अजूनकाही
३० जूनपासून आषाढाला सुरुवात झाली… आणि आषाढ म्हटला की, अनेकांना महाकवी कालिदासाच्या ‘मेघदूत’ची आठवण येते. ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या त्यातल्या शब्दांना तर ‘मोस्ट कोटेबल कोट’चा दर्जा मिळालाय! आणि ‘मेघदूत’? त्याची ख्याती काय वर्णावी! गेल्या अनेक वर्षांपासून ‘मेघदूत’ मराठीसह जगभरच्या लेखक, कवी, अनुवादक आणि रसिकवाचकांना मोहिनी घालत आले आहे. त्याची ओळख करून देणारे हे सदर १२ जुलैपासून रोज...
.................................................................................................................................................................
लेखांक चौथा
पूर्वमेघ
(लेखातला पहिला मूळ संस्कृत श्लोक कालिदासाचा आणि त्याचे अनुवाद अनुक्रमे कुसुमाग्रज, सी.डी. देशमुख आणि शांता शेळके यांचे)
११.
कर्तुं यच्च प्रभवति महीमुच्छिलीन्ध्रामवन्धां
तच्छ्रुत्वा ते श्रवणसुभगं गर्जितं मानसोत्काः।
आ कैलासाद्विसकिसलयच्छेदपाथेयवन्तः
संपत्स्यन्ते नभसि भवतो राजहंसाः सहायाः॥
शीर्ण घरेला फलपुष्पांच्या आश्वासत दौलती
श्रुतिसुंदर तीं तुझी गर्जितें नभिं जेव्हां नादती
राजहंस मुखिं देठ घेउनी कमलांचे कोंवळे
मानसयात्रा करावयास्तव येतिल तुज संगती!
जी पृथ्वीला सफल करते उद्गते कन्दजातें
ती ऐकोनी श्रुतिसुख तुझी गर्जना, मानसातें।
उत्कण्ठेने निघुनि मिळती सोबती राजहंस
कैलासाच्या पथिं, कमलिनी-तन्तु पाथेय ज्यांस।।
भूगर्भीचे कंद अंकुरित करुन फेडती तिचें वांझपण
श्रवणमधुर तीं तुझीं गर्जितें ऐकुन हृदयीं हर्षित होउन
कैलासावर मानससरसीं जाण्यास्तव जे जे आतुर होतिल
कमलदेठ घेऊन शिदोरी राजहंस तुजसंगें येतिल!
तुझी गर्जिते कंदांना अंकूर फूटण्यासाठी, पृथ्वीला सुफल करण्यासाठी निमित्त होतात. त्या तुझ्या गर्जना ऐकून राजहंस पक्षी, तुझ्याबरोबर उडू लागतील, मानससरोवरापर्यंत तुला सोबत करतील. त्या प्रवासासाठी त्यांनी आपल्या चोचीमध्ये कोवळ्या कमलतंतूंची शिदोरी घेतलेली असेल.
पृथ्वी, बलाका, पथिक-वनिता या सगळ्या आकाशतील मेघाच्या साक्षीने सुख पावत आहेत. सुफल होत आहेत. आणि त्याच वेळी काळ्याभोर मेघाबरोबर शुभ्र राजहंस त्याला मानससरोवरापर्यंत सोबत करायला निघालेले आहेत. तेही कोवळ्या कमल-तंतूची शिदोरी घेऊन.
‘शिदोरी’ला संकृत शब्द आहे ‘पाथेय’. म्हणजे रस्त्यातले जेवण. शांताबाईंनी ‘शिदोरी’ हा साधा शब्द वापरला आहे, पण सीडींनी मात्र ‘पाथेय’ हा शब्द वापरून कमाल केली आहे. राजहंस कमलतंतू घेऊन चालले आहेत. कमलतंतूंना ‘शिदोरी’ कसे म्हणायचे, ते ‘पाथेय’ आहे!
‘उत्कण्ठेने निघुनि मिळती सोबती राजहंस
कैलासाच्या पथिं, कमलिनी-तन्तु पाथेय ज्यांस’
१२.
आपृच्छस्व प्रियसखममुं तुङ्गमालिङ्गय शैलं
वन्द्यैः पुंसां रघुपतिपदैरङ्कितं मेखलासु।
काले काले भवति भवतो यस्य संयोगमेत्य
स्नेहव्यक्तिश्चिरविरहजं मुञ्चतो बाष्पमुष्णम्॥
मिरवी देहीं दाशरथाचीं पदचिन्हें मंगल
रामगिरी हा तुला पाहुनी होई स्नेहाकुल,
तुझी प्रतीक्षा करून शिणला, त्याला आलिंगुनी
हिमाचलाच्या मार्गावरती पडो तुझें पाउल!
आलिंगावा प्रणयि निघता उंच हा आद्रिमित्र
पार्श्वीं ज्याच्या उमटलिं पदें राघवाची पवित्र।
तुम्ही दोघे उचित समयीं भेटतां तों कळोनी
येई प्रेमा चिर-विरहिंची उष्ण बाष्पें गळोनी।।
जिथें उतरणीवरी उमटलीं श्रीरामांचीं वन्द्य पाउलें
शैलसखा तो भेटतांच त्या आलिंगन दे प्रेमें वहिलें
प्रदीर्घ विरहानंतर घडतां मित्रभेटिचा हृद्य सोहळा
उष्ण आंसवें गाळुन दाविल सख्यभाव तो गाढ आपुला!
आपला प्रियमित्र असलेल्या या रामगिरी पर्वताला आलिंगन दे आणि त्याचा निरोप घे. सर्वांनाच वंद्य असलेली श्रीरामाची पावले या पर्वताच्या उतरणीवर उमटलेली आहेत. दर वर्षी (पावसाळ्यात) तुझी याच्याशी भेट होते आणि त्यानंतर दीर्घकालपर्यंत तुमचा विरह होतो. त्यामुळे तुमची भेट झाल्यावर हा रामगिरी पर्वत बराच वेळ उष्ण अश्रू ढाळत राहतो. त्या अश्रूंमधून त्याच्या स्नेहभाव व्यक्त होत राहतो.
उष्ण पर्वतावर पावसाचे थेंब पडल्यावर जमिनीतून वाफा निघतात. त्याला कालिदास ‘पर्वताचे अश्रू’ म्हणत आहेत.
हा अर्थ ध्वनित करण्यासाठी सीडी अश्रूंसाठी ‘बाष्पे’ हा शब्द वापरतात.
‘तुम्ही दोघे उचित समयीं भेटतां तों कळोनी
येई प्रेमा चिर-विरहिंची उष्ण बाष्पें गळोनी’
याशिवाय सीडी ‘पार्श्व'’हा शब्दसुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने वापरतात. पार्श्व म्हणजे शरीराचा उजवा आणि डावा… बगलेचा भाग.
‘आलिंगावा प्रणयि निघता उंच हा आद्रिमित्र
पार्श्वीं ज्याच्या उमटलिं पदें राघवाची पवित्र’
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
१३.
मार्गं तावच्छृणु कथयतस्त्वत्प्रयाणानुरूपं
संदेशं मे तदनु जलद ! श्रोष्यसि श्रोत्रपेयम्।
खिन्नः खिन्नः शिखरिषु पदं न्यस्य गन्तासि यत्र
क्षीणः क्षीणः परिलघु पयः स्रोतसां चोपभुज्य॥
निरोप तुज सांगेन सखीस्तव परंतु करुणाघन,
हवें कराया उचित पथाचें तुजला दिग्दर्शन;
शिणतां काया पहुड जरासा पर्वतशिखरांवर
क्षीण वाटतां नितळ झऱ्यांचें कर पाणी प्राशन.
ऐकें मार्ग प्रथम कथितो जो तुवा आक्रमावा
तो सन्देश श्रवणि मग जो लक्ष देता रमावा।
जेव्हां जेव्हां श्रमसि पथिं घे अद्रिश्रुंगी विसावा
येतां ग्लानी उदक हलकें पी नद्यांचे सुखें वा।।
तुझ्या प्रयाणा मार्ग सोयिचा अता सांगतों ऐक, घना रे,
श्रवणयोग्य संदेश मागुती कथितों तोही ऐकुन घे, रे
जातां जातां श्रमशिल, तेव्हां गिरिशिखरांवर क्षण टेकावें
जरा क्षीणता येतां, सखया, विमल झऱ्यांचे पाणी प्यावें
हे मेघा, पहिल्यांदा तुझ्या प्रवासाला अनुकूल असा मार्ग मी तुला सांगतो, तो ऐकून घे. त्यानंतर कानांनी आतुरतेने प्राशन करावा, असा माझा संदेश तू ऐक. या नंतर तुझ्या प्रवासात ज्या ज्या वेळी तुला थकवा येईल, तेव्हा तू पर्वतांवर तुझी पाऊले टेकवून विश्रांती घे. प्रवासामुळे कधी क्षीण झालास, तर तू मार्गातील झऱ्यांचे पाणी पिऊन घे.
चंद्रा राजन यांनी त्यांच्या ‘पेंग्विन क्लासिक’साठी केलेल्या भाषांतरात ‘hear my message, drinking it in eagerly with your ears’ असे केले आहे. बाकीच्या भाषांतरकरांनी ‘श्रोत्रपेयम’ या कालिदासाने वापरलेल्या शब्दाचे भाषांतर ‘ऐकण्याजोगा संदेश’ असे केले आहे.
सीडींनी कालिदासाला अभिप्रेत असलेल्या अर्थाची छटा अगदी बरोबर पकडली आहे-
‘तो सन्देश श्रवणि मग जो लक्ष देता रमावा’
तू लक्ष देऊन ऐकशील तर रमून जाशील असा माझ्या प्रियेसाठीचा निरोप मी तुला देईन.
१४.
अद्रेः शृङ्गं हरति पवनः किंस्विदित्युन्मुखीभि-
र्दृष्टोत्साहश्चकितचकितं मुग्धसिद्धाङ्गनाभिः।
स्थानादस्मात्सरसनिचुलादुत्पतोदङ्मुखः खं
दिङ्नागानां पथि परिहरन्स्थूलहस्तावलेपान्॥
उधळिल वारा शैलशिरें का, भय वाटुनियां उरीं
बघतां वरती, पाहतील तुज सिद्धांच्या सुन्दरी;
वेतलताकुल या भूमींतुन जाई उत्तरेकडे
चुकवित शुंडाप्रहार दिग्गज करतिल जे अंबरी!
“वारा नेई गिरीशखरी हे” मुग्ध ऐशा विचारी
डौला तूझ्या बघति चकिता उन्मुखी सिद्धनारी।
सोडी स्थाना सरस-निचुला या, निघें उत्तरेला
दिङनागांची पथिं चुकवुणी स्थूल हस्तावहेला।।
काय गिरीचें शिखरच वारा वाहुन नेतो?
- शंकित होतिल चकित लोचनीं कुतूहलें तुज भोळ्या
सिद्धांगना पाहतिल वेतसकुंजामधुनी इथल्या, सरव्या, भरारी
सवेग घेई दिग्गजशुंडाऽघात टाळुनी उत्तरेस मग पुढती जाई
ज्याची प्रचंड ताकद सिद्धमुनींच्या स्त्रियांनी आश्चर्यचकित होऊन पाहिलेली आहे, असा तू आहेस. तू आता पर्वताचे शिखरच उडवून नेणार नाहीस ना, असे ज्याच्याबद्दल सिद्ध स्त्रियांना वाटले, असा तू आहेस. रसरशीत अशा वेतांच्या या भूमीतून तू आकाशात झेप घे आणि उत्तर दिशेला अभिमुख होऊन दिग्गजांच्या प्रचंड सोंडांचे प्रहार चुकवत चुकवत आपल्या मार्गाला लाग.
इथे कालिदास पर्जन्यकाळातील रुद्रगंभीर अनुभवाचे वर्णन करत आहे. पर्वताचे शिखरच्या शिखर उडवून नेईल की काय असे वाटावे, एवढे अजस्त्र आणि रौद्रचपल रूप या मेघाचे आहे. आणि एवढ्या समर्थ अशा मेघालाही त्याहूनही अजस्त्र आणि रौद्र अशा दिग्गजांच्या सोंडांचे तडाखे चुकवत चुकवत जायचे आहे. दिशांच्या रक्षणाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे असे ते दिग्गज! यांच्या सोंडांचे तडाखे म्हणजे चारी दिशांतून पर्जन्यमेघावर तूटून पडणारी पर्जन्यकालीन वादळे!
या आधीच्या श्लोकांमध्ये मेघाच्या रोमांचित करणाऱ्या रूपाचे वर्णन करून झाल्यावर कालिदास आता मेघाच्या रौद्र-भीषण रूपाचा अनुभव या श्लोकामध्ये आपल्याला देत आहे.
हत्तींच्या सोंडांच्या आघातांना कुसुमाग्रज ‘शुंडाप्रहार’ हा शब्द वापरतात, शांताबाई ‘शुंडाघात’ हा शब्द वापरतात आणि सीडी ‘हस्तावहेला’ हा शब्द वापरतात. हस्त+अवहेला. अवहेला म्हणजे तिरस्कार!
दिग्गजांचा शुंडाप्रहाररूपी तिरस्कार चुकवत चुकवत तू पुढे जा, असा अर्थ!
१५.
रत्नच्छायाव्यतिकर इव प्रेक्ष्यमेतत्पुरस्ता
द्वल्मीकाग्रात्प्रभवति धनुःखण्डमाखण्डलस्य।
येन श्यामं वपुरतितरां कान्तिमापत्स्यते ते
बर्हेणेव स्फुरितरुचिना गोपवेषस्य विष्णोः॥
दूर टेकड्यांवरी उभी हो इंद्रधनुष्याकृती
नवरत्नांच्या तेजोधारा एकत्रित वाहती!
श्यामवर्ण तूं शोभशील त्या दिव्य कमानीमधें
मोरपिसाऱ्यामुळे जसा तो घनश्याम श्रीपती!
नाना रत्नें झळकति जणू एकठायी समोर
अर्धें इन्द्रायुध वरि निघे वारुळांतूनी दूर।
त्या योगाने जलधर निळा फार तू शोभशील
पिच्छें जैसा रुचिर शिखिच्या सांवळा नंदबाळ।।
वारुळ पुढतीं तिथुन उभारे इंद्रधनूचा खण्ड मनोरम
रत्नकिरणकल्लोळ उसळतां झळकतसे जो तेजें अनुपम!
तुझी सांवळी तनु त्यायोगें विशेष कांहीं लेइल कान्ती
गोपवेषधर श्रीविष्णू जणुं मोरपीस शिरिं धारण करिती!
रत्नांच्या तेजाच्या विविध छटा एकत्र आल्यामुळे प्रेक्षणीय झालेले इंद्रधनुष्य वरुळातून वर आलेले आहे. मोरपिसाऱ्यामुळे गोपालांचा वेश धारण केलेल्या कृष्णाचे श्यामल शरीर अधिकच आकर्षक दिसते. त्याचप्रमाणे या इंद्रधनुष्यामुळे तुझे श्यामल रूप अधिकच खुलून दिसेल.
शांताबाईंनी ‘रत्नकिरणकल्लोळ उसळतां झळकतसे जो तेजें अनुपम’ अशी बहारीची ओळ लिहिली आहे. एका टेकडीवरून इंद्रधनुष्याने उभारी घेतली आहे आणि रत्नकिरणांचा कल्लोळ उसळल्यामुळे ते इंद्रधनुष्य अनुपम तेजाने झळकत आहे.
कुसुमाग्रजांनी येथे -
‘दूर टेकड्यांवरी उभी हो इंद्रधनुष्याकृती
नवरत्नांच्या तेजोधारा एकत्रित वाहती!’
या ओळी लिहून कालिदासाच्या इंद्रधनुष्याचे तेज वाढवले आहे. एवढेच नाही, तर त्यांनी इंद्रधनुष्याच्या कमानीमध्ये मेघ उभा आहे, असे मनोरम चित्रही उभे केले आहे. दिव्य अशा निसर्ग सौंदर्याचे तेवढ्याच दिव्य-सुंदर भाषेत वर्णन करावे तर कुसमाग्रजांनीच.
इथे आपल्याला कालिदासाने या सगळ्या सौंदर्याच्या कमानीमध्ये श्रीकृष्णांची स्थापना केलेली आहे, हे लक्षात घ्यावे लागेल. जशी त्याने अलकापुरीच्या सौंदर्यात बाह्य उद्यानात ध्यान करत बसलेल्या शिवाची स्थापना केली होती. तेव्हा कुसमाग्रजांच्या लेखणीतून चंद्रकरांचा झरा हे शब्द उमलून आले होते, इथे या श्लोकात ‘नवरत्नांच्या तेजोधारा’ हे शब्द विलास पावते झाले! इंद्रधनुष्याच्या कमानीखालचा मेघ नुसताच सुंदर दिसत नाहिये, तर तो, मोरपिसांच्या पार्श्वभूमीवर उठून दिसणाऱ्या श्यामल श्रीकृष्णाप्रमाणे सुंदर दिसतो आहे.
अलकापुरीतील शिव असो वा इंद्रधनुच्या खाली उभ्या असलेल्या मेघामुळे ज्याची आठवण येते आहे, असा श्रीकृष्ण, दोघेही कालिदासाचे अध्यात्म स्पष्ट करत जातात. जेव्हा जेव्हा प्रकृतीतील अपार सौंदर्य कालिदासाला दिसते, तेव्हा तेव्हा त्याला प्रकृतीच्या मागे उभ्या असलेल्या पुरुष-तत्त्वाची आठवण होते!
..................................................................................................................................................................
लेखांक पहिला : कालिदासाच्या काव्यातील एकेक श्लोक सौंदर्यवंत ऐरावतासारखा झुलत राहतो, आणि त्यावर आशयाचा ऐश्वर्यमान इंद्र आरूढ झालेला असतो!
लेखांक दुसरा : उत्कंठा उत्पन्न करणाऱ्या त्या मेघासमोर यक्ष आपले अश्रू आवरत कसाबसा उभा राहिला…
लेखांक तिसरा : कालिदास आपल्याला आपल्या जगातून उचलतात आणि प्रेमाच्या व सौंदर्याच्या तीव्र संवेदनांनी भारलेल्या जगात घेऊन जातात…
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment