आपल्या प्रेमामुळे दुसरी व्यक्ती किती आनंदी होते आहे, यावर आपल्या प्रेमाचे भाग्य अवलंबून असते!
पडघम - साहित्यिक
श्रीनिवास जोशी
  • चित्र शांताराम आत्माराम सबनीस यांच्या ‘महाराष्ट्र मेघदूत’ (१९३८) या पुस्तकातून साभार
  • Tue , 19 July 2022
  • पडघम साहित्यिक कालिदास Kalidasa कालिदास दिन Kalidasa Din मेघदूत Meghadūta आषाढस्य प्रथम दिवसे Aashadhasya Prathama Divase

३० जूनपासून आषाढाला सुरुवात झाली… आणि आषाढ म्हटला की, अनेकांना महाकवी कालिदासाच्या ‘मेघदूत’ची आठवण येते. ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या त्यातल्या शब्दांना तर ‘मोस्ट कोटेबल कोट’चा दर्जा मिळालाय! आणि ‘मेघदूत’? त्याची ख्याती काय वर्णावी! गेल्या अनेक वर्षांपासून ‘मेघदूत’ मराठीसह जगभरच्या लेखक, कवी, अनुवादक आणि रसिकवाचकांना मोहिनी घालत आले आहे. त्याची ओळख करून देणारे हे सदर १२ जुलैपासून रोज...

.................................................................................................................................................................

लेखांक सातवा

पूर्वमेघ

(लेखातला पहिला मूळ संस्कृत श्लोक कालिदासाचा आणि त्याचे अनुवाद अनुक्रमे कुसुमाग्रज, सी.डी. देशमुख आणि शांता शेळके यांचे)

२६.

विश्रान्तः सन्व्रज वननदीतीरजातानि सिञ्च -

नुद्यानानां नवजलकणैर्युथिकाजालकानि।

गण्डस्वेदापनयनरुजाक्लान्तकर्णोत्पलानां

छायादानात्क्षणपरिचितः पुष्पलावीमुखानाम्॥

 

रम्य जुईचे पुढें ताटवे राननदीच्या तिरीं

भिजतिल कलिका शिंपडतां तूं नाजुक पहिल्या सरी;

कर्णफुलें सुकलेली, टिपती गाल, अशा माळिणी

छायारूपें मुखास्वाद घे त्यांचा तूं क्षणभरीं.

 

विश्रामोनी चल नदीतीरिं जे बाग तेथें

सिंचोनीयां नवजलकणें तूं जुईच्या कळ्यांते।

गालीं स्वेदा पुसुनि सुकलीं कर्णपद्में जयांची

छाया देतां क्षणिक रुची घे माळिणींच्या मुखांची।।

 

जरा विसांवा घेउन जाईं राननद्यांच्या तीरांवरुनी

तिथें बहरल्या उद्यानांतिल कळ्या जुईच्या भिजव सरींनी

गालांवरती घाम डंवरला, कानांवरची कमळें सुकलीं

पुष्पें खुडत्या माळिणींस त्या सुखव, सख्या, तू धरुन सांवली

 

तुझी विश्रांती घेऊन झाली म्हणजे रानातल्या झऱ्यांच्या काठाकाठाने तू पुढे जा. जाताना काठावरच्या बागांमधील जुईच्या नवकलिकांवर तुझ्या नवजलतुषारांचे शिंपण कर. पुढे तुला फुले खुडणाऱ्या तरुणी दिसतील. चेहऱ्यावरचे स्वेदबिंदू पुसून त्यांच्या कानांवरची कमलपुष्पे कोमेजून गेलेली असतील. त्या तरुणींच्या चेहऱ्यांवर थोडा काळ सावली धर. त्यांच्या सौंदर्याचा क्षणभर आस्वाद घे आणि मग लगेच पुढचा प्रवास सुरू कर.

बोरवणकर म्हणतात की, हा मेघ त्या रमणींच्या सौंदर्यात अडकला तर निरोपाला उशीर होईल, अशी भीती यक्षाला वाटते आहे. त्यामुळे तो मेघाला त्या तरुणींच्या मुखावर क्षणभरच सावली धरायला सांगतो आहे.

तरुणींना छाया देता देता त्यांच्या सौंदर्याचा आस्वाद घेण्याची कल्पना अतिशय सुंदर आहे. तरुणींजवळ काहीतरी काम काढून जायचे आणि त्यांच्या सौंदर्याचा आस्वाद घ्यायचा, ही गोष्ट प्रत्येक पुरुषाने कधी ना कधी केलेली असते. यक्षाने मेघाला दिलेला सल्ला ऐकला की कळते, ही प्रथा काही आजची नाही, फार पुरातन आहे!

सीडी लिहितात -

‘छाया देतां क्षणिक रुची घे माळिणींच्या मुखांची’

हे मेघा, त्या फुले तोडणाऱ्या तरुणींना छाया देताना तू त्यांच्या मुखांची रुची घे.

आणि कुसमाग्रज लिहितात -

‘छायारूपें मुखास्वाद घे त्यांचा तूं क्षणभरीं’

छायेच्या रूपाने त्यांचा मुखांचा आस्वाद तू घे.

छाया देताना आस्वाद घेण्यापेक्षा कुसुमाग्रजांची छायेच्या ‘रूपाने’ तरुणींच्या सौंदर्याचा आस्वाद घ्यायची कल्पना जास्त ‘भारी’ आहे.

शांताबाई स्त्री असल्याने पुरुषांची ही ‘ट्रिक’ सनातन असूनही त्यांच्या लक्षात आली नसावी आणि त्यामुळे त्यांच्या भाषांतरात ती उतरली नसावी!

२७.

वक्रः पन्था यदपि भवतः प्रस्थितस्योत्तराशां

सौधोत्सङ्गप्रणयविमुखो मा स्म भूरुज्जयिन्याः।

विद्युद्दामस्फुरितचकितैस्तत्र पौराङ्गनानां

लोलापाङ्गैर्यदि न रमसे लोचनैर्वश्चितोऽसि।।

 

वाट वांकडी तरी उदारा, जाई अवंतीप्रत

भव्य धवल ते सौध पाहुनी होशिल तूं विस्मित

विजा चमकतां, चंचलनयना प्रमदांच्या तेथिल

बघशिल ना जरि लोचनलीला, व्यर्थ तुझें जीवित!

 

नाही वाटेवरि जरि तया उत्तरे जो निघाला

जा भेटोनी विमुख नच उच्चसौधा विशाला।

जेथें विद्युत चमकुनि भयें लोल नारिकटाक्ष

चित्ता तूझ्या जरि न हरती जाण तू निष्फलाक्ष।।

 

जरी वाकडी वाट, तरीही उत्तरेस तूं, जलदा, जाईं

उज्जयिनीचे सौध मनोहर, सखया, विन्मुख तयां न होईं

पौरजनांच्या ललना सुंदर, नयन विजेनें त्यांचे दिपतां

कटाक्ष चंचल जरी न बघशिल, व्यर्थ जिणें हें समज तत्त्वतः

 

तू उत्तर दिशेला निघालास की, थोडा दूरचा वळसा पडला तरी चालेल, पण तू उज्जयिनीला जा. तेथील प्रासादांच्या विस्तीर्ण गच्च्या पाहण्याची संधी तू अजिबात गमावू नकोस. तुझ्या विजेच्या उन्मेषांमुळे दिपलेल्या नगरातील सुंदरी बावरून जातील. त्यांच्या तरल आणि चंचल नेत्रकटाक्षांच्या सौंदर्यात तू रमला नाहीस, तर तू एका मोठ्या आनंदाला मुकलास, असे म्हणावे लागेल.

कुसुमाग्रजांनी फार सुंदर ओळी लिहिल्या आहेत -

‘विजा चमकतां, चंचलनयना प्रमदांच्या तेथिल

बघशिल ना जरि लोचनलीला, व्यर्थ तुझें जीवित’

चंचलनयना प्रमदांच्या लोचनलीला! कुसुमाग्रजांना दाद द्यावी म्हटले, तर शब्द सापडत नाहीत, अशा वेळी!

सीडी लिहितात -

‘जेथें विद्युत चमकुनि भयें लोल नारिकटाक्ष

चित्ता तुझ्या जरि न हरती जाण तू निष्फलाक्ष’

आपण मराठीमध्ये ‘विलोल’ हा शब्द वापरतो, पण ‘लोल’ वापरत नाही. ‘विलोल’ म्हणजे अस्थिर! ‘लोल’ म्हणजेसुद्धा हलणारे किंवा अस्थिर असलेले. वीज चमकल्यामुळे भयाने अस्थिर झालेले स्त्रियांचे कटाक्ष तू बघितले नाहीस आणि त्यामुळे तुझ्या चित्ताचे हरण झाले नाही, तर तुझे नेत्र निष्फल झाले असेच तू समज.

ज्या डोळ्यांना स्त्रियांच्या अस्थिर कटाक्षातले सौंदर्य दिसू  शकत नाही, ते डोळे निष्फळ आहेत, असेच म्हणायला हवे!

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

२८.

वीचिक्षोभस्तनितविहगश्रेणिकाञ्चीगुणायाः

संसर्पन्त्याः स्खलितसुभगं दर्शितावर्तनाभेः।

निर्विन्ध्यायाः पथि भव रसाभ्यन्तरः सन्निपत्य

स्त्रीणामाद्यं प्रणयवचनं विभ्रमो हि प्रियेषु॥

 

किलबिलते खगमाला लहरींवरती वा - मेखला,

जलावर्त वा दावित नाभी, अस्थिरता पावलां

निर्विंध्या ती, लुब्ध तुझ्यावर रसास्वाद घे तिचा

विभ्रमचेष्टा प्रणय सांगती रमणीहृदयांतला!

 

जीची चंचल्लहरिमुखरा मेखला पक्षिराजी

जाणो नाभि स्खलितगतिनें दाविते भोवरा जी।

ती निर्विन्ध्या पंथिं जंव मिळे सेविं तीच्या रसास

स्त्रीची कान्ताजवळि पहिली प्रेमभाषा विलास।।

 

लाटा उठती, किलबिलती खग, मेखलाच ती किंचित् ढळवुन

जळीं भोंवरा - छे! निर्विन्ध्या निजनाभीचें घडविल दर्शन

कामातुर त्या सरितेवरती लवुनि जरासा करि रससेवन

लाडिक विभ्रम रमणींचे तर प्रणयाचें पहिलें आश्वासन!

 

उज्जयिनीच्या वाटेवर असताना निर्विन्ध्या नदी तुला भेटेल. तिच्या लाटा उसळत आहेत आणि त्यामुळेच त्यांवर विहार करणारे पक्षी किलबिलाट करत आहेत. त्या पक्ष्यांचे आणि पाणपक्ष्यांचे थवे म्हणजे जणू तिच्या कमरेच्या रुमझुमणाऱ्या मेखलाच. खडकांमुळे वळणे घेत चालल्यामुळे तिची चाल अतिशय मनोहर झालेली आहे. आपल्या प्रवाहातील भोवऱ्याच्या रूपाने आपली नाभी ती तुझ्यासमोर प्रकट होऊ देत आहे. स्त्रिया आपल्या मनातील प्रणयाची भावना, अशाच विभ्रमांतून व्यक्त करत असतात. तिच्या या प्रेमाचा तिच्याशी एकरूप होऊन, तू मनसोक्त रसास्वाद घे.

हा सर्व अर्थ कुसुमाग्रजांनी चार सुंदर ओळी लिहून व्यक्त केला आहे.

‘किलबिलते खगमाला लहरींवरती वा - मेखला,

जलावर्त वा दावित नाभी, अस्थिरता पावलां

निर्विंध्या ती, लुब्ध तुझ्यावर रसास्वाद घे तिचा

विभ्रमचेष्टा प्रणय सांगती रमणीहृदयांतला!’

तिच्या प्रेमाचा तू रसास्वाद घे, याचा चंद्रा राजन यांनी फार सुंदर अनुवाद केला आहे-

‘—such coy gestures are women’s first statements of love—

be sure to be filled with love’s fine flavour.’

यक्ष मेघाला सांगतो आहे की, ती तिचे प्रेम लज्जाभावाने नटलेल्या विभ्रमांमधून व्यक्त करते आहे, तेव्हा –‘be sure to be filled with love’s fine flavour!’

ती एवढ्या सुंदर आणि लज्जेने अलंकृत झालेल्या विभ्रमांमधून आपले प्रेम व्यक्त करते आहे, तर तू तुझे मन तिच्या प्रेमाच्या अभिजात स्वादाने काठोकाठ भरून घे!

‘—such coy gestures are women’s first statements of love—’

लज्जेने अलंकृत झालेले विभ्रम हे स्त्री-प्रेमाचे पहिले स्टेटमेंट असते. तिच्या प्रेमाचा तो पहिला आविष्कार असतो.

२९.

वेणीभूतप्रतनुसलिलासावतीतस्य सिन्धुः

पाण्डुच्छाया तटरुहतरुभ्रंशिभिर्जीर्णपर्णैः।

सौभाग्यं ते सुभग ! विरहावस्थया व्यञ्जयन्ती

काश्र्यं येन त्यजति विधिना स त्वयैवोपपाद्यः।।

 

अरुंद झाली सिंधुनदी ती, वेणीसम ओहळ

दरडीवरुनी वृक्ष ढाळती सुकली पर्णावळ

ती पांडुरता कृशता दावी विरहाची वेदना

सुभग तिला कर, दुथडी भरुनी तिचें वाहुं दे जळ!

 

गेलासी तों अटुनि दिसते धार वेणीप्रमाणें

तीतें देती तटतरुतळीं पाण्डुता शुष्क पाने।

त्वद्भाग्याचा विरहित-दशा देत तीची पुरावा

ज्यायोगें ती त्यजिल कृशता तो विधी आचरावा।।

 

सिंधुनदीचें जळ ओसरतां वेणीसम ती बारिक झाली

तटतरु गाळिति शीर्ण पालवी पांडुरता त्यायोगें आली

विरहावस्था तिची सुचविते, प्रिय मित्रा रे, अहोभाग्य तव

कृशता सखिची जाइल ऐसा उपाय कांहीं योजावा नव!

 

हे भाग्यशाली मेघा, तू पुढे गेलास म्हणजे सिंधू नदीची कृशता संपवून टाकण्याचे काम कर. तिचा प्रवाह एखाद्या स्त्रीच्या वेणीएवढा अरुंद झालेला असेल. काठावरच्या वृक्षांची पाने गळून तिच्या प्रवाहात पडल्यामुळे तिला पांढरट रंग प्राप्त झालेला आहे. तिची ही विरहावस्था म्हणजे जणू तुझे भाग्यच. तेव्हा तू सिंधू नदी तिची कृशता टाकून देईल असे कर.

ही नदी म्हणजे विंध्य पर्वतात उगम पावलेली सिंधू आहे, असे सारोद्धारिणी आणि सुमतिविजय या कालिदासाच्या संस्कृत टीकाकारांनी म्हटले आहे, असे रामचंद्र बोरवणकर त्यांच्या टिपेमध्ये लिहितात. हिला ‘काला-सिंधू’ असेही नाव आहे.

विरहावस्थेतील सिंधू नदीवर भरपूर प्रेम करायला तुला मिळणार म्हणून तू भाग्यवान आहेस, असा अर्थ रामचंद्र बोरवणकर सांगतात. विरही स्त्रीवर प्रेम करताना तीव्र प्रतिसाद मिळतो, असा अर्थ त्यांना अपेक्षित आहे.

परंतु सगळ्यात सुंदर अर्थ चंद्रा राजन आणि सीडींनी लावला आहे. विरहावस्थेतील क्षीण आणि कृश अशा सिंधू नदीला तिचे दुःख सोडायला लावून तिला उत्फुल्ल करण्याचे कार्य तुला करायचे आहे, म्हणून तू भाग्यशाली आहेस, असा अर्थ चंद्रा राजन ध्वनित करतात-

‘O fortunate lover, yours will be the happy task to induce Sindhu visibly grieving at your absence … to cast off the sorrow withering her.’

सीडी लिहितात -

‘त्वद्भाग्याचा विरहित-दशा देत तीची पुरावा

ज्यायोगें ती त्यजिल कृशता तो विधी आचरावा।।’

तिची विरहदशा तुझ्या भाग्याचा पुरावा देत आहे. ज्यामुळे सिंधू नदी तिची कृशता त्यजेल असा विधी तू आचर.

कृश सिंधू नदीवर अमोघ धारांनी प्रचंड वर्षाव करणे, हा विधी इथे अपेक्षित आहे. प्रचंड वर्षाव करून, प्रचंड प्रेम करून, सिंधू नदीला उत्फुल्ल करण्याचे भाग्य तुझ्या नशिबात आहे असा अर्थ सीडींना अपेक्षित आहे. 

प्रेमात आपल्याला काय मिळते आहे, यावर आपले भाग्य अवलंबून नसते. आपल्या प्रेमामुळे दुसरी व्यक्ती किती आनंदी होते आहे, यावर आपल्या प्रेमाचे भाग्य अवलंबून असते.

कालिदासाला अभिप्रेत असलेला हा अर्थ बोरवणकरांच्या लक्षात आला नाही. प्रेमाचा फार मोठा अर्थ चंद्रा राजन आणि सीडी येथे आपल्या लक्षात आणून देतात. 

३०.

प्राप्यावन्तीनुदयनकथाकोविदग्रामवृद्धा -

न्पूर्वोद्दिष्टामनुसर पुरीं श्रीविशालां विशालाम्।

स्वल्पीभूते सुचरितफले स्वर्गिणां गां गतानां

शेषैः पुण्यैर्हृतमिव दिवः कान्तिमत्खण्डमेकम्॥

 

देश अवंती – वत्सपतीच्या गांवोगांवीं कथा

रमुन सांगती वृद्ध, उदारा, तेथें तूं पोंचतां

वैभवशाली विशाल नगरी उज्जयनी ती पुढें

स्वर्गशलाका ओढुन आणी भूवर कीं साधुता!

 

पूर्वोक्ता ती सधन नगरी माळव्याची पहावी

वृद्धांतोंडीं उदयनकथा जेथल्या सर्व गावीं।

स्वर्गस्थानीं सुकृत घटुनी जन्मता मृत्युलोकीं

शेषें पुण्यें रुचिर हरिला स्वर्गिंचा भाग जी कीं।।

 

उदयनवासवदत्ताप्रणयीकथा जेथले वृद्ध सांगती

अवंतीस त्या प्रथम पोंचुनी, गांठ विशाला नगरी पुढतीं

स्वर्गी गेले, त्यांनीं अपुलें पुण्य तेथलें उणावल्यावर

- ही नगरी - जणुं उरल्या पुण्यें स्वर्गखंड आणियला भूवर!

 

उदयन राजाच्या गोष्टी सांगणारे जाणकार वृद्ध ज्या देशात गावागावात आहेत, अशा अवंती देशात पोहोचल्यावर मी पूर्वी उल्लेख केलेल्या ऐश्वर्यसंपन्न अशा विशाला म्हणजे उज्जयिनी तू नगरीला जा. स्वर्गातील काही लोकांचे पुण्य कमी झाल्याने त्यांची पृथ्वीवर यायची वेळ झाली. तेव्हा त्या लोकांनी आपले उरलेले पुण्य खर्च करून स्वर्गाचा एक तुकडा पृथ्वीवर आणला. स्वर्गाचा तो झगझगीत तुकडा म्हणजेच उज्जयिनी नगरी!

कुसुमाग्रज लिहितात -

‘वैभवशाली विशाल नगरी उज्जयनी ती पुढें

स्वर्गशलाका ओढुन आणी भूवर कीं साधुता!’

'स्वर्गशलाका' असा अत्यंत सुंदर शब्द कुसुमाग्रजांनी वापरलेला आहे. स्वर्गशलाका म्हणजे स्वर्गाचा तुकडा! या स्वर्गशलाकेला साधुतेने पृथ्वीवर ओढून आणलेले आहे. साधुतेच्या पाठोपाठ पुण्ये येणारच! आणि पुण्याच्या पाठोपाठ स्वर्गही येणारच! 

सीडी लिहितात -

‘स्वर्गस्थानीं सुकृत घटुनी जन्मता मृत्युलोकीं

शेषें पुण्यें रुचिर हरिला स्वर्गिंचा भाग जी कीं’

जवळ उरलेली शेवटची पुण्ये खर्च करून रुचिर असा स्वर्गाचा भाग पळवून आणला गेला आहे! रुचिर म्हणजे आपल्या रुचीला अनुकूल असलेला. मनोहर! सुंदर!

शांताबाईंनी -

‘उदयनवासवदत्ताप्रणयीकथा जेथले वृद्ध सांगती’

अशी ओळ लिहिली आहे. इतर अनुवादांमध्ये फक्त उदयन राजाच्या कथा असा उल्लेख आहे. शांताबाईंनी ‘उदयनवासवदत्ताप्रणयीकथा’ असा उल्लेख केलेला आहे. हा वत्स देशाचा राजा उदयन आणि उज्जयिनीची राजकन्या वासवदत्ता यांच्यातील प्रेमकथांचा उल्लेख आहे.

प्रणयकथांचा संदर्भ शांताबाईंनी दिल्यामुळे या श्लोकातील सगळे वातावरणच बदलून गेले आहे! यक्षाला इथे उदयनवासवदत्ता यांच्याच कथा अपेक्षित आहेत!

वेगवेगळे अनुवाद आपण वाचत गेलो, तर मूळ साहित्यकृतीवर अनेक अंगांनी प्रकाश कसे पडत राहतात, याचे शांताबाईंचा हा श्लोक हे उत्तम उदाहरण आहे.

..................................................................................................................................................................

लेखांक पहिला : कालिदासाच्या काव्यातील एकेक श्लोक सौंदर्यवंत ऐरावतासारखा झुलत राहतो, आणि त्यावर आशयाचा ऐश्वर्यमान इंद्र आरूढ झालेला असतो!

लेखांक दुसरा : उत्कंठा उत्पन्न करणाऱ्या त्या मेघासमोर यक्ष आपले अश्रू आवरत कसाबसा उभा राहिला…

लेखांक तिसरा : कालिदास आपल्याला आपल्या जगातून उचलतात आणि प्रेमाच्या व सौंदर्याच्या तीव्र संवेदनांनी भारलेल्या जगात घेऊन जातात…

लेखांक चौथा कालिदासाला जेव्हा जेव्हा प्रकृतीतील अपार सौंदर्य दिसते, तेव्हा तेव्हा त्याला पुरुष-तत्त्वाची आठवण होते…

लेखांक पाचवा : कालिदासाच्या सौंदर्यदृष्टीचा स्पर्श त्याच्या अनुवादकांनासुद्धा होतो…

लेखांक सहावायेथून आपला कालिदासाच्या ‘मेघदूता’तील श्रृंगाररसाच्या प्रवाहात प्रवेश होतो.…

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......