अजूनकाही
विदर्भाच्या राजकारण, समाजकारण, शिक्षण, पर्यावरण आणि सांस्कृतिक क्षेत्रातील ज्येष्ठ नेते गिरीश गांधी आज, २३ जुलै २०२२ रोजी वयाच्या पंचाहत्तरीत प्रवेश करत आहेत. त्यानिमित्ताने प्रकाशित होणाऱ्या ‘सावली’ या गौरवग्रंथातील हा ‘अनकट’ लेख…
.................................................................................................................................................................
एखादं शहर पूर्ण जाणून घ्यायचं असेल तर अगदी गल्लीबोळात मनसोक्त पायी फिरा, लोकांशी बोला, त्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐका आणि एखादा माणूस जाणून घ्यायचा असेल, तर त्याच्यासोबत फिरा, त्याचा गोतावळा बघा, त्याच्याशी बोला, अशी शहर आणि माणूस जाणून घेण्याची अनेकांची शैली असते; माझीही आहे. गिरीश गांधी यांची ओळख १९८१त झाली. ‘मानव मंदिर’ या संस्थेच्यावतीने गरीब-गरजू विद्यार्थ्यांना तेव्हा मोफत सायकली दिल्या जात. शेकडोनं अर्ज येत. त्यातील पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी जी समिती गिरीश गांधी आणि अनंतराव घारड नेमत, त्यात चार वर्षं माझाही समावेश होता. त्या चार वर्षांत प्रशस्त रस्त्यांच्या पलीकडे असलेलं झोपडपट्टीत, नाल्याच्या काठावर राहणारं, नागरी सुविधांचा नावनिशाणा नसलेलं आत्यंतिक गरीब नागपूर अनुभवायला मिळालं. त्या भटकंतीतून नागपूरच्या मातीचा एक भाग मी झालो. जसं नागपूर उमजत गेलं, तसंच या काळात गिरीश गांधीही तुकड्या-तुकड्यात समजत गेले. माणूस म्हटल्यावर गुण आणि दोष आलेच; गिरीश गांधीही त्याला अपवाद नाहीतच, पण हा माणूस जिव्हाळ्याची सावली होऊन आपल्यासोबत वावरत असतो, हाच आजवरचा अनेकांचा अनुभव आहे, हे नि:संकोचपणे मान्य करायलाच हवं. या म्हणण्याचे अनेक दाखले देता येतील, पण त्यातील काही अनुभव इतके वैयक्तिक आहेत की, ते सांगितलेले गिरीश गांधी यांनाही आवडणार नाही.
नितळ गव्हाळ वर्ण, डोईवरचे काहीसे फुगवून मागे वळवलेले केस, मध्यम उंची, अंगावर साधारण अर्ध्या बाह्यांचा तलम खादीचा शक्यतो बुशशर्ट, त्या शर्टाच्या खिशाला हिरव्या शाईचा पेन, मंद रंगाची फुलपॅन्ट, बोलण्याचा स्वर बहुतांश वेळा ऋजू, असं गिरीश गांधी यांचं एकूण व्यक्तिमत्त्व आहे. ‘गिरीशभाऊ’ हे त्यांचं प्रचलित उल्लेखन परिवारात आहे. समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील गुणवंतांची मांदियाळी जमा करणं आणि त्यात रमणं, हा या माणसाचा छंद आहे. या आघाडीवर हा माणूस एवढा छंदिष्ट आहे की, एकटे गिरीश गांधी त्यांच्या घरातही पाहायला मिळत नाहीत. या छंदाचा विस्तार म्हणजे मित्र आणि मान्यवरांना, घरी किंवा हॉटेलात नेऊन भरपूर आग्रहानं खिलवणं हा आहे.
आसामात एका चहाच्या मळ्यात मॅनेजर म्हणून मिळणारी संधी नाकारून सुमारे पाच-साडेपाच दशकापूर्वी वरुडहून नोकरीसाठी नागपूरला आलेले गिरीश गांधी आता नागपूरच्या सार्वजनिक जीवनाचा एक अविभाज्य घटक झालेले आहेत. राजकारण, समाजकारण, पर्यावरण व वृक्षसंवर्धन, पत्रकारिता, शिक्षण, कृषी तसंच सांस्कृतिकतेच्या विविध दालनात गिरीश गांधी यांचा कार्यकर्ता ते नेता असा वैविध्यपूर्ण वावर आहे. गिरीश गांधी यांच्या वावरामुळे या सर्वच क्षेत्रात उत्साह संचारला, हे नाकबूल करणं आत्मवंचना ठरेल.
अनेक संस्था संघटनांच्या व्यवहारात काही क्षणांपूर्वी कार्यकर्ता किंवा संघटकांच्या भूमिकेत वावरणारे गिरीश गांधी नंतर व्यासपीठावर दिसतात. नुसतेच दिसत नाहीत तर, सभा गाजवून टाकतात. किती संस्था आणि संघटनांशी गिरीश गांधी संबंधित आहेत, यांची यादी करता येईल, पण किती संस्था व संघटनांना त्यांनी प्रेरणा दिली, आर्थिक बळ पुरवलं आहे, त्याची मात्र संख्या सांगता येणार नाही, इतकी ती मोठी आहे.
अगदी हेच गिरीश गांधी यांनी संकट समयी मदत केलेल्या माणसांबाबतही लागू आहे. समोरच्यांचा परदेश प्रवास असो की, घर घेणं की, आजारपण की, गरजूला नोकरी मिळवून देणं, अशा अनेक समयी गिरीश गांधी यांचा हात कायम खंबीर दात्याच्या भूमिकेत असतो. मी तर नेहमी म्हणतो, ‘समोरचा स्नेहीजन संकटात येण्याच्या नेमक्या वेळी गिरीश गांधी यांचा धीर देणारा एक हात त्याच्या पाठीवर आणि दुसरा त्याच्या खिशात असतो’. एखाद्याला नोकरी मिळवून देण्यासाठी तो गरजू जितक्या चकरा मारणार नाही, त्यापेक्षा जास्त हेलपाटे त्या संस्थेच्या व्यवस्थापनाकडे गिरीश गांधी मारणार, असा अनुभव मी अनेकांच्या बाबतीत अनेकदा घेतलेला आहे. यातल्या फारच थोड्या माणसांनी त्या मदतीबद्दल गिरीश गांधी यांच्याबद्दल कायम कृतज्ञता बाळगली असल्याचाही अनुभव आहे, मात्र अंतरीचं हे शल्य सहसा उघड न करण्याचा सुसंस्कृतपणा गिरीश गांधी यांच्यात आहे. हे असं वागणं फार कमी लोकांना जमतं, हे नक्की.
संस्थात्मक पातळीवर वावरताना गिरीश गांधींनी बाळगलेली शिस्त आवर्जून लक्षात घेण्यासारखी आहे. पदाधिकारी म्हणून नातं असलेल्या गिरीश गांधी यांच्या प्रत्येक संस्थेची प्रशासकीय आणि आर्थिक घडी अनुकरणीय आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील प्रत्येक संस्था आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण आणि सर्व हिशेब तसंच कार्यालयीन रेकॉर्ड एकदम चोख. ज्या कामासाठी संस्था स्थापन केली, त्या कामासाठी निधी कधी कमी पडल्याचा अनुभव गिरीश गांधी यांच्या बाबतीत येत नाही. रुपयांच्या कमी होणाऱ्या अवमूल्यनामुळे निधी क्वचित कमी पडला, तर त्यासाठी अन्य कोणत्या संस्थेतून निधी वळता करून घेण्याचा ‘अव्यापारेषू’ व्यवहार गिरीश गांधी कधीच करत नाहीत, तर हवी तेवढी भर टाकतात. त्यामुळे एका संस्थेच्या आर्थिक व्यवहाराच्या तंगड्या दुसऱ्या संस्थेच्या पायात अडकलेल्या आहेत आणि एका क्षणी दोन्ही संस्थांचे व्यवहार ठप्प झालेले आहेत, असं होत नाही. अनेक संस्थांचं सारथ्य करत असताना ‘इकडून तिकडे’ पैसे वळवण्याचा ट्रेंड सार्वत्रिक असताना गिरीश गांधी मात्र त्याला अपवाद आहेत.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
‘कदरदान’ता हे गिरीश गांधी या माणसाचं आणखी एक वैशिष्ट्य. बहुसंख्य लोक दुसऱ्याचं कौतुक करण्याच्या बाबतीत कंजूष असतात, पण गिरीश गांधी त्याला पूर्ण अपवाद आहेत. स्नेहीजनांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याऱ्या पत्रावर केलेल्या हिरव्या रंगाच्या शाईनं लफ्फेदार सहीनं याची सुरुवात होते. माझ्या अंदाजाप्रमाणं वर्षभरात अशी दोन हजारांवर तरी शुभेच्छा पत्र गिरीश गांधी पाठवत असणार. हेच गिरीश गांधी स्वत:च्या वाढदिवसाच्या जाहीरपणाबद्दल मात्र फारसे उत्सुक नसतात. त्यांचा साठीचा सत्कार एकसष्ठी उलटल्यावर आणि तेही ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार व ज्येष्ठ विचारवंत डॉ. भास्कर लक्ष्मण भोळे यांनी पुढाकार घेतल्यावर कसा झाला, याचा मी एक साक्षीदार आहे. याही कार्यक्रमात गिरीश गांधी सत्कारमूर्ती म्हणून नाही, तर कार्यकर्ता म्हणून वावरले, ही त्यांच्यातली शालीनता होती हे लक्षात घ्यायला हवं.
प्रकाशित झालेली बातमी किंवा मुद्रित माध्यमातला अन्य मजकूर चांगला आहे, हे सांगणारा पहिला फोन गिरीश गांधी यांचा असतो. हेच प्रकाशित झालेल्या साहित्याबद्दलही. एक बाब इथे आवर्जून नोंदवून ठेवायला हवी-पुस्तक प्रकाशित होणं हा लेखक-कवीच्या आयुष्यातला आनंद आणि प्रातिभ समाधानाचा एक सुवर्णक्षण असतो, पण देखणा प्रकाशन सोहळा करणं मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर असतं. अशा समयी असे अत्यंत नेटके कार्यक्रम आयोजित करण्यात गिरीश गांधी यांनी वैपुल्यानं पुढाकार घेतल्याचा अनुभव अनेकांना आजवर आलेला आहे. सांस्कृतिक क्षेत्रातल्या बहुसंख्य लोकांचे अहंकार फारच टोकदार असतात. अगदी हवेच्या छोट्याशा झुळुकीनंही त्या अहंकाराचा भडका उडतो आणि मानापमानाचे प्रयोग सादर होतात. मात्र, अशा सर्वांना सांभाळून घेणाऱ्या गिरीश गांधी यांच्या संयम व सहिष्णुतेला दाद द्यावी लागेल. हे सांभाळत नागपूर आणि विदर्भात साहित्य, संगीत, चित्रविषयक कार्यक्रम, संमेलनं आयोजित करण्यात गिरीश गांधी यांची इतकी मक्तेदारी निर्माण झाली की, एकदा ‘लोकसत्ता’त लिहिलेल्या एका मजकुरात त्यांचा उल्लेख मी ‘विदर्भाचे सांस्कृतिक प्रवक्ते’ असा केला आणि तो सर्वमान्य झाला!
गुणी जनांचं कौतुक करण्याचा पुढचा टप्पा म्हणजे, नागपूर आणि विदर्भाच्या क्षितिजावर विविध पुरस्कार सुरु करण्यात गिरीश गांधी यांनी घेतलेला पुढाकार. हा खरं तर एक स्वतंत्र विषय आहे. नागपूर आणि विदर्भ भूषण ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, प्रकाश देशपांडे यांच्या नावाने पुरस्कार असा हा सन्मानांचा व्यापक पट आहे. या उपक्रमांमुळे नागपूरकर गिरीश गांधी विदर्भातच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचले. सन्मान देण्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करण्याच्या प्रक्रियेत गिरीश गांधी यांच्या सोबत काम करण्याची संधी मलाही अनेकदा मिळाली. त्यामुळे त्यांचं वाचन आणि राज्यात कुठे कोण काय विधायक काम करत आहे, ही माहिती असण्याचा आवाका किती मोठा आहे, हे लक्षात आलं. असा सन्मान देतांना समोरच्यांच्या दोष किंवा उणिवांची चर्चा न करणं आणि केवळ त्याचं कर्तृत्व विचारात घेणं, ही गिरीश गांधी यांची खासीयत दुर्मीळ आहे. नियमाला अपवाद म्हणून की काय, अगदीच क्वचित असा सन्मान देण्यासाठी निवड करताना गिरीश गांधी जास्तच ‘दयाळू’ होतात, असाही अनुभव आहे. अग्रलेख मागे घेण्याचा जागतिक नीचांक करणाऱ्या संपादकाला ‘प्रबोधनकार ठाकरे’ सन्मान देण्याचा त्यांचा निर्णय मला नेहमीच ‘धाडसी दयाळू’पणाचा वाटत आलेला आहे, पण ते असो.
महाराष्ट्रातल्या राजकारणात गिरीश गांधी यांचा वावर आणीबाणीच्या आधीपासून आहे. विधानसभेची एक निवडणूकही त्यांनी त्या काळात लढवली होती. लोकशाहीच्या मूल्यांवर त्यांची नितांत श्रद्धा आहे म्हणूनच या मूल्यांचा होणारा संकोच त्यांना अस्वस्थ करतो. त्यांचं राजकीय आकलन आणि सर्व राजकीय पक्षांतला त्यांचा शीर्ष नेतृत्वाशी असणारा संपर्क व वावर राष्ट्रीय तसाच राजकारण विरहित आहे. दिल्ली, मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद, अमरावती अशा विविध ठिकाणी गिरीश गांधी यांच्यासोबत प्रवास करण्याची संधी मिळाली, तेव्हा त्यांचा हा अफाट लोकसंग्रह लक्षात आला.
जगजीवनराम, पी.व्ही. नरसिंहराव, शंकरराव चव्हाण यांच्यापासून ते राज्यातल्या अनेक मुख्यमंत्र्यांशी गिरीश गांधी यांची असणारी ही विश्वासाची घसट मी ‘फर्स्ट हँड’ अनुभवली आहे. अनेक राजकीय दिग्गजांच्या खास गोटातले म्हणून ते अजूनही ओळखले जातात, तरी राजकारणात गिरीश गांधी नावाचा माणूस ‘वाट चुकलेला मुसाफीर’ आहे. जनता दल, राष्ट्रवादी ते काँग्रेस या प्रवासात त्यांच्यातल्या क्षमतांना न्याय मिळणं तर लांबच राहिलं, त्या क्षमता सिद्ध करण्याची किमान संधीही त्यांना मिळाली नाही, असं माझं ठाम मत आहे. लोकशाही मूल्यांवरील परकोटीची श्रद्धा आणि ‘ॲक्रॉस द पार्टी’ असणारा गिरीश गांधी यांचा संपर्क तर, त्यासाठी अडथळा ठरला नसावा ना, अशी शंका अनेकांच्या प्रमाणे माझ्याही मनात आहे. याबद्दल केव्हा तरी गिरीश गांधी यांनीच जाहीर खुलासा करायला हवा. राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना विधानपरिषद सदस्यत्व दिलं, पण तेही अल्पकाळच. पुन्हा हे सदस्यपद पूर्ण टर्म त्यांना मिळालं नाही, कारण समोर सार्वत्रिक निवडणुका होत्या आणि मतांसाठी ‘गांधी’ऐवजी दुसऱ्या कुणाला उमेदवारी देणं, हा त्या पक्षाचा प्राधान्यक्रम ठरला, अशी चर्चा तेव्हा झाली. ती खोटी कशी काय असू शकेल, पण, कोणतीही खळखळ न करता अपरिहार्यता म्हणून ते नाकारणं खिलाडू वृत्तीनं गिरीश गांधी यांनी स्वीकारलं. त्या छोट्या कारकिर्दीतही त्यांनी छाप उमटवली. आमदार म्हणून मिळणारं सेवानिवृत्ती वेतन सरकारी खजिन्यात जमा करणारे माझ्या साडेचार दशकांच्या पत्रकारितेतील गिरीश गांधी हे एकमेव आहेत.
अकाली दिवंगत झालेली प्रतिभावान अभिनेत्री स्मिता पाटील हा गिरीश गांधी यांचा हळवा कोपरा आहे. स्मिता पाटील हिच्या स्मृत्यर्थ गेल्या साडेतीन दशकांपासून एक वार्षिकांक गिरीश गांधी प्रकाशित करतात. स्त्री हेच या अंकाचं सूत्र असतं. आजवरच्या जवळ जवळ प्रत्येकच अंकाला संदर्भमूल्य आहे. एकाच विषयावर इतका प्रदीर्घ काळ वार्षिकांक प्रकाशित होण्याचा मराठीतला तरी हा विक्रम असणार. या अंकाचं तीन वेळा संपादन मी केलं. ते करताना ‘मालक’ गिरीश गांधी यांनी मला पूर्ण स्वातंत्र्य आणि अतिशय सन्मानजनक मानधन दिलं हे आवर्जून सांगायला हवं. ‘आईकडे एक स्त्री म्हणूनही पहिलं पाहिजे’ हे माझ्या ‘आई’ या अंकाचं सूत्र तसं तर स्वीकारायला कठीण होतं, पण त्यासंदर्भात अतिशय खुला दृष्टीकोन गिरीश गांधी यांनी दाखवला. मी संपादित केलेली ‘आई’ आणि ‘माध्यमातील ती’ ही दोन पुस्तकं म्हणजे याच अंकातील मजकुराची सुधारित आवृत्ती आहे. ठरवलं असतं तर कॉपीराईटचा मुद्दा काढून त्या मजकुराची पुस्तकं करताना बराच ‘मालकी हक्क’ गिरीश गांधी यांना दाखवता आला असता, पण त्यांनी कोणतीच खळखळ केली नाही. असं उमदेपणानं वागणं प्रत्येकालाच जमेल असं कधीच नसतं.
प्रत्येकाला भावलेले (आणि कदाचित काहींना न भावलेलेही!) गिरीश गांधी वेगवगळे असणं अगदी स्वाभाविक आहे. शिवाय त्यांचं व्यक्तिमत्त्वही बहुपेडी आहे, म्हणून ते कुणा एकाच्या कवेत मावणार नाही. मला गिरीश गांधी हे एखाद्या झाडासारखे वाटतात. झाड शीतल छाया, फुलं आणि फळं देतं. गिरीश गांधी नावाचं झाड जिव्हाळ्याची सावली देणारं आहे.
..................................................................................................................................................................
लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment