‘दगडावर दगड... विटेवर वीट’ : स्वतःच्या आयुष्यातल्या आठवणी सांगण्याच्या निमित्तानं काहीही भरताड वाचकांच्या माथी मारणाऱ्यांनी ‘दगडावर दगड, विटेवर वीट’ रचून किती चिरेबंदी इमारत बांधता येते, ते एकदा डोळ्याखालून घालावं
पडघम - साहित्यिक
सुबोध जावडेकर
  • नंदा खरे आणि ‘दगडावर दगड... विटेवर वीट’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Sat , 23 July 2022
  • पडघम साहित्यिक नंदा खरे Nanda Khate

मराठीतील विचक्षण कादंबरीकार, अनुवादक आणि संपादक नंदा खरे यांचं काल, २२ जुलै २०२२ रोजी पुण्यात वयाच्या ७६व्या वर्षी दीर्घ आजारानं निधन झालं. त्यांच्या ‘दगडावर दगड... विटेवर वीट’ या आगळ्यावेगळ्या पुस्तकाचा परिचय करून देणारा हा पुर्नमुद्रित लेख... हा लेख पहिल्यांदा मुंबई साहित्य संघाच्या ‘साहित्य’ या त्रैमासिकात २००३ साली प्रकाशित झाला होता. या पुस्तकाची पहिली आवृत्ती ग्रंथालीने प्रकाशित केली होती, नवी आवृत्ती मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केली आहे...

.................................................................................................................................................................

गेल्या वर्षी एक वेगळेच पुस्तक माझ्या वाचनात आलं. वेगळं अशासाठी म्हणायचं की, कादंबरी, आत्मचरित्र, ललितनिबंध, माहितीपर लेखन अशा कुठल्याच एका वाङ्मय प्रकारात त्याला बसवता येणार नाही. पुस्तकाचा लेखक नंदा खरे हा बांधकाम व्यवसायात आहे. सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट घेणाऱ्या म्हणजेच ठेकेदारी करणाऱ्या कंपनीत आयुष्याचा मोठा भाग त्यानं काढलेला आहे. पूल बांधणे, धरणे बांधणे, अशा स्वरूपाची कामं त्याची कंपनी ठेकेदारीनं करते. या व्यवसायातले आपले अनुभव तो इथं सांगतोय.

एका सिव्हिल इंजिनियरनं केलेलं हे लिखाण असलं तरी अशा स्वरूपाच्या लिखाणाला बहुतेक वेळेला येणारा तो विशिष्ट वास याला अजिबात येत नाही. एका संवेदनशील माणसानं आपल्या व्यवसायाच्या संदर्भात केलेलं मुक्तचिंतन असं त्याचं स्वरूप आहे. पण मुक्त याचा अर्थ आकृतीबंध, शैली यांची रूढ बंधनं झुगारून देऊन. मुक्त म्हणजे भरकटलेलं नाही. उलट सव्वाशे पानाचं हे पुस्तक इतकं सघन आहे, संपृक्त - कॉन्सन्ट्रेटेड - आहे की, आत्मचरित्राच्या नावानं ऐसपैस, गलथान लिखाण करणाऱ्यांनी या लेखकाकडून चार धडे घ्यावेत. स्वतःच्या आयुष्यातल्या आठवणी सांगण्याच्या निमित्तानं काहीही भरताड वाचकांच्या माथी मारणाऱ्यांनी ‘दगडावर दगड, विटेवर वीट’ रचून किती चिरेबंदी इमारत बांधता येते, ते एकदा डोळ्याखालून घालावं, असं वाटून जातं.

हे आत्मनिवेदन असलं तरी त्यात कुठं कणभरही आत्मसमर्थन नाही, उलट कठोर आत्मपरीक्षण आहे. ललितलेखन असलं तरी भाबडं स्मरणरंजन किंवा भावुकपणा औषधालाही नाही. विषयाच्या ओघानं काही माहिती आली तरी त्यामागं स्वतःचं ज्ञान दाखवण्याची हौस नाही.

इतकं प्रवाही, निखळ पारदर्शक, अंतरंगाला भिडणारं आणि विचार करायला लावणारं लिखाण फार क्वचित पाहण्यात येतं.

पुस्तकाच्या सुरुवातीला एक प्रसंग आहे. एखाद्या गायकानं सुरुवातीचा षड्ज असा दमदार लावावा की, सगळ्या मैफलीच चित्र श्रोत्यांपुढे उभं रहावं, तसं झालं आहे. लेखकाची संवेदनशीलता, अनुभव टिपायची आणि शब्दांतून व्यक्त करायची ताकद आणि केवळ भारताच्याच नव्हे, तर जगाच्या संदर्भात विचार करायची क्षमता याचं दर्शन घडवणारा हा प्रसंग आहे..

लेखकाच्या देखरेखीखाली पहिलीच स्लॅब पडत होती. एक बारा-चौदा वर्षांची मुलगी काँक्रिटची घमेली वाहताना पळत पळत थट्टा-मस्करी करत हसत होती. विटकरी रंगाची साडी, तसलेच पोलके. तेलुगु लोकांच्या तुलनेत उजळ वर्ण. चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह. निष्कारण आरडाओरडा करत, हसत काम करत होती. इतर अनुभवी बायकांच्या संथ, शांत हालचालींच्या पार्श्वभूमीवर ही आयुष्यात पहिलीच स्लॅब करतेय, हे लगेच लक्षात येत होतं. पण काँक्रिटची घमेली घेऊन पळणं इतकं कष्टाचं असतं की, सवय असणाऱ्यांचासुद्धा घामटा निघतो. पंचवीस किलो वजन सांभाळून घेऊन सहा-सात किलोमीटर पळणं म्हणजे खायचं काम नाही.

लेखक लिहितो, “पंधरा-वीस मिनिटं झाली आणि त्या मुलीचा आवाज बंद झाला. थट्टा संपली. चेहरा घामानं डंबरला. माझ्या डोळ्यादेखत त्या मुलीचं बालपण संपत होतं. सिमेंटचे डाग, घाम, थकवा यानं चेहरा रंगत होता. ठेकेदाराचा ‘ए प्पोरी! ए प्पोरी! ए प्पोरी’ हा ओरडा त्या पोरीला घाण्याच्या बैलाला फिरवावं, तसा फिरवत होता. आनंद, थकवा, फरपट, हतबलता. झपझप चेहऱ्यावरचे भाव बदलत ती मुलगी तासाभरात प्रौढ झाली. कळी उमलताना टाइमइलेप्स तंत्र वापरून मिनिटाभरात पाकळ्या कोमेजताना दाखवतात तसं झालं. कामाच्या रेट्याखाली सव्वा तासात ती कळी कोमेजून गेली.”

लेखकाच्या डोळ्यासमोर घडलेला हा प्रसंग. त्याच्या अनुषंगान मनात येणारे विचार लेखक नोंदवतो. त्यातून कामगारांबद्दलची खरीखुरी कळकळ, समोरच्या प्रश्नांची सखोल जाण आणि बौद्धिक झेप, या सगळ्याचं दर्शन घडतं. पहिल्या ‘सा’मध्येच गायकानं मैफलीचा ताबा घेतला आहे, हे जाणवतं.

स्लॅब टाकताना भारतीय मजुरांना छाती फुटेपर्यंत धावून घमेली वाहावी लागतात. यात स्त्री मजुरांचे फार हाल होतात. याबद्दल केवळ हळहळ व्यक्त करून लेखक थांबत नाही. त्यावर काय उपाय करता येईल याचाही विचार करतो. घमेली वाहण्याला पर्याय काय? परदेशात हातगाड्या वापरून काम करतात. पण हातगाडी ढकलून भारतीय पुरुषसुद्धा चटकन दमतात. बायका तर हातगाडी ढकलूच शकणार नाहीत. मग बायकांना कामच मिळणार नाही. तेव्हा घमेली वाहण्यासारखं कष्टाचं काम बायकांकडून करून घ्यायचं की, त्यांना उपाशी राहू द्यायचं, असा खरा प्रश्न आहे.

हाच पेच बालमजुरांच्या बाबतीतही लेखकापुढे उभा राहतो. ‘बारा-पंधरा वर्षांच्या पोरापोरींना कशाला कामाला लावतोस?’ असं त्याच्या स्लॅबसाठी मजुर पुरवणाऱ्या ठेकेदाराला तो खडसावतो. पण ठेकेदारानं दिलेलं उत्तर ऐकल्यावर मात्र चूप होतो. तो ठेकेदार आपल्या हैदराबादी भाषेत म्हणतो-

“वो सोब रिस्तेदारही है मेरे साब, पाच आदमी के घर मे मरदका तीन रुपिया, औरत का दो रुपिया बोले तो सोबको एकेक रपिया आता। पोट्टे घर का काम तो करतेच। ईदर काम पे आया तो एकेक रुपिया तो कमाता। ये पोट्टीयोंका पैसा मैं उनके माबपको नै देता। बस शादी के लिये रकता मई। पोट्टिया अपना दहेज कमाती तो ढंग के पोट्टे मिलते साब। नहीं तो दहेज के लिये क्या मिलता, साब? क्या बचता?”

लेखक काय बोलणार? तो लिहितो, “आपण ह्या प्रश्नाला उत्तर नाही देऊ शकत. ना पोरांपर्यंत शिक्षण पोचवू शकत, भर कामाची हमी देऊ शकत. काय अधिकार आहे आपल्याला पाश्चात्य मानवतावादाच्या आधारे पोरांना कामाला लावणाऱ्या ठेकेदारावार ओरडण्याचा?”

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

पाश्चात्य तंत्रज्ञानानाचा आपण डोळे झाकून जो स्वीकार करतो, त्यावर लेखक अनेकदा कडाडून टीका करतो. ही टीका फक्त फॅशन म्हणून केलेली नाही. त्या मागं लेखकाचं इतक्या वर्षांचं चिंतन आणि स्वतंत्र बुद्धीनं केलेला विचार आहे. तथाकथित जुनाट तंत्रज्ञान वापरून आपण जेव्हा खाणीतून दगड काढतो, तेव्हा त्या कामाची गती कमी असेल कदाचित, पण आपण हजार हातांना काम देत असतो. अमेरिकन तंत्रज्ञान वापरून प्रचंड वेगानं खाणीतून दगड काढता येतो, पण प्रचंड खर्च करून. शिवाय त्यामुळे हजारातल्या नऊशे नव्वद जणांना आपण बेकार बनवत असतो. तेव्हा कोणतं तंत्रज्ञान वापरायचं? लेखक भराभर आकडेवारीच सादर करतो आणि तीही आपल्याला समजेल अशा भाषेत. तेव्हा मग अमेरिकन तंत्रज्ञान खरोखरच आपल्या तथाकथित जुनाट तंत्रज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे का, भारतात ते वापरणं इष्ट आहे का, याचा आपण अंतर्मुख होऊन विचार करायला लागतो.

ठेकेदारी हा एक बदनाम व्यवसाय आहे. ठेकेदार नेहमीच मजुरांची पिळवणूक करून, सरकारी अधिकाऱ्यांना लाच चारून, कमी प्रतीचा माल वापरून गबर होतात, असा सार्वत्रिक समज आहे. लेखक लिहितो, “एक गंमत पहा. एखाद्या डॉक्टरकडून चूक होते, रोगी दगावतो किंवा कधी जन्माचा जायबंदी होतो. अशा वेळी, बहुतेक वेळा लोकांची प्रतिक्रिया असते, डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली, रोग्याच्या आयुष्याची दोरीच तुटली, त्याला काय करणार? वकील केस हरतात, ते जज्ज विक्षिप्त म्हणून, शिक्षकांचे पूर्ण वर्ग नापास होतात ते विद्यार्थ्यांनी अभ्यास केला नाही म्हणून, पण बांधकाम-अपघात मात्र निरपवादपणे भ्रष्टाचारामुळेच होतात, असं आपण धरून चालतो.”

किती खरं आहे हे निरीक्षण!

अपघात होण्यासारखी परिस्थिती निर्माण होऊनसुद्धा जिवापाड धडपड करून दुर्घटना घडू न दिल्याच्या कितीतरी हकीगती लेखक सांगतो. बांधकामात चूक होऊ नये म्हणून डोळ्यात तेल घालून काळजी घेणाऱ्या इंजिनियर्सच्या, रात्री-बेरात्री जागून, पावसा-पाण्याची पर्वा न करता अपघात टाळण्याची शर्थ करणाऱ्या सुपरवायजर्सच्या, कामगारांच्या कथा पुस्तकात ओघाने येतात. लेखक म्हणतो, “तात्पर्य काय, ठेकेदारांनाही कामाच्या जबाबदारीची जाणीव असतेच. उगीच कुणी लहान-थोर अपघात झाल्यावर ‘भ्रष्टाचार – भ्रष्टाचार’ म्हणून बोंबलू नये. बांधकामातल्या अपघातामध्ये माणसं मरू शकतात. छान नाट्यमय फोटो काढण्यासारखी परिस्थिती येऊ शकते. पण त्यात कधी चुकांचा, कधी निसर्गाचा हात असतो. कधी कधी बदमाशीही असते, नाही असं नाही - पण तशी ती कोणत्या पेशात नसते? आणि बदमाशी, भ्रष्टाचार हे बहुधा जिवाशी खेळ करून केले जात नाहीत - त्याहून सोप्या आणि सुरक्षित पद्धती असतात. शंका असल्यास हर्षद मेहताला विचारा.”

या जळजळीत उदगारामागे लेखकाचा बांधकाम खात्यातला तीस वर्षांचा अनुभव उभा आहे. आणि फारशी माहिती नसताना केलेल्या उथळ शेरेमारीबद्दलचा इतकी वर्षं मनात साठून राहिलेला रागही.

टेंडर भरायची सध्याची पद्धत, त्यातलं नाट्य आणि थरार. कधी कधी त्यातन अभावितपणे होणारे विनोद यावरचं प्रकरण भलतंच रंगतदार झालं आहे. कमीत कमी रकमेचं टेंडर पास होणं, ही गोष्ट वरवर पाहता न्याय्य आणि समाजाच्या आणि देशाच्या दृष्टीनं हितकारक दिसत असली तरी कधीकधी ती कशी घातक ठरते, तेही दाखवून दिलं आहे. हे दोष दूर करायचे जे उपाय सुचवले आहेत, ते प्रत्येकानं जरूर नजरेखालून घातले पाहिजेत.

पुढे एका ठिकाणी लेखक म्हणतो, “आजही बांधकामाची शासकीय बजेटे सपासप कमी-जास्त करण्यातला सामाजिक अन्याय कुणालाही, कुणालाही, कुणालाही जाणवत नाही.” या वाक्यातला ‘कुणालाही’ हा शब्द तीनदा येण्यामागची चीड, निराशा, हतबलता कुणालाही अस्वस्थ करेल (खरंच करेल?). ‘नटसम्राट’ नाटकात एक प्रसिद्ध स्वगत आहे. त्यात ‘तर’ हा शब्द एकापाठोपाठ तीनदा आला आहे. यशवंत दत्त हा ‘तर’ तीन वेगवेगळ्या वजनानं उच्चारून त्याच्या तीन वेगवेगळ्या अर्थछटा दाखवत असत. लेखकाच्या या तीन ‘कुणालाही’ मागे अशाच तीन वेगवेगळ्या अर्थछटा आहेत. जरा विचार केला तर त्या जाणवतात.

अनुभव सांगण्याच्या निमित्तानं लेखक जगण्याच्या संदर्भात जागोजाग जे भाष्य करतो, ते सुजाण वाचकांना अस्वस्थ करणारं आहे. उदाहरणार्थ लेखक एके ठिकाणी म्हणतो, “जीन्स नावाच्या जैवरसायनांची तगून रहायची धडपड त्यांच्या माणसे नावाच्या ‘आवरणांना’ चित्रविचित्र गोष्टी करायला लावते, हेच ‘अंतिम सत्य’!” साहजिकच इथं आपल्या मनात प्रश्न उभा राहतो, माणूस हा स्वतंत्र व्यक्तिमत्व असलेला, विचार करू शकणारा प्राणी आहे की, फक्त जीन्स पुढच्या पिढीत वाहून नेणारा वाहक आहे?

नोकरीनिमित्तानं बायकांपासून दूर रहावं लागत असल्यामुळे सेक्सच्या संदर्भातले अनेक प्रश्न उपस्थित होणं क्रमप्राप्त आहे. अशा हकीगतींवर, अनुभवांवर, किश्शांवर एक स्वतंत्र प्रकरणच आहे. पण त्याचा विशेष म्हणजे त्यात नैतिकतेचा कुठलाही आव आणलेला नाही की, खोटाखोटा भावुकपणाही नाही. दर कामाच्या ठिकाणी नवीन बाई ठेवून स्वतःबरोबर साहेबाचीही सोय बघणारा आणि बायकोला मात्र गावी ‘पवित्र’ ठेवणारा शर्मा, बायको भाजल्यावर रडत-ओरडत नीट औषधोपचार झाले नाहीत म्हणून लेखकावर आरोप करणारा आणि ती मेल्यावर लगेचच दुसरं लग्न करणारा कोमरैया, मादीपणाशिवाय दुसरं काहीच नसलेल्या बाईशी संबंध ठेवून पत्नी मेल्यावर तिच्याशी लग्न करणारे सुसंस्कृत माजी स्वातंत्र्यसैनिक, अशा कितीतरी लोकांच्या हकीगती मॅटर-ऑफ-फॅक्टली पुस्तकात येऊन जातात.

बांधकामांवर या गोष्टी होतात. त्या फारशा मनावर घेतल्या जात नाहीत. ‘होता हैं ऐसा’ म्हणून सोडून दिल्या जातात. फारसा नैतिक ऊहापोह केला जात नाही. हीच वृत्ती तंदुरुस्त, मंदुरुस्त आहे (‘मनदुरुस्त’ या नव्या शब्दाची नोंद घ्यावी) हे नोंदवून लेखक विचारतो, “पण भविष्यात कामावर स्त्री-इंजिनियर, स्त्री-अधिकारी दिसायला लागले, तर ही वृत्ती टिकेल का?” शेवटी काढलेला निष्कर्ष तर फार भेदक आहे. लेखक म्हणतो, “खूप एकटेपणाने नजर बदलते. मग ती मंगळवाडीची साइट असो की, बांद्रा बँड स्टँड! माणसे बहुतेक सारखीच असतात - अंधारात तर हुबेहूब एकसारखी!”

लेखकाच्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीच्या खुणा या पुस्तकात जागोजाग दिसतात. पेशाने इंजिनियर असल्यामुळे त्याला प्रत्येक गोष्टीचं गणित मांडायची आणि पुरावा द्यायची हौस आहे, हेही लक्षात येतं. पण तरी हे पुस्तक म्हणजे काही बांधकाम खात्यातले कोरडे अनुभव आणि त्यावरचं भाष्य यानं भरलेलं नाही. भोवतालच्या निसर्गाची रसिक मनानं टिपलेली चित्रेही भरपूर आहेत.

रुक्ष वाटणाऱ्या कॅम्प साइटसवरून कधी कधी निसर्गाचे चमत्कार बघायला मिळतात. कधी हातभर लांबीचा झळझळीत धूमकेतू दिसतो, तर कधी क्षितिजावरून चालून येणारी काळ्या ढगांची प्रचंड भिंत दिसते. संध्याकाळचं एक वर्णन पहा, “संध्याकाळी ढगांनी सूर्यकिरण फाडले जायचे, लहान पोरांच्या चित्रामध्ये असतात तसे. आणि पूर्वेकडे पाहिलं की, भास व्हायचा की, तिकडेही एक काळा सूर्य आहे. उजेडाच्या फरकाट्यामध्ये अंधाराचे फरकाटे मारणारा. एखाद्या संत्र्याच्या मध्यावरून फोडी दिसाव्यात तसे रचलेले हे किरण. जरा गावाशहरांपासून दूर गेलं की, अशा मजा दिसतात. मागून साली संकृती येते!”

यातलं शेवटचं ‘मागून साली संकृती येते’ हा खास नंदा खरे टच!

कामाच्या निमित्तानं रहावं लागायची ती ठिकाणं लोकवस्तीपासून दूर असत. त्यामुळे विंचू-साप हे नित्याचे. पावलीएवढाली पिलं पाठीवर घेऊन निघालेली विंचविण, छतातून टपटप पडणारे बचकीएवढाले केसाळ कोळी, फूटभर लांबीची पिवळ्या-काळ्या रंगाच्या घोणी, यांच्या सोबतीनं कॅम्पवर जगावं लागे. किटकिडा नावाचा एक चिंचोक्याएवढा कीटक इतका जोरानं आवाज करतो की, त्याच्यापाशी आलेली कुत्रीसुद्धा दचकून उडी मारून फूटभर मार्ग जातात. फुटबॉल एवढ्या आकाराच्या एका बेडकानं चक्क लहान सापाला खाताना एकदा लेखकाला पहायला मिळालं. एक शिंग गुढग्याजवळच्या कातडीत घुसवून अमानुष पद्धतीनं जखडलेली एक हरणी एक पारधी विकायला घेऊन आला होता. एकदा याला सातआठ फूट लांबीच्या पट्टेदार वाघानं अगदी अगदी जवळून दर्शन दिलं होतं. त्यावरची त्याची कॉमेन्ट अशी- “मजा येते. ह्या प्रसंगाची टेप मनातल्या मनात रीवाईंड करायला.”

कॅम्प लाइफचं चित्रण अगदी मोजक्या शब्दांत, पण पुरेशा ताकदीनं आलं आहे. सकाळचा चहा, तिथलं दिव्य जेवण, करमणूक, खेळ, त्या आयुष्यातले ताणतणाव, लहानसहान गोष्टींवरून अधूनमधून होणारी भांडणं, सगळं छान आलं आहे. विशेषतः इंजिनियर्सच्या बायकांच्या होणाऱ्या ओढाताणीचं चित्र मनाला भिडतं. या असल्या आयुष्याच्या रेट्यात दुसरं काही- म्हणजे समाजकार्य, नोकरी, कलेची साधना वगैरे-करायला सवडच नसते. अशा बायकांविषयी तुच्छतेनं बोलणाऱ्या एका स्त्रीमुक्तीवादी विदुषीला मारलेला टोला झकासच आहे. कॅम्पवर चीफ इंजिनियरलाच त्या कामगारांचा पाटील, मुखिया मानलं जातं. या नात्यानं हाताखालच्या कामगारांना वागवताना, त्यांचा न्यायनिवाडा करताना आपल्या हातून काही चूक तर नाही झाली, या विचारानं स्वतःचा वारंवार घेतलेला धांडोळा लेखकाच्या वृत्तीबद्दल बरंच काही सांगून जातो.

नंदा खरेची स्वतःची वेगळी शैली आहे. अलिप्तपणे अनुभव नोंदवून नंतर त्यावर मिस्कील टिप्पणी करत जाण्याची. उदाहरणार्थ एके ठिकाणी स्वतःची चूक अप्रत्यक्षपणे नोंदवल्यावर पाठोपाठ कंसात कॉमेन्ट येते – “स्वतःच्या चुका अशा पुसटपणेच कबूल कराव्या!” कामं मिळवायला धडपडणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर्सना लेखक ‘कामातुर कॉन्ट्रॅक्टर्स’ म्हणतो. एका खेड्यातला एक बीएएमएस डॉक्टर पार्टटाइम सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट घेत असे. त्याला ‘सिव्हिल सर्जन’ नाव ठेवलं जातं.

सात ठिपक्याचं किरडू चावलं तर लहान पोर मरू शकतं, असं कामावरचे लोक त्याला सांगतात. हे सात ठिपक्याचं प्रकरण काय आहे, याचा याला शेवटपर्यत पत्ता लागत नाही. पण त्या रात्री कोळ्यासारखा एक केसाळ प्राणी जेव्हा टपकन जेवायच्या टेबलावर पडतो, तेव्हा लेखक तिथून उठून मेसमध्ये जाऊन बसतो. त्यावरची लेखकाची मल्लीनाथी अशी : “तिथं सुरक्षित असतं म्हणून नव्हे, तर काही चावलंच तर ठिपके मोजायला तरी कोणी सोबतीला असावं म्हणून!”

तरुण असताना आणि कामानं पिट्टा पडला की, कशी प्रचंड भुक लागते ते लिहिताना लेखक लिहितो, “भूक लागली होती, तेवीस वर्षांची आणि भरपूर काम केलेल्या दिवसाची!” हैदराबादी ढंगाच्या ‘अईसा उदरकु जानेका । बाये जाव नक्कोच नक्को ।सिदे हात जाव।’ अशा थाटातल्या हिंदीबद्दल बोलताना म्हणतो, “ही मेहमूदने शिकवलेली आणि पुढे शाम बेनेगलने प्रतिष्ठा दिलेली भाषा”.

ज्या बारकाव्यानं लेखक बांधकाम व्यवसायाचं चित्र वाचकांच्या डोळ्यासमोर उभं करतो, तो पाहाण्यासारखं आहे. त्यात कधी दोन बायकांचा दादला असलेल्या लोहाराची गोष्ट येते, आठवड्यातले सहा दिवस त्याच्या अंगठ्याखाली राहून सुट्टीच्या दिवशी दारू पिऊन त्याला बडवणाऱ्या त्याच्या बायका भेटतात. कधी माणसं शोधायला पुण्याला आलेला कामगाराची हकीगत लेखक सांगतो. पुण्याला त्याच्याकडचे पैसे चोरीला जातात. पत्र पाठवावं, तार करावी असं काही त्याला सुचत नाही. बिचारा सरळ चालायला सुरुवात करतो आणि पुण्याहून नगरला चालत येतो. दोन महिने लागतात. त्याबद्दल तक्रार तर सोडाच, पण परत आल्यावर उशीर झाला म्हणून साहेबाची माफी मागतो.

ठेकेदार लोक कामाची मोजणी करताना नेहमीच माप जास्ती जास्त कसं भरेल, याची खबरदारी घेत असतात. त्याबद्दलची एक हकिगत. गवत कापणाऱ्या ठेकेदारानं किती जागेवरचं गवत काढलं त्याचं मोजमाप घेण्याचं काम चाललेलं असतं. टेपनं माप घेण्याऐवजी पावलं मोजून माप घ्यायचं ठरतं. लेखक पावलं टाकत माप घेत असताना वाटेत दगड आल्यामुळे एक पाऊल जरा लांब-ढांग टाकून लांबवर - पडतं. तर त्या क्षणी त्या ठेकेदाराच्या तोंडून जिव्हारी घाव बसल्यासारखा ‘रस्सऽऽ’ असा उदगार येतो. शंभर पावलात एक पाऊल थोडं लांब पडलं, तर काय असा फार मोठा तोटा येणार असतो? पण नाटकं करायची सवय!

पंधराएक वर्षं काम केलेल्या सुपरवाइजरचा पगार नव्यानं लागलेल्या इंजिनियरइतका असतो. त्याचं सुपरवाइजर्सना केवढं वैषम्य वाटत असणारच. नव्या लागलेल्या इंजिनियरबद्दल त्यांच्या मनात सूक्ष्म अढी असते. सुपरवाइजर आणि इंजिनियर यांच्यात सहमीच एक छुपा तणाव, चढाओढ असते. एकमेकावर कुरघोडी करायचा प्रयत्न होत असतो. नवीन इंजिनियरची फजिती होत असताना सुपरवाइजरनं गंमत पहात बसणं हेही नेहमीचं आहे. अर्थात हे सगळं केवळ बांधकाम खात्यातच नव्हे, तर इतर उद्योगातही होत असणारच. किंबहुना मानवी व्यवहाराच्या सर्वच क्षेत्रांत हे होत असणार. पण त्याचं चित्र साहित्यात उमटलेलं सहसा पाहण्यात येत नाही.

कामावरचे मजूर काम करताना कंटाळा येऊ नये म्हणून गाणी म्हणतात. विशेषतः जड वस्तू खेचून नेताना सगळ्यांचा जोर एकाच वेळी लागावा म्हणून हे काम करणारे लोक बोली बोलतात. एकजण गाण्याचे बोल बोलतो आणि बाकीचे ‘हे जोर’ असं म्हणून त्याला साथ देतात. ही गाणी पुष्कळदा वाह्यात, तर कधी कधी अश्लीलही असतात. समोर उभ्या असलेल्या आपल्या साहेबाचं नाव त्यात गंफून त्याला शिव्या घालणं हेही चालतं. यातलं एक त्यातल्या त्यात सभ्य गाणं या पुस्तकात दिलं आहे. ते वाचून ते रचणाऱ्याची कल्पनाशक्ती, प्रतिभा, चित्रदर्शी भाषा याला दाद द्यावीशी वाटते.

कॅम्प लाइफ, त्यातल्या अडीअडचणी, गमती हे सगळं अगदी थोडक्यात पण तमच्या डोळ्यापट चित्र उभं करेल इतक्या चित्रमय शैलीत पुस्तकात आलं आहे. एकच उदाहरण बघा. बटाट्याचा लगदा खाऊन कंटाळलेल्या एका बंगाली बाबूनं सुट्टीच्या दिवशी स्वतः जाऊन मासे पकडले. किती? तीन. करंगळीएवढ्या आकाराचे. ते पंधरा जणांच्या वरणात - हो वरणातच – घातले आणि बॉसला विचारलं, ‘क्यूँ साब, आज दाल में कुछ स्पेशल हैं ना?’ काही वेगळं लागत नाहीये म्हटल्यावर तो रुसून म्हणाला, ‘तुम्हाला कदर नाही सर, माझ्या फिश करीची!’

अशा कितीतरी गमतीच्या गोष्टी निवेदनाच्या ओघात येऊन जातात.

बांधकाम ही एक निर्बुद्धपणे करायची गोष्ट आहे, असा एक सर्वसाधारण समज आहे. दगडावर दगड, विटेवर वीट रचायची, त्यात कसलं आलंय डोकं? पण हे किती चुकीचं आहे, ते हे पुस्तक वाचून कळतं. विशेषतः जुगाड बांधणारे खलाशी नावाचे कुशल कामगार, त्यांनी डोकं लढवून बनवलेल्या रचना याच्या हकीगती वाचण्यासारख्या आहेत. पण त्यापेक्षा महत्त्वाचा आहे लेखकानं उपस्थित केलेला प्रश्न. आजच्या जमान्यात डोकं लढवून काम करण्यापेक्षा ठोक काम करायला जास्त महत्त्व आलेलं आहे. या काळात कोण डोकं वापरणार? डोकं वापरणाऱ्यांची संख्या आणि सहभाग यापुढं कमी कमीच होत जाणार. एकगठ्ठा काम ओढून काढणं वाढत जाणार. त्याची परिणती कशात होणार आहे?

जुनं ते सगळंच चांगलं होतं, अलिकडे सगळंच बिघडत चाललं आहे, असला उमाळा लेखकानं काढलेला नाही. दळणवळण, ठेकेदारांवर पूर्वी लादल्या जाणाऱ्या जाचक अटी, अशा काही बाबतीत पूर्वीपेक्षा जास्त चांगली परिस्थिती आहे, असं तो मोकळेपणानं सांगतो. त्यामुळे पुस्तकाला एक प्रकारचं वजन येतं.

लेखकाचे चतुरस्त्र वाचन, त्याची बहुश्रुतता, त्यानं केलेलं चिंतन याचं दर्शन पुस्तकात जागोजाग होतं. कधी अरुण साधू, रंगनाथ पठारे यांच्या कादंबऱ्यांचे उल्लेख येतात. कधी सॅम पित्रोदाची आठवण काढली जाते. कधी अंबानी आणि बिल गेट्स यांच्या बंद दारामागे झालेल्या बैठकीवर टीकाटिप्पणी होते. हकीगतींना जोडून आलेल्या अशा संदर्भांमुळे पुस्तकाला एक वेगळंच सौंदर्य प्राप्त झालं आहे.

वाचक पुस्तक वाचून खाली ठेवतो, तेव्हा आपण पहिल्यापेक्षा जास्त समृद्ध झालेलो आहोत, हे त्याला जाणवतं. पुस्तकाच्या यशाची यापेक्षा वेगळी कुठली पावती असते?

इतकं असूनही या पुस्तकाचा व्हावा तसा बोलबाला का झाला नाही, हा प्रश्नच आहे. ग्रंथालीचं पुस्तक असूनही समीक्षकांकडून हे पुस्तक साफ दुर्लक्षिलं गेलं. या पुस्तकात दोष नाहीत असं नाही. काही उणीवा नक्कीच आहेत. पण तरीही त्याची आवर्जून दखल घ्यावी इतकं ते खात्रीनं महत्त्वाचं आहे. पण टीकाकारांच्या पसंतीची मोहर त्याच्या नशिबी नव्हती, हे खरं. असं का झालं, समीक्षकांनी त्याच्याकडे पाठ का फिरवली, हे मला न सुटलेलं कोडं आहे.

‘दगडावर दगड... विटेवर वीट’ : नंदा खरे

मनोविकास प्रकाशन, मुंबई

मूल्य – २५० रुपये.

.................................................................................................................................................................

लेखक सुबोध जावडेकर प्रसिद्ध विज्ञानकथाकार आहेत.

subodh.jawadekar@hotmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......