प्रेमात पडलेल्या स्त्रीच्या प्रेमाचा अव्हेर करणे, यक्षाला योग्य वाटत नाही. म्हणून तो मेघाला सांगतो आहे…
पडघम - साहित्यिक
श्रीनिवास जोशी
  • रेखाचित्र चिं. द्वा. देशमुख यांच्या ‘मेघदूत’ या - वरदा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या - अनुवादित आवृत्तीमधून
  • Thu , 21 July 2022
  • पडघम साहित्यिक कालिदास Kalidasa कालिदास दिन Kalidasa Din मेघदूत Meghadūta आषाढस्य प्रथम दिवसे Aashadhasya Prathama Divase

३० जूनपासून आषाढाला सुरुवात झाली… आणि आषाढ म्हटला की, अनेकांना महाकवी कालिदासाच्या ‘मेघदूत’ची आठवण येते. ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या त्यातल्या शब्दांना तर ‘मोस्ट कोटेबल कोट’चा दर्जा मिळालाय! आणि ‘मेघदूत’? त्याची ख्याती काय वर्णावी! गेल्या अनेक वर्षांपासून ‘मेघदूत’ मराठीसह जगभरच्या लेखक, कवी, अनुवादक आणि रसिकवाचकांना मोहिनी घालत आले आहे. त्याची ओळख करून देणारे हे सदर १२ जुलैपासून रोज...

.................................................................................................................................................................

लेखांक नववा

पूर्वमेघ

(लेखातला पहिला मूळ संस्कृत श्लोक कालिदासाचा आणि त्याचे अनुवाद अनुक्रमे कुसुमाग्रज, सी.डी. देशमुख आणि शांता शेळके यांचे)

३६.

पश्चादुच्चैर्भुजतरुवनं मण्डलेनाभिलीनः

सान्ध्यं तेजः प्रतिनवजपापुष्परक्तं दधानः।

नृत्यारम्भे हर पशुपतेरार्द्रनागाजिनेच्छां

शान्तोद्वेगस्तिमितनयनं दृष्टभक्तिर्भवान्या॥

 

उभारलेल्या भुजा शिवाच्या, त्यांवर हो कंकण

जास्वंदीसम नव संध्येचें तेज करी धारण

तूंच आर्द्र हो चर्म गजाचें प्रभु करितां तांडव

अभय होउनी करिल उमा मग स्नेहानें प्रेक्षण!

 

जें बाहूंचे तरुवन उभें मंडले तेथ लीन

सन्ध्यातेजें मग नवजपापुष्पसा रक्तवर्ण

नृत्यारंभीं पुरविं करिचें आर्द्रचर्म प्रभूला

गौरीं धैर्यें अचल नयनीं पाहू दे भक्तलीला

 

फिरवित वेगें बाहूंचें बन करील जेव्हां ताण्डव शंकर

जास्वंदीसम संध्यारंजित होउनियां करिं वलय भुजांवर

ओल्या गजचर्मापरि घेईं नृत्यारंभीं शिवा वेढुनी

शान्त होउनी प्रसन्ननयनीं निरखिल प्रेमें तुला भवानी

 

नंतर शिवाचे तांडवनृत्य सुरू होईल, तोपर्यंत तुला ताज्या जास्वंदीच्या फुलासारखे आरक्त तेज प्राप्त झालेले असेल. शिवाच्या तांडवाच्या वेळी त्याच्या बाहूंच्या उंच तरुवनावर स्वतःला पांघरून टाक. आणि तांडव प्रसंगी त्याची ओले गजचर्म पांघरण्याची इच्छा नाहीशी कर. तेव्हा भीती नष्ट झालेली पार्वती तुझी भक्ती अनिमिष नेत्रांनी पाहत राहील.

‘ओल्या गजचर्मा’चा अर्थ समजून घेतल्याशिवाय या श्लोकाचा अर्थ समजत नाही. याविषयी बोरवणकर आपल्या टिपेमध्ये लिहितात, “मागें गजासुर नांवाचा एक असुर अतिशय प्रबळ झाला व देवादिकांस फार त्रास देऊ लागला; तेव्हां सर्वांनी काशी विश्वेश्वराच्या देवळांत शंकराचा आश्रय घेतला व त्याला गजासुरापासून आपले रक्षण करण्यास प्रार्थना केली. तेव्हां शंकरानें गजासुराला मारलें, व त्याचें चामडें सोलून काढून तें आपल्या अंगावर पांघरलें व तांडवनृत्य करण्यास आरंभ केला… शंकरानें गजासुराचें ओलें चामडें पांघरलेले पाहतांच पार्वतीला भीति वाटून तिनें आपले नेत्र मिटून घेतले होते. म्हणून यक्ष मेघाला सांगतो की, त्या चामड्याच्या ठिकाणी तूच राहा म्हणजे शंकराला गजचर्माची आठवण होणार नाहीं, पार्वतीला भीति वाटणार नाहीं व ती तुझ्या भक्तीमुळे तुझ्याकडे कौतुकानें पाहात राहील.”

या श्लोकातील ‘बाहूंचे बन’ हा संदर्भसुद्धा समजून घ्यायला लागतो. बोरवणकर पुढे लिहितात, ‘गजासुरमर्दनानंतर गजासुराचे चर्म उचलून धरण्याकरता शिवाने अनेक हात धारण केले.’ त्याचे हात झुलणाऱ्या वृक्षांच्या बनासारखे दिसतात, असा हा संदर्भ आहे.

३७.

गच्छन्तीनां रमणवसतिं योषितां तत्र नक्तं

रुद्धालोके नरपतिपथे सूचिमेद्यैस्तमोभिः।

सौदामन्या कनकनिकषस्निग्धया दर्शयोवीं

तोयोत्सर्गस्तनितमुखरो मा स्म भूर्विक्लवास्ताः।।

 

काळोखांतुनि जातां प्रमदा कुणी प्रियाच्या घरीं

विजा विहरूं दे निकषावरच्या कांचनरेषेपरी

तिमिरांतुनि त्या मार्ग दावतिल, नको गर्जना करूं

नको बरसुं रे, भयशाली त्या स्वभावता सुंदरी!

 

तेथें रात्री निघति रमणी वल्लभांच्या गृहांतें

अंघराच्या पटलिं ना दिसे राजमार्गीं तयांतें

वीजांनी, ज्या जणुं निकषिंच्या स्वर्णरेखाचि, पन्थ

दावी, वर्षाध्वनि न करिं वा गर्जना, त्या भयार्त

 

प्रिय भेटीस्तव अभिसारोत्सुक रमणी जेव्हां निघतिल रात्री

राजपथावर अडेल पाउल निबिड तिमिर तो भरतां नेत्रीं

उजळ तयांची वाट विजेनें कांचनरेषा जशि निकषावर

वर्षुन गर्जुन भिववुं नको पण विलासिनी त्या जात्या कातर

 

उज्जयिनीमधील अभिसारिका जेव्हा रात्री आपल्या प्रियकराच्या घराकडे जाऊ लागतील, तेव्हा अतिशय निबिड असा अंधार असेल. त्यामुळे त्यांना राजमार्ग दिसेनासा झाला, तर तू तुझ्या विजेने त्यांना मार्ग दाखव. सोन्याच्या कसाच्या दगडावर उमटलेल्या सोनेरी रेषेप्रमाणे तुझी विद्युल्लता सुंदर आणि झळझळीत असू दे. मात्र मार्ग दाखवताना तू अजिबात गडगडाट करू नकोस किंवा अत्यंत जोराची जलवृष्टी करू नकोस. कारण त्या सुंदरी अत्यंत भयशाली असतात.

सोन्याच्या रेषांसारखी विद्युल्लता! सोनेरी रंगाच्या विजा किती सुंदर दिसतात, हे बहुतेकांनी पाहिलेले असते. अभिसारिकांना मार्ग दाखवण्यासाठी सोनेरी विजाच हव्यात. त्यांची मनोवस्था काय असते, त्या आपल्या प्रियाला भेटायला किती अधीर झालेल्या असतात… त्यांच्या या सुंदर अवस्थेत आपण त्यांना काय साध्या पांढऱ्या विजांनी मार्ग दाखवायचा का?

गद्य अनुवादकांनी या रमणींना भीती दाखवू नकोस, कारण त्या ‘भित्र्या’ असतात असे लिहिले आहे. हे विशेषण रमणींसाठी योग्य नाही असे वाटते. कुसुमाग्रज त्यांना ‘भयशाली’ म्हणतात, सीडी ‘भयार्त’ म्हणतात, तर शांताबाई ‘कातर’ हा शब्द वापरतात! रमणींसाठी ‘भित्र्या’ हे विशेषण वापरून कसे चालेल? त्या भयशाली असायला हव्यात किंवा भयार्त, निदान कातर तरी!

कुसुमाग्रजांनी किती मृदू शब्द वापरले आहेत -

‘काळोखांतुनि जातां प्रमदा कुणी प्रियाच्या घरीं

विजा विहरूं दे निकषावरच्या कांचनरेषेपरी

तिमिरांतुनि त्या मार्ग दावतिल, नको गर्जना करूं

नको बरसुं रे, भयशाली त्या स्वभावता सुंदरी!’

‘विजा विहरू दे’ असे कुसमाग्रज सांगत आहेत. खरं तर विजा कडाडतात, पण अभिसारिका आपल्या प्रियकराला भेटायला चालल्या असताना विजांनी आकाशात विहारच करायला पाहिजे. कालिदासाच्या यक्षाची संवेदनशीलता, त्याचा सभ्यपणा आणि त्याची रसिकता कुसुमाग्रजांनी आपल्या शब्दांच्या अभियोजनेमधून अत्यंत सुंदरपणे पकडली आहे - माफ करा - अभिव्यक्त केलेली आहे!

‘अभिसारिका’ या शब्दाचा अर्थसुद्धा किती सुंदर आहे! आधी ठरलेल्या संकेताप्रमाणे प्रियकराला भेटायला निघालेली स्त्री म्हणजे अभिसारिका! त्यांना कुसुमाग्रज ‘प्रमदा’ म्हणतात, सीडी ‘रमणी’ म्हणतात आणि शांताबाई ‘अभिसारोत्सुक रमणी’ म्हणतात!

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

३८.

तां कस्यांचिद्भवनवलभौ सुप्तपारावतायां

नीत्वा रात्रिं चिरविलसनात्खिन्नविद्युत्कलत्रः।

दृष्टे सूर्ये पुनरपि भवान्वाहयेदध्वशेषं

मन्दायन्ते न खलु सुहृदामभ्युपेतार्थकृत्याः॥

 

विलास करुनी थकून जातां कांता सौदामिनी,

जिथें पारवे विसावले त्या सौधावर जाउनी

रात्रभरीं विश्रांत सख्या हो, होतां सूर्योदय

वाटचाल कर, कार्य प्रियांचे नित्य असावें मनीं.

 

भार्या विद्युत बहु विलसुनी श्रांत होतां निशेतें

काढीं कोठें उपरि भवनीं पारवे सुप्त जेथें

शेषा मार्गा फिरुनि धर बा पाहता सूर्यबिंब

हातीं घेतां जन न करिती मित्र-कार्यीं विलंब

 

वळचणीस झोंपले पारवे जिथे घरांच्या सांदीमधुनी

रात्र घालवी तिथें, प्रियाही असेल शिणली तव लखलखुनी

सूर्य उगवतां पुन्हां पहाटें प्रवास अपुला सुरू करी तूं

रेंगाळति ते मुळीं न, धरिती मित्रहिताचा मनिं जे हेतू

 

रात्री खूप वेळ आकाशात विलास केल्यावर तुझी पत्नी विद्युल्लता खूप थकून जाईल. तेव्हा तू ती रात्र, पारवे जिथे झोपून गेलेले आहेत, अशा सौधावर निवांतपणे घालव. सूर्य उगवताच तू लगोलग आपला उरलेला प्रवास सुरू कर. कारण, एकदा मित्रकार्य स्वीकारल्यानंतर कुठलाही सज्जन अजिबात दिरंगाई करत नाही.

अनेक गद्य भाषांतरकार ‘खूप काळ विलास केल्यावर वीज थकून गेली’ या ऐवजी ‘खूप काळ स्फूरण पावल्यावर वीज थकून गेली’ असे भाषांतर करतात. ‘चिरविलसनात्खिन्न’ यातील ‘विलसन’ याचा अर्थ स्फुरणे, चमचमणे याबरोबरच ‘विलास करणे’ असाही होऊ शकतो, अशी टिप बोरवणकरांनी दिली आहे. 

इथं ‘स्फुरण पावणे’चा अर्थ प्रणय करताना गात्रे स्फुरण पावणे, असा घेणे अपेक्षित आहे. वीज चमकत होती, याचा अर्थ ती मेघाबरोबर ‘स्फुरण’ पावत होती, असे बोरवणकर वगैरे भाषांतरकारांना अपेक्षित आहे.

उज्जयिनी नगरी कालिदासाची नगरी होती. तिच्याविषयी त्याला प्रेम वाटणे साहजिक आहे. यक्षाला, आपल्या प्रिय पत्नीला निरोप पोहोचवण्याची कितीही घाई असली तरी कालिदास उज्जयिनीमध्ये तब्बल नऊ श्लोक थांबला आहे. त्यानंतर थांबणे अशक्य झाल्याने त्याने मेघाला पुढच्या प्रवासाला जाऊ दिले आहे.

३९.

तस्मिन्काले नयनसलिलं योषितां खण्डितानां

शान्ति नेयं प्रणयिभिरतो वर्त्म भानोस्त्यजाशु।

प्रालेयास्रं कमलवदनात्सोऽपि हर्तुं नलिन्याः

प्रत्यावृत्तस्त्वयि कररुधि स्यादनल्पाभ्यसूयः॥

 

प्रभातकालीं प्रियकर पुसती रमणींची आसवें

मानखंडिता - कारण रत ते रात्रीं अन्यांसवें;

सूर्यहि टिपतो पुष्करिणीच्या कमलावरचें दंव

आडवितां कर, कोप तयाचा तुजवरतीं संभवे!

 

अन्यासक्त प्रिय समजवी रूष्ट कान्ते सकाळी

तीचे अश्रू पुसुनि म्हणुनी भानुचा मार्ग टाळीं

तोही अश्रूपरि दव मुखी पद्मिनीच्या नुरेल

या यत्नातें कर पसरि, तूं आड येतां चिडेल

 

रुसल्या रमणी आर्जविण्या त्या नयन तयांचे प्रेमें पुसुनी

योग्य समय हा प्रणयिजनांना, प्रिय मित्रा रे, घेईं जाणुनि

रविमार्गांतुन दूर सरक तूं, नकोस रोधूं किरण तयाचे

असेल आतुर तोही पुसण्या कमलिनिमुखिंचे अश्रु दंवाचे

 

सूर्योदयाच्या वेळी प्रणयपूर्तीच्या बाबतीत ज्यांची मानखंडना झाली आहे, अशा प्रेयसींचे अश्रू प्रियकरांनी पुसून टाकायचे असतात. याच कारणासाठी तू सूर्याच्या मार्गातून ताबडतोब दूर हो. कमलवेलींच्या कमलमुखावरील दवबिंदूरूपी अश्रू पुसून टाकण्यासाठी सूर्य परत आलेला आहे. अशा वेळी तू त्याचे किरण अडवलेस तर तो तुझ्यावर रागवेल.

आपला प्रियकर दुसऱ्या स्त्रीबरोबर रत झाल्यामुळे जी चिडली आहे, दुःखी झाली आहे, ती खंडिता!

सकाळची वेळ अशा चिडलेल्या प्रेयसीची समजूत काढण्याची वेळ आहे. बोरवणकर आपल्या टिपेमध्ये म्हणतात, नलिनी म्हणजे कमळाची वेल ही सूर्याची पत्नी आहे, असा कविसंकेत आहे. कमळाचे फूल हे नलिनीचे वदन! संध्याकाळ होताच सूर्य प्रतीचीला म्हणजे पश्चिमेला कवटाळू लागला आहे, हे पाहून नलिनी दुःखी होते.

सकाळी येऊन सूर्य आपल्या दुःखी झालेल्या प्रियचे दवरूप अश्रू आपल्या किरणरूपी हातांनी पुसतो आणि तिची समजूत काढून तिला पुन्हा प्रफुल्लित करतो, अशी कल्पना! त्यामुळे सूर्याच्या या उद्योगाच्या आड येऊन त्याचा राग ओढवून घेऊ नकोस, असा सल्ला यक्ष मेघाला देत आहे.

चंद्रा राजन लिहितात – “Philandering hushands come home at sunrise called on to comfort their anguished wives by drying the welling tears of betrayal…”

मानखंडना झालेल्या स्त्रियांच्या डोळ्यात अश्रू परत परत भरून येत आहेत! त्यांना प्रिय असलेले त्यांचे अप्रामाणिक नवरे त्यांची समजूत काढत आहेत.

४०.

गम्भीरायाः पयसि सरितश्चेतसीव प्रसन्ने

छायात्मापि प्रकृतिसुभगो लप्स्यते ते प्रवेशम्।

तस्मादस्याः कुमुदविशदान्यर्हसि त्वं न धैर्या -

न्मोघीकर्तुं चटुलशफरोद्वर्तनप्रेक्षितानि॥

 

गंभीरेच्या नितळ जलीं – वा हृदयीं प्रेमातुर

तव रूपाची पडेल छाया स्वभावता सुंदर

नलिनीसम ते धवल खेळती मासे लहरींवरी

कटाक्ष ते सरितेचे, तिजशीं होउं नको निष्ठुर!

 

गम्भीरेच्या विमल सलिलीं कीं  जसें शुद्ध भावीं

छायामात्रें शिरुनि, रुचिरा, मूर्ति तूझी भरावी,

दृग्पात त्वां चपल-शफरी-रूपि धीर स्वभावें

तीचे तेव्हा कमल-धवल व्यर्थ न जाऊ द्यावे

 

प्रतिबिंबित तूं होशिल जेव्हां गंभीरेच्या जळांत निर्मळ

प्रविष्ट होशिल, सख्या, जणूं कीं हृदयिं तिच्या, रे, प्रसन्न प्रेमळ

चपल मासळ्या लवलवणाऱ्या कटाक्ष सखिचे कमलशुभ्र ते

आशय त्यांचा घेई जाणुन, विफल करीं नच तिचीं वांछिते!

 

प्रसन्न अंतःकरणाप्रमाणे निर्मळ जळ असलेल्या गंभीरा नदीच्या प्रवाहात मुळातच सुंदर असलेले तुझे छायारूप तुझ्या कळत-नकळत प्रवेश करेल. त्या वेळी कमल फुलांप्रमाणे शुभ्र असलेले शफरी नावाचे मासे पाण्यात नर्तन करत असतील. या शुभ्र आणि वेगवान माश्यांच्या नर्तनलीला म्हणजे गंभीरा नदीने तुझ्याकडे फेकलेले कटाक्षच आहेत. तिच्या या प्रेमकटाक्षांकडे निष्ठूरपणे दुर्लक्ष करू नकोस.

हे मेघा, तुझी सुंदर छाया गंभीरेच्या निर्मळ प्रवाहात प्रवेश करती झाली आहे. आपल्याला आपली छाया कुठे पडते आहे, याचे भान नसते, तसे मेघालाही नाही. पण त्याच्या सौंदर्याने गंभीरेच्या हृदयात प्रवेश केला आहे. ती प्रेम-विव्हल होऊन कटाक्ष टाकते आहे. प्रेमात पडलेल्या स्त्रीच्या प्रेमाचा अव्हेर करणे, यक्षाला योग्य वाटत नाही. म्हणून तो मेघाला सांगतो आहे की - तुझ्या नकळत तुझी छाया पडल्यामुळे तुझ्या सौंदर्यावर लुब्ध होऊन ती तुझ्या प्रेमात पडली आहे. तू तिची आर्जवे करायला गेलेला नसतानाही हे घडते आहे. पण म्हणून तिच्या या सुंदर प्रेमकटाक्षांकडे दुर्लक्ष करू नकोस.

कालिदासाने ‘छायात्मा’ हा शब्द वापरलेला आहे. ‘छायारूपी आत्मा’ हा फार सुंदर शब्द आहे. मेघाच्या त्या छायेत मेघाचे संपूर्ण रूप आणि सौंदर्य उतरलेले आहे, असा अर्थ घेतला, तर या शब्दातील मजा लक्षात येते. खरं तर पर्जन्यमेघाचे मूळ रूपाच छायेसारखे असते, ही अजून वेगळीच मजा!

या श्लोकातील ‘शफरी मत्स्य’ याविषयी बोरवणकरांनी एक टीप दिलेली आहे- “हे शफर किंवा शफरी मासे पाण्यातल्या पाण्यात न फिरता पाण्याच्या पृष्ठभागावर उड्या मारतात. इंग्रजीमध्ये यांना ‘फ्लाईंग फिश’ म्हणतात.” यामुळे गंभीरा नदीच्या ‘कटाक्षां’ना एक सुंदर अर्थ प्राप्त होतो.

बापट-मंगरूळकर-हातवळणे आपल्या टिपेमध्ये शफरी माश्यांच्या नयनांनी ‘कटाक्ष’ टाकणाऱ्या गंभीरेला ‘मीनाक्षी’ म्हणतात! – ‘चंचल मासळीच्या सुळकांडीप्रमाणे कटाक्ष टाकण्यांत ती तरबेज आहे. यक्ष मेघाला सांगतो, ‘तूं मनाचा निश्चय करून किंवा घट्टपणे आणि बेपर्वाईनें पुढे जाईन म्हणशील, पण असे करूं नकोस. त्या मीनाक्षीचे चंचल कटाक्ष वायां घालविणें तुला शोभणार नाहीं.’

सीडींचा अनुवाद अनेकांना क्लिष्ट वाटतो, पण तो तसा नाहीये. एकदा मंदाक्रांताची चाल लक्षात घेत त्यांनी लिहिलेली कडवी लक्षात घेतली, तर अर्थ आपोआप बाहेर येतो. सीडींचे प्रभुत्व सर्वत्र अनुभवाला येत राहते. संस्कृत म्हणू नका, मराठी म्हणू नका, कालिदासाचा आशय म्हणू नका आणि मंदाक्रांतावरची त्यांची पकड म्हणू नका! सीडी ‘क्लास अपार्ट’ आहेत!

कुसुमाग्रजांनी ‘समुदितमदना’ आणि शांताबाईंनी ‘पादाकुलका’ ही सोपी वृत्ते अनुवादासाठी घेतली आहेत. या दोन्हींचा विस्तार मंदाक्रांतापेक्षा मोठा आहे. यात आशय व्यक्त करण्यासाठी जास्त शब्द मिळतात.

या पार्श्वभूमीवर सीडींची कामगिरी अतिशय उत्तुंग ठरते. माझ्या मते सीडींचा अनुवाद अतिशय उच्च दर्जाचा आहे. वरील श्लोकात बघा, त्यांनी शफरी माश्यांचा नावाने उल्लेख करण्यासाठी जागा शोधून काढली आहे. सीडींचा अनुवाद वाचणे जरा कष्टाचे आहे, पण मोठे आनंदायक आहे.

‘चपल अशा शफरी नावाच्या मत्स्यांप्रमाणे रूप असलेले आणि कमळासारखे शुभ्र असे तिचे दृग्पात म्हणजे कटाक्ष तू तुझ्या धीरगंभीर स्वभावामुळे कृपया व्यर्थ जाऊ देऊ नकोस.’ हा आशय सीडींनी खालील दोन ओळींमध्ये कसा अंतर्भूत केलेला आहे, हे बघितले तर त्यांच्या अनुवादाचे लावण्य लक्षात येते-

‘दृग्पात त्वां चपल-शफरी-रूपि धीर स्वभावें

तीचे तेव्हा कमल-धवल व्यर्थ न जाऊ द्यावे’

..................................................................................................................................................................

लेखांक पहिला : कालिदासाच्या काव्यातील एकेक श्लोक सौंदर्यवंत ऐरावतासारखा झुलत राहतो, आणि त्यावर आशयाचा ऐश्वर्यमान इंद्र आरूढ झालेला असतो!

लेखांक दुसरा : उत्कंठा उत्पन्न करणाऱ्या त्या मेघासमोर यक्ष आपले अश्रू आवरत कसाबसा उभा राहिला…

लेखांक तिसरा : कालिदास आपल्याला आपल्या जगातून उचलतात आणि प्रेमाच्या व सौंदर्याच्या तीव्र संवेदनांनी भारलेल्या जगात घेऊन जातात…

लेखांक चौथा कालिदासाला जेव्हा जेव्हा प्रकृतीतील अपार सौंदर्य दिसते, तेव्हा तेव्हा त्याला पुरुष-तत्त्वाची आठवण होते…

लेखांक पाचवा : कालिदासाच्या सौंदर्यदृष्टीचा स्पर्श त्याच्या अनुवादकांनासुद्धा होतो…

लेखांक सहावा : येथून आपला कालिदासाच्या ‘मेघदूता’तील श्रृंगाररसाच्या प्रवाहात प्रवेश होतो.…

लेखांक सातवा : आपल्या प्रेमामुळे दुसरी व्यक्ती किती आनंदी होते आहे, यावर आपल्या प्रेमाचे भाग्य अवलंबून असते!

लेखांक आठवाकालिदास सगळे वातावरणच स्त्री-पुरुषांतील प्रेमामध्ये अध्याहृत असलेल्या अनिवार वेडाने भारावून टाकतो...

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......