कालिदासाच्या सौंदर्यदृष्टीचा स्पर्श त्याच्या अनुवादकांनासुद्धा होतो…
पडघम - साहित्यिक
श्रीनिवास जोशी
  • चिं. द्वा. देशमुख यांच्या ‘मेघदूत’ या - वरदा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या - अनुवादित आवृत्तीमधून
  • Sat , 16 July 2022
  • पडघम साहित्यिक कालिदास Kalidasa कालिदास दिन Kalidasa Din मेघदूत Meghadūta आषाढस्य प्रथम दिवसे Aashadhasya Prathama Divase

३० जूनपासून आषाढाला सुरुवात झाली… आणि आषाढ म्हटला की, अनेकांना महाकवी कालिदासाच्या ‘मेघदूत’ची आठवण येते. ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या त्यातल्या शब्दांना तर ‘मोस्ट कोटेबल कोट’चा दर्जा मिळालाय! आणि ‘मेघदूत’? त्याची ख्याती काय वर्णावी! गेल्या अनेक वर्षांपासून ‘मेघदूत’ मराठीसह जगभरच्या लेखक, कवी, अनुवादक आणि रसिकवाचकांना मोहिनी घालत आले आहे. त्याची ओळख करून देणारे हे सदर १२ जुलैपासून रोज...

.................................................................................................................................................................

लेखांक पाचवा

पूर्वमेघ

(लेखातला पहिला मूळ संस्कृत श्लोक कालिदासाचा आणि त्याचे अनुवाद अनुक्रमे कुसुमाग्रज, सी.डी. देशमुख आणि शांता शेळके यांचे)

१६.

त्वय्यायत्तं कृषिफलमिति भ्रूविलासानभिज्ञैः

प्रीतिस्निग्धैर्जनपदवधूलोचनैः पीयमानः।

सद्यःसीरोत्कषणसुरभि क्षेत्रमारुह्य मालं

किंचित्पश्चाह्नज लघुगतिर्भूय एवोत्तरेण॥

 

प्रेमभरानें नेत्र निरागस खिळवुनियां तुजवरी

कृषिवलकांता म्हणतिल, आलें हें सौभाग्यच घरीं!

नांगरल्या मातीचा पसरे सुगंध माळावर

सेवित जा तो जलद तेथुनी उत्तर देशांतरीं!

 

तूझ्या हातीं कृषिफल असें जाणुनी लक्षितील

तूते प्रेमें कृषक-वनिता नेत्र ज्यांचे अलोल।

मालक्षेत्रें चढ उखळितां नांगरे ज्या सुवास

डावा थोडा वळ, मग पुन्हां शीघ्र जा उत्तरेस।।

 

फळें सुगीचीं तुझ्याच हातीं, जाणुनिया हें

अपुल्या चित्तीं कृषीवलांच्या

वधू भाबड्या अतिप्रीतिनें तुला पाहती नुकत्या

झाल्या नांगरटीनें दरवळणाऱ्या माळावरुनी उत्तरेस

जा पुनरपि वेगें पश्चिमेस तूं हलकें वळुनी

 

‘नयनांचे विविध विभ्रम ज्यांना माहीतही नाहीत, अशा ग्रामीण स्त्रिया, तुझे रूप आपल्या प्रेमळ नयनांनी पिऊन घेतील. कारण शेतीची सगळी समृद्धी तुझ्यावरच अवलंबून आहे, हे त्यांना माहिती असते. अशा वेळी, जमीन नांगरून झाल्यामुळे जो सुगंधित झाला आहे, अशा माळावर चढून तू थोडासा पश्चिमेला जा. आणि मग उशीर न करता लगेच द्रुतगतीने उत्तर दिशेला जायला लाग.’

नयननांचे विभ्रम माहीत नसलेल्या ग्रामीण स्त्रियांच्या नयनांचे वर्णन करताना कुसुमाग्रज ‘निरागस’ हा शब्द वापरतात, तर सीडी ‘अलोल’ हे विशेषण वापरतात. म्हणजे जे चंचल नाहीत ते! नगरातील स्त्रिया स्वतःच्या भावना आपल्या विलोल नयनांद्वारे आविष्कृत करण्याएवढ्या चतुर असतात. ग्रामीण स्त्रियांमध्ये एवढे चातुर्य कुठले? त्यांचे नयन ‘अलोल’ असतात!

१७.

त्वामासारप्रशमितवनोपप्लवं साधु मुर्ध्ना

वक्ष्यत्यध्वश्रमपरिगतं सानुमानाम्रकूटः।

न क्षुद्रोऽपि प्रथमसुकृतापेक्षया संश्रयाय

प्राप्ते मित्रे भवति विमुखः किं पुनर्यस्तथोच्चैः॥

 

रानजाळ विझवून, थांबतां श्रांत सख्या होउन

आम्रकूट तुज माथ्यावरती वाहिल आनंदुन;

आठवुनी ऋण क्षुद्रहि करिती मित्रांचा आदर

विशाल अन् उत्तुंग गिरी तो - तसेंच त्याचें मन!

 

दावाग्नीला शमवुनि जसा खिन्न चालून वाट

येसी तेव्हां तुज गिरि शिरी घेतसे आम्रकूट।

आभारातें विसरत नसे क्षुद्रही आश्रयाला

येतां मित्र स्मरण न कसें त्यापरी श्रेष्ठशीला।।

 

जलवर्षावें विझविसि वणवे - आम्रकूट स्वागतास सजला

निजशिखरांवर देइल आश्रय प्रवासशिणल्या, मेघा,

तुजला स्मरण मागल्या उपकारांचें नीचमनींही प्रेम जागवी

उच्च, सुसंस्कृत मुळांत त्यांची काय थोरवी मग सांगावी!

 

‘आपल्या जलवर्षावाने तू विविध वणवे शांत करत जाशील. अशा रीतीने वणवे विझवत विझवत केलेल्या प्रवासामुळे तू थकून जाशील. अशा वेळी आम्रकूट पर्वत तुला मोठ्या आदराने आणि प्रेमाने आपल्या मस्तकावर धारण करेल. आपल्या मस्तकावर विश्रांतीसाठी आश्रय देईल. ज्याने आपल्यावर उपकार केले आहेत, असा मित्र आश्रयासाठी आला, तर अगदी क्षुद्र मनुष्यदेखील आपल्यावर केल्या गेलेल्या उपकाराची आठवण ठेवून पाठ फिरवत नाही. मग आम्रकूट पर्वतासारखा उत्तुंग श्रेष्ठ तुझ्याविषयी उदासीन कसा राहील?’

सीडी लिहितात -

‘दावाग्नीला शमवुनि जसा खिन्न चालून वाट

येसी तेव्हां तुज गिरि शिरी घेतसे आम्रकूट’

वणवे विझवत जाणे म्हणजे भयंकर विनाश बघत जाणे. अशी वाट चालून झाल्यावर मन खिन्न होणारच. म्हणून सीडी ‘दावाग्नीला शमवुनि जसा खिन्न चालून वाट’ असे लिहितात. त्यांची प्रतिभा अशा रीतीने आशयाच्या छटा शोधत राहते आणि त्यात यशस्वीसुद्धा होते.

हा आम्रकूट पर्वत म्हणजे सध्याचे अमरकंटक आहे, असे होरेस विल्सन या अभ्यासकाचे म्हणणे आहे आणि बहुतेक अभ्यासकांनी ते मान्यही केलेले आहे. ज्याची शिखरावर आणि ज्याच्या आसपासच्या परिसरात अंब्याची खूप झाडी आहे, तो आम्रकूट असे एम. आर. काळे म्हणतात.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

१८.

छन्नोपान्तः परिणतफलद्योतिभिः काननाम्रै -

स्त्वय्यारूढे शिखरमचलः स्निग्धवेणीसवर्णे।

नूनं यास्यत्यमरमिथुनप्रेक्षणीयामवस्थां

मध्ये श्यामः स्तन इव भुवः शेषविस्तारपाण्डुः।।

 

पक्कफलांकित आम्र जयावर, त्या शैलाच्या शिरीं

विराजतां तूं, रंग कृष्ण तव केशकलापापरी,

देवांनींही दृश्य बघावें – वसुंधरेचा स्तन

गौरपीत विस्तार भोंवती श्यामल मध्यावरी!

 

वन्याम्रांचा बहर उजळी अद्रिला अंगिं अंगी

काळा केशासम जंव तिथें होसि आरूढ श्रृंगी।

देवद्वंद्वें गणतिल मनीं शैल तो त्या सुयोगी

अग्रीं श्याम स्तन अवनिचा गौर शेषीं विभागी।।

 

पिकल्या पिवळ्या आम्रफळांच्या राई टाकिति उतार झांकुन

गिरीवरी त्या काजळकाळा मेघ जरा तूं टेकशील क्षण तैं

देवांच्या मिथुनांनाही लोभनीय तें गमेल दर्शन

गौर सभोंती मधें सांवळा दिसेल जणुं तो पृथ्वीचा स्तन!

 

‘पिकलेल्या आम्रफलांच्या रंगांमुळे आम्रकूटाच्या उतरणींचे विस्तार उजळून गेलेले आहेत. या पर्वताच्या शिखरावर केशकलापाप्रमाणे श्यामल असा तू आरूढ झालास की, ती शोभा, मध्यभागी श्यामल आणि भोवताली गौर असलेल्या पृथ्वीच्या स्तनाप्रमाणे दिसेल. देवलोकातील देवांनीही आपल्या कामिनींना बरोबर घेऊन पाहावी अशी ती शोभा सिद्ध होईल.’

शांताबाईंनी याचे फार सुंदर भाषांतर केले आहे -

‘देवांच्या मिथुनांनाही लोभनीय तें गमेल दर्शन

गौर सभोंती मधें सांवळा दिसेल जणुं तो पृथ्वीचा स्तन!’

कालिदासाने ‘अमरमिथुनप्रेक्षणीय’ असे शब्द वापरले आहेत. अमर म्हणजे देव, मिथुन म्हणजे जोडपी. देवांच्या जोडप्यांसाठीही जो प्रेक्षणीय आहे असा तो. देवांच्या जोडप्यांनाही पाहण्यासाठी लायक!

‘अमरमिथुन’ या शब्दांकडून प्रेरणा घेऊन शांताबाईंनी ‘देवांची मिथुने’ हा शब्दप्रयोग केलेला आहे.

चंद्रा राजन यांनी श्लोकाचा अनुवाद फार सुंदर केला आहे – “Its slopes all aglow with the ripened fruit of wild mangoes, and you on its peak set like a coil of dark glossy hair, the mountain —seeming Earth’s breast—dark-blue centre encircled by pale-gold expansive curves—will appear entrancing to celestial lovers.”

गडद निळ्या रंगाचा मध्य असलेला आणि त्याच्या भोवती फिकट सोनेरी उतार असलेला पृथ्वीच्या स्तन! कालिदासाच्या सौंदर्यदृष्टीचा स्पर्श त्याच्या अनुवादकांनासुद्धा होतो हे खरे!

१९.

स्थित्वा तस्मिन्वनचरवधूभुक्तकुञ्जे मुहूर्तं

तोयोत्सर्गद्रुततरगतिस्तत्परं वर्त्म तीर्णः।

रेवां द्रक्ष्यस्युपलविषमे विन्ध्यपादे विशीर्णां

भक्तिच्छेदैरिव विरचितां भूतिमङ्गे गजस्य॥

 

लतागृहांतुन विहार करती जिथें भिल्लिणी सदा

गिरिवरतीं त्या जरा विसावुन जा पुढती नीरदा,

विंध्याचा खडकाळ पायथा तेथ पहा वाहती

गजांगचित्रित रेषांसम ती वेगवती नर्मदा.

 

थांबे शैली अचिर, शबरी सेविती कुंज जेथें

होता वृष्टि त्वरित पुढच्या आक्रमावे पथातें।

रेवा वाहे उपलविषमीं विन्ध्यपादि विशीर्ण

श्रृंगाराचे जणुं करिवरी रेखिले भिन्न वर्ण।।

 

जिथें भिल्लिणी रमल्या कुंजीं तिथें विसांवा घेई घडिभर

सरी वर्षुनी हलक्या होउन जरा मोकळा वेगें जा तर

बघशिल खडकांमध्यें फाटुनी रेवा वाहे विन्ध्यतळाशी

काळ्या देहांवर हत्तींच्या शुभ्र रेखिली जणुं कीं नक्षी!

 

‘वनवासी स्त्रिया ज्याच्या लताकुंजांमध्ये वास्तव्य करतात, अशा आम्रकूट पर्वतावर तू थोडा वेळ थांब. खूप जलवृष्टी केल्यामुळे तू हलका होऊन वेगवान झाला असशील. अशा वेगवान अवस्थेत तू पुढे गेलास की, विंध्य पर्वताच्या खडकाळ पायथ्याशी तुला नर्मदा नदी दिसेल. तिच्या पात्रातील मोठ्या मोठ्या खडकांमुळे तिचा प्रवाह विछिन्न झालेला तुला दिसेल. एखाद्या हत्तीच्या अंगावर काढलेल्या वेलबुट्टीप्रमाणे नर्मदा तुला दिसेल.’

नर्मदेमधील एखाद्या हत्तीसारखे प्रचंड खडक आणि त्यामधून वाहणारे नर्मदेचे शुभ्र फोफावते प्रवाह, असे हे चित्र मेघाला दिसणार आहे. सीडी लिहितात -

‘रेवा वाहे उपलविषमीं विन्ध्यपादि विशीर्ण

श्रृंगाराचे जणुं करिवरी रेखिले भिन्न वर्ण’

‘उपलविषमी’ म्हणजे दगडांमुळे ऊंच सखल झालेला. ‘विशीर्ण’ म्हणजे फाटलेला आणि ‘करि’ म्हणजे हत्ती. दगडांमुळे ऊंचसखल झालेल्या प्रवाहातून रेवा विशीर्ण होऊन वाहते आहे. त्यामुळे एखाद्या हत्तीवर श्रृंगाराचे वेगवेगळे रंग रेखले गेले आहेत, असे वाटते.

सीडींचे मराठी वाचण्यासाठी संस्कृत शब्दकोश जवळ घेऊन बसावे लागते. पण एकदा शब्दार्थ लक्षात आला की, संस्कृतप्रचूर मराठी काव्य किती मनोहर असू शकते, याचा अंदाज येतो.

२०.

तस्यास्तिक्तैर्वनगजमदैर्वासितं वान्तवृष्टि

 र्जम्बूकुञ्जप्रतिहतरयं तोयमादाय गच्छेः।

अन्तःसारं घन ! तुलयितुं नानिलः शक्ष्यति त्वां

रिक्तः सर्वो भवति हि लघुः पूर्णता गौरवाय।।

 

गंध मदाचा जलांत मिसळे वनहत्ती नाहतां

कुठें जांभळी वृक्ष अडविती वेग तिचा धावता,

सेवुनि तें जल समर्थ व्हावें मत्त समीरापुढें

रितेपणाला मिळे हीनता, पूर्णाला श्रेष्ठता!

 

वर्षोनीया वनगजमदें उग्र ज्या गन्ध येई,

कुण्ठे जम्बूिवनिं, जल तिचें सेवुनी मार्ग घेईं।

अन्तःसारा तुज हलविण्या वायुची काय शक्ती

सम्पन्नाची महति, अवघि रिक्त ते तुच्छ होती।।

 

रानांमधले प्रमत्त हत्ती मदें तयांच्या गंधित झाले

जांभुळराया गर्द दाटल्या ठायीं ठायीं तयें रोधिलें

जळ सरितेचें प्राशुन घे तूं, वारा नच मग अडविल

तुजला रितेपणाची इथें हेळणा, गौरव लाभे पूर्णत्वाला!

 

‘भरपूर वृष्टी केल्यानंतर तू रानातल्या हत्तींच्या मदाचा सुवास ज्याला येत आहे, असे नर्मदेचे पाणी तू पिऊन घे. या नर्मदेचा प्रवाह जांभळाच्या वनांमुळे जागोजागी रोखला गेला आहे. त्या रोखलेल्या नर्मदेचे पाणी तू पिऊन घे. असे भरपूर जल पिऊन घेतल्यामुळे तुला अंतर्गत बळ प्राप्त होईल. त्यामुळे वारा तुला उडवून लावू शकणार नाही. रिते झालेले सर्वच हीनता पावते. संपूर्णता गौरवाला कारण होते.’

कुसुमाग्रजांनी कालिदासाचा भाव अतिशय सुंदर पकडलेला आहे.

‘सेवुनि तें जल समर्थ व्हावें मत्त समीरापुढें

रितेपणाला मिळे हीनता, पूर्णाला श्रेष्ठता!’

मत्त समीरापुढे सामर्थ्यवानच असायला हवे! नाहीतर हीन वागणूक निश्चितपणे मिळणार.

चंद्रा राजन यांनी त्यांच्या इंग्रजी भाषांतरात हा भाग अतिशय सुंदर साधला आहे- '…journey on; gaining inner strength the wind cannot make light of you, O Rain-Cloud;

for hollowness makes things light; fullness bestows weight.'

मराठी भाषांतरकारांनी रितेपणा, रिकामे असणे, हलके असणे या शब्दांवर लक्ष केंद्रित केले आहे. चंद्रा राजन यांनी पोकळपणा अधोरेखित केला आहे.

..................................................................................................................................................................

लेखांक पहिला : कालिदासाच्या काव्यातील एकेक श्लोक सौंदर्यवंत ऐरावतासारखा झुलत राहतो, आणि त्यावर आशयाचा ऐश्वर्यमान इंद्र आरूढ झालेला असतो!

लेखांक दुसरा : उत्कंठा उत्पन्न करणाऱ्या त्या मेघासमोर यक्ष आपले अश्रू आवरत कसाबसा उभा राहिला…

लेखांक तिसरा : कालिदास आपल्याला आपल्या जगातून उचलतात आणि प्रेमाच्या व सौंदर्याच्या तीव्र संवेदनांनी भारलेल्या जगात घेऊन जातात…

लेखांक चौथा कालिदासाला जेव्हा जेव्हा प्रकृतीतील अपार सौंदर्य दिसते, तेव्हा तेव्हा त्याला पुरुष-तत्त्वाची आठवण होते…

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......