कालिदासाची सौंदर्यदृष्टी किती सूक्ष्म निरीक्षणांतून जन्मली आहे, याची अनेक उदाहरणे देता येण्यासारखी आहेत…
पडघम - साहित्यिक
श्रीनिवास जोशी
  • चंबळा नदीचं एक छायाचित्र
  • Fri , 22 July 2022
  • पडघम साहित्यिक कालिदास Kalidasa कालिदास दिन Kalidasa Din मेघदूत Meghadūta आषाढस्य प्रथम दिवसे Aashadhasya Prathama Divase

३० जूनपासून आषाढाला सुरुवात झाली… आणि आषाढ म्हटला की, अनेकांना महाकवी कालिदासाच्या ‘मेघदूत’ची आठवण येते. ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या त्यातल्या शब्दांना तर ‘मोस्ट कोटेबल कोट’चा दर्जा मिळालाय! आणि ‘मेघदूत’? त्याची ख्याती काय वर्णावी! गेल्या अनेक वर्षांपासून ‘मेघदूत’ मराठीसह जगभरच्या लेखक, कवी, अनुवादक आणि रसिकवाचकांना मोहिनी घालत आले आहे. त्याची ओळख करून देणारे हे सदर १२ जुलैपासून रोज...

.................................................................................................................................................................

लेखांक दहावा

पूर्वमेघ

(लेखातला पहिला मूळ संस्कृत श्लोक कालिदासाचा आणि त्याचे अनुवाद अनुक्रमे कुसुमाग्रज, सी.डी. देशमुख आणि शांता शेळके यांचे)

४१.

तस्याः किंचित्करधृतमिव प्राप्तवानीरशाखं

नीत्वा नीलं सलिलवसनं मुक्तरोधोनितम्बम्।

प्रस्थानं ते कथमपि सखे ! लम्बमानस्य भावि

ज्ञातास्वादो विवृतजघनां को विहातुं समर्थः॥

 

तिच्या जलाचा सुनील शालू कटीतटाहुन सरे

सावरतां गर्दीत कराने, वेतलतांवर चिरे

वस्त्र ओढुनी तिथें थांबतां, प्रयाण व्हावें कसें?

अंक अनावृत सोडुनि जाइल रसिक कोणता बरें!

 

जैसें किंचित करधृत तिचे वेत्रशाखांत लीन

घेशी नीराम्बर तट-कटी-भ्रष्ट जेव्हां हरून

कैसा मित्रा नततनु पुढें चालशी त्या प्रसंगी

आस्वादज्ञ त्यजिल कुणी कां स्त्री अनाच्छादितांगी

 

लवले वेळू - त्याच करांनीं धरिल जरी ती स्वयें सावरुन

नीलजलाचें वसन तियेचें कटिवरुनी तूं घेईं खेंचुन

कामोत्सुक तू झुकतां तीवर प्रयाण तुजला सुचेल कुठुनी?

प्रणयरसाचा ज्ञाता कुणि कां विमुक्तवसना सोडिल सजणी?

 

निळ्या पाण्याचे वस्त्र गंभीरा नदीच्या तीररूपी नितंबांवरून आणि मांड्यांवरून खाली ओढले गेले आहे. ते पात्रातील वेतांच्यापर्यंत हटलेले आहे. त्यामुळे ते निळ्या पाण्याचे वस्त्र तिने आपल्या हातांनी किंचित सावरून धरलेले आहे, असे दिसते आहे. हे वस्त्र, हे मेघा तूच अजून थोडे खाली वाकून अजून थोडे ओढून घेतो आहेस. मित्रा, तिला असे विवस्त्र केल्यावर पुढच्या प्रवासासाठीचे  प्रयाण तुला कष्टाचेच होईल. कारण, कामसुखाची गोडी ज्याने चाखली आहे, असा कोण पुरुष जिचा कटिप्रदेश अनावृत्त आहे, अशा स्त्रीला सोडून जाऊ शकेल?

चंद्रा राजन यांनी या श्लोकाचा अतिशय सुंदर अनुवाद केला आहे-

“Her dark-blue waters like a garment

slipping off the sloping bank of her hips,

still cling to the reed-branches as if

lightly held up by one hand; drawing

it away as you bend over her, my friend,

will it not be hard for you to depart?

For who can bear to leave a woman,

her loins bared, once having tasted

her body’s sweetness?”

तिचे (गंभीरेचे) गडद निळे पाणी एखाद्या वस्त्राप्रमाणे तिच्या नितंबांच्या काठांवरून खाली घसरले आहे, परंतु ते अजूनही वेतांना बिलगून बसले आहे. जणू काही ते तिने एका हाताने अलगद असे आपल्या शरीरावर सावरून धरलेले आहे. तू खाली वाकून ते वस्त्र अजून थोडे खेचून घेतो आहेस. मित्रा तू असे केले आहेस खरे, पण आता इथून तुझा पाय निघणे अवघड नाही का होणार? कारण जिचा कटिभाग उघडा आहे, अशा स्त्रीला तिच्या शरीराची गोडी चाखलेला, असा कोणता पुरुष सोडून जाऊ शकेल? 

आपल्यावर अनुरक्त झालेल्या आणि त्यातही अनावृत असलेल्या स्त्रीला कोण बरे सोडून जाईल.

शेवटची मनोरम ओळ अनुवादित करताना कुसुमाग्रज, सीडी आणि शांताबाई या तिघांनीही मोठी मौज उडवून दिली आहे!

कुसुमाग्रज लिहितात - ‘अंक अनावृत सोडुनि जाइल रसिक कोणता बरें!’

सी डी लिहितात – ‘आस्वादज्ञ त्यजिल कुणी कां स्त्री अनाच्छादितांगी’

आस्वादातील कोण तज्ज्ञ जिचे अंग अनाच्छादित आहे, अशा स्त्रीला सोडून जाईल.

आणि शांताबाई लिहितात – ‘प्रणयरसाचा ज्ञाता कुणि कां विमुक्तवसना सोडिल सजणी?’

प्रणयरस जाणणारा कोणता पुरुष आपल्या वस्त्रांपासून मुक्त झालेल्या स्त्रीला सोडून जाईल!

४२.

त्वन्निष्यन्दोच्छ्वसितवसुधागन्धसंपर्करम्यः

स्रोतोरन्ध्रध्वनितसुभगं दन्तिभिः पीयमानः।

नीचैर्वास्यत्युपजिगमिषोर्देवपूर्वं गिरिं ते

शीतो वायुः परिणमयिता काननोदुम्बराणाम्॥

 

तहान शमतां श्वास टाकिते धरती गंधांकित

सेवन करिती सोंडेनें गज होउनि आनंदित

समीर ते पिकवीत काननामधील औदुंबर

देवगिरीला येतिल मेघा, तुजसंगे वाहत.

 

वर्षावाने प्रकटित तुझ्या रम्य गन्धें धरेच्या

शुण्डारन्ध्री सळसळ करी सेवनीजो करींच्या

तू येता देवगिरीजवळी तेथूनी वाहणारा

धीरेधीरे पिकविल वनीं उम्बरां गार वारा

 

तुझ्या सरींनीं भिजली भूमी उच्छ्वासें त्या होय सुगंधित

शीतळ वारा असा सेवितां सुखावले गज करिती गर्जित

रानउंबरावरी बाजल्या फळांस देईं अधिक पक्वता

मंद वाहुनी सुखविल तुज, तूं देवगिरीला जाया निघतां

 

तुझ्या वृष्टीमुळे पृथ्वी आनंदाचे सुगंधी निश्वास टाकते आहे. यामुळे तिच्या संपर्कात आलेला वारा सुगंधित झालेला आहे. हा सुगंधित वारा, हत्ती आपल्या सोंडांनी प्राशन करत आहेत. त्यामुळे अत्यंत मधुर ध्वनी तयार होत आहेत. हा वारा उंबराच्या फळांना पक्व करत वाहतो आहे. हे मेघा, असा हा वारा तू देवगिरीला जात असताना तुला साथ करत तुझ्या खालून वाहत राहील.

या श्लोकावर बोरवणकरांनी टीप लिहिली आहे – “पाऊस पडल्यावर जमिनीतून ज्या सुगंधित वाफा निघतात, त्यावर उन्हाने संतप्त झालेली जमीन जलवृष्टी होताच शांत होऊन आनंदाचे निश्वास सोडू लागली आहे, अशी कल्पना कवीने केली आहे.”

बोरवणकर पुढे लिहितात, “या श्लोकातील देवगिरी म्हणजे दक्षिणेतील देवगिरी नव्हे. माळव्यात चंबळा नदीच्या काठी एक देवगड आहे. या गावातील टेकडीवर कार्तिकेयाचे एक मंदिर आहे आणि पुढच्या श्लोकात कार्तिकेयाचा उल्लेख आहे.” बोरवणकरांच्या म्हणण्यानुसार कालिदासाचे देवगिरी म्हणजे हे देवगड असावे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

४३.

तत्र स्कन्दं नियतवसतिं पुष्पमेघीकृतात्मा

पुष्पासारैः स्नपयतु भवान् व्योमगङ्गाजलार्द्रैः।

रक्षाहेतोर्नवशशिभृता वासवीनां चमूना - 

मत्यादित्यं हुतवहमुखे संभृतं तद्धि तेजः।।

 

कार्तिकेय तो जन्म जयाचा हो शिवतेजांतुन

मुनिवर तेथें वसे करोनि इंद्राचें पालन!

कामरूप तूं - धारण करुनी पुष्पाची आकृती

व्योमनदीच्या करीं जलानें त्याला अभिसिंचन,

 

तेथें स्कन्द स्वपद करितो, पुष्पमेघस्वरूपें

स्वर्गंगेच्या सलिलिं भजलीं त्यावरी वर्षिं पुष्पें

तो वन्हीच्या मुखिं शशिधरे देवसेवनार्थ

सूर्यापेक्षा प्रखर दिधलें सोडुनी तेज मूर्त

 

कार्तिकेय ज्या ठायीं वसतो, मेघ फुलांचा होउन तेथें

स्वर्गंगेच्या जळांत भिजल्या आर्द्र फुलांनीं भिजव तयातें

तेज शिवें अग्नींत ठेविलें रक्षायास्तव चमू वासवी

त्यांत जन्मला कार्तिकेय, जो सूर्याहुनिही अति तेजस्वी

 

हे मेघा, देवगिरीवर कायम वास्तव्य करून असलेल्या स्कंदाची तू अर्चना कर. त्यासाठी तू स्वतः पुष्पमेघाचे रूप घे आणि आकाशगंगेच्या जलाने ओल्या झालेल्या पुष्पांच्या वृष्टीने स्कंदाला अभिषेक कर! इंद्राच्या अफाट सेनांचे रक्षण करण्यासाठी सूर्यापेक्षाही प्रचंड असे, हे तेज चंद्रकलाधारी शंकराने अग्नीच्या मुखात ठेवलेले आहे.

या मागे एक आख्यायिका आहे. ती लक्षात घेतली तर या श्लोकाचा अर्थ आपल्या लक्षात येतो. ही आख्यायिका बोरवणकरांनी दिली आहे. - तारकासुर जेव्हा प्रमत्त होऊन देवांना त्रास देऊ लागला, तेव्हा त्यांनी भगवान शंकरांची प्रार्थना केली. शंकरांनी त्यांना तारकासुराच्या त्रासातून सोडवण्याचे अभिवचन दिले आणि ते पार्वतीबरोबर एकांतात गेले. देवांनी पुष्कळ वाट पाहिली. इकडे तारकासुराचा त्रास होतच होता. शेवटी त्यांनी अग्नीला शंकराकडे पाठवले. अग्नी कबुतराचे रूप घेऊन गेला, परंतु शंकरांनी त्याला ओळखले. त्या वेळी न रागावता त्यांनी आपले स्खलन झालेले रेत अग्नीच्या मुखामध्ये टाकले. अग्नीला ते तेज सहन होईना. त्याने ते गंगेत टाकले. तेथून ते सहा कृत्तिकांच्या गर्भात गेले. त्यांनाही ते सहन झाले नाही, म्हणून त्यांनी ते ‘शर’ नावाच्या गवताच्या बेटात टाकले. तेथे त्यापासून पुत्र उत्पन्न झाला. या पुत्राने तारकासुराचा वध करून देवांचा त्रास चुकवला. तोच हा स्कंद.

शंकरांच्या स्खलन झालेल्या रेतापासून जन्मला म्हणून ‘स्कंद’ हे नाव पडले. अग्नीच्या मुखात ते पडले, म्हणून ‘अग्निभू’ हे नाव पडले. गंगेत पडले म्हणून ‘गांगेय’ हे नाव पडले. सहा कृत्तिकांच्या गर्भात गेले म्हणून ‘षण्मासुर’ आणि ‘कार्तिकेय’ ही नावे पडली.

कृत्तिका म्हणजे अर्थातच कृत्तिका नक्षत्र! यात डोळ्यांनी दिसणारे सहा तारे असतात, म्हणून सहा कृत्तिका!

शांताबाईंनी या श्लोकाचा अनुवाद अतिशय सुंदर केला आहे-

‘कार्तिकेय ज्या ठायीं वसतो, मेघ फुलांचा होउन तेथें

स्वर्गंगेच्या जळांत भिजल्या आर्द्र फुलांनीं भिजव तयातें

तेज शिवें अग्नींत ठेविलें रक्षायास्तव चमू वासवी

त्यांत जन्मला कार्तिकेय, जो सूर्याहुनिही अति तेजस्वी’

४४.

ज्योतिर्लेखावलयि गलितं यस्य बर्हं भवानी

पुत्रप्रेम्णा कुवलयदलप्रापि कर्णे करोति।

धौतापाङ्गं हरशशिरुचा पावकेस्तं मयूरं

पश्चादद्रिग्रहणगुरुभिर्गर्जितैर्नर्तयेथाः॥

 

मयूर तेथें, पीस तयांचें ज्योतिर्वलयांकित

वत्सल गौरी कमलदलासम कानावरि खोवित,

चंद्रकरांनी धुतल्या ज्याच्या नीलाक्षांच्या कडा

नाचव त्याला घुमवुनि अपुलें गिरीमधें गर्जित!

 

तेजोलेखावलयि गळलें पिच्छ ज्याचें भवानी

वात्स्यल्याने कुवलदलापाशिं घाली स्वकर्णीं।

ज्याच्या नेत्रां हरशशिकरें शुभ्रता येत बर्ही

स्कन्दाचा तो कुहरिं घुमत्या नाचवीं गर्जनांही।।

 

शिवमस्तकिंच्या चंद्रकलेने उजळुन गेले ज्याचे लोचन

स्कंदाच्या प्रिय मयुरा नाचव गिरीदरींतुन गर्जित घुमवुन

वलयांकित जैं पीस तयाचें गळेल रमतां धुंद नर्तनीं

पुत्रस्नेहें सहज भवानी कमलदलासह खोविल कानीं

 

तेजाच्या रेखांची मंडले असलेले ज्याचे पीस पार्वती आपल्या पुत्रावरील प्रेमामुळे आपल्या कर्णावर कमलपुष्पाच्या समवेत धारण करते; आणि ज्याच्या डोळ्यांचे कोन शिवाच्या मस्तकीच्या चंद्रप्रकाशामुळे शुभ्र रंगाचे झालेले आहेत, अशा मयुराला तू पर्वतातील गुहा-कुहरांतून प्रतिध्वनित होणाऱ्या गर्जना करून नृत्य करायला लाव.

स्कंदाचे म्हणजे कार्तिकस्वामीचे वाहन मयूर, हे सर्वांना माहीत असते. स्कंदाची पूजा झाल्यावर मयुराला आपल्या गर्जना करून तू नाचायला लाव, असे यक्ष सांगतो आहे.

मोराच्या डोळ्यांभोवती अतिशय सुंदर अशा पांढऱ्या रेखा असतात. त्यांचा एक रेखीव कोनच डोळ्यांभोवती झालेला असतो. गुगलवर मोराची छायाचित्रं बघितली की, आपल्याही लक्षात ते सौंदर्य येईल. या रेखा शिवाच्या मस्तकावरच्या चंद्रप्रकाशामुळे शुभ्र रंगाच्या झालेल्या आहेत, असे यक्ष सांगतो आहे.

याचे भाषांतर सीडी अतिशय सुंदर करतात- ‘ज्याच्या नेत्रां हरशशिकरें शुभ्रता येत बर्ही’.

ज्याच्या नेत्रांच्या बाहेरच्या भागाला हरीच्या मस्तकीच्या चंद्राच्या करांमुळे शुभ्रता आलेली आहे.

कालिदासाची सौंदर्यदृष्टी किती सूक्ष्म निरीक्षणांतून जन्मली आहे, याचे हे मोठे उदाहरण आहे.

४५.

आराध्यैनं शरवणभवं देवमुल्लङ्घिताध्वा

सिद्धद्वन्द्वैर्जलकणभयाद्वीणिभिर्मुक्तमार्गः।

व्यालम्बेथाः सुरभितनयालम्भजां मानयिष्यन्

स्रोतोमूर्त्या भुवि परिणतां रन्तिदेवस्य कीर्तिम्।।

 

गांगेयाचें करून पूजन जा पुढती, सिद्ध ते -

भय वर्षेचें वाटुन करतिल मार्ग तुझे रे रिते

पुढें चंबला नदी, घडीभर भाविकतेनें रहा

रंतिनृपाच्या गोयज्ञांची कीर्तिच ती वाहते!

 

स्कन्दा ऐसें पुजुनि निघणे, सोडिती सिद्ध जाया-

संगें मार्गा  तव भिजुनियां जाइ वीणा भयें या

भेटें खालीं उतरुनि नदीरूप ती कीर्ति भावें

जी धेनूंचे यजन करुनि जोडिली रन्तिदेवे

 

वेतसकुंजोद्भव स्कंदातें आराधुन तूं जातां पुढती

वंशीधर सिद्धांची युगलें तुझ्या भयानें बाजुस होती

गोयज्ञांतुन जन्मा आल्या चर्मण्वतिवर होईं तूं नत

रन्तिदेवकीर्तीच जणूं ती प्रवाहरूपें झाली परिणत

 

या शरगवताच्या बेटामध्ये जन्मलेल्या देवाची पूजा केल्यानंतर तू पुढे निघालास की, हातामध्ये वीणा घेतलेली सिद्धांची जोडपी भीतीमुळे तुला मार्ग करून देतील. कारण तुझे थेंब वीणांवर पडतील, अशी भीती त्यांना वाटेल. थोडा मार्ग चालून गेल्यावर तुला राजा रन्तिदेव याच्या गोयज्ञांमुळे भूतलावर अवतरलेली नदी लागेल. ती रन्तिदेवाची वाहती कीर्तीच आहे. तिचा सन्मान करण्यासाठी तू थोडा खाली उतरून ये.

बोरवणकर या श्लोकावरील आपल्या टिपेमध्ये लिहितात – “रन्तिदेव हा भरतकुलात उत्पन्न झालेला राजा होता. त्याने इतके गोयज्ञ केले की, त्यात मारलेल्या गाईंच्या कातड्यातून स्रवणाऱ्या रक्ताची नदी झाली. तिला ‘चर्मण्वती’ हे नाव मिळाले. श्लोकातील नदीरूपाने वाहणारी कीर्ति म्हणजेच चर्मण्वती. हल्ली ती ‘चंबळा’ या नावाने ओळखली जाते.”

स्कंदाला शर गवतात जन्मलेला देव का म्हणतात, या विषयी बोरवणकरांची टीप ४३व्या श्लोकाखाली दिलेलीच आहे.

..................................................................................................................................................................

लेखांक पहिला : कालिदासाच्या काव्यातील एकेक श्लोक सौंदर्यवंत ऐरावतासारखा झुलत राहतो, आणि त्यावर आशयाचा ऐश्वर्यमान इंद्र आरूढ झालेला असतो!

लेखांक दुसरा : उत्कंठा उत्पन्न करणाऱ्या त्या मेघासमोर यक्ष आपले अश्रू आवरत कसाबसा उभा राहिला…

लेखांक तिसरा : कालिदास आपल्याला आपल्या जगातून उचलतात आणि प्रेमाच्या व सौंदर्याच्या तीव्र संवेदनांनी भारलेल्या जगात घेऊन जातात…

लेखांक चौथा कालिदासाला जेव्हा जेव्हा प्रकृतीतील अपार सौंदर्य दिसते, तेव्हा तेव्हा त्याला पुरुष-तत्त्वाची आठवण होते…

लेखांक पाचवा : कालिदासाच्या सौंदर्यदृष्टीचा स्पर्श त्याच्या अनुवादकांनासुद्धा होतो…

लेखांक सहावा : येथून आपला कालिदासाच्या ‘मेघदूता’तील श्रृंगाररसाच्या प्रवाहात प्रवेश होतो.…

लेखांक सातवा : आपल्या प्रेमामुळे दुसरी व्यक्ती किती आनंदी होते आहे, यावर आपल्या प्रेमाचे भाग्य अवलंबून असते!

लेखांक आठवा : कालिदास सगळे वातावरणच स्त्री-पुरुषांतील प्रेमामध्ये अध्याहृत असलेल्या अनिवार वेडाने भारावून टाकतो...

लेखांक नववा : प्रेमात पडलेल्या स्त्रीच्या प्रेमाचा अव्हेर करणे, यक्षाला योग्य वाटत नाही. म्हणून तो मेघाला सांगतो आहे…

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......