अजूनकाही
‘बखर एका राजाची’, ‘डांगोरा एका नगरीचा’ आणि ‘उच्छाद’ या गाजलेल्या कादंबरीत्रयीचे लेखक प्रा. त्र्यं. वि. सरदेशमुख यांच्या साहित्यिक-नोंदींविषयीचे ‘जवळिकीची सरोवरे’ हे नीतीन वैद्य यांचे पुस्तक आज, २३ जुलै २०२२ रोजी सोलापुरात समारंभपूर्वक प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने या पुस्तकाविषयी...
.................................................................................................................................................................
प्रसिद्ध कादंबरीकार त्र्यं.वि. सरदेशमुख यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नितीन वैद्य यांनी त्यांचे जगभरच्या प्रज्ञावंतांविषयीचे चिंतन ‘जवळिकीची सरोवरे – सखे-सांगाती’ या पुस्तकातून एकत्र आणले आहे. असे विचारवंत त्यांच्या सहवासात कायम असत, हे वैद्य यांचे म्हणणे यथोचितच आहे. हा मजकूर सरदेशमुख यांचे शब्द घेऊन येतो. कधी तो त्रोटक आहे, कधी विस्तृत. कधी तो प्रसिद्ध झालेला आहे, तर कधी केवळ त्यांच्या डायरीतील नोंदींचा आहे. काही वेळा तर तो साध्या चिठोऱ्यावरचादेखील आहे. सरदेशमुख यांचे हे चिंतन ‘जोडताना’ नितीन वैद्य यांनी त्याचे दिन-विशेष आणि औचित्यसुद्धा दिले आहे. त्यामुळे सरदेशमुख सहज उलगडत जातात. तसे पहिले तर वैद्यांचे लिखाणदेखील अल्पाक्षरी आहे. मात्र त्यात औचित्य आहे, विचार-सौंदर्य तर आहेच...
जगभरातील या विचारवंतांना असे एकत्र आणणे आणि त्यांना आपले ‘सखे-सांगाती’ करणे सोपे नक्कीच नव्हते. सरदेशमुखांचा हा संवाद अखंडित चालू होताच. खरे म्हणजे तो त्यांचा स्थायीभाव होता. ही सगळी टिपणे, लेख, नोंदी आणि पत्रे यातून वेळोवेळी कसला संकल्प सरदेशमुख सोडत होते, माहीत नाही! वैद्य यांनी हा सगळा मजकूर अधिक उजळ करून या पुस्तकात उपलब्ध करून दिला आहे. हा एक वेगळाच आकृतिबंध आहे. सरदेशमुखांचा पिंड एकाच वेळी रॅशनल आणि अध्यात्मवादी आहे.
निकोलस बर्दिएव्हच्या संदर्भातील नोंदीबद्दल वैद्य म्हणतात- “तशीच बेचैनी सरदेशमुख यांच्या वाटेला आली असावी”. अभूतपूर्व ध्यास आणि चिंतन यातून त्यांना आलेली बेचैनी हीच त्यांच्या लिखाणाची प्रेरणा आहे. आणि खरे तर, हे अटळ आहे. म्हणूनच कदाचित सरदेशमुख यांनी प्रज्ञावंत सखे सांगाती यांची संगत पत्करली असावी.
विद्याधर वैद्य या अप्रसिद्ध (‘व्याधा हातौनी सुटला’) कवीच्या कविता हा सरदेशमुखांनी लेखाचा विषय केला होता. विशीतच आपले आयुष्य संपवणाऱ्या विद्याधरची मानसिकता आणि व्यक्त होण्याची धडपड हृदयस्पर्शी आहे. तसा त्याच्या प्रत्यक्ष आयुष्यातील घटनाक्रमदेखील चटका लावणारा. “गतीची बीजे हृदयाला फुलवतील असे श्वासच अस्तित्वात नाहीत” असे लिहिणारा हा कवी सरदेशमुखांच्या समीक्षेचा विषय झाला.
जवळिकीची ही सरोवरे एकदा अनुभवून संपणार नाहीत. कित्येकदा एखादा संकल्प राहून गेलेला असावा, असेदेखील वाटते. एमिली डिकन्सनबद्दल लिहिताना सरदेशमुख म्हणतात, “ती आता माझी झाली… तिला अर्घ्य दिल्यावाचून मला राहवेना”. नितीन वैद्य यांनी असे काही संदर्भसुद्धा निवडलेले दिसतात. उदाहरणार्थ सर्वांतीसचा संदर्भ! ‘डॉन कियोते’बद्दल सरदेशमुख काही जुळवाजुळव करत होते की काय असे वाटून गेले. खलील जिब्रानच्या काही ओळी सरदेशमुख यांच्या डायरीत होत्या. त्याची ‘देवप्रियाची गाणी’ झाली आणि अखेर अनुवाददेखील झाला. जगभरातील अनेक श्रेष्ठ साहित्यिक, तत्त्वज्ञ यांच्या कलाकृतीचे हे कवडसे आपण या पुस्तकात पाहू शकतो. सरदेशमुख यांच्या प्रसिद्ध आणि प्रकाशित पुस्तकांचे संदर्भ यात आहेतच, मात्र खरा शोध म्हणायला हवा, तो अप्रकाशित टिपणांचा. ती परिपूर्ण नसतानादेखील वैद्य यांनी सरदेशमुखांच्या मनाचा थांग शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
यात बर्ट्रांड रसेल, विक्टर ह्युगो, इब्सेन, बोरिस पास्तरनाक, कार्ल मार्क्स, हरमान हेसे, टी.एस. इलियट, जिब्रान, सार्त्र आणि असे अनेक सखे-सांगाती आहेत. शिवाय ज्ञानेश्वर, मर्ढेकर, ग्रेस, जी.ए. कुलकर्णी, केशवसुत, राजा ढाले इत्यादी भारतीय प्रतिभावंत, कवीसुद्धा आहेत. अशा अनेक मंडळीना सखे-सांगाती करण्याची सरदेशमुख यांची पद्धत खूप जिव्हाळ्याची आहे. त्यात शोधदेखील आहे आणि ओलावासुद्धा निसटलेला नाही.
खलील जिब्रानबद्दल लिहिताना सरदेशमुखांचा ‘अनुवाद’ वैद्य देतात. मृत्यूनंतरच्या अस्तित्वावर ती कविता आहे. असे एकरूप होऊन जाणे दुर्मीळ. वैद्य कवितेनंतरच्या एकाच वाक्यात व्यक्त होतात - जिब्रान मराठी असता तर, त्यांने हेच शब्द वापरले असते कदाचित…”
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
सरदेशमुख गप्पांच्या मैफिलीत रमणारे नव्हते आणि तरीही हे पुस्तक रंजक झाले आहे. त्यांच्या अंतर्मनात काय चाललेले असावे, याचा अंदाज येणे हे वैद्यांच्या लिखाणाचे यश आहे. इतके लेख, टिपणे, पत्रे, यामधून सरदेशमुख थेट क्वचितच व्यक्त होतात. एका दृष्टीने हा स्वत:चा शोध असावा. इतर कला, संगीत, नृत्य, सिनेमा याबद्दल (‘सिनेमाचे दिवस’ हा त्यांचा दुर्मीळ लेख ‘ऋतुरंग’मध्ये आला असावा!) सरदेशमुख काय जवळीक बाळगतात, याचे दर्शन मात्र फार नाही, पण नाट्य-कलेबद्दल एका व्याख्यानात त्यांनी काही भाष्य केले आहे.
नाटकाचे त्यांचे चिंतन संहितेच्या अंगाने आहे. ते म्हणतात, माझी समीक्षा ही कोणत्या ‘इझम’शी बांधील नाही! मंचावरील नाट्य हा प्रकार त्यांनी फार अनुभवला नाही. तरीही त्यांचे शब्द किती मोजके आणि नेमके आहेत हे पहा! ते म्हणतात- “फुटकळ त्रुटित आणि अमंगळ कर्मकल्लोळाने दु:ख बीजे सतत कशी पेरली जातात? त्यांची पीक भराला येते, त्या वेळी स्त्री-पुरुष आपापल्या ठायी विसकटून कसे हताश, या विषयीचे जागेपण आणि जाणतेपण देण्यासाठी कलांची निर्मिती प्रतिभावंतांकडून होत आली आहे...” नाटकांच्या संदर्भातील सरांचे हे मूलभूत चिंतन वाचल्यावर त्यांच्या दृष्टीकोनातून कला तपासण्याची संधीदेखील मिळायला हवी होती, असे वाटून गेले. सरदेशमुख या भागाकडे फारसे फिरकले नसावेत असेच वाटते. युजेन आयनेस्कोच्या ‘ABSURD’ नाटकांचे रूपांतर करणारे सरदेशमुख इब्सेन आणि महेश एलकुंचवार यांच्या नाटकावर देखील लिहितात हे चकित करणारे आहे. त्यांचे स्वत:चे स्वैरचिंतन ‘नट, नाटक आणि आपण’मध्ये आले आहे.
‘वैज्ञानिक दृष्टी’बद्दलचे त्यांचे विचारदेखील यात आहेत. माक्स प्लांक हा क्वांटम थिअरी मांडणारा शास्त्रज्ञ सरदेशमुखांच्या वाचनात कसा आला, याचे आश्चर्य वाटते. तो म्हणतो, ‘शोधता आले ते शोधले आणि जे शोधता आले नाही, तिथे शरण गेलो. त्यात अंतर्यामीचे सुख आणि समाधान मी प्राप्त करू शकलो.’ यावर सरदेशमुख अधिक भाष्य न करता विवेकशील आचरण आणि कर्तव्य-कर्म सुचवतात.
आयुष्यात वेळोवेळी आणि कमालीच्या सातत्याने जगभरातले साहित्यिक आणि तत्त्वज्ञ यांचा धांडोळा घेत सरदेशमुख काही अंतिम सत्य शोधत नव्हते. मात्र त्याच्या जवळ जात किमान त्यातील सुसूत्रता शोधत असावेत. अन्यथा त्यांनी हे सगळे कुठल्या ना कुठल्या फॉर्ममध्ये का होईना नोंदवले नसते. त्यामुळे त्यांच्या जवळिकीच्या परिसरात असलेली ही सरोवरे कायम आपल्या दिलाश्याचे ठिकाण ठरतील.
सरदेशमुख हे लेखक आणि समीक्षक म्हणून किती मोठे होते इतकेच दाखवणे, हा या पुस्तकाचा हेतू नक्कीच नाही. त्यांच्यामधील सामान्य स्वरूपाची दु:खेसुद्धा या नोंदीतून काही वेळा येतात. कन्नड महाकवी द.रा. बेंद्रे काही काळ त्यांच्या सहवासातील एक थोर व्यक्ती. हा काळ सरदेशमुखांच्या वैयक्तिक आयुष्यातील विपरीत घटनांचा, प्रापंचिक अडचणीचा होता. त्यांच्या किंचित कथनाला त्या महाकवीने दिलेले सांत्वन ही सहृदयतेची श्रेष्ठ कोटी ठरावी.
असेच काही हळुवार नात्यांचे पदर आपल्याला श्री.पु. भागवत यांच्या पत्रातूनदेखील दिसतात. गो.नी. दांडेकर, शांता शेळके, पु.ल. देशपांडे यांच्याशी झालेला पत्र-संवाददेखील असाच आत्मीय आहे. साने गुरुजी, नाटककार रा.ग. गडकरी, महात्मा गांधी, माधव जुलियन यांच्यावरील टिपणातून व्यक्त झालेले यश-अपयश यांचे नेमके निर्देश हे हळुवार पण तरीही स्पष्ट आहेत. कवी ग्रेस, नारायण सुर्वे आणि राजा ढाले यांच्या कवितांबद्दलचे लिखाण असेच मार्मिक आणि थेट आहे. विशेष म्हणजे सुर्वे यांचे त्यानंतर आलेले पत्र हा तत्कालीन संवादाची निर्मळ प्रवृत्ती दाखवतो. ही सगळी उदाहरणे निवडताना सरदेशमुख उलगडत जातात, हे वैद्यांचे यश म्हणायला हवे.
‘डांगोरा एका नगरीचा’ ही सरदेशमुखांची महत्त्वाची कादंबरी. प्रदीर्घ काळ चिंतन आणि लेखन झालेले. बारीकसारीक तपशिलाचा आग्रह, आत्मपर घटनांची सरमिसळ, श्रीपुंसारख्या विचक्षण संपादकाचे साहचर्य हे सगळे खूपच वेधक आहे. ‘डांगोरा’च्या या प्रवासाचा सगळा तपशील नितीन वैद्य यांनी बराच सविस्तर दिला आहे. त्यातून या कादंबरीचा लेखन प्रवास कळतो. आणि इतके सगळे होऊन देखील ‘डांगोरा’चे अधिकृत प्रकाशन आणि समारंभ झाला नाही. अंतिम हस्तलिखित झाले, त्या दिवशी सरदेशमुख स्मृतीमंदिराच्या हिरवळीवर पेढे घेऊन आले होते. जवळीकीचे हे दर्शन खूप साधे, मनोज्ञ आणि समाधानाचे होते. याच हिरवळीवर ते १५-१६ जणांसमोर ‘डांगोरा’चे वाचन करत होते.
अनुवादाच्या संदर्भात सरदेशमुख म्हणतात, ‘एका वैभवशाली अंत:करणासोबत सहलीला गेल्यासारखे वाटते’. सरदेशमुख आयुष्यभर संवाद करत राहिले, ते मौनात असणाऱ्या प्रतिभावंत व्यक्तींशी. या एकतर्फी संवादाचे हे संचित नितीन वैद्य यांनी आपल्याला सांगण्याचा घाट घातला. हे नक्षत्रांचे देणे आहे!
‘जवळिकीची सरोवरे’ - नीतीन वैद्य
डिंपल पब्लिकेशन, मुंबई
पाने - ३०२
मूल्य - ४०० रुपये.
..................................................................................................................................................................
लेखक जयंत राळेरासकर ध्वनिमुद्रिका संग्राहक आणि चित्रपट अभ्यासक आहेत.
jayantraleraskar@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment