अजूनकाही
आपण आपल्या पिढ्या मोजतो, पण लेखन-साधनांचीसुद्धा नोंदवण्यासारखी पिढी असते. लेखनात मग्न असणाऱ्या गणपतीच्या हातातील मोरपीस, पैशाच्या खांबाला टेकून ‘ज्ञानेश्वरी’ सांगणारे ज्ञानोबा, शेजारी त्यांची वाणी शब्दबद्ध करायला लेखणी हातात घेऊन बसलेले सच्चिदानंद बाबा, दासोपंताची ढब्बू पैशाची शाई, शिवकाल-पेशवाईतला बोरू… अशी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारी अनेक लेखन-साधने कलाकलाने सुलभ होत गेलेली आढळतात. त्यांचीसुद्धा सांगावी, नोंदवावी अशी एक पिढी असते- जी त्या त्या पिढीबरोबरच्या लेखनासोबत वाढते. ती ग्रंथांतून, विविध फतव्यांतून, मैलाच्या दगडातून टिकून राहते… तर कधी त्यांच्यावर जीव लावणाऱ्या पिढीसोबत ती गाडली जाते. या साऱ्याविषयी लिहा-बोलायला एक साधं निमित्त झालं...
चौथ्या इयत्तेत शिकणाऱ्या मुलीसाठी काल नवा पेन आणला. ‘बाबा लिहून लिहून हात दुखतोय’ अशी तक्रार करणाऱ्या मुलीने परवा ‘लिहून बोटाला फोड’ आलाय म्हटल्यावर मला तिचं सांगणं अतिशयोक्तीपूर्ण वाटलं. जवळ बोलावून तिची बोटं पाहिली. तर्जनीला बारीक फोड आलेला. यावर उपाय म्हणून तिच्या बोटाला आराम पडेल, असा टोकाशी रबरी आवरण असणारा एखादा पेन आणून द्यायला हवा, या विचाराप्रत आलो. ‘उद्या तुला नवा पेन आणूयात’ असं सांगून तिची शाळेत पाठवणी केली. शाळेतून घरी आल्या आल्या ‘बाबा आणला का माझा पेन?’, ही तिची विचारणा. ‘सायंकाळी नक्की आणतो’, असं तिला माझं उत्तर.
आज पावसानं तसा चांगला जोर धरलेला. तासगावला तसा पाऊस कमीच, पण आज होता त्याला जोर. त्यामुळे मीही दिवसभर घराबाहेर गेलो नव्हतो. टर्म लांबल्यामुळे माझी उन्हाळी सुट्टी पावसाळी झालीय. ‘तुम्ही तेवढे घरात बसणार आणि आम्ही शाळेला जाणार’ अशी मुलींची माझ्याबद्दलची तक्रार. एरवी त्या झोपेत असताना त्यांचा बाप नोकरीच्या गावी गेलेला असायचा. तो तोच बाप आता त्यांना उन्हाळी कम पावसाळी सुट्टीमुळे घरात वावरताना दिसतोय म्हटल्यावर त्यांनी तक्रारीचा सूर आळवणं स्वाभाविकच होतं.
लांबलेल्या वेळापत्रकानं मुलं शाळेत आणि पालक घरात, अशी माझ्यासारख्या अनेक पालकांची अवस्था झालेली. थोडा बदल म्हणून पावसात कुठे कडमडायला जावं, तर अनेक जिल्हाधिकाराऱ्यानी कलम १४४ लागू केलेलं. ओरडून पावसाच्या बातम्या सांगणारे न्यूज चॅनेलवाले दिवसभर घाबरून सोडत होते. सरकार स्थापन झाल्यानं आता राजकीय गरमागरमी थंडावलेली. त्यामुळे सारे जण पावसाच्या मागे लागलेले. कोल्हापुराच्या दिशेनं सासरवाडीकडे प्रवास करावा, तर कधी पूर येईल आणि कधी आपण अडकून पडू, याची खात्री नाही. समाजमाध्यमावर पाऊस-पाण्याच्या अनेक बातम्या व्हायरल होताहेत. ओमानच्या किनाऱ्यावर वाहून गेलेल्या तरुणींबद्दलच्या अनेकांच्या स्टेट्स पाहून, कोसळणाऱ्या दरडी पाहून गड्या आपलं घर बरं समजून घरातच पाय पसरून बसलेले माझ्यासारखे कैक.
आजच्या पावसामुळे दिवसभर घरी. शाळेतून आल्यावर पुन्हा मुलाचा प्रश्न ‘बाबा पेन आणला का?’ ‘आणतो सायंकाळी’ हे माझं वचन. अधिक ताणून धरायला नको म्हणून अंधार पडण्याअगोदर बाहेर जाऊन तिच्यासाठी एक पेन आणला. तो तिच्या स्वाधीन करून माझ्या कामाला लागलो. काही वेळानं “बाबा, तो पेन मला नको. मी तुमच्या कपड्यामध्ये पेन ठेवला आहे. मला तो पेन आवडला नाही. हा पेन तुमच्यासाठी ठेवा व तुम्ही तो पेन वापरा” अशा आशयाची चिठ्ठी लिहून, तिने ती छोट्या मुलीकडून माझ्याकडे पाठवली.
मी चिठ्ठी पाहिली, पण काही प्रतिक्रिया दिली नाही. ती दरवाज्याआडून चिठ्ठीवर मी कसा रिअॅक्ट होतोय, याचा अंदाज बांधू लागली. माझा अंदाज घेत ती बाहेर दरवाज्याआड थांबलेल्याची जाणीव झाल्यावर मीही मुद्दामच ती चिठ्ठी वाचली नाही. थोडा वेळ वाट पाहून तीही कंटाळली. ‘बाबा, मी तुम्हाला एक चिठ्ठी दिलीय. ती तुम्ही वाचली का?’ म्हणत जवळ आली. मी म्हटलं, ‘एवढं काम झालं की वाचेन’. मग मी काम करत असलेल्या संगणकाच्या आजूबाजूला ती घुटमळू लागली. यात पुन्हा काही वेळ गेला. मला तिची तगमग वाढलेली दिसली. मी अधिक परीक्षा नको पाहायला म्हणून ती चिठ्ठी घेऊन वाचली. तिला मी आणलेला पेन आवडला नव्हता, त्याविषयी तिने उघड नाराजी व्यक्त केली होती. पण मी त्यावर तात्काळ प्रतिक्रिया दिली नाही. माझं काम पुढे सुरू ठेवलं. तिला अपेक्षित प्रतिसाद न दिल्यानं ती रागानं निघून गेली.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
काही वेळानं पुन्हा संगणकाशेजारी येऊन उभी राहिली. मी केवळ हसलो. ती ‘मी तो पेन वापरणार नाही, तुम्ही मला पेन खरेदीला घेऊन गेला नाहीत, मी असला आणायला सांगितला नव्हता’ वगैरे वगैरे बरंच बोलून गेली. मी तिच्यासाठी आणलेला १० रुपयाचा नवा पेन आणि १२ रुपयांच्या दोन रिफील असे वाया गेलेले २२ रुपये, त्यासाठी पावसात मारलेली चक्कर, या साऱ्याचा हिशेब केला. तिने तोच पेन वापरावा, हे जरी मला आतून वाटत असलं तरी तिने घेतलेल्या पवित्र्यामुळे आता आणखी एक पेन घ्यावा लागणार, हे नक्की होतं.
आमच्या शालेय जीवनात आताच्या इतकी वह्या आणि पेनची चंगळही नव्हती अन पालकांनी घेऊन दिलेली एखादी गोष्ट अव्हेरायची सोयही नव्हती. शाळेत असताना लिहिण्यासाठी पाटी हेच साधन. वही-पेन मिळाले ते पाचवीच्या वर्गात. अनेकदा पुढच्या इयत्तेतल्या भावंडांच्या उरलेल्या पानांतून दाभणानं भोकं पाडून हातावर त्या सांधलेल्या असायच्या. वह्यांचा आजच्या इतका क्लास नव्हताच. वह्या साध्या आणि लिहायला फाऊंटन पेन. तो वहीच्या कागदावर जरा जास्त वेळ टेकवला तर शाई मागच्या बाजूला उठायची. कधी त्याची नीब वहीच्या पानाला भोक पाडायची, तर कधी पेन उमटत नाही म्हणून त्याला जोरात झिंजडलं की, सारी शाई रागानं बाहेर येऊन वहीवर पसरायची. त्यात नीबची विशेष काळजी घ्यावी लागायची.
शनिवारी सकाळची शाळा सुटली की, येऊन त्याच्या स्वच्छतेसाठी पाणी कोमट करावं लागे. काही काळ त्याला कोमट पाण्यात बुडवून मग त्याची सफाई. हे सारं नको वाटायचं, पण आण्णांचा (वडील) हाच पेन वापरण्याचा आग्रह. अक्षराबाबत त्यांचा विशेष कटाक्ष. लिहायला फाऊंटन पेनच वापरायचा, लिहिताना करंगळी सरळ रेषेत ठेवायची, आठवड्यातून एकदा कोमट पाण्यात पेन स्वच्छ करायचा, या त्यांच्या आग्रहांविरोधी मत नोंदवण्याची सोय नव्हती. त्यांची सैन्यासारखी शिस्त होती. एकदा शर्टाच्या खिश्यात शाई गळून खिसा निळा पडला. त्या बदल्यात मार तर पडलाच, पण खिश्याची निळाई कमी करण्यासाठी खास मुंबईवरून नीळ आली. पांढरा शर्ट आई नीळ घालून देऊ लागली, पण आण्णांनी पेन बदलू दिला नाही. या निळीनं हायस्कूलचं शिक्षण पार पडेपर्यंत पिच्छा सोडला नाही.
अक्षर मोत्यासारखं असावं ही भूमिका ज्या पिढीची होती, ते त्या पिढीतले होते. त्यांच्या वयाच्या ११व्या वर्षी ते मुंबईला गेले. त्यांनी तीन बत्ती नाक्यावरील सोड्याचं दुकान, सिंधी–मारवाडी यांच्या घरी हरकाम्या अशा अनेक ठिकाणी काम करत त्यांनी अनेकांची अक्षरं पाहिलेली. त्यामुळे अक्षरांबाबत त्यांचा विशेष कटाक्ष. मी शाळेला जाऊ लागल्यावर त्यांनी माझ्यावर फाऊंटन पेनाचा हा प्रयोग अनेक दिवस सुरू ठेवला, पण माझं अक्षर मात्र सुधारलं नाही. ते गावी सुट्टीला आले की, तेवढ्या काळात फाऊंटन पेन वापरे, इतर वेळी कांडीचं साधं पेन.
जसजशा इयत्तेच्या पायऱ्या चढत गेलो, तशी पेनाबाबत रुची बदलत गेली. त्या काळात साध्या कांडीच्या पेनाबरोबरच खटक्याच्या पेनाला विद्यार्थिवर्गाकडून अधिक पसंती होती. वर्गात सारखं खाटकूट करत बसायला मजा वाटायची. कधी अधिक दाब दिला की, खाटकूट करणारी मागची बाजू दूर उडवायची. पुढच्या टोकाला असणारी एखाद्याची स्प्रिंग हरवली की, दुसऱ्याच्या पेनाच्या स्प्रिंगवर दरोडा पडायचा. काही दिवस ही खाटकूटच्या पेनाची स्टाईल चालली. जोडीला निळ्या टोपणाचे दोन पेन बाजारात येऊन चांगले स्थिर स्थावर झाले. त्यातला एक पेन पारदर्शक होता.
आमचं हायस्कूल ज्या इमारतीत भरायचं, त्याच्या माडीवर नववीचा वर्ग होता. या वर्गाच्या पश्चिमेला मागील बाजूस एक खिडकी होती. सूर्य मावळतीला झुकला की, पिंपळाच्या झाडातून खिडकीवाटे किरणं वर्गात यायची. या किरणांत काही जण आपलं पेन धरायचे. किरणांचं परावर्तन होऊन त्यातून सप्तरंग बाहेर पडायचे. ते सप्तरंग कधी डाव्या बाजूला बसलेल्या पोरींच्या अंगावर, तर कधी पुढील प्लायवूडच्या भिंतीवर पाडून खेळ खेळायचे.
दुसरा होता निळा पांढरा रेनॉल्ड. ही आमच्या अर्ध्यापेक्षा अधिक वर्गाची पसंती होती. त्यावरची ‘045 REYNOLDS FINE CARBURE’ ही अक्षरं त्या वयात खूप मोहक वाटायची. त्या पेनच्या अंगावरील अक्षरांची अनेक जण छेड काढायचे. बाजारवाड्यातल्या न्हाव्याच्या दुकानातून जुन दाढीचं ब्लेडचं पातं उपलब्ध करून कधी ‘India’, तर कधी स्वत:च्या नावाची काही अक्षरं किंवा आडनावाची काही अक्षरं, अशी खोडाखोडी चालायची. यामागे आपला पेन हरवला किंवा चोरीला गेला तर त्याचा तपास लवकर पूर्ण व्हावा, हे लॉजिक होतं. वर्गातली काही खट्याळ पोरं कुठल्या पोरीचं नसेना का नाव, निदान आद्याक्षर तरी कोरता येतंय का, याचीही चाचपणी करायचे. मी वर्गात अवखळ पण हुशार. त्यामुळे सरांची मर्जी. मला खूप सभ्य समजणाऱ्या वर्गातल्या पोरी आणि आण्णाची नको इतकी भीती, त्यामुळे माझ्या पेनावर देशप्रेम व्यक्त करणारी ‘India’ हीच अक्षरं. पुढे पुढे रेनॉल्ड कंपनीची प्रगत होत जाऊन तिचे नवनवे पेन जसे बाजारात आले, तसे इतरही काही नवे पेन नशीब आजमावू लागले.
आम्ही वयात यायला आणि ‘लिखते लिखते लव हो जाए’ ही टॅगलाईन असणारी रविना टंडनची ‘रोटोमॅट’ पेनची जाहिरात यायला एकच गाठ पडली! वर्गातल्या अनेकांनी ‘रोटोमॅट’चं पेन घेतलं. त्या काळी पेनाच्या कंपन्या तशा कमीच. एकदा आण्णांच्या तोंडून ‘म्हात्रे पेन कंपनी’चं नाव ऐकलं होतं. त्या वेळी ही पेन तयार करणारी एकमेव कंपनी असावी, असा माझा कयास होता. पुढे मुंबईला आल्यावर दुरून का असेना ती कंपनीही पाहिली. महाविद्यालयीन जीवनात तर पेनांची खूप चंगळ झाली. ‘पायलट’, लग्झर, ‘हिरो’ अशा अनेक कंपन्या येऊन त्यांनी पेनांचा बाजार काबीज केला. या कंपन्यांची पेन तशी महागडी. त्यामुळे रेनॉल्डचा खाटकूटवाला पेन पदवीपर्यंत सोबत राहिला.
पदवीच्या शेवट्याच्या वर्षाला आमचा सदिच्छा समारंभ. आपण आता कॉलेज सोडून जाणार… गुरूविषयीचा कृतज्ञ भाव म्हणून त्यांना काहीतरी भेट द्यायची असते, हे मला वर्गातल्या सुप्रियामुळे कळालं. आम्ही साऱ्यांनी वर्गणी काढली. सुप्रिया, मी आणि वर्गातली काही इतर मुलं भाऊसिंगजी रोडवरील ‘नेता स्टोअर्स’मध्ये गेलो. तिथं सरांसाठी महागडं पेन खरेदी केलं. त्या वेळी अनेक महागडी पेन पाहायला मिळाली. पुढे एम.ए.साठी विद्यापीठात गेल्यावर गतीनं लिहायला मदत करणारे पेन दोस्त झाले. बॉलपेनांची जागा जेलपेनने घेतली. आता पसंतीला उतरणाऱ्या ‘पारकर’, ‘ट्रायमॅक्स’, ‘हाऊसेर’ कंपनीच्या नव्या नव्या पद्धतीच्या पेनांची खरेदी करतो, वापरून पाहतो. पेन सतत बदलला की, अक्षर बिघडतं, हे मला इतक्या वर्षानं अनुभवानं आलेलं शहाणपण.
मुलीला पसंत न पडलेल्या पेनानं इतकं ‘पेन-पुराण’ उभं केलं. तिला उद्या दुकानातून तिच्या पसंतीचं पेन घेऊन देण्याचं वचन देऊन मी आजच्या दिवसासाठी पेन हा विषय संपवला...
..................................................................................................................................................................
लेखक बळवंत मारुती मगदूम श्री. आर. आर. पाटील महाविद्यालय, सावळज ता. तासगाव येथे शिक्षक आहेत. त्यांनी मुंबई, कोल्हापूर इथं कुरिअर बॉय, हेल्पर, रूमबॉय, वेटर म्हणून नोकरी केलेली आहे.
balvantmagdum2020@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment