३० जूनपासून आषाढाला सुरुवात झाली… आणि आषाढ म्हटला की, अनेकांना महाकवी कालिदासाच्या ‘मेघदूत’ची आठवण येते. ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या त्यातल्या शब्दांना तर ‘मोस्ट कोटेबल कोट’चा दर्जा मिळालाय! आणि ‘मेघदूत’? त्याची ख्याती काय वर्णावी! गेल्या अनेक वर्षांपासून ‘मेघदूत’ मराठीसह जगभरच्या लेखक, कवी, अनुवादक आणि रसिकवाचकांना मोहिनी घालत आले आहे. त्याची ओळख करून देणारे हे सदर १२ जुलैपासून रोज...
.................................................................................................................................................................
लेखांक आठवा
पूर्वमेघ
(लेखातला पहिला मूळ संस्कृत श्लोक कालिदासाचा आणि त्याचे अनुवाद अनुक्रमे कुसुमाग्रज, सी.डी. देशमुख आणि शांता शेळके यांचे)
३१.
दीर्घीकुर्वन्पटु मदकलं कूजितं सारसानां
प्रत्यूषेषु स्फुटितकमलामोदमैत्रीकषायः।
यत्र स्त्रीणां हरति सुरतग्लानिमङ्गानुकूलः
शिप्रावातः प्रियतम इव प्रार्थनाचाटुकारः॥
शिप्रेवरचा पहाटवारा सेवुनि कमलासव
स्पर्श मुलायम, मुखांत सारसगीतांचे मार्दव
रमणींचा रतिशीण वारतो, करूनिया कूजन
प्रियकर जणुं हा -पुन्हा तयांचें करीतसे आर्जव!
जो विस्तारी सरस मधुरां कूजितां पक्षियांच्या
प्रातःकाळी फुललिं कमळें वाहि गन्धा तयांच्या।
शिप्रा वायु हरित रतीची ग्लानि जेथें स्त्रियांची
देही अंगा सुख, जणु सखा प्रेमसंगासि याची।।
सारसपक्षी किलबिलती, तें दूर वाहुनी नेईं कूजित
पहाटवेळीं कमळें फुललीं स्वाद सेविं तो मधुरकषायित
रमणींचा रतिखेद निवारी कुरवाळुनि त्या सुखदस्पर्शा
शिप्रेवरचा शीतळ वारा सजण आर्जवी जणुं मधुभाषी!
या उज्जयिनी नगरीमध्ये अव्यक्त-मधुर असे सारस पक्ष्यांचे कूजन पहाटकाली ऐकू येत असते. हे कूजन क्षिप्रा नदीवरील पहाटवारा उज्जयिनीच्या परिसरात सर्व दिशांना पसरवत असतो. हा वारा फुललेल्या कमलपुष्पांमुळे सुगंधितही झालेला असतो. असा हा विलक्षण पहाटवारा लाघवी शब्दांनी आपल्या प्रियेची मनधरणी करणाऱ्या प्रियकराप्रमाणे रतिक्रीडेमुळे स्त्रियांना आलेली ग्लानी नाहीशी करतो!
कुसुमाग्रज लिहितात -
‘शिप्रेवरचा पहाटवारा सेवुनि कमलासव
स्पर्श मुलायम, मुखांत सारसगीतांचे मार्दव’
क्षिप्रेवरचा पहाटवाऱ्याने कमलासव प्राशन केल्यामुळे त्याचे स्पर्श मुलायम झालेले आहेत. आणि हा वाऱ्याच्या मुखात सारसगीतांचे मार्दव आहे.
चंद्रा राजन म्हणतात -
‘At day-break in Ujjayinī, Śiprā’s cool breeze scented with the fragrance of lotuses comes prolonging the piercing cries of love-maddened sāras-cranes.’
सारसांच्या कूजनाला चंद्रा राजन ‘liercing cries of love-maddend Saras-cranes’ म्हणतात!
प्रेमात अनावर झालेल्या सारसांचे कूजनच काय, पण क्षिप्रेवरून वाऱ्याचे वाहणे, त्याचे प्रेमार्त कूजन पसरवणे, त्याचे कमलपुष्पांना स्पर्श करून सुगंधित होणे आणि लाडिक प्रियकरांप्रमाणे रमणींच्या भोवती रुंजी घालत त्यांचा रतिक्रीडेचा शीण घालवणे, हे सगळेच ‘लव्ह मॅडन्ड’ आहे!
कालिदास सगळे वातावरणच स्त्री-पुरुषांतील प्रेमामध्ये अध्याहृत असलेल्या अनिवार वेडाने भारावून टाकतो.
बोरवणकरांनी या श्लोकाच्या अनुवादाखाली अतिशय सुंदर टीप दिलेली आहे. सारसांच्या कूजनासाठी ते ‘अव्यक्त-मधुर’ असा शब्द वापरतात. सारसांच्या तीक्ष्ण स्वरातली मधुरता आपल्या लक्षात पटकन येत नाही. परंतु, त्या मागील कामभावना आपल्या लक्षात आली, तर त्या कूजनातील मधुरताही लक्षात येते. पुढे बोरवणकर म्हणतात की, कालिदासाने वाऱ्याला येथे प्रियकराची उपमा दिलेली आहे. प्रियकर ज्याप्रमाणे मधुर बोलून आपल्या प्रेयसीचा रतिसुखाचा शीण घालवतो आणि तिला संभोगसुखासाठी पुन्हा उद्युक्त करतो, तसा हा क्षिप्रेवरचा वारा वागतो आहे.
३२.
हारान्स्तारांस्तरलगुटिकान्कोटिशः शङ्खशुक्ती:
शष्पश्यामान्मरकतमणीनुन्मयूखप्ररोहान्।
दृष्ट्वा यस्यां विपणिरचितान्विद्रुमाणां च भङ्गा -
न्संलक्ष्यन्ते सलिलनिधयस्तोयमात्रावशेषाः।।
(कुसुमाग्रजांनी या श्लोकाचा अनुवाद केलेला नाही.)
तेथें हाटीं सुघटित मणी हार ते पाणिदार
पाचू जैसे गवत हिरवें फांकिती तेज दूर
शिंपा शंख प्रचुर बघुनी पोंवळीं भिन्नजात
वाटे चित्ता जलचि नुसतें राहिलें सागरांत
मणिमालांतुन हिरे जडविले अगणित जेथें शंखशिंपले
हरिततृणासम चमकति पाचू किरण जयांचे भवतिं फांकले
प्रवाळखंडहि विक्रीसाठीं पेठांमधुनी जिथें मांडले -
वैभव जिथलें बघतां वाटे, सागरिं केवळ जलच राहिलें!
त्या विशाल नगरीमध्ये महारत्नांनी जडवलेले मोत्यांचे हार कोट्यवधीच्या संख्येने आहेत! अगणित शंख, शिपले आणि प्रवाळ आहेत. कोवळ्या गवताप्रमाणे हिरव्यागार किरण-शलाका उधळणारे अगणित पाचू आहेत. कोट्यवधी पोवळ्यांचे दगड येथे बाजारात विक्रीकरता मांडून ठेवलेले आहेत! एवढी सगळी रत्ने इथे पाहिली की, असे वाटते - समुद्रात आता केवळ पाणीच बाकी उरलेले असेल.
कुसुमाग्रजांप्रमाणेच चंद्रा राजन यांनीसुद्धा हा श्लोक आपल्या अनुवादात घेतलेला नाही. त्यांनी मेघदूताची ‘बंगाल प्रत’ वापरली आहे. बाकी अनुवादकांनी ‘देवनागरी प्रत’ वापरलेली दिसते. कालिदासाच्या लिखाणात अनेक श्लोक नंतर घुसडले गेले आहेत. वरील श्लोक त्यातीलच एक असावा असे वाटते. प्रेमाच्या अनावर वातावरणातून एकदम बाजारात का म्हणून जायचे?
कालिदासाने रत्नांची, हिऱ्यांची आणि सौंदर्यवंत लक्ष्मीची अनेक वर्णने पुढे केली आहेत. पण बहुतेक वेळा यक्षाची प्रेयसी तिथे हजर आहे. आयुष्यात स्त्रीचा आधार आणि स्त्रीचे अनावर प्रेम नसेल, तर मग लक्ष्मीला काय अर्थ उरतो?
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
३३.
जालोद्गीर्णैरुपचितवपुः केशसंस्कारधूपै
बन्धुप्रीत्या भवनशिखिभिर्दत्तनृत्योपहारः।
हर्म्येष्वस्याः कुसुमसुरभिष्वध्वखेदं नयेथा
लक्ष्मीं पश्यंल्ललितवनितापादरागाङ्कितेषु॥
केशबंध सुकवीत धूप ये कुठें गवाक्षांतुनी
करील तुजला सबल, नाचतिल मोर तुला पाहुनी
पुष्पसुगंधित, ललनांच्या पदरंगानें रंगले
हर्म्य पाहतां मुशाफरीचे श्रम जातिल लोपुनी!
घे विश्रांति भवनिं तिथल्या जीं सुगन्धी फुलांनीं
लक्ष्मी रंगी उमटलिं जिथें सुन्दरी-पादचिन्हीं
प्रेमें देती तुज गृहशिखी देणगी नृत्यरूप
पोषी जालोद्गत अलक जो आंचवायास धूप
केस उदवितां रमणी, येइल धूप सुवासिक जाळीमधुनी
फुगशिल त्यानें, पाळिव मोरहि स्वागत करतिल तुझें नाचुनी
लाक्षारंजित जिथें उमटलीं विलासिनींचीं मृदुल पाउलें.
पुष्पसुगंधित सदनीं शिरतां विसरावे त्वां श्रमही अपुले!
स्त्रिया आपले केस उदवून सुगंधित करत आहेत. तो धूप गवाक्षांमधून बाहेर पडून तुला पुष्ट करत आहे. राजप्रासादामधले मयूर तुला नृत्याचे नजराणे देत आहेत. उज्जयिनीमधले प्रासाद विविध पुष्पांच्या सुगंधाने सुगंधित झालेले आहेत. या प्रासादांमध्ये लावण्यलतिकांच्या पावलांना लावलेल्या रंगांच्या खुणा उमटलेल्या आहेत. अशा या उज्जयिनीची शोभा पाहत पाहत तू तुझ्या प्रवासाचा शीण घालव!
लावण्यलतिकांची पावले म्हणजे लक्ष्मीचीच पावले.
सीडी लिहितात -
‘लक्ष्मी रंगी उमटलिं जिथें सुन्दरी-पादचिन्हीं’
सुंदरींच्या रंगीत पदचिन्हांमधून जिथे लक्ष्मी उमटली आहे!
शांताबाईंनी तर कमालच केली आहे.
‘लाक्षारंजित जिथें उमटलीं विलासिनींचीं मृदुल पाउलें. पुष्पसुगंधित सदनीं शिरतां विसरावे त्वां श्रमही अपुले!’
लाखेने रंगवलेली विलासिनींची मृदुल पाऊले, ज्या पुष्पसुगंधित घरांमध्ये उमटलेली आहेत, त्या घरांमध्ये शिरून तू ते सगळे वैभव बघ आणि आपले श्रम विसरून जा.
गृहदेवता स्त्री आणि लक्ष्मी यांचे ऐक्य कालिदासामध्ये ठायी ठायी दिसून येते.
होरेस विल्सन लिहितो -
‘Here should thy spirit with thy toils decay, Rest from the labours of the wearying way :
Round every house the flowery fragrance spreads;
O'er every floor the painted footstep treads;’
तुझ्या श्रमांमुळे तुझ्या मनोवृत्ती क्षीण झाल्या असतील, तर या नगरात तू विश्रांती घे. इथे प्रत्येक घराच्या अवतीभोवती फुलांचा सुगंध दरवळतो आहे आणि प्रत्येक घरामध्ये रमणींची रंगीत पावले उमटत आहेत.
होरेस विल्सनची दृष्टी ऐन्द्रिय अनुभवांवर केंद्रित झालेली आहे. त्याला ते दृश्य रम्य वाटते आहे. त्याला भारतीय संस्कृतीतले गृहदेवतेचे आणि लक्ष्मीचे ऐक्य कसे कळावे? पण एक चांगले होते, विल्सनसाहेबामुळे आपल्याही डोळ्यासमोर उज्जयिनीमधली घराघरामधून चालणारी सुंदर रमणींची पावले जिवंत होत उमटत जातात!
३४.
भर्तुः कण्ठच्छविरिति गणैः सादरं वीक्ष्यमाणः
पुण्यं यायास्त्रिभुवनगुरोर्धाम चण्डीश्वरस्य।
धूतोद्यानं कुवलयरजोगन्धिभिर्गन्धवत्या
स्तोयक्रीडानिरतयुवतिस्नानतिक्तैर्मरुद्भिः॥
गंधवतीवर नाहत युवती, सुवास चेतोहर
वाहत वारा, घेउन संगें कमलांचे केसर
त्या लहरींसह पावन हो तूं पाहुन चंडीश्वरा
नीलवर्ण तव पाहुनि करितिल शैव तुझा आदर.
तेथें स्थान त्रिभुवनपति-श्रीहरिचें भजावे
स्वामिग्रीवेसम गण तुझी पाहती कान्ति भावें
उद्यानातें पवन हलवी गंधवत्यम्बुजांचा
तैसें तोयीं रमत रमणी गन्ध वाहे तयांचा
कंठ शिवाचा काय सांवळा म्हणुनी गण तुज बघतां सादर
गौरीशाचें मंदिर गांठुन दर्शन त्याचे घेईं सत्वर
अंगराग मिसळले जयांतुन जलकेलीस्तव येतां युवती
गंधवतीच्या परागमिश्रित वाऱ्यानें उपवनें डोलती!
‘आपला स्वामी श्री शंकर याच्या कंठाच्या रंगाप्रमाणेच याची कांती आहे’, अशा विचाराने शिवाचे गण तुझ्याकडे आदराने पाहू लागतील. कमलपरागांच्या सुवासांनी आणि जलविहारात रंगून गेलेल्या तरुणींच्या जलक्रीडेमुळे, गंधवती नदी सुगंधित झाली आहे. त्यामुळे तिच्यावरून वाहणारे वारेसुद्धा सुगंधित झालेले आहेत. या वाऱ्यांमुळे ज्या चंडीश्वराच्या मंदिरातील उद्यान कंपित झालेले आहे, अशा त्या चंडीश्वराच्या मंदिराकडे तू जा.
शांताबाईंनी ‘अंगराग’ असा अतिशय सुंदर शब्द वापरला आहे.
‘अंगराग मिसळले जयांतुन जलकेलीस्तव येतां युवती गंधवतीच्या परागमिश्रित वाऱ्यानें उपवनें डोलती!’
अंगराग म्हणजे प्रसाधने. गंधवती नदीमध्ये युवती जलक्रीडा करत आहेत आणि त्यांनी अंगाला लावलेली चंदन वगैरे प्रसाधने नदीच्या पाण्यात मिसळून ती गंधवती झालेली आहे. आणि अर्थातच त्या नदीवरून वाहणारा वारासुद्धा.
३४.
अप्यन्यस्मिञ्जलधर! महाकालमासाद्य काले
स्थातव्यं ते नयनविषयं यावदत्येति भानुः।
कुर्वन्संध्याबलिपटहतां शूलिनः श्लाघनीया -
मामन्द्राणां फलमविकलं लप्स्यसे गर्जितानाम्॥
महाकाल तें मंगल मेघा, जागृत तेथें शिव
अकालिं जातां अस्त होइतों काल जरा घालव
प्रदोषपूजा होउं लागतां घुमव तुझा चौघडा
शिवसेवेनें कृतार्थ होइल नाद तुझा भैरव!
जासी अन्या समयिंच जरी तू महाकालिं तेथें
थांबावें जोंवरि तरणिंचे बिंब अदृश्य होतें
सन्ध्यापूजेमधिं शिवपदीं श्लाघ्य गंभीरताल
डंका होसी फल तुज पुरें गर्जनांचे मिळेल
महाकालमंदिरास येतां अवेळ तरिही थांब जरासा
दृष्टिआड होईल सूर्य जों समयाची त्या करी प्रतीक्षा
सांजपुजेला शिवास प्रिय त्या डमरूचें त्वां कार्य करावें
मेघमन्द्रस्वर गभीर गर्जित, सखया, त्याचें फळ सेवावें
हे मेघा, महाकाल मंदिरात तू सूर्यास्ताच्या आधी पोहोचलास तर सूर्य अस्ताला जाईपर्यंत थांब. श्री शंकराच्या संध्याकाळच्या पूजेच्या वेळी चौघडा वाजवण्याचे थोर आणि पवित्र कार्य तू कर. त्यामुळे तुझ्या गंभीर अशा गडगडाटी गर्जनांचे संपूर्ण फळ तुला मिळेल.
कुसुमाग्रजांनी इथे एक सुंदर विशेषण वापरले आहे.
‘शिवसेवेनें कृतार्थ होइल नाद तुझा भैरव!’
मेघाच्या नादाला त्यांनी ‘भैरव-नाद’ असे म्हटले आहे.
‘भैरव’ या शब्दाचे दोन अर्थ होतात. एक म्हणजे घोर आणि भयानक. आणि दुसरा म्हणजे शिवाचा गण. हे दोन्ही अर्थ इथे चपखल बसतात. शिवाची सेवा केल्यामुळे तुझा घोर नाद कृतार्थ होईल. किंवा, शिवाची सेवा केल्यामुळे तुझा एक गणच असलेला गडगडाटी असा भैरव नाद कृतार्थ होईल!
३५.
पादन्यासैः क्वणितरशनास्तत्र लीलावधूतै
रत्नच्छायाखचितवलिभिश्चामरैः क्लान्तहस्ताः।
वेश्यास्त्वत्तो नखपदसुखान्प्राप्य वर्षाग्रबिन्दू
नामोक्ष्यन्ते त्वयि मधुकरश्रेणिदीर्घान्कटाक्षान्॥
चरणगतींने कमरेवरच्या किणकिणती मेखला
मणिरत्नांकित चवऱ्या वारुन शिणलेल्या कोमला
नखक्षतांना सुखवित पहिलें ज्यांच्या जलसिंचन
भ्रमरनेत्र खिळवून पाहतिल तिथें भाविणी तुला!
तेथें नृत्यें रुमझुति जो मेखला, खेळवीतां
रत्नोद्भासें जडित चंवरी शीण येऊन हाता
वेश्या येतां नखपदिं तुझ्या वर्षणाचेतुषार
दीर्घा दृष्टी तुजवरि अलिश्रेणिशा सोडतील
कटीवरी किणकिणति मेखला गणिका ऐशा नर्तन करिती
रत्नकांचनी मुठी धरोनी शिवावरी चामरें वारिती
शीण करीं तू दूर तयांचा नखक्षतांवरि थेंब शिंपुनी
भ्रमरपंक्तिसम कटाक्ष तिरपे टाकितील तुजवरी कामिनी
अनेक गणिका तिथे नृत्य करत असतील. त्या नृत्यातील पदन्यासांमुळे त्यांच्या कमरेच्या मेखला किणकिणत असतील. रत्नजडित मुठी असलेल्या चवऱ्या ढाळून ढाळून त्यांचे हात दुखून गेले असतील. अशा या नर्तिकांच्या अंगावरच्या नखांच्या व्रणांवर तुझ्या पावसाचे सुखकर असे पहिले थेंब पडतील, तेव्हा त्या तुझ्याकडे भ्रमरांच्या लांब माळेसारखे दीर्घ कटाक्ष फेकतील.
कामातील उत्फुल्लता कालिदासाच्या काव्यात क्षणोक्षणी व्यक्त राहते. नृत्य, पदन्यास, किणकिणणाऱ्या मेखला आणि अंगांगावर उठलेल्या उन्मत्त कामाच्या खुणा! आणि त्या खुणाही सुखावल्या जात आहेत, पहिल्या पावसाच्या पहिल्यावहिल्या नाजुक तुषारांनी!
प्रेमाच्या त्या नाजुक खुणा सुखावल्या गेल्यामुळे होते काय, तर त्या युवती मेघाकडे त्यांच्या भ्रमरनेत्रांनी दीर्घ कटाक्ष टाकून ‘अव्यक्त-मधुर’ असे धन्यवाद देतात!
कामसुखाचा रस पूर्णपणे उपभोगायचा असेल तर कालिदासाची संवेदना हवी. निदान यक्षाची तरी!
कालिदासाने वापरलेल्या ‘मधुकरश्रेणिदीर्घान’ या शब्दमालिकेचा भ्रमराच्या पंक्तीप्रमाणे ‘दीर्घ कटाक्ष’ असा अर्थ अनेक भाषांतरकारांनी लावला आहे.
कुसमाग्रज मात्र त्याचा अर्थ ‘भ्रमरनेत्रांचे दीर्घ कटाक्ष’ असा लावतात. भ्रमरांप्रमाणे काळ्याभोर नेत्रांचे दीर्घ कटाक्ष!
‘भ्रमरनेत्र खिळवून पाहतिल तिथें भाविणी तुला!’
सीडींनी ‘अलिश्रेणी’ असा शब्द वापरलेला आहे. अलि म्हणजे भुंगा आणि श्रेणी म्हणजे ओळ! सीडी संस्कृत शब्द वापरतात. पण एकदा ते समजून घेतले की, त्यांच्या अनुवादातले सौंदर्य लक्षात यायला लागते.
..................................................................................................................................................................
लेखांक पहिला : कालिदासाच्या काव्यातील एकेक श्लोक सौंदर्यवंत ऐरावतासारखा झुलत राहतो, आणि त्यावर आशयाचा ऐश्वर्यमान इंद्र आरूढ झालेला असतो!
लेखांक दुसरा : उत्कंठा उत्पन्न करणाऱ्या त्या मेघासमोर यक्ष आपले अश्रू आवरत कसाबसा उभा राहिला…
लेखांक तिसरा : कालिदास आपल्याला आपल्या जगातून उचलतात आणि प्रेमाच्या व सौंदर्याच्या तीव्र संवेदनांनी भारलेल्या जगात घेऊन जातात…
लेखांक चौथा : कालिदासाला जेव्हा जेव्हा प्रकृतीतील अपार सौंदर्य दिसते, तेव्हा तेव्हा त्याला पुरुष-तत्त्वाची आठवण होते…
लेखांक पाचवा : कालिदासाच्या सौंदर्यदृष्टीचा स्पर्श त्याच्या अनुवादकांनासुद्धा होतो…
लेखांक सहावा : येथून आपला कालिदासाच्या ‘मेघदूता’तील श्रृंगाररसाच्या प्रवाहात प्रवेश होतो.…
लेखांक सातवा : आपल्या प्रेमामुळे दुसरी व्यक्ती किती आनंदी होते आहे, यावर आपल्या प्रेमाचे भाग्य अवलंबून असते!
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment