गुरुनाथ नाईकांचा कॅप्टन दीप पाकिस्तानी वा चिनी हेरांचे डाव उद्ध्वस्त करत होते. चंद्रकांत काकोडकरांनीही त्यांच्या राजाराम राजेस एकदा पाकिस्तानात पाठवलं होतं, पण तेवढंच.
या अशा कथांनाच पुढे हेरगिरी कथा मानण्यात येऊ लागलं. फार काय, अगदी मराठी विश्वकोशातही ‘हेरकथा’ या मथळ्याखाली रहस्यकथांबाबतचंच टिपण आहे. पण हेरकथा आणि रहस्य वा साहस वा चातुर्यकथा यांत मोठा फरक आहे.
आंतरराष्ट्रीय राजकारण, त्यातील ताणे-बाणे, मुत्सद्देगिरी, राजकीय नेत्यांचा, अधिकाऱ्यांचा वर्तन व्यवहार, येथपासून इतिहास, भूगोल, युद्धशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र, हेरगिरी, आधुनिक तंत्रज्ञान आदी विविध विषयांचं किमान ज्ञान, जमल्यास संरक्षणविषयक यंत्रणांतील अनुभव, अशा अनेक बाबी हेरकथांच्या मांडणीसाठी कमीजास्त प्रमाणात, पण आवश्यक असतात. तेव्हाचे मराठी लेखक ज्या मध्यमवर्गातून येत, त्याला हे ‘एक्स्पोजर’ असणं कठीण होतं. त्यामुळे हेरकथालेखन हे नेहमीच त्यांच्या आवाक्याबाहेर राहिलं. परिणामी मराठीत स्वतंत्र हेरकथा अभावानेच दिसल्या. आजही त्यात फरक पडलेला नाही.
ही कमतरता भरून काढली पुन्हा भाषांतरित हेरकथा-कादंबऱ्यांनी. या भाषांतरकार-लेखकांमुळे आजवर अनेक उत्तमोत्तम इंग्रजी हेरकथा-कादंबऱ्या मराठीत आल्या आहेत. ते गरजेचंच होतं. जग समजण्यासाठी, आंतरराष्ट्रीय राजकारणाविषयीची समज वाढण्यासाठी केवळ जाडजूड अभ्यासपूर्ण ग्रंथ, प्रबंध वा वृत्तपत्रीय लेखच वाचावयास हवेत असं नाही. हेरकादंबऱ्या हेही त्याचं एक रंजक साधन ठरू शकतं, हे जॉन ल कार यांच्यापासून फ्रेडरिक फोरसिथ, रॉबर्ट लडलम यांच्यापर्यंतच्या काही लोकप्रिय कादंबरीकारांनी आणि त्यांच्या कादंबऱ्यांनी दाखवून दिलं आहे. परभाषेतील उत्तम हेरकादंबऱ्या मराठीत येणे, हे मराठीची समृद्धी वाढवणारेच. ‘लपंडाव मृत्यूशी’ या कादंबरीबाबत हेच म्हणता येईल. मराठीतील हेरकथांच्या दालनाची श्रीमंती या अस्सल अनुवादित कादंबरीमुळे खचितच वाढणार आहे.
२.
‘लपंडाव मृत्यूशी’ हा मारिया अरबातवा आणि शुमित दत्त गुप्ता यांच्या ‘ट्रायल बाय डेथ ऑर आयर्न फिलाथेलिस्ट’ या मूळ रशियन कादंबरीचा अनघा भट यांनी केलेला अनुवाद. एखाद्या कलाकृतीचा अनुवाद आणि दागिना मोडून दुसरा करणं यांत एक साम्य असतं. एक दागिनी मोडून दुसरा करताना त्यातील सोन्याची थोडीफार घट होतेच. अनुवादाचंही तसंच असतं. एका भाषेतील कादंबरी दुसऱ्या भाषेत नेताना काही तरी मागे राहतंच. अखेर शब्दांमधून प्रवाहित होत असतं, ते त्या भाषिक समाजाचं सांस्कृतिक संचित. त्या गोष्टी जशाच्या तशा, तितक्याच जोमदारपणे, मूळ कलाकृतीच्या आशयसूत्रांना धक्का न लावता, संस्कृती आणि त्या भाषिक पर्यावरणाचं भान ठेवत दुसऱ्या भाषेत उतरवणं हे महाकर्मकठीण. ते किती कठीण असतं, ते पाहणं/शोधणं काही कठीण नाही. त्यातही कादंबरी मूळची भलत्याच कुठल्या भाषेतील, तेथून ती वेगळ्याच भाषेत म्हणजे उदाहरणार्थ इंग्रजीत येणार आणि तेथून मग मराठीत असा प्रवास असेल, तर त्यात बराच आशय ऐवज हरवण्याची दाट शक्यता असते.
‘लपंडाव मृत्यूशी’ या कादंबरीचं वेगळेपण हे की, भाषेचा अधला-मधलाकुठलाही थांबा न घेता, अनघा भट यांनी ती थेट रशियन भाषेतून मराठीत आणली आहे. अनघा भट या गेली अनेक वर्षं रशियन भाषेतील मराठी भाषेत आणण्याचं महत्त्वपूर्ण काम करत आहेत. त्यामुळे केवळ त्या भाषेशीच नव्हे, तर त्या भाषेतील साहित्याशी आणि संस्कृतीशी त्यांचा उत्तम परिचय आहे. त्याचा प्रत्यय ही कादंबरी वाचताना सातत्यानं येतो.
या कादंबरीचं लेखकद्वय मारिया अरबातवा आणि शुमित दत्त गुप्ता हे पती-पत्नी. त्यांनी एकत्रितरीत्या लिहिलेली ही पहिलीच कादंबरी. यातील मारिया अरबातवा या लेखिका-पत्रकार. रशियातील स्त्रीवादी चळवळीतील आघाडीच्या कार्यकर्त्या. ड्युमाची निवडणूकही त्यांनी लढवली होती. त्यांच्या एका काव्यसंग्रहाचा, काही नाटकांचे आणि लघुकथासंग्रहांचे इंग्रजीत अनुवाद झालेले आहेत. ‘विसाव्या शतकास सांस्कृतिक योगदान’ दिल्याबद्दल ‘केंब्रिज सुवर्ण पदका’ने त्यांना गौरवण्यात आलं आहे. शुमित दत्त गुप्ता हे मूळचे भारतीय. ते अर्थविश्लेषक.
अशा या जोडीनं त्यांच्या पहिल्या एकत्रित कादंबरी लेखनासाठी विषय निवडावा तो हेरगिरीचा, हे विशेष. मात्र बहुधा त्यामुळे एक झालं, अशा विषयाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोन समोर आला. एरवी आताशा हेरगिरीवरील लेखनाचाही एक ‘फॉर्म्युला’ बनून गेला आहे. अशा कथा-कादंबऱ्या उगाचच थरारक, रोमहर्षक वगैरे करण्याचा एक सोस त्यात दिसून येतो. त्यास तशी हरकत नाही. मात्र त्यामुळे हेरगिरी या विषयाकडे पाहण्याचा सामान्य वाचकांचा दृष्टीकोनच बिघडला आहे. हेरगिरी म्हणजे इॲन फ्लेमिंगचा जेम्स बॉण्ड वा रॉबर्ट लडलमचा जेसन बोर्न; हेरगिरी म्हणजे तुफान हाणामारी, बंदुकबाजी, पाठलाग, चकचकीत गाड्या, सुंदर ललना आणि महाभयंकर खलनायक असा एक फिल्मी उथळपणा त्यात आला आहे.
‘लपंडाव मृत्यूशी’ या साचेबंदपणापासून फारच दूर आहे. हेरगिरीतील आणि एकूणच आंतरराष्ट्रीय संबंधांतील सर्व करडेपणा, त्यातील भ्रष्टाचार, क्रौर्य, भावनांचा खेळ हे सर्व घेऊन ही कादंबरी आपल्यासमोर येते. अत्यंत ग्लॅमरस, फिल्मी चकचकीतपणा असलेले हे विश्व नेमकं कसं असतं, याचं भान या कादंबरीतून जागं होतं. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे ही या कादंबरीचा नायक हा प्रत्यक्षातील हेर आहे. आणि तो जेम्स बॉण्ड नाही. हेरगिरीचा भाष्यकार म्हणता येईल, अशा जॉन ल कार या कादंबरीकाराच्या जॉर्ज स्माईलीच्या जातकुळीशी त्याचे नाते आहे.
त्याचं नाव अलेक्सेई मिखाईलोविच कझ्लोव. केजीबी या रशियन गुप्तचरसंस्थेचा तो हेर. जर्मन, इंग्लिश, फ्रेंच, इटालियन, डच अशा विविध भाषांवर त्याचं प्रभुत्व होतं. १९५९ साली तो केजीबीत दाखल झाला. ‘इल्लिगल इंटेलिजन्स ऑफिसर’ हे त्याचे पद. येथे इल्लिगल म्हणजे बेकायदेशीरच, पण वेगळ्या अर्थानं. ते असतात ‘डीप कव्हर एजंट’. दुसऱ्या देशात, भलतीच ओळख घेऊन ते वावरत असतात. ते त्या देशाचे नागरिक बनतात. लग्न वगैरे करून स्थायिक होतात. तेथे स्वतःचा परिवार तयार करतात. आणि गोपनीय कारवाया करतात ते मात्र रशियासाठी. एरवी गुप्तचरांना परदेशातील दुतावासात एखादं वेगळंच अधिकारपद देऊन पाठवलेलं असतं. त्या पडद्याआडून ते गोपनीय कारवाया करत असतात. त्यांना तसं कोणतंही अधिकृत ‘कव्हर’ नसतं. म्हणून ते ‘इल्लिगल’. तर कझ्लोव्ह हा असा ‘डीप कव्हर एजंट’ होता.
ऑटो श्मिड हे नाव धारण करून तो पश्चिम जर्मनीचा नागरिक बनला होता. बर्लिनमध्ये राहायचा. आधुनिक धुलाई यंत्रांचा फिरता विक्रेता हा त्याचा व्यवसाय. त्यानिमित्तानं तो विविध देशांत फिरायचा. अर्थात तो फक्त दिखावा. केजीबीला हवी असलेली गोपनीय माहिती मिळवणं हे त्याचं काम. अशाच एका मोहिमेवर तो दक्षिण आफ्रिकेत जातो. त्यात जे घडतं ते सारं ही कादंबरी सांगते. हा हेर खरा, त्याचं जीवनचरित्र खरं, ती मोहीम खरी, त्यावरच ही कादंबरी आधारलेली आहे. पण म्हणून ती जसं घडलं अगदी तसंच मांडणारी कादंबरी नाही.
मुळात कादंबरी या वाङ्मय प्रकाराचीच ती मर्यादा आहे. तिचा विषय कोणताही असो, ती चरित्रात्मक असो वा घटनाकेंद्री, तिच्यात लेखकाच्या कल्पनेच्या भराऱ्या असतातच. ते लेखकाचं कलात्मक स्वातंत्र्य असतं. एरवी लेखक दोन पात्रांतील संवाद कसं लिहिणार? कल्पनेच्या भराऱ्या लावूनच लेखक वाचकासमोर इतिहासाचा - झालं ते असंच झालं याचा - आभास निर्माण करत असतो. काहींच्या कल्पनेला असलेले वास्तवाचे पंख बळकट असतात, काहींचे तकलादू. काहींनी कलात्मक स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील फरकच कळत नाही. सत्य घटनांवर आधारित असलेल्या कादंबऱ्या, खासकरून ऐतिहासिक कादंबऱ्या वाचताना वाचकानं हे लक्षात घ्यायचं असतं की, तो अस्सल इतिहास नसतो. इतिहासाशी, त्यातील व्यक्तींशी, घटनांशी शक्यतो प्रामाणिक राहून त्याला कल्पिताची जोड देऊन मांडलेली ती खरीखरी वाटणारी कहाणी असते. कल्झोवच्या हेरगिरी कारकिर्दीतील एका प्रकरणावर आधारलेली ही कादंबरी अशीच वास्तव आणि कल्पना यांची वास्तवाच्या अधिकाधिक जवळ जाणारी सरमिसळ आहे.
अलेक्सेई कझ्लोव हा ऑटो श्मिड नावाचा जर्मन विक्रेता बनून दक्षिण आफ्रिकेत गेला होता, तो एका खास कामगिरीवर. वर्णद्वेषी दक्षिण आफ्रिका आणि तिची वसाहत असलेल्या नामिबियातील अण्वस्त्रनिर्मितीविषयीची गोपनीय माहिती मिळवण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती. त्याकरता झांबिया, बोत्सवाना, मालावी, नामिबिया आणि अर्थातच दक्षिण आफ्रिकेत तो अनेकदा गेला होता. अशाच एका दौऱ्यात मालावीमध्ये त्याला अगदी अपघातानंच दक्षिण आफ्रिकेने केलेल्या अणुस्फोट चाचणीविषयीची माहिती मिळते. ब्लांतायरमधील एका खास श्वेतवर्णीयांसाठीच्या एका क्लबमध्ये तो बसला होता, सोबत तेथे स्थायिक झालेले काही श्वेतवर्णीय लोक होते. गप्पांमध्ये ‘सहजच’ दक्षिण आफ्रिकेत झालेल्या स्फोटाचा विषय निघाला. टेबलावरील काहींच्या मते तो अणुस्फोट नव्हता. ते ऐकून तेथे बसलेल्या एका मद्यधुंद वृद्धेनं तोंड उघडलं. १९७६च्या डिसेंबरमध्येच काही इस्रायलींच्या मदतीनं अणुस्फोट चाचणी करण्यात आल्याचं तिने सांगितलं. ती महिला होती दक्षिण आफ्रिकेच्या पेलेन्दबा येथील अणुसंशोधन प्रयोगशाळेच्या महासंचालकांची निवृत्त सचिव. ‘सोव्हिएत हेरसंस्थांचे कथाकार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निकोलाय डोल्गोपोलोव हे कझ्लोव यांचे परिचित. त्यांच्याशी बोलून लिहिलेल्या लेखात डोल्गोपोलोव यांनी ही माहिती दिलेली आहे. रशियातील ‘इझ्वेस्तिया’ या दैनिकास डिसेंबर २००९मध्ये दिलेल्या मुलाखतीत कझ्लोव यांनीही हेच सांगितलेलं आहे.
कादंबरीत मात्र ही घटना वेगळ्याच प्रकारे अवतरते. हीच बाब कझ्लोव यांना झालेल्या अटकेची. रशियातील त्यांच्याच एका सहकारी गुप्तचरानं - अल्येग गार्दियेवस्की याने - केलेल्या फितुरीमुळे कझ्लोव यांचं बिंग फुटतं. दक्षिण आफ्रिकेच्या ‘काऊंटरइंटेलिजन्स’ - हेरगिरीविरोधी - पथकानं त्यांना अटक केली. दक्षिण आफ्रिकेत बराच काळ वावरल्यानंतर कझ्लोव यांना ही अटक झाल्याचं कादंबरी सांगते. स्वतः कझ्लोव मात्र वेगळीच माहिती देतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, ते नामिबियात असतानाच त्यांच्यावर पाळत ठेवणं सुरू झालं होतं. तेव्हा तेथून ते जोहान्सबर्गला पळाले. पण विमानातून उतरताक्षणी त्यांना अटक करण्यात आली.
कादंबरीतील वास्तव आणि प्रत्यक्षातील घटना यांच्यात अशा काही ठिकाणी विसंगती आहे. ते कादंबरीकारानं घेतलेलं स्वातंत्र्य आहे. जोवर आम्ही कादंबरीतून इतिहास मांडत आहोत आणि आम्ही सांगतो तोच खरा इतिहास आहे, अशी भूमिका कादंबरीकार घेत नाही, तोवर त्याच्या कलात्मक स्वातंत्र्यास आक्षेप घेण्याचं कारण नाही.
या कादंबरीत कोठेही मारिया अरबातवा, शुमित दत्त गुप्ता वा अनुवादक अनघा भट यांनी कोणीही तसा दावा केलेला नाही. अशा वेळी जे कल्पित प्रसंग रचण्यात आलेले आहेत, त्यांचं नेमकं प्रयोजन काय आहे आणि ते प्रसंग कादंबरीच्या मूळ आशयाला पूर्णतः छेद तर देत नाहीत ना, हे पाहावं लागेल. कादंबरी वाचताना लक्षात येतं, की या आणि अशा प्रकारच्या सर्व प्रसंगांतून, घटनांतून कादंबरीकार आपल्यासमोर त्या-त्या देश-कालातील संस्कृतीचा आणि अर्थाच हेरगिरीचा एक मोठा पट मांडू पाहत आहेत. त्याकरता आवश्यक तिथं ते स्वातंत्र्य घेत आहेत. ‘लपंडाव मृत्यूशी’चं एक वैशिष्ट्य म्हणून याची नोंद करता येईल.
‘एक होता हेर आणि त्याने शत्रूच्या देशात जाऊन हवी ती माहिती मिळवली आणि मग त्याला अटक झाली’, एवढ्यापुरतीच ही कादंबरी नाही. आफ्रिका हा या कादंबरीचा भौगोलिक पट. त्या पार्श्वभूमीवर कादंबरीतील घटना घडतात. त्या घटनांच्या आणि संवादांच्या ओघात ती आपणांस इतिहास आणि भूगोलाचं दर्शन तर घडवतेच, परंतु त्याबरोबरच त्या-त्या भागाची संस्कृती, समाजजीवन यांवरही भाष्य करते. ती आंतरराष्ट्रीय राजकारणातील करडेपणा, त्यातील ताणे-बाणे आपणांस उलगडून दाखवतेच, त्याचबरोबर मानवी भावभावनांचे खेळही मांडते. कादंबरीत ठिकठिकाणी येणारी ही सारी वर्णनं, संवादांतून दिली जाणारी माहिती अनेकदा थकवते वाचकाला. इतकं काही सांगण्याची खरोखरच गरज होती का असं वाटून जातं. मात्र कादंबरी वाचल्यानंतर जाणवतं की, ही वर्णनं वा माहिती केवळ माहिती देण्यासाठी म्हणून आलेली नाहीत. ती ‘पानपूरक’ नाहीत. त्यांमागे विशिष्ट हेतू आहे, गरज आहे.
कादंबरी वाचनास सुरुवात करतानाच हे लक्षात घ्यायला हवं की, ही काही जेम्स बॉण्ड पठडीतील हेराची कहाणी नाही. कझ्लोव हा ‘डीप कव्हर एजंट’ आहे. एका परक्या देशाचा नागरिक म्हणून तो वावरतो आहे. तसं विशिष्ट कायदेशीर प्रक्रियेनं नागरिकत्व स्वीकारता येतं, परंतु कझ्लोव्ह पश्चिम जर्मनीचा ‘जन्मानं नागरिक’ बनलेला आहे. एक वेगळंच व्यक्तिमत्व त्यानं अंगिकारलं आहे. ही साधी बाब नव्हे. व्यक्तिमत्व ही जन्मापासून तयार होत जाणारी बाब असते. माता-पिता, अन्य नातेवाईक, समाज, त्यांची संस्कृती, धार्मिक परंपरा, इतिहास, भवताल या सगळ्यातून त्याचं व्यक्तिमत्त्व साकारत असतं. ते बदलणं ही सोपी बाब नव्हे. पुन्हा कझ्लोवने फिरत्या विक्रेत्याची भूमिका घेतलेली आहे. त्याने दुर्मीळ टपाल तिकिटं जमा करण्याचा छंद जोपासला आहे. याच्या गरजा वेगळ्या आहेत. त्यासाठी कोणते कष्ट घ्यावे लागतात, स्वतःला कसं घडवावं लागतं हे त्याच्या गप्पांतून, तो त्या-त्या प्रसंगांना कशा प्रकारे सामोरा जातो, हे सांगण्याचं काम ती माहिती, ती वर्णनं करत आहेत.
कझ्लोव हा गुप्तचर खरा, पण एक माणूस म्हणून समोर येतो तो यातून. आधीच्या प्रकरणांत ज्या वर्णनांच्या वा माहितीच्या प्रयोजनाविषयी शंका येतात तिचे, नंतर जेव्हा ऑटो श्मिड हा जर्मन नागरिक नसून रशियाचा हेर आहे, अलेक्झेई कझ्लोव आहे, हे आपणांस समजतं तेव्हा अचानक महत्त्व लक्षात येतं.
हेरगिरीविश्वाविषयी ज्यांना खरोखरच अस्सल काही जाणून घ्यायचं आहे, हेरगिरीविषयीचे मनातील गैरसमज दूर करायचे आहेत, त्यांच्यासाठी ही कादंबरी म्हणजे ‘गाईड’च. आज हेरगिरी या विषयाला वाहिलेली पुस्तकं काही प्रमाणात आणि चित्रपट मोठ्या प्रमाणावर बाजारात येत असताना, हे विश्व आतून समजून सांगणारी आणि त्यातही मूळ रशियन असलेली ही कादंबरी अनघा भट यांनी मराठीत आणली. त्याबद्दल त्यांचे आभारच मानावयास हवेत. गुप्तचरांविषयी भारतात उपलब्ध असलेले बहुतांश साहित्य हे पाश्चात्य दृष्टिकोनातून लिहिलेलं आहे. त्यातही ते खासकरून अमेरिकन आहे. ही कादंबरी हा काही प्रमाणात त्यावरील उतारा निश्चित ठरेल, यात शंका नाही.
‘लपंडाव मृत्यूशी’ - मारिया अरबातवा आणि शुमित दत्त गुप्ता,
अनुवाद - अनघा भट
प्रकाशक - कलासक्त, पुणे
मूल्य - ४५० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment