कालिदास आपल्याला आपल्या जगातून उचलतात आणि प्रेमाच्या व सौंदर्याच्या तीव्र संवेदनांनी भारलेल्या जगात घेऊन जातात…
पडघम - साहित्यिक
श्रीनिवास जोशी
  • उजवीकडील चित्र शांताराम आत्माराम सबनीस यांच्या ‘महाराष्ट्र मेघदूत’ (१९३८) या पुस्तकातून साभार
  • Thu , 14 July 2022
  • पडघम साहित्यिक कालिदास Kalidasa कालिदास दिन Kalidasa Din मेघदूत Meghadūta आषाढस्य प्रथम दिवसे Aashadhasya Prathama Divase

३० जूनपासून आषाढाला सुरुवात झाली… आणि आषाढ म्हटला की, अनेकांना महाकवी कालिदासाच्या ‘मेघदूत’ची आठवण येते. ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या त्यातल्या शब्दांना तर ‘मोस्ट कोटेबल कोट’चा दर्जा मिळालाय! आणि ‘मेघदूत’? त्याची ख्याती काय वर्णावी! गेल्या अनेक वर्षांपासून ‘मेघदूत’ मराठीसह जगभरच्या लेखक, कवी, अनुवादक आणि रसिकवाचकांना मोहिनी घालत आले आहे. त्याची ओळख करून देणारे हे सदर कालपासून रोज...

.................................................................................................................................................................

लेखांक तिसरा

पूर्वमेघ

(लेखातला पहिला मूळ संस्कृत श्लोक कालिदासाचा आणि त्याचे अनुवाद अनुक्रमे कुसुमाग्रज, सी.डी. देशमुख आणि शांता शेळके यांचे)

.

जातं वंशे भुवनविदिते पुष्करावर्तकानां

जानामि त्वां प्रकृतिपुरुषं कामरूपं मघोनः ।

तेनार्थित्वं त्वयि विधिवशाद्दूरबन्धुर्गतोऽहं

याच्या मोधा वरमधिगुणे नाधमे लब्धकामा॥

 

कामरूप तूं पुष्करकुलजा, – यक्ष म्हणे त्या घना,

तूं इंद्राचा सचीव, करतों तुझ्यापुढें याचना,

नको अनुग्रह अधमाचा मज त्याहुन वाटे बरी

गुणवंताच्या घरीं निराशा - शल्य तिचें ना मना!

 

जन्मा येशी सुविदित कुळी पुष्करावर्तिकांच्या

इच्छारूपी अमरपतिच्या तू शिरी सेवकांच्या।

दुर्दैवी मी स्वजनविरहीं यामुळें तूज याची

‘ना’ श्रेष्ठांची तरी हि बरवी 'हो' नको दुर्जनाची।।

 

जन्मलास तूं, घना, जाणतों, प्रथित पुष्करावर्तक वंशीं

इंद्राचा तूं प्रधान सेवक, रूप हवें तें धारण करिशी

म्हणुन याचना तुझीच करतों वियुक्त जन मी प्रियेपासुनी

क्षुद्रांच्या उपकारापेक्षां विफलहि बरवी सुजनविनवणी!

मला माहीत आहे की, तू जगप्रसिद्ध अशा पुष्कर आणि आवर्तक या मेघांच्या वंशात जन्मलेला आहेस. शिवाय तू इंद्राचा कामरूपी, असा मुख्य अधिकारी आहेस. तू कुठलाही आकार धारण करू शकतोस. मी माझ्या पत्नीपासून नियतीच्या योगामुळे विलग झालेलो आहे आणि त्यामुळे मी माझी निरोपाची विनंती तुला उद्देशून करत आहे. गुणांनी श्रेष्ठ असलेल्या व्यक्तीला केलेली विनंती नाकारली गेली, तरी ती क्षुद्र व्यक्तीकडून स्वीकारल्या गेलेल्या विनंतीपेक्षा जास्त स्वीकारार्ह असते.

‘कामरूपी’ म्हणजे पाहिजे तो आकार धारण करणारा. सीडींनी त्याचे भाषांतर ‘इच्छारूपी’ अशा चपखल शब्दात केले आहे.

कालिदास विरही यक्षासाठी ‘दूरबन्धु’ असा शब्द वापरतो. प्रेमबंधनापासून दूर असलेला. शांताबाईंनी त्यासाठी ‘वियुक्त’ हा शब्द वापरलेला आहे. आपल्या प्रियेने जो युक्त नाही किंवा प्रेमाने जो युक्त नाही तो वियुक्त! कुसुमाग्रजांची तर गोष्टच वेगळी. ‘कामरूप तू पुष्करकुलजा, यक्ष म्हणे त्या घना’ अशी अत्यंत सुंदर ओळ ते लिहून जातात.

बोरवणकरांनी एक सुंदर टीप दिलेली आहे – “मेघाला ‘मघोनः प्रकृति पुरुषः’ म्हणतात, कारण ‘इंद्र’ ही पाऊस पडणारी देवता मानलेली आहे. अर्थात् इंद्र मेघांकरवी भूतलावर पाऊस पाठवतो, अशी कल्पना केलेली आहे, म्हणून त्याला इंद्राचा ‘प्रकृतिपुरुष’ म्हटले आहे.”

‘प्रकृतिपुरुष’चे भाषांतर कुसुमाग्रजांनी ‘सचिव’ असे केले आहे, तर सीडी त्याला ‘तू अमरपतिच्या’ म्हणजे इंद्राच्या सेवकांच्या शिरी आहेस, असे म्हणतात आणि शांताबाई मेघाला ‘इंद्राचा प्रधान सेवक’ म्हणतात.

.

संतप्तानां त्वमसि शरणं तत्पयोद! प्रियायाः

संदेशं मे हर धनपतिक्रोधविश्लेषितस्य।

गन्तव्या ते वसतिरलका नाम यक्षेश्वराणां

बाह्योद्यानस्थितहरशिरश्चन्द्रिकाधौतहर्म्या॥

 

एक तुझा जळत्या हृदयांना जलवंता, आसरा

विरहदग्ध मी नेशिल का रे, निरोप माझ्या घरा?

जाशिल का अलकेस, शिवेवर धवल शिलामंदिरें

गमे वाहतो त्या शिल्पावर चंद्रकरांचा झरा!

 

संतप्तांचा अससि जलदा आसरा तू, निरोप

कान्तेला दे , विरह घडवी आमुचा स्वामि-कोप।

यक्षेशांचे नगर अलका तेथ जा, सौध जेथ

बाह्योद्यानीं वसतीच हर तच्चंद्रिका द्योतवीत।।

 

जिवा तापल्या तूंच निवविसी, म्हणुनि याचितों, मेघा, तुजला

धनपतिशापें विरहतापल्या निरोप माझा पोंचव सखिला

यक्षांची प्रिय अलकानगरी तिथेंच आहे तुजला जाणें

शिवमस्तकिंच्या चंद्रकलेचें जिथें फुलतसे नित्य चांदणें!

हे मेघा, तू पोळलेल्या लोकांचा आसरा आहेस. म्हणून तू हा माझा संदेश माझ्या प्रियेला मिळावा म्हणून घेऊन जा. मी माझ्या प्रियेपासून धनाचा स्वामी कुबेर याच्या शापामुळे विलग झालेलो आहे. अलकापुरी हे कुबेराचे ठिकाण आहे. तिथे तुला जायचे आहे. या नगरातील घरे शिवाच्या मस्तकावरील चंद्रकोरीमुळे प्रकाशित झालेली असतात. भगवान शिव या नगराच्या बाहेरील उद्यानात ध्यान करत बसलेले असतात.

इथे कालिदासांची सौंदर्यासक्त कल्पनाशक्ती मेघदूतामध्ये तिच्या संपूर्ण ताकदीनिशी पहिल्यांदा प्रकट होते. अलकापुरीच्या बाहेर असलेल्या उद्यानात शिव ध्यान करत बसलेले आहेत आणि त्यांच्या मस्तकीच्या चंद्रकोरीच्या प्रकाशामुळे अलकापुरीतील सर्व प्रासाद उजळून निघालेले आहेत. कालिदास मेघदूतातील या क्षणांपासून आपल्याला आपल्या जगातून उचलतात आणि प्रेमाच्या आणि सौंदर्याच्या तीव्र संवेदनांनी भारलेल्या जगात घेऊन जातात.

कुसुमाग्रज अलकापुरीतील सौंदर्याने भरलेले वातावरण नेमके पकडतात -

“जाशिल का अलकेस, शिवेवर धवल शिलामंदिरें

गमे वाहतो त्या शिल्पावर चंद्रकरांचा झरा!”

चंद्रकरांचा म्हणजे चंद्रकिरणांचा झुळझुळणारा झरा जिथे वाहतो आहे, तिथल्या वातावरणाबद्दल काय बोलावे? तसं बघायला गेलं तर, अलकेच्या बाहेरील उद्यानात बसलेले शिव हे चंद्रकरांच्या झऱ्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत.

मेघदूत हे काव्य सौंदर्य, प्रेम, सृजन आणि अध्यात्म यांचा अतिशय सुंदर मेळ आहे. कुसुमाग्रजांनी चंद्रकरांच्या झऱ्यात शिवाला बघितले. शांताबाईंनासुद्धा शिवापेक्षा त्यांच्या मस्तकावरची चंद्रकला जास्त महत्त्वाची वाटली. सीडी मात्र म्हणाले की, ‘हर’ स्वतः अलकापुरीच्या बाहेरील उद्यानात बसलेले आहेत आणि त्यांची चंद्रिका चमकत आहे.  त्या चंद्रिकेमुळे अलकापुरी मंद प्रकाशात उजळून निघाली आहे, हे सीडींना शिवापुढे तेवढे महत्त्वाचे वाटलेले नाही.

कालिदासने मात्र आपल्या मंदाक्रांत वृत्तात शिव आणि सौंदर्य या दोघांनाही मानाचे स्थान दिलेले आहे. चंद्रिकेचे चांदणे सर्व जगावर पडते. ध्यानस्थ शिवाच्या मस्तकीच्या चंद्रिकेचे चांदणे फक्त यक्षाच्या प्रिय अलकापुरीवर पडते आहे. कालिदासांची सौंदर्यदृष्टी अशी उन्नत आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

.

त्वामारूढं पवनपदवीमुद्गृहीतालकान्ताः

प्रेक्षिष्यन्ते पथिकवनिताः प्रत्ययादाश्वसन्त्यः।

कः संनद्धे विरहविधुरां त्वय्युपेक्षेत जायां

न स्यादन्योऽप्यहमिव जनो यः पराधीनवृत्तिः॥

 

भाळावरुनी सारित कुंतल पथिकाच्या कामिनी

नीलपथीं तुज पाहतील मन आश्वासित होउनी,

घनागमीं रे विरहार्तांची विरहदशा संपते,

मीच अभागी, पराधीन मजपरी न कोणी जनीं!

 

वातारूढा बघतिल तुला पान्थ-दारा, स्वहस्तें

केशाग्रांना उचलुनि, मनीं धीर येई तयांतें।

येसी केव्हा कवण विरहीं स्त्रीस सोडोनि राही

माझें तैसें परवश जिणें निश्चयें ना कुणाही।।

 

वाऱ्यावर तूं वाहत जातां केश आपुले मागें सारुन

वाटसरूंच्या स्त्रिया पाहतिल विश्वासें तुज अति आनंदुन

दर्शन होतां तुझें उपेक्षिल कोण आपुली प्रिया विरहिणी?

मी तर असला पराधीन जन, मजसम दुःखी असेल कां कुणि?

जेव्हा तू वायूपंथाने आकाशातून जाऊ लागशील, तेव्हा प्रवासाला गेलेल्या पुरुषांच्या स्त्रिया आपल्या केशांच्या बटा सावरत तुझ्याकडे अत्यंत उत्कंठेने बघू लागतील. तू आकाशात उगवल्यावर विरहाने व्याकूळ झालेल्या आपल्या पत्नीची उपेक्षा कोण करेल? माझ्यासारखा एखादा पराधीन आणि दुःखी माणूस या जगात दुसरा कोण असेल?

खरंच आहे, वर्षामेघ आपल्या संपूर्ण सौंदर्याने आकाशातून जाऊ लागला की, सगळे वातावरण उत्फुल्ल होऊन जाते. अशा वेळी आपल्या प्रेयसीची आठवण होणार नाही, असा कोण प्रियकर असेल? त्या पथिकांच्या स्त्रियांना हे माहीत आहे. पूर्वानुभवामुळे मेघ आले की, आपले प्रियकर आपल्यापासून दूर राहू शकत नाहीत, हे त्यांना माहीत आहे आणि म्हणून अतिशय उत्कंठेने त्या मेघाकडे पाहत आहेत. हा सगळा आशय आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कुसुमाग्रज एक सुंदर ओळ लिहितात -

“घनागमीं रे विरहार्तांची विरहदशा संपते”

त्या आधीच्या दोन ओळीसुद्धा अत्यंत सुंदर आहेत

“भाळावरुनी सारित कुंतल पथिकाच्या कामिनी

नीलपथीं तुज पाहतील मन आश्वासित होउनी”

निळ्या आकाशामध्ये भरून येणाऱ्या म्हणजे आकाशाच्या नीलपथावरून चाललेल्या, मेघाला आपले केस कपाळावरून दूर सारत कामाची अपेक्षा करणाऱ्या त्या कामिनी अत्यंत उत्कंठेने बघत आहेत.

.

मन्दं मन्दं नुदति पवनश्चानुकूलो यथा त्वां

वामश्चायं नदति मधुरं चातकस्ते सगन्धः।

गर्भाधानक्षणपरिचयान्नूनमाबद्धमालाः

सेविष्यन्ते नयनसुभगं खे भवन्तं बलाकाः॥

 

मंद गतीनें वाऱ्यावरती जाशिल तूं जेधवां

हर्षभरें हा करील चातक मंजुळ गीतोत्सवा,

गर्भाधानक्षणाचीं चित्रें कल्पित हृदयंगम

धवल पक्षिणींचा तुजपुढती येइल सुंदर थवा!

 

प्रेरी मार्गी हळुहळु तुला वायु जैसा सुखाचा

वामांगाने मधुर रव हो संगती चातकाचा

गर्भाधानक्षण उमजुनी अंतरिक्षी सुरेखा

तूझ्या संगे उडतिल नभी मालिकेने बलाका

 

शांताबाईंच्या भाषांतरात या श्लोकाचा अंतर्भाव केलेला नाही.

अनुकूल असलेला वारा तुला हळूहळू पुढे नेत राहील. त्या वेळी चैतन्याने भारलेला चातक पक्षी तुझ्या डाव्या बाजूने अत्यंत मधूर असे कूजन करत राहील. गर्भाधानक्षणाचा म्हणजे मीलनाचा अनुभव असलेल्या बलाक पक्षिणी अत्यंत आनंदाने तुझ्याबरोबर मालिका करून उडत राहतील. तुझी सेवा करत राहतील. तुला साथ देत राहतील.

मेघाच्या आगमनामुळे बलाक पक्षिणींची अवस्था पथिक-वनितांसारखीच झालेली आहे. त्याही मीलन सुखाच्या कल्पनेत रमून गेलेल्या आहेत.

हे सगळे वातावरण सीडींनी अतिशय सुंदर पकडलेले आहे-

“गर्भाधानक्षण उमजुनी अंतरिक्षी सुरेखा

तूझ्या संगे उडतिल नभी मालिकेने बलाका”

चंद्रा राजन लिहितात -

“hen-cranes will know the time ripe for mating and rejoice when they note in the sky your eye-delighting presence…”

१०.

तां चावश्यं दिवसगणनातत्परामेकपत्नी -

मव्यापन्नामविहतगतिर्द्रक्ष्यसि भ्रातृजायाम्।

आशाबन्धः कुसुमसदृशं प्रायशो ह्यङ्गनानां

सद्यःपाति प्रणयि हृदयं विप्रयोगे रुणद्धि॥

 

बंधुसखी तव दिसेल तुजला अविहत जाशिल

जरी दिवसामागुन दिवस मोजते, झुरते जरि अंतरीं!

कुसुमासम रमणींचीं हृदये कोमल, कोमेजती

विरहानें, पण आशाबंधन त्यांस सदा सावरी!

 

मार्गान्तीं ती खचित तुजला भ्रातृजाया दिसेल

आहे जीवा धरुनि, दिवसां मोजुनि भतृशील ।

स्त्रीचें प्रेमी हृदय विरहीं जें फुलाचे समान

जावें प्राया झणिं गळुनि त्या ठेवि आशा धरून।।

 

अनिर्वेध तूं जातां ऐसा, घना, पाहशिल अपुली वहिनी

एक एक दिन मोजुनियां जी काळ कंठितां असेल शिणली

ललनाहृदयें विगलित होती फुलांपरी ती कोमल जात्या

आशातंतू चिवट परन्तू वियोगकालीं सावरितो त्या!

आणि तू, तुझ्या मार्गावर अविचल जात राहिलास तर तुला तुझ्या या भावाची पतिव्रता पत्नी विरहाचे उरलेले दिवस मोजत कसाबसा जीव धारण केलेल्या अवस्थेत दिसेल. आशाबंधन हे स्त्रियांच्या फुलांसारख्या अत्यंत कोमल आणि प्रेमाने संपृक्त असलेल्या हृदयाला तगूवून ठेवते. नाहीतर, स्त्रियांचे हृदय विरहाने कोणत्याही क्षणी खचून जाणारे असते.

शांताबाईंनी इथे ‘विगलित होती’ असा शब्दप्रयोग केला आहे. म्हणजे पाघळणे.

खरं तर अनेक विद्वान हा श्लोक ग्राह्य धरत नाहीत. आताशी प्रवास सुरू झाला आहे. इतक्यात मेघ यक्षाच्या पत्नीपर्यंत कसा पोहोचला? रामचंद्र बोरवणकर आणि चंद्रा राजन यांनी या श्लोकाचा अंतर्भाव त्यांच्या भाषांतरात केलेला नाही.

..................................................................................................................................................................

लेखांक पहिला : कालिदासाच्या काव्यातील एकेक श्लोक सौंदर्यवंत ऐरावतासारखा झुलत राहतो, आणि त्यावर आशयाचा ऐश्वर्यमान इंद्र आरूढ झालेला असतो!

लेखांक दुसरा : उत्कंठा उत्पन्न करणाऱ्या त्या मेघासमोर यक्ष आपले अश्रू आवरत कसाबसा उभा राहिला…

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शारीर प्रेम न करता शार्लट आणि शॉचे प्रेम ४५ वर्षे टिकले आणि दोघांनीही असंख्य अफेअर्स करूनही सार्त्र आणि सीमोनचे प्रेम ५४ वर्षे टिकले! (पूर्वार्ध)

किटीवर निरतिशय प्रेम असताना लेव्हिन आनाचे पोर्ट्रेट बघून हादरून गेला. तिला बघितल्यावर, तिची अमर्याद ग्रेस त्याला हलवून गेली. आनाला कुठले तरी सत्य स्पर्शून गेले आहे, हे त्याला जाणवले. आनाबद्दल त्याच्या मनात भावना तयार व्हायला लागल्या. त्याला एकदम किटीची आठवण आली. त्याला गिल्टी वाटू लागले. ही सौंदर्याची ताकद! शारीरिक आणि भावनिक आणि तात्त्विक सौंदर्य समोर आले की, काहीतरी विलक्षण घडू लागते.......

प्रश्न कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो तोंडावर आपटतात की काय याचा नाही. प्रश्न आहे, आपण आणि आपली लोकशाही सतत दात पाडून घेणार की काय, हा...

३० जानेवारीला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने, उलट कॅनडाच भारताच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला आहे. पण याचे आपल्या माध्यमांना काय? त्यांनी अपमाहिती मोहिमेबद्दल जे म्हटले गेले, ते हत्याप्रकरणाशी जोडून टाकले. त्यांच्या बातम्यांचे मथळे पाहता कोणासही असे वाटावे की, या अहवालाने ट्रुडोंचे तोंड फोडले. भारताला निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र मिळाले. प्रोपगंडा चालतो तो असा. अर्धसत्ये आणि अपमाहितीवर.......