अजूनकाही
आजकाल बऱ्याचदा (किंवा अधूनमधून नेहमीच) ‘अंताच्या गोष्टी’ केल्या जातात. ‘अंताची भाषा’ (Language of Ending) वापरली जाते. ‘अंताचे संभाषित’ (Discourse of Ending or End) यावर प्रदीर्घ चर्चा होते किंवा त्याचा परत परत उल्लेख केला जातो. उत्तरआधुनिक (Postmodern Period) काळाचे आणि उत्तरआधुनिकतावादाचे (Postmodernism) हे खास वैशिष्ट्य आहे.
कोणकोणत्या गोष्टींचा अंत पहा- विचारसरणीचा अंत (डॅनियल बेल), इतिहासाचा अंत (फ्रान्सिस फुकोयामा), कलेचा अंत (डोनाल्ड कुसपिट), सेक्सचा (लैंगिकता किंवा लैंगिक प्रश्न) अंत (डोना फ्रेतस; ब्राझिलियन लेखिका)…. अशा अनेक अंतांची संभाषिते (Discourses) जर उदयाला येत असतील तर त्याबद्दल फार काही आश्चर्य वाटून घ्यायला नको ‘भाषेचाही अंत झाला आहे’ असे मी अलीकडेच कोणाकडून तरी ऐकले. (हे खरे आहे का? हेही पाहायला/तपासायला आहे), अशी परिस्थिती या उत्तरआधुनिक कालखंडात नक्कीच निर्माण झाली आहे.
सर्वच अर्थाने आपले जीवन सुखी करण्यासाठी, आनंदी करण्यासाठी आपल्याला काय काय नको आहे? आणि काय काय हवे आहे? कशाचा अंत व्हायला हवा? कशाचा शेवट करायला हवा?
जातीजमातींमधला कलह, संघर्ष, भांडणे, युद्धे आपणाला हवे आहेत का? अंधश्रद्धांचे ओझे आपण प्राचीन काळापासून वाहत आलो आहोत... ते आपणाला हवे आहे का? भेदाचे राजकारण? मी मोठा, तू लहान; मी थोर, तू खालचा; मी उच्चभ्रू, तू नीच; मी गोरा, तू काळा; मी आर्य, तू अनार्य; मी सवर्ण, तू दलित; मी हिंदू, तू ब्राह्मण; मी हा आणि तू तो….
हा ‘इतरत्वा’चा (याला स्लावोज झिझेक यांनी ‘The Big Other’ या पुस्तकात ‘Otherness’ असे म्हटले आहे) प्रश्न वास्तविक मूलभूत आहे. पण हा ‘भेद’ समजून, तो कवटाळून, त्याची उशी करून आपण आपली झोप रोज डोक्यात जोजवण्याचा प्रयत्न करतो आहोत का? आपली उशी ही अशी भेदाची होत नाही का मग? अनेक भकलांची? हातात दगड घेऊन सकाळी उठल्या उठल्या कुठेतरी भिरकवून द्यावा, अशा प्रकारची द्वेष-संस्कृती संक्रमित आणि पोसत भवताल रंगवत तर नाही का आपण?
या सर्व गोष्टींचा अंत व्हायला पाहिजे, पण त्याबद्दल आपण काही बोलत नाही. जातीअंताबद्दल किंवा हे नेमके प्रकरण काय आहे, याबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ‘Annihilation of Caste’ (जातीअंत किंवा जातीचे निर्मूलन) हे पुस्तक आहे. इतरही अनेकांनी या विषयावर लिहिले आहे. त्यातील दिलीप चव्हाण (समकालीन भारत : जातीअंताची दिशा), गेल ऑम्वेट (‘Understanding Caste’), सुरज येंगडे (‘Caste Matters’) - ही काही मोजकीच अलीकडची उदाहरणे - यांनी विस्ताराने लिहिले आहे.
अंधश्रद्धेचे निर्मूलन (अंत व्हावा) व्हावे म्हणून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी महाराष्ट्रमध्ये ‘अंनिस’ची मोठी चळवळ उभी केली. शासनाने या संदर्भात काही कायदे केले पाहिजेत इथेपर्यंत त्यांनी दिलेले योगदान खूप महत्त्वाचे ठरले. पण अंधश्रद्धाचे निर्मूलन (अंत) झाले का? होण्याची शक्यता तरी दिसते का निदान? उलट, गेल्या दशकात ती अजूनही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचे भयंकर राक्षसी रूप आपण बघणार आहोत नजीकच्या भविष्यात असंच वाटतं अनेकदा. याचा अंत करण्यासाठी काय करायला हवे? याचा विचार करणारी काही मंडळी व संस्था स्वतःचा जीव धोक्यात घालून आजही काम करत आहेत.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
आजच्या अतिविकसित उत्तरआधुनिक कालखंडामध्येही अमेरिकेत कृष्णवर्णीय लोकांना बऱ्यापैकी छळले जाते. हा छळ वरवर पाहता दिसत नाही. तो भयंकर सटल (पृष्ठभागावर न दिसणारा), आत मुरलेला; सांस्कृतिक असतो. हा इतिहास आपल्याकडेही आहे. तो वरवर पाहता दिसत नसला, तरीही तो उपस्थित आहे. आरक्षणाच्या माध्यमातून तो सुटलेला नाही. मूलतः हा सांस्कृतिक कलह आहे. ‘भेदाचा प्रश्न’ आहे.
एक उदाहरण देतो. आमचे एक प्राचार्य दलित समाजामधले होते. ब्राह्मणाला लाजवेल अशा प्रकारची त्यांची भाषा आहे, ते उत्तम वक्ते आहेत. ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांचे दाखले नेहमी त्यांच्या भाषणात येतात... इतकी त्यांची सांस्कृतिक उंची आहे. हे सर्व ऐकून उच्चवर्णीय प्राध्यापक कुत्सितपणे हसत, त्यांची टिंगलटवाळी करत. तर मुद्दा असा की, ही ‘इतरत्वा’ची, ‘भेद’ कसा ‘जिवंत’ ठेवला जातो, त्याची गोष्ट आहे.
काय वाटते तुम्हाला? जातीअंत होईल? दाभोलकरांनी जीव गमावला. आजही त्यांच्यासारखे अनेक कर्मवीर जीव धोक्यात घालून कार्यरत आहेत.
संस्कृती ही अशा दहशतीच्या वातावरणात आणि भीतीच्या गाभाऱ्यात कधीच विकसित होत नाही. ती श्रीमंत होण्याची किंवा व्हावी वगैरेची स्वप्ने ही फार दूरची.
घाबरलेले जीव खूप आहेत. मीही त्यातला एक आहे/असावा. भीतीच्या सावटात विचार करणारी आणि लिहिणारी माणसे दबत दबत काहीतरी लिहीत असतात (किंवा विषयांतर करून वेगळेच काहीतरी सांगत राहतात. वेगळ्याच विषयावर किंवा हव्या त्या विषयावर निमुटपणे संशोधन, अभ्यास करत राहतात. काही न बोलता). हे विषयांतर म्हणजे त्यांचे झालेले एक प्रकारचे मार्गच्युतिकरणच (Deviation) असते.
पण विचारसरणीचा अंत, इतिहासाचा अंत, कलेचा अंत, सेक्सचा (लैंगिकता किंवा लैंगिक प्रश्न) अंत कसा काय होऊ शकतो?
‘अंताचे संभाषित’ कदाचित या कालखंडामध्ये महत्त्वाचे ‘नसावे’ असे म्हणताही येत नाही/येणारही नाही. पण याची काही कारणमीमांसा मात्र नक्कीच करायला पाहिजे... चर्चा केलीच पाहिजे.
विशेषतः गेल्या तीन दशकांत जगभरातील संस्कृतीचा आणि एकूणच प्रत्येक मानवी अंगाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाने जो प्रवेश केला आहे त्याचा ऑक्टोपसी प्रभाव वाढत चालला आहे; तो पुढेही वाढत जाणार आहे (आज मला प्रत्यक्ष पुस्तक उघडून वाचणारे वाचक दिसत नाहीत जवळपास. म्हणजे त्याचे प्रमाण इतके कमी झाले आहे की, जवळपास सर्वच जण फक्त ऑनलाईनच दिसतात). या सर्वांचा प्रभाव सर्वच मानवी नात्यांवर दिसतो आहे. त्याची गुंतागुंत वाढत चाललेली आहे. आणि सर्वच सामाजिक संस्थांवर हा प्रभाव मोठ्या प्रमाणात पडत आहे/पडत राहणार आहे.
गेल्या ६०-७० वर्षांमध्ये जगाच्या इतिहासातील हे काहीतरी वेगळेच प्रकरण निर्माण झाले आहे (आधुनिकतेनंतरचा जो कालखंड विकसित (Progressing) किंवा विरचित (Deconstructing) होत गेला, त्यात या सर्वांची बीजे सापडतात). यामुळे ‘अंताची भाषा’ उदयाला आली असावी.
सतत कशाचा तरी अंत होत आहे, हा ‘भास’ आहे की, ‘वास्तव’? हे तपासून पाहण्याची गरज आहे.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment