मराठीतील विचक्षण कादंबरीकार, अनुवादक आणि संपादक नंदा (अनंत यशवंत) खरे यांचं काल, २२ जुलै २०२२ रोजी पुण्यात वयाच्या ७६व्या वर्षी दीर्घ आजारानं निधन झालं. ‘तुम्ही का लिहिता?’ असा प्रश्न अनेक लेखकांना नेहमी विचारला जातो. काही लेखक ‘मी का लिहितो?’ असा प्रश्न उपस्थित करून त्याच आपल्या परीनं बयजवार उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. खरे यांनीही या लेखात या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. हा लेख त्यांच्या ‘ऐवजी’ या पुस्तकात ‘पुढ्यात कोरा कागद, हातात पेन’ या नावाने प्रकाशित झाला आहे. या पुस्तकाची नवी आवृत्ती मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केली आहे. तर या लेखातून खरे यांच्या लेखनाविषयीच्या भूमिकेबद्दल... खास ‘नंदा खरे स्टाईल’मध्ये....
.................................................................................................................................................................
गेल्या काही महिन्यांमध्ये (फेब्रुवारी-एप्रिल २०१६) मला एका सहलीत आणि दोन कार्यशाळांमध्ये भाग घ्यायची संधी मिळाली. पण या तीन अनुभवांची सूत्रं फार म्हणजे फारच वेगवेगळी होती. सहल होती काही मजेदार भूशास्त्रीय रचना पाहत सहभाग्यांना भूशास्त्राची ओळख करून देण्यासाठी. तिशीच्या आगेमागे असलेल्या पंधरा तरुण-तरुणींसोबत पाच दिवस घालवायला मिळाले. मग जी कार्यशाळा झाली, तिच्यात तीस ते सत्तर वर्षं वयाच्या चाळीसेक लोकांनी सृजनाच्या प्रक्रियेबद्दलचे आपले अनुभव एका दोन-अडीच दिवसांच्या काळात इतरांपुढे मांडले. नंतर पंचवीस-तीस वर्षांच्या पंधराएक लोकांना त्यांच्यातल्याच लोकांनी भारतीय संविधानामागची मूल्यव्यवस्था तपासायला लावली. तिन्ही घटनांमध्ये सत्तराव्या वर्षांतला मी सर्वांत ज्येष्ठ नागरिक होतो.
या अनुभवाच्या खिचडीतून काही मुद्दे सुचले, जे नोंदायचा प्रयत्न मी करणार आहे. मुद्दे आहेत बाळबोध आणि विस्कळीत, पण मला महत्त्वाचे वाटताहेत, माझ्यापुरते तरी!
माणसं जगत असतात. आपल्या भोवतालच्या निसर्गातून आणि समाजातून उपयुक्त वस्तू आणि सेवा घेत असतात. त्यांचा मोबदला म्हणून वस्तू आणि सेवा इतर माणसांना देत असतात. हे व्यवहार जगायला आवश्यकच असतात. ते करतानाच माणसं आपल्या भोवतीचा निसर्ग कसा चालतो, समाज कसा चालतो, याचे नियमही तपासून नोंदत असतात. आपल्या गरजा पूर्ण करायला, इच्छा पूर्ण करायला हा अभ्यास आवश्यकच असतो. आणि असे अभ्यास आजच केले जात नाही आहेत, तर ते सदासर्वदा होत आले आहेत. कधीकधी तर असे अभ्यास करून त्यांची उत्तरं इतरांना सांगणं हीच इतरांना आवश्यक वाटणारी सेवा ठरते!
हे तपास, अभ्यास करणं, ज्ञान कमावणं हे कधी औपचारिक शिक्षणातून केलं जातं, तर कधी जात्यावर बसलं की, ओवी सुचावी तसं आपसूकच घडत जातं. निसर्गाचे आणि समाजाचे नियम शोधणं, त्यांच्या मर्यादा ठरवणं, त्याला ज्ञान म्हणणं, त्याची देवाण-घेवाण करणं, हा माणूस म्हणून जगण्याचा आवश्यक भाग आहे. इथे निसर्गनियम, समाजव्यवहाराचे नियम म्हणजे फक्त माहिती असते आणि खरं ज्ञान वेगळं असतं, असं कोणीतरी म्हणेल. मला हे शंकास्पद वाटतं. माहिती-ज्ञान-शहाणपण (!) ऊर्फ information- knowledge- wisdom, हा एक रंगपट आहे. माहिती केव्हा ज्ञानाच्या दर्जाला पोचते, ज्ञानातून केव्हा शहाणपण उपजतं, या प्रश्नांना प्रत्येक जण आपापली उत्तरं देत असतो; त्यात कुठेही दगडावरच्या रेघेसारखा अभेद्य नेमकेपणा नसतो, ही माझी भूमिका आहे.
एका बाबतीत मात्र नेमकं विभाजन सोयीस्कर ठरतं. निसर्गाचा अभ्यास आणि समाजांचा अभ्यास यांना वेगवेगळं ठेवणं चांगलं ठरतं. निसर्गव्यवहार माणसांना महत्त्व देत नाही, तर समाज केवळ माणसांच्या व्यवहारावर बेतले जातात (इथेही घोळ आहेतच!).
आणि एकदा हे विभाजन सोयीचं ठरतं असं मानलं की, उपविभागही जातात; नेहमीच सोयीचं कारण सांगत. तर निसर्गाचे अभ्यास, समाजांचे अभ्यास वगैरेंची काही उपक्षेत्रं नोंदतो, केवळ उदाहरणांपुरती.
वजन, वेग, बलं यांच्या अभ्यासाला ‘यामिकी’ (mechanics) म्हणतात.
प्राण्यांच्या अभ्यासाला अर्थातच ‘प्राणिशास्त्र’ (zoology) म्हणतात.
‘खगोलशास्त्र’ (astronomy) ग्रहताऱ्यांची वागणूक तपासतं.
उष्णतेबाबतचे व्यवहार ‘उष्मागतिकी’ (thermodynamics) तपासते.
माणसांचे मनोव्यापार तपासतं ते ‘मानसशास्त्र’ (psychology)
वस्तू आणि श्रमांचे व्यवहार हे ‘अर्थशास्त्रा’चं (economics) क्षेत्र.
सामाजिक संस्थांचा अभ्यास ‘समाजशास्त्र’ (sociology) करतं.
तसंच राजकीय व्यवहार ‘राज्यशास्त्र ’(political science) तपासतं.
अर्थात, या साऱ्यांत काही सीमावर्ती भागही आहेत. जसं, मेंदूचे व्यवहार मानवी वागणुकीशी जोडणारं ‘मेंदूविज्ञान’ (neuroscience) हे निसर्गाबाबतही आहे, आणि माणसांबाबतही.
निसर्गाच्या अभ्यासांची क्षेत्रं, सामाजिक अभ्यासाची क्षेत्रं, या दोन्हींना वेगवेगळ्या काळांमध्ये वेगवेगळी नावं दिली गेली आहेत. आज निसर्गाबाबतच्या शाखांना विज्ञान (science) म्हणतात, तर माणूस आणि समाजाबाबतच्या शास्त्रांना मानव्यशास्त्र किंवा मानव्यविद्या (humanities) म्हणतात. यांना एकेकाळी उदारमतवादी कला, liberal arts म्हटलं जात असे. हे नाव त्यांना नेहमीच्या चित्रकला, मूर्तीकला, गायन-वादन, नृत्य-नाट्य वगैरे कलापेक्षा सुटं काढायला वापरलं जाई. नेहमीच्या त्या fine arts आणि मानव्यशास्त्र या liberal. आजही या शास्त्रांना बरेचदा कला या नावानं ओळखलं जातं, जसं, “माझी भाषा चांगली होती, म्हणून मी आर्ट्सला गेले.”
विज्ञानाच्या क्षेत्रात अभ्यास करायच्या दोन मुख्य पद्धती आहेत, नियंत्रित प्रयोग आणि नमुने तपासणं. यातली दुसरी पद्धत मानव्यशास्त्रंही वापरतात, पण नियंत्रित प्रयोग मात्र मानव्यशास्त्रांत नीटसे शक्य नसतात. असं का होतं ते जरा तपासायला हवं.
समजा की, आपण एका फुग्यात हवा भरतो आहोत. हवा भरून झाल्यावर फुग्याच्या देठाला गाठ मारली आहे. आता फुग्यातला हवेचा साठा बदलणार नाही. आपल्याला प्रश्न पडतो, “हवेच्या साठ्याचं आकारमान आणि हवेचा दाब याचा काय संबंध आहे?” आता दोनच घटक तपासले जात आहेत. इतरही काही घटक आहेत; वायूच्या साठ्याचं तापमान, त्यात आद्रता नसणं, वगैरे. पण आपण हे इतर घटक ‘जैसे थे’ ठेवू शकतो. असं करताना जाणवतं की, हवेचा दाब वाढला की आकारमान कमी होतं. हे तपासायला नियंत्रित प्रयोग करणं शक्य आहे, कारण दाब वाढवताना तापमान कायम ठेवता येतं, आर्द्रता
बाद करता येते. या अभ्यासातून नियम सापडतो की, इतर घटक स्थिर ठेवले तर दाब आणि आकारमान यांचं प्रमाण व्यस्त असतं. दाब दुप्पट केला तर आकारमान अर्धं होतं; उलट दाब अर्धा केला तर आकारमान दुप्पट होतं. हा आहे शाळांमध्ये शिकवला जाणारा, प्रयोगशाळांत दाखवला जाणारा बॉईलचा नियम. इथे दोनच घटकांचा परस्परसंबंध तपासला तपासला जातो आहे, तर इतर थोडेसे घटक स्थिर ठेवता येत आहेत. असं म्हणूया की, घटकांमधला संबंध साधा, Sinple आहे. तर अशा स्थितीमध्ये प्रयोगाची पद्धत वापरून नियम शोधणं शक्य होतं. इतर घटक ‘जैसे थे’ ठेवायला जरा मेहनत लागते, पण ती जमते.
काही स्थितीमध्ये मात्र प्रयोगांसाठी आवश्यक असा साधेपणा शक्य नसतो. अनेक घटक असतात. इतके जास्त की महत्त्वाचे कोणते, बिनमहत्त्वाचे काणते हेही ठरवणं कठीण असतं. काही घटक इतरांवर परिणाम करू शकतात असं जाणवतं, पण कारण आणि कार्य यांचा नेमका संबंध मात्र ठरवता येत नाही. एक विक्षिप्त उदाहरणातून हे दाखवायचा प्रयत्न करतो. हे तपासाचं उदाहरण नाही, पण कारणं कोणती, त्यामुळे कार्यं काय होतात, हे ठरवणं किती अवघड होऊ शकतं, हे मात्र उदाहरणातून दिसेल.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
१९५०-६०च्या दशकात बोर्निओत मलेरियाचा त्रास वाढला. जागतिक आरोग्य संघटना, WHO, हिनं डीडीटीची फवारणी करून डास कमी केले. बोर्निओत घरं गवतानं शाकारायची पद्धत होती. या गवतावर काही सुरवंट चरतात, पण काही गांधीलमाश्या सुरवंटांना खावून छपरं शाबूत ठेवतात. आता डीडीटी फवारणीनं उघड्यावरच्या गांधीलमाश्या कमी झाल्या. यामुळे गवतात लपलेले सुरवंट माजले आणि घरांची छपरं टिकेनाशी झाली. WHOनं घरांवर घालायला पत्रे दिले, पण पत्र्यांवरच्या पावसाच्या आवाजानं लोकांची अक्षरशः झोप उडली. येवढ्यानंही भागलं नाही. डीडीटीनं डास आणि गांधीलमाश्यांप्रमाणेच इतरही किडे मेले. या किड्यांना खाणाऱ्या पाली मेल्या आणि पालींना खाणारी मांजरही मेली. मांजरं नसल्यानं उंदीरघुशी वाढल्या आणि त्यांच्यासोबत टायफॉईड आणि प्लेगही वाढले. अखेर WHOला पंधरा हजार मांजरं बोर्निओत तातडीनं पाठवावी लागली, थेट पॅराशूटनं. एकूण ‘करायला गेलो एक, झालं भलतंच’ या म्हणीचा बोर्निओ आणि WHOला प्रत्यय आला!
प्रयोगांमधून हाताळता येणाऱ्या साध्या संबंधांऐवजी किचकट, गुंतागुंतीचे संबंध असले तर काय करायचं? विज्ञानाच्या क्षेत्रात अनेक घटकांचा, क्लिष्टतेचा प्रश्न विरचित व्यामिश्रता, ऊर्फ organized complexity या नावानं ओळखला जातो. त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे अनेक उदाहरणं किंवा नमुने घ्यायचे, आणि सुचतील तितके घटक, शक्य तितक्या नेमकेपणानं नोंदून ठेवायचे. याला म्हणतात नमुना अभ्यास किंवा केस स्टडी (case study). असे अनेक अभ्यास उपलब्ध करवून घेतले की, मग त्यातून कोणते घटक इतरांना समांतर बदलतात, कोणते इतरांशी व्यस्त प्रमाणात बदलतात, वगैरे नियम ठरवायला सुरुवात करता येते.
मानव्यविद्यांमध्ये नियंत्रित प्रयोग शक्यच नसतात. काही साध्या, सोप्या, फार खोल न जाणाऱ्या परिस्थितींसाठी ‘जनमताचा कौल’ घेणं, Poll घेणं, ही पद्धत वापरता येते. जसं, भारतीयांना कोणता रंग आवडतो ते ठरवायचं आहे. मग विविध भारतीयांना विचारून काहीतरी ठरवता येतं. इथे ना साधेपणा आहे, ना विरचित व्यामिश्रता. हे आहे स्वैर व्यामिश्रतेचं, raldom complexityचं उदाहरण. अशा कौल घेण्यातून येणारी उत्तरं फार नेमकी नसतात. ती बहुधा सांख्यिकीतून मांडावी लागतात. “क्ष टक्के लोकांना क रंग आवडतो. तर ज्ञ टक्के लोकांना ख रंग आवडतो”, या नमुन्यात उत्तरं येतात.
पण मानव्यशास्त्र्यांचा मुख्य अभ्यास चालतो तो तपशीलवार नमुन्यांच्या विश्लेषणातून. एखादा सुचलेला नियम अशा किती केसेसना सार्थ ठरवतो. यावरून सुचलेल्या नियमाला कितपत मानायचं किंवा उपेक्षित करायचं ते ठरवलं जात असतं.
आणि एक मानव्यशास्त्रांबाहेरचं माणसांच्या व्यवहाराचं क्षेत्र अखेर कमी-जास्त चांगल्या, कमी-जास्त संवेदनशील केस स्टडीज उत्पन्न करत असतं. हे आहे साहित्याचं क्षेत्र. कथा, कादंबऱ्या, कविता, नाटकं, निबंध, हे सारे साहित्यप्रकार मुळात माणसांच्या अनुभवांचे नमुनेच मांडत असतात. यात साहित्यिकाच्या क्षमतेप्रमाणे चांगलं-वाईट आकलन, चांगली-वाईट नोंदणी असं दिसतं. पण प्रयत्न मात्र अनुभव नोंदायचा असतो. यामुळे साहित्य हे मानव्यशास्त्रांना कच्चा माल पुरवतं; तेही एका संवेदनशील निरीक्षकाच्या नजरेतून आणि सुघड मांडणीतून. आता काही उदाहरणं पाहू, ही भूमिका स्पष्ट व्हायला मदत करणारी.
माणसं पोटासाठी भटकत दूरदेशी जातात, विशेषतः पुरुष. आपल्या मूळ गावापासून, घरापासून दूर जाऊन उपजीविका साधायची असते. माझा एक स्नेही आहे. बालपण आणि शिक्षण पुण्यात घालवून-करून आज मुंबईत स्थिरावलेला. तो सांगतो की, सुरुवातीच्या दिवसांमध्ये तो अशी कल्पना करायचा : “आत्ता मला दादरमधून उत्तरेकडची अमुक उंच इमारत दिसते आहे. तिच्या माथ्यावरून चेंबूर-पनवेलकडचा तमुक डोंगर दिसेल. त्याच्या माथ्यावरून... असं करत मी सहा-सात टप्प्यांमध्ये सदाशिव पेठेतलं माझं घर पाहू शकेन!”
आता या मातृभूविरहाची साहित्यिक उदाहरणं भरपूर आहेत. मातृभूसोबत सगेसोयरेही येतात, हेही सांगायला नकोच.
मेघदूतातला कालिदासाचा यक्ष असाच ढगाला रामटेकहून उज्जयिनीला कसं जायचं ते सांगतो.
असंच ‘काबुलीवाला’ चित्रपटातलं ‘ऐ मेरे प्यारे वतन’ हे गाणं कलकत्त्याहून थेट पख्तूनिस्तानात नेतं.
‘परगावाहून बाबांचा आलाय आलाय फोन’ (चूकभूल देणेघेणे) ही सलिल कुलकर्णींची कविताही हेच करते.
केशवसुत ‘गोष्टी घराकडिल मी वदता गड्या रे’ म्हणत असलाच मानसिक प्रवास नोंदतात.
‘सागरा प्राण तळमळला’मध्ये सावरकर हेच करतात.
एक ध्यानात घ्या की, मी चांगलं साहित्य, वाईट साहित्य, तरल साहित्य, बटबटीत साहित्य असले फरक करत नाही आहे. मी फक्त एक सार्वत्रिक, वैश्विक मानवी अनुभव अनेक साहित्यकृती नोंदत असतात, हे आणि एवढंच नोंदतो आहे. या उदाहरणांत कविता आहेत; तीव्र, intense भावना थोडक्यात नोंदणाऱ्या. विस्थापनाचे परिणाम नोंदणाऱ्या मानव्यशास्त्राला या सर्व कविता केस स्टडीज पुरवतात. आणखी एक उदाहरण-
माणसांना त्यांची जगायची पद्धत बरेचदा अस्वस्थ करत असते. काही अंगं त्यांना आवडत असतात, तर इतर काही अंगं तीव्र नावडती असतात. या आवडीनावडी नोंदायच्या प्रयत्नांमधून एक पूर्ण साहित्यप्रकार घडतो, यूटोपियन फिक्शन (utopian fiction) नावाचा. उदाहरणांमध्ये मराठी साहित्यकृती कमी आहेत, पण तो माझा दोष नाही.
भारतात स्त्रियांना माणूस म्हणून फारसं महत्त्व दिलं जात नाही, हे जवळपास सर्वमान्य आहे. काशीबाई कानिटकरांची (१८६१-१९४८) ‘पालखीचा गोंडा’ (१९२८) ही कादंबरी यावर एक सौम्य, सभ्य प्रतिक्रिया देते. एका शहाण्या मुलीला काहीशा कपटानं एका संस्थानिकाच्या गळ्यात बांधलं जातं. तो संस्थानिक वेडसर असतो आणि अल्पायुषीही. त्यामुळे त्याची पत्नी लवकरच संस्थानाची राणी होते. ती आपल्या राज्यात तरी स्त्रियांना मान आणि स्वातंत्र्य देणाऱ्या काही सुधारणा करते, ज्यांवर कादंबरी बेतलेली आहे.
‘कल्पनेच्या तीरावर’ (१९५६/२०११) या कादंबरीत वि. वा. शिरवाडकर एका वेगळ्याच बाबीला केंद्रस्थानी नेतात. आपला आजचा समाज अन्नाबाबतची भूक उल्लेखायला लाजत नाही, पण त्याच दर्जाची लैंगिक भूक मात्र लज्जास्पद मानतो. शिरवाडकरांचा कल्पना नदीचा तीर ही भूमिका थेट उलटी करतो. त्यांच्या जगात ‘प्रेमप्रणयादि कृत्ये’ जाहीर करण्याला मान्यता आहे, पण दोन माणसांनी एकत्र जेवणं मात्र चोरूनमारूनंच होतं.
जॉर्ज आर्वेलची ‘नाइन्टीन एटीफोर’ (१९४९) ही कादंबरी जीवनाची सगळीच्या सगळी अंगं नियंत्रित करणाऱ्या एका सर्वंकषसत्तावादी (totalitarian) समाजाचं चित्र रेखते. हिटलरची जर्मनी, स्टॅलिनचा रशिया, ब्रिटिश सा साऱ्या कमी-जास्त कठोर हुकूमशाह्या ऑर्वेल एका दुःस्वप्नासारख्या आपल्यासाठी जिवंत करतो.
‘ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’ (१९३२) या कादंबरीतून आल्ड्स हक्सले एक वेगळाच समाज रेखतो. त्याचं ‘शूर नवं जग’ कुटुंबव्यवस्था बाद करतं. लोकांना विचारहीन करतं. सर्वांनी एक अत्यंत श्रेणीबद्ध समाज स्वीकारायला अनेकानेक मानसिक तंत्र वापरतं. आणि या साऱ्यांसोबत त्या गोऱ्यागोमट्या कपाळकरंट्या जगाची मापं आपल्यापुढे मांडतं.
हक्स्लेला कादंबरीची अंगं कितपत वास्तववादी आहेत, हे आपण पुरेसं स्पष्ट केलं आहे असं वाटेना. त्यानं ‘ब्रेव्ह न्यू वर्ल्ड रीव्हिजिटेड’(१९५८) नावाच्या एका लेखसंग्रहातून आपल्या मांडणीचे आधार स्पष्ट केले. तेही सव्वीस वर्षांनंतर!
असे साहित्यातून मानव्यशास्त्रांना कधी उत्तम नमुने मिळतात, तर कधी मर्मग्राही पण काटेकोर नसलेलं शास्त्रीय लिखाण. त्यांचा चांगला वापर करणारे साहित्यिक-मानव्यशास्त्री सरळसोट अभ्यासकांना कधीकधी मागेही टाकू शकतात. उदाहरणार्थ, अमेरिकेतली १९२९-३९ काळातली महामंदी (The Great Depression) आणि त्यामागची शेतीसमस्या यांचं जॉन स्टाईनबेकच्या कथा-कादंबऱ्यांमधलं वर्णन-विश्लेषण औपचारिक अर्थशास्त्र-समाजशास्त्रांच्या पुढचं आणि वरच्या दर्जाचं होतं. कधीकधी तर औपचारिक शास्त्र शिकणाऱ्यांना आवर्जून साहित्याकडे वळवायचे प्रयत्नही झाले आहेत. जसं, १९८४ साली स्टॅन्फर्ड विश्वविद्यालयानं आपल्या सर्व शास्त्र-विभागांना ऑर्वेलच्या ‘नाइंटीन एटीफोर’ या कादंबरीवर त्यांच्या त्यांच्या शास्त्रानुसार लेख लिहायला सांगितले. यात राज्यशास्त्र, अर्थशास्त्र वगैरे मानव्यशास्त्रंच फक्त नव्हती, तर जैवरसायनशास्त्र, संगणकशास्त्र, अशा विज्ञानशाखाही सहभागी होत्या!
निष्कर्ष काय, तर साहित्याचं क्षेत्र थेट मानव्यशास्त्रामध्ये धरलं जात नसूनही मानव्यशास्त्रांना ते अत्यंत गरजेचं आहे.
असाच प्रकार विज्ञान आणि गणिताबद्दल आहे. गणित हा तर्कशास्त्राचाच एक अवतार आहे, असं मानणारे बरेच लोक आहेत. ते प्रयोग किंवा नमुना तपासण्या वापरणारं विज्ञान तर नक्कीच नाही. पण आज एकही विज्ञानशाखा (आणि बहुतांश मानव्यशास्त्रं!) गणिताच्या मदतीशिवाय चालू शकत नाही. हा विज्ञान-गणित संबंध मानव्यशास्त्रं-साहित्य संबंधांपेक्षा बराच दाट आणि सर्वव्यापी आहे.
बहुतेकवेळी विज्ञानशाखा गणिताचा उपयोग एक विश्लेषणाचं हत्यार म्हणून करतात. कधीकधी मात्र असं विश्लेषण विज्ञानाला मूलभूत ज्ञानही देऊ शकते. एका कहाणीतून हे स्पष्ट करायचा प्रयत्न करतो.
एखाद्या मूलद्रव्याचे सगळे अणू हुबेहूब एकसारखे असतात असं मानलं जात असे. अशा अणूंचं वजन ऊर्फ अणुभार (atomic weight) अशी एक संकल्पना घडली, म्हणजे कार्बनचा अणुभार बारा असतो, याचा अर्थ कार्बनचे सर्वच्या सर्व अणू प्रत्येकी (!) हायड्रोजन अणूंच्या बारापट वजनाचे असतात. अणूंची रचना कशी असते, हेही उकललं जात होतं. त्यातून दिसत होतं की, अणूंचं वजन मुख्यतः प्रोटॉन्स नावाच्या घटकांचं वजन असतं. इलेक्ट्रॉन नावाचेही घटक असतात, पण त्यांचं वजन नगण्य असतं. आता एखाद्या अणूत प्रोटॉन्सची संख्या नेहमीच पूर्णांकात असते- बारा, तेरा, चौदा, अशी. ती कधीच १२.३२, १३.४७ अशी अपूर्णांकात असू शकत नाही. जर वजन प्रोटॉन्समुळेच असतं आणि प्रोटॉन्स पूर्णांकातच असतात, तर अणुभारही पूर्णांकातच हवेत. पण प्रयोग दाखवतात की ते अपूर्णांकात असतात!
बऱ्याच विचारानंतर कोणाला तरी सुचलं की, आपली पहिलीच पायरी चुकली आहे. एका मूलद्रव्याचे सर्व अणू हुबेहूब एकसारखे नसतात! अगदी आपण मापदंड म्हणून वापरलेल्या हायड्रोजनचे अणूही एकसारखे नसतात. बहुतांश हायड्रोजन अणूंमध्ये एक प्रोटॉनच फक्त असतो, पण काही अणूंमध्ये दोन प्रोटॉन्स, तीन प्रोटॉन्स असावेत इतकं वजन असतं! पण हायड्रोजनमध्ये प्रोटॉन एकच असू शकतो. म्हणजे साध्या हायड्रोजनच्या दुप्पट-तिप्पट वजन असलेल्या अणूंमध्ये प्रोटॉनइतकं वजन असलेले, पण प्रोटॉनसारखे नसलेले काहीतरी घटक असणार! न्यूट्रॉन या घटकाचा शोध असा अणुभार पूर्णांकात नसल्यामुळे लागला. शुद्ध गणितातून विज्ञानातलं एक तत्त्व बदललं गेल!
मला ज्ञानशाखांमध्ये एक विचित्र संमिती (symmetry, सममिती) जाणवते. एकीकडे निसर्ग तपासणारं विज्ञान, दुसरीकडे माणसं आणि समाज तपासणारी मानव्यशास्त्रं. दोन्हींमध्ये एकेक वेगळा सहकारी-सहभागी मानवी व्यवहार. विज्ञानासोबत गणित, तर मानव्यशास्त्रांसोबत साहित्य. (इथे भाषाशास्त्र, Linguistics, हे साहित्यापेक्षा वेगळं, मेंदूविज्ञानासारखं दोन्ही डगरींवर हात ठेवणारं शास्त्र हे साहित्याचा भाग नाही हे नोंदायला हवं). विज्ञानाला गणित हे विश्लेषणाचं हत्यार ठरतं, तर मानव्यशास्त्रं साहित्याकडे मर्मदृष्टीच्या केस स्टडीजचा पुरवठादार म्हणून बघतात. भाषा चांगली असेल तर मानव्यशास्त्रांकडे जायचं आणि गणित चांगलं असेल तर विज्ञानशाखेकडे; हा जुना ‘करिअर चॉईस’चा मंत्रही ही मजेदार संमितीच ठसवतो. एकेकाळी गणितात बीए, एमे पदव्या दिल्या जात आणि बरेचदा या ‘मेजर’ विषयांसोबत एखादी भाषा ‘मायनर’ असे. बरेचदा ही भाषा संस्कृतही असे; आणि तिचं वर्णनही ‘गणितासारखी’ असं केलं जाई. अर्थात, सुरुवातीचा ‘रामा-रामौ-राम:-प्रथमा’चा जप सोडला तर काहीही गणितासारखं नसे!
आता, मी स्वत:ला लेखक म्हणवतो. बराच काळ हट्टानं स्वतःला, इतरांना सांगत आलो आहे की, मी लेखक आहे, साहित्यिक म्हणावं या दर्जाचा नाही. ही पळवाट आहे आणि तीही निरर्थक, याची मला जाणीव आहे.
मध्ये काही प्रमाणित साहित्यिकांनी त्यांना पडलेले प्रश्न नोंदून उत्तरं दिली. प्रमाणित म्हणजे पुरस्कार कमावलेले आणि मान्यवर प्रकाशक ज्यांची पुस्तकं प्रकाशित करतात असे. तर आवर्जून या महाभागांची आपसातली आणि स्वतःशी झालेली प्रश्नोत्तरं मी वाचली. आपल्याला असे प्रश्न पडत नाहीत, आणि पडलेच तर उत्तरं सुचत नाहीत, यानं मी खजील झालो. आजही खजील आहे. खरं तर हेही निरर्थक आहे, कारण प्रस्थापित, प्रमाणित असं काही मला आदरणीय वाटेल, याची कधीच खात्री नसते. उलट आडमुठ्या वृत्तीमुळे अनादर हेच ‘डिफॉल्ट ऑप्शन’ असतं.
पण काही प्रश्न मलाही पडतात आणि त्यांपैकी काही तर थेट साहेब लोकांना पडणाऱ्यांसारखे. ते विचारतात, “कोणती गोष्ट अनिवार्यपणे साहित्यिकाला लिहितं करते?” माझा प्रश्न असतो, “मी/तू का लिहितो/स?” यावर आजवरचं माझं प्रमाण उत्तर असतं की, मला गप्पा मारायला आवडतं, आणि लेखन या गप्पांची पोच, reach वाढवतं. हे माझं उत्तर आजही वैध, valid आहे. पण कशा नमुन्याच्या गप्पा हा प्रश्न राहतोच. जरा आडवाटेनं उत्तर द्यायचा प्रयत्न करतो, एका कथेतून.
एक इंग्रजी सिनेमा आहे, ‘द इन् ऑफ द सिक्स्थ हॅपिनेस’ (The Inn I the Sixth Happiness, 1958) नावाचा. इंग्रिड बर्गमन ही देखणी, उत्कृष्ट नटी सिनेमाची नायिका आहे. काळ आहे चिनी-जपानी युद्धाचा (१९३०-३३). नायिका एका चर्चशी संलग्न असते, आणि तिच्यावर एक जबाबदारी सोपवली जाते. काही पंधरा वर्षांखालच्या चिनी मुलांना चीनच्या अंतर्भागातून एका बंदरापर्यंत पोचवायचं असतं, जिथून ती मुलं अमेरिकेला जाणार असतात. नायिका जबाबदारी तर स्वीकारते, पण हे खरंच ‘देवाचं काम’ आहे का याबद्दल तिला शंका असते. एका टप्प्यावर ती एका धाब्यासारख्या खाणावळीत जाते, जिचं नाव असतं ‘सहाव्या सुखाची खाणावळ’, द इन ऑफ द सिक्स्थ हॅपिनेस. ती खाणावळवाल्याला या विक्षिप्त नावाचा अर्थ विचारते.
तो सांगतो की, पाच सुखं तर सर्वच माणसांना हवी असतात- आरोग्य, सुबत्ता, चांगलं नाव असणं, मुलं चांगली निघणं आणि क्लेशविरहित मृत्यू. सहावं सुख मात्र प्रत्येकाचं वेगळं असतं, आणि ते माणसांना असं काही करायला उद्युक्त करतं की, त्यानं त्या माणसाचं जीवन सार्थ होईल! नायिकेला साक्षात्कार होतो की, त्या मूठभर मुलांना युद्धानं ग्रस्त-त्रस्त क्षेत्रातून सुरक्षित जागी पोचवणं हेच तिचं सहावं सुख आहे!
माझे एक स्नेही, गणितज्ज्ञ श्री. अनिल खर्शीकर, यांच्याशी कधीतरी गप्पा मारताना ह्या चित्रपटाचा विषय निघाला. ते मला त्यांच्या घरी घेऊन गेले आणि मला त्यांनी त्या सिनेमाची व्हिडिओ टेप दाखवली. हो, तो व्हीसीडीच्या आधीचा काळ होता. माझी पोरवयातली आठवण ताजी झाली!
मग माझं सहावं सुख कशात आहे?
माझं शिक्षण आणि उपजीविकेचं साधन आहे बांधकाम हे सिव्हिल इंजिनीयरिंगचं क्षेत्र. त्यातला विज्ञानाच्या उपयोजनाचा तांत्रिक भाग मला जमत असे आणि आवडत असे. पण मी विज्ञानाचं उपयोजन करणारा तंत्रज्ञच फक्त नव्हतो, तर त्यातून पैसे कमावून जगणारा कंत्राटदार होतो. कंत्राटदारीनं मला चांगली उपजीविका पुरवली आणि निवृत्तीनंतरच्या उपजीविकेची सोयही करून दिली. पण त्यातून मला जीवनाला अर्थ देणारं, जीवनाला सार्थ ठरवणारं सहावं सुख काही मिळालं नाही.
अनेक वयानं ज्येष्ठ-कनिष्ठ बुद्धिमान स्नेही मला सांगतात की, आपला धंदा-पेशा, आपलं उपजीविकेचं साधन, हेच आपला छंदही झालं पाहिजे. सल्ला देणाऱ्यांपैकी काही जणांना तरी, अंशतः तरी हे जमलं आहे. मला मात्र ते जमेना. कंत्राटदारी हा धंदा आहे, पेशा नव्हे. आणि धंदे एकूण अर्थव्यवस्थेचा भाग म्हणूनच करता येतात. धंदेवाईक माणसाचं त्या अर्थव्यवस्थेवर नियंत्रण नसतं. तर मी पेशेवर इंजिनीयर होऊ शकलो. चांगली धरणं, पूल, कारखाने बांधू शकलो. पण अर्थव्यवस्थेनं मला सुख मात्र फारसं मिळू दिलं नाही.
पण ते सुख, सहावं सुख मी शोधत राहिलो.
ते सापडायला लागलं वयाच्या पस्तिशीत. वाट होती ती मला अनोळखी अशा विज्ञानाच्या क्षेत्रातून. मी औपचारिकपणे जीवशास्त्र कधीच शिकलेलो नाही. नववी-दहावीत एक सामान्य विज्ञान नावाचा विषय असायचा, पण त्यात मिळणारे मार्क अकरावीच्या, हायर सेकंडरीच्या परीक्षेत धरले जात नसतं. एक उत्तम शिक्षक आम्हाला त्या विषयात आवर्जुन जीवशास्त्र शिकवत, पण त्या ज्ञानाचा मार्कांशी संबंध नसल्यानं आम्ही त्या प्रकाराला फार महत्त्व देत नव्हतो. ही गोष्ट आहे अठ्ठावन-साठ सालची. तर त्यानंतर वीसेक वर्षांनी मला जीवशास्त्र मोहवायला लागलं. खरं तर सर्व विज्ञानक्षेत्रं एकत्रितपणे पाहणं महत्त्वाचं वाटायला लागलं. भौतिक विज्ञानशाखाही जीवशास्त्राशी जोडूनच तपासाव्याशा वाटायला लागल्या.
हळूहळू जाणवत गेलं की जीवशास्त्र-भौतिकविज्ञानंच नव्हे, तर विज्ञानशाखा आणि मानव्यशास्त्रांचीही सांगड घालत राहायला पाहिजे. या विचारांत मजा येत होती. आणि सोबतच ज्ञानाबाबत एक जेमतेमपणा, एक स्पर्शभावना, एक tentativeness ही येत होता. एकीकडे हा भाव विज्ञानाचं तत्त्वज्ञान तपासायला सांगत होता.
दुसरीकडे तो सर्व सृष्टीचा एकाच मोजपट्टीनं विचार करायला सांगत होता. माणूस आणि इतर प्राणी, प्राणी आणि वनस्पती, फार कशाला, सजीव व निर्जीव हे सगळे फरक तर सारे आहेतच. पण एकाला महत्त्व देणं, दुसऱ्याचा सत्यानाश मान्य करणं; हे सगळं मात्र नाकारणारा हा भाव होता. ढोबळ वर्णन करायचं तर हा पर्यावरणवादी भाव होता. तरल वर्णनात मात्र तो थेट आध्यात्मिक होता! इथे एक स्पष्ट करतो की, मला आध्यात्मिक या शब्दाचा नेमका अर्थ माहीत नाही. पण काही त्या विषयात गती असणारे लोक सांगतात की, सर्व चराचर सृष्टीचा आपणही एक भाग आहोत, असं मानणं म्हणजेच आध्यात्मिक भाव असणं. तर त्या अर्थी माझ्यात उपजलेला भाव आध्यात्मिक होता.
तर हा भाव, तो माझ्यासारख्या गद्य माणसात कसा उपजला, वगैरे गोष्टींबद्दल इतरांशी गप्पा मारायला लागलो. भोवतालच्या लोकांमधल्या काहींना या गप्पा आवडायच्या. बऱ्याच जणांना मात्र यात रस नव्हता. पण काहीतरी संस्कृत श्लोक आहे की काळ अनंत आहे, पृथ्वी विपुल आहे, तेव्हा मला कधीतरी माझ्या वृत्तीची माणसं भेटतीलच. म्हणजे गप्पा दूरवर पोचतील अशा ‘मारल्या’ तर कुठून तरी प्रतिसाद येईलच. आणि हे लिखाणातूनच जमेल.
लिहिण्याचा आणखी एक गुण आहे. लिहायला बसलं की, त्यामागचे विचार स्पष्ट होतात. जर तसं नसलं तर गप्पा आसमंतात विरून जातात. म्हणजे लिहिणं हे स्वत:चेच विचार स्पष्ट करायचं एक हत्यार आहे. नाहीच जमलं तर वाट बदलावी लागेल. जरा दुखेल, पण नाहीतरी कंत्राटदारी कुठे फार सुख देत होती! उलट जर जमलं तर उपजीविकेची जबाबदारी ठेकेदारीवर सोडून थेट सहावं सुख सापडेल!
पण हे लिखाण निसर्गापासून सुरू होणार. आणि हा फक्त पाना-फुलांचा, हरिण-सशांचा निसर्ग असणार नाही. त्यात दगड-धोंडेही येणार. निसर्गातल्या वस्तंपासून तयार केलेल्या मानवनिर्मित वस्तूही येणार. आणि अर्थातच माणसंही येणार आणि त्यांची मनंही. बापरे!
मतमतांतरांचा गलबला. माणसांना म्हणे आतलं आणि बाहरेचं अशी दोन जीवनं असतात. आत वळलेले लोक प्रेम, त्याग, सेवा वगैरेंची वाटा आणि वळणं घेत ईश्वराकडे जाणारं लेखन करतात. उलट जर तुम्ही बाहेर वळलात तर स्वार्थ, हिंसा, संघर्ष, षड्रिपू अशा वाटेनं पाशवी होता, दुष्टाव्याकडे जाणारं लेखन करता.
आणि इथे मी निर्जीव, सजीव, पशू, माणसं, स्त्री-पुरुष साऱ्यांना पाहत, एकाच मापानं तोलण्याला आध्यात्मिक मानायला लागलो आहे. मग काय माणूस फक्त बाहेरचा आहार-निद्रा-भय-मैथुन यात अडकणारा पशू आहे? हो, पण त्यातनंच प्रेम-त्याग-सेवा घडतात आणि स्वार्थ-हिंसा-संघर्षही. दोरीला नेहमीच दोन टोकं असतात. एकाच टोकाची दोरी पाहिली आहे कधी? तर टोकं न पाहता दोरी पाहावी. तीच स्मरावी, तीच बोलावी, लिहावी.
साहित्यप्रकार कोणता वापरावा? ललित कथा-कादंबऱ्या? ललितेतर निबंध?
आणि भाषा कोणती? कोणती का असेना! ऑर्वेल या माझ्या लाडक्या लेखकाबद्दल म्हटलं गेलं आहे की, भाषा ही सत्याची भागीदार असायलाच हवी, हे त्याला आतपासून पटलं होतं. तो एका जागी म्हणतो की, पुरुषानं उष्टावलेल्या बाटलीतनं पाणी वगैरे पिणं त्याला आवडत नसे, पण बाईनं उष्टावलेलं चालत असे! तर इतपत सच्चेपणानं जगणं कबूल करत लिहिता येईल.
आणखी एक अर्धवट आठवणारं अवतरण, आल्बेर कामूचं, “ज्यांच्यापाशी शब्द नाहीत, किंवा सवय नसल्यानं शब्द वापरू न शकणारे, अशा लोकातर्पे लिहिणं हे लेखकाचं कर्तव्य आहे.” हे कबूल. शब्द नसणारी, ‘प्रमाण’ शब्द नसणारी, ते वापरायची सवय नसणारी खूप जणं पाहिली. त्यांना भेटलो. त्यांना ऐकलं. निरखलं. तर हे कर्तव्य म्हणून स्वीकारायला जमेल. ते आत वळत ईश्वराकडे जाणं मात्र नाही जमणार.
तर ही मार्गदर्शक तत्त्वं वापरत लिहावं. ते जमेलही आणि आवडेलही. मला आवडेल, पण वाचकांचं काय? पाहू, काय प्रतिसाद मिळतो ते.
आता भूशास्त्र सहल, सुजन कार्यशाळा यांच्यातून मी का लिहितो याची काही अंगं कळली. पण याचा भारतीय संविधानाच्या मूल्यव्यवस्थेशी काही संबंध आहे का?
मला वाटतं, आहे. चराचर सृष्टीचा भाग आहे मी, त्यामुळे बंधुभावही मला महत्त्वाचा वाटतो. अगदी मानवी व्यवहार तपासताना, तशा व्यवहारांत भाग घेताना केंद्रस्थानी ठेवण्याइतका महत्त्वाचा वाटतो. आणि स्वातंत्र्य, समता, बंधुभाव ही मूल्यं एखाद्या समाजात मूर्त कशी करावी, हे भारतीय संविधान सांगू पाहतं. त्या संविधानाचा मूळ मसुदा प्रामुख्यानं डॉ. आंबेडकरांनी रचला. त्यांनी इतरत्रही या मूल्यांबद्दल लिहिलं. बंधुभावाबद्दल ते म्हणतात, “मी बंधुभावाला सर्वोच्च स्थान देऊ इच्छितो; कारण स्वातंत्र्य, समता नाकारली जाण्याप्रसंगी बंधुभाव हाच खराखुरा रक्षक ठरतो.”
पण येवढं बोलावं, लिहावं का, स्वतःच्या भूमिकेबद्दल? लिहावं आणि मोकळं व्हावं!
लोक विचारतात ना कधीतरी, “तुमच्या लेखनामागची प्रेरणा काय?” तर काय सांगायचं? पुढ्यात कोरा कागद होता आणि हातात पेन होतं हे सांगायचं? तर जरा तपशीलानं उत्तर दिलं, झालं.
‘ऐवजी’ - नंदा खरे
मनोविकास प्रकाशन, पुणे
मूल्य - ३५० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment