३० जूनपासून आषाढाला सुरुवात झाली… आणि आषाढ म्हटला की, अनेकांना महाकवी कालिदासाच्या ‘मेघदूत’ची आठवण येते. ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या त्यातल्या शब्दांना तर ‘मोस्ट कोटेबल कोट’चा दर्जा मिळालाय! आणि ‘मेघदूत’? त्याची ख्याती काय वर्णावी! गेल्या अनेक वर्षांपासून ‘मेघदूत’ मराठीसह जगभरच्या लेखक, कवी, अनुवादक आणि रसिकवाचकांना मोहिनी घालत आले आहे. त्याची ओळख करून देणारे हे सदर १२ जुलैपासून रोज...
.................................................................................................................................................................
लेखांक सहावा
पूर्वमेघ
(लेखातला पहिला मूळ संस्कृत श्लोक कालिदासाचा आणि त्याचे अनुवाद अनुक्रमे कुसुमाग्रज, सी.डी. देशमुख आणि शांता शेळके यांचे)
२१.
नीपं दृष्ट्वा हरितकपिशं केसरैरर्धरूढै -
राविर्भूतप्रथममुकुलाः कन्दलीश्चानुकच्छम्।
जग्ध्वारण्येष्वधिकसुरभिं गन्धमाघ्राय चोर्व्याः
सारङ्गास्ते जललवमुचः सूचयिष्यन्ति मार्गम्॥
हिरव्या पिवळ्या कदंबपुष्पांतिल पाहुनि केसर
नवकदलींचे सेवुनि अंकुर नदीकिनाऱ्यावर
गंधवती धरतीचा हुंगित वास वाढता वनीं
सूचित करितिल हरिण तुझा पथ होउनि हर्षातुर
नीपा अर्धें खुलुनि करती केसर श्यामरक्त
आर्द्र स्थानीं प्रथमकलिका कर्दळींनाही येत।
मृद्गगंधातें दरवळत जो, हुंगुनी काननात
मार्गा तूझ्या हरिण चरतां दाविती वृष्टि जेथ।।
हिरव्यापिंगट नीपफुलांचे भ्रमर पाहती अस्फुट केसर
रानकर्दळीवरी डंवरल्या कळ्या सेवितीं हरिणें आतुर
भाजावळिनें दरवळणारी भूमि हुंगिती मत्त मतंगज
सरी वर्षतां, मेघा रे, हे सर्व सुचवितिल मार्ग पुढे तुज
रस्त्यात अर्धवट उघडलेल्या हिरवटपिवळ्या कदंबपुष्पांतील केसरांकडे निरखून पाहणारे भुंगे तुला दिसतील. थोडा पुढे गेल्यावर तुला पाणथळ जमिनी दिसतील. ज्यांच्या पहिल्या कळ्या बाहेर पडल्या आहेत, अशा कर्दळी त्या पाणथळ जागांमध्ये उगवलेल्या तुला दिसतील. त्या कर्दळी खाणारी हरणेसुद्धा तुला दिसतील. अजून थोडा पुढे गेलास तर रानावनातील जमिनींचा मृदगंध घेत जाणारे हत्ती तुझ्या नजरेला पडतील. तू तुझ्या तुषारांचा वर्षाव करत करत पुढे जात असताना, हे सारे जण तुला मार्गदर्शन करतील.
हा भावानुवाद करताना रामचंद्र बोरवणकर यांनी लावलेला अर्थ ग्राह्य धरला आहे. बोरवणकर यांनी या श्लोकाचा अर्थ अतिशय साकल्याने लावलेला आहे. शांताबाईंनी तोच अर्थ स्वीकारला आहे. ‘सारङ्ग’ या शब्दाचे भुंगा, हरिण आणि हत्ती असे तीन अर्थ घेऊन बोरवणकरांनी हा अर्थ लावला आहे. एम. आर. काळे यांनी हाच अर्थ स्वीकारला आहे.
रा. शं. वाळिंबे आणि बापट वगैरे भाषांतरकारांनी केसर बघणारे, कर्दळी खाणारे आणि मातीचा सुवास घेत जाणारे हत्ती किंवा हरिण तुला मार्गदर्शन करतील असे म्हटले आहे. कुसुमाग्रज आणि सीडी यांनीसुद्धा हाच अर्थ घेतला आहे.
पण गंमत अशी आहे की, हत्ती किंवा हरिण पाणथळ जागेतील कर्दळी खाता खाता त्याच वेळी कोरड्या मातीवर पाऊस पडल्यावर तिला येणारा सुवास कसा घेतील? आणि याही पुढे जाऊन वरील दोन्ही गोष्टी करता करता अर्धोन्मिलीत कदंब फुलांचे केसर कशाला बघतील; असा विचार मनात येतो.
२२.
उत्पश्यामि द्रुतमपि सखे! मत्प्रियार्थं यियासोः
कालक्षेपं ककुभसुरभौ पर्वते पर्वते ते।
शुक्लापाङ्गैः सजलनयनैः स्वागतीकृत्य केकाः
प्रत्युद्यातः कथमपि भवान् गन्तुमाशु व्यवस्येत्॥
अधीर जरि तूं साधायाला मित्राचें वांछित
गिरीगिरीवर फुलें कुड्यांची करतिल तुज मोहित
आळवतिल तुज सजलनेत्र ते मयूर केकारवें
निर्धारानें सोडुनि जा ती स्नेहाची संगत!
तू मत्कार्यावरि जरि सख्या सिद्ध वेगें निघाया
शैलीं शैलीं सुरभि-कुटजीं वेळ जाईल वाया।
केका-शब्दें सजल नयन स्वागतातें मयूर
येतां, यत्नें झडकरि पुढें चालण्या हो तयार।।
कार्यसिद्धि मम व्हावी, म्हणुनी द्रुतगतिनें जरि, मित्रा, निघशिल
विविध पर्वतांवरी तरीही रेंगाळत तूं खचित राहशिल
आनंदाश्रू ढाळुन जेव्हां मोर आरवुन स्वागत करिती
मोठ्या कष्टानेंच तुझें मग पडावयाचें पाउल पुढतीं!
हे मित्रा, माझ्या प्रियेसाठी अगदी लवकर जावे, अशी तुझी इच्छा असली तरी कुटज फुलांनी सुगंधित झालेल्या प्रत्येक पर्वतावर तुला थांबणे भाग पडेल, अशी भीती मला वाटते आहे. तुझ्या आगमनाने मोरांना आनंद होईल आणि ते साश्रू नयनांनी केकारव करत तुला सामोरे येतील. तरीही तू मोठ्या कष्टाने मन आवर आणि लवकर पुढे जाण्याचे कर.
सौंदर्याशाली निसर्गामधून सामोरा येणारा एक एक मोह मेघाला अडवून धरेल काय, अशी शंका यक्षाला वाटते आहे.
होरेस विल्सनने ही भावना आपल्या अनुवादात पुढे आणली आहे-
Ah! much I dread the long-protracted way,
Where charms so numerous spring to tempt delay:
Will not the frequent hill retard thy flight,
Nor flowery plain persuade prolonged delight?
Or can the Peacock's animated hail,
The bird with lucid eyes, to lure thee fail?
एकतर तुझा प्रवास इतका वेळखाऊ आहे, त्यात रस्त्यात इतके मोहक प्रकार तुला आडवे येणार. तुला थांबावेसे वाटले नाही तरच नवल! सुंदर पर्वतराजी तुला आडव्या येतील आणि फुलांनी गच्च भरलेली पठारे सुद्धा आडवी येतील. त्यात मोरांच्या केका आणि त्यांचे आनंदाश्रुंनी भरलेले डोळे!
मेघाचा पाय या सगळ्या मोहांमधून निघणार कसा, असे यक्षाला वाटते आहे.
होरेस विल्सनचे भाषांतर १८१४चे आहे. विल्सन शब्दार्थ नेमकेपणाने पोहोचवण्याच्या भानगडीत फारसा पडत नाही. आणि ते तो मान्यही करतो. कित्येक वेळा तो मुख्य श्लोकापासून खूप दूरही गेलेला दिसतो. पण त्याने दिलेले संदर्भ सुंदर आहेत. त्यामुळे गेली दोनशे वर्षे मेघदूताचे सगळे भाषांतरकार विल्सनसाहेब काय म्हणतो आहे, हे एकदातरी पाहून घेतात!
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
२३.
पाण्डुच्छायोपवनवृतयः केतकैः सूचिभिन्नै
र्नीडारम्भैर्गृहबलिभुजामाकुलग्रामचैत्याः।
त्वय्यासन्ने परिणतफलश्यामजम्बूवनान्ताः
संपत्स्यन्ते कतिपयदिनस्थायिहंसा दशार्णाः॥
सुफल सावळ्या पहा जांभळी दशार्ण देशांतरीं
उसासुनी केतकीबनें हो वनसीमा पांढरी
हंसहि येतिल विसावण्याला तेथें कांहीं दिन
ग्रामखगांचीं दिसतिल घरटीं वृक्ष देवळांवरी
उद्यानांची धवल फुलती कुंपणें केतकीचीं
वृक्षी वृक्षी घडति घरटीं मार्गिं काकादिकांचीं।
काळा जम्बूफलभार खुले माळव्याच्या वनांस
त्वत्सान्निध्यें गमनसमया जाणिती राजहंस।।
पीतशुभ्र उमलले केवडे जिथें वनांच्या सीमेवरुनी
घरटीं बांधिति गावकावळे गजबजलेले चैत्य तयांनीं
दशार्णदेशाजवळीं येतां बघशिल पिकल्या जांभुळराई
जरा विसांवा घेऊं बघतिल थबकुन तेथें राजहंसही!
तू दशार्ण देशाच्या नजीक येऊन ठेपलास म्हणजे, त्या देशातील उद्यानांच्या कुंपणांवरील केवड्यांची अग्रे उमलून आणि उसासून येतील. त्यामुळे सगळ्या कुंपणांवर शुभ्र-सोनेरी रंगाची छटा पसरून राहील. गावातील वृक्षांवर ग्रामखगांची घरटी बांधण्यासाठी एकच धांदल उडेल. गावागावातील वृक्ष पक्ष्यांमुळे गजबजून जातील. वनांमधील जांभळाच्या बनांमध्ये जांभळे पिकतील आणि ती बनेच्या बने निळी-सावळी दिसू लागतील. राजहंससुद्धा या वनांमध्ये काही दिवस वसती करून राहतील.
मानससरोवराकडे निघालेले राजहंस थोड्या काळासाठी या जांभूळ-बनांमध्ये थांबलेले आहेत. निळ्या सावळ्या जांभूळ-बनांवर शुभ्र राजहंस विहरत आहेत, अशी ही सुंदर शोभा आहे. मानससरोवराकडे निघालेले राजहंस थोड्या काळासाठी या जांभूळ-बनांमध्ये थांबलेले आहेत.
हा दशार्ण देश म्हणजे हल्लीचा छत्तीसगढ प्रदेश आहे, असे अनेक विद्वानांचे मत आहे. काही लोक दशार्ण म्हणजे सध्याचा भिलसा-विदिशेच्या आसपासचा प्रदेश म्हणतात. काही लोक दशार्ण म्हणजे बुंदेलखंड म्हणतात! सीडींनी त्याला माळवा म्हटलेले आहे.
२४.
तेषां दिक्षु प्रथितविदिशालक्षणां राजधानीं
गत्वा सद्यः फलमविकलं कामुकत्वस्य लब्धा।
तीरोपान्तस्तनितसुभगं पास्यसि खादु यस्मा -
त्सभ्रूभङ्गं मुखमिव पयो वेत्रवत्याश्चलोर्मि॥
विदिशा नगरी तिथें नृपाची, तिजजवळीं पोंचतां
वेत्रवती सरिता तुज सुखविल, श्रवुनि तुझ्या गर्जितां
भुवई चढवुन प्रणयभरानें तुज ती आमंत्रिल
चंचल अधराचें घे चुंबन - त्यांतच कामार्तता!
ख्याता साऱ्या जगतिं विदिशा राजधानी तयाची
तेथें पावें झणिं सफलता तू विलासीपणाची।
तीरीं पितां गरजुनि जला बेटवेच्या रसाळा
सभ्रूभंगा युवतिवदना कीं जणूं वीचिलोला।।
त्याच दिशेला दिसेल तुजला नामवंत ती विदिशानगरी
कामिजनांचें वांछित तेथें मिळेल, रे, मनिं शंका न धरी
गर्जुन लहरी उठवुन तीरीं जळ चुंबाया लवशिल जेव्हां
किंचित् भुंवया करुन वांकड्या वेत्रवती तुज खुणविल तेव्हां!
जेव्हा तू प्रसिद्ध अशा विदिशा नगरीला पोहोचशील, तेव्हा स्त्रीसुखाच्या तुझ्या मनात असलेल्या सर्व इच्छांची पूर्ती होईल. वेत्रवतीच्या काठावरून तुझ्या घनगंभीर गर्जना गूंजत राहतील. त्या ऐकून चंचल तरंग असलेली वेत्रवती आपली भिवई उचलून तुला प्रेमाचे आमंत्रण देईल. एखादा प्रियकर जसे आपल्या प्रेयसीचे ओठ प्राशन करतो, त्याप्रमाणे तू वेत्रवतीच्या मधुर जलाचे ओठ प्राशून घे.
खरं तर, वेत्रवतीच्या अवखळ लाटा एखाद्या सुंदरीने आपली भिवई वर उचलल्याप्रमाणे दिसत आहेत. भ्रूभंग झालेल्या मुखाप्रमाणे ती दिसत आहे. हे प्रेमाचे आमंत्रणच आहे, असे कुसुमाग्रज म्हणत आहेत. वसंत बापट आणि इतर त्यांच्या रसग्रहणात म्हणत आहेत की, इतके दिवस मेघ दूर राहिल्याने वेत्रवती चिडली आहे आणि म्हणून तिने भिवई वर उचलली आहे, तेव्हा तिचे चुंबन घेऊन तू तिचा राग घालव.
श्रीमती चंद्रा राजन यांनी या श्लोकाचा अतिशय ओघवता असा अनुवाद केला आहे. त्याच अनुषंगाने मी हा अनुवाद केला आहे.
चंद्रा राजन यांचा अनुवाद -
When you reach that royal city, Vidiśā by name widely renowned,
you shall at once obtain the unalloyed fulfilment of a lover’s desire,
tasting Vetravatī’s sweet waters
as a lover his beloved’s lips,
with sonorous thunder passing along her banks
as she flows with knitted brows of tremulous wavelets.
शांताबाईसुद्धा वेत्रवती भिवई उचलून ‘खुणवत’ आहे असाच अर्थ लावतात.
रामचंद्र बोरवणकर यांनी या श्लोकानंतर एक सुंदर टीप दिली आहे. ते लिहितात – “मेघदूतातील श्रृंगाररसाच्या प्रवाहात वाचकाचा येथून प्रवेश होतो. श्रृंगारातील अधरप्राशनाचे येथे कवीने वर्णन केले आहे. मेघाला कामी पुरुष कल्पिला आहे व वेत्रवती नदीला विलासिनी स्त्री कल्पिली आहे.”
मेघदूतामध्ये इतकावेळ मेघामुळे सृजनाचे मंद मंद वारे वाहात होते. आता इथून पुढे, मेघ आणि काव्य जसजसा पुढचा प्रवास करू लागतात, तशीतशी, या काव्यामध्ये कामसुखांची मादक वावटळ हळूहळू उठत जाते. वातावरण कामसुखाच्या आणि अतीव सौंदर्याच्या मोहक अभिव्यक्तीने मदोन्मत्त बनत जाते!
२५.
नीचैराख्यं गिरिमधिवसेस्तत्र विश्रामहेतो -
स्त्वत्संपर्कात्पुलकितमिव प्रौढपुष्पैः कदम्बैः।
यः पण्यस्त्रीरतिपरिमलोद्गारिभिर्नागराणा
मुद्दामानि प्रथयति शिलावेश्मभिर्यौवनानि॥
नगराजवळीं श्रमहरणास्तव तव नीचय पर्वत
कंदबपुष्पें बहरुन होइल प्रेमानें पुलकित!
सुरतगंध त्या गुहांत भरला, रतल्या वारांगना,
पौरजनांच्या तारुण्याची प्रमत्तता दावित!
तेथें नीचैर्गिरिवरि जरा घेत विश्राम थांबें
त्वत्संगें जो पुलकित जणूं फुल्लपुष्पें कदंबे।
जेथें गुंफा रतिपरिमळें पूर्ण वारांगनांच्या
तारूण्यातें प्रगट करिती उत्कटा नागरांच्या।।
नीचै नामक गिरीवरी त्या थांब जरासा विश्रांतीस्तव
कदंबपुष्पीं टपोर फुलला रोमांचित जणुं भेटीनें तव
गणिकांसंगें जिथें शिळांवर संभोगातुर रमले पुरजन
गंध दरवळे रतिलीलेचा सुचवित त्यांचें प्रमत्त यौवन!
तुझा स्पर्श होताच पूर्ण उमललेल्या कदंबपुष्पांचे रोमांच नीचै पर्वताच्या अंगावर उभे राहतील. या पर्वतावर तू काही काळ विश्रांती घे. या पर्वतातील गुहांमध्ये गणिकांच्या प्रणय-क्रीडांमुळे रतिपरिमल भरून राहिलेला असतो. रतिक्रीडेमधून उसळणारा हा सुवास तेथील नागरिकांची यौवने किती बेफाम आणि उत्कट आहेत, हे प्रकट करत राहातो.
‘रतिपरिमल’ ही कल्पनाच वाचकाच्या मनाचे हरण करणारी आहे. स्त्री-पुरुषांच्या मीलनाचा सुवास! तो गुहागुहांतून भरून राहिला आहे. काय बोलावे! शरीरांची प्रमत्त सुखे आणि त्यांची तेवढीच प्रमत्त वर्णने!
चंद्रा राजन रतिपरिमलांना ‘फ्रॅग्ररन्सेस ऑफ प्लेझर’ म्हणतात! सुखांचे सुगंध! सुखांचे परिमल! सगळेच बेफाम, सगळेच बेफाट! स्त्री-पुरुष प्रेमाबद्दल अपराधीपणाची सार्वत्रिक भावना तयार व्हायच्या खूप आधीचा हा काळ होता!
..................................................................................................................................................................
लेखांक पहिला : कालिदासाच्या काव्यातील एकेक श्लोक सौंदर्यवंत ऐरावतासारखा झुलत राहतो, आणि त्यावर आशयाचा ऐश्वर्यमान इंद्र आरूढ झालेला असतो!
लेखांक दुसरा : उत्कंठा उत्पन्न करणाऱ्या त्या मेघासमोर यक्ष आपले अश्रू आवरत कसाबसा उभा राहिला…
लेखांक तिसरा : कालिदास आपल्याला आपल्या जगातून उचलतात आणि प्रेमाच्या व सौंदर्याच्या तीव्र संवेदनांनी भारलेल्या जगात घेऊन जातात…
लेखांक चौथा : कालिदासाला जेव्हा जेव्हा प्रकृतीतील अपार सौंदर्य दिसते, तेव्हा तेव्हा त्याला पुरुष-तत्त्वाची आठवण होते…
लेखांक पाचवा : कालिदासाच्या सौंदर्यदृष्टीचा स्पर्श त्याच्या अनुवादकांनासुद्धा होतो…
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment